Saturday, 3 April 2021

लसायन - 2

 लसायन - 2

'लस घेतली' असे परवा पोस्ट केले, फोटोही पोस्ट केला..लस घेतल्याचे सार्थक झाले.
😂
किती जणांनी काळजी घे सांगितले, विश्रांती घे सांगितले, विश्रांती घ्यायला घरी देखील बोलावले. ( ह्या ऑफरचा कधीतरी नक्की लाभ घेण्यात येईल!!), कोणी घरी पोळी भाजीचा डबा आणून देऊ का विचारले. माझा लसलेला जीव सुखावला. और क्या चाहिये जीने के लिये! मी भाग्यवान आहे.
"काळजी घे सांगणारं कुणी असलं
तर पोस्ट करण्यात अर्थ आहे.
कुणी असे सांगणारे नसेलच तर
vaccine घेणेदेखील व्यर्थ आहे."
Vaccine देतानाच त्यांनी दोन गोळ्या दिल्या होत्या. काहीतरी खाऊन लगेच एक घ्यायची आणि रात्रीचे जेवण झाल्यावर एक घ्यायची असे बजावून सांगितले होते.
पण काही होत नाही अशा फाजील आत्मविश्वासाने आणि औषधे घेण्याचा कंटाळा म्हणून दुपारी घेतलीच नाही.
संध्याकाळी अंग दुखते आहे असे वाटायला लागले तेव्हा रात्रीच्या जेवणानंतर मुकाटपणे गोळी घेऊन टाकली आणि रात्री लवकर झोपून गेले.
Microbiology चा आणि आपला कधीकाळी संबंध आला होता हे मी स्वतः ला देखील जाणवू देत नाही. पण Microbiology ने मला त्या रात्री मी बेसावध असताना गाठले. तेव्हा साधारण 2 वाजले होते.
मग रात्र अशी गेली.
' हे पांढऱ्या रक्तपेशीनो, उठा..जागे व्हा.. शत्रूशी मुकाबला करायला सज्ज व्हा..' आणि असे केवढे लांबलचक स्वगत मनात तयार होत होते. पण पांढऱ्या पेशी माझ्या स्वगताची वाट न पाहता, कधीच कामाला लागल्या होत्या.
मग मी काही सांगण्याची भूमिका सोडून देऊन, प्रेक्षकाची भूमिका स्वीकारली.
"अरे वा..शाब्बास शाब्बास..macrophages.. भले शाब्बास..खाऊन टाक त्या सगळ्यांना. .. चिंपंझी महाशयांच्या कडून आपल्याकडे आलेले ते शत्रू.. कर हल्ला.. टाक गिळून...
अरे अरे. ते बघा अँटीजन.. कुठे आहेत ते लिंफो साईटस .. हां. हे इकडे दिसतायत. कोण रे तुम्ही..B की T?
. B lymphocytes का? झाल्या का अँटी बॉडीज तयार..शाब्बास.. भले भले.. करा हल्ला आता.. होऊन जाउ दे.. हंगा ऐशी!!
तुम्ही काय मागे बसलात रे? चला..कामाला लागा..आणि कोणीतरी हे सगळे लक्षात ठेवताय ना.
.तुम्ही रे T lymphocytes.. पुन्हा असेच शत्रू आले शरीरात तर आपल्याला अशाच अँटी बॉडीज तयार करायच्या आहेत..लक्षात राहील ना??
चला चला..जोरात काम करा सगळ्यांनी. भले भले.. शाब्बास रे शाब्बास!!"
इथे अशी एवढी activity चालू असताना..शरीराला रिपब्लिक टी. वी. च्या प्राईम टाईम चे रुप आले होते.
😂
ही गडबड.. तापलेले वातावरण..सगळे शरीर रसरसले होते तापाने.
आणि हे रिपब्लिक चॅनल ऐकूच येत नसल्या सारखे हाताचे पंजे आणि तळपाय पावले मात्र थंडगार..मग बोटांची हालचाल करून त्यांना किमान उष्णता दिली.
आता इतके इंटरेस्टिंग सगळे सोडून ताप मोजण्याची टेक्निकल activity कोण करणार? जेव्हा हे रोमहर्षक प्रकरण संपले तेव्हा शरीराचे तापमान उतरले.
पण दिवसभर आत कुठेतरी चकमकी झडत होत्या. त्या त्या वेळी शरीर आपले थोडेसे तापमान वाढवून दाद देत होते.
दिवसा दोनदा किंवा गरज भासेल त्याप्रमाणें paracetamol पुरेसे आहे आणि अर्थातच भरपूर पाणी पिणे आवश्यकच.
थकवा देखील येतो. डोळे सतत मिटून ठेवावे वाटते. मोबाईल स्क्रीन चा उजेड नको वाटतो..
ही शरीरातील नॉर्मल प्रक्रिया आहे, vaccine काम करते आहे, ह्याची खूण आहे. तेव्हा reaction आली म्हणून कृपया घाबरून जाऊ नका.
सगळ्यांना हे असे होतेच असे नाही. माझ्या आसपास असे कित्येक जण आहेत, ज्यांना काहीसुद्धा झाले नाही.
तेव्हा..पुन्हा एकदा..लस घ्यायला घाबरु नका. डॉकटर गोळ्या देतील त्या घ्यायला विसरु नका.
चला, सगळ्यांनी लवकर लस घेऊ या. लसीकरण मोहिमेला वेग
देउ या.
.

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...