Thursday, 24 November 2022

चला.. संविधान साक्षर होउ या!! - भाग १०

 चला.. संविधान साक्षर होउ या!! - भाग १०

भारतीय गणराज्याचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ ह्या दिवशी अस्तित्वात आले. संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी ह्या उद्देशाने २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संविधान दिवसाच्या निमित्ताने “चला, संविधान साक्षर होऊ या” ही लेख मालिका सादर करीत आहोत.

संविधानाची प्राथमिक ओळख व्हावी, त्या विषयी उत्सुकता वाटून वाचकांनी संविधानाचा अधिक अभ्यास करायला उद्युक्त व्हावे हाच ह्या मालिकेचा हेतू. तेव्हा Stay tuned! वाचत राहा - पुढचे काही दिवस, दररोज- अतिशय सोप्या शब्दात सामान्य भारतीय नागरिकाने लिहिलेली ही लेख मालिका!

-----------------------------

प्राचीन काळापासूनच भारताची समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था काही मूल्यांवर आधारित होती. राष्ट्रकल्पना, राजधर्म अशा अनेक विषयांवर आपल्या संस्कृतीत सखोल चिंतन केलेले आणि मांडलेले दिसून येते. कौटिल्याचे अर्थशास्त्र, रामायण, महाभारत व इतर ग्रंथांमध्ये आपण ते वाचू शकतो. 

भारताचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. प्राचीन काळापासून अनेक गणतंत्रे अस्तित्वात होती. राजांचे मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून ऋषी होते, अशी अनेक उदाहरणे सापडतील. राजा त्यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय घेत असे. मंत्रीमंडळ व्यवस्थेमुळे संपूर्ण राजेशाही, एकाधिकारशाही नव्हती आणि स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व, कर्तव्यभावना, अन्यायाविरुद्ध दाद मागता येणे इत्यादि लोकशाहीची मूल्ये प्राचीन काळापासून अस्तित्वात होती. त्यामुळे आपल्या संविधानात आपली प्राचीन शाश्वत मूल्ये पुनर्स्थापित केलेली आढळतात तसेच आधुनिक जगातील मूल्ये देखील दिसतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही म्हटले आहे, “स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये आपण फ्रेंच राज्यक्रांतीतून नाही, तर भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून घेतली आहेत.”

भारताचा इतिहास, संस्कृती, परंपरा, भारताने स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा, सामाजिक क्रांती ह्या साऱ्याचे प्रतिबिंब आपल्याला संविधानात उमटलेले दिसते. 

अनेक वर्षे आक्रमकांच्या काळात म्हणजे आधी मुस्लिम आणि नंतर ब्रिटिशांचे राज्य असल्याने विस्कटलेली सामाजिक घडी पुन्हा नीट करण्याचा प्रयत्न संविधानाने केला आहे. सामाजिक विषमता, जातीभेद, काही अनिष्ट रूढी ह्या सगळ्यांना संपवून समाजव्यवस्था आणि देश पुन्हा एकदा वैभवशाली व्हावा ह्या दिशेने प्रयत्न केलेले आहेत. विविधता कायम राखत एकात्मता, एकसंधता कशी साधता येईल ह्याचा विचार केलेला आहे. 

संविधानासंबंधी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यात सांगितलेल्या प्रक्रियेनुसारच त्यात बदल करता येणार आहेत. ह्या साठी लोकांना, लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना महत्वाचे अधिकार आहेत. 

संविधान निर्मितीच्या वेळी ज्या कायद्याविषयी अंमलात आणावा म्हणून विचार झाला होता तो समान नागरी कायदा अजूनही विचाराधीन आहे. सर्व धर्म समान, सर्व नागरिक समान असे घटनेत लिहिलेले असताना सर्वाना समान कायदा हवा. घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे मत होते की आधुनिक भारताच्या भरभराटीसाठी आणि एकतेसाठी समान नागरी कायदा असणे आवश्यक आहे.

संविधान निर्मितीच्या वेळी जम्मू काश्मीर साठी केलेली तात्पुरती तरतूद ७० वर्षे तशीच राहिली. राजकीय इच्छा शक्ती आणि जनमताचा पुरेसा रेटा ह्या दोन गोष्टींच्या अभावामुळे जम्मू काश्मीर मध्ये इतकी वर्षे भारताचे संविधान लागू झाले नाही. अखेर २०१९ मध्ये कलम ३७० हटवले गेले. 

अशा अजूनही काही बाबी आहेत ज्यावर साधक बाधक विचार होऊन, देशाच्या कल्याणाचा विचार करून बदल करण्याची आवश्यकता आहे. संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांविषयी विचार करून आवश्यक तर त्यांचा संविधानात समावेश होण्याची गरज आहे. संविधानाविषयीचे निर्णय आपले राजकीय हेतू, स्वार्थ आणि नफा तोटा बाजूला ठेवून देशाच्या भविष्याच्या दृष्टीने उचित असे निर्णय, ते देखील कालापव्यय न करता घेण्याची गरज आहे. तुमच्या माझ्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांनी संविधानाचा अभ्यास करण्याची गरज आहे.


चला.. संविधान साक्षर होउ या!! - भाग ९

चला.. संविधान साक्षर होउ या!! - भाग ९ 

भारतीय गणराज्याचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ ह्या दिवशी अस्तित्वात आले.संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी ह्या उद्देशाने २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संविधान दिवसाच्या निमित्ताने “चला, संविधान साक्षर होऊ या” ही लेख मालिका सादर करीत आहोत.

संविधानाची प्राथमिक ओळख व्हावी, त्या विषयी उत्सुकता वाटून वाचकांनी संविधानाचा अधिक अभ्यास करायला उद्युक्त व्हावे हाच ह्या मालिकेचा हेतू. तेव्हा Stay tuned! वाचत राहा - पुढचे काही दिवस, दररोज- अतिशय सोप्या शब्दात सामान्य भारतीय नागरिकाने लिहिलेली ही लेख मालिका!

