Thursday, 27 July 2023

शब्दरूप लेऊन फुलल्या.. मनमंदिरा ..

 शब्दरूप लेऊन फुलल्या..  

मनातल्या मुक्या भावनांना शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत कविता लिहिली जाते. खरे तर लिहिलेल्या शब्दांच्या मधल्या अवकाशात कविता कितीतरी सांगत असते. या लेखमालिकेत आपण वाचणार आहोत, अशा कवितांविषयी. दोन शब्दांच्या मधल्या अवकाशाचा शोध घेण्याचा हा तोकडा प्रयत्न आहे. 

—-----------------------------------------------------------

मनमंदिरा .. 

घनदाट अंधारात  दिशा दिसत नसतात.  कुठे जावे समजत नसते. अशा भांबावलेल्या स्थिती कुठून तरी एखादा बारीकसा प्रकाश कण दिसतो. खरे तर तो कण असतो अगदी बारीकसा.  पण  त्याच्या अस्तित्वामुळे धास्तावलेले मन थोडे शांत होते. अंधार दाट आहे हे खरं आहे, पण म्हणून प्रकाश दिसतो आहे हे काय खोटं आहे?  असे मनाला वाटू लागते.  त्या प्रकाशाच्या भरवशावर माणूस चालत राहतो.


गडद काळोखात सगळीकडे अंधार असताना काजव्यांचा प्रकाश देखील माणसाला धीर देतो.  मन उजळून टाकतो. असाच अनुभव देणारे गीत म्हणजे 'मन मंदिरा..'

'कट्यार काळजात घुसली' या सुप्रसिद्ध चित्रपटातील हे गीत. 

गीत - मंदार चोळकर, संगीत - शंकर एहसान लॉय, गायक - शंकर आणि शिवम महादेवन 


मन मंदिरा… तेजाने…
मन मंदिरा… तेजाने उजळून घेई साधका
मन मंदिरा… तेजाने उजळून घेई साधका
संवेदना… संवेदना… संवादे सहवेदना… जपताना
मन मंदिरा…

तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी
तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी
स्वयंप्रकाशी तू तारा…..
स्वयंप्रकाशी तू तारा
चैतन्याचा गाभारा
भर पंखातून स्वप्न उद्याचे
भर पंखातून स्वप्न उद्याचे
झेप घे रे पाखरा
उजळून घेई साधका
मन मंदिरा.. तेजाने उजळून घेई साधका
मन मंदिरा… मन मंदिरा…
मन मंदिरा…


काही महत्वाचे मुद्दे आपण टिपून ठेवतो तसे हे गीत मला वाटते. गाणे होताना आलाप ताना आल्याने ते गीत मोठे वाटते. अन्यथा कविता म्हणून अगदी  लहान लहान आणि थोड्याच ओळी आहेत. मानसशास्त्रातील सूत्रे सांगावीत तसेच प्रत्येक ओळीत एकेक मुद्दा सांगितलेला आहे. 

चित्रपटातील संदर्भ लक्षात न घेता नुसती एक स्वतंत्र कविता म्हणून देखील उत्कट आणि अर्थपूर्ण असलेली ही रचना. 

सर्वात महत्वाचा शब्द म्हणजे साधका. इथेच लक्षात येते की आपण सारेच साधक नाही का? आपापल्या समजुतीनुसार आणि कुवतीनुसार जगण्याला अर्थ देऊ पाहण्याची साधना करत असलेले साधक. 

साधकाने स्वतःच्या मनाचा गाभारा तर उन्नत तेजस्वी विचारांनी उजळून घ्यायचा आहेच. पण दुसऱ्याच्या भावना जाणवतील, टिपता येतील असे तरल संवेदनशील मन ठेवायचे आहे.  तेजाने मन उजळून गेल्यावर मनात कुठल्या वाईट विचारांना, अंधाराला जागा राहीलच कशी? 

पुष्कळदा असे होते की स्वतःच्या यशाच्या, आनंदाने हरखून जाउन, त्या  भरात माणूस दुसऱ्यांचा विचार करणे विसरून जातो. कधी कधी ह्याच्या अगदी उलट देखील होते. आपलेच दुःख आपल्याला इतके मोठे वाटत असते, आपल्याच दुःखाने आपल्याला इतके व्यापून टाकलेले असते की आपल्या आजूबाजूला असलेल्यांचे दुःख आपल्याला दिसतच नाही. 

माणसाला स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांच्या भावना जाणवणे ही सहवेदनाच नव्हे का? असे मन असण्यासाठी, त्या वेदना जाणवल्यावर योग्य ती कृती करण्यासाठी  देखील साधना आवश्यकच. 

तळहाताच्या रेषांनी ..सहजसुखा का भोगी कुणी? अगदी खरे आहे. आपल्याला यशस्वी माणसांचे यश दिसते. पण त्या साठी त्यांनी केलेले प्रयत्न मात्र खूपदा लक्षात येत नाहीत. परीक्षेत यश मिळवण्यासाठी एकाग्रतेने केलेला अभ्यास, बाकी सुखांचा केलेला त्याग  आपल्या लक्षात येत नाही. एखाद्या खेळाडूचे, उद्योगपतीचे यश दिसते पण त्या आधी त्यांनी केलेले जीवतोड प्रयत्न लक्षात येत नाहीत. 

एखादे माणूस लोकप्रिय असते. इथे  मी पुढारी, नेते, इतर माध्यमातील चमकणारे तारे, लेखक, कवी इत्यादी अशा मोठ्या लोकांविषयी बोलत नाहीये.  तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांविषयी बोलते आहे. तर त्या लोकप्रिय माणसाविषयी, त्याच्या आजूबाजूला नेहमी असणाऱ्या माणसांविषयी बोलताना आपण हे विसरून जातो की आजूबाजूची  माणसे जपताना, त्या आता लोकप्रिय असलेल्या माणसाने भरपूर प्रयत्न केलेले असतात. प्रसंगी स्वतःचे सौख्य, स्वास्थ्य, शांतता बाजूला ठेवून मदत केलेली असते.भावनिक आणि मानसिक गुंतवणूक केलेली असते.  

त्यामुळेच साधका, सहज मिळते असे काहीच  नाही, कोणतेच सुख नाही. प्रयत्न करशील तर मात्र नक्कीच साध्य  होईल. कठोर परिश्रमाने तू ध्येयापर्यंत पोचलास की तूच स्वयंप्रकाशी होऊन जाशील. इतरांना मार्गदर्शक ठरशील. 

अशी मनाची जागरूक अवस्था असेल, आत्मज्ञान प्राप्त झालेले असेल तेव्हा साधका, तूच चैतन्यमय झालेला असशील. नाही का? चैतन्य तरी वेगळे काय असते? 

उद्याचे स्वप्न बघ. त्या साठी सर्व ते प्रयत्न कर आणि झेप घे. 

