Monday, 24 August 2020

गोष्ट हरभऱ्याच्या झाडाची!

आज परसबाग दिन. #KitchenGardenDay. परसबागेच्या व्याख्येत फुलझाडे येत नाहीत. त्यामुळे मी माझ्या बाल्कनीतील २*५ फुटांच्या प्रचंड मोठ्या बागेविषयी लिहिणार नाही, तर फक्त त्यातील भाजीपाला, धान्य याविषयी लिहीन. आत्तापर्यंत अळू, ओव्याची पाने, कांद्याची पात, लसणीची पात, २० मुगाच्या शेंगा, कोथिंबीर, पालक, सात आठ मटारच्या शेंगा, कढीलिंब, विड्याची पाने असे काही काही कुंडीत उगवून झाले होते. 

मग एक नवीन प्रयोग करून पाहिला. कडधान्ये केवळ पाण्यावर वाढवण्याचा.#Hydroponics फार सुंदर दिसतात. डायनिंग टेबल वर रोळीत लावलेली असल्याने रोज किती वाढली आहेत ते नजरेला दिसत राहते, आनंद होत राहतो. असे लवलवते हिरवे पोपटी कोंब वाढताना पाहणे हेच माझ्यासाठी पुरेसे होते.

 त्या आनंदावर बोनस म्हणून ती कोवळी पाने खाता पण येणार होती. #DiningTableGarden. खूप छान लागतात. सॅलड /सूप मध्ये घालू शकता. भाजी करू शकता.#HealthyLifeStyle मी आत्तापर्यंत मूग, मटकी आणि हरभरे ह्यांच्यावर असा प्रयोग केला. मला सर्वात जास्त चवीला हरभऱ्याची पाने आवडली. म्हणून त्या विषयी सविस्तर माहिती देते. 

 हरभरे भिजवून चांगले मोड आणून घ्यावे. साधारण २ दिवसात इथल्या दमट हवेत उत्तम मोड येतात. त्यानंतर ते मोड आलेले हरभरे एका चाळणीत ठेवावे. त्या चाळणीच्या खाली दुसऱ्या भांड्यात पाणी ठेवावे. पाणी खाली गेलेल्या मोडाना लागेल पण हरभरे मात्र पाण्यात भिजणार नाहीत अशा प्रकारे ठेवावे. हरभरे पाण्यात भिजले तर कुजून जातील.

त्यावर एक पातळ सुती कापड झाकून ठेवावे. म्हणजे झाडांना हवा लागेल, पण चिलटे बसणार नाहीत. कापड हलके हवे. म्हणजे पाने फुटून उंच होत जातील, तेव्हा त्यांना कापड सहज उंच करता आले पाहिजे. कापड जाड असेल तर पाने दाबून जातील.

वय २ दिवस दिनांक ८ जुलै २०२०

हलके, सुती, पातळ झाकण 

एखाद/दोन दिवसात त्याला पाने फुटायला लागतील. हि झाडे फार पटकन वाढतात. साधारण ६/७ दिवसात तुम्ही पहिली तोडणी करू शकता. 

वय ४ दिवस -१० जुलै २०२०
वय ५ दिवस  ११ जुलै २०२०

वय ६ दिवस १२ जुलै २०२०

वय ८ दिवस १४ जुलै २०२०

वय ११ दिवस १७ जुलै २०२०


पहिली तोडणी १८ जुलै २०२०

मला ह्या वेळी भाजी करायची होती. त्यामुळे मी जास्त वाढवले. सलाड साठी हवे असतील तर तुम्ही साधारण ६ दिवसे वयाची पाने काढायला हवीत. कारण नंतर त्यांचे दांडे थोडे कडक व्हायला लागतात. 

पहिल्या तोडणी नंतर जर का तुम्हाला हरभरे पण हवे असतील तर तेव्हा रोळीतील सगळे हरभरे काढून उसळी साठी व पाने सलाड साठी वापरू शकता. पण जर का तुम्हाला अजून पानेच हवी असतील तर ते हरभरे तसेच राहू द्यावे. परत ५/६ दिवसांनी पानांची तोडणी करता येईल. 


