एका तत्वनिष्ठ व सत्वशील, राष्ट्रभक्त, संघ स्वयंसेवकाची जीवन व कर्तृत्व कहाणी अतिशय प्रभावीरीत्या पडद्यावर साकार करण्याचे श्रेय योगेश देशपांडे आणि सर्व कलाकारांना द्यायला हवे. त्या वेळचा काळ, तेव्हाच साधेपणा, आयुष्यावरची श्रद्धा, खडतर कष्ट, अलौकिक प्रतिभा शक्ती या साऱ्याचा प्रत्यय स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट पाहताना येतो. प्रत्येक मराठी माणसाने आणि विशेषतः तरुणांनी आवर्जून पहावा असा हा चित्रपट आहे. किती खडतर कष्टातून, ज्यात कधी कधी तर आत्महत्येचा देखील विचार मनात आला, पण त्यातून तरुन जाऊन आज अनेक पिढ्या लक्षात ठेवतील अशी विलक्षण संगीत साधना करणाऱ्या स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र आदर्शवत आहे. शब्दप्रभू माडगूळकरांच्या लेखणीत वसलेली सरस्वती आणि स्वर गंधर्व सुधीर फडके ह्यांचे संगीत संयोजन आणि स्वर यातून पिढ्यान पिढ्या लक्षात राहील असे गीत रामायण साकार झाले. आज जेव्हा मराठी माणसाच्या मनात श्रीराम श्रीराम हे शब्द येतात, तेव्हा त्याला आवाज सुधीर फडके ह्यांचा असतो.
एखादे कर्तृत्ववान संपूर्ण जीवन पडद्यावर दाखवणे, ते ही अवघ्या 170 मिनिटांच्या अवधीत मांडणे हे खूपच कठीण काम आहे. योगेश देशपांडे यांनी ते अप्रतिम रित्या पूर्ण केले आहे असे म्हणता येईल.
सुधीर फडके यांच्या घरी पूर्वांचलातील एक विद्यार्थी रहात असे. तो त्यांचा मानस पुत्रच होता. त्याविषयी कुठेतरी उल्लेख असायला हवा होता.
आणखी एक वाटून गेले ते म्हणजे प्रत्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समोर सुधीर फडके जरूर म्हणतील की अवश्य म्हणतील??
सर्वच कलाकारांनी सुंदर भूमिका वठवल्या आहेत. अगदी लहान लहान लकबी आत्मसात करून पात्रे जिवंत केली आहेत.
तर जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट अवश्य पहा . बाकी गाडगीळांनी घडवलेला हा दागिना देखील अस्सल घडला आहे यात शंकाच नाही!
No comments:
Post a Comment