Monday, 23 December 2024

बर्ड बाय बर्ड

 बर्ड बाय बर्ड - ऍन लॅमोट

एकदम वेगळे पुस्तक. एरवी मी कदाचित वाचलेही नसते. पण एका ग्रुपवर झालेल्या  उल्लेखाने उत्सुकता वाटली. 

खूप विचार करायला लावणारी काही वाक्ये आहेत. हे त्यातले एक

To be engrossed by something outside ourselves is a powerful antidote for the rational mind, the mind that so frequently has its head up its own ass seeing things in such a narrow and darkly narcissistic way that it presents a colorectal theology offering hope to no one.

आणि हे अजून एक 

It’s like singing on a boat during a terrible storm at sea. You can’t stop the raging storm, but singing can change the hearts and spirits of the people who are together on that ship.

हे पुस्तक काही लिहिणाऱ्यांसाठी तर आहेच. लिहिण्याची सुरुवात, लिहिण्यातली शिस्त, बारकावे या सर्वांविषयी गमती जमती करत सांगितल्यामुळे वाचनीय झाले आहे.

मला सर्वात जास्त महत्त्वाचे वाटले ते ‘पब्लिश करायची घाई करू नये’ हे वारंवार सांगितले आहे ते! सध्या तर प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांचा सुकाळ झाला आहे. प्रकाशित होणाऱ्या साहित्याच्या गुणवत्तेविषयी स्वतः लेखकानेच कशी काळजी घेतली पाहिजे आणि मुख्य म्हणजे धीर आणि संयम ठेवला पाहिजे हे या पुस्तकात खूप विस्ताराने सांगितले आहे.
लेखिकेची लिहिण्याची शैली व्यंग टिपणारी आहे. स्वतःच्या वागण्यातले, इतरांच्या वागण्यातले, सामाजिक प्रथांबाबत तसेच एकूणच आयुष्यातले व्यंग अत्यंत रंजक पद्धतीने सामोरे आणणारे असे हे लेखन आहे.
जाता जाता लेखिका अनेक पुस्तकांची, चित्रपटांची उदाहरणे देत असते. त्यावरून तिने जे आधी सांगितले आहे की ‘लिहिण्यासाठी एखाद्याने खूप वाचलेले असायला पाहिजे’, ते तिने स्वतःच्या बाबतीतही आचरणात आणले आहे हे पटतेच.
आता हे पुस्तक फक्त ज्यांना काही लिहायचे आहे त्यांनीच वाचावे का? तर याचे उत्तर नाही आणि हो असे दोन्ही आहे.
तुम्हाला लिहायला आवडत नसेल तरी जर का हे पुस्तक वाचायचे असेल तर.. किमान वाचन तरी आवडत असले पाहिजे, तरच हे पुस्तक तुम्हाला आवडेल.
हे पुस्तक वाचताना अनेकदा आपण भारतीय असल्याचा आनंद आणि अभिमान वाटतो. (अर्थात असे अनेकदा होते. मागे एकदा कोर्सेरा वरचा कोणत्या तरी पाश्चात्य विद्यापीठाचा कोर्स करत होते. तो आपल्या ‘सर्वेपि सुखिनः संतु’ वर आधारलेला होता. मग वाटले होते अरे हे तर मला माहिती आहे!) ह्यातील काही संकल्पना भारतीय तत्त्वज्ञानाने सांगितलेल्याच आहेत आणि आपला विशेष अभ्यास वा साधना नसतानाही केवळ ह्या देशात आहोत म्हणून आपल्याला त्या आपोआप माहिती असतात. ( मी आता लायब्ररीचे पुस्तक परत केले आहे. त्यामुळे त्या संकल्पना कोणत्या, त्याचा उल्लेख कुठे आला होता वगैरे डिटेल्स मी देऊ शकणार नाही. पण ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांना पण असे वाटले का ह्याची उत्सुकता मात्र मला नक्कीच वाटते आहे. )
सगळ्यांनाच अतिशय उपयोगी पडेल असा एक सल्ला ह्या पुस्तकात आहे. तेच पुस्तकाचे शीर्षक देखील आहे. विशेषतः आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर आल्यावर जेव्हा जाणवते की खूप काही करायचे राहून गेले आहे. त्या राहून गेलेल्याची सुरुवात करायचा देखील धीर होऊ नये इतकी मोठी त्याची व्याप्ती असते आणि मग आपण काहीच करत नाही.
तर अशा सगळ्यांना हे पुस्तक सांगते .. एकदम मोठा प्रोजेक्ट समोर दिसत असेल तरी लहान लहान सुरुवात करत गेलात, एकेक आयाम पूर्ण करत गेलात तर एक दिवस तो प्रोजेक्ट देखील तुम्ही पूर्ण करू शकता.
"Thirty years ago my older brother, who was ten years old at the time, was trying to get a report on birds written that he'd had three months to write [It] was due the next day. We were out at our family cabin in Bolinas, and he was at the kitchen table close to tears, surrounded by binder paper and pencils and unopened books on birds, immobilized by the hugeness of the task ahead. Then my father sat down beside him, put his arm around my brother's shoulder, and said, 'Bird by bird, buddy.
Just take it bird by bird.'".

ह्या पुस्तकात अनेक कोट्स आहेत. प्रत्येक कोट वर तुम्ही विचार करत रहाल आणि जर का प्रामाणिकपणे स्वतःतील गुण आणि दोष दोन्ही ओळखणार असाल तर आपल्या वर्तनात देखील बदल घडवून आणू शकाल असे ह्यातील काही कोट्स आहेत. त्यामुळे ते काय आहेत ह्या उत्सुकतेने पुस्तक वाचायला हरकत नाही.

मला फार आवडलेले अजून एक कोट सांगते..

But the coach says, “If you’re not enough before the gold medal, you won’t be enough with it.”
मग पुढे लेखिका सांगते ..
Being enough was going to have to be an inside job.

अर्थात हे आपण समजू शकलो तर अजून काय हवे!!!!


Tuesday, 23 July 2024

देह नोहे जाणा आत्म्याचे वाहन...

 “अगदी आध्यात्मिक भाषेत बोलायचे झाले तर आपले शरीर हे एक प्रकारे आत्म्याचे वाहनच म्हणता येईल.” 

ऋतुगंध वर्षासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन करणारी महाराष्ट्र मंडळ सिंगापूरची मंडळाची अतिशय आकर्षक अशी मेल आली आणि त्यातल्या या वाक्याने विशेष लक्ष वेधून घेतले. मन खिळवूनच ठेवले म्हणा ना!! मग लक्षात आले वाहन असेल तर त्याची काळजी घेणे आले, त्याची देखभाल करणे आले. निगा राखणे आले. इतक्यात आला आंतर राष्ट्रीय योग दिवस. मग लेखाचा विषय आयताच समोर आला. 

