Thursday, 20 March 2014

वंगरंगी रंगले मी -ग्रीष्म

दिनांक २२ मार्च ..कोलकात्यातला नेहमीचा दिवस तशी उन तापायला सुरुवात तर सकाळी ६.३० पासूनच होते. पण त्या दिवशी दुपारी तापमान अचानक इतके वाढले, की दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये रकानेच्या रकाने भरून माहिती ओसंडत राहिली. सर्वात तप्त २२ मार्च म्हणून त्याची नोंद पण झाली. मग त्या निमित्ताने आधी कधी मार्च मध्ये एवढे तापमान वाढले होते का? आताच एवढे तापमान वाढण्याचे काय कारण? अशी चर्चेला सुरुवात होत होत गाडी ग्लोबल वॉर्मिंगपर्यंत येऊन ठेपली. जेव्हा प्रत्यक्षात आपल्या राहणीमानात काहीही बदल न करता नुसतीच चर्चा करायची असते तेव्हा चर्चा जास्त रंगते हा नेहमीचा अनुभव परत एकदा आला!!!!

ही सारी चर्चा चालू असताना कोणाच्या ध्यानीमनीही नसेल की ज्या दिवशी ही चर्चा करत होतो तो २३ मार्च २०१० हा नुसता तप्तच नव्हे तर रणरणता, भीषण, काळी छाया ठेवून जाणारा असा दिवस ठरणार आहे. दुपारीच भावाचा फोन आला की तू पार्क स्ट्रीट्च्या जवळ तर रहात नाहीस ना? टी.व्ही.वर बातम्यात त्याला, भले मोठ्ठे कुंकू लावलेली एक जाडजूड बाई मोबाईल वर बोलताना दिसली होती. ती मी असण्याची बरीच शक्यता आहे ह्या शंकेने त्याने फोन केला तर नेमका माझा फोन लागत नव्हता. म्हणून तो अस्वस्थ होता. मी विचारले पण बातमी काय होती? तर त्याने सांगितले की पार्क स्ट्रीटला एका इमारतीला प्रचंड आग लागली आहे. अग्निशामक दल कसो्शीने प्रयत्न करत आहे, पण आग आटोक्यात येत नाहीये.

ती इमारत होती स्टिफन कोर्ट. गेल्या शतकाच्या पहिल्या दुसऱ्या दशकात बांधली गेलेली पार्क स्ट्रीटवरील एक नामांकित इमारत. आता पार्क स्ट्रीटचे महत्व काय हे जाणायचे असेल तर एवढेच म्हणता येईल की हा सिंगापूरचा ऑर्चर्ड स्ट्रीट आहे. लक्ष्मीवंत आणि प्रतिभावंतांना तसेच रंगीन आयुष्याची आवड असणाऱ्यांनाही सारखाच हवासा असणारा. याचे अनेक जुन्या, देखण्या इमारतींनी बनलेले असे स्वत:चे खास व्यक्तीमत्व आहे. गेल्या शतकात ह्या स्ट्रीटला त्याचे व्यक्तिमत्व बहाल करण्यात अ‍ॅंग्लो इन्डिअन्स, आर्मेनियन्स आणि ज्यूंचा मोठा सहभाग होता. अराथून स्टीफन हा त्यांच्यापैकीच एक. कोलकात्यातील सुप्रसिद्ध ग्रॅंड हॉटेल व इतर अनेक इमा्रतींचा मालक. स्टीफ़न कोर्ट ही त्याचेच नाव धारण करणारी इमारत. 

 एकेकाळी अत्यंत वैभवशाली असणारी ही इमारत काळाच्या ओघात बदलत गेली. अनेक कार्यालये तिथे छोट्याछोट्या जागेत कोंबली गेली. पहिली शान राखणे तर सोडाच, इमारतीची निगराणी पण करणे सगळे विसरून गेले

 मंगळवार-२३ मार्च- अराथून स्टीफनच्या स्टिफन कोर्ट मधे खानदानी रुबाबात रहाणाऱ्या, श्रीमंत, सुस्वभावी, नातीने ८४ व्या वर्षात पदार्पण केले. सकाळ उजाडली ती वाढदिवसाने आणि संध्याकाळी ती वृद्धा आपल्या वयोवृद्ध पतीसह, जळणाऱ्या इमारतीकडे भकास नजरेने पहात अक्षरश: रस्त्यावर बसलेली होती. दुसऱ्या दिवशी ज्या निराधार आर्मेनियनांसाठी असणाऱ्या वृद्धाश्रमाने त्यांना आसरा दिला होता, त्या वृद्धाश्रमातून निसटून परत ते विकल जोडपे आपल्या उजाड घरासमोर येऊन उभे होते. आता त्या दोघांचीही दुनिया आहे दु:ख, वेदना आणि चित्र-विचित्र भासांनी व्यापले्ली.