—-----------------------------------------------------------

मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये

भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेले अधिकार म्हणजे मूलभूत अधिकार. हे अधिकार सर्वाना म्हणजे जे जे भारतीय नागरिक आहेत त्या प्रत्येकाला आहेत. तुमची भाषा, धर्म, पंथ, राहण्याचे ठिकाण, सांपत्तिक स्थिती, वय, व्यवसाय ह्यानुसार हे अधिकार कमी जास्त होत नाहीत. ते सर्वाना सारखेच आहेत. ह्या मूलभूत अधिकारांना शासन वा कोणतीही संस्था, व्यवस्था नाकारू शकत नाही. संविधान निर्मितीच्या वेळी सात अधिकार मूलभूत अधिकार म्हणून प्रत्येक नागरिकाला दिलेले होते. पण १९७७ मध्ये झालेल्या ४४ व्या घटनादुरुस्ती द्वारे मालमत्तेचा अधिकार मूलभूत अधिकारांच्या सूचीतून वगळण्यात आला. त्यामुळे आता ६ मूलभूत अधिकार आहेत. संविधानाने भारतीय नागरिकांना सन्मानाने जीवन जगण्याचा, प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. 

१. समानता- कायद्यासमोर सर्व जण समान आहेत. कोणी उच्च वा कनिष्ठ नाही. सर्वांसाठी सारखाच कायदा आहे. सरकारी नोकरीत सर्वाना समान संधी असेल. ह्याला अपवाद म्हणजे शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय नागरिकांना शासन विशेष सवलती देऊ शकते. प्रत्येक प्रौढ नागरिकाला मताचा अधिकार आहे. प्रत्येकाच्या मताची किंमत समान आहे. 

२. स्वातंत्र्याचा अधिकार - भाषण व अभिव्यक्ती, भारतात कुठेही जाता येण्याचे, जमाव करण्याचे, संघटना स्थापन करण्याचे, भारताच्या कोणत्याही भागात व्यवसाय करण्याचे, भारतातील कोणत्याही भागात स्थायिक होण्याचे, मालमत्ता मिळवायचे, ती जतन करण्याचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिलेले आहे. कोणत्याही व्यक्तीचे स्वातंत्र्य कायद्याने मान्य केलेल्या प्रक्रियेखेरीज हिरावून घेता येणार नाही. व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्यानुसार कारवाई केल्याखेरीज कोणीही नागरिकांचे व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही.

३.शोषणाविरुद्धचा हक्क- प्रत्येक भारतीयाला कोणत्याही शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा हक्क दिला आहे. अस्पृश्यता आता कायद्याने नाहीशी करण्यात आली. सामाजिक विषमता आणि जातीधर्म भेद कायद्याने दंडनीय आहेत. 

४.धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क- भारतीय नागरिकाला कोणत्याही धर्माचा अनुयायी असण्याचे, त्या धर्मानुसार आचरण, उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे. सर्व धर्म समान आहेत. अर्थात कोणालाही दुसऱ्यावर दबाव टाकून किंवा प्रलोभन दाखवून धर्मांतरास प्रवृत्त करण्याचा हक्क नाही. 

५.शिक्षण आणि सांस्कृतिक हक्क - प्रत्येक भारतीय नागरिकासाठी प्राथमिक शिक्षण अनिवार्य आणि मोफत आहे. प्रत्येक भारतीय नागरिकास आपली भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा हक्क आहे. 

६.घटनात्मक उपायांचा अवलंब करण्याचे स्वातंत्र्य - आपल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होते असेल तर त्याविरुद्ध दाद मागण्याचा, न्यायालयात जाण्याचा हक्क.

ह्या अधिकारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा असे म्हटलेले होते. 

हे मूलभूत अधिकार शासनाला बंधनकारक आहेत. कोणत्याही कायद्याद्वारे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना बाधा येणार नाही ह्याची जबाबदारी सरकारची आहे. 

ह्या स्वातंत्र्यावर देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी, सुरक्षेच्या कारणास्तव अपवादात्मक परिस्थितीत सरकार मर्यादा घालू शकते. पण ते कायद्याद्वारे व्हायला हवे. आणीबाणीत अशी बंदी आणली गेली होती.

बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीमूळे मूलभूत कर्तव्याची यादी संविधानात समाविष्ट झाली. 

भारतीय नागरिकाची मूलभूत कर्तव्ये 

१. संविधानाचा, संवैधानिक संस्थांचा, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत ह्यांचा आदर करणे. संविधानाप्रमाणे वर्तन करणे. 

२. स्वातंत्र्य मूल्याला अनुसरणे आणि संवर्धन करणे. 

३.देशाचे सार्वभौमत्व, एकता व एकसंधता ह्यांचे जतन व रक्षण करणे.

४. देशाचे संरक्षण करणे. 

५. देशाच्या विविध धर्मीय, भाषिक तसेच वांशिक लोकांमध्ये बंधुत्वाची भावना दृढ करणे, अनिष्ट चालीरीतींचा त्याग करणे.

६. जंगले, उद्याने, नद्या आणि वन्यजीवन ह्यासारख्या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करणे व ती वाढीस लावणे आणि सर्व प्राणिमात्रांबाबत दयाभाव बाळगणे.

७. शास्त्रीय दृष्टीकोन, मानवतावादी भूमिका व चौकस तसेच सुधारणावादी दृष्टीकोन ह्यांचा अंगीकार करणे. 

८. राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करणे व हिंसाचार निषिद्ध मानणे.

वैयक्तिक तसेच सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रांत प्रगती साधून देशाच्या प्रगतीस हातभार लावणे.

