Sunday, 16 February 2025

माउलीच्या मुक्‍ततेचा यज्ञ झाला भारती..

“ऐका हो ऐका!!! आज संध्याकाळी शनिवार वाड्या समोर माझे व्याख्यान आहे. जे कोणी अजूनही मनात आईच्या दुधाचे ऋण मानतात त्यांनी ते जरूर ऐकावे हो.. ज्यांचे रक्त अजून पांढरे पडले नाही त्यांनी ऐकावे हो.” एक सुदृढ तेजस्वी तरुण भर बाजारपेठेतील रस्त्यावरून दवंडी पिटत स्वत:च्याच व्याख्यानाला येण्याचे लोकांना आवाहन करत होता. 

कोणी कुतुहलाने त्याच्याकडे पाहत राहिले तर कोणी इंग्रज सैनिकांच्या भीतीने चोरट्या नजरेने पाहत तिथून लगबगीने निघून गेले. 

संध्याकाळी व्याख्यान ऐकायला त्याच्यासमोर मूठभरच लोक असले तरी आजूबाजूच्या रांतून, गल्ली बोळातून लपत छपत त्याचे भाषण ऐकणारे लोक कमी नव्हते. 

त्या तरुणाने दिलेल्या अशा अनेक व्याख्यानांच्यामुळे लोक जागे झाले, चेतनेने भारले. मेलेल्या मनांत अंगार उत्पन्न झाला. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरानंतर जो समाज निराश, शिथिल आणि निद्रिस्त झाला होता, पराभूत मनस्थितीत आयुष्य जगत होता तो पुन्हा एकवार जुलुमाविरुद्ध लढण्यास सज्ज होऊ लागला. हे सगळे घडवून आणणाऱ्या त्या तेजस्वी बलवान तरुणाचे नाव होते ‘वासुदेव बळवंत फडके.’

कर्नाळ्याच्या किल्लेदारांच्या घराण्यातील ह्या मुलाचा जन्म ४ नोव्हेंबर १८४५ ला झाला. लहानपणापासूनच त्याचे अभ्यासापेक्षा शरीर साधनेतच जास्त लक्ष होते. शेवटी शिक्षण थांबवून पुण्यात मिलिटरी अकाउंट्स आणि फायनान्स डिपार्टमेंट मध्ये क्लार्क म्हणून नोकरी सुरु केली. इंग्रज सरकारची ती नोकरी म्हणजे आर्थिक सुबत्ता आणि स्थिर शांत जीवनाची हमीच होती. नोकरी उत्तमरीत्या चालू होती. लग्न झालेले होते. एखाद्याने आयुष्यभर ती चाकरी करत पैसे कमावले असते, संसार केला असता. 

पण हे पाणी वेगळेच होते. इंग्रज भारतातील सर्व संपत्ती लुटून नेतात, ऐषोआरामात आयुष्य जगतात. लाखो भारतीय आपल्याच देशात अन्नपाण्यावाचून तडफडून मरतात. इंग्रज लोक भारतीयांवर अत्याचार करतात हे त्यांना पाहवत नव्हते. संतापाने रक्त उसळत होते. ही परकी सत्ता झुगारून देऊन स्वराज्य मिळवायला हवे अशी तळमळ लागली होती. 

मनाच्या ह्या अस्वस्थतेत ठिणगी पडली ती एका हृदयद्रावक प्रसंगाने. 

वासुदेवाची आई अतिशय आजारी होती. तिला भेटायला जाण्यासाठी रजा मिळावी म्हणून वासुदेवाने अर्ज विनंत्या केल्या. “इथे रोज किड्यामुंग्यांसारखी माणसे मरतात. प्रत्येकासाठी मी सुट्टी देऊ का?” असे उद्दाम आणि निर्लज्ज उत्तर इंग्रज साहेबाने दिले. 

“आईचा अपमान सहन न करणारी माणसे आहोत आम्ही” असे बाणेदार उत्तर देऊन वासुदेव गावी गेला खरा पण जे व्हायला नको होते तेच झाले होते. वासुदेवाच्या भेटीची आस घेऊन, त्याच्या वाटेकडे डोळे लावून तळमळत असलेली त्याची आई पुढच्या प्रवासाला निघून गेलेली होती.