पहिल्या तोडणीनंतर उगवलेली पाने 
२२ जुलै २०२०

दिनांक २४ जुलै २०२०

दुसरी तोडणी दिनांक २६ जुलै २०२०

मी दुसरी तोडणी २६ जुलै ला केली. नंतर चाळणीची भोके मुळांच्या मुळे झाकली गेल्याने असेल, किंवा पाणी जास्त झाल्याने असेल, त्याला कुजल्यासारखा वास यायला लागला. मग ते हरभरे आणि मुळे कुंडीतील झाडांना खत म्हणून घालून टाकले. 

अशी हरभऱ्याची कहाणी सुफळ संपूर्ण. जशी मला परसबागेतून ताज्या भाजीची प्राप्ती झाली तशी तुम्हालाही होवो! त्या साठी निगुतीने भाजी वाढवण्याची प्रेरणा तुम्हाला मिळो!

ता. क. एक दिवसाआड खालच्या भांड्यातील पाणी बदलायला विसरू नका!

#आत्मनिर्भरभारत #AtmanirbharIndia














Monday, 17 August 2020

निशिगंध फुलताना .. 

ह्या लॉकडाऊन ने मला दिले काय? खरे तर बरेच काही.. त्यातील एक म्हणजे दिली अशी एक संधी जी मला अनेक वर्षांपासून हवी हवीशी होती. फुल फुलते म्हणजे काय होतं? नेमका तो क्षण कोणता कुठल्या क्षणाला म्हणायचं फुल फुलले म्हणून? जेव्हा कळी येते तो क्षण? कि पूर्ण फुल दिसते तो क्षण?
आणि मग १६ जुलै ला निशिगंधाच्या पानांमध्ये एक घट्ट दांडा आल्यापासून रोज नेमाने त्याचे, सकाळी ठराविक वेळेला, फोटो काढायचे हा उपक्रम हातात घेतला. सुरुवातीला कॅमेरा त्या हिरव्यागार पानांच्या मध्ये घालून फोटो काढायला लागायचे आणि मग सरसरसर कळ्या असलेला दांडा वर वाढत गेला आणि आज पाने कितीतरी तरी खाली राहिली आहेत आणि तो दांडा केवढा उंच झाला आहे!
ह्या सगळ्या प्रवासात लक्षात आलं की ज्या क्षणी पहिल्यांदा सुगंध दरवळेल तेव्हा म्हणायचं कि फुल फुलले! सध्या रातराणी देखील फुलली आहे, पण काल रात्री तिच्या सुगंधापेक्षा एक वेगळा सुगंध जाणवला. बाल्कनीत जाऊन बघायच्या आधीच लक्षात आले कि निशिगंध फुलला!हाच तो क्षण, फुलण्याचा!! 
निशिगंध अगदी लहानपणापासूनच माझ्या आवडीचा. लहानपणी सुट्टीत पुण्याला गेलं की परत औरंगाबादला जाताना, डेक्कनशी मिळणारे निशिगंधाचे दांडे घेऊन जायचे ठरलेलेच. मग जाताना बस मध्ये अगदी ते जीवापाड जपायचे आणि नंतर दोन-तीन दिवस घरी त्या दरवळणाऱ्या सुगंधाचा आनंद साजरा करायचा!
नंतर औरंगाबादलाही छान निशिगंध मिळायला लागला, अजूनही मिळतो. किंबहुना मला तर नेहमी वाटतं की, औरंगाबाद ला मिळणाऱ्या निशिगंधा इतका सुगंध इथे मिळणाऱ्या निशिगंधाला नाहीच.
मग इथे घरी कुंडीत निशिगंध आला. मागच्या वर्षी पहिल्यांदा असाच फुलला, तो आनंद मैत्रिणींबरोबर गप्पा, कविता, वाचन आणि अर्थात खाणं असं करत साजरा केला. यावर्षी घरी तर कोणाला बोलवता येणार नाही, म्हणून निशिगंधच पाठवत आहे.

https://youtu.be/TsQaPHhFPEc

Wednesday, 12 August 2020

#Dost Hero

 Today Dhanashree Gruh Udyog gave me a chance to write an article about the Hero in my Dost.The story started in the 3rd week of March. Lock-down was declared and all of us were busy checking grocery in our homes. Hurriedly we wanted to refill the Dabbas and Jars in our home with grocery before the shops closed down. At that time, there were some people who could think beyond their own homes and their kin.