संविधानात लोकशाही आणि सामाजिक न्यायाचे आश्वासन आहे ह्याचेच प्रत्यंतर मूलभूत हक्क आणि कर्तव्ये ह्यांच्या तरतुदीमुळे येते. सर्वसामान्यांसाठी संविधान म्हणजे जणू सुरक्षा कवचच आहे. 

आपल्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली झाली तर भारतीय नागरिकाला न्यायालयात दाद मागता येते. मात्र नागरिकाने आपली मूलभूत कर्तव्ये पार पाडली नाहीत तर नागरिकांवर सामान्यपणे कारवाई केली जात नाही, ही त्रुटी जाणवते. नागरिकांच्या राष्ट्रनिष्ठे वर आणि कर्तव्य तत्परतेवर भारताचे भवितव्य अवलंबून आहे. 


संदर्भ 

https://vishwakosh.marathi.gov.in/30091/


चला.. संविधान साक्षर होउ या!! - भाग ८

 चला.. संविधान साक्षर होउ या!! - भाग ८ 

भारतीय गणराज्याचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ ह्या दिवशी अस्तित्वात आले. संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी ह्या उद्देशाने २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संविधान दिवसाच्या निमित्ताने “चला, संविधान साक्षर होऊ या” ही लेख मालिका सादर करीत आहोत.

संविधानाची प्राथमिक ओळख व्हावी, त्या विषयी उत्सुकता वाटून वाचकांनी संविधानाचा अधिक अभ्यास करायला उद्युक्त व्हावे हाच ह्या मालिकेचा हेतू. तेव्हा Stay tuned! वाचत राहा - पुढचे काही दिवस, दररोज- अतिशय सोप्या शब्दात सामान्य भारतीय नागरिकाने लिहिलेली ही लेख मालिका!

-----------------------------------------------------

 

भारतीय संविधानाने शासनाच्या तीन शाखा निश्चित केल्या आहेत. संसद, न्यायपालिका आणि कार्य पालिका. ह्या शाखांकडे असलेल्या कामाची विभागणी केलेली आहे. कायदे करणे हे संसद आणि विधी मंडळाचे काम आहे. प्रशासकीय विभाग म्हणजे कार्य पालिका कायद्याचे राज्य प्रस्थापित आणि संचालित करते तर ह्या दोन्ही शाखांचा व्यवहार राज्यघटनेत दिलेल्या तत्वानुसार, मार्गदर्शनानुसार चालतो आहे की नाही हे बघण्याचे काम न्याय पालिकेचे आहे. 

न्यायपालिका लोकशाहीचे संरक्षण करते, जनतेच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करते, कायदे पाळले जातील ह्या कडे लक्ष ठेवते, तसेच व्यक्ति अथवा संस्था अथवा व्यवस्थेमध्ये काही विवाद निर्माण झाल्यास ते सोडवते. केंद्र सरकार व राज्य सरकारे अथवा दोन राज्यातील सरकारे हयात विवाद निर्माण झाल्यास त्याचा निवड करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. 

न्यायपालिका ही स्वतंत्र शाखा आहे. ह्यावर संसद अथवा प्रशासकीय विभाग वर्चस्व गाजवू शकत नाही अथवा हस्तक्षेपही करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालय हे भारतातील सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालय हे कोणत्याही न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करू शकते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा भारतातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक आहे.

हयाखेरीज उच्च न्यायालये, कनिष्ठ न्यायालये, जिल्हा न्यायालये, पंचायत न्यायालये अशी विविध ठिकाणी, विविध विषयात काम करणारी न्यायालये असतात. इतकी सर्व न्यायालये असताना देखील ब्रिटिश काळाप्रमाणे अजूनही न्यायालयाला भरपूर उन्हाळी सुट्ट्या असल्याने न्याय मिळायला दिरंगाई होते. 

न्याय देणाऱ्याने कोणत्याही मोहाने अथवा दबावाखाली येऊन निवाडा करू नये असा संकेत आहे. 

न्यायालयाच्या कामात सरकारने ढवळाढवळ करायची नसते. पण इंदिरा गांधी पंतप्रधान असताना असे वारंवार झाले. शेवटी तर देशावर आणीबाणी लादण्यात आली.

आपण आधी पाहिले की राज्यघटना प्रवाही आहे. जिवंत आहे कारण तिच्यात काळानुसार, बदलणाऱ्या परिस्थितीनुसार बदल करता येतात. अर्थातच तिच्यात बदल करण्याची प्रक्रिया देखील संविधानानुसार, सार्वमत घेऊन, बहुमताने करायची आहे. 

ह्याचेच प्रतिबिंब आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवडण्याच्या प्रक्रियेत पडलेले आढळते. सरन्यायाधीश पद हे एका अर्थी सर्वोच्च पद. त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात.

१९९३ पासून न्यायवृंद म्हणजेच कॉलेजियम ची संकल्पना कार्यरत झाली. हया पद्धतीत न्यायाधीशांची निवड न्यायाधीशच करतात. अशी पध्दत बहुतेक फक्त भारतातच असावी. ह्या निवड मंडळात सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश तसेच सर्वोच्च न्यायालयाचे इतर चार ज्येष्ठ न्यायाधीश असतात. हे निवड मंडळ कोणत्या न्यायाधीशांची सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयात नेमणूक करायची ह्याची यादी सरकारला देते. त्या नुसार सरकार नेमणूका करते. 

परंतु ह्या पद्धतीत काही दोष आढळल्याने केंद्र सरकारने २०१४ मध्ये संसदेत एक प्रस्ताव सादर केला. त्यात न्यायाधीशांच्या निवडीसाठी एक राष्ट्रीय आयोग असावा, ज्यात सर्वोच्च न्यायालयाचे तीन न्यायमूर्ती, केंद्रीय कायदामंत्री असावेत. त्या प्रस्तावामध्ये इतरही न्यायाधीशांची बदली, पदोन्नती संबंधी बदल होते. जरी संसदेच्या दोन्ही भवनात हा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी सर्वोच्च न्यायालयाने ह्याला मंजूरी दिली नाही. त्यामुळे अजूनही हा मुद्दा चर्चेत आहे.

