Friday, 15 November 2013

झिणी झिणी वाजे बीन -शिशिर

 झिणी झिणी वाजे बीन, सख्या रे अनुदीन चीज नवीन.

बा.भ.बोरकरांची अतिशय अर्थपूर्ण, मधूर कविता, श्रीधर फडके यांचे संगीत दिग्दर्शन व आशा भोसले यांचा आवाज, सगळे कसे जमून आलेले आणि म्हणूनच हृदयाचा ठाव घेणारे. खुपदा संगीताच्या तालाने, आवाजाच्या माधुर्याने, ऐकणाऱ्याचे शब्दांकडे थोडे दुर्लक्ष होऊ शकते. पण ह्या गीताच्या बाबतीत मात्र असे होत नाही. शब्द आपले मन वेधून घेतातच घेतात.

कोणती बरं बीन वाजते आहे ती? आणि कोण वाजवते आहे? विचार करणाऱ्या प्रत्येकाला ह्याची उत्तरे आपापल्या मनोवृतीनुसार,अनुभवानुसार नक्कीच वेगवेगळी मिळणार. मिळालेली उत्तरेदेखील तीच कायम रहातील ह्याचीही शाश्वती नाही. क्वचित कधी काळाबरोबर उत्तरे बदलतही रहाणार.

हे आयुष्याचे तर वर्णन नव्हे? रोज नव्या रुपात सामोरे येणारे, रोज बदलत रहाणारे..आणि असे बदलत रहाणे हेच नैसर्गिक नव्हे का? निसर्गातही ऋतू बदलत असतात. झाडांची जीर्ण पाने गळून नवी पालवी येत असते. एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे दिसणारी नदी देखील दर क्षणाला नवनव्या जलबिंदूंनी युक्त असते.

माणूस मात्र सारे कळत असुनही, काहीच बदलू नये अशी मनोकामना करतो. बोरकरांनीच म्हटल्याप्रमाणे, पुण्याची मोजणी नसलेले, पापाची टोचणी नसलेले, गंगौघासारखे खळाळते, शुद्ध, निर्मळ असे वर्तमानात जगता येणे किती भाग्याचे.

कधी कधी आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा अर्थच लागेनासा होतो. हे का घडते आहे? कोणामुळे? कोणासाठी? ह्याचे परिणाम काय? काहीच कळेनासे होते. पण त्या त्या वेळी, घडणाऱ्या त्या त्या घटनांचे अर्थ न लागणे, ह्यातच मानवी जीवनाचे सारे रहस्य असते, हेच खरे.

कधी अर्थाविण सुभग तराणा म्हणताना बोरकरांना "अर्था" चा काही दुसरा अर्थ अभिप्रेत असू शकेल का? त्याही ’अर्था ’शिवाय काही नाही हे खरेच, पण तो”अर्थ ’म्हणजेच सारे काही नव्हे, हे ही तितकेच खरे. आपल्या प्रतिभेच्या जोरावर उदंड पैसा कमवून, तो उदारपणे सुस्थळी दानही करून, आपले आयुष्य अर्थपूर्ण करणारे पु.ल. व सुनीताबाई आपल्या पहाण्यात आहेतच ना. शहरात दवाखाना उघडून आयुष्य जसे ’अर्थ’पूर्ण झाले असते, त्या पेक्षाही वनवासी विभागात काम करून, आयुष्य जास्त ‘अर्थपूर्ण’ करणारे डॉ.अभय/राणी बंग, डॉ.प्रकाश/मंदा आमटे हे ही माहिती आहेत. त्या ’अर्था ’विणही सुभग असणारे आयुष्य असेच असेल का?

माणसाला कधी स्वत:तल्या, काही सकारात्मक घडवून आणू शकणाऱ्या शक्तीचा प्रत्यय येतो, तर कधी वेगाने उताराकडे जाणाऱ्याला रोखता न आल्यामूळॆ मन हताश होते. सारं काही संपले असे वाटायला लावणारा क्षण येतो आणि उलटूनही जातो, कायमची सल ठेवून. पण आयुष्य वहात रहाते.

 काय करायचे आहे मला ह्या आयुष्यात?

देखणी ती पाउले, जी ध्यासपंथे चालती,

वाळवंटातूनी सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती.

मला तर वाळवंट नव्हे, मिळाली आहे चांगली हिरवळ. पण तरी तीतही एखादे तरी स्वस्तिपद्म, किंवा निदान त्याची सुरुवात करणे तरी शक्य होइल का मला? वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाता येईल का कधी मला?

हे सारे गुज ऐकणारा सखा कोण आहे? मनचे सारे ज्याच्यापाशी बोलावे, आणि ज्याने ते निर्विकल्प मनाने ऐकावे, समजून घ्यावे असा. पण जिथे द्वैत आहे तिथे असे होणे खरेच शक्य आहे?