Mrs Sukanya Narasimhan and Mr Ganpati Narasimhan were such souls who thought about security guards, sweepers and cleaners and even the TMC ghantagadi workers in Vrundavan society, Thane. All the restaurants and shops were closed. Where would all these people drink tea and have their breakfast, thought the Narsimhan couple. 

Mrs Sukanya and Mr. Narsimhan

So Mr. and Mrs. Narasimhan started preparing breakfast in their home and distributing it to all these people. Initially in March the number was around 35 but it gradually went on increasing. This venture of distributing breakfast went on till the 3rd week of July. At that time, the number of people receiving the breakfast went up to 75!

Can you imagine when we were boggled by the volume of work in our home which was about for 4 people, Mr. and Mrs. Narasimhan were running a kitchen preparing breakfast for 75 people, that too everyday. 

Piping hot Idli+ Chutney

Soon this news spread in the society. I would love to quote Mr. Narsimhan’s words,” Though community spread is bad in Corona, this community spread of the news was for good cause!” Some people came forward for helping in distribution like Mr. Prasad Natu, Mr. and Mrs Sudha Krushnan, Mr. and Mrs Lakshmi Harish who helped regularly.

Distribution Of Breakfast.

Distribution Of Breakfast.

Distribution Of Breakfast.

Some people like Lakshmi Harish, Sudha Krishnan, Jyotsna Nijsure, Shekdar, Dadape, Venkatraman, Anil Gupta, Anathkrishnan, Patade, HP Chankak, Prasad Natu, Adv. Mudholkar, Deepak Kulkarni, Sujay Paranjape sponsored the breakfast on some days. But on the other days, which was more than 3 months, Mr and Mrs Narsimhan prepared breakfast everyday and distributed it to the sweepers, cleaners and security guards. 

I am proud to have friends like Mrs. and Mr. Narsimhan and feature them for Dhanashree Gruh Udyog’s Dost Hero! May there be many people like them in society!


Wednesday, 5 August 2020

चित्र-जय श्रीराम !!

काल आपण शब्द, नृत्य, नृत्यनाट्य, शिल्प ह्यातून दिसणारी रामकथा पहिली. आज पाहणार आहोत, चित्रातून दिसणारी रामकथा. 
रामकथा चित्रांचा विषय झालेली अनेक देशात दिसून येते. मला विशेष करून आठवतायत ती कंबोडियात मिळणारी, राईस पेपरवर एम्बॉस करून तयार केलेली रामकथेतील चित्रे. 




भारतातील प्रत्येक चित्रशैली मध्ये केलेली राम कथा आपल्याला बघायला मिळते.चित्रकूट येथील शिल्प चित्रमय रामदर्शन प्रसिद्ध आहे. राजा रविवर्मा ह्यांनी केलेले राम पंचायतन आणि त्यातली महाराष्ट्रीयन पद्धतीची सीतेची साडी आपल्या सगळ्यांना आठवत असेलच. 
 

काही वर्षांपूर्वी आई -सुशील अभ्यंकर, सिंगापूरला आली होती, तेव्हा रामनवमीच्या निमित्ताने रामायणावर तिचे व्याख्यान झाले होते.
आमचे स्नेही, चित्रकार श्रीरंग केळकर ह्यांनी श्रीरामाचे समयोचित असे उत्तम चित्र काढून तिला भेट दिले होते.


ते अजूनही तिच्या खोलीत लावलेले आहे. इतकेच नव्हे तर आज अयोध्या राम मंदिर भूमिपूजन निमित्ताने त्याच चित्रासमोर तिने रामरक्षा म्हटली. आज भूमी पुजना पर्यंत तिचा श्रीराम जय राम जय जय राम ह्या मंत्राचा 10000 जप पण करून झाला होता. (तसे तिचे वय काही फार नाही..अवघे 91 वर्षे. इतकी तरुण असल्यानेच ती जे ठरवते ते जिद्दीने पूर्ण करू शकते!)

