Sunday, 29 December 2019

गोंदण

ज्याला प्रत्येक गोष्टीत मन गुंतवून जगायची सवय, त्याच्या कपाळावर हुरहुरीचे गोंदण जन्मजातच असते. एके ठिकाणाहून दुसरीकडे जाताना नव्याची उत्सुकता असते, तर जुन्याच्या वियोगाची हुरहूर असते. स्वप्ने नक्षत्रांची पडत असली तरी पायांना असलेली मातीची ओढ सरत नाही. सतत दुसऱ्या वाटा, दुज्या गावचा वारा खुणवत असतोच. 

 ज्यांची लेकरे परदेशात त्यांना असा अनुभव खुपदा येतो. मुलांची ओढ तर असतेच असते पण स्वत:च्या गावी उभ्या केलेल्या विश्वातही पाय गुंतलेला असतो. नुकताच असा अनुभव आला आणि मग "आवा निघाली पंढरपुरा" ह्या गीताचे प्रत्यंतर आले. ह्या भारुडात संत तुकाराम सांगतात, एका आजीला विठोबाच्या दर्शनाची ओढ लागलेली असते, ती पंढरपूरच्या वारीला जायला निघते. पण घरातल्या दूधदुभते, तिखटमिठाचे पाळे, उखळ मुसळ अशा सगळ्या ऐहिक गोष्टीत तिचा जीव अडकून राहतो. 
तसेच माझेही झाले. लाडक्या लेकीकडे जायच्या कल्पनेने खूप आनंदात तर होतेच पण मग झाडांचे काय होणार? त्यांना पाणी कोण घालणार? हे सगळी काळजी मनाला ग्रासून टाकत होती. पाण्याची व्यवस्था केली. ती काळजी मिटली. नंतर लक्षात आले, की खूप झाडांना कळ्या आल्या आहेत. त्या मी नसताना फुलणार. मग परत मनात हुरहूर. ती फुले पाहायला मी नसणार. म्हणजे फुलांचे उमलणे व्यर्थच जाणार. 

आता मी नसले तरी कळ्या फुलायच्या राहणार आहेत का? त्यांचे फुलणे मी पाहायलाच हवे हा मनाचा आग्रह कशासाठी? हा मनात जागलेला, आपण वाढवलेल्या झाडांवरच्या हक्काचा अभिनिवेश तर नव्हे? ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याविषयी मनात नकळत हक्क का जागायला लागतो? आपण फुलांच्या मायेत गुंतलेलो असतो. पण फुलांना त्याचे काय? फुलणे हा त्यांचा धर्म ते निर्ममपणे निभावत असतात. कोणी त्यांच्याकडे बघा, कौतुक करा किंवा न करा!

कौतुकावरून आठवले, जगभरात ज्याचे सगळ्यात जास्त कौतुक होते, त्याच्या असण्याचे, फुलण्याचे उत्सव साजरे होतात असे फुल म्हणजे साकुरा -चेरी ब्लॉसम. जपान, तैवान, कोरिया, ब्रम्हदेश, भारत, चीन इत्यादी देशात आढळणारा हा चेरी ब्लॉसम जगभर ओळखला जातो तो मात्र साकुरा ह्या जपानी नावाने. कारणही तसेच! कारण जपानी माणसांइतके जगातील दुसऱ्या कोणाचे भावविश्व साकुराने व्यापलेले नाही. त्यांच्या कविता, कादंबऱ्या, गीते, चित्रपट सगळ्यात साकुरा दिसतोच दिसतो. केवळ साहित्यात न राहता तो त्यांच्या रोजच्या जगण्यात देखील असतो. कपडे, रुमाल, मग्ज, पिशव्या, छत्र्या सगळ्यावर साकुराची चित्रे. फुललेल्या साकुराखाली स्नेहीजनांनी भेटणे, खाणे आणि प्रामुख्याने ओसाके पिणे, पारंपरिक वेशात फोटोसेशन्स करणे . . किती म्हणून त्या साकुराचे कौतुक! दरवर्षीच्या त्याच्या फुलण्याचे वेळापत्रकच आधी प्रसिद्ध होते आणि मग त्याप्रमाणे प्रवासाचे बेत आखले जातात. 

