Tuesday, 25 February 2020

ती

 ऋतुगंध वर्ष १०, अंक ६ 

ती

आज अशा एका नाव नसलेल्या नात्याविषयी लिहिणार आहे की जे नाते असल्याचे मी कितीतरी दिवस मनातल्या मनात सुद्धा मान्य करायला संकोचत होते, चारचौघात उल्लेख तर खूपच लांब. 

कितीदा संभ्रम वाटायचा, "आमचं काही नातं आहे का खरंच? हे केवळ आपल्याच मनाचे भास नाहीत ना?" पण मग अखेर पटले, "आहे बरं का आपले नाते! ते देखील नुसते नाही तर अगदी जिवाभावाचे". 

त्यानंतर कधी खाजगीत, जवळच्या मित्र परिवारात ह्याची कबुली द्यायला सुरुवात केली. पण जाहीरपणे? ना रे बाबा ना ! मग एकदा परिस्थितीवश जाहीर कबुली द्यायलाच लागली. पण तरी ते रिलेशनशिप स्टेटस लिहायचे झाले असते तर 'कन्फ्युज्ड' असेच लिहावे लागले असते. किंबहुना अजूनही ते तसेच आहे. 'कन्फ्युज्ड' ! 

कधी मी तिच्या मागे असते तेव्हा ती नखरे करते तर कधी ती उत्सुक असते भेटायला आणि दार वाजवते तेव्हा मी कोणत्यातरी दुसऱ्याच कामात मग्न असते. मला वाटते हे काम झाल्यावर दार उघडूया पण तोपर्यंत तिला कुठला धीर निघायला? ती कधीचीच निघून गेलेली असते. मग दिवसेंदिवस आमची गाठभेटसुद्धा नसते. 

कधी वाटते तुझी चाहूल लागलीये, 
वळून पहावे तर तिथे तू नसतेसच … 
तिथे असतात कधी हलणारी झाडाची पाने, 
कधी पानांवर खेळणारे उन्हाचे कवडसे,
कधी पावसाचे चुकार चुटपुटते थेंब,
तर कधी उमललेले लाघट चंद्रबिंब …
ते पाहून परत मनात वळावे, 
तर तिथे तू येउन गेल्याच्या पाऊलखूणा,
आणि परत एकदा हुकलेला भेटीचा क्षण !

पण एखादा दिवस, एखादी वेळ अशी येते की मला तिच्याशिवाय तरणोपाय नसतो. तिच्यावाचून श्वास घेणे पण मुश्किल होऊन जाते आणि मग कागदावर शब्द उतरायला लागतात. ती प्रसन्न असेल तर कागदावर पूर्ण स्वरुपात अवतरते नाहीतर मग आहेच ... नेहमीचा आमचा लपंडाव आणि माझा जीव अधर. आत्तापर्यंत 'ती' कोण ते तुमच्या लक्षात आलेच असेल... कविता!

लहानपणापासून शब्द आणि कविता मनाला भुरळ घालायच्या. मनात काहीतरी उमटत राहायचे पण कागदावर उतरवायचा धीर व्हायचा नाही. त्याला कारण, माझा संकोच हे जसे होते, तसेच कवींची त्यावेळी समाजात असलेली प्रतिमा, हे देखील होते. कवी म्हणजे विचित्र, एककल्ली, समाजाच्या नियमांची पर्वा नसलेले, कोणत्याही विषयावर कविता लिहिणारे, कोणीही सापडताच त्यांना पकडून कविता ऐकवणारे, अशीच कवींची प्रतिमा समाजात होती आणि म्हणूनच कवी आला पळा पळा असेही गमतीने म्हटले जायचे. 

सगळ्यात गंमत म्हणजे प्रसिद्ध कवींच्या कविता वाचलेल्या असणे ह्याला समाजात प्रतिष्ठा होती बरं का, पण कविता लिहिणाऱ्यांविषयीची मात्र अशी प्रतिमा! मला तर समाजात मिळूनमिसळून राहायचे होते, प्रवाहाविरुद्ध पोहण्याची हिंमत नव्हती. झुंडीबरोबरच जायचे होते. मग त्यासाठी कवितेचा त्याग करायला लागला तरी चालेल अशी त्या वेळची माझी मानसिकता होती. 

