Saturday, 1 November 2025

सर्वाना समृद्ध करणारे आनंदघन - प्रल्हादजी अभ्यंकर”

“सर्वाना समृद्ध करणारे आनंदघन - प्रल्हादजी अभ्यंकर”

३०/३५ वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही गंगोत्रीला पोचलो तेव्हा रात्रीच्या सघन अंधारात, गंगेच्या प्रवाहाचा खळखळ आवाज तेवढा ऐकू आला! दुसऱ्या दिवशी तांबडे फुटताच दिसला गंगेचा निर्मल कोवळा प्रवाह.
थोड्यावेळाने गंगामंदिराच्या जवळ गेलो. लहानमोठे प्लास्टिकचे डबे, बाटल्या, स्टीलचे, तांब्याचे गडू दुकानांत विकायला ठेवलेले होते. आपापल्या ऐपतीनुसार ते घेऊन मंत्रोच्चारासमवेत त्यात गंगाजल भरले जात होते. 
माझ्या बाबांवर म्हणजे प्रल्हाद सीताराम अभ्यंकर ह्यांच्यावर लेख लिहिताना आज तसेच वाटते आहे. लहानपणीच लक्षात आले की आपले बाबा बाकी मैत्रिणींच्या बाबांपेक्षा वेगळे आहेत. त्यांचे बाबा रोज घरी येतात. आपले बाबा अधूनमधून घरी येतात. जेव्हा ते घरात असतात तेव्हा खूप लोक त्यांना भेटायला आलेले असतात. इथे त्यांचे संघाचे काम, अंधारात ऐकू आलेल्या गंगेच्या खळखळाटाप्रमाणे नुसते जाणवले होते. 
 थोडे कळायला लागल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे काय? बाबा संघाचे काम करतात म्हणजे काय करतात? हे हळूहळू लक्षात येऊ लागले. अजून जाणतं झाल्यावर संघाची आणि बाबांच्या कामाची खरी ओळख आणि व्याप्ती पटू लागली. 
कोणत्याही पात्रात भरले गेले तरी गंगाजल हे पवित्रच राहते. तसेच लिहिणाऱ्याच्या कुवतीनुसार संघ कार्यकर्त्याचे काम, कामाचे महत्व कमीजास्त होत नाही. ते अक्षयच असते या भावनेनेच हा लेख लिहिते आहे.
गेले शंभर वर्षे अविरत वाहत असलेला संघ सरितेचा प्रवाह करोडो स्वयंसेवकांनी आपल्या त्यागाने, निष्ठेने आणि समर्पणाने समृद्ध केला आहे. नाव, पद, पैसा ह्यांची अपेक्षा न करता, राष्ट्र्राला परमवैभवाला नेण्याचा ध्यास घेऊन आयुष्यभर काम करत राहणारे असंख्य स्वयंसेवक आपल्याला अक्षरशः चकित करून टाकतात. त्यांची वैयक्तिक सुखदुःखे, आशाआकांक्षा ह्यांचा जणू त्यांना विसरच पडलेला असतो. इतकी आत्मविलोपी आयुष्ये असू शकतात का असा कोणाला प्रश्न पडला तर त्यांनी स्वयंसेवकांचे आयुष्य पाहावे! प्रल्हादजी अभ्यंकर ह्या असंख्य स्वयंसेवकांपैकीच एक! 
आपल्या व्यक्तीवैशिष्ट्याने ह्या संपूर्ण समुदायाची उन्नती करण्याचा प्रयत्न, वेगळे उठून दिसण्याचा प्रयास न करता, त्यात मिसळून जाऊन कसा करता येईल हे शिकण्यासाठी अनेक गुणाढ्य संघकार्यकर्त्यांची आयुष्ये अभ्यासता येतील. प्रल्हादजींचे बोलणे, वागणे हे त्याचेच उदाहरण!