एवढा कौतुकाचा धनी असलेला, सतत सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा साकुरा जेव्हा कोरियातील डोंगररांगांमध्ये, हजारोंच्या संख्येने फ़ुललेला पाहिला तेव्हा परत 'फुलांचा धर्म फुलण्याचा, निर्ममपणे बहरण्याचा' हे जाणवून गेले. तिथे त्यांच्याकडे पाहत राहायला कोणी नव्हते. ना त्यांचे कोडकौतुक होणार होते ना त्यांच्या फुलण्याचा उत्सव साजरा होणार होता. पण त्यांचे फुलणे दुसऱ्या कोणाच्या असण्यावर, कौतुकावर थोडीच अवलंबून होते? अंतरात जोपासलेले अस्तित्वाचे कण न कण जणू त्याला पूर्णत्वाला न्यायचे होते. कोणी पाहायला नाही ह्याचा त्याला ना खेद होता, ना खंत, ना हुरहूर!



अवघे आठवडाभराचे त्याचे फुलणे. पण फुलणे असे की  शिल्लक काही राहू नये. असे जगणे माणसाला जमले असते तर किती चांगले झाले असते ! इतके बेभानपणे स्वत:ला उधळून देणे साकुरालाच जमते. सगळ्या फांद्या फुललेल्या, पानांचा पत्ता नाही. तेवढीही जागा फुलांवाचून राहायला नको अशीच जणू झाडाची इच्छा असावी. फांद्या तर अंगांगी फ़ुललेल्याच असतात पण जुने जरठ खोड देखील त्या मायेतून सुटत नाही. त्यावर देखील नाजुकश्या कळ्या उमलत असतात. सगळं गाव ज्या करड्या करारी कर्तबगार माणसाच्या दराऱ्यापुढे नम्र असावे, कोणाची बोलायची हिंमत नसावी, तो माणूस आपल्या नातीबरोबर असताना मात्र परत कोवळा होऊन जावा तसे काहीसे ह्या खोडावरल्या फुलांकडे पाहताना वाटते.



त्या फुलांचे अवघे आठ दिवसांचे आयुष्य संपते, पाकळ्या झाडाखाली, वाऱ्याबरोबर गळू लागतात. क्षण एक पुरे प्रेमाचा असे तर तेव्हा झाडाला वाटून जात नसेल? पण . . . नाही. केवळ सुंदर फुले म्हणजेच जीवन असे झाडाला वाटत नसावे.

फांद्यावरची ती जागा अजिबात रिकामी राहत नाही. लगेच तिथे पाने दिसू लागतात आणि पाहता पाहता फुलांनी बहरलेले असताना पांढरे गुलाबी दिसणारे झाड हिरवेगार होऊन जाते. तेही एक वैभवच असते. पानांच्या मधून हळूच फळे डोकावू लागतात आणि जीवनचक्र अविरत चालू राहते. 

आयुष्याची अनित्यता सांगणारे हे साकुरा मग प्रतीक होऊन गेले ते जपानी संकल्पनेचे - मोनो नो आवारे. . . आयुष्य असो वा प्रेम, सौंदर्य असो वा परिस्थिती, त्यात परिवर्तन अटळ आहे. नित्य असे काहीच नाही, सारेच अनित्य आहे हे मानवी आयुष्यात, जगण्याच्या मोहापायी विसरले जाणारे तत्व साकुरा किती सुंदर रीतीने, नजाकतीने सांगत राहतो! एकदा हा विचार जाणवला, कळला आणि वागण्यात रुजवताही आला कि मग हुरहूर ती कसली वाटणार? हुरहुरीचे गोंदण मग जणू चंदनटिळा होऊन जाईल! 
-वृंदा टिळक 

Thursday, 13 June 2019

प्रल्हादजी अभ्यंकर जन्मशताब्दी




हातात घट्ट धरून ठेवलेला शिंपला. त्यात एक नायाब मोती. शिंपला उघडून दाखवायचे तर सोडाच, पण मूठ देखील कधी उघडली नाही. शिंपला उघडताना मोत्यावर चरा तर उमटणार नाही ना हि भीती. आजुबाजूला सुंदर, चमकदार, प्रमाणबद्ध आकाराच्या मोत्यांच्या राशी असताना, माझ्या मुठीतल्या शिंपल्यातील नैसर्गिक,ओबड धोबड मोत्याची पारख होणार नाही हि देखील काळजी. 