मी कशाला गीत गाऊ, कोण आहे ऐकणारा,

मी कशाला दीप लावू, कोण आहे जागणारा?

असे जगताना कित्येकदा वाटून गेलेलेच नसते का? मग हे मनोभावे सांगणारे आणि ऐकणारे दोघे म्हणजे देह व आत्मा तर नव्हेत?

ही वीणा आहे ज्ञानदेवतेच्या, सरस्वतीच्या हातातले वाद्य. मग हे झिणी झिणी वाजणाऱ्या बीन चे वर्णन करताना, बोरकरांना कशाचे ज्ञान होणे, काही जाणून घेणे अभिप्रेत आहे का?

 " काही शोधायचे नाही, सारे इथेच येणार " असे तेच तर म्हणाले होते ना? मग आता कशाची ही ज्ञानलालसा?

ह्या बीन मधून, सुरात तारा जुळवून, अत्यंत मधुर असा झिणीझिणी नाद करणारा कोण आहे ह्याचेच तर ते ज्ञान नव्हे? कोण आहे तो? सहजपणात प्रवीण असलेला? सारे करूनही स्वत:कडे किंचितसेही श्रेय न घेणारा? तो ’तो ’च तर नव्हे, ज्याचे वर्णन करताना वेदही मुके झाले असे बोरकरांनी म्हटले तो?

मला माहिती आहे, की खूप सारे प्रश्नच मांडले आहेत मी आपल्यासमोर. पण प्रश्नांची उत्तरे आपली आपण शोधणे ह्यातही एक आगळीच मजा आहे ना?

सुरुवातीला म्हटले तसे, बदल हा नैसर्गिकच आहे. अवघ्या दोन महिन्यात नवे ऋतूचक्र सुरू होईल. नव्याचे आगमन व्हायचे तर आधी जुन्याने संपणे महत्वाचे. त्या नुसारच संपेल, "झिणी झिणी वाजे बीन " हे सदरही.

नुकत्याच सुरू झालेल्या कॅलेंडर वर्षानिमित्त आणि अवघ्या दोन महिन्यात येणाऱ्या चैत्र शुद्ध प्रतिपदेनिमित्त आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा, अवघ्या आयुष्याचा आनंदसोहळा करू शकण्याचे मर्म सांगणाऱ्या बा.भ.बोरकरांच्याच कवितेसह.

वाहत्या पाण्याचे : पालापाचोळा ठरेना

घोर घावाचीहि रेघ चार पळेहि 

दुःख वितळे उन्हात, सुख भिजे चांदण्यात

प्रेम गारवा होऊन दरवळे वागण्यांत

उरीं भेटल्याची कोठे तळीं साखर पाझरे

जातो तेथे भोवताली मळा मातून मोहरे

येते उदासता कधी ओल्या काळोखासारखी

मध्यरात्री तिची पण फुले नक्षत्रपालखी

-वृंदा टिळक 

ऋतुगंध -शिशिर २००९

 

Monday, 29 July 2013

फुरसत

इथे दहाव्या मजल्यावरून सगळी झाडे वरून पाहता येण्याचे मोठेच सुख!! त्या एका भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाला अशी अर्धीच गुलाबी किरमिजी शेंदरी पालवी  का आलीये कोणास ठाऊक? किती सुंदर दिसतो आहे तो रंग ! तो मोहोर असेल का? असा अर्ध्याच झाडाला? की ती दोन वेगवेगळी झाडे असतील आणि त्यातील एकच झाड  मोहोरत असेल ?  


अधून मधून काही झाडांना लगडलेले पिवळे फुलांचे घोस वरून तर फारच छान दिसतात. इथे ह्या खिडकीत उभे राहिले की ग्राउंडवर खेळणारी मुले, विविधरंगी झाडे, उडणारे पक्षी ,लगबगीने ये जा करणारी माणसे , मधेच तुरुतुरु धावणाऱ्या  ट्रेन्स, त्या  पलीकडच्या बिल्डींग्स, त्यातील एका इमारतीच्या बाहेरच्या बाजूने लगटून वरखाली करणारी पारदर्शक लिफ्ट ..नजर जरा पलीकडे नेली की काळपट हिरव्या झाडांनी अवगुंठीत टेकडी आणि विस्तीर्ण निळे आकाश... काय बिशाद की मनात काही निरुत्साह राहील!! सगळेच कसे सकारात्मक उर्जा देणारे दृश्य..


आत्ता ह्या क्षणी सूर्याचा निवळत जाणारा उजेड.. 

