Saturday, 11 December 2021

कामिनी

 

माहेरघरी दिन का राजा उर्फ कामिनीचे मोठे झाड. 12 - 15 फूट उंच ..त्याला साजेसा विस्तार. फुलते तेव्हा इतके फुलते की पांढरे होऊन जाते. पानांच्या हिरवाईला पार झाकून टाकते.
माझ्याकडेही आहे कुंडीत. चार वर्षे वयाची कामिनी.
आहे लाडकीच माझी, रूप गंध तिचा मनभावन. शिवाय माहेर घरून मिळालेले रोप हेही खास कारण..
काल फुलली ..इतकी की फांदी फांदीवर गुच्छ लगडले
आज फोटो काढू जाता, तिथे फारसे नव्हते उरले
त्याचा हा फोटो आणि पुढची कविता..
_---------------------
कालचा दिवस उरला नाही, मन का खंती करावे
मावळली फुले म्हणुनी कशास आता हिरमुसावे
गंध होई उणा, गळे पाकळी, कोषही दिसे उघडा,
कोमेजलेल्या फुलांचा पडला धरणीवरती सडा
फुलले होते कधी काळी, बहरले होते जीवन
कोमेजणेही फुलांचे दाखवते जीवनाचा दर्पण
क्षण क्षण कण कण अनित्य तरीही भासे निरंतर
हे ही कृतार्थ, ते ही सुंदर, आयुष्याचे खुलते अंबर
- वृंदा टिळक.
No photo description available.






Sunday, 28 November 2021

शिवशाहीर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे- मानवंदना

 

आज म्हणजे दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ ला ठाण्यातील नागरिकांच्या वतीने स्व. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे ह्यांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने मी जाणार हे निश्चित झाले होते. पण काही अपरिहार्य कारणामुळे मला कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही.
बाबासाहेबांविषयीच्या भावना शब्दांत मांडता येणे अवघड आहे. ह्या आधीही लिहिले आहे मी त्यांच्याविषयी. आजही लिहिते आहे आणि तरी कितीतरी उरलेच आहे.
त्यांचा प्रत्येक श्वास
घेऊन एकच स्वप्न खास
करुनी उदंड अभ्यास
शिवध्यास शिवध्यास
गुंजली ओजस्वी वाणी
करुनी शिवभक्तीची पेरणी
तळपली त्यांची लेखणी
फक्त शिवरायांचे चरणी
कथा कादंबरी ललित लेखन
शिवरायांचे चरित्र लेखन
शिवमहिमा करिता वर्णन
उमटले शिवभक्तीचे गान
एकमेकाद्वितीय जाणता राजा
गौरवले शिवाजी महाराजा
वंदिले हिंदवी स्वराज्या
श्रद्धाभक्तीने नाट्य होई सादर
राज दरबारी मिळावा मान?
लाभावे पुरस्कार सन्मान?
संमेलन अध्यक्षपदाचा मान?
कशाचीच नव्हती त्यांना तहान.
नव्हती कोणतीच अपेक्षा
करा स्तुती, निंदा वा उपेक्षा
मनाचा तोल ढळू न देता
घ्यावी स्थितप्रज्ञत्वाची दीक्षा
ते बोलले नेहमीच खरे
नित्य वागले साजिरे
अपुल्या योगे कोण्या मनी
पडू न दिले कधी चरे
भू मंडळासी पडले
स्वप्न एक शुभंकर
शतायुषी भव वदते झाले
सारे चराचर
काय करावे गौरव गान
बाबासाहेबांचे वर्णन
अद्वितीय समाजभान
समरसतेचे घडे दर्शन
शिवशाहीर पद्मविभूषण
साहित्यिक महाराष्ट्र भूषण
स्वातंत्र्यसमरी तन मन धन
अर्पूनी केले राष्ट्राचे पूजन.
बाबासाहेबांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाविषयी आपण सगळे जाणतो. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम त्यात भर घालून त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिली होती. त्यांच्या लेखन व व्याख्यानातून मिळालेल्या धनातील काही भाग त्यांनी कौशिकाश्रम ट्रस्टला दिला होता. आत्ता आत्तापर्यंत ते कौशिकाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष होते.
कौशिकाश्रम ट्रस्ट काय आहे? ज्या कार्यकर्त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक कामासाठीच वेचले आहे, वैयक्तिक जीवनाचा पूर्ण लोप केला आहे आणि ज्यांना वयोमानानुसार आता प्रवास करणे शक्य नाही अशा कार्यकर्त्यांचे विश्रांतीस्थान व निवासस्थान आहे.
शिवशाहीर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे शब्द ओजस्वी होते आणि उत्कट भाव वाचकांपर्यंत पोचवण्यास समर्थ होते. सरस्वतीच्या आणि भवानीमातेच्या कृपेने हे शब्द धन त्यांना लाभले होते. हे शब्द धन वेचून मिळालेला पैसा त्यांनी सामाजिक कामांसाठी उदारहस्ते दिला.. असे समाजभान जपणाऱ्या लोकविलक्षण व्यक्तिमत्वाला मानवंदना!
No photo description available.