मनाने पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात येतील याचे जणू आश्वासन देणारा असा हा क्षण. असे म्हणतात की स्वप्न तर सगळेच जण पाहतात.  पण त्या स्वप्नांचा पाठपुरावा करून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करणारे फारच थोडे जाण्यास असतात. 

गेल्या काही  वर्षात वाढलेल्या  डिप्रेशनच्या केसेस, वाढलेले आत्महत्यांचे प्रमाण आपल्याला काय सांगते? चिंतेने, शंकेने  मन ग्रासून गेल्यावर सारासार विवेक नाहीसा होतो.  विचार शक्ती नाहीशी होते आणि त्यामुळेच माणूस निराश होतो, आत्महत्या करण्यास पटकन प्रवृत्त होतो. 

पण डोळ्यांपुढे जर एखादे भव्य  स्वप्न असेल, ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असतील ते सगळे कष्ट करण्याची तयारी असेल, जिद्द असेल तर मग मनात निराशेला थारा राहीलच कसा? 

मनाचे मंदिर तेजाने उजळून टाकण्याची, मंदिराचा गाभारा चैतन्याने उजळून टाकण्याची, इतरांचे दु:ख जाणून ते दूर करण्याची, स्वप्न पाहून त्या साठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देणारे हे काव्य.  कर्तव्य करण्यास प्रवृत्त करणारे,  प्रसन्न मनाने प्रकाशाच्या दिशेने प्रवास करायला उद्युक्त करणारे असे  हे सुंदर गीत.  कविता म्हणून विचार केला तर अगदी मोजक्या पाच-सहा ओळींची ही कविता.  पण त्यातून प्रगट होणारा भाव मात्र खूप मोठा.  शब्दातून व्यक्त होणाऱ्या भावाला साजेल अशीच त्याला दिलेली सुरांची सजावट. कधी कधी असे  होते  की सुरावट एवढी मोहक असते, एवढी लोभस असते की त्यामुळे शब्दांकडे दुर्लक्ष होते.  या गीताच्या बाबत मात्र तसे  होत नाही.  चित्रपटातील तो प्रसंग, सुंदर भरदार आवाज, ते मोहून  टाकणारे सूर याचबरोबर लक्षात राहतात  ते अर्थ देखील तितक्याच प्रभावीपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचवणारे शब्द.  

- वृंदा टिळक.

पूर्वप्रसिद्धी - ऋतुगंध वर्षा ( २०२३ )


Tuesday, 21 February 2023

मत्स्य जयंती

 नुकत्याच एका कला दालनात के.. के.  हेब्बर यांचे एक चित्र पाहिले.  मासा आणि मनुष्य. 




एखादी कलाकृती तयार करताना, मग ते चित्र असो वा कविता असो, त्या कलावंताला त्यांच्या मनातले व्यक्त करायचे असते.  पण ती बघताना प्रेक्षकांना आणि ऐकताना श्रोत्यांना काय वाटते  ते कदाचित वेगळे असू शकते.  तसेच काहीसे ह्या  चित्राच्या बाबतीत मला वाटते. 

विश्वाच्या पसाऱ्यात केंद्रभागी एक काळा गोल आहे. त्याच्यात नावेत बसलेला एक माणूस आहे.  माणूस आणि नाव यांच्या तुलनेत कितीतरी महाकाय असलेला एक मासा आहे आणि माणूस त्या माशाला पकडतो आहे. पण ते जाळे नाहीये तर काठी सारखे दिसणारे काही तरी आहे. मग तो भाला टोचतोय आहे का? की ते सरळ दिसणारे आहे ते माशाला बांधलेले आहे आणि तो मासाच त्या माणसाची होडी ओढत नेतो आहे? त्याला वाचवतो आहे? 

फार फार पूर्वीची गोष्ट आहे. प्रलय झाल्यावर त्या प्रलयापासून माणसाला वाचवणारा एक महाकाय मासाच  होता. 

तेव्हापासून आजपर्यंतचा खूप मोठा प्रवास झाला आहे हा.  उद्धार करणारा  ते शिकार होणारा असा माशाचा प्रवास आणि माशाकडून उद्धरला जाणारा ते मासे पकडणारा, त्यांची शिकार करणारा असा माणसाचा प्रवास. 

तसा तर मासा  मानवी संस्कृतीशी  अगदी पहिल्यापासून जोडला गेलेला आपल्याला आढळतो.  लहान मुले  चित्र काढायला शिकतात.  तेव्हा सर्वात आधी  काढतात त्रिकोणी डोंगर, मग एक गोल सूर्य, मग नागमोडी रेषांचे  पाणी. बोटांना हे प्राथमिक आकार काढायचे वळण लागले की मग मुले जरा अवघड आकार काढू लागतात. त्यामूळे नंतर ह्या चित्रात येतात  मराठी चारच्या आकारातील पक्षी आणि एक लंब गोल, त्याला मागे त्रिकोण असे असलेले मासे!!  मराठी हिंदी बालगीतातून लहान मुलांना मासे माहिती झालेले असतात. अगदी चैत्र महिन्यात दारापुढे काढल्या जाणाऱ्या चैत्रांगण  रांगोळीत देखील मासे असतात. 

महाराष्ट्राचे लोकदैवत असलेला पंढरीचा विठोबा कानात मकर कुंडले घालून युगानुयूगे उभा आहे.  मकर याचा प्रथमदर्शनी अर्थ मगर असा असला तरी मकर म्हणजे मासा असाही एक अर्थ आहे आणि विठ्ठलाच्या कानातली कुंडले  ही मत्स्याकृतीची आहेत. 

साहित्याचा विचार केला तर महाकवी कालिदासाने लिहिलेल्या अभिज्ञान शाकुंतल मध्ये माशाची खूप मोठी भूमिका आहे.  मोठी म्हणजे लांबीच्या दृष्टीने मोठी नव्हे कथानकाच्या दृष्टीने मोठी  भूमिका आहे.  दुष्यंताने शकुन्तलेला आपली खूण म्हणून दिलेली शकुंतलेची अंगठी पाण्यात पडते. शकुंतलेला दुर्वासांनी शाप दिलेला असतो की ज्याच्या चिंतनात मग्न आहेस आणि म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष केलेस.  तो तुला ओळखणार देखील नाही.  पण मग ते उ:शाप देखील देतात की तू त्याला अंगठी दाखवलीस तर तो तुला ओळखेल.  पण शकुंतलेची अंगठी तर पाण्यात पडून गेलेली असते आणि ती नसल्यामुळे दुष्यंत तिला ओळखत नाही. पाण्यात पडलेली ती अंगठी एका माशाने गिळलेली असते. नंतर ती एका कोळ्याला सापडते आणि तो दुष्यन्ताला आणून देतो आणि मग दुष्यंताला सगळे आठवते.  असे कथानक आहे.  

हेमिंगवेच्या ‘ओल्ड मॅन अँड द सी’ मध्ये देखील ओल्ड मॅन इतकाच मासा देखील प्रमुख भूमिका निभावतो! 