 

चला.. संविधान साक्षर होउ या!! - भाग ७

चला.. संविधान साक्षर होउ या!! - भाग ७ 

भारतीय गणराज्याचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ ह्या दिवशी अस्तित्वात आले. संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी ह्या उद्देशाने २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संविधान दिवसाच्या निमित्ताने “चला, संविधान साक्षर होऊ या” ही लेख मालिका सादर करीत आहोत.

संविधानाची प्राथमिक ओळख व्हावी, त्या विषयी उत्सुकता वाटून वाचकांनी संविधानाचा अधिक अभ्यास करायला उद्युक्त व्हावे हाच ह्या मालिकेचा हेतू. तेव्हा Stay tuned! वाचत राहा - पुढचे काही दिवस, दररोज- अतिशय सोप्या शब्दात सामान्य भारतीय नागरिकाने लिहिलेली ही लेख मालिका!

-----------------------------------------------------

संविधानाने सर्व भारतीयांना अनेक गोष्टी दिल्या आहेत. त्या सर्व इथे सांगणे शक्य नाही. पण त्यातील प्रमुख गोष्टींविषयी आज आपण विचार करू या.

राज्यपद्धती, कायदा व्यवस्था, सर्व नागरिकांना समान मूलभूत अधिकार आणि जनतेकडे सार्वभौमत्व ह्या अतिशय महत्वाच्या गोष्टी संविधानाने दिल्या. 

इथे संविधानाने दिल्या असे आपण म्हणतो तेव्हा पुन्हा एकदा लक्षात घेण्याची गरज आहे की संविधान भारतीय जनतेच्या प्रतिनिधींनी भारताचा इतिहास आणि संस्कृती लक्षात घेऊन, भारताच्या आकांक्षांचा विचार करूनच तयार केलेले आहे. म्हणूनच संविधानाने दिले असे आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ भारतीय जनतेने भारताला दिल्या असा होतो. 

आपली राज्यपद्धती लोकशाही राज्यपद्धती आहे. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी राज्याचा कारभार करणार. जे चांगले काम करत असतील त्यांना पुन्हा निवडून देण्याची, जे काम करत नसतील त्यांना नाकारण्याची संधी आपल्याला दर पाच वर्षांनी मिळते. 

भारत एक विशाल देश आहे. त्यात अनेक राज्ये आहेत. राज्याचा कारभार राज्यातील लोकांनी विधानसभेवर निवडून दिलेले प्रतिनिधी बघतात तर देशाचा कारभार लोकांनीच निवडून लोकसभेत पाठवलेले प्रतिनिधी आणि विविध राज्यातील लोकप्रतिनिधींनी निवडून राज्यसभेसाठी पाठवलेले प्रतिनिधी करतात. राज्यात शासन करणारी ती राज्य सरकारे आणि केंद्रात शासन करणारे केंद्रीय सरकार. इतके तर आपल्याला माहितीच असते. 

बाबासाहेब आंबेडकरांनी १७ डिसेंबर १९४६ ला आपल्या भाषणात सांगितले होते की विविध जाती, धर्म, भाषा असे वैविध्य आमच्यात असले तरी आम्ही एक होऊ आणि एकच राहू. त्यांनी त्याच भाषणात एक अपेक्षा देखील व्यक्त केली होती की समर्थ आणि सशक्त केंद्रीय सरकार हवे. घटनेद्वारा राज्यांपेक्षा केंद्र सरकारकडे जास्त अधिकार दिलेले आहेत. काही गोष्टीत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत तर उर्वरित गोष्टीत निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. 

भारत संघराज्य आहे. राज्यांचा समूह आहे. मग केंद्र सत्ता आणि राज्यसत्ता ह्यांच्यातील अधिकारांचे वाटप हवे. ते अनुच्छेद २४५ ते २६१ मध्ये केलेले आहे. केवळ केंद्राचा अधिकार असणाऱ्या सूचीत ९९ विषयांचा समावेश आहे, संरक्षण, परराष्ट्र संबंध, बँका, चलन आणि केंद्राची कर्तव्ये कर रचना आणि करवाढ ही त्यातील ठळक नावे. 

केवळ राज्यसरकारच्या अधिकारातील ६१ विषयांमध्ये प्रामुख्याने समाज व्यवस्था, नागरी संरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक आरोग्य आणि सांडपाणी व्यवस्था, कृषी, वनसंपत्ती आणि मत्स्य व्यवसाय, शिक्षण, राज्याचे कर आणि त्यातील वाढ हे आहेत. 

केंद्र आणि राज्य सरकारांचा सामायिक अधिकार असलेल्या ५२ विषयांतील ठळक विषय आहेत गुन्हेगारी कायदा आणि प्रक्रिया, दिवाणी प्रक्रिया, विवाह, करार, आपत्ती, विश्वस्त संस्था, कामगार हित, सामाजिक हमी, आर्थिक आणि सामाजिक नियोजन. 

अगदी रोजच्या आयुष्यातले उदाहरण घ्यायचे तर आता आपल्या लक्षात येईल की पेट्रोलचे भाव प्रत्येक राज्यात वेगवेगळे का असतात!

राज्यात वेगवेगळ्या पक्षांची सत्ता असू शकते. केंद्रात देशभरात बहुमत मिळालेल्या पक्षाची सत्ता असते. पण ही दोन्ही सरकारे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून जेव्हा विकासकामांसाठी एकदिलाने निर्णय घेतात आणि राबवतात तेव्हाच देशाचा विकास होऊ शकतो. लोकांसाठी कल्याणकारी राज्य अस्तित्वात येऊ शकते. इथे पुन्हा एकदा बाबासाहेबांचे शब्द आठवतात की सर्व विविधता विसरून आम्ही एक होऊ. 