आज मूठ किलकिली करते आहे. निमित्ते अनेक. आयुष्याची क्षणभंगुरता लक्षात आलेली असल्याने मुठीबरोबरच, बंद मुठीतला हा मोतीदेखील नाहीसा झाला तर????? 

तुमच्यावर पुस्तक, अनेक विशेषांक,अनेक लेख लिहिले गेलेले असताना, अनेक मान्यवर तुमच्या वागण्या बोलण्याचे संदर्भ आपल्या भाषणातून,लिखाणातून नित्य देत असताना, मला काही वेगळे सांगायचे आहे का? असलेच तर त्याच्या महत्वाला, मोलाला साजेश्या पद्धतीने मला सांगता येईल ना?

अशा सगळ्या संकोचाच्या अडसरानंतर आज तुमच्या आठवणी जागवायला सुरुवात करते आहे. निमित्त तुमच्या जन्मशताब्दीचे. कधी आहे तुमची जन्मशताब्दी? नक्की कोणालाच माहिती नाही. 

जिने तुमच्या जन्माचे वर्ष, तिथी, वेळ लक्षात ठेवली असती ती आई तुमच्या अगदी लहानपणीच गेलेली. ७५-१०० माणसांचे एकत्र कुटूंब. सतत बाळंतिणीची खोली भरलेली. तिथे आईखेरीज दुसरे कोण जन्माची तिथी,वर्ष लक्षात ठेवणार?

तुम्हाला वारंवार विचारल्यावर तिथी बहुतेक वटपौर्णिमा आणि तारीख १५ जून च्या आसपास एवढी माहिती मिळाली होती. वर्ष कोणते विचारल्यावर तुमच्या बोलण्यात आले होते कि बहुधा १८/१९ असावे!

आजच्या दस्तऐवजीकरणाच्या युगात हे सगळे फारच विस्मयजनक वाटते. मला नेहमी वाटायचे, इतक्या मोठ्या जमीनदार घरात मुलांच्या जन्माची माहिती नोंद करून ठेवलेली नसेल तर बाकी अशिक्षित घरातून कशी असेल स्थिती? 

 आता वाटते, जन्म कधी झाला हे माहिती असायलाच हवे पण त्यापेक्षाहि, तुम्ही जगलात कसे हे माहिती असणे जास्त महत्वाचे. 

 असो. तर हाती असलेल्या ढोबळ माहितीनुसार तुमची हि जन्मशताब्दी. तुम्ही असतात आणि तुम्हाला म्हटले असते, "हि तुमची जन्मशताब्दी" तर तुम्ही काय म्हणाला असतात?? आधी तर तुम्ही 'जन्मशताब्दी' हा शब्द वारंवार वेगवेगळ्या पध्द्तीने म्हणून दाखवला असतात. अवघड,क्लिष्ट, पुस्तकी शब्द वापरून बोलणे तुम्हाला नामंजूर असावे बहुधा. तुम्ही अगदी सहज सोपे बोलायचात. वाक्ये देखील छोटी छोटी. सर्वाना लगेच समजतील अशी. मग म्हणाला असतात, १०० वर्षांचा झालो. अबब्बब! ह्या वेळी तोंडावर हात, डोळे मोठे. वाचिक आणि कायिक अभिनयाचे उत्कृष्ट उदाहरण तुम्ही जेव्हा फक्त आमच्याबरोबर असायचात तेव्हा वारंवार दिसायचे! 

आणि मग तुलना लागू, गैरलागू असा विचार न करता म्हणाला असतात, "इथे एकेकजण १०० /१०० वर्षे जगतो आहे, तिथे उपासमारीने तरुण लोकं जातायत." सतत डोक्यात, मनात, हृदयात दुष्काळग्रस्तांचाच विचार. त्यांचा विचाराने तुम्ही हे वाक्य उघड बोलला असतात आणि न बोललेले अजून एक वाक्य तुमच्या मनात उमटले असते हे मी जाणते, ते म्हणजे,"मी एकट्याने एवढे जगण्यापेक्षा आई आणि कमलाकर अजून थोडे जगले असते तर." खूप लहानपणीच गेलेली तुमची आई आणि त्याच सुमारास, तुम्हाला अतोनात लळा लावून गेलेला तुमचा धाकटा भाऊ कमलाकर हे तुमच्या हृदयातील हळवी दुखरी जागा होती. स्मरणरंजनात फारसे न गुंतून राहणाऱ्या तुम्ही, त्या दोघांची आठवण मात्र अनेकदा काढलेली आठवते.