ते दोघे जीवानिशी वाचले म्हणून खुश व्हावे, कारण इतर अनेक जीव तेवढे सुदैवी ठरले नाहीत. उंच इमारतीतील दुर्घटनेच्या वेळी उपयोगी पडेल अशा साधन सामुग्रीचा अग्निशामक दलाकडे असलेला अभाव अनेक जीव घेउन गेला. उंच शिड्या यायला झालेला उशीर, जीवरक्षक गाद्यांची अनुपलब्धी ह्यामूळे उंचावरून उड्या टाकणाऱ्यांचे प्राण गेले. आगीत जळालेल्यांची तर कथाच वेगळी. गच्चीकडे जाणाऱ्या जिन्याकडे, जीवाच्या निकराने धावलेले अनेक जण सापडले ते दुसऱ्या दिवशी कोळसा झालेल्या सांगाड्यांच्या रूपात. बहुमजली इमारतीचे गच्चीचे दार उघडे पाहिजे हा साधा नियमही पाळला गेला नव्हता. कारण गच्चीत केबल्सचे जाळे उभारणाऱ्या कंपनीकडून ट्रस्टला भाडे मिळत होते. गच्चीत जाऊन प्राण वाचायची शेवटची आशा त्या कुलूपाबरोबरच मावळली हो्ती.

मृत्यूने झडप घातलेल्या अनेक तरुण जीवांच्या करुण कहाण्या कित्येक दिवस ऐकू येत राहिल्या. कित्येक दिवस मृतदेह सापडत राहिले. इमारतीवर हिंडणारी गिधाडे मृत्यू-छाया अधिकच गडद करत होती. काही मृतदेहांचा तर ठावठिकाणा लागला तो मातीच्या ढिगाऱ्यातून चाललेली मुंग्यांची रांग दिसल्याने. मृतदेह ओळखू येण्याच्या पलिकडे जळलेले, त्यामुळॆ त्यावरून मृतांच्या नातेवाईकांची भांडणे, त्या मृतदेहांवर लागणाऱ्या नावाच्या चिठ्ठ्यांमधला सरकारी सावळागोंधळ. त्याला सावळागोंधळ म्हणणे हेच बरे, कारण त्यातही भ्रष्टाचार होऊ शकतो, होतो ही कल्पनादेखील सहन न होण्याजोगी.

जीवरक्षक गाद्या कुठे होत्या? तर कोऱ्याच्या कोऱ्या एका गोडाऊन मधे पडून होत्या. कारण अजून त्यासंबंधीची कार्यालयीन कारवाई पुरी झालेली नव्हती. दुर्घटनांचा सामना करण्यासाठी असलेला अर्धा निधी अजून वापरलेलाच गेला नाहीये. अग्निशामक दलाच्या जवानांकडे अग्निरोधक पो्षाख, हेल्मेट्स, ऑक्सीजन सिलेंडर्स पुरेशा संख्येत नाहीयेत ते वेगळेच.

त्या इमारतीच्या वरच्या मजल्यांना, जे नुकतेच २५/३० वर्षा्पूर्वी बांधले गेले, त्यांना परवानगी कोणी दिली, का व कशी दिली ह्याचे चर्वितचरण चालू आहे. सगळ्यात विचित्र म्हणजे ह्या इमारतीचे मालक कोण ह्याबाबतच गोंधळ आहे. ट्रस्ट्चे ट्रस्टीज तेव्हापासून कोलकात्यात फ़िरकले नाहीयेत. बिल्डर्सनी आपली जबाबदारी झटकलेली आहे. ज्याने हे बांधकाम केले हे सर्वांना माहिती आहे, तो सांगतो की माझे नाव कोणत्याही कागदपत्रांवर नाही. मग मला कसे दोषी धरणार?

काही दिवसांत ही चर्चा थांबेल, कारणीभूत असणारे लोक उजळ माथ्याने वावरू लागतील. स्टीफ़न कोर्ट सारख्याच जुन्या अनेक इमारती कोलकाता शहरात आहेत, त्या तशाच, कोणत्याही सुरक्षेच्या उपायांविना वापरल्या जातील, अनेक बेकायदेशीर बांधकामांना परवानगी मिळत राहील. अनेक धोकादायक इमारती पाडण्याचे आदेश राजकीय हस्तक्षेपांमुळॆ रोखले जातील. कागदावर अस्तित्वातच नसलेल्या इमारती प्रत्यक्षात गजबजत रहातील. मृत्यूचे जाळे विणत रहातील.