सिनेसृष्टीत मासे वारंवार आलेले आढळतात. अगदी सर्वात नवा  उल्लेख करायचा म्हणजे ‘अवतार -२, द वे ऑफ वॉटर’ मधला अगदी वेगळाच आणि अतिशय बुद्धिवान मासा टुलकून.  त्याच्या मेंदूतून काढलेले द्रव्य माणसाला अमर बनवणारे असते.  फाइंडिंग निमो मध्ये तर कितीतरी मत्स्यकुळे होती. हिंदीतल्या चित्रपटांत म्हणायचं तर सर्व लहान मुलांना आवडलेला अजूबा सिनेमा आणि आईसारखी माया करणारा डॉल्फिन मासा आठवतो. 

विविध संस्कृतीत मासा 

हिंदू धर्मात मनूला माशांनी वाचवण्याची कथा तर आपण नंतर विस्ताराने पाहणार आहोतच.मासा  हे केवळ भारतीय संस्कृतीतच नाही तर इतर संस्कृतीत देखील आपल्याला प्रतीक म्हणून वेगवेगळ्या धर्मग्रंथात, धार्मिक चिन्हात वापरलेले आढळतात.  चिनी संस्कृतीत  मासा हे समृद्धीचे प्रतीक मानतात. शांती, स्थिरता आणि वैभवाचे  प्रतीक म्हणजे कोई मासा. विपरीत परिस्थितीवर जिद्दीने मात करणे आणि सातत्याने प्रयत्न करत राहणे हे माशाचे प्रतीक शिकवते. माशाला ग्रीक शब्द ichthys आहे. त्याचे इंग्लिश मध्ये भाषांतर केले तर त्याचा अर्थ होतो जीझस - देवाचा पुत्र.  ख्रिश्चन धार्मिक कथांमध्ये माशांचा उल्लेख आढळतो. मासे असंख्य अंडी देतात.  त्यामुळे मासा हे  प्रजोत्पादनाचे आणि भाग्याचे प्रतीक मानला जातो. 

इस्लाम धर्मात मासा हे चिरंतन आयुष्याचे आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. एका माशावर बसून पालखीत मार्गदर्शक जातो आहे असे इस्लामी धर्मग्रंथात दाखवले जाते. 

बुद्ध धर्मात बुद्धाच्या आठ पवित्र चिन्हांपैकी दोन सोनेरी मासे हे एक चिन्ह आहे.  निर्भयतेने आणि आनंदाने जगण्याची शिकवण हे मासे देतात.  

निरनिराळ्या ठिकाणी गुहातून सौंदर्याचा प्रतीक म्हणून मासे कोरलेले आपल्याला आढळतात.  

प्राणी शास्त्रातील वर्गीकरणातील जलचर, उभयचर, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राणी अशा प्रगतीच्या स्तरांवर मासे हे सर्वात पहिल्या स्तरावर आढळतात. 

दशावतारांची संकल्पना

भारतीय संस्कृतीतील दशावतारांची संकल्पना उत्क्रांतीवर आधारलेली आहे असे मानले तर  तिथे देखील विष्णूने घेतलेला पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार होय.

त्यानंतरचे अवतार हळूहळू प्रगत होऊ लागलेले आपल्याला आढळतात. मुळात हिंदू संकल्पनेनुसार अवतार होतात ते संकटातून पृथ्वीचे आणि मानवाचे रक्षण करण्यासाठी. 

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥४-७॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥४-८॥

सज्जनांचे रक्षण आणि धर्माचे सामर्थ्य पुनःप्रस्थापित करण्यासाठी मी येतो असे गीतेत सांगितलेच आहे. 


कोणते आहेत हे अवतार? 

मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम,राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. 

ह्या दशावतारांच्या जन्मतिथीचा उल्लेख देखील आढळतो. मत्स्य—चैत्र शुद्ध तृतीया, कूर्म—वैशाख पौर्णिमा, वराह—भाद्रपद शुद्ध तृतीया, नरसिंह—वैशाख शुद्ध चतुर्दशी, वामन—भाद्रपद शुद्ध द्वादशी, परशुराम—वैशाख शुद्ध तृतीया, राम—चैत्र शुद्ध नवमी, कृष्ण—श्रावण वद्य अष्टमी, बुद्ध—आश्विन शुद्ध दशमी आणि कल्की—श्रावण शुद्ध षष्ठी अशा त्या जन्मतिथी आहेत. 


तर  काही पुराणातील वर्णनानुसार 

जलजौ वनजौ खर्व : त्रिरामी सकृपोSकृप: 

अवतारा द शै वै  ते  कृष्णस्तु भगवान  स्वयं । 

दहा अवतार असे आहेत. जलज-  पाण्यात उत्पन्न होणारे दोन अवतार ,हणजे मत्स्य आणि कासव - कूर्म. वनज - जंगलात निर्माण होणारे दोन अवतार म्हणजे वराह आणि नृसिंह.  खर्व -वामन.  त्रिरामी म्हणजे तीन राम -परशुराम, दाशरथी राम आणि बलराम. आता  सकृपोSकृप:  म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल तर कृपायुक्त अवतार म्हणजेच सकृप आहे बुद्ध आणि कृपाहीन अवतार म्हणजे अकृप आहे कल्की. 

आधीच्या वर्णना पेक्षा बलराम इथे वेगळा आहे हे तर झालेच. पण कृष्ण नाही असे कसे? तर त्याचे उत्तर आहे ह्याच श्लोकाच्या अंतिम चरणात  की कृष्ण हेच स्वतः भगवान असून त्याच्यापासून सर्व अवतार निर्माण झाले आहेत. 


मत्स्य कूर्म  वराहस्य नरसिंहोsश्च वामन:

रामो रामश्च कृष्णश्च बुध्द: कल्किश्च ते दश: 

पद्म पुराण आणि इतर पुराणात हेच वर्णन दिलेले  आढळते. 

दशावतार - वैज्ञानिक संकल्पना 

मगाशी आपण वाचले की अवतार आपल्याला प्रगतीचे टप्पे दाखवतात. ह्या सृष्टीची प्रगती, मानवाची प्रगती दाखवतात.  प्रगती कशाच्या संदर्भात? तर गुणांची उत्क्रांती आणि विकास इथे अभिप्रेत आहे. अगदी वैज्ञानिक तत्वांवर आधारलेली अशी ही शृंखला आहे. 

सृष्टीचा प्रारंभ जलचर प्राण्यांपासून झाला असे म्हणतात. मासा त्या सृष्टिप्रारंभाचे  प्रतीक आहे.  कारण मासा पाण्यात राहतो. पृष्ठवंशी प्राण्यांमधल्या पहिल्या वर्गाचे प्रतिनिधित्व तो करतो.  पाण्याबाहेर तो जिवंत राहू शकत नाही. 

