आईचा हात धरून मी चालले होते बागेत
तेवढ्यात एक आजोबा भेटले आम्हाला वाटेत
झालं..आता हे आजोबा गप्पा मारत बसणार
मला घसरगुंडीवर जायला मग उशीर होणार
आजोबांनी मला विचारले ..तुझे नाव काय बाळा ?
मला सारखा दिसत होता बागेतला झोपाळा ..
मला प्रश्न कळलाच नाही असे आजोबाना वाटले
घरातले सगळे तुला काय म्हणतात, त्यांनी परत विचारले
उत्तरासाठी होते त्यानी आम्हाला थांबवले
मग मी एकदाचे सांगूनच टाकले..
आई नेहमी राणू म्हणते..पण कधी म्हणते जगदंबा
आजी म्हणते छकुली, मावशी म्हणते रंभा
दादा म्हणतो माकड, बाबा म्हणतात लाडोबा
आता तरी आम्ही बागेत जातो न आजोबा !!!
-वृंदा टिळक
(ऋतुगंध शिशिर -२०१२/१३)
No comments:
Post a Comment