"मनोजवं मारुत तुल्यवेगं
जितेन्द्रियं बुध्दिमतां वरिष्ठं
वातात्मजं वानरयुथमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।"
अतिशय बुद्धिमान आणि शक्तिशाली असूनसुद्धा संपूर्ण दास्यवृत्तीने श्रीरामाला शरण गेलेल्या हनुमंताचे स्मरण केल्याशिवाय रामाचे संकीतर्न कसे होणार?
अयोध्येत देखील अशीच पद्धत आहे कि आधी हनुमानगढी मंदिराचे दर्शन घ्यायचे आणि नंतर राम मंदिरात जायचे.
उद्या माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आधी हनुमानगढी मध्ये जाऊन पूजा करतील आणि नंतर भूमिपूजनासाठी पूजा स्थानी जातील.
जिथे जिथे जगभरात भारतीय संस्कृती पोचली तिथे तिथे हनुमानदेखील आहेच. हनुमानाचे प्रचंड पुतळे बाली, इंडोनेशिया, बाटु केव्हस,मलेशिया इथे पाहायला मिळतात. सिंगापूर मध्ये देखील सगळ्यांना मंकी गॉड माहिती असतो. सर्व लेण्या, भित्तिचित्रे ,अगदी पुरातन काळापासून रामा चे चित्र हनुमानाखेरीज पूर्ण होत नाही.
श्रीराम आणि हनुमान ह्या दोघांचीही भक्ती ज्यांनी जोपासली आणि राष्ट्रीय कार्यात परिवर्तित केली त्या समर्थ रामदासांचे स्मरण झाल्याविना आजचा दिवस सुरु व्हायचा नाही.
रामकथा जिथे सांगितली जात असेल तिथे हनुमान असतोच असे मानले जाते. परंपरेनुसार हनुमानाची रामकथा चालू असेल तिथे असं मांडण्याचा प्रघात आहे. ह्या सर्वातला विश्वास आणि श्रद्धा फार लोभस आहे. नंतर कथा संपल्यावर हनुमानाला विनवले जाते,
"कथा समाप्ती होतसे ऐकावे हनुमान।
जाती सुजन सकल श्रोते करिती प्रयाण।
सांगा आमुचे दंडवत प्रभूला विनवुन फार
मज दासाची रघुवीरा द्या स्मृती वारंवार ।।
ह्या पारंपरिक श्लोकात थोडा बदल करून आज म्हणावेसे वाटते आहे,
अभिमानगाथा सुरु होतसे ऐकावे हनुमान।
तत्पर सुजन करण्या राम मंदिर निर्माण।
सांगा आमुचे दंडवत प्रभूला विनवुन फार।
आम्हा दासांची रघुवीरा द्या स्मृती वारंवार। #JaiShreeram # जयश्रीराम



No comments:
Post a Comment