रेडीयोवरचे 'दिल ढून्ढता है फिर वही फुरसत के रात दिन' ह्या गाण्याचे सूर.. आणि 'बैठे रहे तसव्वुर ए जाना किये हुये' !!!!
-वृंदा टिळक  

Monday, 15 July 2013

"झिणीझिणी वाजे बीन"


.तप्त दुपार उतरत निवत चालली होती. एकामागून एक वेगवेगळ्या स्पर्धा चालू होत्या. शेजारी लाडकी लेक, हातात कॉफ़ीचा कप आणि समोर टी.व्ही.त जीव तोडून एशियन युथ गेम मधल्या विविध स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करणारे ऍथलेट्स. माणसाला आनंदात असायला अजून काय हवे??? सुखावून मी आरामात बसले आणि टी.व्ही.पाहू लागले.

गोळाफ़ेक, भालाफ़ेक, उंच उडी अशा कित्येक स्पर्धा होत होत्या. आपापले कौशल्य दाखवत प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठी, चांगल्यात चांगली कामगिरी करण्यासाठी धडपडणारी तरूणाई समोर दिसत होती. ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेची घो्षणा झाली. स्पर्धकांवर फिरता फिरता कॅमेरा भारताच्या स्पर्धकावर आला आणि माझ्याही नकळत मी ताठ बसून पाहू लागले. रवीकुमार-मध्यम बांधा, मवाळ चेहरा. जिंकण्याची इर्षा ना त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती ना हालचालीत.

मी मुलीला म्हटले, "नक्की ह्याचे वडिल उच्चपदस्थ सरकारी अधिकारी असणार आणि ह्याची वशिल्याने टीम मधे वर्णी लागलेली असणार. वाटतोय तरी का हा स्पर्धेत भाग घेणारा खेळाडू?"

 सगळे स्पर्धक सज्ज झाले. इषारा होताच पळू लागले. आमचे सगळे लक्ष अर्थातच भारताच्या रवीकुमार वर लागले होते. सुरुवात तर त्याने एकदम जोषात केली. "अरे, इतक्या वेगात आत्ताच धावू नकोस...माहितीये ना ८०० मीटर ची स्पर्धा आहे. शेवटी दम रहायला हवा वेग वाढवायसाठी." सोफ़्यावर बसल्या बसल्या मी रवीकुमारला माझा मोलाचा सल्ला देत होते.

 एक वर्तुळ धावून झाले. रवीकुमार पहिल्या पाचात होता. मी पुढे सरकून सोफ़्याच्या कडेवर येऊन टेकले होते. सर्वच खेळाडू आता जास्त वेगात धावत होते. सुरुवातीपासून प्रथम क्रमांकावर असणारा खेळाडू अजूनही अग्रभागीच होता. रवीकुमारच्या अगदी पाठोपाठ आता दुसरा एक स्पर्धक धावत होता. रवी कुमार आता पहिल्या तिघात आला होता.

स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली होती. शेवटचे २०० मीटर राहिले होते आणि रवीकुमारने आघाडी घेतली. रवीकुमार आता सर्वांच्या पुढे होता. त्याच्या मागचे खेळाडू ही शक्य तितक्या जास्तीत जास्त वेगात धावत होते. आता अगदी शेवटचे काही मीटर्स राहिले होते. लेकही लॅपटॉप मधले लक्ष काढून टी.व्ही.कडे बघत होती. 

अचानक रवीकुमारच्या मागच्या स्पर्धकाने आपला वेग वाढवला. आता शेवटचे ५० मीटर राहिले असतील. आमचा श्वास रोखला गेला होता. रवीकुमार अजुनही सगळ्यांच्या पुढे धावत होता. निमिषार्धात मागच्या स्पर्धकाने रवीकुमारला गाठले. आता फिनिश लाईन पावलाच्या अंतरावर होती. दोघांचीही शरीरे एकाच लयीत पुढे झेपावली. दोघांचे पायही एकाच रेषेत पडत होते. फिनिश लाईन ओलांडली गेली तीही दोघांनीही बरोबरच. फिनिश लाईन ओलांडताच रवीकुमार खाली पडला.

काही काळ संभ्रम निर्माण झाला. कोण जिंकले कोणालाच कळले नाही. रिप्ले दाखवला गेला. त्यातही पाय अगदी एकाच रेषेत, एकाच वेळी पडताना दिसले. "आले असले दोघे बरोबर तरी नंतर रवीकुमार पडला ना...त्या मुळे त्या दुसऱ्या स्पर्धकाला विजयी घोषित करतील बघ. इतका अटीतटीचा सामना आहे आणि भारतीय खेळाडू सुदैवी ठरलाय असे कधी होतच नाही." नाराज होऊन मी बोलत राहिले. कोणा खेळाडूची चुकलेली लेन, कोणी अन्तिम टप्प्यात धडपडलेले आणि ऑलिम्पिकची हुकलेली पदके माझ्या डोळ्यांसमोर फ़ेर धरून नाचू लागली.