Tuesday, 16 November 2021

बाबासाहेब पुरंदरे- श्रद्धांजली

चंडिके दे अंबिके दे शारदे वरदान दे
रक्त दे मज स्वेद दे तुज अर्घ्य देण्या अश्रू दे।।

असे मागणे मागणारा हा शतायुषी शिवऋषि.
परवा निधनाची अफवा आली आणि ती खोटी ठरल्याचे कळल्यावर वाटले ..आयुष्य वाढले. शंभराव्या वर्षात प्रवेश केला आहेच आता नक्की ते पूर्ण करणार. पण तसे होणे नव्हते.
ज्या मुहूर्तावर रायगडावर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची मंगल वाद्ये वाजली, राजे सिंहासनारूढ झाले, त्याच मुहूर्तावर काल या शिवशाहिरानी ह्या भूमी वरून प्रयाण केले. महानिर्वाणच ते.
त्यांनीच म्हटले होते की एखाद्या कामाचे वेड लागल्याशिवाय ते काम पूर्ण होत नाही आणि त्यांना तर झपाटलेले होते शिवचरित्राने. गेली कमीत कमी 70 वर्षे प्रत्येक श्वास एकाच ध्यासाने घेतलेला होता आणि तो ध्यास म्हणजे शिवाजी महाराजांचे चरित्र आणि गुणगौरव जनसामान्यांपर्यंत पोचवणे.
संशोधन हे केवळ अभ्यासकांच्यासाठी न राहता सर्वांना रुचेल, पचेल अशा सोप्या भाषेत सांगितले गेले तरच त्याची गोडी लोकांना लागेल हे लक्षात घेऊन त्यांनी शिवचरित्र अगदी सोप्या रसाळ भाषेत सांगायला सुरुवात केली, लिहीत राहिले आणि अनेक पिढ्या त्यांनी शिवचरित्राच्या वेडाने झपाटून टाकल्या.
स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या विचारांनी, वक्तृत्वाने ते भारून गेले होते. नाना पालकर ह्यांनी आपल्याला कशासाठी बोलायचे हे दाखवले, असे ते सांगत. माझ्या आयुष्यातून शिवचरित्र वजा केले तर बाकी काहीच राहत नाही अशीच त्यांची भावना होती.
माझ्याच काय पण माझ्या आधीच्या आणि नंतरच्याही कित्येक पिढ्यांना शिवचरित्र आठवते ते ब. मो. अर्थात बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी लिहिलेले. शिवाजी महाराजांचा गुणगौरव करताना 'जाणता राजा' हा शब्द रामदास स्वामींनी जेवढ्या विचारपूर्वक उपयोगात आणला, तेवढाच बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील.
'जाणता राजा' हा प्रयोग केवळ अद्भुत असाच होता. भव्य, नेत्रदीपक, कुठेही तडजोड नाही. शिवाजी महाराजांचे चरित्र तितक्याच उत्तम रीतीने साकार झाले पाहिजे ह्या भावनेने त्यांनी हे शिवधनुष्य उचलले आणि यशस्वीपणे पेलले देखील.
आयुष्यभरात त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. आदर सत्कार झाले, पुरस्कार मिळाले आणि त्याच वेळी त्यांच्यावर अत्यंत विखारी टीका देखील झाली. गलिच्छ आरोप केले गेले. त्यांच्या पुरस्कारांच्या निमित्ताने तर आरोपांचे वादळ उठवण्याचा प्रयत्न झाला.
पण बाबासाहेब या सगळ्यांपासून अलिप्त होते. शिवचरित्र जनमानसावर ठसवण्यासाठी, त्यांचे गुण सर्वांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा म्हणून भव्य स्वप्ने पाहत होते. योजना आखत होते आणि योजना प्रत्यक्षात आणण्याचा ध्यास घेत होते. शिवसृष्टीचे काम चालूच होते.
बाबासाहेबांच्या कामाचे महत्त्व महाराष्ट्रातील जनतेने जाणले होते. सर्वांच्या मनातले ह्या उत्तम लेखक, इतिहास अभ्यासक, प्रभावी वक्ता असलेल्या शिव शाहिराचे स्थान कधीच ढळले नाही. हे अमोघ व्यक्तित्व म्हणजे आपला भाग्य योग आहे अशीच भावना प्रत्येकाची होती आणि आहे.
बाबासाहेब पुरंदरे देह रूपाने आपल्यात नसले तरी चेतना रूपाने कायम राहतील. त्यांचे स्वप्न पूर्ण करणे, कोणत्याही विखारी टीकेला, अप प्रचाराला बळी न पडता,आपला खरा इतिहास जाणून घेणे, शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करणे, त्यांचे लोकोत्तर गुण अनुसरणे हीच बाबासाहेबाना खरी श्रद्धांजली ठरेल.






