Monday, 16 November 2020

 


आली आमच्या घरी दिवाळी- रोज एक पोस्ट- दिवाळीची गोष्ट ४

महाराष्ट्रातील दिवाळीचा एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक.  दिवाळी अंकांची १११ वर्षांची समृद्ध परंपरा . 

घराची दिवाळीसाठी साफसफाई सुरु करण्याच्याही आधी आणि दिवाळीचे बाकी प्लॅन्स करण्याच्याही अगोदर कोणत्या दिवाळी अंकात कोणाचे लेख आहेत ह्याच्या जाहिरातींकडे लक्ष ठेवले जाते. 

ह्या वर्षीच्या आव्हानात्मक परिस्थितीत देखील, निराश न होता दिवाळी अंक प्रकाशित झाले आणि ही १११ वर्षांची परंपरा निरंतर चालू राहिली. 

आत्ता माझ्याकडे ह्या फोटोतील सगळे अंक आहेत. चैत्रेय हे खरे तर वासंतिक आहे. पण तो गेल्याच महिन्यात माझ्यापर्यंत पोचला, तो देखील वाचायचा आहे. तसा रामनवमी ला ऑनलाईन प्रकाशित झाला तेव्हा वाचला होता. पण हार्ड कॉपी वाचण्याची मजा अनुभवायची आहे. 

चिकूpiku चा अंक मी चक्क माझ्यासाठी घेतला. तो साधारण ५-१० वर्षांच्या मुलांना तर आवडेलच पण मी त्यापेक्षा थोडीच मोठी असल्याने मलाही फार आवडला. निज शैशव जपणाऱ्या कोणालाही आवडेल असाच हा अंक आहे!!तो फॉन्ट, चित्रे , गोष्टी, कविता, वेगवेगळे खेळ.. अंक उघडला की  हरखून जायला होते. 

बाकी दिवाळी अंकातील ऋतुरंग हा अंक वाचायला सुरुवात केली आहे. "आम्ही तर कुठल्याही संकटाशी लढत राहू. रात्री नंतर पहाट पाहण्याची आम्हाला सवय आहे," असे सांगणारे अरुण शेवते लिखित संपादकीय, 'लढत ' विशेषांकाला साजेसेच आहे. 

आत्तापर्यंत धूप आने दो -गुलजार, धडपडीचे धडे - विनय सहस्रबुद्धे, माझे अवस्थांतर- संजय पवार, घुंगरांचा सन्मान -गुलाबबाई संगमनेरकर आणि मुंबई नि कोरोना - अंबरीश मिश्र हे लेख वाचून झाले. 

इतक्या उतार चढावांचे, अनिश्चिततेचे आयुष्य जागून सुद्धा आज ८८ व्या वर्षी गुलाबबाई संगमनेरकर म्हणतात," आज आयुष्यात मागे वळून बघताना मी आयुष्यात केलेल्या संघर्षांची बेरीज न करता जे काही चांगले झाले त्याची बेरीज करते आहे." 

फाळणीचे दुःख गुलजार ह्यांच्या लेखनातून वारंवार उमटत राहिले आहे. ह्या लेखात कोरोना मुळे  झालेल्या स्थलांतराच्या निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा फाळणीच्या वेळच्या स्थलांतराची आठवण झाली आहे.. घरात राहणे सक्तीचे, आलेले एकटेपण . "कधी कधी खूप कोंडमारा झाल्यावर वाटते कि समुद्र पाहून यावा, तो कोरडा तर पडला नसेल ना? मग त्याचं ते गिळू पाहणारं रूप तसाच आहे की नाही पाहून येऊ असेही वाटले." असे ते म्हणतात. आलेल्या संकटांची, समाजाने त्याच्याशी दिलेल्या  लढतीची, सकारात्मक प्रयत्नांची हकीकत सांगून ते म्हणतात, "मात्र मानवी आयुष्याची असुरक्षितता तीव्र झाली आहे. तिच्याशी आपल्याला एकत्र येऊन लढायचे आहे."

संजय पवार ह्यांचा माझे अवस्थांतर हा लेख फार वैशिष्ट्य पूर्ण. स्वतःच्या आयुष्याचे इतके बारकाईने विश्लेषण, त्या त्या वेळी घडलेल्या घटनांनी नेमके काय साधले, मनात आणि आयुष्यात घडलेल्या घडामोडी ह्यांचे  नेमके वर्णन वाचायला मिळते. त्या अवस्थांतराचे, केवळ एका व्यक्तिच्याच नव्हे तर त्या वेळच्या समाजकारणाचे पडसाद उमटलेले दिसतात.  भावना इतक्या नेमक्या, इतक्या मोजक्या शब्दात कशा लिहायच्या, प्रत्ययकारी वर्णन कसे असावे ह्याचा वस्तुपाठ असलेला हा लेख. 

 अंबरीश मिश्र ह्यांचा लेख आणि त्याचे नाव  'मुंबई नि  कोरोना' इतके  गद्य?? माझ्याप्रमाणेच तुम्हालाही क्षणभर वाटेल. पण लेख वाचायला सुरुवात कराल तर मात्र ..केवळ आ sss ह!! एखाद्या महानाट्याची नांदी असावी तसा  हा लेख.  मनातले अतिशय उत्कटतेने सांगणारा हा लेख. इथे खरे सांगणारा हा शब्दही योग्य नव्हेच. बहुतेक स्वत:शी बोलत आहेत ते. किती महत्वाच्या आणि अक्षरश: विराट मुद्द्यांना स्पर्श केला आहे त्यांनी! संदर्भ तरी किती विविध, त्यांच्या समृद्ध वाचनाची प्रचिती देणारे. त्या लेखाविषयी  लिहायला खरे तर अजून किती तरी लेख लिहायला हवेत. शेवटी ते म्हणतात, "तुम्हीही माझ्यासारखेच असाल तर कधीतरी भेट होईल. भेटलोच तर समुद्राच्या साक्षीने मुंबईची दृष्ट काढू."

विनय सहस्रबुद्धे ह्यांच्या धडपडीचे धडे ह्या लेखात त्यांच्या आयुष्यात आलेल्या दुविधा, त्याला सामोरे जाताना केलेली धडपड, त्याचे मनावर आणि जीवनावर झालेले परिणाम असे वाचायला मिळते.  विनय सहस्र्बुद्धे ह्यांनी स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याविषयी लिहिलेले मी तरी पहिल्यांदाच वाचले. मुख्यत्वाने आणीबाणीच्या कालखंडाविषयी हे लेखन आहे. ह्या लेखकाच्या लेखणीतून अजून बरेच वाचायची उत्सुकता निर्माण करणारा हा लेख आहे.

 त्यांनी त्यांच्या धडपडीतून मिळालेल्या 'खऱ्या कमाईच्या' तीन गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली म्हणजे अनिश्चितता पावलोपावली असतेच पण आपल्या कामामागचे 'अधिष्ठान' आपण लख्खपणे जाणत असू तर विचलित व्हायची वेळ येत नाही.  बाकीच्या दोन गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात वाचा!

 शेवटी ते म्हणतात की चांगल्याचा चांगुलपणा ठळकपणे पुढे येत नाही तोवर त्याच्या यशाची  शक्यताही वाढत नाही आणि चांगुलपणा यशस्वी झाला नाही तर त्यावरची स्वतः ची आणि इतरांची श्रद्धाही अबाधित राहू  शकत नाही. 