सुरवातीला आपण हा वशिल्याने टीम मधे आला असेल असे म्हटले होते त्याची शरम नंतर त्याच्या चांगल्या कामगिरीबद्दलच्या आनंदात बदलली होती. पण आता तो नाहीच जिंकत असे वाटल्यावर मन खोल खोल कोसळत होते. आनंद व्यथेत रुपांतरीत झाला होता.

 "तो नसताच ना चांगला पळाला तर काही वाटले नसते..पण इतका वेळ सर्वांच्या पुढे पळत होता आणि शेवटच्या क्षणी असे व्हावे, ह्याला काय म्हणायचे?"

अंतिम निकाल कळायला लागणारा काही सेकंदाचा वेळही तासांसारखा वाटत होता. "जाउ दे..आणखी निराशा नको व्हायला. इथुन जावेच हे बरे". मी कप घेऊन आत जाण्यासाठी उठले आणि आता वळणार इतक्यात निकाल जाहीर झाला. रवी कुमार चक्क जिंकला होता!!!!!

दोघांचे पाय आणि शरीर एकाच रेषेत असले तरी, शेवटच्या क्षणी रवीकुमारचे डोके प्रतिस्पर्ध्यापेक्षा पुढे झुकलेले होते, ह्या निकषावर त्याला विजयी घोषित करण्यात आले होते. डोके इतके पुढे झुकवल्यामुळे तोल जाऊन रवीकुमार खाली पडला हे खरेच, पण तीच कृती त्याला सुवर्ण पदक देऊन गेली होती.

माझा आनंद आता खरोखरीच गगनात मावत नव्हता. काही कारण नसताना मारलेले ताशेरे अक्षरश:बुमरॅंग सारखे उलटून माझ्यावर आद्ळले होते आणि तरी मी खुष होते!!!

प्रयत्नांती आत्मसात केलेले कौशल्य, त्याला समय सुचकतेची मिळालेली साथ आणि नशिबाचे वरदान, अशी भाग्य-वर्षा वारंवार होत नाही हे खरे..पण कध्धीच होत नाही हे मात्र खरे नाही, हा आयुष्यभर पुरेल एवढा दिलासा ती कृतार्थ दुपार देऊन गेली होती.

-वृंदा टिळक. 

- ऋतुगंध -२००९


Wednesday, 15 May 2013

"झिणीझिणी वाजे बीन"

 घरात बाळ येते ते बरोबर गाणे घेऊनच. बाळाच्या निमित्ताने प्रत्येक जण गुणगुणू लागतो. ह्यावेळी "झिणीझिणी वाजे बीन" मध्ये बाळाच्या आयुष्यात येणाऱ्या व बाळाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात येणाऱ्या काही गाण्यांविषयी.


 "बाळा जो जो रे " हे बहूतेक प्रत्येक बाळाने ऐकलेले पहिले गाणे असेल. ते देखील आजीच्या तोंडून. आई वर वेळ आलीच बाळाला झोपवण्याची तरी आईला तोपर्यंत " बाळा जो जो रे " म्हणणे झेपायला लागलेले नसते. ती आपली "निंबोणीच्या झाडामागे" किंवा "सुरमई अखियोंमे " म्हणून वेळ भागवून न्यायचा प्रयत्न करते. बाळाला खरोखरीच झोप आलेली असेल तर बाळ त्या गाण्यांनी झोपते देखील, पण नाहीतर, त्याच्या तोपर्यंत ओळखीच्या झालेल्या, "बाळा जो जो रे " च्या लयीसाठी अडून बसते!! मग शेवटी एकतर आजीला किंवा "बाळा जो जो रे" ह्या अंगाईला शरण जाण्यावाचून आईला पर्याय रहात नाही. [अर्थात लहानपणी बाळाला झोपवण्यात जेवढा वेळ घालवला नसेल, तेवढा वेळ बाळ मोठे झाल्यावर आई त्याला जागे करताना घालवते, हा भाग अलाहिदा!!]


केवळ आई आणि आजीच नाही, तर हळू हळू सारे घरच बाळाचे "आशिक " बनलेले असते. बाळाची प्रत्येक कॄती एक सोहळाच बनून जाते. बाळाला तेल लावणे, बाळाची अंघोळ सारे कसे ह्या आशिकांच्या घोळक्यात व्हायला लागते. बाळाला तेल लावताना, "डोल मैना डोलाची, हाती परडी फ़ुलाची" म्हणत आजी त्याला डोलवते. हाताच्या थोड्याशा आधारावर, पायात जोर येउ लागलेले बाळ रेटे देते, तेव्हा आजीचा चेहरा कौतूकाने उजळतो आणि बाजूला जमलेले प्रजाजन "काय हे अद्भूत" असे भाव चेहऱ्यावर वागवत खूश होतात.