Friday, 12 November 2021

झाडे स्वप्नामधली



अमृता गांगल जोशीने हा फोटो पोस्ट केला आणि तो मनात रुतून बसला. हे आत्ता पोस्ट करते आहे ते फोटो पाहता क्षणी मनात आले ते.
त्यानंतर कित्येक दिवस झाले. आता तर ह्या झाडांनी देखील रंग बदलले असतील. पण माझे मन अजून तिथेच रेंगाळते आहे..त्यांच्या सोन वर्षावात गुंतले आहे. आजकाल बऱ्याचदा तिथेच असते मी.
अमृता, इतका सुंदर फोटो पोस्ट केल्या बद्दल धन्यवाद.
स्वप्नामधल्या जागेवरली झाडे स्वप्नामधली
स्वप्नामधल्या झाडांवरची पाने सोनसळी
चुरचुरती पायाखाली राशी पिवळ्या तांबूस
आठवणींचा त्यांना येतो कटूमधुर वास
जरा जराशी हिरवळ दिसे, देई आमंत्रण
इथून तिथे, जाता होते, पूर्ण एक आवर्तन
वळणवाकुडे पाणी थरथरे वाऱ्यासरशी
मन मोहरे, घेई हिंदोळे, रेंगाळे दृश्यापाशी
No photo description available.