#जयश्रीराम #JaiShreeram

Tuesday, 4 August 2020

श्रीरामदूत-जयश्रीराम

"मनोजवं मारुत तुल्यवेगं
जितेन्द्रियं बुध्दिमतां वरिष्ठं
वातात्मजं वानरयुथमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।"
अतिशय बुद्धिमान आणि शक्तिशाली असूनसुद्धा संपूर्ण दास्यवृत्तीने श्रीरामाला शरण गेलेल्या हनुमंताचे स्मरण केल्याशिवाय रामाचे संकीतर्न कसे होणार?
अयोध्येत देखील अशीच पद्धत आहे कि आधी हनुमानगढी मंदिराचे दर्शन घ्यायचे आणि नंतर राम मंदिरात जायचे.
उद्या माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आधी हनुमानगढी मध्ये जाऊन पूजा करतील आणि नंतर भूमिपूजनासाठी पूजा स्थानी जातील.
 
जिथे जिथे जगभरात भारतीय संस्कृती पोचली तिथे तिथे हनुमानदेखील आहेच. हनुमानाचे प्रचंड पुतळे बाली, इंडोनेशिया, बाटु केव्हस,मलेशिया इथे पाहायला मिळतात. सिंगापूर मध्ये देखील सगळ्यांना मंकी गॉड माहिती असतो. सर्व लेण्या, भित्तिचित्रे ,अगदी पुरातन काळापासून रामा चे चित्र हनुमानाखेरीज पूर्ण होत नाही.
श्रीराम आणि हनुमान ह्या दोघांचीही भक्ती ज्यांनी जोपासली आणि राष्ट्रीय कार्यात परिवर्तित केली त्या समर्थ रामदासांचे स्मरण झाल्याविना आजचा दिवस सुरु व्हायचा नाही. 


रामकथा जिथे सांगितली जात असेल तिथे हनुमान असतोच असे मानले जाते. परंपरेनुसार हनुमानाची रामकथा चालू असेल तिथे असं मांडण्याचा प्रघात आहे. ह्या सर्वातला विश्वास आणि श्रद्धा फार लोभस आहे. नंतर कथा संपल्यावर हनुमानाला विनवले जाते,
"कथा समाप्ती होतसे ऐकावे हनुमान। जाती सुजन सकल श्रोते करिती प्रयाण। सांगा आमुचे दंडवत प्रभूला विनवुन फार मज दासाची रघुवीरा द्या स्मृती वारंवार ।।
ह्या पारंपरिक श्लोकात थोडा बदल करून आज म्हणावेसे वाटते आहे,
अभिमानगाथा सुरु होतसे ऐकावे हनुमान।
तत्पर सुजन करण्या राम मंदिर निर्माण।
सांगा आमुचे दंडवत प्रभूला विनवुन फार।
आम्हा दासांची रघुवीरा द्या स्मृती वारंवार।
सज्जनगड राममूर्ती
(P.C.धनश्री नानिवडेकर) 

#JaiShreeram # जयश्रीराम

शिल्पकला - जय श्रीराम!

 जिथे जिथे हिंदू संस्कृती पोचली तिथे तिथे रामकथा पोचली. रामाचे उदात्त चरित्र जनमानसाला मोहिनी घालत राहिले. त्याचे पडसाद आपल्याला शिल्पकलेत उमटलेले दिसतात. 

कंबोडिया मधील अंगकोरवाट मंदिरातील रामायण कथा शिल्पांची पॅनेल्स आणि सियमरीप परिसरातील बाकी मंदिरात दिसणाऱ्या रामकथेतील मूर्ती, इंडोनेशियातील जावा मधील प्रम्बनन मंदिरातील रामायणातील शिल्पे, बाली मधील देनपसार आणि उबूद मधील भव्य रामायणातील पात्रांचे पुतळे, मलेशियातील बाटु केव्हस मधील रामायण शिल्पे असे अनेक ठिकाणी आपल्याला शिल्पांमधून रामायण साकार झालेले दिसते. 

भारत तर रामाची जन्मभूमी! इथे ठिकठिकाणी रामायण दिसणार त्यात नवल नाहीच. काही हजार वर्ष जुन्या गुहा आणि लेण्यांतील रामायण शिल्पांपासून ते चित्रकूट च्या राम दर्शन प्रकल्पापर्यंत आपल्याला रामायण दिसत राहते. आज इथे पोस्ट करते आहे दोन फोटो. 