मग येते अंघोळीची वेळ. बाळाच्या नाजूक टाळूवर आपल्या तळव्याचा आडोसा करून पाणी घालताना आजी "बाळाच्या डोक्यावर तो तो तो, बाळाची बायको योयोयो" असे गाणे म्हणते. बाळाची अंघोळ होईपर्यंत त्याचे अंथरूण सारखे करून ठेवू या, म्हणत त्याच्या पाळण्यातील गादी, दुपटे नीट करत असलेली आई आपल्याला अजून बाळाला सांभाळायला्च जमत नाहीये, तर त्याच्या बायकोला आपण कसे सांभाळणार असा विचार करत राहते. बाळाचे आवरताना, "अडगुले,मडगुले, सोन्याचे कडगुले, रुप्याचा वाळा, तान्ह्या बाळा तीट टिळा" हे गाणे मदतीला असतेच.


बाळ मोठे होत जाते, तसे स्वत:च्या नव्या सुरावटी तयार करते. आईला गाण्यातली बाकी घराणी ओळखता आली नाहीत तरी आपल्याच घराण्यातल्या ह्या सुरावटींचा अर्थ मात्र लग्गेच ओळखता येत असतो. कोणते सूर म्हणजे भूक लागली, कोणते सूर म्हणजे दुपटे बदलायची वेळ झाली हे ती अगदी तत्काळ सांगू शकते. अर्थात आता काही सुज्ञ माता बाळांना सतत डायपर वापरून, दुपटे ओले होण्याची वेळच येऊ देत नाहीत म्हणा..पर्यावरणाची हानी होताना येणारा करूण सूर बहुधा त्यांना ओळखू येत नसावा.


बाळाला भरवताना "हा घास चिउचा, हा घास काऊचा" असे धृपद घालून तमाम ओळखीच्या व्यक्ती आणि वस्तूंच्या नावे घास देऊन आणि गाणी म्हणून होतात! शिवाय बाळाने ताटलीवर, वाटीवर हात मारू नये, म्हणून त्याच वेळी त्याला "इथे इथे बैस रे मोरा, बाळ घाली चारा, चारा खा, पाणी पी, बाळाच्या डोक्यावरून भूर्रकन उडून जा" म्हणून त्याचे हात गुंतवून ठेवायची शक्कल पण लढवली जाते. ’जशा चाणाक्ष आया, तशीच चाणाक्ष मूले ’, ही नसलेली म्हण बाळ ”भुर्रकन " म्हणताना डोक्यावर नेलेले हात खाली आणताना, ताटलीवर मारून सिद्ध करतेच!!


बाळाला, "तळहात, मळहात, मनगट, कोपर, खांदा, गळागूटी, हनुवटी, भाताचे बोळके, वासाचे नळके, काजळाच्या डब्या, देवाजीचा पाट, देवाजीच्या पाटावर चिमण्यांचा किलबिलाट " हे गाणे म्हणून एकेक अवयव दाखवायला शिकवताना, बाळाने खरोखरच हात, खांदा, तोंड, नाक, डोळे, कपाळ, डोके दाखवायला सुरूवात केली, की आईला प्रेमाचे एकदम भरतेच येते. पूर्ण जगात आपल्या बाळाएवढे हुश्शार कोणीच नाही, अशी त्या क्षणी तिची खात्रीच पटलेली असते. इतके छान गाणे लिहणाऱ्या, कपाळाला देवाजीचा पाट म्हणणाऱ्या कवीने, बाळाच्या गोबऱ्या गोंडस गालांसाठी काहीच का लिहिले नसेल असा प्रश्नही तिला पडतो.


बाळ उभे रहायला लागले, की "बाळ उभे राहिले,कोणी नाही पाहिले" हे गाणे म्हणून सर्वांना पहायला बोलवण्याची योजकता तर महानच! बाळ उभे तर रहायला शिकते, पण अजून उभे राहून झाल्यावर बसायचे कसे हे मात्र त्याला यायला लागलेले नसते. मग तो इवला जीव बावरतो, गांगरतो. उभे राहून राहून पाय दुखल्यावर, मग तो गब्दुल देह, बुद्कन खाली पडतो. लागलेले तर असतेच शिवाय भितीही वाटलेली असते. आईला समजते, बाळाच्या मनात काय आहे ते. पण आत्ताच ह्याची भिती घालवायला हवी, नाहीतर हा कायम भित्राच राहील, एवढे मानसशास्त्र तिलाही अवगत असते. मग बाळाच्या पडण्याकडे जास्त लक्ष न देता, बाळाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, ती "हात रे, कोणी आमच्या बाळाला लागवले. तो बघ उंदीर पळाला!” ह्या ओळींचा आधार घेते. आता नव्या पिढीतल्या आया अशावेळी "उन्दीर पळाला" हे पुरातन गाणेच म्हणतात की, "कोंबडी पळाली" असे नवे गाणे म्हणतात ह्या विषयी संशोधन व्हायला हवे!!