 तर मंडळी, त्या आत्म्याच्या वाहनाला आणि ते वाहन चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या मन, बुद्धीला सुरळीत ठेवण्यासाठीचा सगळा खटाटोप म्हणजे योग! बाकी लोक योगाच्या अनेक मोठमोठ्या व्याख्या सांगतात. आपल्यापूरती ही वरची व्याख्या पुरेशी आहे. 

योगासाठी लवचिक शरीर आणि स्थिर मन आवश्यक असते असे म्हणतात. पण खरे तर सर्वात आधी आवश्यक असते योगा मॅट. तर तशी योगा मॅट माझ्याकडे आज अनेक वर्ष आहे. ती घरात असण्याचे कारण म्हणजे सगळे जण योगा मॅट घेतात, मग आपणच मागे राहून कसे चालेल? निदान खरेदीत तरी मागे नको असे म्हणून ती मॅट ची खरेदी झालेली आहे!!!

 तशी त्या योगा मॅट ची घरात काही अडचण होत नाही. गोल सुरळी करून वॉर्डरोबच्या वर कोपऱ्यात ठेवली की दिसायलाही नको. दृष्टीआड होते ते मना आड होते हे तर आपल्याला माहिती असतेच!! 

वर्षातून एकदा योग दिनाच्या दिवशी मात्र योगा मॅट नक्की बाहेर काढली जाते. बाकी काही योगासने केली नाहीत तरी whatsapp वर स्टेटस, फेसबूकवर पोस्ट आणि इनस्टावर रील तर टाकायला लागते ना? तेव्हा योगा मॅट पाठीमागे असेल की कसे ओथेनटिक वाटत राहते. 

तर आपण बोलत होतो योगा मॅट विषयी. त्याच्या एका बाजूला थोडे वर आलेले ठिपके असतात आणि एक बाजू प्लेन असते. योग दिनाच्या दिवशी म्हणजे 21 जूनला सकाळपासून मनात संभ्रमाचे चक्र सुरू होते की यातली कुठली बाजू नक्की वर करायची? सपाट बाजू वर करायची की ठिपके वर करायचे आणि काहीच निर्णय होत नाही. त्याच्यामुळे दर योगदिनाला मी आलटून पालटून एकेक बाजू वर ठेवते. काय म्हणता ? मागच्या वर्षी कोणती बाजू वर होती ते लक्षात कसे राहते? अगदीच सोप्पे!! गुगल फोटो वर आणून देते न त्या दिवशी .. एक वर्ष आधी .. आजाचीच दिवशी असे शीर्षक असलेला!! टेक्नॉलॉजी माणसाला उपयोगी पडते म्हणतात ती अशी!!

तर मॅट ची एकदा सपाट बाजू वर, एकदा ठिपकेवाली बाजू वर असे करून योग दिनाच्या दिवशी त्यावर दहा मिनिटे शांतपणे डोळे मिटून बसते. त्याच वेळेत कोणालातरी माझे वेगवेगळ्या अॅंगल मधून फोटो काढायला सांगते. तीन वेगवेगळे फोटो असतील की whatsapp स्टेटस, फेसबूक पोस्ट आणि इनस्टावर रील अगदी छान होते. एकच फोटो तिन्ही ठिकाणी लावला की योग दिन कसा ‘दीन’ वाटायला लागतो. तेवढे फोटो आणि एखादी लहानशी विडियो काढून झाली की मग मी अत्यंत समाधानाने योगा मॅट गुंडाळून ठेवते, ती पुढच्या योग दिनापर्यंत! अगदीच अधेमधे काही विशेष कार्यक्रम असेल तर ती मॅट उघडली जातेही, अगदीच नाही उघडली जात वर्षभर असे नाही. पण त्या वेळेला बाकी गडबडच इतकी चालू असते की आपण कुठली बाजू वर घातली आहे याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला फुरसत असते!!

पण गेल्या वर्षी मुक्काम पोस्ट सिंगापूर मध्ये असतानाच एका योग वर्गात जात होते. तर तेव्हा माझ्या कोरियन शेजारणीने मला नीट समजावून सांगितले की ठिपके ठिपके वाली बाजू असते ती जमिनीवर ठेवायची म्हणजे मग मॅट घसरत नाही आणि जी सपाट बाजू असते ती वर ठेवायची. अशा रीतीने माझ्या मनातील युगानुयुगांचा संभ्रम संपुष्टात आला, त्याबद्दल तिचे आभार मानावे तेवढे थोडेच. 

 आणि पु. ल. देशपांडे म्हणतात तसा आयुष्यातला तो बोळा निघाला आणि आयुष्य वाहते झाले. तर आता मॅट कशी घालायची हे लक्षात राहायला लागल्यावर योगवर्गात जाणे सुरू झाले. दोन-तीन वेगवेगळ्या योग शिक्षक/ शिक्षिकांच्या बरोबरचा माझ्या योगाभ्यासाचा ( कसला वजनदार शब्द आहे ना?नुसता तो लिहून देखील लै भारी वाटतेय!) अनुभव इथे नोंदवते आहे. 

योगशिक्षक होण्यासाठीचा पहिली अट बहुतेक हीच असावी की अत्यंत संथ गतीने आकडे मोजता यायला हवेत!! कारण मी पाहिले आहे की आपल्याला श्वास रोखून धरायला सांगून हे लोक शांतपणे, अतिशय सावकाश ‘ एक दोन तीन चार ..’असे आकडे मोजत बसतात. श्वास रोखलेल्या अवस्थेत आपले खरे तर मनातल्या मनात शंभर आकडे कधीच मोजून झालेले असतात. इतकेच नाही तर अजून थोडा वेळ थांबलो तर शंभरी भरलीच म्हणून समजा अशी खात्रीही झालेली असते!!! ‘मोज ते बाबा किंवा मोज ग बाई पटापटा’ असे आपल्या मनात कितीदा तरी येऊन गेलेले असते. नंतर अगदीच आर या पार अशा स्थितीत आपण आल्यावर एकदाचे त्यांचे दहा आकडे पूर्ण मोजून होतात आणि मग ते पुढची आज्ञा देतात!!