घरात इतके दिवाळी अंक वाचायला असल्याने तुळशीच्या लग्नापर्यंतही दिवाळी संपत नाही..नक्कीच!!!

माझे बाबा गोष्ट सांगायचे तेव्हा शेवटी असायचे ,"एक होते पोस्ट ..संपली आमची गोष्ट" इथे तर दिवाळीच्या गोष्टीच्या चार पोस्ट झाल्या!! ही दिवाळी आपल्या सगळ्यांसाठीच वेगळी होती. अस्वस्थ होती आणि तरीही दिवाळीने सर्वांच्या  मनात उत्साह जागवलाच. 

आपल्या घराखेरीज अजून किमान  एका तरी घरी दिवा लागेल हे आपण सगळ्यांनी आवर्जून पाहिले. आपल्या घरी फराळाचे करताना अजून कोणाला तरी तसेच घरात गोडधोड करता यावे ह्याची काळजी घेतली.  अवघ्यांनी मिळून सुपंथाकडे चालण्यासाठी जमेल तेवढ्या शक्तीने पाऊल पुढे टाकले. हा प्रकाश आपल्या सगळ्यांच्या मनात निरंतर उजळत राहो. ।। शुभं भवतु .. कल्याणमस्तु ।।





Sunday, 15 November 2020

 आली आमच्या घरी दिवाळी- रोज एक पोस्ट- दिवाळीची गोष्ट ३  

तुमचे जितके ग्रुप्स असतील त्या प्रमाणात तुम्हाला ऑरगॅनिक दिवाळी कशी साजरी करावी हा मेसेज आला असेल. नाही आलाय म्हणता? त्या मेसेज कम जोक चा सारांश असा कि बायकोने केलेला फराळ आयते बसून खा आणि तरी हा अमकी तमकी सारखा नाही झाला म्हणा ..की आपोआप घरबसल्या फटाके ..विना धूराचे .. 

तद्दन सेक्सिस्ट, पकाऊ जोक आहे. त्यावर तर निबंध लिहिण्याजोगा आहे. पण ते जाउ दे. आपला आजचा विषय तो नाही. 

हा जोक वाचला तेव्हा वाटले ठाण्यात म्हणतील ... तरी श्रद्धा किंवा अलकनंदासारखा नाही! आणि तरीही फटाके वाजणार नाहीत. कारण तिलाही मान्य असेल की ह्या दोन्ही ठिकाणचे पदार्थ उत्तमच असतात!! 

आता ठाणेकर नसलेल्याना श्रद्धा किंवा अलकनंदा कोण हे माहिती नसेल. त्यांच्यासाठी - श्रद्धा आणि अलकनंदा ही दोन ठाण्यातील अस्सल मराठी खाद्यपदार्थ मिळणारी दुकाने आहेत. भाजणी, कुरडया, मेतकूट,  तळणीच्या मिरच्या,पाचक इथपासून ते विविध मसाले, पुरणपोळ्या,गूळपोळ्या, ओल्या नारळाच्या करंज्या,उकडीचे मोदक असे सगळे पदार्थ उत्कृष्ट दर्जाचे जिथे मिळतात अशी दुकाने.( अनुभव हीच खात्री!! मी करून घेतलेली आहे अनेकदा!)  तिथे मिळणाऱ्या पदार्थांची यादी करायची तर मराठी खाद्यपदार्थांचीच यादी करावी लागेल. इतके पदार्थ तिथे मिळतात. काही पदार्थांसाठी आधी ऑर्डर द्यावी लागते, पण मिळते सगळे. 

विविध कारणांनी जेव्हा घरी करणे शक्य नसेल तेव्हा इथून पदार्थ आणावे आणि रसना तृप्त करावी. स्वच्छता आणि चवीची खात्री! तेल, तूप ओघळणारे पदार्थ, अजागळ बांधणीतले पदार्थ इथे दिसणार नाहीत. सगळे अगदी नीटनेटके. 

अजून अस्सल पणाचा  पुरावाच हवा असेल तर श्रद्धाचे माहिती नाही, पण अलकनंदा दुपारी बंद देखील असते!! हा गंमतीचा भाग सोडल्यास दोन्ही दुकाने माणुसकी जपणारी, सामाजिक बांधिलकी मानणारी दुकाने आहेत. काही सेवाभावी संस्थांच्या कामाच्या निमित्ताने हा अनुभव घेतलेला आहे. 

एक वैयक्तिक अनुभव सांगायचा  तर सिंगापूरला नेण्यासाठी बऱ्याच  पुरणपोळ्यांची ऑर्डर अलकनंदात दिलेली होती. त्यांनाही माहिती होते की हे सिंगापूरला पाठवायचे आहे. दुर्दैवाने त्यांचे जवळचे  नातेवाईक गेले त्या दिवशी म्हणून त्यांनी  दुकान बंद ठेवले . तर त्यांचा घरी फोन आला आणि म्हणाले  तुम्ही किती वाजता पोळ्या घ्यायला येणार ते सांगा, तेव्हा येऊन मी तुमच्यासाठी दुकान उघडून पोळ्या देतो आणि मग परत बंद करतो. त्यांनी दाखवलेली ही माणुसकी आणि बांधिलकी थक्क करणारी होती. 

आपल्याला आलेले चांगले अनुभव आपण सगळ्यांसोबत शेअर करत नाही, म्हणून हे मुद्दाम लिहिले!!तेव्हा ठाण्यात मराठी वळणाचे खाद्यपदार्थ खायचे तर आवर्जून श्रद्धा किंवा अलकनंदाला भेट द्या. घरी जाऊन निवांत खा. 

घरी जर का बरीच माणसे येणार असतील तर अलकनंदा ला केटरिंग ची ऑर्डर देता येते. तो अनुभव देखील उत्तम असाच आहे. ह्याखेरीज मी अनुभव घेतलेले आहेत वृंदावन केटरर्स चे वृषाली आणि वृंदावन गद्रे आणि मुक्तछंद चे सागर वामन संजीवनी. उत्तम स्वैपाक. तुम्ही सांगाल त्या स्पेसिफिकेशन्स सहित व्यवस्थितपणे घरी पोचणार. 

ह्या खेरीज स्वाद वाले कर्वे देखील केटरिंग ऑर्डर्स घेतात. मी खाल्लेला आहे त्यांच्या कडाचा स्वैपाकही. पण मी स्वतः मागवला मात्र नाही. 

तेव्हा इतके सगळे सांगितल्यावर आता फराळाचा फोटो हवाच ना!! तो मात्र सगळा मीच केलेला आहे. ह्या कोणाकडेही ह्याच्यापेक्षा चांगलाच मिळतो!!





Saturday, 14 November 2020

 


आली आमच्या घरी दिवाळी - रोज एक पोस्ट -दिवाळीची गोष्ट २



आज नरकचतुर्दशी! अभ्यंग स्नानाचा दिवस. 

ह्या फोटोत आहे, खादी नॅचरल चंदन मसाज ऑइल,  Amruta Ayurved Panchkarma Center चे आयुर्वेदिक सुगंधी उटणे आणि The Earthen Lather चा १०० % व्हीगन साबण






खादी नॅचरल चंदन, अप्रतिम सुगंध. ग्रामोदय आश्रमाची निर्मिती. प्रिय सखीने भेट दिलेले असल्याने त्याला मैत्रीचा सुगंध पण येतोच आहे. 

