Wednesday, 26 March 2014

मी तुला पुन्हा भेटेन -भावानुवाद

मी तेनु फिर मिलांगी.. अमृता प्रीतम 

प्रसिध्द पंजाबी लेखिका. कथा, कादंबरी, कविता सर्व प्रकारचे विपुल लेखन. त्यांचे साहित्य अनेक भाषांत अनुवादित झाले आहे. साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ----------

मी तुला पुन्हा भेटेन कशी कुठे माहिती नाही. 

बनेन कदाचित तुझ्या कल्पनेचा एक धागा 

किंवा उतरेन एक रहस्यमय रेषा बनून तुझ्या कानवासवर 

माहिती नाही …कशी ...कुठे ..पण मी भेटेन मात्र तुला नक्की 

बनेन एक खळाळता झरा 

आणि उडवेन पाण्याचे तुषार तुझ्या अंगावर 

माझ्या शीतलतेने तुझ्या तप्त हृदयाला शांतवत राहीन.

बाकी काहीच जाणत नाही मी,

पण एवढे मात्र ठाऊक आहे मला ...

काळ काहीही करो..

हा जन्म मात्र नेहमीच माझ्याबरोबर असेल.

शरीर संपले की सारेच संपते.

पण स्मृतींचे धागे ह्या विश्वात कण कण होऊन चिरंतन राहतात.

वेचेन पुन्हा ते कण, विणेन धागे नव्याने 

अन भेटेन तुला पुन्हा .. 

(ऋतुगंध -वसंत २०१३/१४)

 



फोटो आंतरजालावरून साभार. 




No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...