Friday, 18 November 2022

प्रवास असावा ऐसा'


प्रवास असावा ऐसा'
प्रवास आपल्या नकळत आपल्याला बदलत असतो. आपल्याला ज्यांची जाणीव होईल वा कदाचित होणारही नाही..असे सूक्ष्म बदल आपल्यात होत जातात. आपण पाहिलेल्या जागा, अनुभवलेले सुंदर क्षण, आपल्यावर ओढवलेले प्रसंग हे सगळे आपल्या मनाचा एक भाग बनून जातात आणि आपल्याला सुजाण, समृद्ध करतात. हे ज्याला कळते तो प्रवासाचे गंतव्य विचारपूर्वक निवडतो.
नुकताच आपण मोठ्या उल्हासात आणि जल्लोषात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. तो उत्साह अजून ताजा असताना, आपणां सर्वांना विचारावेसे वाटते आहे, स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचे अर्घ्य दिले अशा क्रांतिकारकांशी किंवा स्वातंत्र्यसंग्रामातील घटनांशी निगडित स्थाने आपण पाहिली आहेत का? आपापल्या गावात तेव्हा काय घटना घडल्या होत्या? कोणत्या ठिकाणी घडल्या होत्या? कोणते क्रांतिकारक राहत होते? त्यांचे कार्य काय? ह्याविषयी आपण जाणून घेतले आहे का?
अगदी उदाहरणच द्यायचे तर लोकमान्य टिळकांचे घेऊ या. त्यांचे जन्मस्थान असलेले चिखलगाव आपण पाहिले आहेत? त्यांचे वास्तव्य असलेला पुण्याचा केसरी वाडा आपण पाहिला आहेत? त्यांचे अंत्य संस्कार झाले ते गिरगाव चौपाटीवरील स्थान, त्यांचा तिथे असलेला पुतळा हे पाहिले आहे?
चाफेकर बंधूंचे स्मारक, चाफेकर बंधूंचे चिंचवड मधील घर, ‘गोंद्या आला रे आला’ ची आरोळी जिथे ठोकली गेली आणि रँडचा वध झाला ती गणेशखिंड?अनंत कान्हेरेंना जिथे फाशी दिली गेली ते ठाणे जेल? हे सगळे आपण पाहिले आहे का? ह्यातील काय काय पाहिले आहे? आपण पाहिलेल्या स्थानाविषयी इतरांना सांगितले आहे का?
अजून जुन्या काळात जायचे तर शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेले शिवनेरी, हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेले किल्ले रायगड, शिवाजी महाराजांचे इतर गडकिल्ले, पेशव्यांचा शनिवारवाडा. महाराष्ट्राबाहेर गेलो तर राणी लक्ष्मीबाईंची झाशी, जालियनवाला बाग हत्याकांड घडले ते अमृतसर, १८५७ च्या उठावातले दिल्ली, कानपूर, लखनौ, महाराणा प्रतापांचे चितोडगड हे सर्व किंवा ह्यातले काही पाहिले आहे?
स्वतंत्र भारताने युद्धांचा सामना केला ती ठिकाणे, शत्रूंशी मुकाबला केला ती रणक्षेत्रे, तेथील लष्करी संग्रहालये… हे सगळे आपण किती जागरूकतेने पाहतो? त्याविषयी कितीजणांना आवर्जून सांगतो? प्रत्येकाने हा विचार करायची आवश्यकता आहे.
आपल्या प्रवासाला, रोजच्या आयुष्यातून बदल, मनोरंजन हा हेतू असतोच पण त्या सोबत किंवा त्या शिवाय आणखी काही उदात्त हेतू देखील असावा असा आपण कधी विचार करणार की नाही ?
अशा सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांचा विचार करत तुम्ही थांबला असाल किंवा इतके प्रश्न वाचून कंटाळला देखील असाल तर तुम्ही इथेच हा लेख वाचायचे थांबवले असेल. पण तसे केलेत तर ह्या पुढे मी ज्या ठिकाणाविषयी लिहिणार आहे ते वर्णन वाचायला मुकाल. तेव्हा धीर धरा..वाचत राहा!!!
वर दिलेली यादी अगदीच उदाहरणादाखल होती. त्यामुळे त्यात अनेक व्यक्तींचा, स्थळांचा उल्लेख नव्हता. पण तरीही त्यात एक ठळक, अत्यंत महत्वाचे नाव नाही म्हणून अनेकांनी आश्चर्याने भुवया उंचावल्या असतील. तर थांबा. आपण तिथेच जातो आहोत!
भृगु ऋषींच्या वास्तव्याने पावन झालेले आणि त्यांचेच नाव धरण करणारे भगूर गांव पुनः एकदा विख्यात झाले ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांचा जन्म भगूर गावात झाल्याने.
हे कवन तर सर्वाना माहिती आहेच.
“भाग्यवान हा भगुर गाव जो नाशिक शेजारी
जिथे जन्मले सावरकर कुळी स्वातंत्र्य केसरी ||”
(कवी - अज्ञात )
तर आज आपण जाऊ या भगूरच्या सावरकरवाड्यात.
नाशिक जवळील दारणा नदीच्या काठी भगूर गाव वसलेलेआहे. नाशिक शहरापासून १७-१८ कि.मी. अंतरावर असलेल्या ह्या गावी जाताना आपल्याला देवळाली लष्करी भागातील स्वच्छ आणि सुंदर परिसर ओलांडून जावे लागते. कमीत कमीत शंभर वयोमान असलेले भव्य वृक्ष ह्या मार्गात आपली सोबत करतात.
महान स्वातंत्र्यसेनानी, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, द्रष्टे समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांचा जन्म २७ मे १८८३ ह्या दिवशी भगूर येथे त्यांच्या वडिलोपार्जित घरात झाला. सावरकर वाडा म्हणून ही वास्तू ओळखली जाते. आपला बालपणीचा काळ सावरकर बंधूनी ह्याच वास्तूत व्यतीत केला.