आयुर्वेदिक सुगंधी उटणे, अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर चे. अमृता आणि आनंद कुलकर्णी हे  तरुण उत्साही डॉक्टर्स आपल्या क्लिनिक सोबतच अशी  अनेक आयुर्वेदिक उत्पादने तयार करीत आहेत. 

वैशाली, चैतन्य ने भेट  दिलेले साबण १०० टक्के व्हीगन! The Earthen Lather च्या अनुराग आणि देविका चिटणीस ह्यांनी व्हीगन साबणांचे अनेक प्रकार तयार केले आहेत. त्या साबणाचे रूप इतके सुंदर आहे की  आधी त्यांचे मनसोक्त फोटो काढून ठेवले आहेत. आता आज साबणाचा शुभारंभ केला!! फोटोत हिरवा दिसणारा साबण Aloe Vera चा, त्यात मिंट पण असल्याने एकदम थंडा थंडा कुल कुल चा  अनुभव!!

आणि पाच वर्षांपूर्वी मुग्धाने स्वतः रंगवून दिलेल्या सुंदर पणत्या .. दर दिवाळीत वापरते! 

एरवी नेहमीसारखे सगळे चालू असले की आपल्याला काहीतरी बदल हवा असतो. हे वर्षच वेगळे होते, दिवाळी देखील वेगळीच. तर ती नेहमीसारखी आहे असे स्वतःला वाटायला लावण्याचे सगळे प्रयत्न आपण सगळेच करतो आहोत! असो. 

तर मी सांगत होते गोष्ट स्थानिक वस्तू वापरण्याची. तर त्यातले उटणे आणि साबण अगदी आमच्या ठाण्यातच तयार झालेला आहे हो!

तुम्ही सगळे पण नक्की तुमच्या परिसरात तयार होणाऱ्या वस्तू शोधत असाल. स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देत असाल ह्याची खात्री आहेच. अवघे धरु सुपंथ.. ठरलेच आहे आपले!!. 















 
#दिवाळी # शुभदिपावली # आत्मनिर्भरभारत #Local4Diwali # Diwali #ShubhDeepawali #AtmaNirbharBharat #HillViewPrestigeResidency #DiwaliSpirit #Happytimes #RojEkPost #DiwaliGosht # WeAreTogether #SilverVeganTravels 

Friday, 13 November 2020

 आली आमच्या घरी  दिवाळी  - रोज एक पोस्ट, दिवाळीची गोष्ट - १

           ।।श्री ।।

गोष्ट तुमच्या माझ्या इथली 

ठाण्याच्या  वडवली नगरातली 

 येऊन एकत्र  काही उत्साही तरुणांनी

शिकविले कंदील करणे स्वतः दाखवूनी 

 पाचवड पाडा   लोक करती कंदील तयार 

उचलले पाउल त्यांनी होण्या आत्मनिर्भर 

देण्या त्यांच्या कष्टाना  दिलखुलास दाद 

गृहसंकुलाने केला समोर मदतीचा हात 

जाणिले मनी  वचन कि एकमेका साह्य करू 

सुपंथ धरुनी आपण सारे सदैव पुढती सरू 

आले कंदील आणि लागले घरोघरी 

एकसारख्या कंदिलांची मौजच भारी 

वारियाने डुले  कंदील, फडके भगवा गर्वाने 

शुभ दीपावली, शुभ  चिंतू  सारे एक दिलाने 

पाचा उत्तरी सुफळ कहाणी साठा उत्तराची 

गोष्ट सौहार्दाची -सर्वसमावेशक दिवाळीची ।।






#दिवाळी # शुभदिपावली # आत्मनिर्भरभारत #Local4Diwali # Diwali #ShubhDeepawali #AtmaNirbharBharat #HillViewPrestigeResidency #DiwaliSpirit #Happytimes #RojEkPost #DiwaliGosht # WeAreTogether #SilverVeganTravels 


Sunday, 25 October 2020

पावसाची आली सर

 ऋतुगंध वर्ष ९ अंक ३ 

पावसाची आली सर

पावसाची आली सर
घालूनिया कोडे
उत्तरांची वाढे झार
गुन्तवीत तिढे

येई सरीवर सर
पागोळ्या गळती
दाटलेली सांज होई
उनाड धरती

अशी कोसळता सर
मन अनावर
नभ उतरुनी डोळा
सांडे काठावर

बरसली अशी सर
गूढ चित्रलिपी
जन्मावरी गोंदलेली
प्राक्तनाची नक्षी

- वृंदा टिळक

शहाणीव

 

शहाणीव

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २

कोरिया 

 सध्याचे दिवस वैशाखवणव्याचे. काहिली होण्याचे. ह्या काहिलीत आधार वाटतो तो अमलताश -बहाव्याच्या पिवळ्या लटकघोसांचा आणि नक्षीदार झालरफुलांच्या ताम्हण वृक्षांचा. आमच्या घराकडे येणारा रस्ता तर दोन्ही बाजुंनी ताम्हणवृक्ष असणारा आणि ह्या दिवसात सुंदर दिसणारा. ताम्हण -महासोना -जारुल अनेक नावांनी ओळखले जाणारे हे सुंदर फूल महाराष्ट्राचे राज्य फूल आहे. असे म्हणतात की पद्म आणि नारद नामक दोन बुद्धांना ह्याच वृक्षाखाली ध्यान करताना ज्ञानप्राप्ती झाली होती.

ताम्हण 

इतके दिवस मला बुद्धाला ज्ञानप्राप्ती म्हटले की  एकाच एका बोधीवृक्षाची -अश्वत्थ वृक्षाची आठवण व्हायची. पण नुकतेच वाचनात आले की अठ्ठावीस बुद्धांना ज्या वृक्षांखाली ज्ञानप्राप्ती झाली ते वृक्ष वेगवेगळे होते. 

बुद्धाच्या तुलनेत आपली आयुष्ये अगदी क्षुद्र आणि आपल्याला होणारे साक्षात्कार देखील त्याच प्रमाणात छोटेसे. पण आपापल्या छोट्या आयुष्यात वेगवेगळ्या निमित्ताने साक्षात्कार होत असतात आणि शहाणपण देऊन जात असतात हे देखील खरेच.

वेगवेगळे प्रसंग, अनुभव, माणसे आपली शहाणीव वाढवत असतात. दंतकथा, आख्यायिका, इतिहास, संस्कार, वास्तव, भय आणि स्वप्ने ह्यांनी विणलेला एक घट्ट गोफ आपले सांस्कृतिक संचित बनलेला असतो. आपण आयुष्य जगतो, जगभर फिरतो, ह्या संचिताच्या नजरेतून विश्व पाहतो आणि नकळत आपली शहाणीव क्षणाकणाने वाढवत जातो.

संगमबूरी - कोरिया 

नुकतेच दक्षिण कोरियामधील जेजू बेटावरील संगमबुरी येथे गेलो होतो. आम्ही संगमबुरीला पोचलो तेव्हा आभाळ कसेबसे ढगांना आवरुन उभे होते. कधीही बांध ढासळेल आणि ढग अनावर होऊन कोसळू लागतील अशी स्थिती. थंड हवेमुळे तो झाकोळ देखील अगदी प्रसन्न वाटत होता. थोडा चढ चढून वर गेलो आणि एका अवर्णनीय दृश्याने मन वेधून घेतले. ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या विवराच्या कडेवर असलेले विस्तीर्ण पठार. त्याच्या बाजूला डोलणारे चमचमते गवताचे पिवळसर सोनेरी तुरे. मुरुमदगडांच्या लांबच लांब नागमोडी रांगा आणि एका बाजूला हिरवळीच्या विस्तारावर विखुरलेली स्मृतिस्थळे. ती स्मृतिस्थळे कोणाची? कधीची? काहीच कुठे उल्लेख नाही.