त्या नंतरचा अवतार आहे  जमीन आणि पाणी दोन्हीवर जगू शकणारे उभयचर कूर्म. . पृष्ठवंशी प्राण्यांतील दुसरा वर्ग. थोड्या प्रगत युगाचे प्रतिनिधित्व कासव करते.  ते पाण्यात राहिले तरी जमिनीवर पण जिवंत राहते. त्यानंतरचा अवतार आहे वराह.  जीवसृष्टी आणखी प्रगत झाल्याचा पुरावा. केवळ जमिनीवर जगू शकणाऱ्या प्राण्यांचे युग सुरू झाले हे दर्शविणारा  प्रतिनिधी म्हणजे वराह. 

 यानंतर बाकी सर्व प्राणी विकसित झाले. सर्वात शेवटी आला मानव. तोच मानव की जो सध्या केवळ बुद्धीच्या जोरावर आपणच सर्व सृष्टीचे राजे आहोत, सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत असे मानून त्यांचे शोषण करतो तो मानव. खरे तर आपण लक्षात ठेवले पाहिजे की आपण ह्या पृथ्वीतलावर सर्वात शेवटी आलो आहोत. 

 मानव आत्ताच्या अवस्थेत येण्याआधी उत्क्रांतीचे अनेक टप्पे पार करावे लागले. तेच आपल्याला ह्या अवतारांत देखील दिसते.  प्राणी आणि मनुष्य दोन्ही असलेला नरसिंह अवतार. ह्या रूपानंतर मानव तयार झाला खरा पण तो अजून लहान चणीचा, बुटका होता. तो वामनावतार.वामन रूप हे प्रगत मानवाचे प्राथमिक रूप आहे. मग आला परशुराम अवतार.  २१  वेळा जुलुमी आणि दुष्ट  शासकांपासून पृथ्वी मुक्त करणारा आणि परशु धारण करणारा परशुराम. शूरवीर मानवरूप. त्यापुढचे दाशरथी राम रूप म्हणजे मर्यादापुरुषोत्तम राम. सर्वच बाबतीत आदर्श असे मानवरूप. कृष्ण हा पूर्णावतार तर बुद्ध म्हणजे दया, करून, अहिंसेचे मूर्तिमंत रूप. शत्रूवर देखील कृपा करणारे असे हे रूप. पण जगाला जशास  तसे हे न्याय दाखवणारे, शत्रूंशी लढताना त्यांच्यावर कृपा न करता शत्रूला नामोहरम करणारे रूप म्हणजे कल्की. 

अवतार प्रयोजन 

संकटातून वाचवण्यासाठी अवतार घेतले असे म्हणाले तर ती संकटे कोणती होती हे पाहायला हवे. 

पुराणांतील कथांचे दाखले अनेकदा दिले जातात. त्यावरून लक्षात येते की  मत्स्यावतार शंखासुराला मारण्यासाठी झाला. प्रलय झाला तेव्हा मनूचे आणि पर्यायाने सर्व सृष्टीचे रक्षण करण्यासाठी झाला. 

 देव व दैत्य सागरमंथन करत होते तेव्हा रवी म्हणून मंदार पर्वत घेतला होता. पण तो समुद्रात बुडायला लागला. त्या  मंदार पर्वताला आधार देण्यासाठी कूर्मावतार झाला. 

पृथ्वी पाण्यात बुडू लागली तेव्हा पाण्यात बुडणाऱ्या पृथ्वीला वर काढण्यासाठी आणि ती बुडण्याची कारण ठरलेल्या हिरण्याक्ष राक्षसाचा वध करण्यासाठी वराह अवतार झाला.  हिरण्यकश्यपू ह्या दैत्याचा वध करून भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नरसिंहावतार झाला. 

 तीन पावलात बळीचे सर्वस्व हरण करून बळिराजाला पाताळात लोटून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी वामनावतार झाला.  जुलुमी दुष्ट क्षत्रिय राजांचा  नाश करणारा परशुरामावतार, रावणराज्य नष्ट करून धर्माचे रामराज्य प्रस्थापित करणारा रामावतार,  दुष्टांचा वध करण्यासाठी कृष्णावतार यज्ञात दिले जाणारे बाली, युद्धात होणारी हिंसा ह्यांचा  अतिरेक थांबवण्यासाठी बुद्धावतार आणि जो अजून व्हायचा आहे तो कल्कीचा अवतार. 


मत्स्यावतार

ह्या अवताराविषयी, शतपथ ब्राह्मण आणि तैतरीय संहिता ह्या दोन ग्रंथांचे संदर्भ आढळतात. हा अवतार नक्की कधी झाला ह्याविषयी वेगवेगळी तिथी दिलेली आढळते. एक तिथी आहे चैत्र शुद्ध तृतीया आणि वराहपुराणानुसार आषाढ शुद्ध एकादशी या दिवशी मत्स्यावतार झाला. 

ज्याच्यापासून वेदांचे रक्षण करण्यासाठी मत्स्यावतार झाला असे मानले जाते त्याची देखील दोन वेगवेगळी नावे आढळतात. कुठे हयग्रीव तर कुठे शंखासुराचे नाव आहे. 

कश्यप पत्नी दिति ही दैत्यांची माता. हयग्रीवासुर हा  तिचाच मुलगा. त्याने ब्रम्हदेवाकडून वेद  पळवून नेऊन समुद्रात लपवून ठेवले. हयग्रीव हा जमीन, पाणी, आकाश तिन्हीमध्ये संचार करू शकायचा असे कथा सांगते. 

हयग्रीवाचा वध करून, वेदांचे रक्षण करण्यासाठी,  त्यांना पाण्यातून बाहेर काढून ब्रम्हदेवाला परत सोपवण्यासाठी पाण्यात लीलया वावरणाऱ्या मत्स्याचे रूप घेतले. 

मनू आणि मासा 

अजून एक कथा अशी की एकदा राजा मनू  नदीच्या तीरावर तर्पण  करीत असताना  त्याच्या हातात एक लहान मासा आला.  तो मासा मनुला म्हणाला की मला वाचव. माझे रक्षण पालन पोषण कर. ह्या बदल्यात मी तुला वाचवेन व संकटातून पार करेन. राजाला आश्चर्य वाटले. हा इतका लहान मासा आपल्याला कसा वाचवणार? तेव्हा मासा पुढे म्हणाला, येणाऱ्या काळात मोठा जलप्रलय होणार आहे.  त्यात सर्व सृष्टी नष्ट होईल. वाहून जाईल. तेव्हा मी तुला वाचवेन. 

राजाने विचारले,” ते कसे?”

तेव्हा मासा म्हणाला, “ तू एक नाव तयार कर. त्या नावेत अन्नधान्य बीजरुपात तसेच सर्व स्वेदज, अंडज, उद्भिज इत्यादी जीव  सोबत घे. प्रलयाच्या वेळी नावेत बस. नाव त्या प्रलयात आपला तोल सावरू शकणार नाही. म्हणून ती  नाव तू माझ्या शिंगाला बांध. मी तुला सुरक्षित स्थळी घेऊन जाईन.”