पण एकदा असे झाले की एका कार्यक्रमासाठी कविता शोधायचे काम माझ्याकडे होते. नेमकी तेव्हा मी अनेक व्यापात एवढी गुंतलेली की संदर्भ ग्रंथालयात जायलाच वेळ झाला नाही, जवळ असलेली पुस्तके वाचायलाही वेळ झाला नाही. कविता तर संध्याकाळी द्यायचीच होती कारण जाहीर कार्यक्रम होता. मग मीच कविता लिहून दिली आणि तीच एका अर्थाने आमच्या नात्याची जाहीर कबुली ठरली. 

तोपर्यंत कोण काय म्हणेल ह्याची पर्वा करणे हे माझ्या कवितेशी असलेल्या अनुबंधापेक्षा महत्वाचे नाही, अशी आयुष्याविषयीची समजदेखील आली होती आणि मग आमचे हे नाते मी मनोमन स्वीकारले. 

मनोमन निर्विकल्प स्वीकार हा कोणतेही नाते बहरण्यासाठी अत्यावश्यकच. आमचेही नाते मग असेच बहरत गेले. जमिनीखालून एखादा झरा सतत वाहत असावा, नजरेला दिसला नाही तरी त्याच्या ओलाव्याने जमिनीवर हिरवळ असावी, शीतलता असावी, तसेच काहीसे.

कवितेने मला काय दिले ह्याचा रुक्ष ताळेबंद मी मांडणार नाही, मोजणार देखील नाही, ह्या नात्याला कोणत्याही लौकिक मापकांमध्ये. एवढेच सांगेन की  काही नाती अशी असतात जी आपले भाग्य म्हणून आपल्या ओंजळीत आलेली असतात. नुसत्या स्मरणमात्रेही आपले आयुष्य सुगंधाने दरवळून टाकतात, तेजाने भारुन टाकतात, जगण्याकडे आशावादी दृष्टिकोनातून बघायला शिकवतात. 

नुसते कविता लिहिणेच नाही तर इतर कवींच्या कविता वाचणे, समजून घेणे, मुरत आणि मुरवत जाणे, ह्या नात्याचा अविभाज्य भाग आहे. किती ज्ञात अज्ञात कवींच्या सुंदर सुंदर कविता मला वाचता आल्या, मन:पूर्वक उपभोगता आल्या. त्यात आढळलेले, आवडलेले शब्द, कल्पनाविष्कार माझे भावविश्व उजळवून गेले.

त्यातला अर्थ कधी हाती लागला तर कधी हुलकावणी देऊन गेला. बंद मुठीत एखादे रत्न असावे आणि बंद मुठीतूनही त्याचा प्रकाश बाहेर सांडावा, नुसतेच तेवढे नाही तर त्या प्रकाशाला स्वर्गीय सुगंध पण लाभावा तसे दर वेळी सुंदर कविता वाचताना, जाणून घेताना वाटत राहिले. 

कविता एकाच वेळी अपार आनंद आणि तीव्र वेदना देऊन जाते आणि आपण तरीही कायम तिच्या प्रेमात राहतो. असे काय असते कवितेत? का आपण एवढे नादावून जातो? ह्या संबंधांचे भविष्य काय असे विचार मी आता करीत नाही. एवढेच म्हणते, 

मी रेलून उभी आहे कवितेवर,
आयुष्यभराचा भार टाकून, 
आणाभाका न घेताही,
ती आहे सतत. . . माझ्याबरोबर. 
आणि आता ती आणि मी यातील सीमारेषाच नामशेष,
कवितेच्या आधीची मी कशी होते, आठवत नाही,
त्या आधी मी होते का? मी 'मीच' होते का?