ती अज्ञात वीरांची स्मृतिस्थळे आणि वाईट शक्तीपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी उभारले गेलेले दगडी पुतळे आपल्याला शतकांचा प्रवास घडवतात पण मनात रुतून राहतो तो एका उंचवट्यावर असलेला, आकाशाच्या पार्श्वभूमीवर मान उंचावून बघत असलेला हरिणाचा पुतळा. पुतळा इतका जुना नाही पण त्या जागेचे गारुड आणि पुतळ्याच्या देहबोलीतून व्यक्त होणारी प्रतीक्षा आणि ओढ आपल्याला अनेक युगे मागे घेऊन जाते.

संगमबुरीची दंतकथा सांगते ती एक अनोखी प्रेमकहाणी. स्वर्गातील जेड सम्राटाची मुलगी मलजात आणि हानगम नावाचा एक तारा प्रेमात पडतात. सम्राटाला कळताच तो त्यांना स्वर्गातून हद्दपार करतो. ढगांच्या वाटेवरून वाऱ्याच्या साथीने ते दोघे येतात पृथ्वीवर संगमबुरीला. तेव्हाही जेजू बेट आणि संगमबुरी निसर्गसुंदर आणि स्वर्गाइतकेच रमणीय असणार. त्यांना ती जागा खूप आवडते, एकमेकांची हवीहवीशी साथ आणि रमणीय जागा .. काळ पंख लावून उडत असणार. इथेच खरे तर ह्या कथेचा सुखांत व्हायला हरकत नव्हती. पण .. 

त्यांची खाण्याची आवडनिवड आणि सवयी अगदी भिन्न. मलजात फक्त फळे आणि भाज्या खाणार तर हानगम फक्त प्राण्यांचे मास. खाण्याच्या भिन्न आवडींमुळे लवकरच त्यांच्यात भांडणे सुरु होतात. मलजात सांगते की मला तुझ्या अन्नाचा वास सहन होत नाही. आपण वेगळे राहू या. मलजात संगमबुरी सोडून जाते हानगम तिथेच राहतो.

संगमबूरी 

हरिणाचा पुतळा खरे तर त्या विभागात सापडणाऱ्या प्राण्यांचे प्रतीक म्हणून उभारलेला आहे पण ही गोष्ट ऐकल्यावर मला सारखे वाटत होते की एकमेकांसमवेत घालवलेले सुंदर दिवस आठवत ह्या जागेत हानगमने मलजातची वाट पाहिली असेल आणि ते सगळे सौंदर्य आणि वाट पाहणे त्या पुतळ्यात भिनले आहे. आजही तिथे कधी पाऊस, कधी धुके, कधी ढग तर कधी ऊन असेल सांगता येत नाही. स्थानिक लोक मानतात की हानगमचा मूड बिघडला की असे होते!!!

ह्या दंतकथेला अर्थाचे अनेक पदर आहेत. अगदी भिन्न प्रवृत्तीवर प्रथमदर्शनीच प्रेम जडणे आहे, त्या प्रेमाच्या कबुलीपाठोपाठ येणारी त्याबद्दलची शिक्षा विनातक्रार भोगणे आहे. सतत सोबत राहताना कंगोरे टोचायला लागल्यावर आधी जुळवून घ्यायची धडपड आहे आणि नंतर वैयक्तिक स्वातंत्र्य, प्रेमासाठी गहाण न ठेवता, वेगळे व्हायचा घेतलेला निर्णय आहे. माणसांनी माणसांपर्यंत पोचण्याच्या वाटा डोळ्यांदेखत नाहीश्या होणे आहे. त्या वाटा हरवतानाचा सोसलेला आकांत आहे. स्वप्न पाऱ्यासारखे निसटून जाणे आहे. साऱ्या आकांताच्या पार जात धारण केलेला खंबीरपणा आहे. अटळ एकांत आहे. 

अशा परीक्षेच्या, अवघड निर्णय घेण्याच्या वेळा प्रत्येकाच्याच आयुष्यात वळणावळणावर सामोऱ्या येतात. निर्णयाची जबाबदारी 'भोगणे' फार कमी जणांना जमते. अनेकदा परिणामांचे भय वाटून निर्णय घेणेच टाळले जाते आणि मग वाट्याला येतो तो चकवा. न घेतलेले निर्णय जर का घेतले असते तर? त्यांचे परिणाम काय झाले असते? अशा विचारांच्या चकव्यात माणूस गोल गोल फिरत राहतो.

गाठी पडूच नयेत अशी तरकीब शिकवणारा यार जुलाहे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. मग एकतर गाठी पडूच नयेत किंवा पडल्याच तर त्यांचीच सुंदर नक्षी बनवून टाकावी ही शहाणीव आपली आपल्यालाच मिळवावी लागते.

ती शहाणीव असतेच चकव्याच्या सीमारेषेवर तिष्ठत.  .. आपली वाट पाहत !


स्वगत - मन करा थोर


मानवी मनात भावनांचे अनेक तरंग उमटत असतात. कधी आसपासचा निसर्ग, माणसे, घटना, वस्तू ह्या कारण असतात तर कधी आठवणी!

हे तरंग शब्दांत उतरवता येतील का, ह्याचाच ध्यास प्रत्येक लिहू पाहणाऱ्याला असतो. कधी ते जमल्या सारखे वाटते, तर कधी शब्दांत उतरेपर्यंत भावनांनी वेगळेच वळण घेतलेले असते.

ह्या भावनांविषयी, त्या निमित्ताने स्वतःशी होणाऱ्या संवादाविषयी वृंदा टिळक लिहिणार आहेत, आपल्या 'स्वगत' ह्या सदरात! 

-----------------------------------------------------------

मन करा थोर !

काही वर्षांपूर्वी माझे एक घड्याळ हरवले. मी फार हळहळले. ती हळहळ केवळ ते घड्याळ सोन्याची डायल असलेले, मौल्यवान खडे जडवलेले होते म्हणूनच नव्हती, तर ते फार प्रेमाने, भेट म्हणून मिळालेले होते म्हणूनही होती. खूप वाईट वाटले. स्वतः ला वारंवार दोष दिला. नंतर कितीतरी दिवस दुसरी घड्याळे घालताना हरवलेल्या घड्याळाची आठवण, हळहळ, परत स्वतःला दोष असे चक्र चालूच राहिले. माझ्यासारख्या सामान्य माणसांची अशीच असते प्रतिक्रिया. 

हे तर झाले वस्तू हरवण्याबाबत. पण थोडक्यात ट्रेन वा बस चुकली तरी हळहळ वाटते. मन लगेच तोपर्यंत केलेली कोणती कृती केली नसती तर वेळ वाचला असता आणि ही ट्रेन मिळाली असती हा हिशेब करते. मग आठवतो शब्द, "मुदा ".

ती एक जपानी संकल्पना आहे . मुदा म्हणजे कुचकामी असणे, निरुपयोगी असणे, उधळपट्टी करणे. मोठाल्या कंपन्यात ही संकल्पना वापरून कुठे आपल्याला वेळ, संसाधने वाचवता येतील आणि फायदा वाढवता येईल ह्याचा विचार केला जातो. कुठे आणि कशी उधळपट्टी, नुकसान टाळता येईल ह्याची यादी मोठी आहेच. पण वैयक्तिक आयुष्यात मला त्यातील काही गोष्टी फारच महत्वाच्या वाटतात. त्या आहेत, unused skills, confusion आणि self doubt. 