मग मनूने तो मासा कमंडलूत ठेवला. तो मोठा झाला. त्याला कमंडलू पुरेसा होईना  तेव्हा एका लहान घड्यात ठेवला. पण लवकरच तो मासा आकाराने वाढला आणि घड्यात मावेनासा झाला.  मग त्याला विहिरीत ठेवले. तिथेही तो मोठा झाला. मग सरोवरात, नंतर नदीत आणि तिथेही त्याला जागा पुरेनाशी झाल्यावर समुद्रात सोडले. 

मग माशाच्या सांगण्याप्रमाणे एक नाव तयार केली. सर्व अन्नधान्यांचे बीज नावेत ठेवले. 

काही काळाने जेव्हा प्रलय झाला तेव्हा मनूने नावेत बसून ती नाव माशाच्या शिंगाला बांधली. माशाने ती सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवली.  अशा रीतीने मत्स्यावतारात सृष्टीचे रक्षण केले गेले. 

मनूच का?

प्रश्न असा पडतो की मनूच का निवडला गेला ह्या कामासाठी? तर कथा सांगते की मनूने अनेक वर्षे तप केल्यावर जेव्हा त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि वर माग म्हणाले तेव्हा खरे तर त्याला स्वतः साठी मोक्ष, परम पदाची प्राप्ती असे काहीही मागता आले असते.  पण मनू हा उत्तम राजा व उत्तम माणूस होता.  उत्तम राजाचे लक्षण असते की तो स्वतः आधी नेहमी प्रजेचा विचार करतो. तेव्हा वैयक्तिक कोणतेही मागणे न मागता मनूने असे मागितले की जेव्हा प्रलय काळ येईल,  तेव्हा मी पृथ्वीवरील सर्व जीव समूहांचे रक्षण करण्यास समर्थ असावे.  ब्रह्मदेवांनी त्याला तथास्तु म्हणून वर दिला आणि म्हणूनच मत्स्यावतारात सर्व जीवसमूहाचे रक्षण करण्यासाठी आणि  नावेत बसण्यासाठी राजा मनू ची  निवड झाली. 

तात्पर्य 

  ह्या कथा ऐकल्या आणि त्यावर विचार केला की लक्षात येते जेव्हा ज्ञान झाकोळले जाते. त्यावर अंधाराचे आवरण आपोआप किंवा जाणूनबुजून घातले जाते जसे हयग्रीवाने वेद  लपवले होते तसे, तेव्हा जिथून हल्ला झालेला असेल तिथेच जाऊन, तसेच लढून ज्ञानाला वाचवायला लागते. ज्ञानावरचे आवरण दूर करावे लागते. वेद समुद्रात लपवले गेले तर समुद्रात जगू शकेल असाच अवतार घेऊन वेदांचे रक्षण केले गेले. 

दुसरे लक्षात येते की प्रयत्न सोडून चालत नाही. नदीत गेल्यावर मोठा झाला की मासा आपोआप  समुद्रात जाईल, त्याला पोहता येतेच असे म्हणून मनू स्वस्थ बसला नाही. त्याने त्याला समुद्रात नेऊन सोडले. तेव्हा एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असाल, तर कोणत्याही शक्यता गृहीत न धरता स्वतः पूर्ण प्रयत्न करत राहा. 

संकटातून सुटायचे असेल तर पूर्वतयारी आवश्यक असते. प्रलय होईल तेव्हा बघू काय करायचे ते असे म्हणून चालत  नसते, तेव्हाही चालले नव्हते.  आधीच तयारी म्हणून नाव तयार केलेली होती. वाचवायचे होते ते अन्नधान्य तसेच प्राणी नावेत ठेवलेले होते. 

दूरदृष्टी, संकटाला लहान न लेखणे, पूर्वतयारी व वेळ येईल तेव्हा पूर्ण तयारीनिशी, आत्मविश्वासाने संकटाला सामोरे जाऊन विजयी होणे हे ह्या कथेचे तात्पर्य वाटते. 

स्वतःच्या स्वार्थापुढे जो जाऊ शकेल तोच दुसऱ्यांच्या उपयोगी पडू शकतो हे देखील मनूच्या असा सर्वांचे रक्षण करता यावे ह्या वर मागण्याने अधोरेखित होते. 

मत्स्य जयंती 

मत्स्य जयंती चैत्र शुद्ध तृतीयेला साजरी केली जाते. ह्या दिवशी उपास केला जातो. मत्स्यावतारातील विष्णूची पूजा केली जाते. त्या निमित्ताने व्रतस्थ आचरण घडते. दान धर्म केला जातो. मत्स्यावताराची प्रतिमा काही ठिकाणी  पूर्ण मत्स्यरूपात दिसते तर कधी खालचा भाग मत्स्य रूपात आणि वरचा भाग मानवी रूपात अशी दिसते.  मानवी रूपाला चार हात दाखवलेले असतात आणि त्या हातांत विष्णूची आयुधे असतात. मत्स्य जयंती हे व्रत आहे. उपासना आहे आणि म्हटले तर उत्सव देखील आहे. 

 मत्स्य यंत्र 

ह्या मत्स्यावतारातील विष्णुमूर्ती प्रमाणेच एक मत्स्य यंत्र देखील काहीजणांच्या पूजेत आढळते. 




अत्यंत अवघड रचना असलेल्या ह्या यंत्राची समकेंद्री  पाकळ्यांची रचना आहे. त्या पाकळ्यांच्या संख्येवरून ते कशाचे प्रतीक आहेत ह्याचे संकेत आहेत. यंत्र म्हणजे विविध आकृती जसे बिंदू,त्रिकोण,चौकोन इत्यादी आकार वापरून केलेली रचना. एखादी विशिष्ट रचना हे त्या त्या देवतेचे प्रतीक मानले जाते व त्याची पूजा केली जाते. 

एखादी पूजा तुम्हाला करायची असेल तर त्या साठी देहशुद्धी आणि चित्तशुद्धीचे संस्कार आपल्या धर्मात सांगितले आहेत. 

मध्यंतरीच्या काळात विस्मृतीत गेलेले हे मत्स्यजयंतीचे व्रत आणि उत्सव आता अनेकांच्या लक्षात येते आहे. 

व्रते का केली जातात? 

पण एकूणच  व्रते कशासाठी केली जातात? व्रतं पुण्यं- व्रतं भाग्यम , व्रतं तप - व्रतं सर्वार्थ साधनं, देवेशपूजनं असे आपल्याकडे मानले जाते. व्रताने दृढनिश्चय, संयम, संकल्प, भक्ती, श्रद्धा ह्यांचा विकास होतो. व्रतांचे कायिक,वाचिक,मानसिक असे प्रकार आहेत. व्रत आचरत असताना क्षमा,सत्य,दया, दान इत्यादी गुणांची जोपासना करायची असते. व्रत आचरताना स्नान करणे, मर्यादित अन्न घेणे, मद्यपान व मांसभक्षण निषेध इत्यादी आचार आणि काही पथ्ये तर सांगितलेले असतातच. पण त्या शिवाय असहाय, अनाथ, अपंग, संकटग्रस्त लोकांना अन्नदान असेही सांगितलेले आहे. ही व्रते म्हणजे उपासनाच आहे.  