रुजवा

 ठिकाण होते काझीरंगाचे जंगल. ब्रम्हपुत्रेच्या सान्निध्याची जाणीव करून देणारे तळी, ओहळ आणि जलप्रवाह, हिरवीगार झाडे, उंच उंच.. अगदी दहा बारा फूट उंच वाढलेले हत्ती गवत, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज, पाण्यावरून, झाडांवरून वाहत आपल्यापर्यंत येणारा सुखद वारा, हे चित्र पूर्ण करण्यासाठीच जणू असावा तसा लवकर उगवलेला चंद्र. ते वातावरण कधीच विसरता न येणारे. आणि ह्या सगळ्या विलोभनीय दृश्यावर चरचरीत विद्रुप ओरखडा उमटवणारे माणसांचे जोरजोरात बोलण्या, ओरडण्या, हसण्याचे आवाज.


आसामातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे संरक्षित वनक्षेत्र जागतिक वारसा स्थानांपैकी एक. प्रवास आता सोपा झाल्याने पर्यटकांनी गजबजलेले. जंगल सफारीला जाणाऱ्या लोकांना मॉलमध्ये फिरणे आणि जंगलात फिरणे ह्यातला फरक माहिती नसला की जे होते तेच इथेही आढळले.

काझीरंगा 

आपण जंगलात आहोत. हे जंगल हत्ती, एकशिंगी गेंडे, हरणे, पाणम्हशी आणि विविध पक्ष्यांचे घर आहे. माणसांइतके ते सारे वायफळ, वाचाळ नाही आहेत आणि त्यांना आवाजाची सवय नाही आहे. त्यांच्या घरी आपण आलो आहोत तर शांतपणे जंगल न्याहाळावे, जमले तर ती नीरवता मनात मुरवावी, हिरवाई मनात रुजवावी आणि निघून जावे. आपल्या येण्याने जंगलाला कमीतकमी उपद्रव होईल अशी काळजी घेत, आपली कोणत्याही प्रकारची खूण मागे न सोडता निघून जावे. हे सारे कळायला नको का?

शिक्षणाने माणसे साक्षर बनतात पण सुसंस्कृत बनण्यासाठी मात्र एका सुजाण मनाची आवश्यकता असते. आमच्या जीप पाठोपाठ होत्या अनेक तरुण मुलामुलींच्या जीप्स. तारुण्यसुलभ उत्साह, त्या उत्साहाला काबूत न ठेवता येणारे अनिर्बंध मन आणि प्रचंड गुर्मी ह्यांनी भरलेल्या जीप्स. काही प्रौढ पर्यटक, वयाने वाढलेले पण समजूत न आलेले, त्यांचेही वागणे तसेच.

लाल,पिवळे भडक रंगाचे कपडे अंगावर आणि सतत आरडा ओरडा करत सेल्फीज चालू. आपल्या आवाजाने आजूबाजूचे प्राणी आणखीच बुजणार ह्याचे यत्किंचितही भान नाही.

वाटले की जंगल साक्षरतेचे धडे गिरवल्याखेरीज पर्यटकांना जंगलात येऊ देता काम नये. प्राण्यांच्या डोळ्यांत खुपणार नाहीत असेच गडद काळपट हिरवे किंवा कोणत्याही मातकट रंगाचे कपडे असावेत. आपली हालचाल देखील आवश्यक तेवढीच असावी. आवाज तर शक्यतो करूच नाही. अंगावर कृत्रिम तीव्र सुगंध मारलेला नसावा. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण जंगल निरीक्षणाला आलो आहोत ह्याचे भान असावे.

ह्यात समजायला काही कठीण आहे का? पण समजून घ्यायचेच नसेल तर त्याला कोण समजावणार? वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून तमीज नावाची गोष्ट फार दुर्मिळ होते आहे हे परत एकदा जाणवले.

त्या सगळ्या आरड्याओरड्याने फार अस्वस्थता आणि राग आला होता. तेवढ्यात दिसले हे झाड. तळ्यात बघत बसलेले. आजूबाजूच्या जगाकडे त्याचे लक्षच नव्हते. नसतातच सगळ्या गोष्टी लक्ष देण्याएवढ्या योग्यतेच्या. आपण आपले मन ढवळून टाकायची परवानगी का बरे त्यांना द्यावी? असेच ते सांगत होते.