अशीच वेळ आणखी एकदा येते ती आपल्याला एखाद्या अवघड स्थितीत अडकवून आता आसनस्थिती होल्ड करा असे ते सांगतात तेव्हा. तेव्हाही इतक्याच निवांतपणे आकडे मोजायला त्यांना वेळ आणि पेशंस कसा असतो कळत नाही!! इथे आपण हे हातपाय मानेचे कडबोळे घातले तर खरे आता हयातून सुटून पूर्ववत कसे व्हायचे ह्याचीच चिंता करत असतो. त्यांना नुसते होल्ड करा सांगायला काय जाते? आपल्याला क्षणाचा शंभरावा भाग देखील एखाद्या युगासारखा वाटत असतो. आपल्याला वाटत असते की त्यांचे मोजणे फास्ट फॉरवर्ड करावे आणि तेव्हा त्यांचा वेग मात्र कासवा इतकाच असतो. 

कपालभातीची वेळ आली की तर खूपच गोंधळ होऊ लागतो. आधी संपूर्ण श्वास सोडायचा आणि दीर्घ श्वास घ्यायचा. मग श्वास बाहेर टाकत पोटही हलवायचे. त्याला झटके देत मागे पुढे करायचे. बाकी शरीर गदगदा हलवायचे नाही. फक्त पोट हलवायचे. आता इतकी सगळी ऍक्टिव्हिटी एकाच वेळेला जमवायची, शिवाय ते ज्या गतीने आकडे मोजत असतात त्या गतीने हे सगळे प्रकरण करायचे हे अवघडच जाते आणि गंमत म्हणजे एरवी अगदी संथ असणारी त्यांची आकडे मोजायची गती अशा काही वेळेला मात्र दुप्पट/ तिप्पट वाढलेली असते. कपालभाती करून झाल्यावर ते सांगतात की श्वास विरहित अवस्थेचा आनंद घ्या, कुठल्या क्षणी  आपला श्वास पुन्हा चालू होतो आहे त्याकडे लक्ष द्या. तो क्षण पकडायचा प्रयत्न करा. इथे मात्र एवढी अख्खी कपालभाती करून झाल्यावर, त्यात अध्येमध्ये अनेकदा आता फक्त तो श्वासच नाही, तर सगळेच संपते आहे की काय असे वाटून गेल्यावर, श्वास पुन्हा चालू होतो आहे यातच आपला परमानंद सामावलेला असतो!! 

तितली आसनाची तर आगळीच कथा!! कितीही प्रयत्न केला तरी आमची तितली काही जमिनीला टेकायला तयार होत नाही, ती सतत हवेतच उडत राहते! जमिनीवर टेकणार नाही म्हणजे नाही असा तिने दृढ निश्चय केलेला असतो. योग म्हणजे संकल्प आणि मनाची दृढता हे तितलीला नक्कीच माहिती असणार. आपण तर काय, तितली जितकी उडते आणि खाली येते, त्याच्यातही खुश असतो. तितक्यात योग शिक्षिका जणू आपल्याकडे बघूनच दिलेली असावी अशी आज्ञा देतात की वरच्या वर करू नका, मांडी आधी नीट जमिनीला टेकवा आणि मगच पाय वर घ्या!! आता टेकत असते तर नक्कीच टेकवले असते ना! (जिज्ञासूनी तितली आसन म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी नुसती बटरफ्लाय पोज सर्च करून थांबू नये तर ती करून देखील पहावी. अनुभव हीच खात्री असे कोणीसे म्हणून ठेवलेलेच आहे.) आमचे गुडघे म्हणजे तर खाशा सवाऱ्याच. मोडेन पण वाकणार नाही हा अस्सल मराठी बाणा त्यांत ठासून भरलेला असतो. ते कसे बसे अगणित वर्षांच्या प्रयत्नानंतर वाकायला लागलेच तर तितली आसन मध्ये त्यांचा रथ कायम जमिनीपासून दशांगुळे वरच राहतो. ते हवेतच असतात. 

नंतर उभ्याने करायची आसने सुरु होतात. वृक्षासनाची वेळ येते. “हात नमस्कार मुद्रेत डोक्यावर ताणून धरा. उजव्या पायाचे पाऊल डाव्या मांडीवर ठेवा. आता एका पायावर शरीराचा तोल सांभाळा. दृष्टी समोर एका बिंदूवर स्थिर ठेवा.” शिक्षिका सांगतात. पण इथे दृष्टी नुसती भिरभिरत असते. आपण कोणत्याही क्षणी पडलोच तर कशाकशाचा आधार घेता येईल हे शोधत असते. भिंत जवळ पडेल की खुर्ची असा गहन विचार मनात चालू असतो. त्याच वेळी शिक्षिका सांगत असतात, ‘ शांत चित्त..स्वस्थ शरीर’. इतकी भीती वाटत असताना कसे राहायचे चित्त शांत आणि कधी व्हायचे आमचे शरीर स्वस्थ ???!! 

तर आपल्याला इतके जमायला लागेपर्यंत बाकी वर्ग खूप पुढे निघून गेलेला असतो. त्यांच्याबरोबर आपण निवांतपणे शांतिमंत्र म्हणावा आणि कृतज्ञता बाळगत वर्ग संपवावा. कोण ते? कोण म्हणाले की वर्ग संपल्याबद्दल कृतज्ञता का म्हणून? जरा गंभीरपणे विचार करायला शिका आता तरी!! आपण योग करू शकतो म्हणून ह्या आत्म्याच्या वाहनाविषयी म्हणजे देहाबद्दल कृतज्ञता बाळगत, आपल्या आईवडिलांना, गुरुजनांना मनोमन नमस्कार करीत वर्ग संपवावा. कोपरापासून हात जोडू नयेत. 

पण योगवर्ग संपला तरी वाहनाची देखभाल काय इतक्यात संपते होय? तसेही वर्गाच्या आधी तीन तास पोटात काही न गेल्याने हल्लक की हलके काय ते वाटायला लागलेलेच असते. मग खाद्ययोग करायला घ्यावा. वाहनात इंधनच नसेल तर वाहन चालणार कसे!! हलक्या पदार्थांचा आहार घ्यावा. हलके..म्हणजे तेलावरही तरंगणारे असे बटाटेवडे, कांदा भजी, मुंग पकोडे ह्या सारखे हलके पदार्थ असतील तर मनाला देखील तृप्तता येते. कधी कधी बदल म्हणून म्हणजे वर्षातील चार महिने आम्रयोग करावा. त्याच्या कृतीसाठी जिज्ञासूंनी लेखिकेशी संपर्क साधावा. आत्ता विनामूल्य माहिती देण्यात येईल. फक्त पुढच्या मौसमात आंब्याची एक पेटी लेखिकेकडे पोचवावी, इतकीच अल्प अपेक्षा आहे. 

