आज अनेक वर्षांनी तिला भेटायला जात होते. कशी असेल ती? इतक्या वर्षात मी तर कितीतरी बदलले. माझे विचार, माझ्या धारणा इतकेच काय माझा स्वभाव देखील थोडा फार बदलला. मग ती किती बदलली असेल? ती स्वत: किती बदलली असेल हे खरे तर नाहीच महत्वाचे. तिच्यामुळे आसपासचा परिसर कसा सुपीक झाला, ती कशी जीवन दात्री ठरली? कधी कोपिष्ट होऊन तिने हाहाकार माजवला? हेच महत्वाचे.
तिला भेटले होते जिथे, गंगोत्रीला, ती होती तिच्या जीवनाची सुरुवात. तिचे निर्मल, प्रसन्न, नितळ पाणी खरेच खूप कोवळे वाटत होते. तिला गंगामैय्या म्हणणे म्हणजे एखाद्या ४/५ वर्षाच्या मुलीला नउवारी नेसवून, उगीच मोठे केल्यासारखे वाटत होते. पुढे हृषीकेशला भेटली तीही अशीच मैत्रिणीसारखी. दगड धोंड्यातून खळाळत वाट काढणारी. जिच्याशी मनातले सारे बोलावे अशी स्वागतशील अन निवांत.
पण हरिद्वारला बघावे तर तिचे रूपच पालटलेले. धार्मिक बंधनात करकचून आवळली गेली असल्यासारखी वाटली ती. किती प्रौढ दिसत होती. तिचे विशाल पात्र अनेकांची पापे पोटात घेत होते म्हणे. जिच्याशी मैत्री होऊ शकेल अशी राहिलीच नव्हती ती. ती आता झाली होती पूजनीय आणि वंदनीय अशी गंगामैय्या. भर वेगात वाहात होती. सांज आरतीच्या वेळी तिच्या पात्रात असंख्य दिवे सोडले जात असताना, ओझरती दिसल्यासारखी वाटली खरी जुनी मैत्रीण तिच्यात, पण ते तेवढेच.
आज इतक्या वर्षांनी आणि इतक्या अंतरावर परत एकदा भेटणार होते मी तिला. गंगोत्री ते गंगासागर. शेकडो किलोमीटर. तशी हुगळी म्हणून तिलाच कोलकात्यात भेटले होतेच. हावडा ब्रिज म्हणजेच रवींद्र सेतू कडे अगदी 'आ ' करून बघून झाल्यावर पुलाखालून संथपणे वाहणाऱ्या तिचे भान येते. वाटते, हिला भेटण्यासाठी यायला पाहिजे एकदा पहाटवेळी वा संध्याकाळी. जेव्हा सूर्य असेल मवाळ आणि शहराच्या दिव्यांनी केलेला नसेल अजून आपला लखलखाट. झाली नसेल रोजच्या आयुष्याची वर्दळ सुरु तिच्या किनारी. अशाच निवांत वेळी भेटायला हवे तिला. असे अनेकदा मनात येऊनही तिला तिथे भेटायला जायचे राहून गेलेच खरे. तसे तर हुगळी म्हणूनच बेलूर मठाच्या बागेतून दिसणारे तिचे विरागी रूप ही अनुभवले होते.
पण आज मी निघाले होते गंगासागराला. जिथे गंगा मिळते सागराला, ज्या ठिकाणी मकर संक्रांतीला भारतातली सगळ्यात मोठी यात्रा होते त्या गंगासागराला. मनात खूप उत्सुकता होती. "सब तीर्थ बार बार, गंगा सागर एक बार " असे ज्या गंगा सागराचे वर्णन केले जाते ते कसे असेल?
थोडा गाडीने प्रवास, मग गाडी नावेत टाकून नदी पार करायची आणि मग परत रस्त्यावरून प्रवास, असे मनाशी योजिले होते. पण इथे नदी पार करायला फक्त प्रवासी नाव होती. गाडी व चालक अलीकडच्या तीरावरच ठेवून आम्ही निघालो. तिकीट खिडकीपासूनच रांगेला सुरुवात. भारतातील निरनिराळ्या प्रदेशातून भाविक व प्रवासी आले होते. एकच प्रवासी बोट असल्याने आपोआपच सगळे वर्ग भेद मावळले होते! बोट येई पर्यंतचा वेळ निरनिराळी भजने, घोषणा, फेरीवाले, भांडणे, यात्रेकरूंच्या आपापसातल्या गप्पा, नवसांच्या कथा, त्यातच ज्योतिष सांगणारेही हजर होते. एकूण अगदी मस्त वेळ गेला. जनसागराचा भाग होणे म्हणजे काय ह्याचा प्रत्यय येत होता !!
