Tuesday, 25 October 2016

उदंड आहे!!

 ऋतुगंध - वर्ष १०, अंक ४

खड्यांच्या गौरी घरात आणल्यावर त्यांना घरातील सगळ्या खोल्यांतून घेऊन जायचा सोहळा असायचा. जिच्या हातात गौरी असतील तिने विचारायचे असे, "इथे काय आहे?" आणि मग तिच्याबरोबर जी असेल तिने उत्तर द्यायचे, "उदंड आहे!" लहानपणी हसू यायचे. 

जरीकाठाचे परकर पोलके, हातातल्या किणकिणत्या बांगड्या, डोक्यातली कलाबूतीचा धागा गुंफलेली वेणी, बोटांवरची केशरीसर रंगलेली मेंदी, ह्या सगळ्याने मन गुंगलेले असायचे, पण तरी मनातल्या एखाद्या कोपऱ्यात जाणवून जायचे की त्या 'इथे काय आहे?' चे उत्तर इथे स्वयंपाकघर किंवा बैठक आहे असे नेमके न देता, 'उदंड आहे' असेच का म्हणायचे?? पण आता, एवढे आयुष्य जगून झाल्यानंतर, त्या 'उदंड आहे' मागचा भाव जाणवतो आहे.

राजश्री लेलेने ऋतुगंधच्या सिंगापूर सिरीजसाठी आणि मैत्री ह्या विषयावर लिहायला सांगितले तेव्हा मनात लख्खपणे हेच 'उदंड आहे' असे उमटले. आता ते 'उदंड' इतके अलवार आहे की त्याच्या नाजुकपणाला बाधा न येता, नेमक्या शब्दांत मांडता येणे मात्र खरेच अवघड. पण सांगायचा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?

भारतातून सिंगापूरला आलेल्या कोणासाठीही हे स्थित्यंतर हा आयुष्यातला मोठा बदल असतो. नुसती भौगोलिक जागा बदललेली नसते तर ज्या शहराच्या, नात्यांच्या, कर्तृत्वाच्या, संदर्भाच्या चौकटीत आजवर आयुष्य जगलो, ती चौकट अचानक नाहीशी झालेली असते. स्वातंत्र्य, मोकळेपण, पोरकेपण, एकटेपण अशा संमिश्र भावनांचा मनात नुसता कल्लोळ माजतो. आधीची सगळी उपाधी गळून पडलेली असते. तिथे केलेल्या बऱ्यावाईट कामांमुळे लाभलेली प्रसिद्धी लोप पावलेली असते. न कोणी ओळखणारे असते न कोणी रस्त्यात हाक मारणारे असते. रस्त्याने जाताना आपण असतो, रस्ता असतो आणि लोकांतातही सापडलेला एकांत असतो. सगळेच नवे असते. नवी जागा, नवी व्यवस्था, पुन्हा रुळणे आणि नव्याने रुजणे. आयुष्य जणू परत पहिल्या पानापासून पुन्हा सुरु करणे.

वाटते, ओल्या पंखांवरचे पाणी झाडताना पाखराला असेच वाटत असेल का? सर्व झटकून झाल्यावरचे हलके हलके की हे वाटणे म्हणजे ताप येऊन गेल्यावर वाटते तसे हल्लक हल्लक असते ???

सुरुवातीच्या ह्या मानसिक कल्लोळानंतर थोडं थांबून विचार केला तर आजवरच्या आयुष्यातील घटनांची, प्रसंगांची रिळे कधीही, कुठेही मनात उलगडायला लागतात. स्वत:तील उणीवा आणि क्षमता दोन्हीही समजत जातात. स्वत:ला सामोरे जाऊन, समंजस स्वीकाराच्या स्थितीला मन येऊन पोचले की आपोआपच, आत्तापर्यंत कधी नव्हती इतकी, स्वत:शी मैत्री जमत जाते. अशी मैत्री जमण्यासाठी आवश्यक असलेला अवकाश आणि वेळ मिळालेला असतो. अशी मैत्री जमलेल्या ह्या स्वत:बरोबरचे आयुष्य मग स्थिरावत जाते. 