 तर अशा रीतीने ह्या आत्म्याच्या वाहनाची म्हणजेच देहाची योगाच्या माध्यमातून केली जाणारी देखभाल सुफळ संपूर्ण होते. आमची झाली तशीच तुमची, ह्यांची, त्यांची देखील होवो!! शेवटी काय … ‘सर्वेपि सुखिनः सन्तु’ सांगणारी आपली परंपरा आहे. 


देह नोहे जाणा 

आत्म्याचे वाहन 

करू संगोपन 

तयाचे हो!!

योगाच्या माध्यमे 

बुद्धी देह मना

लाभे संजीवन 

सत्वर हो ।।

योगा संगे करा

असा खाद्ययोग 

शांत होई मन

वृंदा म्हणे !!



- वृंदा टिळक.
पूर्व प्रसिध्दी - ऋतु गंध महाराष्ट्र मंडळ सिंगापूर. जुलै 2024

Monday, 6 May 2024

शब्दरूप लेऊन फुलल्या - दिवे लागले रे!

 शब्दरूप लेऊन फुलल्या 

मनातल्या मुक्या भावनांना शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत कविता लिहिली जाते. खरे तर लिहिलेल्या शब्दांच्या मधल्या अवकाशात कविता कितीतरी सांगत असते. या लेखमालिकेत आपण वाचणार आहोत, अशा कवितांविषयी. दोन शब्दांच्या मधल्या अवकाशाचा शोध घेण्याचा हा तोकडा प्रयत्न आहे. 

—-----------------------------------------------------------------------------------

या ऋतुचक्रातला हा शेवटचा अंक आणि म्हणूनच हा या लेख मालिकेतील शेवटचा लेख देखील आहे. ह्या अंकाचा विषय आहे दिवा. त्या निमित्ताने इथे लिहू पहाते आहे, माझ्या एका आवडत्या कवितेविषयी. कवितेचे संपूर्ण आकलन होवो न होवो, ह्या कवितेने मनाला मोहवून टाकलेले आहे हे नक्की. 


दिवे लागले रे, दिवे लागले रे,

तमाच्या तळाशी दिवे लागले;

दिठीच्या दिशा खोल तेजाळताना

कुणी जागले रे? कुणी जागले?

रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी

असे झाड पैलाड पान्हावले

तिथे मोकळा मी मला हुंगिताना

उरी गंध कल्लोळुनी फाकले…

उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा

कुणी देहयात्रेत या गुंतले?

आरक्त त्याच्या कृपेच्या कडा 

अन् उष: सूक्त ओठात ओथंबले

  • कवी शंकर रामाणी

 

पहिल्या ओळीतच प्रकाशाची जाणीव आहे. पण हा प्रकाश कुठे उमलला आहे? तर तमाच्या तळाशी.. तम- अंधार. कोणता अंधार आहे हा? ह्या सृष्टीच्या आधीपासून असलेला असा अंधार? सृजनाच्या अनेक शक्यता दाखवणारा अंधार? अज्ञानाचे प्रतीक असणारा अंधार? दिठींच्या दिशा तेजाळत असताना ‘कुणी जागले’. कुणी म्हणजे कोण? हा प्रतिभाशक्तीचा संदर्भ आहे? अध्यात्मिक चेतनेचा संदर्भ आहे? पुढे शंकर रामाणी लिहितात,’रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी’. माणूस ह्या जगात येतो तो रित्या ओंजळीने आणि जातो ते ही रित्या ओंजळीनेच. पण इथे हा रितेपणा पुष्पवृष्टीने संपन्न झाला आहे आणि नुसती आत्ता झालेली पुष्पवृष्टी नाही तर असे करणारे एक संपूर्ण झाड पलीकडे वाट पाहते आहे.


शंकर रामाणी - कोणतीही काव्य वाचने, संमेलने, परिसंवाद, अध्यक्षीय भाषणे अशा कोणत्याही वाङ्मयीन व्यवहारात न गुंतलेला, काहीसा एकटा राहणारा कवी. त्यांच्या कोकणी आणि मराठी दोन्हीही कवितांना गोवा आणि महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले. त्यांची कविता अस्सल गोव्याच्या मातीतली. ती कविता बोरकरांच्या कवितेची तर आठवण करून देतेच पण त्यापेक्षाही जास्त आठवण आरती प्रभू आणि ग्रेस ह्यांच्या कवितेची आठवण करून देते. 


संपूर्ण आयुष्यभर कविता ह्या एकाच साहित्यप्रकाराशी एकनिष्ठ राहिलेले कवी फार थोडे. जगण्याची धडपड, हलाखीची परिस्थिती, आयुष्यातील दुःख ह्या सगळ्यांतुन जात असतानाही शंकर रामाणी कविता लिहीत राहिले. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर त्यांना ‘ कविता यायची’ आणि मग ती कुठे येईल? कधी येईल? कशी येईल हे काहीच त्यांच्या हातात राहायचे नाही.


‘दिवे लागले रे दिवे लागले’ या कवितेविषयी बोलायचे तर त्यांना ती सुचली ती एका अतिशय अवघड वेळी. त्यांनी लिहिले आहे, ‘‘१५ जुलै १९७० हा तो दिवस. माझी(प्रथम) पत्नी खूप आजारी होती. तिला हार्टडिसीज तर होताच, पण काही नवीनच आजार उद्भवला होता. तिला खूपच त्रास होऊ लागला. ताबडतोब हॉस्पीटलमधे घेऊन जाण्यासाठी ऍम्ब्युुलन्स् आणायला आमचा शेजारी गेला. तेव्हा मी त्यांची वाटच पाहत बसलो होतो. आत बायको अक्षरश: तळमळत होती. वेदनांनी ओरडत होती. अत्यंत निराशेचा असा तो क्षण होता. आणि.. आणि मला कविता आली! आपोआप आली. त्याचा या घटनेशी संबंध असेल किंवा नसेलही. कुणाला ठाऊक? त्या ओळी मनातून निसटून जाऊ नयेत म्हणून हातात मिळालं त्या कागदाच्या चिरोट्यावर खरडली.’’

तीव्र वेदनेच्या वेळी सुचलेलं हे उषा सुक्त काहीसे अतर्क्य म्हणायला हवे. पण ही कविता केव्हा सुचली याविषयी त्यांच्याच शब्दात आपण वाचल्यावर मग देह यात्रा, रित्या ओंजळी, पैलाड, देहयात्रा या सगळ्याचा अर्थ लागत जातो. ओंजळीत जे काय आयुष्यभर मिळवले होते त्याचे समर्पण झाले आहे आणि ती ओंजळ वाहून टाकून आता रिती झाली आहे.