वृंदा टिळक 









-----------------------------------------------------------------------------------------

एक रात्र रखरखीत उन्हाळ्यातली
सुट्टीतल्या मस्तीच्या ऐन भरातली
तेव्हा आपल्या गावात वीज नव्हतीच,नाही?
आणि गम्मत म्हणजे तशी उणिवही भासली नाही.
कामं आवरून ओट्यावर अंथरुणं घालून गेलेला गडी
शुभ्र पांढरी चादर ,पायाशी चुण्या घालून ठेवलेली मऊ चौघडी
हवेत आता थोडासा गारवा उतरलेला
सभोवताली गडद अंधार पसरलेला
क्वचित कुठे एखादा काजवा चमकणारा
आकाशात मात्र चांदण्यांचा सडाच चमचमणारा
बाकी सगळी आपापल्या गाद्यांवर रेलून बसलेली
मी मात्र तुमच्या हाताच्या उशीवर डोके ठेवून ऐटीत पहुडलेली
तुम्ही बरोबर असलात कि नेहमीच मी राजकन्या असायची
तुमच्यासकट साऱ्यांवर रुबाब गाजवायची
मग सुरु व्हायची गोष्ट ब्रम्हराक्षसाची
एक माणूस त्याच्या घरी लपायचा
मग ब्रम्हराक्षस आपल्या बायकोला म्हणायचा
मला माणसाचा वास येतोय
गोष्ट इथवर पोचेपर्यंत मी नकळत उठून बसायची
कारण पुढची नक्कल आपल्या दोघांची मिळून असायची
डुकरासारखे तोंड करून इकडेतिकडे पाहायचे
घाणेरड्या आवाजात ,"कुठे आहे तो माणूस ??" असे विचारायचे
काय पोरकटपणा आहे हा ,सुचवणारा नापसंतीचा कटाक्ष आईचा
हि काय खरोखरची डुक्कर दिसते आहे ना ,अभिप्राय भावंडांचा
या साऱ्याकडे आपण दोघे दुर्लक्ष करायचो
बराच वेळ ब्रम्हराक्षसाची नक्कल करत राहायचो
मग कधीतरी गोष्ट पुढे सरकायची
मग केव्हातरी नकळत मी झोपून जायची
डोक्यावर तेव्हा तुमचा हात फिरत असायचा
आजूबाजूचा अंधारही किती वत्सल वाटायचा !
बाबा आता तुम्ही नाहीत ,
चांदण्याही बहुतेक कोणीतरी आवरून
ठेवून दिल्या असाव्यात.
आजकाल बरेचदा आकाश रिकामेच असते.
आजूबाजूला एवढे सारे लाईट असूनही
अंधार मात्र काळाकुट्ट आणि रखरखीत होत चाललाय ...