उपासना 

उपासना हे हिंदू धर्माचे एक  वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. कोणी, कशी, कधी,कोणाची उपासना करायची ह्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असलेला कदाचित हा एकमेव धर्म असेल. प्रत्येक व्यक्ती आपल्या रुचीनुसार, उपलब्ध असलेल्या साधन आणि वेळात उपासना करू शकते. 

संतमाहात्मे आचरतात ती  उपासना सामान्य जणांसाठी आदर्श असली तरी नेहमी शक्य असतेच असे नाही. तेव्हा सामान्य जण स्थलकालसापेक्ष अशी उपासना आचरतात. 

स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर पैसा, प्रतिष्ठा, सुख ह्यांच्या पलीकडे जाऊन 

आत्मसाक्षात्कारासाठी उपासना करावी असे हिंदू धर्म मानतो. उपासनेला कर्म आणि ज्ञान ह्यांच्यामधील सेतू मानलेले आहे. उपासना श्रद्धा जागवते तसेच शास्त्र समजून घेण्याची प्रेरणा देखील जागवते. 

कर्म, उपासना आणि ज्ञान हे आपल्या धर्माचे तीन प्रमुख स्तंभ मानले आहेत. शुद्ध कर्म आपल्याला कोणताही दंभ नसलेल्या उपासनेचा मार्ग दाखवते. 

उपासना सामूहिक असेल तर त्या निमित्ताने एक संघटित शक्ती निर्माण होते. एकात्मतेचा अनुभव येतो. सर्वानाच आनंद आणि उत्साह मिळतो. 

ह्या सामूहिक शक्तीचा उपयोग अर्थातच चांगल्या कामासाठी करायचा अशीच आपल्या धर्माची शिकावं आहे. 

मत्स्य जयंती- व्रत आणि बरेच काही 

पूजा, उपास, दानधर्म, त्या निमित्ताने एकत्र येणे हे होतेच. सामूहिक शक्तीचा अविष्कार घडतो. सर्वाना आनंद मिळतो हे तर मत्स्य जयंतीला होईलच. पण 

मत्स्य जयंतीच्या व्रताच्या आणि उत्सवाच्या विषयी बोलायचे तर आजच्या काळाला अनुसरून आपण त्यात भर घालू शकतो. एक सामाजिक उत्सव म्हणून देखील साजरा करू शकतो. समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता असेल, सागरी सीमेची सुरक्षा असेल, मत्स्य पालन आणि संवर्धन असेल, कितीतरी चांगल्या गोष्टी ह्या निमित्ताने होऊ शकतील. 

राष्ट्राय स्वाहा 

शेवटी जे काही आपण करणार ते राष्ट्राय स्वाहा अशीच आपली भावना असते ना? 

विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणतात,” पूर्वपरंपरा, मातृभूमी आणि भाषा यांच्या अभिमानाने एकरूप झालेला समाज म्हणजे राष्ट्र होय.या राष्ट्राविषयी मनात असलेली निष्ठा, त्याच्या यशासाठी केले जाणारे आपले सर्वतोपरी प्रयत्न, राष्ट्राविषयी मनात असलेला सेवाभाव म्हणजे राष्ट्रभक्ती.  राष्ट्रासाठी तन-मन धनाच्या माध्यमातून केलेली पूजा ही राष्ट्रभक्ती आचरणे ही देखील आचरण्याजोगी उत्तमातील  उत्तम उपासना आहे.  या उपासनेचे फल आहे अखंड, अक्षय,  निर्व्याज अशी आनंदप्राप्ती, पूर्वजांच्या ऋणातून अंशतः मुक्ती आणि पुढील अनंत पिढ्यांची तृप्ती.” 


-वृंदा टिळक 


संदर्भ 

  1. भक्तिकोश - चतुर्थ खंड - भारतीय उपासना - डॉ. शंकर अभ्यंकर. 

  2. मत्स्य पुराण - प्र. न. जोशी 

  3.  मत्स्य पुराण - का.अ. जोशी/ पां.रा. ढमढेरे. 

  4. विश्वकोश - https://vishwakosh.marathi.gov.in/


Monday, 13 February 2023

साहित्य संमेलन - एक ऊर्जा स्रोत

 एक साहित्य संमेलन झाले की महिनाभर तरी साहित्य संमेलनात काय झाले? ते कसे बरोबर वा चूक होते? संमेलनाच्या आयोजनात काय चांगले वा वाईट होते? यावर चर्चा चालू राहते. ही चर्चा निवळली की मग कोणत्या ठिकाणी पुढचे साहित्य संमेलन होणार त्यावर चर्चा होऊ लागते. ते ठरले की मग अध्यक्ष कोण असणार, त्या नावाचा अंदाज सर्वजण वर्तवू लागतात. त्यानिमित्ताने माणसांना मोहरे करून विचारधारांवर टीका केली जाते किंवा विचारधारांना मोहरे करून माणसांवर टीका केली जाते. हे सगळे आटोपते आहे की नाही तोपर्यंत पुढचे साहित्य संमेलन येते. मग पुन्हा उडतो धुरळा.. कोणते विषय? कोणाला निमंत्रणे?


असेच रहाटगाडगे गेले कित्येक वर्ष आपण पहात आहोत. हे वर्षही काही वेगळे नव्हते! याच क्रमाने सगळे होत होत अखेर फेब्रुवारी उजाडला. साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आणि प्रत्यक्ष साहित्य संमेलनाला सुरुवात देखील झाली. 

महात्मा गांधी, विनोबा भावे, मावशी केळकर अशा थोर नेत्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले वर्धा शहर. जवळून वाहणारी वरदा नदी. ठेंगणी एक वा दोन मजली घरे, भरपूर मोकळी जागा असे हे मध्यम आकाराचे वर्धा शहर. पहाटे व रात्री गार होणारी तर दुपारी उन्हाचे चटके देणारी कोरडी हवा. इतकी कोरडी आणि उष्ण की वर्ध्याच्या भाषेत सांगायचं तर गगरा (कोरडी माती आणि धूळ) उडत होता. 


या साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून मी उपस्थित होते. तीनही दिवस साहित्यसंमेलनात जवळपास पूर्ण वेळ उपस्थित राहून साहित्य संमेलनाचा आनंद घेता आला. 

वर्ध्याच्या संमेलनाचे वर्णन करताना भव्य शब्द खूपदा वापरायला लागेल. संमेलनासाठी उपयोगात आणलेली जागा भव्य, मुख्य सभामंडप भव्य, व्यासपीठ भव्य, व्यासपीठ आणि श्रोत्यांच्या आसनव्यवस्थेमधील मोकळी सोडलेली जागा देखील भव्य, भोजनकक्षही भव्यच! या भव्यतेसाठी वर्धा संमेलन नक्कीच लक्षात राहील.