आयुष्याविषयी इतकी लख्ख जाणीव झाल्यावर कोणतेच पाश बांधून ठेवू शकत नाहीत आणि मग अवस्था ‘ उरी गंध कल्लोळुनी फाकले” अशी होते. शंकर रामाणी ह्यांच्या आणखी एका कवितेत त्यांनी लिहिले आहे,

“माझिया दारात चिमण्या आल्या 

 अबोल काहीसे बोलून गेल्या 

 कळले सारे नि कळले नाही 

अबोध मनाची हासली जुई 

दाटून दिशांत उतला गंध 

 झडली जाणीव गळले बंध

प्राणास फुटले अद्भुत पंख

 तंद्री त भिनला आकाश डंख 

माझिया दारात चिमण्या आल्या

 आगळे वेगळे सांगून गेल्या”


ही ‘झडली जाणीव गळले बंध, प्राणास फुटले अद्भुत पंख’ ही अनुभूती त्यांच्या कवितातून वारंवार आपल्याला वाचायला मिळते आणि त्याचाच एक अविष्कार दिवे लागले रे मध्ये देखील पाहायला मिळतो.

मग पुन्हा आपण आधीच्या ओळी कडे जातो. ‘कुणी जागले रे कुणी जागले’. दुसऱ्या एका कवितेत शंकर रामाणी म्हणाले होते, ’ मला जन्मांधाला अवचित नेत्र फुटले’ 

ही ज्ञान प्राप्ती, जाणीव जागृती आपल्याला ‘ दिवे लागले रे’ या कवितेत देखील पाहायला मिळते. 

रोमरोमातुनी चैत्रवाटा उभ्या राहताना म्हणजेच वसंताची, नवनिर्मितीची, फुलण्याची, पुन्हा बहरण्याची चाहूल लागताना ही देहयात्रा बांधून ठेवते आहे का? अपुरी पडते आहे का? जे गवसले आहे ते ह्या देहाच्या पार जाणारे आहे का?

‘ आरक्त त्याच्या कृपेच्या कडा’.. हा ‘तो’ कोण आहे? तो जगन्नियंता, सृष्टीकर्ता आहे? की कधी तुम्हाला झाकोळून टाकणारे तर कधी प्रकाशाने उजळून टाकणारे तुमचे मन आहे? की तुमच्या प्रतिभा शक्तीला हुंकार देणारा असा कोणी आहे? ‘उष:सूक्त ओठात ओथंबले’. इथे एका नव्या आशेने, एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होणे आहे. जणू आत्मसाक्षात्कार होण्याची ही घटना आहे. उष:सूक्त आपण वाचले तर लक्षात येते अत्यंत अवघड परिस्थितीतून सत्य आणि ज्ञानाच्या मदतीने मार्ग काढण्याची प्रेरणा देणारे असे हे सूक्त आहे. ( ऋग्वेद - ४-५१-५८). मग वाटून जाते शंकर रामाणींच्या आयुष्यात पत्नी अत्यवस्थ असल्याने आलेली उदासी आणि त्यातून आशेचा प्रकाश दाखवणारे हे काव्य म्हणून त्यांच्या उषासूक्ताचा संदर्भ आला असावा का? उषा सूक्ता मध्ये एके ठिकाणी म्हटले आहे की उषादेवीने कृपा करण्यासाठी काही भाग्यवान लोकांना जागृत केले आहे आणि बाकी अभागी अज्ञानी लोक मात्र अंधारामध्ये, त्याच्या अगदी काळ्याकुट्ट गाभ्यामध्ये तसेच निजून आहेत. इथे आपल्याला तमाच्या तळाशी दिवे लागण्याचा संदर्भ मिळतो. 


ह्या कवितेशी माझा एक सुंदर अनुभव जोडला गेला आहे. अखिल भारतीय विज्ञान परिषदेचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन २०१६ मध्ये भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरमध्ये आयोजित केले गेले होते. अनेक थोर वैज्ञानिक उपस्थित होते. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे वैज्ञानिक उपस्थित असल्याने ते संमेलन तारांकित होते. संमेलनाला मी एक श्रोता म्हणून उपस्थित होते. संमेलनातील एका संध्याकाळी पद्मश्री पद्मजा फेणाणी ह्यांचा मंगलदीप हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. स्वतःच्या ह्या कार्यक्रमाचे त्या निवेदनही करतात. निवेदनात त्यांनी सांगितले की शंकर रामाणी ह्यांच्या ‘दिवे लागले रे’ ह्या गाण्याचे संगीत मला न्हाणीघरात सुचले आहे. असे सांगताना त्यांनी त्याचा संबंध ‘युरेका युरेका’ असे न्हाणीघरातून ओरडत येणाऱ्या आर्किमिडीजशी जोडला आणि नंतर गाणे संपल्यावर हे गाणे खरे तर एडिसनने म्हणायला पाहिजे होते अशी मिस्कील टिपणीही केली. 

त्यांचे दिवे लागले रे हे गाणे देखील अतिशय रंगले. अक्षरशः तमाच्या तळाशी दिवे लागण्याचा अनुभव उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आला असेल. त्या क्षणी वाटून गेले की हे विलक्षण आहे. केवळ शब्दांचा आणि सुरांचा, संगीताचा अविष्कार नाही. त्या पल्याडची अनुभूती देणारे असे काहीतरी आहे. 

‘दिवे लागले रे ‘ ही कविता माझी आवडती होतीच. ह्या अनुभवाने ती आणखी जवळची झाली. 

कवितेच्या वाचनाच्या आणि आनंदाच्या अनेक चैत्रवाटा आपल्या सर्वांना लाभो ह्या शुभेच्छांसह हा लेख, ही लेखमालिका दोन्हींसाठी इथेच थांबते आहे. 


Wednesday, 1 May 2024

स्वरगंधर्व सुधीर फडके

 एका तत्वनिष्ठ व सत्वशील, राष्ट्रभक्त, संघ स्वयंसेवकाची जीवन व कर्तृत्व कहाणी अतिशय प्रभावीरीत्या पडद्यावर साकार करण्याचे श्रेय योगेश देशपांडे आणि सर्व कलाकारांना द्यायला हवे. त्या वेळचा काळ, तेव्हाच साधेपणा, आयुष्यावरची श्रद्धा, खडतर कष्ट, अलौकिक प्रतिभा शक्ती  या साऱ्याचा प्रत्यय स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट पाहताना येतो. प्रत्येक मराठी माणसाने आणि विशेषतः तरुणांनी आवर्जून पहावा असा हा चित्रपट आहे. किती खडतर कष्टातून, ज्यात कधी कधी तर आत्महत्येचा देखील विचार मनात आला, पण त्यातून तरुन जाऊन आज अनेक पिढ्या लक्षात ठेवतील अशी विलक्षण संगीत साधना करणाऱ्या स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र आदर्शवत आहे. शब्दप्रभू माडगूळकरांच्या लेखणीत वसलेली सरस्वती आणि स्वर गंधर्व सुधीर फडके ह्यांचे संगीत संयोजन आणि स्वर यातून पिढ्यान पिढ्या लक्षात राहील असे गीत रामायण  साकार झाले. आज जेव्हा मराठी माणसाच्या मनात श्रीराम श्रीराम हे शब्द येतात, तेव्हा  त्याला आवाज सुधीर फडके ह्यांचा असतो.  

