Tuesday, 11 October 2022

इंक्टोबर 2022 - 1

 इंकटोबर २०२२

चित्रे तर काढता येत नाहीत पण रोज दिलेल्या विषयावर काही लिहणे आवडेल. असे मनात आले तेव्हा ऑक्टोबर सुरु होऊन सात आठ दिवस होऊन गेले होते. त्यामुळे लिहायला सुरुवात झाली ती ९ तारखेपासून. 


प्रॉम्प्टस 


दिनांक ९ - नेस्ट - घरटे
अनोळखी गाव.. जणू एक नवा जन्म.आधीची सगळी उपाधी गळून पडलेली असते. तिथे केलेल्या बऱ्यावाईट कामांमुळे लाभलेली प्रसिद्धी लोप पावलेली असते. न कोणी ओळखणारे असते न कोणी रस्त्यात हाक मारणारे.रस्त्याने जाताना आपण असतो, रस्ता असतो आणि लोकांतातही सापडलेला एकांत असतो. कशावर आणि कोणावर विसंबून राहावे, निवांत राहावे असे काही काही उरलेले नसते. 

सगळेच नवे.. नवी जागा, नवी व्यवस्था, पुन्हा रुळणे आणि नव्याने रुजणे. आयुष्य जणू परत पहिल्या पानापासून पुन्हा सुरु करणे. 

तेव्हा वाटते,
ओल्या पंखांवरचे पाणी झाडताना पाखराला असेच वाटत असेल का? 
 सर्व झटकून हलके हलके?
 दुपारच्या उन्हात नव्या गावातही पाखराला झाडाची सावली मिळत असेल न? 
की कडक उन्हातही फक्त स्वत:च्याच सावलीचा आसरा असेल? 
संध्याकाळी परतायला सवयीचे उबदार घरटे नसेल
…. पण कदाचित म्हणूनच
अनोळखी गावे घालत असावीत कर्तृत्वाला साद.
खुणावत असावे न पाहिलेले आभाळ
त्यात स्वत:च्या अस्तित्वाची खूण उमटवण्यासाठी. 
खुद्से रूबरू हो जाते है हम अजनबी शहरमे। 

10 October - Crabby - irritable, grumpy

आजकाल ना कोणाला माझी किंमतच राहिलेली नाहीये. एक काळ असा होता की माझ्या एका इशाऱ्यासरशी सगळेजण हातातले काम सोडून धावत यायचे. माझे खाणे पिणे, फिरायला जाणे ह्याची तर मला कधीच आठवण करून द्यायला लागायची नाही. मला तहान भूक लागायच्या आधीच माझ्या समोर सगळे हजर असायचे. फिरायला जावेसे वाटले तर कोणीही माझ्यासोबत यायला तयार असायचे.

आणि आता? किती वेळच्या हाका मारतो आहे, पण कोणी लक्ष देईल तर शपथ. कधीची भूक लागली आहे मला. अरे आहे का कोणाचे लक्ष?
हे नवीन बाळ घरात आल्यापासून अस्से चालले आहे. त्या बाळाच्या तालावर घर नाचते आहे. बाळ उठले, बाळ रडले, बाळाची अंघोळ, बाळाला भूक लागली, बाळ झोपले. सतत हे आणि हेच चालू. आम्हाला काय कधी बाळं झाली नाहीत की काय? आम्ही नाही केली हो असली नसती कवतिके. बाळ आणि त्याची आई काय ते बघून घ्यायचे. आमच्या आयुष्यात नाही कधी बाळामुळे फरक पडला.

अरे आहे का कोणी? देणार आहे का कोणी माझ्याकडे लक्ष? संतापाने त्याला काय करावे ते सुचेना. त्याने जवळची ताटली जोरात सरकवली. किती तरी मोठा आवाज झाला. त्याला वाटले आता सगळे धावत येणार. पण को SSS णी आले नाही. तो हताश झाला.
काय माणसे आहेत की चेष्टा? मी इथे असा एका जागी खिळलेला नसतो ना तर एकेकाला चांगली दाखवली असती मजा. मग घाबरले असते मला.. नाही..आता तर काहीतरी करायलाच हवे मला..त्या शिवाय नाही कोणी लक्ष द्यायचे. अंग ताणून त्याने नीट मोकळे करून घेतले. शेपटी ताठ केली आणि साखळीला हिसडे मारत जोरजोरात भुंकायला सुरुवात केली.

11 October Eagle

सूर्य माथ्यावर आला होता. सूर्याचे तेजस्वी किरण डोळ्यांना टोचत होते. ताप असह्य होऊन तो तिथल्या एकमेव खडकाच्या मागे सावली शोधू लागला. तापलेल्या खडकातून गरम झळा येत होत्या. सावलीच्या मोहात पडावे तर झळांनी अंग तापणार आणि सावली सोडावी तर उन्हाने अंग भाजणार. आयुष्य इतके अवघड का असते? टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या हिरव्यागार झाडांच्या सावलीकडे बघत तो विचार करत होता.

आपल्यालाही तिथे, झाडाच्या सुखशीतळ सावलीत बसता आले असते. तिथे बसून उन्हाला पराभूत करता आले असते. मग काय होते जे आपल्याला इथे ओढून घेऊन आले?अग्निडोम्ब उसळलेला असावा इतका दाह होतो आहे इथे. कशासाठी इथे दाह सोसतो आहोत आपण? शिखरावर पोचणे म्हणजे कशाचा आधार न मिळणे.. अगदी सावलीचा सुद्धा... तरी इथे यायला भाग पाडतो तो आपले गरुडपण सिद्ध करण्याचा अट्टाहास. सावलीत तर काय कावळ्या चिमण्याही राहतात.

आपण गरुड म्हणून जन्मलो. मरेपर्यंत गरुडच राहायचे असेल तर असे शिखरावर बसून स्वतःच स्वतःची जुनी झालेली पिसे उपटून काढणे भागच आहे. सगळी पिसे उपटली जातील तेव्हाच नवी पिसे येतील आणि पुन्हा गरुडभरारी घेता येईल. तोपर्यंत हा सूर्याचा दाह, पिसे उपटली जातानाच्या वेदना, त्या उपटलेल्या पिसांच्या जागेवरचे दुखरे हळवेपण सारे सारे सहन करायला हवे. गरुड असणे सोपे नसतेच.. शेवट्पर्यन्त गरुड राहणे त्याहूनही सोपे नसते.



No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...