--------------------------------------------------------------------------------------
"ढम ढम ढोल बाजे,ढोल बाजे"चे सूर,त्या तालावर थिरकणारी पाऊले आणि झिंगलेली तरूणाई. ट्रॅफ़िकमधे अडकलेली टॅक्सी थांबली होती ती एका दांडियाच्या मांडवाजवळ. मुद्दाम बघायचा प्रयत्न न करताही तिला आतले दृश्य दिसत होते.रोषणाई,रंगीबेरंगी कपडे उत्सवी वातावरणाची जाणिव करून देत होते.
टेंभी नाक्याजवळ नवरात्रातील जत्रा लागली होती. फ़ुगेवाले,खेळणीवाले,निरनिराळ्या वस्तू आणि खाद्यपदार्थ विकणाऱ्या हातगाड्या सगळ्याचीच गर्दी झाली होती.उंचच्या उंच आकाशपाळणा, त्यात बसून उत्तेजित होऊन ओरडणारे लोक, ज्यांचा नंबर अजून लागला नाहीये, असे उत्सुकतेने बघणारे लोक अशा सगळ्याचे मिळून एक गोल गोल फिरणारे भिरभिरे झाले होते. त्या गर्दीतच तिला ते दोघे दिसले. घेरदार फ्रॉक, खांद्याशी रुळणाऱ्या दोन वेण्या, आकाशपाळण्याकडे कुतुहलाने बघत भिरभिरणारे डोळे आणि बाळमूठीत घट्ट धरलेले बाबांचे बोट. बाबा आपले बोट तिच्या मुठीत देऊन ,पाळण्याकडे बघायच्या ऐवजी कौतुकाने आपल्या मूलीकडे बघत असलेले. अतिशय लोभस दृश्य होते ते.
ते दोघं तिच्या मनाला फार फार भावून गेले. त्यांच्या त्या नात्यातल्या विश्वासाचे जणू प्रतिकच अशी ती बाळमूठ आणि ते बोट, टॅक्सी पुढे गेली तरी तिच्या डोळ्यांपुढे तरळत राहिले. तिच्या काळजात एक बारिकशी कळ उठली. नकळत तिची बोटांची घट्ट मूठ वळली. जणू मूठीतले बोट सुटून जाऊ नये,ह्याचीच ती धडपड होती.
गावाकडे जायचे म्हणून आज ड्रायव्हर रजेवर गेला आणि नेमका फोन आला. टॅक्सी शोधण्यात कमीतकमी अर्धा तास तरी वाया गेला.त्यात गावातली ही गर्दी. मुंगीच्या वेगाने वाहतूक चालली होती. गावातून बाहेर पडायलाच इतका वेळ लागला. टॅक्सी हायवेला लागताच तिने ड्रायव्हरला एसी बंद करायला सांगितला आणि खिडकीच्या काचा खाली केल्या.सुखद गार हवा आत येताच तिने सीटवर मागे मान टेकली आणि डोळे मिटून त्या हवेचा आनंद अनुभवू लागली.
वसंत आणि शरद तिचे आवडते ऋतू. कोणत्याही ऋतूतला दिवस सारखाच असतो. पण पहाट,उतरती संध्याकाळ आणि रात्र मात्र वेगवेगळी असते.आपापली खासियत असलेले व्यक्तीमत्व घेऊन हे प्रहर येतात , असे तिला नेहमीच वाटायचे.शरद ऋतू तर तिचा खास आवडता होता.
लहानपणी,अश्विनातल्या पहाटे,नवे कपडे घालून ,कर्णपूऱ्यातल्या देवीला सगळ्यांनी मिळून जाण्याची मजा आगळीच असायची. पहाटे, सुखद गारव्यात,मैत्रिणींशी गप्पा मारत जाताना,चालण्याचा शीण कधीच जाणवायचा नाही. अदालत रोडवरील बुचाची झाडे फ़ुललेली असायची. वाऱ्याच्या झुळकीबरोबर बुचाची फुले अलगद , तरंगत खाली यायची .त्यांचे असे तरंगत खाली येणे पाहून ती खुष होऊन जायची. लांब नाजुक देठ असलेली ती शुभ्र फूले, सुगंधाचे अपार वैभव घेऊन, ती पहाट श्रीमंत करून टाकायची. फुले गोळा करत करत चालायचे आणि गोळा झालेली फूले आईकडे ठेवायला देत रहायचे. देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिल्याराहिल्या आई ती देठे गुंफ़ून छानशी वेणी करायची व केसात माळून द्यायची. तो बुचाचा सुगंध,बरोबर घेतलेल्या पूजा साहित्यातल्या शेवंतीचा मंद सुवास आणि जत्रेत लावून घेतलेल्या कुंकवाला येणारा सुक्ष्म चंदनगंध हे सारेच तिच्या मनातल्या अश्विनाच्या पहाटेला दरवळत रहायचे.