असे स्थिरावलेले आयुष्य जगताना मधेच कधीतरी जाणवून जाते की इथला निसर्गदेखील आपला मित्र बनून गेला आहे. कधी अगदी प्रसन्न निळेभोर असलेले तर कधी भरून आलेल्या ढगांनी सावळे मायाळू झालेले आकाश आवडायला लागलेले असते. रोज एकदा तरी हजेरी लावणारा पाऊस आपले क्षेमकुशल पुसण्यासाठी आला आहे असे वाटायला लागते. त्या पावसाने झाडांची पाने जशी धुतली जाऊन साफ झालेली असतात तसेच मनही सगळा झाकोळ दूर होऊन प्रसन्न झालेले असते.

विषुववृत्तीय हवामानातले कडक ऊन, रोज येणारा पाऊस, दमट हवा ह्याला आपण सरावत जातो. सिंगापूरातील नेचर पार्कस, पार्क कनेक्टर्स, वेगवेगळे रिझरवायर्स, त्याच्या आजूबाजूला वसलेले पार्क्स हे सगळे तर अगदी जिवाभावाचे मित्र बनून जातात. शहरी वातावरणापासून अगदी वेगळया अशा ह्या वाटांवरून फिरणे किती आनंदाचे असते!

तो हिरवागार रंग, पानांतून गाळून येणारा सूर्यप्रकाश, ऊन सावलीची जाळी, पाखरांचे आवाज, फुलांचे, फळांचे वास, तळ्यातील पाण्यावर वाऱ्याच्या लहरीबरोबर उठणारे तरंग, सूर्य उगवताना आणि मावळताना आकाशात दिसणारी रंगपंचमी हे सगळे सगळे त्या वाटांवरून फिरताना आपल्याला लाभते आणि ही मैत्री अधिकच गहिरी बनत जाते.

माणसांना भेटायची ओढ तर प्रत्येकाला असतेच. त्यातही परदेशात स्वत:ची भाषा बोलणारे कोणी भेटणे फारच सुखाचे. सिंगापूरात महाराष्ट्र मंडळ नेमके हेच काम करते. अनेक वर्षांपूर्वी मी सिंगापूरात पहिल्यांदा मंडळाच्या संपर्कात आले ते गणपती उत्सवाच्या निमित्ताने. आम्ही संध्याकाळी आरतीसाठी गेलो होतो. तेव्हा तिथे गणपतीच फक्त माझ्या ओळखीच होता आणि बाकी सगळे लोक नवे आणि अनोळखी होते. पण अनोळखी असले तरी माझी भाषा बोलणारे लोक आसपास आहेत ह्यानेच मी आनंदात होते.

हळू हळू ओळखी होत गेल्या, कार्यक्रमांना नियमित जाणे, त्यात सहभागी होणे होऊ लागले. पाहतापाहता महाराष्ट्र मंडळ कधी सिंगापूरातील आयुष्याचा अविभाज्य भाग बनून गेले कळलेच नाही.

अनेकांशी ओळखी झाल्या. अनेकानेक उत्तम कार्यक्रमांचा आनंद घेता आला. अनेक उपक्रमात सहभागी होता आले. मानवी स्वभावाच्या अनेक छ्टा अनुभवता आल्या. महाराष्ट्र मंडळ, शब्दगंध, मंथन, ऋतुगंध, विवेकानंद सेवा संघ अशा व ह्याखेरीज अनेक वाटांनी मैत्र लाभत गेले, माझे आयुष्य समृद्ध करत गेले. ज्येष्ठांकडून तसेच तरुण आणि बालांकडूनदेखील कितीतरी गोष्टी शिकता आल्या.

सिंगापूरातील वास्तव्याला आणि माझ्या भावविश्वाला अर्थ देणारे हे मैत्र माझ्यासाठी फारच मोलाचे होते, आहे आणि राहील. आनंदाचे कितीतरी प्रसंग ह्या मैत्रीने उजळून गेले आणि कितीतरी अवघड प्रसंग ह्याच बळावर सहन करता आले. ह्या भावबंधांना ना नात्यांची नावे होती ना स्थळकाळाचे बंधन होते. 