जिला छोटे बाळ आहे त्या आईला दिवस उगवतो कसा आणि मावळतो कसा हे बाळाच्या वेळापत्रकावरूनच कळते, इतकी ती बाळात गुरफटलेली असते. पण दिवस थोडीच थांबून रहातात. बाळ झपाट्याने मोठे होत असते. आता खूप शब्द बोलता यायला लागलेले असतात. स्वत:च्या मागण्या शब्दात सांगता यायला लागतात. मग बाळाला शिकवायसाठी सारेच जण पुढे सरसावतात. एक, दोन, वन, टू, जानेवारी, फ़ेब्रुवारी, चैत्र, वैशाख सगळे बाळाला शिकवले जाते. रोज बाळाला कडेवर घेऊन म्हटलेले पसायदान, बाळाचेही पाठ होऊन जाते.


आपले होकार, नकार, मागण्या, निषेध शब्दांच्या भाषेत सांगता येणाऱ्या, उभे रहाणे, बसणे, उंच ठिकाणी चढता येणे, पळणे अशा सर्व हालचाली करता यायला लागलेल्या बाळाला आता स्वतंत्र व्यक्तिमत्व प्राप्त झालेले असते. काठीचा घोडा करून घरात दुडकत दुडकत फ़िरत, "अबडक खबडक घोडोबा, घोड्यावर बसले लाडोबा, लाडोबाचे लाड करते कोण? आजी, आजोबा, मावश्या दोन" हे गाणे म्हणत खिदळणाऱ्या बाळाकडे बघताना, मनात खूप आनंद होत असतानाही, डोळे का भरून येतात, ते आईचे आईलाच माहिती.

-वृंदा टिळक. 

(ऋतुगंध -२००९)


Friday, 15 March 2013

झिणी झिणी वाजे बीन- ग्रीष्म

 
 ग्रीष्म झळा?? छे..छे..प्रीतीचा चंदन वाळा...

ज्येष्ठ आणि आषाढ हे दोन महिने, स्मरण दोन महाकाव्यांचे.

ही दोन महाकाव्ये म्हणजे जणू प्रेमाची दोन रुपेच.

एकात प्रेमामूळे कर्तव्य भावना उजळून निघाली,

तर दुसऱ्यात प्रेमामूळे कर्तव्यात कुचराई झाली.

पण दोन्हीमुळे मनावर ठसली ती प्रेमाची महती.

ती होती ती होती एक राजकन्या, उपवर, सुस्वरूप, गुणवान,.

सहचराच्या निवडीचे स्वातंत्र्य असणारी.

जबाबदारीने ते स्वातंत्र्य पेलू शकणारी.

निवडला तिने एक गुणवान राजपुत्र.

ती एक राजकन्या, तो एक राजपुत्र.

पण...पण ती राजकन्या होती एका वैभवशाली देशाची,

तर तो होता हद्दपार राजपुत्र एका गमावलेल्या राज्याचा.

त्याच्याकडे गुण, चारित्र्य सारे काही होते, नव्हते फ़क्त राज्य.

आप्तांनी केलाही, निष्फळ प्रयत्न राजकन्येचे मन वळविण्याचा.

पण पक्का होता निर्धार राजकन्येचा.

वरीन तर ह्यालाच, नाहीतर मग विवाहच नको.

तिच्या प्रेमापुढे, जिद्दीपुढे झुकावेच लागले साऱ्यांना.

झाला त्यांचा विवाह.

महालातल्या ऐषोआरामांचा त्याग करून ती वनातही रमली.

दृष्टीहीन सासू-सासऱ्यांची सेवा, घरातली कामे करू लागली.

प्रेमापुढे त्या कष्टांची तिला तमा नाही वाटली

चेतविली सहचरात आकांक्षा तिने विजय प्राप्तीची,

जागी केली त्याची ईर्षा गमावलेले राज्य परत मिळवण्याची.

जिद्दीने केला तिने साक्षात यमाचाही पाठपुरावा.

सहचराचे केवळ प्राणच नाही तर सन्मानही परत मिळवला.


परिस्थिती पुढे झुकणारी नव्हे, तर परिस्थिती बदलवणारी,

ठरली ती दोन्ही कुळांना तारणारी.

पतीचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देणारी.

शतकानुशतके गायिली जातेय गाथा तिच्या प्रेमाची, निष्ठेची, जिद्दीची.

पतीवरच्या प्रेमाने उजळलेल्या तिच्या कर्तव्यभावनेची.


...


आषाढाचा पहिला दिवस

न चुकता होणारी त्याची आठवण.

कोण होता तो?

  .

पत्नीच्या प्रेमपाशात तो रममाण,

अष्टौप्रहर तिचाच ध्यास, तिचेच गुणगान,

आणायची होती पुजेसाठी कमळे त्याला मानसरोवरातून

पण प्रियेच्या स्मरणात मग्न तो, गेला कर्तव्य विसरून

कुबेर झाला क्रोधाविष्ट, दिली त्याला शिक्षा कठोर

अलकापूरीहून केली त्याची रवानगी थेट रामगिरीवर.

