आली आमच्या घरी दिवाळी- रोज एक पोस्ट- दिवाळीची गोष्ट ४
महाराष्ट्रातील दिवाळीचा एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक. दिवाळी अंकांची १११ वर्षांची समृद्ध परंपरा .
घराची दिवाळीसाठी साफसफाई सुरु करण्याच्याही आधी आणि दिवाळीचे बाकी प्लॅन्स करण्याच्याही अगोदर कोणत्या दिवाळी अंकात कोणाचे लेख आहेत ह्याच्या जाहिरातींकडे लक्ष ठेवले जाते.
ह्या वर्षीच्या आव्हानात्मक परिस्थितीत देखील, निराश न होता दिवाळी अंक प्रकाशित झाले आणि ही १११ वर्षांची परंपरा निरंतर चालू राहिली.
आत्ता माझ्याकडे ह्या फोटोतील सगळे अंक आहेत. चैत्रेय हे खरे तर वासंतिक आहे. पण तो गेल्याच महिन्यात माझ्यापर्यंत पोचला, तो देखील वाचायचा आहे. तसा रामनवमी ला ऑनलाईन प्रकाशित झाला तेव्हा वाचला होता. पण हार्ड कॉपी वाचण्याची मजा अनुभवायची आहे.
चिकूpiku चा अंक मी चक्क माझ्यासाठी घेतला. तो साधारण ५-१० वर्षांच्या मुलांना तर आवडेलच पण मी त्यापेक्षा थोडीच मोठी असल्याने मलाही फार आवडला. निज शैशव जपणाऱ्या कोणालाही आवडेल असाच हा अंक आहे!!तो फॉन्ट, चित्रे , गोष्टी, कविता, वेगवेगळे खेळ.. अंक उघडला की हरखून जायला होते.
बाकी दिवाळी अंकातील ऋतुरंग हा अंक वाचायला सुरुवात केली आहे. "आम्ही तर कुठल्याही संकटाशी लढत राहू. रात्री नंतर पहाट पाहण्याची आम्हाला सवय आहे," असे सांगणारे अरुण शेवते लिखित संपादकीय, 'लढत ' विशेषांकाला साजेसेच आहे.
आत्तापर्यंत धूप आने दो -गुलजार, धडपडीचे धडे - विनय सहस्रबुद्धे, माझे अवस्थांतर- संजय पवार, घुंगरांचा सन्मान -गुलाबबाई संगमनेरकर आणि मुंबई नि कोरोना - अंबरीश मिश्र हे लेख वाचून झाले.
इतक्या उतार चढावांचे, अनिश्चिततेचे आयुष्य जागून सुद्धा आज ८८ व्या वर्षी गुलाबबाई संगमनेरकर म्हणतात," आज आयुष्यात मागे वळून बघताना मी आयुष्यात केलेल्या संघर्षांची बेरीज न करता जे काही चांगले झाले त्याची बेरीज करते आहे."
फाळणीचे दुःख गुलजार ह्यांच्या लेखनातून वारंवार उमटत राहिले आहे. ह्या लेखात कोरोना मुळे झालेल्या स्थलांतराच्या निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा फाळणीच्या वेळच्या स्थलांतराची आठवण झाली आहे.. घरात राहणे सक्तीचे, आलेले एकटेपण . "कधी कधी खूप कोंडमारा झाल्यावर वाटते कि समुद्र पाहून यावा, तो कोरडा तर पडला नसेल ना? मग त्याचं ते गिळू पाहणारं रूप तसाच आहे की नाही पाहून येऊ असेही वाटले." असे ते म्हणतात. आलेल्या संकटांची, समाजाने त्याच्याशी दिलेल्या लढतीची, सकारात्मक प्रयत्नांची हकीकत सांगून ते म्हणतात, "मात्र मानवी आयुष्याची असुरक्षितता तीव्र झाली आहे. तिच्याशी आपल्याला एकत्र येऊन लढायचे आहे."