ह्या साऱ्या दुर्दैवी घटनेमधला मानवी सहभाग किती? होणाऱ्या हानीची तीव्रता कमी करता आली असती का? हा सगळा विचार कधी व कोण करणार?

सामाजिक नीतिमत्ता, चारित्र्य या दंतकथा आहेत की काय असा संभ्रम निर्माण होतो आहे. आज "मी आणि माझा स्वार्थ " ही चलनी नाणी आहेत. राजकारण तर गलिच्छ होत चाललेले आहेच पण समाजकारणात देखील राजकारण घुसलेले आहे. आज स्वार्थापायी कोणत्याही समाजविघातक गोष्टींना परवानगी मिळू शकते. त्याचे दूरगामी परिणाम काय होणार आहेत ह्याचा विचार करायला वेळ आहे कोणाकडे? आज पदांसाठी नियुक्त्या होतात त्या एखाद्या माणसाची योग्यता, त्याची त्या कामावरची निष्ठा बघून नव्हे, तर हा माणूस ह्या पदावर असणे " मला " किती उपयोगाचे /त्रासाचे आहे ह्यावरून. लोककल्याणकारी कामे उभी व्हावीत ह्याची आच तर विस्मृतीतच जमा आहे.

ह्या सा्ऱयाचा भारताच्या बाहेर असणाऱ्या भारतीयांशी काय संबंध? त्यांना हे सारे वाचून, ऐकून काय करायचे आहे? हे ज्याचे त्यानेच ठरवायला हवे.

इथे सहज आठवले म्हणून सांगते. मध्यंतरी माझी एक मैत्रीण सांगत होती की काही विशिष्ट सरकारी कार्यालयातील लोकांना जून, जुलै, ऑगस्ट हे महिने म्हणे सुगीचे असतात. भारत कृषिप्रधान देश आहे असे पाठ्यपुस्तकात वाचल्याचे मला्ही आठवत होते. पण पावसाच्या महिन्यांचा सरकारी कामकाजाशी असलेला प्रत्यक्ष संबंध पाहून मी माझे मन अगदी उचंबळूनच आले. 

खूश होत मी विचारले, "कसा?" 

तिच्या उत्तराने मात्र मला एकदम जमिनीवर आणले.ती म्हणाली,"त्या महिन्यांत एकतर सगळ्या अ‍ॅडमिशन्स चालू असतात. त्यामूळॆ बोनाफ़ाईड, डोमिसाईल सर्टिफ़िकेट्स वि्द्यार्थ्यांना घाईने हवी असतात. शिवाय त्याच सुमारास परदेशी असलेली भारतीय मंडळी सुट्ट्यांसाठी मायदेशी आलेी असतात. त्यांनाही वेगवेगळ्या प्रकारची कामे, सरकारी कार्यालयांतून करवून घ्यायची असतात. अर्थातच त्यांच्या वेळाची किंमत ही स्थानिक भारतीयांपेक्षा कित्येक पटीने जास्त.तेव्हा....सुगीच नाही का?"

आज हे सारे लिहित असतानाच बातमी आली आहे, ती दंतेवाडाची. दंतेवाडा, चिंतलनार, सुकमा ही नावे आपल्या साऱयांना माहिती झाली ती एका दुर्दैवी घटनेने. नक्षलवाद्यांनी राखीव पोलिस दलाच्या जवानांवर केलेल्या क्रूर हल्ल्यामूळे. ७६ हा प्राण गमावलेल्या जवानांचा आज सरकारी सूत्रांनी प्रसिद्ध केलेला आकडा आहे. १००० नक्षलवादी राखीव पोलीस दलाच्या जवानांना घेरून मारतात आणि एवढे १००० जण तिथे पोचेपर्यंत कोणालाही खबर लागत नाही हे अद्भुतच नव्हे का? आपले राजकीय हितसंबंध राखण्यासाठी फोफावू दिलेली विषवल्ली अखेर भस्मासूरच बनते हा अनेकदा शिकून झालेला आणि तरीही हेतूपुरस्सर विस्मरणात घालवलेला धडा, पुन्हा एकदा अनेक जवानांच्या प्राणांची आहुती देऊन गिरवला जातोय.