विरहाने तो कृश झाला, प्रियेच्या आठवणीने तळमळला.

मेघही त्याला दूत भासला, संदेश पाठवण्या प्रियेला.

कालिदासाच्या लेखणीतून उतरली साक्षात प्रेमभावना

विरहाग्नीतून उजळून अधिक तीव्र,अधिक शुद्ध झालेली

एका कर्तव्यच्युत हद्दपार गुन्हेगारालाही,अजरामर करणारी.

 

...


Tuesday, 15 January 2013

झिणीझिणी वाजे बीन- ’वसंत”


ऋतु - कालचक्राचा, एक छोटासा तुकडा. निसर्गाच्या, हवामानाच्या बदलत्या रुपाचा प्रत्यय देणारा. हे बदल सजगपणे,रसिकतेने अनुभवायचे भाग्य मात्र शहरीकरणाने आपल्यापासून हिरावून घेतले आहे. सिंगापूरसारख्या, ऋतुना जणु कुणी ’स्टॅच्यु"केले असावे, अशा ठिकाणी रहाताना तर, ऋतुंचे बदल केवळ भिंतीवरच्या दिनदर्शिकेतच बघायला मिळतात. पण आपल्या आठवणीत मात्र हे सारे ऋतु अगदी तसेच टवटवीत असतात. .असेच हे स्मरणरंजन.

धुळवडीच्या दिवशी महानगरपालिका खास दुपारच्या वेळी पाणी सोडायची. मग त्या गार पाण्याने अंगावरचे रंग काढतानाही पाण्याचा थंडपणा जाणवायचा नाही, तेव्हाच लक्षात यायचे की उन्हाळा आलाय. होळीनंतरच्या दिवसात, कैरीच्या फ़ोडीना तिखट-मीठ लावुन खात खात, मस्त अभ्यास व्हायचा. सुट्टीचे बेत ही सुरु असायचे. त्या योजनांमधे येणारा परिक्षांचा बारिकसा अडथळा दुर झाला की मग मोकळे सुट्टीभर मजा करायला.

सरत्या फ़ाल्गुनातच चैत्राची चाहुल लागलेली असायची. रेशमी साड्या, कपडे उन्हे दाखवायला गच्चीवर जायचे. वाळवणांनाही सुरुवात व्हायची. कावळ्यांवर लक्ष ठेवायला वाळवणांशेजारी आम्हा मुलांची प्रतिष्ठापना व्हायची आणि आमचे सर्वात आवडते वाळवण असायचे डाळीच्या सांडग्यांचे. कारण लक्ष ठेवता ठेवता ते मनसोक्त खाता यायचे. वाळण्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची चव कशी लागते ह्याचा अभ्यास ही व्हायचा!!

 उन्हाळ्यात असायची भरपुर लग्ने आणि मुन्जी. ह्या समारंभाच्या निमित्ताने खुपदा बाहेर जाता यायचे, नवे कपडे घालायला मिळायचे आणि सतत पाहुणे येत रहायचे. त्या समारंभातही जेवण्याव्यतिरिक्त प्रत्यक्ष समारंभाशी आमचा संबंध तसा कमीच यायचा. कार्यालयांपेक्षा आम्हाला कार्यालयांची अंगणे आणि गच्चीच जास्त ओळखीची असायची.

 तेव्हा’ वसंत ऋतु’आम्हाला चैत्र / वैशाख -वसंत असे पाठ करण्यापुरता माहिती असायचा. पण प्रत्यक्ष आमच्या जिव्हाळ्याचा असायचा तो वसंत नाही तर उन्हाळ्याची सुट्टी! वसंताची महती माहिती होण्यासाठी, पुढे कित्येक उन्हाळे, पावसाळे जावे लागले! 

त्या दिवसातली एक खास गोष्ट म्हणजे रामाचे नवरात्र. गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत रामाच्या मंदिरात, ज्याला आमच्या गावी का कोणास ठाउक पण रामाचा मठ म्हणत असत, विविध कार्यक्रम चालत. पहाटे उठून रामाच्या मठात काकड आरती साठी जाताना कडुनिंबावरून वहात येणाऱ्या शीतल झुळका, दुपारचे मठातले सामुहिक जेवण, रात्रीची कथेकरी बुवांची प्रवचने, अगदी रात्री रामाची शेजारती आणि ह्या साऱ्या गोष्टी घडत असताना, पार्श्वभुमीवर वाजणारी कोकिळेची शीळ, सारेच भारून टाकणारे. रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी रात्री गावकऱ्यांनी बसवलेले नाटक असायचे. पुर्ण वर्षभर ज्याकडे डोळे लावून बसावे,असे हे दिवस असायचे हे निश्चित.