एखादे कर्तृत्ववान संपूर्ण जीवन पडद्यावर दाखवणे, ते ही अवघ्या 170 मिनिटांच्या अवधीत मांडणे हे खूपच कठीण काम आहे. योगेश देशपांडे यांनी ते अप्रतिम रित्या पूर्ण केले आहे असे म्हणता येईल. 

सुधीर फडके यांच्या घरी पूर्वांचलातील एक विद्यार्थी रहात असे. तो त्यांचा मानस पुत्रच होता. त्याविषयी कुठेतरी उल्लेख असायला हवा होता.  

आणखी एक वाटून गेले ते म्हणजे प्रत्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समोर सुधीर फडके जरूर म्हणतील की  अवश्य म्हणतील??

सर्वच  कलाकारांनी सुंदर भूमिका वठवल्या आहेत. अगदी लहान लहान लकबी आत्मसात करून पात्रे जिवंत केली आहेत.

तर जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट अवश्य पहा . बाकी  गाडगीळांनी घडवलेला हा दागिना देखील अस्सल घडला आहे यात शंकाच नाही!


Tuesday, 30 April 2024

लाडका फोन तो ...

 चैत्रमास…. होती कुठली तरी तिथी आणि ऊन मात्र वैशाख वणव्यातले होते. दिनांक नीटच लक्षात आहे. २४ /०४/२४. नाना पालकर स्मृती समिती ठाण्यात एक डायलिसिस सेंटर सुरू करते आहे. त्याची मीटिंग होती चार वाजता कोपरीला.

म्हणून रिक्षात बसून बैठकीसाठी निघाले. आता घोडबंदर रोडपासून कोपरी पर्यंत जायचं म्हणजे वेळच वेळ हातात. मग रिकामे बसून काय करायचं?

 तर खूप दिवसांपासून खुणावत असलेली ब्लॉग पोस्ट लिहायला घेतली. तिकडे फुललेल्या फुलांचे वर्णन लिहिण्यात मी रंगून गेले होते. सगळे सिग्नल्स लागत, ट्रॅफिक पार करत रिक्षा आपल्या गतीने जात होती. तरीही मी वेळेत पोचणार होते त्यामुळे मला काळजी नव्हती. रिक्षा आता साधारण पोचली होती तीन हात नाक्याजवळ..

तर आपण होतो फुलांच्या वर्णनाशी.. जंगलभर फुललेली ऱ्होडोडेंड्रॉन्स अजूनही डोळ्यांपुढे आणि मनात बहरली होती आणि इतक्यात …. म्हणजे आपण कौतुकाने जोपासलेले झाड असावे.. त्याला पहिली कळी आलेली असावी.. आणि आता कळी उमललेली असेल म्हणून आपण उत्सुकतेने पहाटे येऊन पाहावे तर… तर कोणीतरी आपल्या आधीच उठून ते फूल खुडून नेलेले असावे तसे झाले..

 आले का लक्षात काय झाले असेल ते? अहो.. ज्या फोनवर गुगल डॉक्युमेंट्स मध्ये मी टाईप करत होते, तो फोनच हातातून नाहीसा झाला होता!!

 क्षण भर तर मला कळलेच नाही की नक्की काय झाले ते आणि मग लक्षात आले की शेजारून बाईक वरुन जाणाऱ्या दोन मुलांपैकी एकाने माझ्या हातातला फोन हिसकावून नेला होता.

 मी ‘फोन फोन’ करून ओरडले. त्या भरधाव ट्रॅफिक मध्ये ते कोणालाही ऐकू गेले नाही. थोड्यावेळ रिक्षाने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण बाइकचा वेग खूप जास्त होता. झिगझॅग मोटरसायकल चालवत ते दोघं वेगाने निघून गेले. मला बाईकचा नंबर देखील पाहता आला नाही.

 लगेच रिक्षावाल्याला नौपाडा पोलीस स्टेशनला रिक्षा घ्यायला सांगितली. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तिथून त्या तक्रारीची कॉपी घेऊन वोडाफोन सेंटरमध्ये गेले. ते सिम कार्ड ब्लॉक करून, नवीन सिम ताब्यात घेतले. त्याच रिक्षाने घरी आले. लॅपटॉपवरुन तो फोन सिक्युअर केला. पण मग मनात आलं की नकोच रे बाबा.. आणि मग तो फॅक्टरी रीसेट देखील करून टाकला. कारण तसेही आधी गुगल लोकेशन बघितले तर ते दिसत नव्हतेच. चांगला गुगल पिक्सेल सिक्स होता. पण त्यापेक्षाही महत्त्वाचे होते ते हे की तो फोन मुलाने आणि सुनेने खूप प्रेमाने, आग्रहाने मला दिला होता. त्यामुळे तो गेल्याची हळहळ अजूनच जास्त वाटत राहिली. 

 आता ही हकीकत, स्वतःच्या वेडेपणाची कितीही लाज वाटली तरीही, मी आवर्जून सगळ्यांना सांगते आहे. त्यातून झालेच कोणी तर शहाणे होईल ही आशा आहे. 

 माझ्या झालेल्या चुका अशा होत्या -

1. रिक्षात एकटी असूनही मध्ये न बसता अगदी डाव्या बाजूला बसले होते.

2. दोन्ही हाताने टाईप आणि तेही फक्त हाताच्या अंगठ्याने टाईप करायची सवय असल्याने (त्या अर्थाने अंगठे बहाद्दरच!!) फोन हातात घट्ट धरलेला नव्हता.

3. मोटरसायकल झिगझॅग चालवली म्हणून नंबर दिसला नाही हे तर ठीकच आहे. पण मला त्या मुलाच्या शर्टचा रंग, त्याच्या बाईकचा रंग काही म्हणता काही लक्षात राहिले नाही. 