उद्याच्या भागात पाहूया कायदा व्यवस्था आणि मूलभूत अधिकारांविषयी. 


संदर्भ - 

१. भारतीय राज्यघटना - एक दृष्टिक्षेप - संपादक - श्री. अरुण करमरकर 

२.https://www.india.gov.in/my-government/constitution-india

चला.. संविधान साक्षर होउ या!! - भाग ६

 चला.. संविधान साक्षर होउ या!! - भाग ६ . 

भारतीय गणराज्याचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ ह्या दिवशी अस्तित्वात आले. संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी ह्या उद्देशाने २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संविधान दिवसाच्या निमित्ताने “चला, संविधान साक्षर होऊ या” ही लेख मालिका सादर करीत आहोत.

संविधानाची प्राथमिक ओळख व्हावी, त्या विषयी उत्सुकता वाटून वाचकांनी संविधानाचा अधिक अभ्यास करायला उद्युक्त व्हावे हाच ह्या मालिकेचा हेतू. तेव्हा Stay tuned! वाचत राहा - पुढचे काही दिवस, दररोज- अतिशय सोप्या शब्दात सामान्य भारतीय नागरिकाने लिहिलेली ही लेख मालिका!

—--------------------------------------------

आज आपण पाहणार आहोत की संविधानाची प्रत दिसते कशी? 

संविधानाची मूळ प्रत संसद भवनाच्या ग्रंथालयात विशेष रीतीने जतन करुन ठेवलेली आहे. संविधान संपूर्णपणे हाताने लिहिलेले आहे. जगातील सर्वात मोठे असे हे हस्तलिखित संविधान आहे. 

इंग्रजी आणि हिंदीत दोन वेगवेगळ्या सुलेखनकारांनी संविधान लिहिले आहे. संविधानाची मूळ इंग्रजी प्रत प्रेमबिहारी नारायण रायझादा यांच्या हस्ताक्षरात आहे. इटालिक, किंचित तिरक्या अक्षरात सुलेखनाने ही प्रत त्यांनी लिहिली आहे. या प्रतीचे प्रकाशन देहराडून मध्ये करण्यात आले आणि फोटोलिथोग्राफ सर्वे ऑफ इंडिया यांच्याकडून करण्यात आला होता. हिन्दी प्रतीचे सुलेखन वसंत कृष्ण वैद्य ह्यांनी केले आहे. 

संविधानाच्या मूळ प्रतीवर आपल्याला सुंदर चित्रे दिसतात. ही चित्रे प्रख्यात चित्रकार नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी काढलेली आहेत. हे तेच नंदलाल बोस ज्यांनी पद्मश्री आणि भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कार पदकांचे डिझाईन केले आहे. नंदलाल बोस ह्यांचे शिष्य जबलपूरचे राम मनोहर सिन्हा ह्यांनी प्रस्तावनेचे पान अतिशय सुंदर चित्रित केले आहे. 

संविधानाच्या पानांवर कोणती चित्रे आहेत? भारताच्या प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि इतिहास दाखवणाऱ्या प्रसंगांची रेखाटने घटनेच्या पानावर केलेली आहेत. कोण कोणती चित्रे आहेत त्याची सूची देखील आपल्याला शेवटी दिलेली आढळते. 


त्याच्यात मोहंजोदारो आहे, वैदिक यज्ञ पद्धती आहे. राम लक्ष्मण सीता आहेत. अर्जुनाला भगवदगीता सांगणारे श्रीकृष्ण आहेत. भगीरथाच्या तपश्चर्येतून आलेली गंगा नदी आहे. सम्राट चंद्रगुप्त, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंसिंग, राजा विक्रमादित्य इत्यादी शूरवीर आहेत. स्वातंत्र्यसैनिकांपैकी झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे. सुभाषचंद्र बोस आहेत त्यांची आझाद हिंद सेना आहे. महात्मा गांधी आहेत. शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्ध आहेत. भगवान महावीर आहेत. 























तसेच विविधतेने नटलेल्या आणि निसर्गरम्य अशा भारत भूमीतील अनेक सुंदर दृश्ये संविधानाच्या पृष्ठावर साकारलेली आहेत. वेगवेगळ्या कालखंडातील भारतीय संस्कृतीची प्रतीकेच आपल्याला इथे दिसतात. एकूण अत्यंत वैभवशाली असे संविधानाचे दृश्य रूप आहे. गौरवशाली इतिहास, क्रियाशील वर्तमान आणि भारताचे उज्वल भवितव्य यांचेच जणू चित्रण भारतीय राज्यघटनेचा दृश्य रूप आपल्याला दाखवत आहे. 

संदर्भ - संविधानाची प्रत


चला.. संविधान साक्षर होउ या!! - भाग ५

 चला.. संविधान साक्षर होउ या!! - भाग ५ . 

भारतीय गणराज्याचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ ह्या दिवशी अस्तित्वात आले. संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी ह्या उद्देशाने २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संविधान दिवसाच्या निमित्ताने “चला, संविधान साक्षर होऊ या” ही लेख मालिका सादर करीत आहोत.

संविधानाची प्राथमिक ओळख व्हावी, त्या विषयी उत्सुकता वाटून वाचकांनी संविधानाचा अधिक अभ्यास करायला उद्युक्त व्हावे हाच ह्या मालिकेचा हेतू. तेव्हा Stay tuned! वाचत राहा - पुढचे काही दिवस, दररोज- अतिशय सोप्या शब्दात सामान्य भारतीय नागरिकाने लिहिलेली ही लेख मालिका!

—------------------------------

आजच्या भागात आपण पाहणार आहोत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेविषयी. 


काय म्हटले आहे उद्देशिकेत?
"आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय: विचार,अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता: निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून; आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत." 