मोठे झाल्यावर अश्विनातल्या संध्याकाळी गरब्याच्याच नावे केलेल्या. परिक्षा अगदी सुरूच असेल आणि गरब्याला जाता आले नाही तरी,’अम्बे मै आवा रे’ आणि ’मै तो भूल चली" ही गाणी मनात टिपऱ्या वाजवत रहायची. मोकळ्या मैदानात जागवलेल्या कित्येक कोजागिरी पोर्णिमा तिच्या मनात कायमचे घर करून बसलेल्या होत्या.
कार्तिकातल्या पहाटेंना काकड आरतीचा ठेका आणि पणतीतल्या तेलाचा वास असायचा.त्या आधी असायची अश्विन अमावस्या.संध्याकाळी वाड्यासमोर वाजत असलेला बॅंड,गुरूजींच्या मंत्रांचा आवाज आणि सिल्कचा शर्ट आणि रुबाबदार फेटा बांधून लक्ष्मी-पूजनाला बसलेले तिचे बाबा.
त्या आठवणीने गळ्यात हुंदका दाटून आला. तो हुंदका दाबायच्या प्रयत्नात गळ्यात दुखल्यासारखे झाले. श्वास अडकायला लागला."ओ बाबा,तुम्ही नका हो असे सारखे सारखे आजारी पडू.८२ वर्षे म्हणजे काही आजकाल फ़ार वय नाही होत." तिच्या मनाने आकांत मांडला. "मेडिकल सायन्स किती पुढे गेलेय. काही होणार नाही तुम्हाला. ह्या आधीही नव्हता का असाच सिव्हियर हार्ट अटॅक आला? त्यातून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटेल एवढ्या लवकर बरे झालात आणि तुमचे ठरलेले कार्यक्रम,दौरे पार पाडलेत. तसेच आताही होईल". डोळे उघडून तिला पहाताच ,नाकावरचा ऑक्सीजन मास्क,शरीरभर वेढलेल्या निरनिराळ्या नळ्या ,मॉनिटरवरच्या नागमोडी थरथरत्या रेषा, ह्या साऱ्यातून तिचे बाबा तिच्याकडे पाहून हसणार होते. नक्कीच हसणार होते.आपल्या मनात पटलेल्या ह्या खात्रीने ती निवांत झाली.
आता पहाटेचे तीन वाजत आले होते. हवा आणखी थोडी गार झाली होती. तिच्या आवडत्या पुण्यात टॅक्सी शिरताच, तिला हायसे वाटले. इतक्या वेळ ट्रॅफ़िकमूळॆ, होत असलेल्या उशीरामूळे ताणले गेलेले मन थोडे सैलावले.आता १५ मिनिटात पोचूच आपण दवाखान्यात.
दीनदयाळ हॉस्पिटलच्या आवारात टॅक्सी शिरताच ती हॅंडलला हात लावून बसली. टॅक्सी थांबते कधी आणि आपण उतरतो कधी असे तिला होऊन गेले. ते दोन क्षणही संपता संपत नव्हते.
रिसेप्शन रूममधे फ़क्त काउंटरवरचा लाईट चालू होता. तिथला माणूस खाली मान घालून काहीतरी लिहित बसला होता. बाहेरचे ग्रीलचे दार वाजवताच ,त्यानेच येऊन दार उघडले. तिचा नवरा आता त्याला बाबांचे नाव सांगत होता. त्याने वॉर्ड नंबर आणि रूम नंबर सांगितले की निघायचे अशा तयारीत ती उभी होती. पाय लगेच उचलले जायला उत्सुक होते.
तितक्यात तिच्या कानावर शब्द आले,"आय ऍम सॉरी.ही हॅज एक्स्पायर्ड.त्यांना औरंगाबादला नेले आहे." तिच्या पायातली उत्सुक गती ठप्प झाली. एक विचित्र बधिरता तिला व्यापून राहिली. ती थरथरत,पायातले त्राण जातजात त्या बाकावर बसली. डोके सुन्न झाले होते. ज्या शक्यतेचा इतके तास, मनातल्या मनात देखील उच्चार करणे टाळले होते, तीच समोर उभी ठाकली होती.
गारठलेल्या मनाने ती परिस्थितीला सामोरी गेली. ती त्या बाकावरून उठली,टॅक्सीत जाऊन बसली.आता अजून होताच प्रवास राहिलेला.औरंगाबाद पर्यंतचा.अवघड,नकोसा,जीवघेणा.डोक्यावरचे आभाळच नाहीसे व्हावे,तसे तिला वाटत होते.