संजय पवार ह्यांचा माझे अवस्थांतर हा लेख फार वैशिष्ट्य पूर्ण. स्वतःच्या आयुष्याचे इतके बारकाईने विश्लेषण, त्या त्या वेळी घडलेल्या घटनांनी नेमके काय साधले, मनात आणि आयुष्यात घडलेल्या घडामोडी ह्यांचे नेमके वर्णन वाचायला मिळते. त्या अवस्थांतराचे, केवळ एका व्यक्तिच्याच नव्हे तर त्या वेळच्या समाजकारणाचे पडसाद उमटलेले दिसतात. भावना इतक्या नेमक्या, इतक्या मोजक्या शब्दात कशा लिहायच्या, प्रत्ययकारी वर्णन कसे असावे ह्याचा वस्तुपाठ असलेला हा लेख.
अंबरीश मिश्र ह्यांचा लेख आणि त्याचे नाव 'मुंबई नि कोरोना' इतके गद्य?? माझ्याप्रमाणेच तुम्हालाही क्षणभर वाटेल. पण लेख वाचायला सुरुवात कराल तर मात्र ..केवळ आ sss ह!! एखाद्या महानाट्याची नांदी असावी तसा हा लेख. मनातले अतिशय उत्कटतेने सांगणारा हा लेख. इथे खरे सांगणारा हा शब्दही योग्य नव्हेच. बहुतेक स्वत:शी बोलत आहेत ते. किती महत्वाच्या आणि अक्षरश: विराट मुद्द्यांना स्पर्श केला आहे त्यांनी! संदर्भ तरी किती विविध, त्यांच्या समृद्ध वाचनाची प्रचिती देणारे. त्या लेखाविषयी लिहायला खरे तर अजून किती तरी लेख लिहायला हवेत. शेवटी ते म्हणतात, "तुम्हीही माझ्यासारखेच असाल तर कधीतरी भेट होईल. भेटलोच तर समुद्राच्या साक्षीने मुंबईची दृष्ट काढू."
विनय सहस्रबुद्धे ह्यांच्या धडपडीचे धडे ह्या लेखात त्यांच्या आयुष्यात आलेल्या दुविधा, त्याला सामोरे जाताना केलेली धडपड, त्याचे मनावर आणि जीवनावर झालेले परिणाम असे वाचायला मिळते. विनय सहस्र्बुद्धे ह्यांनी स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याविषयी लिहिलेले मी तरी पहिल्यांदाच वाचले. मुख्यत्वाने आणीबाणीच्या कालखंडाविषयी हे लेखन आहे. ह्या लेखकाच्या लेखणीतून अजून बरेच वाचायची उत्सुकता निर्माण करणारा हा लेख आहे.
त्यांनी त्यांच्या धडपडीतून मिळालेल्या 'खऱ्या कमाईच्या' तीन गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली म्हणजे अनिश्चितता पावलोपावली असतेच पण आपल्या कामामागचे 'अधिष्ठान' आपण लख्खपणे जाणत असू तर विचलित व्हायची वेळ येत नाही. बाकीच्या दोन गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात वाचा!
शेवटी ते म्हणतात की चांगल्याचा चांगुलपणा ठळकपणे पुढे येत नाही तोवर त्याच्या यशाची शक्यताही वाढत नाही आणि चांगुलपणा यशस्वी झाला नाही तर त्यावरची स्वतः ची आणि इतरांची श्रद्धाही अबाधित राहू शकत नाही.
घरात इतके दिवाळी अंक वाचायला असल्याने तुळशीच्या लग्नापर्यंतही दिवाळी संपत नाही..नक्कीच!!!
माझे बाबा गोष्ट सांगायचे तेव्हा शेवटी असायचे ,"एक होते पोस्ट ..संपली आमची गोष्ट" इथे तर दिवाळीच्या गोष्टीच्या चार पोस्ट झाल्या!! ही दिवाळी आपल्या सगळ्यांसाठीच वेगळी होती. अस्वस्थ होती आणि तरीही दिवाळीने सर्वांच्या मनात उत्साह जागवलाच.
आपल्या घराखेरीज अजून किमान एका तरी घरी दिवा लागेल हे आपण सगळ्यांनी आवर्जून पाहिले. आपल्या घरी फराळाचे करताना अजून कोणाला तरी तसेच घरात गोडधोड करता यावे ह्याची काळजी घेतली. अवघ्यांनी मिळून सुपंथाकडे चालण्यासाठी जमेल तेवढ्या शक्तीने पाऊल पुढे टाकले. हा प्रकाश आपल्या सगळ्यांच्या मनात निरंतर उजळत राहो. ।। शुभं भवतु .. कल्याणमस्तु ।।









