Thursday, 16 January 2025

मातृ ऋण

 “अरे! तुझ्या डोळ्यात पाणी? घाबरलास की काय फाशीला? की मृत्यूची भीती वाटते आहे? मी तर समजत होते की माझा राम खूप शूर आहे, महान क्रांतिकारक आहे. ज्याच्या नावाने ब्रिटिश सरकार थरथर कापते, हजारो नवयुवक ज्याचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवून क्रांतिकार्यासाठी तयार होतात असा माझा राम खूप धैर्यवान आहे. पण तू तर भित्रा निघालास. तुझ्या डोळ्यात फाशीच्या भीतीने पाणी आले.”

“नाही ग आई, मी फाशीला नाही घाबरत. मृत्यूची काय भीती वाटायची? मृत्यूने फक्त देहाची ही खोळ बदलली जाईल, आत्मा तर अमर आहे. 

माझ्या डोळ्यात पाणी आले ते तुझ्याविषयीच्या प्रेमाने. आगी जवळ लोणी ठेवल्यावर जसे लोणी वितळते तसेच तुझ्याजवळ आल्यावर माझे मन मृदू कोमल होऊन गेले. डोळ्यातून पाणी ओघळू लागले. मला आठवतेय ना तू माझ्यासाठी किती कष्ट घेतलेस ते.” कोठडीच्या गजावर आईने धरलेल्या हातावर हात ठेवत तो म्हणाला.

 तो होता सुप्रसिद्ध क्रांतिकारक पंडित रामप्रसाद बिस्मिल. त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली होती. फाशीला आता अवघे दोन दिवस उरले होते. आज आई भेटायला आली आहे. ही शेवटचीच भेट. आज तिला आपल्या मनातल्या भावना सांगायलाच हव्यात. संपूर्ण आयुष्य त्याच्या डोळ्यांसमोरून सरसरत गेले. 

दहा अकरा वर्षाचे असतानाच आपल्याला वाईट संगत लागली आणि मग सिगरेटची, कधी मधी गांजाची पण तलफ येऊ लागली. यासाठी पैसे कुठून आणणार? मग आपण वडिलांच्या पेटीतून पैसे चोरू लागलो. बरेच दिवस ती चोरी पचली. आपण सरावत चाललो. पण एकदा पैसे चोरताना चुकून पेटीची कडी जोरात वाजली. आईला संशय आला आणि मग आपल्या या वाईट सवयीविषयी घरात सगळ्यांना कळले. आईला खूप वाईट वाटले. तिने आपल्याला परोपरीने समजावले. वडील भरपूर रागावले. पण आपण तर निगरगट्ट झालो होतो. त्या रागवण्यामुळे आपल्या वाईट सवयी कमी झाल्या किंवा सुटल्या असे काही झाले नाही. कदाचित तसंच पुढेही चालू राहिले असते तर संपूर्ण आयुष्याचा सत्यानाश झाला असता. 

पण आपले सुदैवच म्हणायचे!आर्य समाजाचे स्वामी सोमदेव यांचा सहवास आपल्याला लाभला. स्वामी दयानंद सरस्वतींचे ‘सत्यार्थ प्रकाश’ वाचले आणि आपले आयुष्य आमुलाग्र बदलून गेले. वाईट सवयी सुटल्या. योगसाधनेची, व्यायामाची गोडी लागली. राष्ट्रसेवेची तळमळ लागली. आपल्यासारखाच स्वातंत्र्याचा ध्यास लागलेली मित्रमंडळी मिळाली. लोकमान्य टिळक हे तर आपले श्रद्धास्थान. त्यांचे विचार वाचून रक्त सळसळून उठायचे. ब्रिटिशांचे अत्याचार सहन होत नव्हते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काय करावे तेही सुचत नव्हते. लवकरच आपण सशस्त्र क्रांतीचा मार्ग धरला.

 शस्त्रात्रे खरेदी करायची तर पैसे हवेतच. मैनपुरीच्या लुटीच्या वेळी आपण ब्रिटिशांच्या हातात सापडलो नाही. पुढेही एकदा दिल्ली आग्र्याजवळ लुटीच्या वेळी पोलीस आले. त्यांच्या हातावर तुरी देऊन आपण यमुनेत उडी मारली. प्राणायामाचा केलेला अभ्यास इथे कामी आला. आपण बराच वेळ पाण्याखाली पोहू शकलो. मोठे अंतर कापून दूर जाऊ शकलो. 