नावेत बसताच लोकांचा भक्ती भाव अगदी उफाळून आला होता. गंगेचे भव्य पात्र आपोआपच नतमस्तक व्हायला लावत होते. तो विशाल प्रवाह किती दु:खे पचवून, किती कहाण्या मनात साठवत तिथपर्यंत आला होता. किती जणांची श्रद्धा ठाम करत, किती जणांच्या जगण्याचा आधार बनत गंगौघ तिथेपर्यंत पोचला होता. सगळे सामावून घेत, सगळे सोसत, स्वत:ची उदात्तता टिकवून ठेवायची कशी ह्याची शिकवण देत तिथे तो शांत होता.
भाविकांनी हात जोडले, गंगामैय्याचा जयजयकार केला. पैसे फेकले. नैवैद्यही दाखवले व पात्रात फेकले. नदीतल्या माशांसाठी पाण्यात खाणे टाकले आणि मग शेवटी त्या प्लास्टिकच्या पिशव्याही नदीतच टाकल्या. जिला क्षणभरापुर्वी आपण हात जोडले तिला कचरा टाकून कसे घाण करावे असा तिळमात्रही संदेह त्यांच्या मनात आला नाही.
| जय गंगा मैय्या! |
ह्या सगळ्यासकट, किंबहुना हे असे असताना सुद्धा तो प्रवास अद्भुत होता. भारताची संस्कृती, धर्म जिच्या तीरावर नांदले, अनेक राजवटींचा उदय व अस्त जिने पाहिला त्या एका पुरातन अस्तित्वाचे भान येत होते. पण त्याचवेळी मातेच्या प्रेमळ व आश्वासक स्पर्शाचा प्रत्ययही, तिचा जलौघ देत होता. विश्वाच्या विराट पसाऱ्यात स्वत:च्या अस्तित्वाचे क्षुद्रपण जाणवून माणसाला नम्रत्व येत होते. आजूबाजूचे सारे जग विसरून गेले होते आणि तिच्याशी आपले जन्मोजन्मीचे नाते आहे असा प्रत्यय येत होता. मला वाटते भारतीय मनाला असणारी गंगेची ओढ ती हीच असावी.
असे म्हणतात की गंगेत आपली पापे धुतली जावीत म्हणून स्नान करणाऱ्या लोकांची पापे तीरावरच्या झाडावर त्यांची वाट पहात बसलेली असतात. ते लोक स्नान करून परत येताच त्यांच्या मानगुटीला बसण्यास तैयार!! तसेच आपल्या मनाचेही असते. उदात्ततेच्या, अपार शांतीच्या प्रदेशात, विशाल होऊन ते फार काळ रहात नाही. जमीन पायाला लागताच आम्ही स्पेशल गाडी शोधायच्या गडबडीत मग्न झालो. अफाट जनसमुदायाचा भाग वगैरे फार वेळ झेपणारी गोष्ट नाही !!
अगदी चिंचोळा जमिनीचा पट्टा. काहीही निगा न राखलेल्या अनेक गाड्या. आवश्यक सुविधांचा असलेला अभाव. तिथे मकर संक्रांतीला जमणाऱ्या गर्दीत अनेक लोक चेंगरून वा आजाराने वा अपघातात मरतात, त्या बातम्यांचे आता मला कधी नवल वाटणार नाही. त्या गाडीने सोडल्यावर परत एक सायकल रिक्षा. पैशांचा अभाव, उत्पन्नाची अपुरी साधने ह्यामुळे जेव्हा मिळेल तेव्हा जास्तीत जास्त मिळवण्याची स्वाभाविकपणेच बनलेली मानसिकता. ह्या सगळ्याला तोंड देताना त्या भेटीतील उदात्तता कधी संपून गेली कळलेच नाही. आता उरले होते फक्त उपचार.