Saturday, 3 April 2021

लसायन - 2

 लसायन - 2

'लस घेतली' असे परवा पोस्ट केले, फोटोही पोस्ट केला..लस घेतल्याचे सार्थक झाले.
😂
किती जणांनी काळजी घे सांगितले, विश्रांती घे सांगितले, विश्रांती घ्यायला घरी देखील बोलावले. ( ह्या ऑफरचा कधीतरी नक्की लाभ घेण्यात येईल!!), कोणी घरी पोळी भाजीचा डबा आणून देऊ का विचारले. माझा लसलेला जीव सुखावला. और क्या चाहिये जीने के लिये! मी भाग्यवान आहे.
"काळजी घे सांगणारं कुणी असलं
तर पोस्ट करण्यात अर्थ आहे.
कुणी असे सांगणारे नसेलच तर
vaccine घेणेदेखील व्यर्थ आहे."
Vaccine देतानाच त्यांनी दोन गोळ्या दिल्या होत्या. काहीतरी खाऊन लगेच एक घ्यायची आणि रात्रीचे जेवण झाल्यावर एक घ्यायची असे बजावून सांगितले होते.
पण काही होत नाही अशा फाजील आत्मविश्वासाने आणि औषधे घेण्याचा कंटाळा म्हणून दुपारी घेतलीच नाही.
संध्याकाळी अंग दुखते आहे असे वाटायला लागले तेव्हा रात्रीच्या जेवणानंतर मुकाटपणे गोळी घेऊन टाकली आणि रात्री लवकर झोपून गेले.
Microbiology चा आणि आपला कधीकाळी संबंध आला होता हे मी स्वतः ला देखील जाणवू देत नाही. पण Microbiology ने मला त्या रात्री मी बेसावध असताना गाठले. तेव्हा साधारण 2 वाजले होते.
मग रात्र अशी गेली.
' हे पांढऱ्या रक्तपेशीनो, उठा..जागे व्हा.. शत्रूशी मुकाबला करायला सज्ज व्हा..' आणि असे केवढे लांबलचक स्वगत मनात तयार होत होते. पण पांढऱ्या पेशी माझ्या स्वगताची वाट न पाहता, कधीच कामाला लागल्या होत्या.
मग मी काही सांगण्याची भूमिका सोडून देऊन, प्रेक्षकाची भूमिका स्वीकारली.
"अरे वा..शाब्बास शाब्बास..macrophages.. भले शाब्बास..खाऊन टाक त्या सगळ्यांना. .. चिंपंझी महाशयांच्या कडून आपल्याकडे आलेले ते शत्रू.. कर हल्ला.. टाक गिळून...
अरे अरे. ते बघा अँटीजन.. कुठे आहेत ते लिंफो साईटस .. हां. हे इकडे दिसतायत. कोण रे तुम्ही..B की T?
. B lymphocytes का? झाल्या का अँटी बॉडीज तयार..शाब्बास.. भले भले.. करा हल्ला आता.. होऊन जाउ दे.. हंगा ऐशी!!
तुम्ही काय मागे बसलात रे? चला..कामाला लागा..आणि कोणीतरी हे सगळे लक्षात ठेवताय ना.
.तुम्ही रे T lymphocytes.. पुन्हा असेच शत्रू आले शरीरात तर आपल्याला अशाच अँटी बॉडीज तयार करायच्या आहेत..लक्षात राहील ना??
चला चला..जोरात काम करा सगळ्यांनी. भले भले.. शाब्बास रे शाब्बास!!"
इथे अशी एवढी activity चालू असताना..शरीराला रिपब्लिक टी. वी. च्या प्राईम टाईम चे रुप आले होते.
😂
ही गडबड.. तापलेले वातावरण..सगळे शरीर रसरसले होते तापाने.
आणि हे रिपब्लिक चॅनल ऐकूच येत नसल्या सारखे हाताचे पंजे आणि तळपाय पावले मात्र थंडगार..मग बोटांची हालचाल करून त्यांना किमान उष्णता दिली.
आता इतके इंटरेस्टिंग सगळे सोडून ताप मोजण्याची टेक्निकल activity कोण करणार? जेव्हा हे रोमहर्षक प्रकरण संपले तेव्हा शरीराचे तापमान उतरले.
पण दिवसभर आत कुठेतरी चकमकी झडत होत्या. त्या त्या वेळी शरीर आपले थोडेसे तापमान वाढवून दाद देत होते.
दिवसा दोनदा किंवा गरज भासेल त्याप्रमाणें paracetamol पुरेसे आहे आणि अर्थातच भरपूर पाणी पिणे आवश्यकच.
थकवा देखील येतो. डोळे सतत मिटून ठेवावे वाटते. मोबाईल स्क्रीन चा उजेड नको वाटतो..
ही शरीरातील नॉर्मल प्रक्रिया आहे, vaccine काम करते आहे, ह्याची खूण आहे. तेव्हा reaction आली म्हणून कृपया घाबरून जाऊ नका.
सगळ्यांना हे असे होतेच असे नाही. माझ्या आसपास असे कित्येक जण आहेत, ज्यांना काहीसुद्धा झाले नाही.
तेव्हा..पुन्हा एकदा..लस घ्यायला घाबरु नका. डॉकटर गोळ्या देतील त्या घ्यायला विसरु नका.
चला, सगळ्यांनी लवकर लस घेऊ या. लसीकरण मोहिमेला वेग
देउ या.
.

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...