( ह्यातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द मूळ उद्देशिकेत नव्हते. ते १९७६ मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना घातले गेले. )

अप्रतिम अशी ही उद्देशिका आपल्याला घटनेतील भाव भावना, उद्दिष्ट्ये, आकांक्षा, हेतू अवघ्या काही ओळीत सांगते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर एक नवा समाज घडवायचा होता. नव्या युगात प्रवेश करत असताना आपला इतिहास आणि संस्कृती विसरायची नव्हती. हे दोन्हीही लीलया साध्य करणारी अशी ही प्रास्ताविका. आपली राज्यघटना, संविधान हे देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाईल, राष्ट्राची अस्मिता जागृत होईल असे आहे ह्याची चुणूक दाखवणारी ही उद्देशिका. 

 पाठ्यपुस्तकात उद्देशिका दिलेली असते. पण फार लक्ष देऊन वाचली मात्र जात नाही.खरे तर ही उद्देशिका वारंवार वाचली की दरवेळी त्यातून अधिकाधिक अर्थ छटा उलगडत जातात.

काय म्हटले आहे ह्यात? 'आम्ही भारताचे लोक ' ! स्वतंत्र झालेल्या भारतातील नागरिकांनी हे संविधान तयार करून स्वतः प्रत म्हणजे देशाला अर्पण केलेले आहे. कोणीतरी लादलेले हे नियम नाहीत तर आपणच विचारपूर्वक तयार करून अंगिकारलेले हे नियम आहेत. इथे लोकशाहीचा जागर झाला आहे.

कसे अर्पण करीत आहेत? तर बंधुता प्रवर्धित करण्याचा निर्धार करून! इथे आश्वासन, प्रयत्न असे शब्द न वापरता निर्धार म्हटले आहे. हे करायचेच आहे असा निर्धार व्यक्त होतो आहे. 

बंधुता..आपण प्रतिज्ञेत देखील म्हणतो, सारे भारतीय माझे बांधव आहेत.' एकमेकांशी सौहार्दाने, सहानुभूतीने वागणे, एकमेकांच्या मदतीला नेहमी तयार असणे, एकमेकांच्या सुख-दुःखात सामील असणे, एकमेकांचे कल्याण व्हावे अशी इच्छा व प्रयत्न करणे म्हणजे बंधुता. बंधुता भारतीय संस्कृतीला नवीन नव्हतीच. अगदी प्राचीन काळापासून विश्वबंधुत्व हे मूल्य भारतात जोपासले जात होते. आता त्या मुल्याला उद्देशिकेत देखील महत्वाचे स्थान मिळाले आहे. 

आम्ही सगळे एका साच्यात घडवले गेलेले निर्जीव पुतळे नाही. प्रत्येक जण वेगळा आहे. भारतीय समाजात देखील भाषा, भूषा आणि भोजनात विविधता आहे. तरीही प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता अखंड राखणारी अशी ही बंधुता आहे. आमच्यातील विविधता ही आमची कमजोरी नाही, तर बलस्थान आहे आणि त्या विविधतेमुळे आमच्या एकतेला बाधा येणार नाही असे भारतीय जनता निर्धारपूर्वक सांगते आहे. 

असे केव्हा होऊ शकेल? तर जेव्हा प्रत्येक नागरिकाला न्याय मिळेल, स्वातंत्र्य असेल आणि समानता असेल तेव्हाच अशी बंधुता प्रस्थापित होऊ शकेल.

कोणता न्याय? तर सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय. स्वातंत्र्य कशाकशाचे पाहिजे? परकीय सत्तेपासून तर आपण मुक्त झालो, स्वतंत्र झालो. पण आता आपल्याच देशात आपल्याला स्वातंत्र्य हवे आहे ते विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. समानता कोणती असेल तर दर्जाची आणि संधीची समानता असेल.

आपणच तयार केलेली राज्यघटना आणि तिची ही उद्देशिका आहे. व्यक्तिगत, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात आपण कसे वागायचे आहे ह्याचा मार्ग उजळणारा दीप असलेली ही उद्देशिका आहे.त्यामुळे उद्देशिकेतील सर्व उद्देश सत्यात आणायचे असतील तर आपल्यालाही या मूल्यांच्या नुसारच आपले वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय वर्तन ठेवायला लागेल. अन्यथा ही उद्देशिका आणि हे संविधान हे केवळ कागदावरच राहील.


संदर्भ 

https://legislative.gov.in/constitution-of-india/preamble-to-the-constitution-of-india


https://www.evivek.com



चला.. संविधान साक्षर होउ या!! - भाग ४

 चला.. संविधान साक्षर होउ या!! - भाग ४



तर आज आपण पाहणार आहोत की घटना समितीचे सदस्य कोण कोण होते? 

मागच्या भागात आपण पाहिले की ९ डिसेंबर १९४६ ला डॉ. राजेंद्रप्रसाद ह्यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन झाली. समितीचे काम सुरु झाले. ह्यात ३८९ सदस्य होते. फाळणीनंतर ही संख्या झाली २९२. 

हे सदस्य कोण होते?कसे निवडले गेले होते?पहिल्या घटना समितीतील एकूण ३८९ सदस्यांपैकी २९२ सदस्य हे प्रादेशिक विधानसभांनी निवडून दिलेले प्रतिनिधी होते. 93 सदस्य हे वेगवेगळ्या संस्थानांचे प्रतिनिधी होते आणि दिल्ली, अजमेर, मेवाड, कूर्ग आणि ब्रिटिश बलुचिस्तान या चार कमिशनर प्रदेशांचे प्रत्येकी एक याप्रमाणे चार सदस्य होते. या 292 सदस्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे 208 सदस्य तर मुस्लिम लीगचे 73 सदस्य निवडून आले होते. पण नंतर परिस्थिती बदलली. मुस्लिम लीगने घटना समितीत सामील होण्यास नकार दिला आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र घटना समिती असावी अशी मागणी केली. राजकीय दृष्ट्या अनेक घडामोडी घडल्या, हिंदू मुस्लिम दंगे झाले आणि मग 18 जुलै 1947 ला विभाजनाचा निर्णय करण्यात आला. जो भाग पाकिस्तानात समाविष्ट होणार होता त्या क्षेत्रातल्या सदस्यांनी घटना समितीच्या राजीनामा दिला.

