आज म्हणजे दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ ला ठाण्यातील नागरिकांच्या वतीने स्व. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे ह्यांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने मी जाणार हे निश्चित झाले होते. पण काही अपरिहार्य कारणामुळे मला कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही.
बाबासाहेबांविषयीच्या भावना शब्दांत मांडता येणे अवघड आहे. ह्या आधीही लिहिले आहे मी त्यांच्याविषयी. आजही लिहिते आहे आणि तरी कितीतरी उरलेच आहे.
त्यांचा प्रत्येक श्वास
घेऊन एकच स्वप्न खास
करुनी उदंड अभ्यास
शिवध्यास शिवध्यास
गुंजली ओजस्वी वाणी
करुनी शिवभक्तीची पेरणी
तळपली त्यांची लेखणी
फक्त शिवरायांचे चरणी
कथा कादंबरी ललित लेखन
शिवरायांचे चरित्र लेखन
शिवमहिमा करिता वर्णन
उमटले शिवभक्तीचे गान
एकमेकाद्वितीय जाणता राजा
गौरवले शिवाजी महाराजा
वंदिले हिंदवी स्वराज्या
श्रद्धाभक्तीने नाट्य होई सादर
राज दरबारी मिळावा मान?
लाभावे पुरस्कार सन्मान?
संमेलन अध्यक्षपदाचा मान?
कशाचीच नव्हती त्यांना तहान.
नव्हती कोणतीच अपेक्षा
करा स्तुती, निंदा वा उपेक्षा
मनाचा तोल ढळू न देता
घ्यावी स्थितप्रज्ञत्वाची दीक्षा
ते बोलले नेहमीच खरे
नित्य वागले साजिरे
अपुल्या योगे कोण्या मनी
पडू न दिले कधी चरे
भू मंडळासी पडले
स्वप्न एक शुभंकर
शतायुषी भव वदते झाले
सारे चराचर
काय करावे गौरव गान
बाबासाहेबांचे वर्णन
अद्वितीय समाजभान
समरसतेचे घडे दर्शन
शिवशाहीर पद्मविभूषण
साहित्यिक महाराष्ट्र भूषण
स्वातंत्र्यसमरी तन मन धन
अर्पूनी केले राष्ट्राचे पूजन.
बाबासाहेबांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाविषयी आपण सगळे जाणतो. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम त्यात भर घालून त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिली होती. त्यांच्या लेखन व व्याख्यानातून मिळालेल्या धनातील काही भाग त्यांनी कौशिकाश्रम ट्रस्टला दिला होता. आत्ता आत्तापर्यंत ते कौशिकाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष होते.
कौशिकाश्रम ट्रस्ट काय आहे? ज्या कार्यकर्त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक कामासाठीच वेचले आहे, वैयक्तिक जीवनाचा पूर्ण लोप केला आहे आणि ज्यांना वयोमानानुसार आता प्रवास करणे शक्य नाही अशा कार्यकर्त्यांचे विश्रांतीस्थान व निवासस्थान आहे.
शिवशाहीर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे शब्द ओजस्वी होते आणि उत्कट भाव वाचकांपर्यंत पोचवण्यास समर्थ होते. सरस्वतीच्या आणि भवानीमातेच्या कृपेने हे शब्द धन त्यांना लाभले होते. हे शब्द धन वेचून मिळालेला पैसा त्यांनी सामाजिक कामांसाठी उदारहस्ते दिला.. असे समाजभान जपणाऱ्या लोकविलक्षण व्यक्तिमत्वाला मानवंदना!