सिंगापूरात जुळलेले आणि आता जगभरात विखुरलेले भावबंध आज देखील तेवढेच जिव्हाळ्याचे आहेत. सतत संपर्कात असण्या नसण्याने फरक न पडणारे असे हे मैत्र लाभणे माझ्यासाठी अपार भाग्याचे आहे.

सुरुवातीला जरी म्हणाले की ह्या ‘उदंड’ मैत्राला शब्दांत मांडणे अवघड असले तरी प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? पण आता हे सगळे लिहून झाल्यावर जाणवते आहे की आपल्या स्नेहसुगंधाने मनात सतत तेवत राहिलेल्या मैत्रीविषयी जे मला वाटतंय त्यातले शतांशानेही शब्दांत आले नाही. असो!

ऋतुगंध मैत्री विशेषांकाच्या वाचकांना अपार मैत्र लाभो आणि लाभलेले मैत्र निरपेक्ष स्नेहभावनेने शतपटीने समाजाला परतही करता येवो ह्याच शुभकामना! 


Friday, 29 April 2016

होपी नृत्य

पूर्ण जगाचे भले व्हावे म्हणून मंत्रसदृश्य गाणे म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली. क्षणभर मनात उमटून गेले, हे तर होपी भाषेतील 'सर्वेपि सुखिन: सन्तु' च आहे!

होपी: होपितू - शिनूमू अशा मूळ नावाचे प्रचलित रूप. होपीचा अर्थ आहे शांतताप्रेमी, सुसंस्कृत, सभ्य लोक. ईशान्य अरीझोनातील हे मूळ रहिवासी. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे होपी हे नुसते नाव नाही तर ती एक वृत्ती आहे. पृथ्वीचा, निसर्गाचा, सर्व जगाचा सांभाळ करण्याची, त्या विषयी आदर बाळगण्याची. होपी असणे म्हणजे नैतिकता आणि नीतिमूल्यांचे जतन करणे. पृथ्वीचा रक्षणकर्ता मसावच्या सूचनांनुसार निसर्गाशी, सृष्टीशी तादात्म्य पावलेले होपी लोक. 

जमिनीला अत्यंत पवित्र मानणारे हे लोक. जमिनीला सीमेत बांधणे, तिचे तुकडे पाडणे आणि त्यावर मालकी हक्क सांगणे हे ह्या लोकांना माहितीच नाही. Washington मधल्या Smithsonian - National Museum Of American Indian मध्ये त्यांची माहिती वाचली, एका परिषदेच्या निमित्ताने झालेल्या भाषणांचे काही तुकडे ऐकायला मिळाले आणि अक्षरश: थरारून जायला झाले. जमिनीविषयीचे असा पूज्य भाव आपण हरवूनच बसलो आहोत का? सीमारेषा न आखता, मालकीहक्क न सांगता, केवळ आमचे पूर्वज इथे राहिले म्हणून आम्ही इथे राहणार असे त्यांचे म्हणणे आहे. आज ईशान्य अरीझोनात त्यांचे reservation आहे आणि सगळी मिळून साधारण २०००० आसपास ह्या जमातीची संख्या आहे. 

Grand Canyon National Park मधल्या होपी हाउससमोर त्यांचा एक कार्यक्रम बघायला मिळाला. 

एक मातीचा चौथरा तयार केला होता. प्रथम सगळ्यांचे भले व्हावे म्हणून गायकाने केलेली मंत्रसदृश्य प्रार्थना, आळवणी. नंतर एक तालवाद्य आणि एक तंतुवाद्य वापरून काही हेलांच्या आणि काही सुरांच्या साथीने होणारे नृत्य. नृत्याच्या पोशाखात पक्ष्यांच्या पिसांचा वापर. पावसासाठी, पीक चांगले यावे म्हणून किंवा त्या परमतत्वाशी जोडणारा एक दुवा म्हणून सगळ्यासाठी त्यांच्याकडे नृत्य आहे. 