चतु:श्रूंगीच्या पायथ्याशी दर्शनोत्सूक भक्तांची भली मोठ्ठी रांग इतक्या पहाटे देखील लागलेली होती.तिथेही बुचाची झाडे फ़ुललेली होती.पण आज मात्र ती झाडे विषण्णपणॆ फ़ुले ढाळत उभी होती.
तिच्या मनातल्या शरद ऋतुला आता नेहमीच बुचाच्या फुलांचा संदर्भ असणार होता पण त्या फुलांना वास मात्र पोरकेपणाचा असणार होता.
---------------------------------------------------------
तुमच्या प्रवासात तुम्हाला कोणी ठाणे, डोंबिवलीचे भेटले कि लगेच तुम्ही सांगणार, "अरे,आमची मुलगी असते तिथे!" हे सांगताना तुमच्या डोळ्यात पाणी असणारच... मग ते लोक जेव्हा कधी मला भेटत तेव्हा हे सगळे सांगणार ! बाबा एवढ्या तीव्रतेने आपली आठवण काढतात म्हणून खूपच छान वाटायचे. अशी आठवण काढली जाणे कोणाला नाही आवडणार? पण त्याच वेळी त्या आठवणीने तुम्हाला हळवं वाटतंय ,त्रास होतो ह्यासाठी वाईट पण वाटायचे.
तुमचा फॅन क्लब खूपच मोठा. समाजाच्या विविध स्तरातला आणि वयोगटातला. ते कोणी मला भेटायचे तेव्हा त्यांना मी तुमची मुलगी आहे कळल्यावर त्यांच्या डोळ्यात तुमच्याविषयी जे उमटायचे ना .. तुम्ही कोण आहात त्याची लख्ख जाणीव करून देणारे. मला केवढा अभिमान वाटायचा तुमचा!!
तुम्हाला एकदा मी म्हणाले होते कि बाबा, I am so proud of you! आत्ताच्या क्षणोक्षणी love you ,miss you म्हणण्याच्या दिवसांत बाबांना I am so proud of you म्हणून दाखवण्यात काय खास आहे ते कळणार नाही. पण त्यावेळी ते फार अनोखे होते. असे बोलून दाखवणे तुम्हालाही अनपेक्षित होते. त्या क्षणार्धात तुमच्या चेहऱ्यावर उमटलेल्या विविध भावना खूप सुखावणाऱ्या होत्या. तुमचा चेहरा होताच पारदर्शी ..राग ,लोभ,आनंद ,दुःख सगळ्या भावना अगदी लगेच झळकवणारा ! मला आजही ह्याचा फार आनंद होतो कि मी तुम्हाला ते म्हणून दाखवू शकले होते.
तुमच्या प्रेरणेमुळे सुरु झालेले किती प्रकल्प आज उत्तमरीत्या कार्यरत आहेत, तुमच्या प्रेरणेमुळे सामाजिक कामांकडे वळलेली कित्येक माणसे आज मोठे काम करत आहेत. ह्या सगळ्याविषयी म्हणजे तुमच्या कार्यकर्ता,नेता, सहकारी,उत्तम माणूस असण्याविषयी अनेक पुस्तकातून , लेखांतून , चित्रफितीतून ,ध्वनिफितीतून सांगितले गेले आहे.
बाबा म्हणून तुम्ही कसे होतात? मुलांना वळण लावायचे,अभ्यास घेण्याचे ,संसार सांभाळण्याचे, घर सुरळीत ठेवण्याचे सर्व हक्क तुम्ही आईला देऊन टाकले होतेत. मुलांवर माया करायचे, त्यांच्यासाठी हळवे होण्याचे काम मात्र तुम्ही नेहमी केलेत ..अगदी नातवंडांपर्यंत केलेत. तुमच्याशी संवाद साधणे सोपे होते. तुमच्यापर्यंत पोचणे सोपे होते. तुमच्याशी वाद घालणेही सोपे होते. तसे खरे तर मला तुमच्याशी वाद घालायलाही लागायचा नाही. माझे म्हणणे बहुतेकदा तुम्हाला मान्य व्हायचेच किंवा मला दुखवायचे नाही म्हणून तुम्ही मान्य करुन टाकायचात !!
आम्ही आनंदात आहोत ना ह्याची तुम्हाला नेहमी काळजी असायची आणि तसे अधूनमधून विचारून तुम्ही खात्रीदेखील करून घ्यायचात. पण बाबा ,तुम्ही इतके हळवे होतात कि समजा जरी आम्ही आनंदात नसतो,तरी तसे तुम्हाला सांगून,तुमच्या जीवाला घोर लावणे आम्हाला जमले नसते!!
