कवठी चाफा दर पौर्णिमेला फुलतो असे नाही..पण फुलतो तेव्हा पौर्णिमा जवळ आलेली असते हे मात्र खरे..तसेही तर तो फुलल्यावर पौर्णिमा अवतरतेच!
फुलण्याच्या त्या क्षणी इतका गंध उधळून देतो की काल संध्याकाळी तर मी त्याच्यापासून दहा बारा फूट अंतरावर होते, मध्ये एक काचेचे बंद दार. पण असेलच बहुतेक एखादी फट दारात. कारण गंध मला खेचून घेऊन गेला त्याच्यापाशी. केवळ काही क्षण असतात त्याचे गंध उधळण्याचे..ते आपल्याला साधता आले, लाभले तर त्या सारखा आनंद दुसरा नाही.
जरा गोलशी दडस कळी
रचनेमधली रंगावली
शशी किरण शीतल लेऊन
अनिवार सुखे सैलावली
उमलून येत हळू पाकळी
गंध बहर फुलवित आली
क्षण साधुनी कैवल्याचा
समेवरती अचूक पोचली
गंधकुपीतील सांडून अत्तर
भूल पडे ही गंधभारली
उदारहस्ते उधळून देता
सुगंधकोषी रिती जाहली
वचने दिली आणि घेतली
उत्कट गहिरी धून आळवली
विसरुनी सारे हिशेब आता
रंगुनी राधा निरंग झाली
- वृंदा टिळक.
१६/०१/२२