त्यांचे वेगळेपण हे असू शकते की त्यांनी सर्व भूमिकांतून संघाचे काम केले आहे.  शाखेकडे कुतूहलाने पाहणारा नवयुवक शाखेत जायला लागला. स्वयंसेवक झाला, गटप्रमुख, शिक्षक, कार्यवाह, मुंबई जिल्हा प्रचारक, मुंबई जिल्हा कार्यवाह, संसारी कार्यकर्ता, विभाग संघचालक, सह प्रांत संघचालक, प्रांत संघचालक, पुन्हा सहप्रान्तसंघचालक, कार्यकारिणी सदस्य, वानप्रस्थी कार्यकर्ता असे सगळे झाला. सत्याग्रहात भाग घेऊन झाला. १९७९पर्यंत तीनचारदा तुरुंगवासही भोगून झाला. 
भौगोलिक क्षेत्राचे म्हणाल तर नेऊरगाव अगदी लहान खेडेगाव. तिथून मुंबईत आल्यावर त्यांचा संघाशी परिचय झाला आणि तिथेच ते संघकामात मुरले देखील. 
नंतर संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत राहिले. प्रसंग पडला तर शारीरिक शक्तीच्या बळावर विरोधकांना अद्दल घडवू शकणारा बलदंड युवक ते संघाची वैचारिक भूमिका आणि प्रत्यक्ष व्यवहार काय असावा ह्याचा निरंतर विचार करणारा वृद्ध इतका सगळा काळ ते संघकामात होते.
पारतंत्र्यात असलेला देश, मग स्वातंत्र्य, नंतरची आणीबाणी ते जनता पक्षाचे सरकार, पुढे राज्यात भाजपाचेही सरकार इतक्या मोठ्या स्थित्यंतराच्या काळात ते सदैव कार्यरत होते. प.पू. डॉक्टर हेडगेवार असतानाचा संघ ते मा. सुदर्शनजी सरसंघचालक असतानाचा संघ इतक्या दीर्घ काळात ते संघाचे स्वयंसेवक होते. कामानिमित्ताने त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला होता. तोही कसा तर अगदी बैलगाडी किंवा मिळेल ती लाल डब्याची बस, उभे राहून, बसून, कधी मोटारसायकलवर मागे बसून तर कधी जीपने, फार क्वचित रेल्वेनेही, नंतर नंतर स्वतंत्र कारने असे सर्व अनुभव त्यांच्या गाठीशी होते. उघड्या डोळ्यांनी ते समाजात वावरत होते. 
ह्या सर्व भूमिकांमुळे, प्रदीर्घ काळामुळे आणि सर्वार्थाने ‘प्रवासामुळेही’ माणसे, व्यवस्था आणि संस्था सुरळीत करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी जमा झाला होता. संघाला आणि समाजाला त्यांच्या ह्या कौशल्याचा खूप उपयोग झाला. 
ह्यातील प्रत्येक भूमिका आणि पद त्यांनी तितक्याच समरसून निभावले. त्या त्या भूमिकेला आणि पदाला त्यांनी आपल्या स्नेहार्द, संवेदनशील, विचारी, आशावादी स्वभावाने आणि सहजमोकळ्या वर्तनाने गौरव प्राप्त करून दिला. देशाच्या, राज्याच्या सर्वोच्च नेत्यांशी बोलताना ते जितके आदराने, मनापासून आणि स्पष्ट बोलायचे तेवढेच एका लहान गावातील एखाद्या नव्या कार्यकर्त्यांशीही बोलायचे. त्यांच्याशी संवाद कोणालाही सहजसाध्य होता. 
त्यांना माणसांचा लोभ होताच आणि महत्वाचे म्हणजे इतर सर्वांनाही त्यांचा मोह होता. त्यांच्याभोवती सतत घोळका असे. ते कोणत्याही पदावर नसतानादेखील ह्या स्थितीत बदल झाला नाही. स्वयंसेवकापासून ते मोठ्या राजकीय नेत्यांपर्यंत अनेक जण त्यांना भेटायला येत असत. 