एक आहे एलापूर अर्थात वेरूळ मधील १६ नंबर लेणी - कैलास लेण्यातील दक्षिण भिंतीवर असलेले रामायण पॅनल 
संपूर्ण रामायण इथे महत्वाच्या प्रसंग रूपाने दाखवले गेले आहे.

(P.C. इंद्रनील बंकापूरे )

त्या काळातील कलाकारांनी पिढ्या न पिढ्या काम करून अतिशय कौशल्याने हि लेणी कोरली आहेत. एकश्लोकी रामायणातील ओली आपण पहिल्या तर त्या सगळ्या ह्या शिल्पात आपल्याला सापडतील. 
दुसरा फोटो आहे तो दिल्लीतील संकेतजवळील कुंभारवाड्यात घेतलेल्या राम पंचायतन मूर्तीचा. ह्या शिल्पातील देखणे आकार, चेहरे, सुकुमार शरीरयष्टी हे सगळेच लोभस आणि त्याला खास मातीचे मार्दव प्राप्त झाले आहे.

(P.C.प्रज्ञा साठे)
 
थोडक्यात राज घराण्यांपासून ते गल्लीतील कारागिरांपर्यंत, पुरातन लेण्यांपासून ते आधुनिक प्रोजेक्ट्स पर्यंत रामायण शिल्पे प्रत्येक कलाकाराला मोह पाडतात. 
#Jaishreeram #जयश्रीराम 

PhraLak PhraRam -- जय श्रीराम

विजयादशमी च्या आधी नऊ दिवस चालणारी रामलीला उत्तर भारतीय संस्कृतीची विशेष चिन्ह आहे. मध्य व दक्षिण भारतात रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात.

इंडोनेशिया बालीतील केचक (Kecak )नृत्य, कंबोडियातील रीमाके (Reamker), मलेशियातील हिकायत सेरी रामा (Hikayatseri Rama), लाओस मधील PhraLak PhraRam. आग्नेय आशियात ठिकठिकाणी रामायण पाहायला मिळते.
Pra Lak Pra Ram हे लाओसचे राष्ट्रीय महाकाव्य आहे आणि ते वाल्मिकी रामायणावर आधारलेले आहे. इथेहि जरी रामच नायक असला तरी लक्ष्मणाचे नाव आधी येते. त्यामागचे कारण असे की रामाला राजा म्हणून जे करणे आवश्यक होते ते त्याने केले पण लक्ष्मणाने मात्र स्वतःच्या इच्छेने त्याच्याबरोबर वनवास स्वीकारला तसेच आयुष्यभर त्याला साथ दिली. त्याबद्दल गौरव म्हणून लक्ष्मणाचे नाव आधी येते!
या महाकाव्यात ते दोघं राजा Thattarath ह्याचे पुत्र आहेत. ह्या काव्यात Nang Sida आहे,जिला लक्ष्मीचा अवतार मानले गेले आहे. इथे monkey Hanoumane आहे, जो त्यांना Sida चा शोध घ्यायला आणि युद्धातही मदत करतो. Totsakhan आहे जो सिदाला पळवून नेतो आहे. लाओसमध्ये लोक मानतात की रामायण हे जातक कथा आहे!
ह्या सर्व पात्रांचे मुखवटे, त्यांच्या कपड्यांचे रंग हे परंपरेने चालत आले तेच आहेत. कोणती वाद्ये वापरली जावीत, कोणत्या प्रसंगी कोणते संगीत वाजेल हे देखील ठरलेले असते.
पिढ्यानपिढ्या हा वारसा निष्ठापूर्वक जपणारे कलावंत लाओसमध्ये आहेत. मधल्या अस्थिरतेच्या काही दशकांत हे नृत्यनाट्य सादर करायला बंदी होती. पण कलावंतानी हि कला प्राणपणाने जपल्यामुळेच ती लुप्त न होता आज सादर होऊ शकत आहे.
लुआंग प्रबांग च्या नॅशनल म्युझियम परिसरात असलेल्या रॉयल थियेटर मध्ये रोज PhraLak PhraRam सादर होते. एकूण त्यांनी साधारण ९ प्रवेश आहेत. त्यातील रोज दोन प्रवेश सादर होतात. आम्हाला लुआंग प्रबंग मध्ये हि नृत्य नाटिका बघण्याची संधी मिळाली होती.