बाहेरून बघताना ही वास्तू दोन मजली असल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्षात आत तीन मजले आहेत. घरापासून नदीपर्यंत जाणारा एक भूमिगत गुप्त मार्गदेखील आहे.
घरात धान्य ठेवण्यासाठी भिंती बांधून साठवणीची जागा तयार केली आहे. खालच्या मजल्यावर तिला एक लहान तोंड केलेले आहे. वरून पाहिल्यास ते लिफ्टच्या शाफ्टसारखे दिसेल. जेव्हा जेव्हा धान्य आवश्यक असेल तेव्हा खालच्या मजल्यावरील तोंडातून धान्य घ्यायचे!
हे झाले वास्तूचे वर्णन. पण नुसत्या दगड, विटा, भिंती ह्यांनी बनलेल्या वास्तूचे वर्णन करून भागणार नाही. कदाचित सावरकर बंधूंच्या नंतर अनेकदा घराची मालकी बदलली असेल. अनेकदा घरात रचनात्मक बदल झाले असतील. पण आपण सगळे तिथे जातो ते त्या वास्तूचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने आपल्या मनात असंख्य आठवणी जाग्या व्हाव्यात, आपण काहीतरी अभ्यास करावा, स्फूर्ती घ्यावी, प्रेरणा मिळावी म्हणून.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वयाच्या १४/१५ व्या वर्षी भगूरमधील ह्याच घरातल्या देवघरात सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली. ज्या मूर्तीच्या समोर त्यांनी शपथ घेतली होती, ती देवीची मूर्ती अतिशय सुंदर आहे. ती पितळ किंवा पंचधातूची बनवलेली असावी असे वाटते. देवीच्या हातात तलवार, कमळ, शंख, दिवा आणि इतर आयुधे आहेत.
सध्या ती मूर्ती भगूरच्या खंडोबा मंदिरामध्ये ठेवली गेली. सावरकर वाड्यापासून तसे चालत जाण्याच्या अंतरावर आहे हे मंदिर. ते देखील अवश्य पाहायला हवे.
सावरकरांनी देवीसमोर घेतलेली प्रतिज्ञा अशी होती," महिषासुर मर्दिनी, मला आशीर्वाद दे. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारितां मारितां मरेतो झुंजेन. चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवाजीसारखा माझ्या मातृभूमीला स्वराज्याचा राज्याभिषेक करवीन." कुमारवयात घेतलेली प्रतिज्ञा सार्थ करत मातृभूमीच्या स्वराज्यासाठी व सुराज्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर अखेरपर्यंत झटले.
तिन्ही सावरकर बंधूंनी जिथे आपले प्राथमिक शिक्षण घेतले ती शाळा आपण भगूर गावामध्ये पाहू शकतो.
सावरकर वाडा पाहणे, तेथील स्वयंसेवक मार्गदर्शकांकडून सर्व माहिती ऐकणे हा एक जिवंत अनुभव असतोच. शिवाय आपण सावरकरांचे साहित्य तसेच त्यांच्यावर लिहिले गेलेले इतर साहित्य व सीडीज सावरकर वाड्यात खरेदी करू शकतो. सावरकरांचा अंदमान कारागृहातील कैदी क्रमांक व धोकादायक कैदी अशी वर्गवारी असलेला बिल्ला आपण पाहू शकतो. त्याची प्रतिकृती विकत घेऊ शकतो.
आपल्या राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या, भारताचा अभिमान असणाऱ्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी अशी अनेक ठिकाणे आहेत. त्यापैकी दोन ठिकाणे म्हणजे भगूर येथील सावरकरांचे जन्मस्थान आणि सावरकर ज्या कोठडी मध्ये होते ती अंदमानमधील कोठडी.
हे का पाहायचे? तर सावरकरांनी ते वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असोत, आयुष्यातील कोणत्याही स्थितीत असोत, कोणत्याही ठिकाणी असोत, निरंतर भारताचाच विचार केला. भारताला स्वातंत्र्य कसे मिळेल हा विचार आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व काम केले. अंदमान कारागृहातून सुटून आल्यावर, समाज प्रबोधनाचे काम हाती घेतले. आयुष्याचा होम केला. हालअपेष्टा सोसल्या. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर
"की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने
लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने
जे दिव्यदाहक म्हणोनी असावयाचे
बुद्ध्याची वाण धरले करी हे सतीचे'
इतके ज्वलंत काही करणे आपल्याला शक्य नसेलही. पण आपल्या शक्तीनुसार काहीतरी तर नक्कीच करता येईल ना? ही स्थाने पाहून आपल्यालाही आयुष्यात काहीतरी समाजाच्या हिताचे करता यावे अशी प्रेरणा मिळेल म्हणून ही ठिकाणे पाहायची.
ह्या दोनपैकी पहिल्या स्थळाचे वर्णन आपण वाचलेतच. दुसऱ्या ठिकाणी मला अजून जायचे आहे. जाऊन आल्यावर आपल्याला वर्णन पाठवेनच. पण तोपर्यंत … सामान बांधायला घ्या, प्रवासाला निघा आणि भारतीय स्वातंत्र्यसमराशी संबंधित कोणती स्थळे आपण पाहिलीत हे कळवायला विसरू नका!
-वृंदा टिळक.
'महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर - स्मरणिका

No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...