कपिल मुनींचा आश्रम पूर्वीच्या जागेपासून हलवून आता किनाऱ्यावर आहे.
| कपिल मुनी आश्रम |
गंगासागराला स्नान करावे, पूजा करावी, पूर्वजांचे श्राद्ध करावे म्हणजे हिंदू रूढीनुसार अपार पुण्य मिळते असे सांगणारे पुजारी मागे लागत होते. ह्यातले काहीच करायचे नसल्याने आम्ही निवांत होतो. ते आमचे निवांतपण पाहून वेगवेगळ्या प्रकारचे लोक मागे लागले. मालिश करून घ्या, आमच्याच हॉटेलात खायला या, रंगीत माळा विकत घ्या, दान करा वा भविष्य जाणून घ्या!! नुसतेच आमचे काही न करता तिथे असणे त्यांना नामंजूर होते बहुधा!!
| जिथे सागरा गंगा मिळते! |
भर दुपारी उन चटके देत होते. ह्या सगळ्या लोकांना वैतागून आता इथून लवकर निघूया अशा निर्णयाला पोचलो होतो. आपल्याला ५ मिनिट चप्पल काढली तरी जिथे चटके सोसत नाहीयेत तिथे ह्या दान मागणाऱ्या लोकांची अवस्था किती बिकट असेल असा विचार करून मी एका वयोवृद्ध महिलेला पैसे दिले आणि सांगितले, " खाउन घे मावशी काहीतरी ". त्यावर तिने मला सांगितले ,"अभी तो रोजा हैं, रात को खायेगी!!" मी चकित. गंगासागराला दान मागणे आणि रोजा असणे ह्यातली गुंतागुंतीची सामाजिक, आर्थिक वीण समजावून घ्यायला हवी एकदा.
गंगासागराची भेट हा आमच्या कोलकाता वास्तव्यातला शेवटचा निवांत दिवस होता. दुसऱ्या दिवशीपासून मूवर्स, त्यांची पाहणी आणि अंदाजपत्रके, खोकी, सामानाची बांधाबांध ह्यांनी दिवस व्यापले जाणार होते.
किती मजेची गोष्ट आहे ही! माझा कोलकाता वास्तव्यातला पहिला दिवस सुरु झाला होता तो पहाटेच झालेल्या रवींद्र सरोवराच्या दर्शनाने आणि शेवटचा दिवशी मी होते गंगा सागराला. ह्याला योगायोगच म्हणावे तर अत्यंत प्रिय असा योगायोग होता तो.
कसे होते मला दिसलेलं कोलकाता? भिशोन सुंदर! जुन्या काळाच्या स्मृती मिरवणारे, मोठाल्या बागा, मैदाने तळी असलेले. प्रत्येक छोट्या छोट्या भागातही भाजी बाजार, मिठाईचे दुकान आणि सराफाचे दुकान हे हवेच!! खूप सुंदर सुती साड्या अजूनही रोज नेसणाऱ्या सुंदर स्त्रियांनी कोलकात्याला नि:संशय एक खानदानी सौंदर्य प्राप्त झालेले आहे. सामान्य माणसात अजूनही बऱ्यापैकी नितीमत्ता टिकवून असलेले, स्त्रीयांविषयीचा आदर केवळ पुस्तकात न ठेवता प्रत्यक्ष वागण्यातही दाखवणारे असे हे कोलकाता.
"ईश्वरासाठी लिहिलेला अभंग आणि प्रेयसीसाठी लिहिलेले गान सारख्याच तोलाचे आहे, जर का अभंग तेवढा चांगला लिहिला गेला असेल तर !! " असे म्हणणारे रसिक रवीन्द्रनाथ तिथल्या हवेत ती आस्वादक वृत्ती ठेवून गेले आहेत बहुधा!! त्यांची कविवृत्ती, सुभाष चंद्राचा क्रांतिकारी बाणा, विवेकानंदांची धर्माकडे पाहण्याची नवी दृष्टी, अनेक वैज्ञानिकांचे वास्तव्य लाभलेली महाविद्यालये ह्या सर्वांचे अद्भुत मिश्रण कोलकात्याला त्याचा विशेष स्वभाव बहाल करते..
कोलकात्याच्या वनस्पती उद्यानात एक प्रचंड मोठा वटवृक्ष आहे.त्याचा विस्तार अवाढव्य आहे. खास गोष्ट म्हणजे त्याचे मूळ खोड वाळवी लागल्याने कधीच नाहीसे झाले आहे. पण पारंब्यांचा विस्तार प्रचंड वाढला आहे. कोलकात्याला पाहताना वारंवार त्या वटवृक्षाची आठवण येत रहाते. फरक एवढाच की तो पारंब्यांचा विस्तार हिरवागार, रसरशीत आहे आणि कोलकाता मात्र...