आयोजक असलेल्या विदर्भ साहित्य संघाला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली आणि हे ९६ वे साहित्य संमेलन. दोन्हीचीही शतकी वाटचाल कौतुकास्पद आणि प्रदीर्घ इतिहास व वारसा लाभलेली. अर्थातच सर्वांच्याच या साहित्य संमेलना कडून खूप जास्त अपेक्षा होत्या. 


तसे एक आणि दोन तारखेला काही कार्यक्रम सुरू झालेले असले तरी संमेलनाचा प्रमुख कार्यक्रम सुरू झाला तो 3 फेब्रुवारीला सकाळी. साहित्यसंमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने अगदी उत्साहात झाली. स्थानिक शाळा कॉलेजमधील विद्यार्थी आणि संमेलनाला आलेले साहित्यिक ह्यांचा सहभाग होता. 


पहिले उदघाटनाचे सत्र आचार्य विनोबा भावे सभा मंडपात जो मुख्य सभा मंडप होता तिथे, प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर आयोजित केलेले होते. ते सत्र उशिरा सुरू झाले. काही अनपेक्षित कारणांनी नितीन गडकरी त्या सत्रात उपस्थित राहू शकले नाहीत पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते. माजी अध्यक्ष भारत सासणे, संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या खेरीज साहित्य महामंडळाचे पदाधिकारी, समन्वयक उपस्थित होते. तसेच विश्वनाथ प्रसाद तिवारी आणि कुमार विश्वास हे देखील उपस्थित होते. ते सत्र उशीरा सुरु झाले आणि बरेच लांबले देखील. 

तसेही उद्घाटनाचे सत्र हे सर्वांचे स्वागत, सन्मान आणि भाषणे यामुळे मोठेच असते. यावेळी ज्यांना विशेषत्वाने बोलावले होते ते डॉक्टर विश्वनाथ प्रसाद तिवारी आणि कुमार विश्वास यांना साधारण पाच पाचच मिनिटे बोलायला वेळ मिळाला. संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चपळगावकर थोडेच बोलले. पण त्यांचे संपूर्ण भाषण नंतर दुपारच्या सत्रात झाले. 


संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आपल्या भाषणात म्हणाले की एखादी घटना घडली की त्यावर विचार व्हायला पाहिजे. जसे फळ झाडावरून खाली पडते हे आपण सगळ्यांनी पाहिले होते, अनेक वर्षे पाहिले होते. पण विचार मात्र न्यूटननेच केला. त्याचप्रमाणे कुठल्याही घटनेवर ती का घडली? कशी घडली? असा विचार करायला पाहिजे. समारोपाच्या भाषणात त्यांनी सांगितले की मी काल विद्रोही साहित्य संमेलनात ठिकाणी जाऊन थोड्यावेळ बसून आलो. ही देखील विचार करायला लावणारीच घटना होती. समारोपाच्या भाषणात ते म्हणाले की सर्वांनी एकत्र आले पाहिजे. 


३,४,५ असे तीन दिवस मिळून अनेक विषयांवर परिसंवाद झाले. ग्रंथालय चळवळीचे यश अपयश, वैदर्भीय बोलीभाषा, गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज आणि महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा, आम्हां लेखकांना काही बोलायचे आहे, ललितेतर साहित्याची लोकप्रियता, स्त्रीपुरुष तुलना ( ताराबाई शिंदे ), कृषिजीवनातील अस्थिरता आणि मराठी लेखन, मराठीतील अर्थविषयक लेखन, वाचन पर्यायांच्या पसाऱ्यात गोंधळलेले वाचक, गांधीजी आणि विनोबा - आजच्या परिप्रेक्ष्यातून, वंचित समाजाच्या साहित्यातील लोकशाहीचे चित्रण इत्यादि विविध विषय होते. काही विशेष कार्यक्रम सादर झाले. त्यात मृदगंध - वैदर्भीय काव्यप्रतिभेचा हा विदर्भातील काव्यपरंपरेचा आढावा घेणारा कार्यक्रम होता. 


 शेजारी शेजारी किंवा जवळ जवळ असणारे मंडप आणि त्यात एकाच वेळी चालू असणारी सत्रे ह्यामुळे श्रोत्यांच्या मनात कोणत्या सत्राला उपस्थित रहावे याविषयी फारच संभ्रम होता. सत्र चालू असताना मध्येच उठून दुसरीकडे जाणारांची संख्या पण मोठी होती. 


परिणाम असा होत होता की वैचारिक भाषणे, परिसंवाद ह्यांना अगदी मोजकी संख्या पण राजकीय पुढारी, अभिनेते असतील की मुख्य मांडव ओसंडून श्रोते! संमेलनअध्यक्षांच्या भाषणाला देखील अगदी अल्प उपस्थिती होती. 

सर्वात जास्त उपस्थिती आणि रसिकांची दाद लाभणारा मंडप म्हणजे गझल कट्टा. तिथे अगदी नवनवीन कवी आणि आश्वासक गजल ऐकायला मिळाली. 

कवी कट्टा, बालसाहित्य, अभिवाचन हे इतर मंडप. अभिवाचनाचा ह्या वेळी प्रथमच समावेश झाला होता. प्रकाशन कट्ट्यावर अनेक पुस्तकांचे प्रकाशन झाले. 


चित्रकार विजय बोधनकर ह्यांचे स्वभाव चित्र प्रदर्शन ह्या संमेलनात होते. प्रत्येकाच्या लेखनातील, स्वभावातील, कर्तृत्वाचे बारकावे टिपून काढलेली एकेक चित्र पाहणे हा खूपच विशेष अनुभव होता. 


बसोली ग्रुपने आयोजित केलेली शालेय विद्यार्थ्यांची चित्र स्पर्धा व नंतर त्याचे प्रदर्शन हे देखील खूप खास होते. कवितांच्या ओळींवर, त्या कविता समजून घेऊन मुलांनी काढलेली चित्रे जो त्यांचा सामूहिक प्रयत्न होता. ती पाहणे आनंदाचे होते. 


मराठी राज्य भाषा विकास संस्थेने आयोजित केलेला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ह्यासाठीचे प्रदर्शन, राष्ट्रपतीना पत्र हा उपक्रम आणि शांतता मराठीचे कोर्ट चालू आहे हा लघुपट उल्लेखनीय होते. 


या संमेलनात अनेक स्नेही सहभागी होते. त्यामुळे मग कविता असेल, प्रकाशन असेल, गझल असेल, अभिवाचन असेल वा परिसंवाद असेल, त्यांचे सादरीकरण असेल त्या त्या ठिकाणी, त्या त्यावेळी उपस्थित राहणे हे आनंदाचे, अभिमानाचे होते.