चैत्र गौरीची आरास, डाळ, पन्हे हे सर्वांच्या आवडीचे असायचे. त्या वेळी उत्सुकता असायची ती त्या दिवशीपर्यन्त मदन-बाणाची फ़ुले फ़ुलायला लागतील की नाही ह्याची. अशा चांगल्या चाललेल्या सुट्टीत, "परिक्षांचे निकाल" नावाचा भीषण खडखडाट यायचा, पण वर्षानुवर्षांच्या अनुभवाने त्यावर मात केली जायची. त्याच्या यातना कठीण सोसल्यानंतर बाजारात यायचे, ते रसराजेश्वर-आंबे. त्या आनंदापुढे आधीची सारी दु:खे कस्पटासमान वाटायची.

दुपारी आमरस-पुरीचे जेवण झालेले आहे. घरातील मोठी माणसे झोपलेली आहेत. बाहेर कडक उन्हाच्या झळा जाणवत आहेत. अशावेळी रंगायचा पत्त्यांचा डाव. खुप चुलत, आत्ते, मावस, मामे भावंडे एकत्र जमलेली असायची. लहान भावंडांना रॅगिंग करणे अगदी रीतसर चालू असायचे. विशेषत:"चॅलैंज"वा"नॉट at होम” सारखे खेळ चालू असतील तर मग त्या लहान भावंडांचे हाल विचारायलाच नकोत. ह्या साऱ्यांतून सुटका व्हायची, ती जेव्हा आई विळी समोर घेउन घागरीएवढे मोठे कलिंगड चिरायला बसायची तेव्हा. कलिंगडातला मधला लालेलाल भाग जिंकुन आम्ही इतक्या वेळ झालेल्या छळाचे उट्टे काढायचो!!

ह्याच सुमारास केव्हातरी लोणची घालण्याचा उत्सव साजरा व्हायचा. ते ही एक व्रतच असायचे! प्रत्येकाची कुल-देवता वेगळी. त्या प्रमाणे ह्या व्रतामधल्या काही टप्प्यांवर बदल आढळायचा. पण शेवटची प्रथा तीच.. आजु-बाजुला मुले उभी असतील. त्यांच्या ही हातावर दोन फोडी ठेवाव्यात. हे व्रत जे मनोभावे आचरतील, त्यांचे वर्ष खमंग जाईल, अशी फ़लश्रुती होती. कोण आज हे व्रत आचरणार आहे, त्याची माहिती आम्हाला असायचीच. त्या मुळे आमचा घोळका त्या घरी जायचा आणि आमचा दिवस सार्थकी लागायचा.

 त्या वैषाख झळांच्या दुपारी,मधेच कधीतरी ssssरे..ssगा sss र अशी हाक कानी यायची. अशी हाक कानी आली की सगळ्या घरातील सगळी मुले बाहेर येणार हे नक्कीच. असे बाहेरचे आणि ते ही गाडीवरचे खायला आम्हाला परवानगी नसायचीच, पण बाकी मुले कसा हट्ट करतायत आणि आइसप्रुट मिळवतायत हे पहाणे ही करमणूकीचे असायचे. एकतर आपल्याला खायला न मिळाल्याची खंत आणि आइस्प्रुट चा आकार, कित्येक वर्षे,"मीठी छुरी"म्हटल्यावर आइसप्रूटच डोळ्यांपूढे यायचे!!

मग त्या दु:खावर जणू चंदनाचा लेप असा, घरी पॉट आणून आइसक्रीम करायचा बेत ठरायचा. पॉट आणणे, खडेमीठ आणणे ह्या सगळ्या महत्वाच्या बाबी पुर्ण होईपर्यंत घरात आइसक्रीम साठीचे दुध आटवून गार करुन तयार असायचे. ह्या शुभ प्रसंगी स्नेही जनांची उपस्थिती अनिवार्यच. गच्चीवर एकीकडे गप्पा, गाणी ,जोक्स, कथाकथन असे चालू असायचे. आलटुन पालटुन प्रत्येकजण पॉट फ़िरवायला बसायचा. खुप सारा धीर धरल्यावर मग फळे रसाळ गोमटी खायला मिळायची!!!

अशी अनेक आंबट-गोड, थंड-उष्ण..वळणे घेत सुट्टी संपायची. येणार येणार म्हणुन जिची आतुरतेने वाट पाहिली, ती आली कधी आणि संपली कशी हे ही कळायचे नाही. हा कालावधी इतक्या झटकन संपायचा की "वसंत” हा साही ऋतुंमधील सर्वात लहान ऋतु आहे, अशी कित्येक वर्षे माझी ठाम समजुत होती.


वृंदा टिळक 

-ऋतुगंध वसंत २००९


महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...