माणसाचे मन आणि आयुष्य कुरतडणाऱ्या ह्या तिन्ही गोष्टी. किती आयुष्य, सकारात्मकता आणि उमदेपणा पाहता पाहता खाउन टाकतात. वेळोवेळी ह्या तिन्हींचा सामना करायला लागतोच. काही हरवले, आजारपण आले, प्रियजनांचा वियोग सहन करावा लागला की  ,"हे माझ्याच बाबतीत का? मीच का?" ही प्रतिक्रिया मनात उमटते. त्या विषयी एक चांगला विचार मध्यंतरी वाचनात आला की  तुझ्याच बाबतीत हे घडते कारण तू त्या दुःखावर,संकटावर मात करू शकतेस म्हणून! आपल्याबाबत "त्या" ला असा विश्वास वाटला ह्या विचाराने देखील अंगात खंबीरपणा येतो. मनोबल वाढते. संकटाशी दोन हात करायचे सामर्थ्य अंगी येते. 

काही जण दुःखावर मात करुन उभे राहतात. नुसते तेवढेच नाही, तर आत्मविश्वासाने त्या आपत्तीला एक सकारात्मक रुप देऊ शकतात. एक गोष्ट ऐकली होती.. साधारण अठराशे ऐंशीच्या काळातली. 

स्टॅनफर्ड विद्यापीठ 

एक साधे कपडे घातलेले प्रौढ जोडपे हार्वर्ड विद्यापीठात, अध्यक्षांच्या भेटीसाठी वाट पाहत बसले होते. खूप वेळ थांबल्यावर भेट झाली. ते अध्यक्षांना म्हणाले की आम्ही ह्या विद्यापीठासाठी, आमच्या मुलाच्या स्मरणार्थ काहीतरी करू इच्छितो. त्यांचे कपडे आणि एकूण अवतार पाहून अध्यक्ष त्यांना म्हणाले की तुम्ही काय करणार? विद्यापीठातील इमारती बांधायला आणि रोजचा कारभार चालवायला किती खर्च लागतो ह्याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? असे म्हणून त्यांनी खर्चाचा आकडा सांगितला. कथा पुढे असे सांगते की  आकडा ऐकल्यावर त्या बाई आपल्या नवऱ्याला म्हणाल्या,” एवढाच खर्च येत असेल तर मग आपण वेगळे विद्यापीठच स्थापन करू या ना! ” आणि स्टॅनफर्ड विद्यापीठाची स्थापना झाली.

ही कथा कपोलकल्पित असू शकते, बहुतेक आहेच. पण स्टॅनफर्डस दांपत्याने, टायफॉईडने गेलेल्या आपल्या मुलाच्या स्मरणार्थ, आठ हजार एकरांच्या भूखंडावर, स्टॅनफर्ड विद्यापीठाची स्थापना केली हे शंभर टक्के सत्य आहे.

आपला एकुलता एक मुलगा गेला म्हणून नुसते दुःख करत न बसता, सर्व मुले आपलीच आहेत असे समजून त्यांच्या शिक्षणाची सोय करणारे स्टॅनफर्ड दाम्पत्य unused skills, confusion आणि self doubt ह्या तिन्ही ‘मुदां’वर मात करताना दिसते! आत्मविश्वासाचे हे रुप अतीव आदराला पात्र असेच! मानवता आणि संस्कृतीवरचा विश्वास दृढ करणारे. आज स्टॅनफर्ड विद्यापीठ संशोधनाची, नव कल्पनांची, अनेक मातब्बर कंपन्यांची जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध झाले आहे. जग बदलणाऱ्या अनेक गोष्टी तिथल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत, करत आहेत. 

“त्या” ने आपल्या खंबीरपणावर ठेवलेला विश्वास सार्थ करत, परिस्थितीशी दोन हात करून, शिवाय इतरांच्या उपयोगी पडणारे अनेक जण आपल्याला आजूबाजूला दिसतात. डोळे उघडून पाहायला मात्र हवे. 

नेवासा 

स्वतःचे मन किती विशाल होऊ शकते, ह्याचे एक उदाहरण तर नतमस्तक करणारेच! लहानपणीच आईवडील गेल्याने आलेले पोरकेपण. आईवडील असतानाच काही कारणांनी सहन करायला लागणारा आत्यंतिक सामाजिक विरोध आणि बहिष्कार त्यांच्या मृत्यूनंतरही संपलेला नाहीच. तो तसाच आणि नेहमी सहन करायला लागला. वाट्याला सतत आली अवहेलना, उपेक्षा आणि तिरस्कार. कितीदा प्रायश्चित्त घेऊनसुद्धा समाज-मान्यता नाहीच.

अशा परिस्थितीत कोणीही कडवट, निराश, बंडखोर झाले असते. समाजाचा तिरस्कार करायला लागले असते; पण हे पाणीच वेगळे होते. त्यांनी स्थापना केली भक्तिमार्ग सांगणाऱ्या वारकरीसंप्रदायाची. शिकवले सगळ्यांना प्रेम करायला, सहृदय राहायला. शिकवले अद्वैत तत्त्वज्ञान. स्वतः ला आलेल्या अतोनात वाईट अनुभवांनंतरसुद्धा लिहिला तो अमृतानुभवच. संस्कृतातील गीतेचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना कळावे म्हणून प्राकृतात आणले.

पैसाचा खांब 

समाजाने दिलेले सगळे विष पचवून, समाजाला परत दिला तो अमृत कुंभ, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी! विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले अशी मनोवस्था असल्याने, स्वतःसाठी काही न मागता, 'त्या'च्याकडे मागितले काय तर, ”भूतां परस्परे मैत्र जडो” आणि “जो जे वांछील तो ते लाहो!” 

ज्ञानेश्वरांचे अवघे एकवीस वर्षांचे आयुष्य मला एखाद्या अद्भुत चमत्काराप्रमाणे वाटते. त्यांच्या आयुष्यातील पहिला भाग जणू सर्वसामान्यांना हे दाखवायलाच, की हालअपेष्टा कोणालाच चुकल्या नाहीत आणि दुसरा भाग ह्यासाठी की सर्व दुःखांवर मात करून मन बुद्धी किती विशाल होऊ शकते!

संपूर्ण विश्वाला जणू त्यांनी आपल्या कवेत घेतले. ज्ञान दिले ते देखील अत्यंत ऋजुतेने, कोमलपणे, प्रेमाने. उगीच नाही त्यांच्या नावापुढे ‘माउली’ हा शब्द जोडला जात! आकाशाच्या पार जातानाही त्यांनी वर्षाव केला तो कैवल्याच्या चांदण्याचा! शांतीचे, विश्वकल्याणाचे मागणे मागणारे ज्ञानेश्वर विश्वास दृढ करतात दुःखावर मात करता येण्याचा, मन विशाल करता येण्याचा!
( पूर्वप्रसिद्धी ऋतुगंध सिंगापूर )


नित्यकल्याणी

                         

घरातली बाग कितीही लहान असू दे, त्यातील झाडांची कामे कधी न संपणारी. गंमतीचा भाग असा की झाडे आवडणाऱ्या माणसांसाठी, ह्या कधी न संपणाऱ्या कामांचा भार न होता, दगदग न वाटता, ती कामे म्हणजे सुखनिधान होऊन जातात. जिवाचा विसावा होऊन जातात. रोज वाढणाऱ्या झाडांकडे पाहत राहणे, कळ्या कधी धरतात ,फुले कशी फुलतात ह्याकडे लक्ष ठेवणे हे दिवसातला महत्वाचा भाग बनून जाते.