त्यांचा संघकामातील अनुभव हे कारण होतेच पण  त्यांचा मिस्कील मोकळा स्वभाव, दीर्घकाळ मनात कटुता न ठेवणारे निरागस निर्मळ मन, माणसांवरचा आणि माणुसकीवरचा कशानेही भंग न पावणारा, म्हणजे अगदी अनेकांनी त्यांना व्यवहारात फसवले, गैरफायदा घेतला तरीही अढळ राहिलेला विश्वास, निरपेक्ष, नितांत प्रेम करण्याइतके विशाल हृदय आणि कोणाच्याही दुःखाने सावळे होणारे अंतःकरण हे देखील कारण असावे. 
ते मुंबईला असताना प्रचारक म्हणून थांबले आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले. प्रापंचिक गरजा भागविण्यापुरतेच काम करायचे आणि बाकी सगळा वेळ संघासाठी द्यायचा,  आपल्या गरजा कमीत कमी ठेवायच्या  हे मनाशी निश्चित होते. पण कमी आणि जास्त हे नेहमी सापेक्ष असते. त्यामुळे उदाहरण देते. एकाच पातेल्यात आळीपाळीने भात आणि भाजी करायला लागायची. त्यात घरात फक्त दोघेच  नाही तर सतत येणारे जाणारे कोणी असणारच. पण आई आणि बाबा दोघांनीही हे स्वीकारलेले होते.
 संघकामाचे महत्व पटलेली आणि बाबांच्या संघकामाची आवश्यकता जाणणारी सहधर्मचारिणी बाबांना मिळाली हा त्यांच्या कामासाठी एक भक्कम आधार ठरला. त्यामुळे प्रचारक म्हणून थांबल्यावरही काम, कामाविषयी तळमळ, त्यासाठी तनमनधन अर्पण करणे हे आयुष्यभर तसेच राहिले. असेच काम असंख्य स्वयंसेवक करत असतात हे मी जाणते. 
बुद्धाने म्हटल्याप्रमाणे असे अदृश्य खांब असतात म्हणून तर आभाळ तोलले जाते. ह्या सर्वांच्या कामाचा दृश्य परिणाम कदाचित दाखवता येणार नाही. पण जमिनीखालून वाहणाऱ्या एखाद्या अदृश्य प्रवाहाप्रमाणे ह्या सर्वांचे काम जमीन समृद्ध करत असते. आपल्या कष्टाने नांगरणी करून जमीन तयार करत असते. ह्या जमिनीत मग कोणतेही पीक घ्या, ते जोमानेच वाढेल. श्रेय त्या त्या वेळी बियाणे पेरणाऱ्याला जाईल पण त्यामागे त्याग असेल अशा असंख्य संघ कार्यकर्त्यांचा!
बाबांनी आयुष्यभर केलेल्या कामाचे फलित काय असा प्रश्न विचारणे कोतेपणाचे ठरेल. पण तरीही उत्तर शोधायचे ठरवलेच तर त्यांनी जोडलेली असंख्य माणसे, त्या माणसांच्या मनात जागृत केलेली देशप्रेमाची, संघकामाची आणि माणुसकीची भावना असे देता येईल. त्या प्रेरणेचा परिणाम म्हणून अनेक कार्यकर्ते तयार झाले. ते कार्यकर्तेही आजन्म राष्ट्रसेवेसाठी झटले. लहान मोठी कामे आणि संस्था उभ्या राहिल्या. केवळ उभ्या राहिल्या असेच नाही तर आज इतकी वर्षे उत्तमरीत्या सक्रिय राहिल्या. 
बाबा प्रांतसंघचालक झाल्यावर त्यांच्या कार्यपद्धतीचा विशेष सांगायचा तर कोणालाही त्यांच्याजवळ मनमोकळे बोलता यायचे, आपल्या समस्या आणि विचार मांडता यायचे. प्रांत कार्यकारिणी सामूहिकरित्या निर्णय घ्यायची. जबाबदारीचे वाटप व्हायचे. नव्या युगाला साजेश्या संघकामाची ती चाहूल होती. 