आता जे कोण भेटेल त्याला सगळी कहाणी मी सांगत असल्यामुळे मला अजून काही रोमहर्षक कहाण्या ऐकायला मिळाल्या.

 त्यातली एक अशी- एकजण नवऱ्याच्या मागे बसून मोटरसायकल वर जात होती. तिच्या हातातला फोन कापूरबावडी सर्कलच्या जवळपासच कुठेतरी हिसकावला गेला. त्या धक्क्याने ती पडली. मोटरसायकल पडली आणि जवळपास एक्सीडेंटच झाला.

 दुसरी घटना म्हणजे एक काका कापूरबावडी/ माजिवडा परिसरात स्टॉप वर उभे होते. फोन त्यांच्या शर्टच्या वरच्या खिशात होता. त्यांच्याजवळ पत्ता विचारण्यासाठी एक मोटरसायकल उभी राहिली. ते सिरियसली पत्ता समजावून सांगत असतानाच त्या मोटरसायकलवर मागे बसलेल्या मुलांनी त्यांच्या खिशातला फोन काढून घेतला. पण त्या काकांनी मोटरसायकलच्या मागे धरले व थोडे अंतर ते मोटारसायकल सोबत फरफटत गेले. आरडाओरडा झाला आणि घाबरून त्या मुलांनी फोन टाकून दिला. काकांना मात्र भरपूर लागले. 

सध्या अशा खूप घटना ऐकू येत आहेत. तर ह्या सगळ्या कहाण्यांचा सारांश की मी केल्या त्या चुका तुम्ही करू नका. रस्त्याने चालत असा, रिक्षात बसलेले असा, मोटरसायकल वर बसलेले असा .. आपला फोन आणि पाकीट सांभाळा. काळजी घ्या आणि मुख्य म्हणजे तुम्ही स्वतः सुरक्षित रहा!!


आता इतक्या रोमहर्षक प्रसंगावर लिहायला तर लागणारच ना!! आता मी लिहिलेल्याचे एखादया जुन्या आवडत्या कवितेशी साधर्म्य दिसले तर त्याला योगायोग मानू नका!! 


लाडका फोन तो होता माझा एक

 मिळणार तसा ना शोधून दुसरे लाख 

किती भराभरा तो साईट साऱ्या उघडी 

सर्च रिझल्टही देण्या वेळ मुळी ना दवडी 

किती सुंदर होता बदामी त्याचा रंग

 लावले कव्हर मी झाकण्या त्याचे अंग 

किती तरी फोन मी घेतले आजवरी 

पण हा होता कार्य कुशल ही भारी 

त्या घेऊन संगे गेले रिक्षामध्ये बसोन 

घेतला चोरट्याने हातातून हिसकावोन

मी ओरडले.. मग आले पोलिसांत जाऊन

नोंदविली तक्रार अन घेतले सिम बदलून

किती शोध शोधला कुठे ना परि तो दिसला

परतले घरी मी चेहरा ही माझा हिरमुसला

वाटते सारखे न जावे त्याच ठिकाणी 

काढून घेईल का फोन दुजाही कोणी

किती वाटले असे तरी स्वस्थ न बसते घरात 

बाहेर जाता फोन ठेवते पर्सच्या कप्प्यात 


Tuesday, 26 March 2024

राधा

आला कान्हा गोकुळ रमले
असे कुणी ना तेथे उरले
ज्याला न झाली रंगबाधा ||
ती ही रमली रंगी रंगली
रंगांच्याही पल्याड पोचली
आता निरंग झाली राधा ||

- वृंदा टिळक

Friday, 1 March 2024

शब्दरूप लेऊन फुलल्या - दर्पणी पाहता रुप ..

 शब्दरूप लेऊन फुलल्या 

मनातल्या मुक्या भावनांना शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत कविता लिहिली जाते. खरे तर लिहिलेल्या शब्दांच्या मधल्या अवकाशात कविता कितीतरी सांगत असते. या लेखमालिकेत आपण वाचणार आहोत, अशा कवितांविषयी. दोन शब्दांच्या मधल्या अवकाशाचा शोध घेण्याचा हा तोकडा प्रयत्न आहे. 

—--------------------------------------------------

प्रसन्न वातावरण आहे. सुखाची चाहूल लागण्याची शुभचिन्हे दिसू लागली आहेत. वारा रुणझुणत वाहत आहे. अगदीच मंद वारा वाहिला असता तर कदाचित कळलेदेखील नसते. सोसाट्याचा वारा आला असता तर त्रेधा तिरपीट उडाली असती. पण आत्ता कसा तो अगदी रुणझुणत सुखकारक होईल असा वाहतो आहे. घन गरजत बरसत आयो रे मधला तडतडाट आत्ता ऐकू येत नाही आहे तर घन घुणघुणत आहेत. घुणघुणत ह्या शब्दाने आठवण होते ती गुणगुणत ह्या शब्दाची आणि लहान बाळाला रमवण्यासाठी खुळखुळा वापरतात त्याची देखील. इतकाच सुखद आहे आत्ता मेघांचा आवाज. पण माझं मन मात्र ह्या कशातच रमत नाही आहे. मला आता त्या भवतारक कान्हाची भेट लवकरात लवकर घडवून द्या.

चंद्र आणि चांदण्याचा शीतल प्रकाश कोणाला आवडत नाही? चाफ्याच्या सुवासाने मन कसे प्रसन्न होते. चंदनाची शीतलता तर काय वर्णावी ?!! त्याच्या नुसत्या सुवासाने देखील सुखशीतल वाटते. मग चंदन प्रत्यक्ष अंगाला लावल्यावर तर किती चांगले वाटेल. पण नाही ना... तो देवकीनंदन भेटला नाही त्यामुळे मला हे काहीच आवडत नाही आहे. चंदनाने तर मला चटके बसल्यासारखे वाटत आहेत. भेटवा हो लवकर मला तो वनमाळी.

कोमल, मुलायम, सुगंधी फुलांची शय्या तुम्ही माझ्यासाठी तयार केली आहेत. मला मात्र आपण आगीवर झोपलो आहोत असेच वाटते आहे. ही आग लवकर विझवाल का हो? मला रिझवण्यासाठी तुम्ही तुमच्या मधुर आवाजात गाणी म्हणता आहात. तुमचे गाणे ऐकून कोकिळा देखील आपला मधुर स्वर त्यात मिसळत आहे. पण थांबवा हे सारे. मला ह्या कशानेच आणि कशाचेच सुख वाटत नाही आहे. रूप, गंध, नाद, स्पर्श ह्या सर्वांना आणि ह्या सगळ्याने सुखावणारे काही नकोच आहे मला आता.