आईची राख विसर्जित करताना वासुदेवाने शपथ घेतली,” माते, तुला मुक्त करीन. तुला दुःख देणाऱ्या क्रूर सत्तेचे निर्दालन करेन तेव्हाच स्वस्थ बसेन.”

नुसती शपथ घेऊन वासुदेव स्वस्थ बसला नाही तर शेवटच्या श्वासापर्यंत त्या साठी रक्त आटवले. सर्वसंगपरित्याग तर केलेला होताच. लहुजी वस्तादांच्या तालमीत शरीर अधिक बलदंड झाले होते. शस्त्रात्रे चालवण्यात प्राविण्य मिळाले होते. ‘दधिचीप्रमाणे मीही माझ्या शरीरातील हाडे, मास अगदी रक्ताचा शेवटचा थेंबदेखील देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणूनच खर्च करेन’ ही मनाची दृढ धारणा होती. 

जातीभेद नाहीसा करत, सर्वाना आपल्या स्वातंत्र्य सेनेत त्यांनी सामावून घेतले. क्रांतिकारकांच्या गुप्त बैठका, विदेशी वस्तूंची होळी, शस्त्रात्रे जमवणे, त्या साठी पैसे उभे करणे असे सगळे काम धडाडीने चालू होते. स्वराज्य भक्ती मनात असलेले आणि त्या साठी सर्वस्वाचे समर्पण करायला तयार असलेले कणखर नागरिक घडवायचे असतील तर त्यांना तसे शिक्षण द्यायला हवे. त्या साठी पुणे नेटिव्ह सोसायटीची स्थापना झाली. सैन्य खात्यातील चाकरीमुळे इंग्रज सैन्य कुठे आणि किती असते, त्यांना लागणारे पैसे कुठून कुठे जातात ते माहिती झाले होते. तो खजिना लुटण्याचा बेत एका देशघातकी माणसाने फितुरी करून फोडला. 

मात्र इंग्रजांच्या विरुद्ध लढून स्वातंत्र्य मिळवायचे तर शस्त्रे हवीत. त्या साठी पैसे हवेत. इतर अनेक ठिकाणी धाडी घालून शस्त्रांसाठी पैसे जमा केले होते. शस्त्रास्त्रे मिळवली. आपल्या क्रांतिसेनेतील लोकांना प्रशिक्षण दिले. 

इतका तेजस्वी माणूस इंग्रजांच्या डोळ्यांत खूपत नसता तरच नवल. त्यांना पकडून देणाऱ्याला मोठ्या बक्षिसाची घोषणा झाली. 

जागृत होऊ पाहणाऱ्या समाजात काही करंटे लोक देखील असतातच. अशाच एका देशद्रोही माणसाने विश्वासघात केला आणि वासुदेव बळवंत फडके पकडले गेले. अतोनात छळ झाला. भारतात त्यांना ठेवले तर जनक्षोभ उसळेल म्हणून त्यांना १८८० मध्ये एडनला नेण्यात आले. त्यांच्या अंगातील शक्ती उपासमारीने, हाल अपेष्टांनी कदाचित उणावली असेलही पण मातृभूमीसाठी लढण्याचा मनातील जाज्वल्य निर्धार कणमात्रही उणावला नव्हता. 

दारात बेड्या अडकवून त्यांनी बेड्या तोडल्या आणि अख्खे दारच बिजागऱ्या उचकटवून उपसून काढले आणि एडनच्या तुरुंगातून पळून गेले. दुर्दैवाने ते पुन्हा पकडले गेले. जेलमध्ये त्यांना दिल्या जाणाऱ्या यातना आणि छळामध्ये जास्तच अमानुषता आणि क्रौर्य आले. एडनमध्येच १७ फेब्रुवारी १८८८ ला त्यांचा मृत्यू झाला. 

माउलीच्या मुक्‍ततेचा यज्ञ झाला भारती

त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती

( ग. दि. माडगूळकर )

“मातृभूमी आणि माझे प्राण यातून एकच निवडायची वेळ आली तर मी मातृभूमीच निवडेन” असे म्हणणारे आणि त्याप्रमाणे इंग्रजांविरुद्ध सतत लढत आयुष्य जगणारेआणि प्राणार्पणही करणारे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्वतःच्या जीवनाने हजारो क्रांतिज्योती उजळवून गेले. क्रांतिकारकांच्या, देशभक्तांच्या अनेक पिढ्यांचे प्रेरणास्थान बनले.

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके 







 







महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...