त्यांच्या कार्यकाळात तीन अगदी महत्वाचे मुद्दे आले. त्यावेळचे वर्णन मा. दामुअण्णा दाते ह्यांच्या शब्दांत सांगते. ते म्हणतात, “मंडल आयोग, मराठवाडा विद्यापीठ नामांतर, शिवसेना भाजप युती हे तीन विषय त्यांच्या प्रांतसंघचालकपदाच्या काळात आले. वेगवेगळ्या काळात या तीन विषयांच्या बैठका झाल्या आणि योगायोगाने या तिन्ही बैठकींचा समारोप प्रल्हादजींनाच करायला लागला. ह्या तिन्ही बाबतीत संघाच्या प्रांत कार्यकारणीचे मत अनुकूल होते. तसेच मत सर्वसामान्य कार्यकर्त्याचेही होणे आवश्यक होते. प्रल्हादजींनी त्यांच्या नेहमीच्या कौशल्याने या विषयाची अपरिहार्यता, अनुकूल निर्णय घेण्यामागची व्यापक भूमिका कार्यकर्त्यांना समजावून सांगितली. यामुळे मतभेदाची कटूता निर्माण न होता संघाने ते विषय स्वीकारले.” 
रुक्ष सिद्धांत, अवघड शब्दांतील तत्वे असे त्यांच्या भाषणात कधीच नसे. अगदी सोप्या शब्दांत हसत खेळत, रोजच्या जीवनातील उदाहरणे देत ते विचार मांडायचे. वाक्ये लहान लहान आणि लयबद्ध, मुक्तछंदातले काव्यच म्हणूया! त्या उदाहरणांची आणि संघविचारांची श्रोत्यांना चकित करणारी सांगड घातलेली असायची. त्यामुळे त्यांची भाषणे श्रोत्यांच्या मनाला भिडायची. आज बाबा जाउन पाव शतक उलटून गेल्यावरही त्यांच्या भाषणांची आठवण काढणारे अनेक जण आहेत ह्यातच सारे आले!
त्यांनी विचार सहजतेने मांडले आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे त्यांच्या व्यवहारातून सहृदय माणूसपणाचे निखळ दर्शन सहजपणे होत गेले. ते स्वतः प्रत्येक क्षण अगदी भरभरून जगले. आपल्यातले माणूसपण, माणूसपणाच्या मर्यादा आणि क्षमता त्यांना ज्ञात होत्या. 
आवश्यक तेव्हा अतिशय प्रखरपणे बोलणारे निर्भीड प्रल्हादजी अनेकांनी पाहिले. त्या त्या वेळच्या संघकामासाठी आवश्यक असेल ते सर्व त्यांनी केले. पण कधी कोणाविषयी त्यांनी दीर्घकाळ कडवटपणा ठेवला आहे असे आठवत नाही. त्यांचा स्वभावच नव्हता तो. 
त्यांच्या सगळ्याच भावना उत्कट होत्या. आनंद, उत्सुकता, काळजी, दुःख सगळेच बाबांना तीव्रतेने वाटायचे आणि उतारवयात तर स्थिती अशी झाली की अनेक आघात सोसलेल्या हृदयाला ते झेपायचे नाही! कोणाची काळजी वाटत असेल, निवडणुकीचे निकाल असतील, क्रिकेटची मॅच असेल सॉर्बिट्रेटची स्ट्रीप खिशातून काढावी लागायची! सिनेमा, नाटक बघताना, पुस्तक वाचताना इतकेच काय बोलता बोलता एखाद्या कार्यकर्त्याची आठवण झाली तरी कितीदा डोळे पुसावे लागायचे. 
कोणाचेही दुःख त्यांना सहन व्हायचे नाही. केवळ माणसांचेच नाही तर गुरांचे दुःखदेखील त्यांच्या हृदयाला भिडायचे. दुष्काळ विमोचन समिती, नंतरची जनकल्याण समिती ह्या सगळ्या कामांमागे ही सहवेदना अनुभवल्याने येणारी तळमळ होती. 