काझीरंगा 

मग वाटले, खरंच .. आपल्यालाही ह्या अप्रिय गोष्टी गाळून, नुसते हे जंगल, हे सुंदर वातावरण मनात भरून घेणे जमायला हवे. इथे आपण वारंवार येऊ शकणार नाही आहोत. मग आपली ही दुर्मिळ जंगलभेट काही लोकांच्या गैरवर्तणुकीमुळे वाया का घालवायची? त्या गोंगाट करणाऱ्या लोकांना जंगलात असेपर्यंत शांतता राखा असे एकदा आपण सांगितले आहेच. ह्यापेक्षा जास्त आपण काही करू शकत नाही. हा विचार मनात आला आणि राग निवळत गेला. मन शांत होत गेले. त्या विलोभनीय वातावरणात विरघळत, रुजत गेले. 

काझीरंगा प्रसिद्ध आहे ते एकशिंगी गेंड्यांची सर्वात जास्त संख्या असलेले अभयारण्य म्हणून. जंगलात जीपने फिरताना खूप एकशिंगी गेंडे दिसले.


एकशिंगी गेंडा 

पण एक काळ असा होता की एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ह्या जंगलातील प्राण्यांची संख्या अगदी कमी झाली होती. ते वर्ष होते एकोणिसशे चार.

भारताचे तत्कालीन व्हॉईसराय कर्झन आपल्या पत्नीसह काझीरंगाला आले होते. तिने काझीरंगाविषयी खूप ऐकले होते पण प्रत्यक्षात त्यांना एकही गेंडा दिसला नाही. तेव्हा तिने आपल्या पतीकडे गेंड्याच्या संरक्षणासाठी तात्काळ काही उपाययोजना करण्याची मागणी केली. परिणामस्वरूप एकोणीसशे पाच मध्ये काझीरंगा हे प्रस्तावित संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. तरीपण शिकारीवर बंदी यायला मात्र एकोणीसशे छत्तीस उजाडले.

काझीरंगा नावाविषयी अनेक आख्यायिका ऐकायला मिळतात त्यातील एक म्हणजे रंगा नावाची मुलगी शेजारच्या गावातील काझी नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली. घरच्यांना हा विवाह पसंत नव्हता. दोघे जंगलात पळून गेले आणि मग परत कधीच कोणाला दिसले नाहीत. म्हणून म्हणे हे काझीरंगा!

ह्या लेखमालिकेतील पहिल्या लेखात अशीच गोष्ट होती कोरियामधील संगमबुरीतील हंगम आणि मलजातची. एका अतर्क्य योगायोगाने आज ही लेखमालिका संपवताना परत आपण रंगा आणि काझीच्या गोष्टीपाशी आहोत.

ह्या शिशिर ऋतुसोबत संपेल हे ऋतुचक्र, चैत्रापासून येणाऱ्या वसंतात नवे ऋतुचक्र सुरु होईल. सोबतच संपेल ही लेखमालिका ‘स्वगत’ नावाची.आपण हि लेखमालिका आवर्जून वाचली, उदारपणे कौतुक केलेत त्याबद्दल मनःपूर्वक आभार. नव्या वर्षात प्रवेश करताना सोबतीला देते आहे कविता,

” नात्यांमधून रुजताना” - अरुणा ढेरे

उन्हापावसाच्या हातांनी वाढतात
अंगणातली रोपटी चहूकडून
तसे आपण रुजत जातो नात्यांमधून. 

आयुष्य वाट देते कि अडवते
असा प्रश्न नसतो सहसा आपल्यासाठी
ते असते आपल्यापुरते - जशी माती.

माणसाने माणसाला दिलेला विश्वास,
तसे झऱ्याचे उगम भेटतात अंधारात
आणि मुळे ओलावतात.

सापटीत दडलेला नाग निसटावा
तशी कोरडी रखरखही कधी येते
हृदयाच्या आसपास सारे उजाड होते.
पण नव्या उमेदीची पानफुट आठवू नये

अशा वैराण काळातही
आत हलत असते एक धमनी हिरवीशी
नात्यांमधून रुजताना आपण दाखवलेल्या मनःपूर्वकतेची.


काझीरंगा 


- (पूर्वप्रसिद्धी - ऋतुगंध फेब्रुवारी २०२०)






महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...