सकाळी डोळे उघडताच मनात विचार येतो तो, आज कोणते फुल फुलणार आहे ह्याचा ! कधी कधी असे दिवस असतात की अनेक झाडे फुलांनी बहरत असतात, पण कधी असेही दिवस येतात की एकाही झाडाला फुल येणार नसते. आयुष्यातही नाही का कितीतरी वेळा अशा येऊन गेलेल्या असतात? अशावेळी देखील झाडांतला, त्या दिवसातला आणि एकूणच जगण्यातला उत्साह टिकवून ठेवणे ह्यालाच आयुष्य जगणे म्हणत असावेत बहुतेक! 

नित्यकल्याणी 

माझ्या छोट्याश्या बागेतले सदैव बहरणारे झाड म्हणजे सदाफुली. वर्षभर, कोणत्याही परिस्थितीत फुलत राहणारी सदाफुली. इतर भाषांतून ती सदाबहार, नयनतारा, नित्यकल्याणी ह्या नावांनी देखील ओळखली जाते. 

सदाफुलीचे रोप मी आणले होते माहेरच्या अंगणातल्या बागेतून, खास आईच्या सांगण्यावरून. म्हणूनही ते माझे फार लाडके. मी त्या रोपाचे गाव बदलले, त्याला प्रवासातले धक्के सहन करायला लागले. त्याला मातीत वाढायची सवय होती, त्याचे अमर्याद अवकाश मी कुंडीत बंदिस्त करून टाकले. नंतर इथे आणल्यावर देखील गावातल्या गावात घर बदलणे, कुंडी बदलणे असे सगळे बदल अगदी लीलया झेलत, ते झाड आजपर्यंत छान वाढत राहिले आहे. फुलत राहिले आहे. 

काही महिन्यांपूर्वी झाड वाढत वाढत फांद्या वेलासारख्या कुंडीच्या बाहेर झेपावयाला लागल्या. झाडांचे ते बाहेर विस्तारणे, पानाफुलांचे नैसर्गिक सुशोभन होणेदेखील फार लोभस होते. पण नंतर फांद्या जमिनीला टेकायला लागल्या. अगदी लोळायलाच लागल्या. मी विचार केला की जेव्हा फांद्यांना फुले आणि कळ्या नसतील तेव्हा खाली टेकणाऱ्या त्या फांद्या कापून टाकेन. म्हणजे मूळ झाड चांगले सशक्त होईल. 

कित्येक महिने असेच गेले, झाडाने मला त्याला कापायची संधी दिलीच नाही. कळ्या नाहीत, फुले नाहीत असा एकाही फांदीचा , एकही दिवस गेला नाही. अखेर मन कठोर करून एक दिवस जमिनीला टेकणाऱ्या फांद्या कापून टाकल्या. कळ्या, फुले असलेल्या फांद्या कापताना आणि नंतरदेखील फार अस्वस्थता आली होती. 

त्या कापलेल्या फांद्या दुसऱ्या एका कुंडीत खोचून ठेवल्या. आज जवळजवळ महिना होत आला तरी, अजूनदेखील त्या कुंडीत खोचलेल्या फांद्या फुलत आहेत. आपल्यातला जीवनरस कणाकणाने वापरत आहेत. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपला फुलण्याचा धर्म प्राणपणाने जपत आहेत, निभावत आहेत.

कुंडीतले मूळ झाड आपल्या फांद्या कापल्या गेल्या म्हणून मनात कष्टी झाले असेल का? त्याला दुःख झाले असेल का? झालेही असेल..कोणास ठाऊक? पण बाहेर मात्र त्या झाडाने तसे काहीच दिसू दिले नाही. त्या फांद्या नसण्याची कसर झाडाने अधिकच फुलून भरून काढली. फुलांचा आकार अधिक मोठा आणि झाडाची पाने अधिक तजेलदार दिसत होती.

एवढेच नाही, तर कुंडीत अजून बारकी बारकी रोपे देखील आली होती. फांद्या कापल्या गेल्याचे संकट झाडावर कोसळले, पण झाडाने, त्या संकटाने खचून न जाता, अतिशय सकारात्मकतेने संकटाकडे पाहिले. संकटाचा उपयोग स्वतःला अधिक मजबूत करण्यासाठी, रुजण्यासाठी करून घेतला. नित्य कल्याणाचाच विचार करणारी म्हणून ती नित्य कल्याणी असेल का?!! 

सदाफुली जमिनीवर लावताना, ती आक्रमकतेने वाढते, चिवट आहे हा धोका लक्षात घ्या, असे सांगितले जाते. कारण ती सर्वत्र पसरते. अगदी मानवजातीसारखेच वर्णन. आक्रमकतेने वाढणारी, इतर जीवसृष्टीवर आक्रमण करणारी, इतर जीवसृष्टीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करुन घेणारी अशी मानवजात!

हे वर्णन तर मानवजातीचे आणि सदाफुलीचे बरोबर जुळते, पण सकारात्मकतेने विचार करण्यात तेवढा माणूस सदाफुलीपेक्षा कमी पडतो. छोट्या/ मोठ्या संकटांनी निराश, हताश होऊन जातो. खचून जातो. नैराश्याने ग्रासलेली अनेक माणसे आपल्या आसपास आढळतात. ते नैराश्य संपूर्ण अस्तित्वावर बांडगुळासारखे वाढत जाते. त्याचा वचपा आपल्या परिघातील माणसांशी वाईट वागून काढावासा वाटतो. कोणी आपल्या भल्यासाठी काही सांगितले तरी ते ऐकावेसे वाटत नाही.. एकूणच संपूर्ण आयुष्य गढूळ होत जाते. असा एक माणूसही आसपासची अनेक आयुष्ये झाकोळून टाकायला पुरेसा असतो

आपल्याही आयुष्यात अशा नैराश्याच्या वेळा तर येऊन गेलेल्याच असतात. त्या त्या वेळी, माझे कोणी नाही, माझ्यासाठी कोणी नाही, आता जगण्याजोगे काहीच उरले नाही असे वाटून गेलेले असते. आपण खोल खोल बुडत आहोत आणि वर येता येत नाही, कोणीतरी खालीच दाबून ठेवते आहे असेही वाटलेले असते. अशा वेळी दुप्पट उत्साहाने उसळी मारून पाण्याच्या पृष्ठभागावर यायचे आहे ..आपले आपल्यालाच हे एकदा जाणवले आणि अंगी बाणवता आले की नैराश्य हरलेच समजा. हुरहुरत्या तिन्हीसांजेपासून शाश्वत पुनवेपर्यंतचा प्रवास आत्मबळावरच करावा लागतो. प्राणांवर नभ पांघरणारे प्रत्येकाच्या वाट्याला कसे कोणी येणार? 