हीच तळमळ त्यांच्या सर्व काळातल्या, विविध वेळी, विविध ठिकाणी भोगलेल्या तुरुंगवासातही प्रत्ययाला येते. नाशिकला इतर  मनःस्थिती ठीक राहावी, नंतरही संघकाम करत राहण्याचीच सर्वांची भूमिका असावी ह्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अनेकदा सांगितले, लिहिले गेले आहेत. 
 बाबांचा अजून एक विशेष जाणवतो म्हणजे ते कायम संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक राहिले. जबाबदारी असताना आणि नसताना, सभेच्या केंद्रस्थानी असताना वा मागच्या खुर्चीवरचा सामान्य श्रोता असताना, ते निष्ठावंत स्वयंसेवकच राहिले. शाखेत जात राहिले. 
त्यांनी संघकामापुढे स्वतःच्या शरीराची, प्रकृतीची पर्वा कधीच केली नाही. अगदी मोजकी उदाहरणे सांगायची तर जनरल अरुणकुमार वैद्यांच्या हत्येने आधीच आजारी असलेले मा. नाना ढोबळे अत्यवस्थ झाले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच, डॉक्टरांना न जुमानता, बाबा सरळ रुग्णालयातून मुंबईहून पुण्याला पोचले होते. भाग्यनगर मुक्ती संग्रामयात्रेच्या वेळीही तसेच. हॉस्पिटलमधून ते सरळ सभास्थानी भाषण करायला, प्रवासाला जात असत. सगळ्या डॉक्टरांसाठी इतका आग्रही पेशंट ही एक अवघड कसोटीच असणार! 
स्वातंत्र्यसैनिक स्मारकाचे रखडलेले काम पाठपुरावा करून त्यांनी मार्गी लावले. सैनिक स्मारकाचे उद्घाटन बाबा गेल्यानंतर झाले. हा कार्यक्रम प्रल्हादजी असताना व्हायला हवा होता अशी हळहळ त्यावेळी अनेकांना वाटली. स्वतः बाबांना बहुतेक असे वाटले नसते. 
संघाबाहेर अनेक चांगले लोक असतात, निःस्वार्थ भावनेने काम करत असतात. जनसामान्यांनी केलेले अगदी लहान लहान काम असले तरी ते शोधून त्याचे कौतुक व्हावे, सुजनतेचा आणि सज्जनतेचा प्रसार समाजात व्हावा ह्यासाठी ‘उतराई’ नावाची संस्था सुरु करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. 
अनेक कामे, प्रकल्प, उपक्रम त्यांनी उभे केले. त्यांचा विश्वास होता की आपण नसलो तरी कोणी ना कोणी स्वयंसेवक ही सर्व कामे करण्यासाठी पुढे येईलच. ते गेल्यावर, काळाच्या ओघात कधी तो विश्वास सार्थ ठरला तर कधी ती कामे थांबली. असो. 
बाबांचा एक गुणविशेष असाही होता की ते एखाद्याच्या गुणांचा गौरव करीत पण उणिवांचा, दोषांचा उल्लेख करत नसत. सुख मानण्यावर आहे अशी त्यांची ठाम श्रद्धा होती. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीचा सहज स्वीकार करून ते पुढे जाऊ शकत. 
अगदी लहानपणीच त्यांची आई गेल्याने कदाचित त्यांना कधी मायेची उणीव जाणवलीही असेल. त्यांनी मात्र शेकडो जणांवर भरभरून माया केली. सर्वांनी सुखरूप राहावे असे त्यांना वाटे. समाजस्थितीची त्यांना जाण होती. ती चांगली ठेवण्यासाठी ते सतत कार्यरत राहिले.  राष्ट्रप्रेम, सौजन्य, सौहार्द बरसवून सर्वाना समृद्ध करणारे आनंदघन होते ते. 
- वृंदा टिळक 
जळगाव तरुण भारत- ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी दीपावली विशेषांक’  (दीपस्तंभ प्रचारक’ ) ह्या ऑक्टोबर 2025 च्या अंकात प्रकाशित.

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...