निसर्गाशी एकरूप होण्याचा भाव, कमीत कमी वाद्ये व कमीतकमी शब्दांच्या साथीने केलेले नृत्य पाहताना भारतातील आदिवासी नृत्याची आठवण येत होती. अखिल मानवजातीला जोडणारा एक अदृश्य धागा इथे क्षणमात्र आपले अस्तित्व जाणवून देतो हे खरेच. 
-वृंदा टिळक

मातीचा चौथरा





Wednesday, 27 April 2016

मेरी एलिझाबेथ जेन कोल्टर

मेरी एलिझाबेथ जेन कोल्टर -साउथ रीम -Grand Canyon ला जाऊन आल्यावर अनेक दिवस मनात गुंजत असलेले नाव. कोण होती मेरी कोल्टर? १८६९ साली जन्मलेली एक स्थापत्यशास्त्रज्ञ . त्या काळातल्या अगदी मोजक्या स्थापत्यशास्त्रज्ञ महिलांपैकी एक. केवळ हे किंवा तिच्या इमारती National Historic Landmark म्हणून मान्यता पावलेल्या आहेत हे, तिचे वैशिष्ट्य नाही. तर तिचे वैशिष्ट्य आहे तिचे काम आणि म्हणूनच ती तुमच्या मनात रुतून बसते. 

सर्वात आधी पाहीली ती Hermit's rest. कलत्या सोनेरी उन्हाच्या वेळी आम्ही तिथे पोचलो. समोर एक ओबड धोबड दगडांची कमान, त्यात टांगलेली एक जुनी, पुराणकालीन असावी अशी घंटा आणि त्या कमानीवर वेड्यावाकड्या अक्षरात लिहिलेले, 'hermit's rest' हे नाव. पुढे गेल्यावर वेगवेगळ्या आकारांचे दगड वापरून केलेले बांधकाम. मातीचे ढिगारे, दरीतल्या दगडांच्या रांगेत बेमालूम मिसळणारे ते खोलीचे दगड, कुठल्याही भिंतीचा पृष्ठभाग गुळगुळीत किंवा सम प्रतलात नाही. बांधकाम अगदी पुरातन वाटत होते आणि त्यात त्याचे ते हरमीट'स रेस्ट नाव. माझ्या मनात कोण्या एक शेकडो वर्षांपूर्वीच्या ऋषींच्या स्थानाची कथा पण तयार झाली आणि मग लगेच ही जागा भारतात असती तर तिथे उदबत्ती, धूप, फुले वाहिलेली आणि त्या स्थानाविषयी एखादी आख्यायिका सांगणारे कोणी नक्की भेटले असते असे येउन गेले. 


दुसऱ्या दिवशी मेरी कोल्टरचे बाकी काम बघताना लक्षात आले कि तिने बांधलेली वास्तू पाहताना जेवढी पुरातन भासते तेवढी प्राचीन नसतेच. शेकडो वर्षे जुने भासणारे हरमीट'स रेस्ट अवघ्या १०० वर्षांपूर्वी बांधले गेलेले आहे. आहे त्यापेक्षा कितीतरी पुरातन भासावे, आसपासच्या निसर्गात मिसळून जावे आणि स्थानिक कलांचा आणि संस्कृतीचा त्या बांधकामावर ठसा असावा ह्या तिन्ही बाबींविषयी घेतलेली दक्षता मेरीच्या कामात दिसून येते. 

Lookout Studio तर डोंगरकड्यात एवढा मिसळून गेलाय कि दगडांचा एक ढिगारा खाली दरीत वाकून बघत असेल असेच वाटते. चंद्राकृती कड्याच्या एका टोकाला असलेली ही वास्तू. नुसते तिच्या उघड्या Galary मधून दरीकडे पाहत राहणे कसे असेल ह्याची कल्पना केली तरी ती प्रगाढ शांतता मनात मुरत जाते. 


आडवे चिरे एकावर एक ठेवून बांधलेले होपी हाउस होपी ह्या अरीझोनाच्या आद्य रहिवाशांच्या पुरातन खेड्यातले असावे इतके जुने वाटते. 