घनदाट निबिड वन किर्र गातसे गाणी
कलतात सावल्या कुणी डहूळले पाणी
भयनादआवर्त गरगरे तमाच्या पैंजणी
स्मरणातील काहुर मनी कोरती लेणी ।।१।।

मौनात निमाले लागट बोचरे कोंब 
निवविते साधना जनीमनीचे डोंब 
स्वतःच सुज्ञशा स्वतःने पूर्ण होताना 
सरे हुरहूरी सांज, प्रकाशले चंद्रबिंब ।।२।।

किरणांसवे गुंफिली असली लाघव माया
कि पाण्यावर थरथरली गर्द धुकेरी छाया
होता चंद्र्स्पर्श सावल्यांना, उजळले पात्र 
विकसली मनी पुनवेची तृप्त शाश्वत रात्र ।।३।।

कल्याणाचा उत्साहपूर्ण, सकारात्मक. आशादायक विचार आणि कृती करणे, त्याच्या साहाय्याने नैराश्यावर मात करणे माणसालाही शक्य आहे. कोणालाही हानी न पोचवणारे कल्याण. कोणाचेही हक्क ओरबाडून न घेणारे कल्याण. मग माझ्या कल्याणापासून ते विश्वाच्या कल्याणापर्यंत पोचता येईलच.असे झाले की केवळ सदाफुलीचेच नव्हे तर मानवजातीचेही नाव नित्य कल्याणी ठेवता येईल!!
(पूर्वप्रसिद्धी - ऋतुगंध सिंगापूर )

Monday, 19 October 2020

राधा कमळ
बहिणी कडे ही फुले आणि ह्या ओळी उमलल्या!!
उमलले फूल,
पडली गं भूल
वेलीच्या कानांधले , 
जणू हलते डुलते डूल
- अंजली चितळे

मग आमच्याकडे ही कविता उमलली.

उमलले फूल
पडली ग भूल
वेलीच्या कानांत
हलले ग डूल
लालडी चुनरी
राधा ग ल्याली
वारियाने हाले
कशी सावरली?
बासरीचे सुर
उमटले दूर
मन ते आतूर
राधा बावरली
सूर ते गुंजले
तनात मनात
हलले ग डूल
राधेच्या कानात!!
भरला ग मोद
पूर्ण त्रिभुवनी
कान्हा तो मोहन
वसे ध्यानी मनी
- वृंदा टिळक.

त्यावरच्या बहिणीच्या ओळी! 

नाजूक माझी वेल,कसा सोसेल?
प्रीतीचा खेळ,बघ भांबावेल
ही कमलण माझी राधा
का तिज मदनाची बाधा?
सवंगडी तिचाही साधा,
नच लौकिक जगती शोधा
- अंजली चितळे.

Monday, 24 August 2020

गोष्ट हरभऱ्याच्या झाडाची!

आज परसबाग दिन. #KitchenGardenDay. परसबागेच्या व्याख्येत फुलझाडे येत नाहीत. त्यामुळे मी माझ्या बाल्कनीतील २*५ फुटांच्या प्रचंड मोठ्या बागेविषयी लिहिणार नाही, तर फक्त त्यातील भाजीपाला, धान्य याविषयी लिहीन. आत्तापर्यंत अळू, ओव्याची पाने, कांद्याची पात, लसणीची पात, २० मुगाच्या शेंगा, कोथिंबीर, पालक, सात आठ मटारच्या शेंगा, कढीलिंब, विड्याची पाने असे काही काही कुंडीत उगवून झाले होते. 

मग एक नवीन प्रयोग करून पाहिला. कडधान्ये केवळ पाण्यावर वाढवण्याचा.#Hydroponics फार सुंदर दिसतात. डायनिंग टेबल वर रोळीत लावलेली असल्याने रोज किती वाढली आहेत ते नजरेला दिसत राहते, आनंद होत राहतो. असे लवलवते हिरवे पोपटी कोंब वाढताना पाहणे हेच माझ्यासाठी पुरेसे होते.

 त्या आनंदावर बोनस म्हणून ती कोवळी पाने खाता पण येणार होती. #DiningTableGarden. खूप छान लागतात. सॅलड /सूप मध्ये घालू शकता. भाजी करू शकता.#HealthyLifeStyle मी आत्तापर्यंत मूग, मटकी आणि हरभरे ह्यांच्यावर असा प्रयोग केला. मला सर्वात जास्त चवीला हरभऱ्याची पाने आवडली. म्हणून त्या विषयी सविस्तर माहिती देते. 

 हरभरे भिजवून चांगले मोड आणून घ्यावे. साधारण २ दिवसात इथल्या दमट हवेत उत्तम मोड येतात. त्यानंतर ते मोड आलेले हरभरे एका चाळणीत ठेवावे. त्या चाळणीच्या खाली दुसऱ्या भांड्यात पाणी ठेवावे. पाणी खाली गेलेल्या मोडाना लागेल पण हरभरे मात्र पाण्यात भिजणार नाहीत अशा प्रकारे ठेवावे. हरभरे पाण्यात भिजले तर कुजून जातील.

त्यावर एक पातळ सुती कापड झाकून ठेवावे. म्हणजे झाडांना हवा लागेल, पण चिलटे बसणार नाहीत. कापड हलके हवे. म्हणजे पाने फुटून उंच होत जातील, तेव्हा त्यांना कापड सहज उंच करता आले पाहिजे. कापड जाड असेल तर पाने दाबून जातील.

वय २ दिवस दिनांक ८ जुलै २०२०

हलके, सुती, पातळ झाकण 

एखाद/दोन दिवसात त्याला पाने फुटायला लागतील. हि झाडे फार पटकन वाढतात. साधारण ६/७ दिवसात तुम्ही पहिली तोडणी करू शकता. 

वय ४ दिवस -१० जुलै २०२०
वय ५ दिवस  ११ जुलै २०२०

वय ६ दिवस १२ जुलै २०२०

वय ८ दिवस १४ जुलै २०२०

वय ११ दिवस १७ जुलै २०२०


पहिली तोडणी १८ जुलै २०२०

मला ह्या वेळी भाजी करायची होती. त्यामुळे मी जास्त वाढवले. सलाड साठी हवे असतील तर तुम्ही साधारण ६ दिवसे वयाची पाने काढायला हवीत. कारण नंतर त्यांचे दांडे थोडे कडक व्हायला लागतात. 

पहिल्या तोडणी नंतर जर का तुम्हाला हरभरे पण हवे असतील तर तेव्हा रोळीतील सगळे हरभरे काढून उसळी साठी व पाने सलाड साठी वापरू शकता. पण जर का तुम्हाला अजून पानेच हवी असतील तर ते हरभरे तसेच राहू द्यावे. परत ५/६ दिवसांनी पानांची तोडणी करता येईल. 


पहिल्या तोडणीनंतर उगवलेली पाने 
२२ जुलै २०२०

दिनांक २४ जुलै २०२०

दुसरी तोडणी दिनांक २६ जुलै २०२०

मी दुसरी तोडणी २६ जुलै ला केली. नंतर चाळणीची भोके मुळांच्या मुळे झाकली गेल्याने असेल, किंवा पाणी जास्त झाल्याने असेल, त्याला कुजल्यासारखा वास यायला लागला. मग ते हरभरे आणि मुळे कुंडीतील झाडांना खत म्हणून घालून टाकले. 

अशी हरभऱ्याची कहाणी सुफळ संपूर्ण. जशी मला परसबागेतून ताज्या भाजीची प्राप्ती झाली तशी तुम्हालाही होवो! त्या साठी निगुतीने भाजी वाढवण्याची प्रेरणा तुम्हाला मिळो!

