Wednesday, 26 March 2014

परंपरा

मंदिराच्या १०८ पायऱ्या, पायऱ्यांवरचा मखमली गालिचा
गाभाऱ्या्तील तोरणे, देवीची वाडी, 
घमघमणारा सुगंध फ़ुलांचा. 
नवरात्रात जहागिरदारांचा मुक्काम मंदिराशेजारच्या वाड्यातच असायचा
  ...म्हणजे परंपराच होती तशी. 

तिची सासू बोर्ड मीटिग्जना ट्राउझर्स अन
पार्टी मिटींग्जना कडक स्टार्च च्या साड्या नेसायची
नवरात्रात मात्र शालू, शेले, पैठण्या लेऊन खानदानी रुबाबात वावरायची
नऊ दिवस श्रद्धापूर्वक अभिषेक, पूजा अर्चा उपास करायची
 ...म्हणजे परंपराच होती तशी. 

उत्सुक नेत्रांनी ती सारे टिपत होती
ब्राम्हण भोजने, सदावर्ते चालू होती, 
नवमीला तर गावातल्या सर्व कुमारिकांना बोलावून कुमारीपुजनाची रीत होती
 ...म्हणजे परंपराच होती तशी. 

तिची नुकतीच गर्भ-जल परिक्षा झाली होती. 
लॅब मधून परस्पर सासूकडे गेलेला रिपोर्ट वाचताना सासूची मुद्रा बदलली होती. 
नवरात्र संपताच नव्या सुनेला विश्रांतीसाठी दवाखान्यात अपॉइंट्मेंट घेतली गेली होती. 
गेल्या चार पि्ढ्यात त्यांच्या घराण्यात मुलगी जन्माला आली नव्हती. 
...म्हणजे परंपराच होती तशी. 

-वृंदा टिळक

x

No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...