एरवी कशातच मन रमले नाही की दर्पणात स्वतःचे रूप पाहण्यात तरी मन मग्न होऊन जाते. पण आत्ता त्या दर्पणाचा मन शांत करण्यासाठी काहीच उपयोग नाही. उलट दर्पणात पाहून त्याच्या भेटीची आतुरता अजूनच वाढते आहे. कारण दर्पणात पाहिल्यावर मला माझे नाही तर त्याचेच प्रतिबिंब दिसते आहे. कोणी केली अशी जादू? हा चकवा कोणी लावला? मन परत परत फिरून फिरून त्याच्या भेटीकडेच का ओढले जाते आहे? त्या विठ्ठलाचेच आहे हे काम.

विरहिणींची राणी म्हणावी अशी ही अप्रतिम विराणी कोणी लिहिली आहे हे सांगायला देखील लागू नये अशी त्या सिध्दहस्त कवीची नाममुद्रा ह्या कवितेवर उमटलेली आहे. 

शब्दांना उकार लावल्याने शब्द कसे लडिवाळ झाले आहेत पहा. कशाच्या तरी आधाराने, कशाला तरी धरून नुकतेच उभे राहू लागलेले गोंडस बाळ आपल्या पायाला धरून उभे राहावे आणि आपण प्रेमभराने त्याला उचलून कडेवर घ्यावे, तसे हे शब्द वाचताना वाटते.

ह्या लडिवाळ शब्दांना अजून मनमोहक करतो तो रचनेतला अनुप्रास. घन आहे तिथे कान्हा आहे, चंदन आहे तिथे देवकीनंदन आहे, चोळी, पोळी, वनमाळी आहे. वनमाळी देखील नुसते नाही तर कान्हो वनमाळी आहे.

कृष्णाचीच अनेक रूपे, अनेक नावे. माउलींनी म्हटलेच आहे, " अनंत रुपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी, बाप रखुमादेवीवरू खुण बाणली कैसी" 

शब्दांचा अनुप्रास ही तर फार वरवरची खूण झाली. त्या शब्दांच्या अर्थातून ज्ञानेश्वर माउली जे सुचवत आहेत ते पूर्णपणे समजून घ्यायला हवे. उदाहरणच द्यायचे तर अगदी पहिल्या कडव्यात कान्हा आहे. जीवनात रमणारा कान्हा आहे. उत्पत्ती आणि स्थितीचे कारण असणारे असे हे रमणे आहे. म्हणूनच तो भवतारक आहे. 

बाह्य संवेदनांपासून कवितेचा प्रवास आत्मभानापर्यंत पोचतो आहे असे वाटतानाच लक्षात येते की आता तर त्याही पलीकडे पोचणे आहे. अहंकाराचा पूर्ण लय झाला आहे. मी, माझा देह ही भावनाच नाहीशी झाली आहे. उरला आहे फक्त 'तो ' . 'असा मी' चा लय व्हायला अनेक जन्मांची साधना हवी, तेव्हा कुठे माझ्याजागी 'तो ' दिसणार आहे.

ही भावना माउलींनी अनेकवार वर्णन केली आहे. 'क्षेम देऊ गेले तंव .. मीचि मी एकली', ‘आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी' आणि अजून अनेकदा हे वर्णन आपण वाचतो. प्रत्येक वेळी तीच अनुभूती. श्रवण, कीर्तन, पादसेवन, स्मरण, अर्चन, वंदन, दास्य, सख्य ह्या सगळ्या पायऱ्या पार करून आत्मनिवेदनापर्यंत पोचणे ह्या शब्दांतून प्रतीत होते आहे. 

ज्ञानेश्वरांचे शब्दभांडार अपरंपार होते. सहसा कोणीही कविता लिहिताना तेच तेच शब्द कवितेत घेणार नाही. एकाच अर्थाचे अनेक शब्द भाषेत सापडतात . ते कवितेत योजले जातात. पण इथे माउली वेगी भेटवा आणि पोळे हे दोनदा लिहितात आणि लक्षात येते ती विरहाची तीव्रता आणि भेटीची आतुरता. पं. हृदयनाथांचे संगीत आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांचा आवाज ह्या विराणीशी इतके एकरूप झाले आहेत की ही विराणी मनात येताच, ती चाल आणि तो स्वर ह्या सकटच आठवते. 

गाणाऱ्यांसाठी तर हे गाणे म्हणजे अख्खे वर्कशॉप आहे. शब्द उच्चारावेत कसे, शब्दांतील भावना स्वरात व्यक्त कशी करावी त्याचा वस्तुपाठच जणू. घुणघुणा मधील पहिला घ ऐका, मेघांच्या आवाजाचा भास होतो की नाही?

ह्या लेखमालिकेच्या प्रस्तावनेत मी म्हटले आहे की दोन शब्दांमधील अवकाश शोधण्याचा हा तोकडा प्रयत्न आहे आणि ह्या वेळी ज्या कवितेविषयी, ज्ञानेश्वरांच्या विराणी विषयी लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे त्यातील शब्दांमधील अवकाश शोधण्यासाठी तर एक जन्म अपुराच...

—-------

घनु वाजे घुणघुणा ।

वारा वाजे रुणझुणा ।

भवतारकु हा कान्हा ।

वेगीं भेटवा कां ॥१॥

चांदवो चांदणें ।

चापेवो चंदनु । देवकी नंदनु ।

विण नावडे वो ॥२॥

चंदनाची चोळी ।

माझें सर्व अंग पोळी । कान्हो वनमाळी ।

वेगीं भेटवा कां ॥३॥

सुमनाची सेज । सीतळ वो निकी ।

पोळे आगिसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥

तुम्हीं गातसां सुस्वरें । ऐकोनि द्यावीं उत्तरें ।

कोकिळें वर्जावें तुम्हीं बाइयांनो ॥५॥

दर्पणीं पाहातां ।

रुप न दिसे वो आपुलें ।

बापरखुमादेविवर विठ्ठलें ।

मज ऐसें केलें ॥६॥


Monday, 22 January 2024

भारतीय नारी



मानवता के अक्षुण्ण प्रवाह की बहती हुई धार हूँ मैं
म्यानमें बड़ी सावधानी से रखीं तेज तलवार हूँ मै
मैं नारायणी हूं, फूल भी हूँ, चिनगारी भी हूँ
सुशीला: सुधीरा: समर्था: तेजस्विनी
ऐसी आज की भारतीय नारी हूँ
नहीं मेरे कर्तृत्व का दायरा स्व तक सीमित
स्व, परिवार, समाज और सृष्टी
मेरे हृदय मे अपनत्व हैं अपरिमित

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...