 एवढे सगळे होऊनही आजच्या अग्रगण्य मराठी दैनिकाची हेडलाईन आहे, "शोएब-आयेशाची फ़िक्स्ड डबल्स १५ कोटींची"!!! कोणाला कशाचे महत्व वाटेल खरेच सांगता येत नाही.

 ज्या नक्षलवादाच्या हिंसेचे आणि सामूहिक कत्तलकांडाचे आपण दंतेवाडात पुन्हा एकदा प्रत्यंतर घेतले, त्या सशस्त्र क्रांति वादी नक्षलवादाचे प्रणेते असणाऱ्या कनू संन्याल यांनी प.बंगालधील एका खेड्यात २३ मार्च ला आत्महत्या केली. गेल्या काही वर्षात नक्षलवादाने घेतलेल्या वळणाने कनू संन्याल यांचा भ्रमनिरास झाला होता असे बातम्यांत वाचले.

अखिल भारतीय मरा्ठी साहित्य संमेलनाच्या आधी केवळ ३/४ दिवस ही घटना घड्ली. श्रद्धांजलीचा मसुदा तयार होऊन समारोपाच्या सत्रात कनू संन्याल यांना श्रद्धांजली वाहिली गेली. त्या आधी महिनाभर निधन पावलेले, अनेक लोककल्याणकारी कामे उभे करणारे, महाराष्ट्राचे पुत्र असणारे नानाजी देशमूख वा जर्मन बेकरी स्फोटात मरण पावलेले अश्राप पुणेकर यांची मात्र साहित्य संमेलनाने दखली घेतली नाही असेही बातम्यांतच वाचले. अखेर कोणाला कशाचे तर कोणाला कशाचे महत्व हेच खरे.

ऋतूगंधचा हा पर्यावरण विशेषांक आहे. पर्यावरण, आपली बदलती जी्वनप्रणाली, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादि विषयांवर नक्कीच लिहिले जाईल. पण नैसर्गिक पर्यावरणा्चे जतन करण्याबरोबरच सामाजिक पर्यावरणाचे पण संगोपन करणे तितकेच आवश्यक असल्यामूळे "वंगरंगी रंगताना" मध्ये हे सारे विषय येणे महत्वाचे वाटले.

एवढे सारे लिहून झाल्यावर/ देखील/ सुद्धा नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा. इथे "पोइला बैशाख" जवळ आला आहे. तुमच्या हातात हा अंक पडेपर्यंत तर उलटूनही गेला असेल. इथे वंगदेशी नववर्ष चैत्राऐवजी वैशाखात सुरू होते. (ह्यांचे वर्षच मूळी उशिरा सुरू होते, त्यामूळेच हे लोक सारीच कामे धिम्या गतीने करत असावेत असा मला दाट संशय आहे!)

सध्या भारतात आ्यपीएल नावाचा एक चमचमता, चंदेरी करमणूकीचा प्रकार आला आहे. बरेच जण त्याला क्रिकेट असेही म्हणतात. कोलकाता नाईट राइडर्स ची मॅच, इथल्या भाषेत "खेला" असेल तर मग पहायलाच नको. तर अशाच एका खेला असणाऱ्या दिवशीची ही गोष्ट. आमच्या शेजारीच एक भला प्रचंड मॉल आहे. ज्याला सिंगापूरला अ‍ॅट्रियम म्हणतात तो मधला प्रशस्त चौक! त्या चौकात भला मो्ठा स्क्रीन लावलेला. तिन्ही बाजूने चारी मजल्यांवर लोक गर्दी करून उभे. त्या जमलेल्या लोकांतली प्रेक्षणीय स्थळे टिपणारे तर स्क्रीनच्या मागच्या बाजूलाही उभे. कोलकाता नाईट राइडर्सची मॅच. दस्तूरखुद्द दादा फलंदाजीला उभे. चेंडू आला् की प्रेक्षकांतून रोलर कोस्टर वर बसल्यावर ओरडतात तशा आरोळ्या. दादाने देखील निराश केले नाही. पहिल्याच चेंडू वर चौका. परत एका चेंडूनंतर चौका. प्रेक्षकांना झपाटून टाकणारा उत्साह ...... आरोळ्या..शिट्ट्य़ा. एकदम सही अनुभव. सामूहिक ऊर्जेचा आविष्कार नेहमीच चैतन्यदायी असतो.


-खास ऋतुगंधसाठी,वंगभूमीतून, वृंदा टिळक.

ऋतुगंध ग्रीष्म -२०१०


No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...