ता. क. एक दिवसाआड खालच्या भांड्यातील पाणी बदलायला विसरू नका!

#आत्मनिर्भरभारत #AtmanirbharIndia














Monday, 17 August 2020

निशिगंध फुलताना .. 

ह्या लॉकडाऊन ने मला दिले काय? खरे तर बरेच काही.. त्यातील एक म्हणजे दिली अशी एक संधी जी मला अनेक वर्षांपासून हवी हवीशी होती. फुल फुलते म्हणजे काय होतं? नेमका तो क्षण कोणता कुठल्या क्षणाला म्हणायचं फुल फुलले म्हणून? जेव्हा कळी येते तो क्षण? कि पूर्ण फुल दिसते तो क्षण?
आणि मग १६ जुलै ला निशिगंधाच्या पानांमध्ये एक घट्ट दांडा आल्यापासून रोज नेमाने त्याचे, सकाळी ठराविक वेळेला, फोटो काढायचे हा उपक्रम हातात घेतला. सुरुवातीला कॅमेरा त्या हिरव्यागार पानांच्या मध्ये घालून फोटो काढायला लागायचे आणि मग सरसरसर कळ्या असलेला दांडा वर वाढत गेला आणि आज पाने कितीतरी तरी खाली राहिली आहेत आणि तो दांडा केवढा उंच झाला आहे!
ह्या सगळ्या प्रवासात लक्षात आलं की ज्या क्षणी पहिल्यांदा सुगंध दरवळेल तेव्हा म्हणायचं कि फुल फुलले! सध्या रातराणी देखील फुलली आहे, पण काल रात्री तिच्या सुगंधापेक्षा एक वेगळा सुगंध जाणवला. बाल्कनीत जाऊन बघायच्या आधीच लक्षात आले कि निशिगंध फुलला!हाच तो क्षण, फुलण्याचा!! 
निशिगंध अगदी लहानपणापासूनच माझ्या आवडीचा. लहानपणी सुट्टीत पुण्याला गेलं की परत औरंगाबादला जाताना, डेक्कनशी मिळणारे निशिगंधाचे दांडे घेऊन जायचे ठरलेलेच. मग जाताना बस मध्ये अगदी ते जीवापाड जपायचे आणि नंतर दोन-तीन दिवस घरी त्या दरवळणाऱ्या सुगंधाचा आनंद साजरा करायचा!
नंतर औरंगाबादलाही छान निशिगंध मिळायला लागला, अजूनही मिळतो. किंबहुना मला तर नेहमी वाटतं की, औरंगाबाद ला मिळणाऱ्या निशिगंधा इतका सुगंध इथे मिळणाऱ्या निशिगंधाला नाहीच.
मग इथे घरी कुंडीत निशिगंध आला. मागच्या वर्षी पहिल्यांदा असाच फुलला, तो आनंद मैत्रिणींबरोबर गप्पा, कविता, वाचन आणि अर्थात खाणं असं करत साजरा केला. यावर्षी घरी तर कोणाला बोलवता येणार नाही, म्हणून निशिगंधच पाठवत आहे.

https://youtu.be/TsQaPHhFPEc

Wednesday, 12 August 2020

#Dost Hero

 Today Dhanashree Gruh Udyog gave me a chance to write an article about the Hero in my Dost.The story started in the 3rd week of March. Lock-down was declared and all of us were busy checking grocery in our homes. Hurriedly we wanted to refill the Dabbas and Jars in our home with grocery before the shops closed down. At that time, there were some people who could think beyond their own homes and their kin.

Mrs Sukanya Narasimhan and Mr Ganpati Narasimhan were such souls who thought about security guards, sweepers and cleaners and even the TMC ghantagadi workers in Vrundavan society, Thane. All the restaurants and shops were closed. Where would all these people drink tea and have their breakfast, thought the Narsimhan couple. 

Mrs Sukanya and Mr. Narsimhan

So Mr. and Mrs. Narasimhan started preparing breakfast in their home and distributing it to all these people. Initially in March the number was around 35 but it gradually went on increasing. This venture of distributing breakfast went on till the 3rd week of July. At that time, the number of people receiving the breakfast went up to 75!

Can you imagine when we were boggled by the volume of work in our home which was about for 4 people, Mr. and Mrs. Narasimhan were running a kitchen preparing breakfast for 75 people, that too everyday. 

Piping hot Idli+ Chutney

Soon this news spread in the society. I would love to quote Mr. Narsimhan’s words,” Though community spread is bad in Corona, this community spread of the news was for good cause!” Some people came forward for helping in distribution like Mr. Prasad Natu, Mr. and Mrs Sudha Krushnan, Mr. and Mrs Lakshmi Harish who helped regularly.

Distribution Of Breakfast.

Distribution Of Breakfast.

Distribution Of Breakfast.

Some people like Lakshmi Harish, Sudha Krishnan, Jyotsna Nijsure, Shekdar, Dadape, Venkatraman, Anil Gupta, Anathkrishnan, Patade, HP Chankak, Prasad Natu, Adv. Mudholkar, Deepak Kulkarni, Sujay Paranjape sponsored the breakfast on some days. But on the other days, which was more than 3 months, Mr and Mrs Narsimhan prepared breakfast everyday and distributed it to the sweepers, cleaners and security guards. 

I am proud to have friends like Mrs. and Mr. Narsimhan and feature them for Dhanashree Gruh Udyog’s Dost Hero! May there be many people like them in society!


Wednesday, 5 August 2020

चित्र-जय श्रीराम !!

काल आपण शब्द, नृत्य, नृत्यनाट्य, शिल्प ह्यातून दिसणारी रामकथा पहिली. आज पाहणार आहोत, चित्रातून दिसणारी रामकथा. 
रामकथा चित्रांचा विषय झालेली अनेक देशात दिसून येते. मला विशेष करून आठवतायत ती कंबोडियात मिळणारी, राईस पेपरवर एम्बॉस करून तयार केलेली रामकथेतील चित्रे. 




भारतातील प्रत्येक चित्रशैली मध्ये केलेली राम कथा आपल्याला बघायला मिळते.चित्रकूट येथील शिल्प चित्रमय रामदर्शन प्रसिद्ध आहे. राजा रविवर्मा ह्यांनी केलेले राम पंचायतन आणि त्यातली महाराष्ट्रीयन पद्धतीची सीतेची साडी आपल्या सगळ्यांना आठवत असेलच. 
 

काही वर्षांपूर्वी आई -सुशील अभ्यंकर, सिंगापूरला आली होती, तेव्हा रामनवमीच्या निमित्ताने रामायणावर तिचे व्याख्यान झाले होते.
आमचे स्नेही, चित्रकार श्रीरंग केळकर ह्यांनी श्रीरामाचे समयोचित असे उत्तम चित्र काढून तिला भेट दिले होते.


ते अजूनही तिच्या खोलीत लावलेले आहे. इतकेच नव्हे तर आज अयोध्या राम मंदिर भूमिपूजन निमित्ताने त्याच चित्रासमोर तिने रामरक्षा म्हटली. आज भूमी पुजना पर्यंत तिचा श्रीराम जय राम जय जय राम ह्या मंत्राचा 10000 जप पण करून झाला होता. (तसे तिचे वय काही फार नाही..अवघे 91 वर्षे. इतकी तरुण असल्यानेच ती जे ठरवते ते जिद्दीने पूर्ण करू शकते!)

#जयश्रीराम #JaiShreeram

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...