आपल्याला ह्या विषयी आंतरजालावर खूप माहिती मिळेल. YouTube वर अनेक clippings बघायला मिळतील.
इंडोनेशिया मध्ये योग्यकर्ता आणि भारतात दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय रामायण परिषदेत देखील हे नृत्यनाट्य सादर झाले होते.


त्यांना समजलेली, भावलेली रामायण कथा, ती परंपरा निष्ठापूर्वक जतन करण्याचा प्रयत्न,त्या सादरीकरणातील कर्मठता जपल्याने येणारे वैशिष्ट्य सगळेच संस्मरणीय आहे.





Monday, 3 August 2020

नृत्य - श्री रामचन्द्र कृपालु भजुमन हरण भवभय दारुणं

गीतारामायणाद्वारे केलेले श्रीरामांचे शब्द संकीर्तन आपल्या सगळ्यांच्या हृदयात वसलेले आहे. श्रीरामरक्षा आपल्या सायं प्रार्थनेचा अविभाज्य भाग आहे. रामाचे महान भक्त असलेले समर्थ रामदास आणि त्यांनी केलेली रामस्तुती पूजनीय आहे. वाल्मिकी रामायण, तुलसीरामायण -श्रीरामचरितमानस आणि इतर अनेक रामायण आवृत्त्या हे आपले पवित्र ग्रंथ आहेत. 
भारतीय संस्कृतीत रुजलेला राम नृत्यांत पूजला गेला नसता तरच नवल. भारतातील सगळ्या शास्त्रीय नृत्यशैली, लाओस कंबोडिया येथील रामायण नृत्य नाटिका, इंडोनेशिया बाली मधील केचक नृत्य सगळ्यात राम आहेच. 
प्रत्येक जण आपापल्या परीने नृत्यातून श्रीरामांचे गुण संकीर्तन करीत आहे. 
इथे प्रस्तुत करते आहे, 
महान संत गोस्वामी तुलसीदास ह्यांनी लिहिलेली राम वंदना 
श्री रामचन्द्र कृपालु भजुमन हरण भवभय दारुणं 
स्वर - लता मंगेशकर 
नृत्यशैली - कथ्थक 
नर्तिका - स्नेहा टिळक, मृणाल मोडक 
नृत्य दिग्दर्शन - भूपाळी कुलकर्णी देशपांडे 
प्रयोजन - महाराष्ट्र मंडळ,सिंगापूर कार्यक्रम 

 

https://youtu.be/rzARAU9pK48

त्रिवार जयजयकार रामा त्रिवार जयजयकार!!

आपल्या सर्वांच्या हृदयात वसणारे, मनात रुजलेले गीत रामायण आज पुन: पुन्हा आठवते आहे! 
शब्दप्रभू ग.दि.माडगुळकर आणि स्वरतीर्थ सुधीर फडके ह्यांच्या मनातील रामभक्ती, जनशक्ती बनून अवतरली आणि अनेक शतके तशीच मराठी जनांच्या ओठांवर पण राहील ह्यात तिळमात्र शंका नाही. त्याच गीत रामायणातील शब्दांचा आधार घेऊन आज म्हणावेसे वाटत आहे,
त्रिवार जयजयकार रामा त्रिवार जय जय कार
भरत भूवरी आज उतरले स्वर्ग सौख्य साकार ||
तव दृष्टीच्या पावन स्पर्शे 
आज मांडला उत्सव हर्षे
मने विसरली पाचशे वर्षे
सुसज्ज आहेत तव सिंहासन, करी प्रभो स्वीकार 
त्रिवार जयजयकार रामा त्रिवार जयजयकार।।१।। 
प्रजा जनीं जे रचिले स्वप्नी 
मूर्त दिसे ते स्वप्न लोचनी
जयघोष उमटे मनामनातूनी 
स्वस्थळीच होणार उन्नत सुंदर, मंदिर पुन्हा साकार
त्रिवार जयजयकार रामा त्रिवार जयजयकार ।।२।।


महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...