घटना समितीच्या सदस्यांमध्ये विविध धर्म, जाती, प्रांत, लिंग यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.

घटना समितीमध्ये सामील असलेल्या 15 महिला सदस्या होत्या अम्मू स्वामीनाथन, दाक्षायणी वेलायुधन, बेगम ऐयाज रसूल, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन जीवराज मेहता, कमला चौधरी, लीला रॉय, मालती चौधरी, पूर्णिमा बॅनर्जी, राजकुमारी अमृत कौर, रेणुका रॉय, सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी, विजयालक्ष्मी पंडित आणि अँनी मस्करेन्हास. 

विविध उपसमित्यांच्या अध्यक्षपदी होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, कन्हैयालाल मुनशी, अल्लादी कृष्णा स्वामी अय्यर, आचार्य कृपलानी, एच.सी. मुखर्जी, गोपीनाथ बर्डोलोई, गणेश मावळणकर, पट्टाभि सितारामय्या, ए. व्ही. ठक्कर, मोतुरी सत्यनारायण. 

घटना सल्लागार होते सर बी.एन.राव, एस.एन.मुखर्जी, अल्लादि कृष्णस्वामी अय्यर. घटना समितीत सहभागी असलेल्या सर्वांची नावे इथे देणे तर शक्य नाही. आंतरजाला वर ती उपलब्ध आहेत. 

सरदार वल्लभभाई पटेल, चक्रवर्ती राजगोपालाचारी, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, एन. व्हि. गाडगीळ, मुंनुस्वामी पिल्ले, मोहम्मद शरीफ, फ्रँक अँथनी, गोपाल स्वामी अय्यंगार के एन मुंशी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, बी.एन. मित्तल, डी.पी. खैतान इत्यादी सर्व जात, धर्म, पंथाची मंडळी घटना समितीत काम करीत होती. 

भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीवर संविधान समितीच्या एकूण २८४ सदस्यांनी सह्या केलेल्या आहेत.



ह्या समितीत कार्यरत असलेले डॉक्टर राजेंद्रप्रसाद पुढे स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती झाले, जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले, सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री झाले. घटना मसूदा समितीत किंवा लेखा समितीत सात जण होते. त्या समितीचे अध्यक्ष असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री झाले. 

जरी डिसेंबर १९४६ मध्ये काम सुरू झाले असले तरी स्वातंत्र्य मिळाल्या वर संविधान तयार करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली. घटना समितीतील सदस्यानी अभ्यासपूर्वक, परस्पर विचारविनिमय, चर्चा करून, अनेकदा एकेका प्रस्तावावर सांगोपांग विचार करून मग घटना तयार केली आहे. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर नवीन भारत हा व्यक्तिस्वातंत्र्य, समता, सामाजिक व आर्थिक न्याय आणि जबाबदार शासन ह्या तत्त्वांवर उभारला जायचा होता. संविधान उत्तम, अचूक, सर्वसमावेशक, सुस्पष्ट आणि लवचिक असावे ह्या साठी घटना समितीतील सदस्य अविश्रांत परिश्रम करीत होते. त्याचाच परिणाम म्हणून तयार झाले भारतीय संविधान. भारतीय नागरिक त्यांच्याविषयी नेहमीच कृतज्ञ राहतील. 

उद्याच्या भागात आपण वाचणार आहोत संविधानाच्या उद्देशिकेविषयी. 


संदर्भ - 

स .. संविधानाचा - लेखक रमेश पतंगे 

https://vishwakosh.marathi.gov.in/30091/

----------------------

भारतीय गणराज्याचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ ह्या दिवशी अस्तित्वात आले.संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी ह्या उद्देशाने २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संविधान दिवसाच्या निमित्ताने “चला, संविधान साक्षर होऊ या” ही लेख मालिका सादर करीत आहोत.

संविधानाची प्राथमिक ओळख व्हावी, त्या विषयी उत्सुकता वाटून वाचकांनी संविधानाचा अधिक अभ्यास करायला उद्युक्त व्हावे हाच ह्या मालिकेचा हेतू. तेव्हा Stay tuned! वाचत राहा - पुढचे काही दिवस, दररोज- अतिशय सोप्या शब्दात सामान्य भारतीय नागरिकाने लिहिलेली ही लेख मालिका!

------------------------

-वृंदा टिळक


चला.. संविधान साक्षर होउ या!! - भाग ३

 चला.. संविधान साक्षर होउ या!! - भाग ३

भारतीय गणराज्याचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ ह्या दिवशी अस्तित्वात आले.संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी ह्या उद्देशाने २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संविधान दिवसाच्या निमित्ताने “चला, संविधान साक्षर होऊ या” ही लेख मालिका सादर करीत आहोत.

संविधानाची प्राथमिक ओळख व्हावी, त्या विषयी उत्सुकता वाटून वाचकांनी संविधानाचा अधिक अभ्यास करायला उद्युक्त व्हावे हाच ह्या मालिकेचा हेतू. तेव्हा Stay tuned! वाचत राहा - पुढचे काही दिवस, दररोज- अतिशय सोप्या शब्दात सामान्य भारतीय नागरिकाने लिहिलेली ही लेख मालिका!

—--------------------------------------------------- 

संविधानाची निर्मिती कशी झाली?


भारतीय संविधान हे जगातील कोणत्याही स्वतंत्र राष्ट्राचे सर्वाधिक विस्तृत संविधान आहे. 