त्याशिवाय जेवणाच्या वेळी म्हणा किंवा येता जाताना म्हणा, अनेक जण भेटत होते, त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणे,त्यांचे विचार जाणून घेणे हे देखील होत होते. हा एक मोठा आनंदाचा आणि भाग होता.


 अनेक प्रकाशन संस्थांचे स्टॉल्स होते. तिथे गर्दी दिसली नाही तरी अगदी कोणीच नाही असेही कधी दिसले नाही. आता प्रत्यक्षात विक्री झाली का नाही, हे त्या त्या स्टॉल धारकांनाच माहिती. खाऊ गल्लीतील विविध स्टॉल्स मात्र गजबजलेले असायचे! 


 भोजन मंडप खरोखरच भव्य होते. त्यामुळे गर्दी झाली नाही. शिवाय जेवणासाठी अनेक स्टॉल्स उभारल्याने, इतकी संख्या असूनसुद्धा, खूप वेळ रांग लावायला लागली आहे असे कधीच झाले नाही. 

 

इथे परत आल्यावर विविध वृत्तपत्रातील संमेलनाचा वृत्तान्त वाचणे हे खूपच ज्ञान वर्धक ठरले!

उद्घाटनसत्रात गडकरी असतील असे कार्यक्रम पत्रिकेत छापलेले होते. ते वाचून एका वृत्तपत्रात गडकरी उपस्थित होते असे छापून आले. प्रत्यक्षात काही अनपेक्षित घटना घडली त्यामुळे गडकरींना येता आले नव्हते! जे न देखे रवी, ते देखे कवी असे ऐकले होते. पण व्यासपीठावर नसलेले गडकरी वार्तहराला दिसले म्हणजे किती जबरदस्त वार्तांकन शक्ती म्हणावी ही! 

दुसरे लक्षात असे आले की अनेक संदर्भ देऊन केलेली अभ्यासपूर्ण भाषणे, परिस्थितीचा सम्यक विचार करून केलेली संयत भाषणे ह्यांना वृत्तपत्रांच्या दृष्टीने काहीच महत्व नव्हते. 

आम्हां लेखकांना काय म्हणायचे आहे ह्या परिसंवादात प्रविण दवणे ह्यांनी केलेल्या आशावादी भाषणाला माध्यमांनी जास्त जागा दिली नाही. गांधी आणि विनोबा आजच्या परिप्रेक्ष्यात ह्या परिसंवादातील प्रशांत धर्माधिकारी यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाची फारशी दखल घेतली गेली नाही. 

माध्यमांना वादग्रस्त विधाने असलेले, ओरडून केलेले, वेळप्रसंगी शिव्या देखील वापरलेली अशी भाषणे..मग त्यात परिसंवादाच्या विषयाला धरून मुद्दे असोत वा नसोत.. तीच दखलपात्र वाटतात असा ह्याचा अर्थ घ्यायचा का??


मुख्य मंडप खूपच भव्य होता. पण त्यातील व्यवस्था पाहणारे मात्र तिथे फारच क्वचित उपस्थित असायचे. त्यामुळे मग भल्या मोठ्या स्क्रीन वर आदल्या दिवशीच्या कविसंमेलनाची पत्रिका दिसत राहणे, अनेक लाईट स्टेजच्या मध्यभागी रोखलेले आणि बाजूला अंधार, स्टेज वर पुरेशी आसन व्यवस्था नसणे, आधीच्या सत्रातील वक्त्यांनी पाणी पिऊन रिकाम्या बाटल्या ठेवल्या असतील त्या पुढच्या सत्रातही टीपॉंय वर व मंचावर देखील पडलेल्या असणे असे प्रकार घडत होते. 


स्वच्छ्ता गृह व्यवस्था हा तर अतिशयच दुर्लक्षित प्रकार होता. महिला स्वच्छ्ता गृहे अगदीच अल्प आणि दयनीय होती. 


तसा विचार केला तर साहित्याचे अनेक पैलू आहेत. कथा, कादंबरी, ललित लेख, नाट्य वाचन, प्रवास वर्णन, कविता आणि बरेच काही. त्या सर्वांना काही ना काहीतरी प्रतिनिधित्व साहित्य संमेलनात मिळावे असे वाटते.


 इथे मला खुलभर दुधाची कहाणी एका वेगळ्या स्वरूपात दिसते. साहित्य संमेलन हा एक भला मोठा कुंभ ( मेळा नव्हे,तर कुंभ म्हणजे घडा, रांजण!) तर त्यात सहभागी प्रत्येक जण आपापल्या साहित्यकृती त्या रांजणात समाविष्ट करतो. पण मग तो संपुर्ण कुंभ सकस, समृद्ध असावा असे वाटत असेल तर मग आपला सहभाग असलेली साहित्यकृतीदेखील तेवढीच सकस नको का? लिहिणे आणि प्रकाशित करणे, सादर करायची संधी मिळणे..सगळेच आता सोपे झाले आहे. इतर कशाची आणि कोणाचीही कसोटी मानली नाही तरी स्वतःच आपण लिहिलेल्या कृतीच्या दर्जाविषयी सजग राहायला नको का?

 

साहित्य संमेलनात नवे लिहू पाहणारे, अनेक वर्ष लिहीत असलेले, लिहायची इच्छा असणारे असे अनेक जण एकमेकांना भेटतात. साहित्याच्या नव्या अविष्काराने प्रभावित होतात आणि नवीन काही लिहिण्यासाठी, नवीन विचारांसाठी ऊर्जा घेऊन जातात. ह्या साठी अशी साहित्य संमेलने होत राहिली पाहिजे. 

कुमार विश्वास म्हणाले तसे मागे बसलेल्यांना संमेलनात स्थान मिळायचे असेल तर जिल्हा पातळीवर देखील झाली पाहिजेत. 

साहित्य संमेलनाला महाराष्ट्र भरातून श्रोते तिकिटे काढून आले होते. दरवर्षी येत आहेत ही खूपच आश्वासक गोष्ट वाटते. 


साहित्य संमेलनाचा मूळ हेतू काय आहे? साहित्य विषयक चर्चा त्यात होतात का? साहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळते का? नवीन लिहू पाहणाऱ्यांना काही मार्गदर्शन मिळते का? या सगळ्या मुद्द्यांच्या विषयी प्रत्येकाच्या मनात विचार सुरू होणे हे साहित्य संमेलनाचे फलित म्हणता येईल! 

मुख्य अतिथी दिनेश प्रताप सिंग आणि कुमार विश्वास या दोघांनीही सांगितले की इतके मोठे संमेलन त्यांनी हिंदी भाषेचेही कधी पाहिलेले नव्हते.

अशी साहित्य संमेलने हा मराठी भाषेच्या दृष्टीने अभिमानाचा विषय आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी साहित्य संमेलने होत राहावीत. या निमित्ताने विचार विमर्श होत रहावा. साहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळावे. शुभंकर ऊर्जा मिळावी. 



महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...