नंतर हिंदुस्थान रिपब्लिकन असिसिएशन ची स्थापना झाली. मोठे काम उभे राहू लागले. आता पैसे लुटायचे ते धनाढ्य नागरिकांचे नाही तर ब्रिटिश सरकारचेच.. सरकारचे तरी कुठले पैसे म्हणा.. भारतीयांकडून हिसकावून घेतलेले धन ते.. क्रातिकार्यासाठी ते घेण्यात कशाला मागेपुढे पाहायचे. काकोरीची योजना तर यशस्वी झाली. ट्रेनमधून ब्रिटिशांचा खजिना आपण सगळ्या साथीदारांच्या सहकार्याने लुटला. कोणाच्या तरी बंदुकीतून चुकून गोळी उडाली आणि एका नागरिकाची हत्या झाली. ते मात्र फार वाईट झाले. 

कोठडीच्या गजावर आईचा हात होता. आयुष्याने आपल्या खुणा उमटविलेल्या, कष्टांच्या रेघा कोरल्या गेलेल्या त्या हातावर हात ठेवताच पुन्हा त्याचे मन सद्गदित झाले. 

आपले आयुष्यच जर आपण देशासाठी वाहून घेतले मग मृत्यूची इथे कोणाला तमा आहे? पण आज आठवते आहे वेळोवेळी आईने आपल्यासाठी उपसलेले कष्ट आणि केलेला त्याग. दरवेळी कुठल्याही प्रसंगात आईने आपली पाठराखण केली, संसार न करता देशसेवा करण्याच्या आपल्या निर्णयाला पण पाठिंबाच दिला. इतकी सगळी पुस्तके लिहून, तेही सरकारपासून लपून प्रकाशित करताना आईनेच तर पैसे दिले होते आपल्याला. मातृवेदी संस्थेच्या कामात आपण सहभागी झालो तेव्हाही कधी धन लागले की आपण आईकडे मागणी करावी आणि आईने ती पूर्ण करावी असेच होत होते. बरं, आईकडे एवढे पैसे असावे इतकी घरची परिस्थिती तरी कुठे चांगली होती? म्हणजे ते पैसे उभे करताना या माऊलीला किती कष्ट होत असतील! पण तिने ते घडवून आणले. आपल्या इतकीच देशसेवेची तळमळ तिलाही होती. ती शूर आहे म्हणूनच आपल्या अंगात हे शौर्य, धैर्य आले असावे! 

रामप्रसादांच्या डोळ्यातून आता घळघळा अश्रू वाहू लागले. ते आईला म्हणाले, 

“मृत्यूची नाही गं मला भीती वाटत. मला वाईट वाटते ते एवढेच की मी तुझी काहीच सेवा करू शकलो नाही. तुझी सेवा नाही केली पण मातांची माता असलेल्या भारतमातेच्या चरणी आयुष्य अर्पण केले. आणि तसे तर तुझे ऋण कधीच फिटणार नाहीत. हा जन्म तर आता दोन दिवसांत संपेल पण पुढचे जितके जन्म मला मिळतील तितके जन्म मी तुझ्याच पोटी जन्म घेईन आणि त्या सगळ्या जन्मात देखील संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठीच देईन. ऋषीमुनींनी निर्मिलेले, क्रांतिकारकांच्या स्वप्नातले माझे श्रेष्ठ भारत राष्ट्र जोपर्यंत प्रत्यक्षात येणार नाही तोपर्यंत माझे क्रांतिकार्य चालूच राहील. आशीर्वाद दे आई मला, आशीर्वाद दे. 

यदि देश के हित मरना पड़े, मुझको सहस्रो बार भी।

तो भी न मैं इस कष्ट को, निज ध्यान में लाऊं कभी।।

हे ईश! भारतवर्ष में, शतवार मेरा जन्म हो।

कारण सदा ही मृत्यु का, देशोपकारक कर्म हो।।”


पूर्व प्रसिद्धी -ग्राहक हित मासिक डिसेंबर २०२४


महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...