कायदा वा सुव्यवस्थेची स्थिती प्रचंड प्रमाणात ढासळलेली. सगळेजण कोणाच्या तरी भीतीच्या छायेत असण्याचे विषारी वर्तुळ असलेली. उद्योग धंदे अनेक प्रकारच्या दहशतीमुळे मोडकळीस आलेले. भेदरलेले लोक आणि कामगार समस्यांनी ग्रासलेले उद्योग धंदे, वाढती नक्षलवादी हिंसा, राजकीय फायद्यासाठी काहीही करू शकणारे राजकारणी हे सगळे पाहिले की एखाद्या मोडकळीस आलेल्या पण अजूनही आपले गतवैभव सांगणाऱ्या जुन्या इमारतीची आठवण होते.
स्थिती एवढी वाईट आहे म्हणावे तर अजूनही रस्त्यावर ५ रुपयांना पोटभर पोळी भाजी मिळते, अजूनही भाजी बाजारात अगदी गरीब माणूस ५ रुपयांना एक वांगे, दोनचार भेंड्या, दोनचार परवर, छोटासा भोपळ्याचा तुकडा असे विकत घेऊ शकतो, जे आज मुंबईत शक्य नाहीये. अजूनही ज्यांच्यावर विश्वास ठेवावा असे सामान्य लोक आहेत. अजूनही माणसामध्ये जीव गुंतवणारे वेडे लोकही आहेत.
" तुमसे मोन लाग गया हैं " म्हणत रडणारी व मला रडवणारी माझी घरकामातली मदतनीस, कोलकात्यातील गर्दीत, लबाड माणसांत मादामजींचा निभाव लागणार नाही ह्या समजुतीने रक्षणकर्त्याची भूमिका घेणारा आमचा नेपाली वाहन चालक, 'इतना रेंट देनेसे तो आप कोठी खरीद ही लेंगे तो सस्ता पडेगा ',असा अनाहूत सल्ला देणारा सोसायटीच्या ऑफिस मधला तरुण मित्र, "आपके घरमे तो हमारे जैसोन्के ७/८ घर हो जायेंगे असे निर्व्याजपणे सांगणारा क्लीअरंस एजंटचा माणूस, आमच्या कोलकाता आवडण्याचे कौतुक असलेले , बंगाली शिकून घ्या आता लवकर असे सांगणारे, आम्ही सोडून जाणार म्हणून हळहळणारे आमचे घरमालक जोडपे, कितीतरी लोक. न गुंतायचे ठरवूनही ,' मोन तो हमाराभी लग ही गया था!"
मला भावलेला बंगाल हा असा होता. फार थोडा काळ व्यतीत केला मी तिथे. तिथल्या समाज जीवनाची पुरती ओळख नाहीच करून घेता आली. अळवाच्या पानावरच्या थेम्बासारखे माझे राहणे झाले. पण त्या अलीप्ततेतही वंग रंगाने मला इतके रंगवून टाकले. मला रंगवून टाकणारा वंग रंग तुम्हा सगळ्यांनाही रंगवो ह्यासाठीच होता हा सगळा लेखन-प्रपंच.
संपेलच आता हे ऋतुचक्र आणि त्या बरोबरच ही लेख-मालिकाही. ह्या ऋतुचक्राचे सरणे सोसण्यासाठी आणि नव्या ऋतुचक्रातील आनंद उत्साहाने अनुभवण्यासाठी हार्दिक शुभकामना.
पाडगावकरांच्या एका कवितेतल्या काही ओळी वाचणार का?
फुलणं ही जशी फुलाची भाषा असते
तशीच असते कोमेजणं ही फुलांचीच भाषा
कितीही कोमेजलेली फुलं जरी असली तरी
एकदा ती फुलली होती हे नाही विसरता येत..
न बोलता उभे होतो एकमेकांसमोर
यापुढे भेटलो तरी आपण परके असणार
कोमेजलेली फुलं पुन्हा फुलत नाह
हे ज्यांना कळलं ते फुलणंसुद्धा सोसतात..
-वृंदा टिळक .
ऋतुगंध शिशिर २०११