किती मोठे आहे? तर त्यात १,४६,३८५ शब्द आहेत. 

राज्यघटना तयार व्हायला किती वेळ लागला?

ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला थोडे भूतकाळात जावे लागेल. भारत ब्रिटिश अंमलाखाली होता तेव्हाची ही गोष्ट.

१८५७च्या स्वातंत्र्यसमराने संपूर्ण देशभरातील वेगवेगळ्या राज्यांतील जनतेत आपण सगळे एक आहोत ही भावना जागृत केली. अन्यायी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढून आपल्याला देश स्वतंत्र करायचा आहे असा विचार लोकांच्या मनात जागवला.

जोपर्यंत ब्रिटिश सत्ता जगभरात सामर्थ्यशाली होती तोपर्यंत भारताविषयी विचार करण्याची त्यांना फारशी गरज वाटली नव्हती. पण दुसऱ्या महायुध्दाच्या वेळे पासून ब्रिटनची परिस्थिती बदलू लागली. भारतीय जनता देखील जागृत होऊ लागली होती. १९४५ मध्ये ब्रिटनमध्ये मजूरपक्षाचे सरकार निवडून आले आणि भारतविषयक हालचालींना वेग आला. भारत स्वतंत्र होणार अशी चिन्हे स्पष्ट झाली.

 ९ डिसेंबर १९४६ ला सच्चीदानंद सिंह हे हंगामी अध्यक्ष असलेली घटना समिती तयार झाली. त्या समितीची पहिली बैठक नवी दिल्ली येथील संविधान गृहात झाली. आता ह्याला सेंट्रल हॉल म्हणतात.

११ डिसेम्बरला डॉ. राजेंद्रप्रसाद ज्या समितीचे कायम अध्यक्ष आहेत अशा घटना समितीचे कामकाज सुरु झाले. ह्यात ३८९ सदस्य होते. फाळणीनंतर ही संख्या कमी होऊन २९२ झाली. 

विविध विषयांवर काम आणि अभ्यास करण्यासाठी १९ उपसमित्या कार्यरत होत्या. संघ अधिकार, संघ सरकार घटना, राज्य सरकार घटना, अल्पसंख्याक व मूलभूत अधिकारविषयक समिती इ. उपसमित्या घटनासमितीचे काम करत होत्या. ह्यातील सर्वात महत्वाची होती ती मसुदा तयार करणारी समिती. तिचे अध्यक्ष होते डॉ. आंबेडकर. मसुदा समितीचे सात सदस्य होते. घटनासमितीने एकूण २ वर्षे ११ महिने १८ दिवस काम केले. ११ सत्रांमध्ये एकूण १६५ दिवस एकत्रित काम चालले. घटनेच्या मसुद्यावर सर्वांगीण चर्चा करण्यात आली. 

कच्च्या मसुद्यात २४३ कलमे आणि १२ सूची होत्या. त्यावर बराच विचार विमर्श होऊन मसुदा समितीने घटना समितीसमोर सादर केलेल्या पहिल्या मसुद्यात ३९५ कलमे आणि ८ सूची होत्या. 

घटना समितीतील सदस्यांनी गांभीर्यपूर्वक विचार करून त्यात काही दुरुस्त्या सुचवल्या. त्यांची एकूण संख्या होती. ७६३५. पण त्यातल्या काही सूचना परत परत आल्या होत्या. त्यामुळे एकूण २४७३ सूचनांवर विचार झाला. घटना समिती सदस्यांनी चर्चा केली. 

त्यानंतर घटनेला अंतिम स्वरूप दिले गेले. तेव्हा घटनेत २२ विभाग, ३६५ कलमे आणि १२ परिशिष्टे निश्चित केली गेली. 

संविधान २६ नोव्हेंबर १९४९ ह्या दिवशी अस्तित्वात आले. २६ जानेवारी १९५० पासून घटना अमलात आली आणि भारतीय प्रजासत्ताक (गणराज्य) जन्मास आले.

भारताच्या संविधानातील अनेक तरतुदी वेगवेगळ्या देशांच्या संविधानातून घेतल्या आहेत. त्यांना भारतीय संदर्भात आणि घटनेत कसे उपयोगात आणता येईल ह्याचा विचार करूनच त्या घेतल्या गेल्या. असे म्हटले जाते की मार्गदर्शक तत्वे आयर्लंडच्या घटनेतून घेऊन भारतीय घटनेत समाविष्ट केली गेली. स्वातंत्र्य,समता, बंधुता हे फ्रांस कडून, सर्वोच्च न्यायालयाची यंत्रणा जपानकडून, पंचवार्षिक योजना रशियाकडून घेतली. ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, जर्मनी इत्यादि देशांच्या राज्यघटनेतून देखील काही मुद्दे घेतले गेले.

पण डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी मात्र आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे आपण भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानातून घेतली आहेत असे स्पष्टपणे म्हटले आहे. किंबहुना प्राचीन भारतीय संस्कृतीची, अगदी वैदिक काळापासूनची वैशिष्ट्ये आपल्याला संविधानात दिसून येतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता, विचार आणि अभिव्यक्ती यांचा आदर, श्रद्धा, विश्वास, उपासना यांचे स्वातंत्र्य यांना अधिकृतरित्या स्वीकारले गेले. राष्ट्र कधीच एक होऊ नये ह्या कुटील हेतूने परकीय आक्रमकांनी समाजात रुजवलेल्या भेदभावांना तिलांजली दिली गेली. राष्ट्राची एकता आणि एकात्मता पुन्हा एकदा प्रस्थापित केले गेली.

आपण पुढच्या भागात पाहणार आहोत, घटना समितीचे सदस्य कोण कोण होते?


संदर्भ 

https://vishwakosh.marathi.gov.in/30091/

भारतीय राज्यघटना - एक दृष्टिक्षेप - संपादक - श्री. अरुण करमरकर



महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...