तुम्ही घरात असलात आणि आम्ही बाहेर गेलो कि जितक्या वाजता परत येऊ म्हणून सांगून जाउ त्याच्या आधीच तुम्ही वाट पाहायला सुरुवात करणार..मग प्रत्यक्ष ती वेळ येईपर्यंत खुर्चीत बसून वाट पाहणे संपून दारापर्यंत येरझारा सुरु आणि मग आम्हाला थोडा उशीर झाला तर बघायलाच नको. मूळचा लख्ख गोरा आणि उन्हाने रापलेला तुमचा चेहरा काळजी आणि राग दोन्हीने लालेलाल झालेला असायचा . त्यामुळे जेव्हा परत येणार असू त्यापेक्षा थोडी उशिराचीच वेळ तुम्हाला सांगायचे शहाणपण अंगी यायला किती वर्षे लागली आणि मग वाटले,हे आपल्याला आधी का नाही सुचले?!!
सिनेमा,नाटक बघताना ,पुस्तक वाचताना कितीदा डोळे पुसायचात गणतीच नाही. क्रिकेट मॅच बघताना सॉर्बिट्रेटची स्ट्रीपच जवळ!! एक दोन गोळ्या तर घ्यायला लागायच्याच. आत्ता तुम्ही असतात तर २०१४ आणि २०१९ च्या निकालांच्या वेळी बहुतेक तुम्हाला हेडगेवार रुग्णालयातच राहायला जायला लागले असते! आनंद, उत्सुकता,काळजी,दुःख सगळेच तुम्हाला तीव्रतेने वाटायचे आणि अनेक आघात सोसलेल्या तुमच्या हृदयाला ते झेपायचे नाही!
बस स्टॅन्ड ,रेल्वे स्टेशन कुठंही जायचे असो, खूप आधी जाऊन बसण्यावर तुमचा ठाम विश्वास ! अखेरचे जातानाही तीच घाई. किती छान आला मृत्यू तुम्हाला! तुमच्या आवडत्या शहरात , एका कार्यक्रमात,माणसे आजूबाजूला असताना ,कोणाशी तरी बोलत असताना एका क्षणांत ! तेव्हा आमच्यासाठी तो मोठा धक्का होता. पण नंतर विचार केल्यावर जाणवते कि असेच मरण तुम्हाला आवडले असते. पुण्यातल्या बालगंधर्वमधल्या तुमच्या शेवटच्या कार्यक्रमाची विडिओ पाहिली. नेहमीप्रमाणेच तुम्ही त्या क्षणांक्षणात .. खरे तर नेहमीच प्रत्येक क्षण भरभरून जगलात. त्यानंतर माझ्याकडे ठाण्याला येणार होतात,कधी नव्हे ते कार्यक्रमाशिवाय,नुसते सहज राहायला , ते मात्र राहूनच गेले.
-------------------------------------------------------------
लोण्याचा काळजाचा वाघ माणूस असतो तुमचा बाबा
भावनावश होऊन सतत ,विरघळत असतो बाबा
सावळं आभाळ मनात अन डोळे ज्याचे वत्सल
सहअनुभूती सहवेदनेने समृद्ध जिणे त्याचे अस्सल
तो माणसांचा, माणसे त्याची, संघकार्य हेच जीवन
शुष्क कोरडा मार्ग नसे हा ,सवे त्याच्या वेल्हाळपण
ध्येय निश्चित, मार्ग विवेकी, जोडत जाइ माणसे
हृदये सिंचून, ओल्या मातीत, पेरत जाइ माणसे
शेतकरी तो ,हताश न होई ,झाला न जरी ईच्छित रुजवा
माणुसकी हाच धर्म त्याचा, माणसांवर विश्वास हाच ठेवा
देव नसे तो, मातीचा माणूस,
पण लोभस त्याचे माणूसपण
रागलोभ तीव्र जरी,
सोबतीस असे सहृदय उदार उबदारपण
मातीशी करार पक्का, नकोच ह्याला आकाश
आकाशाला नावरे मोह, घुटमळे ते आसपास
एक दिवस आकाश अखेर जमिनीवर झुकले
विरघळले त्याच्यात अन मातीचा सुगंध ल्याले
लोण्याच्या काळजाचा वाघ माणूस असतो जेव्हा बाबा
भारून आसमंत ,स्मरणातही दरवळत राहतो बाबा
--------------------------------------



महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...