 
आकाराने प्रचंड असलेल्या desert view watch towerची तेथील आद्य रहिवाशांच्या प्युएब्लो मनोऱ्यासारखी रचना. गोलाकार जिने, ओबडधोबड भिंती. वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या वेगवेगळ्या आकारांच्या खिडक्यांमधून येणारा प्रकाश आणि भिंतीवर असलेली खास चित्रशैलीतील चित्रे ह्या मनोऱ्याला त्याचे व्यक्तिमत्व बहाल करतात. तो उजेड त्या ओबड धोबड भिंतीवर, त्या चित्रांवर पडतो आणि सावली उजेडाचे एक अदभूत नाट्य निर्माण करतो. पूर्ण कामात कुठेही सिमेंट व लोखंड दिसणार नाही ह्याची काळजी घेतलेली आहे. सगळी इमारत दगड आणि मातीचीच असावी आणि शेकडो वर्षे जुनी असावी असे वाटत राहते. तिथून दिसणारे दरी कड्यांचे दृश्य तर अप्रतिम. 





आसपासच्या परिसरात मिसळून गेलेल्या आणि तिथल्या संस्कृतीतून उमलून आलेल्या रचना हे मेरी कोल्टरच्या कामाचे वैशिष्ट्य आणि त्याबद्दल तिला मानवंदना दिल्यावाचून राहवत नाही. धन्यवाद मेरी! अशीही वास्तूरचना करता येते असे तू दाखवून दिलेस. त्या भव्य, गंभीर, प्रशांत Grand Canyonला साजेशा मानवनिर्मित वास्तू तिथे उभ्या राहिल्या ह्याचे श्रेय इतिहास नेहमीच मेरीला देत राहील. 
-वृंदा टिळक

Wednesday, 20 April 2016

केनरोकुएन - एक मनभुली

जपान म्हणजे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रोनिक्स वस्तू, जपान म्हणजे बलाढ्य अर्थव्यवस्था, जपान म्हणजे हिरोशिमा/नागासाकीवर पडलेला अणूबॉम्ब, जपान म्हणजे किमोनो, जपान म्हणजे शिस्त आणि राष्ट्रभक्ती, अदब आणि नम्रता, जपान म्हणजे भूकंप आणि फुकुशिमा. . जपान म्हटले की आपल्या मनात हे सगळे येतेच. पण या खेरीज जपान म्हणजे साकुरा आणि मोमिजीसुध्दा!!!

आपल्या भारताप्रमाणेच अतिपूर्वेकडील जपानदेखील निसर्ग सौंदर्याने श्रीमंत आणि प्रत्येक ऋतूत आगळे वेगळे रूप धारण करणारा असा देश आहे. त्यातही एप्रिल आणि नोव्हेंबर हे दोन महिने जपानला अगदी आवर्जून भेट देण्यासाठीचेच मानले जातात. किंबहुना ह्या दोन महिन्यातले जपानचे रूप तुम्ही अनुभवले नसेल तर जपान पाहीलाच नाहीत म्हणा ना! 

मार्च अखेरीस वसंताचे स्वागत करत जापनीज प्लम बहरतात आणि मग सुरु होतो चेरी ब्लॉसमचा -साकुराचा उत्सव - हानामी!!शिशिरागमे ‘एकेक पान गळावया’ लागताना मनात अस्वस्थता दाटून येणे स्वाभाविकच आहे. पण त्या आधीच्या शरद ऋतूत, नोव्हेंबरच्या सुमारास पानांचे बदलणारे रंग न्याहाळणे मात्र अतीव आनंदाची अनुभूती देते. हवामानाच्या अंदाजानुसार कोणत्या भागातील झाडे अंदाजे कधी रंग बदलतील ह्याचे वेळापत्रकच प्रसिध्द होते आणि मग त्यानुसार प्रवासाचे बेत आखले जातात! 

रंग बदलणाऱ्या झाडात मोमिजी -जापनीज मेपल आपल्या सौंदर्याने प्रमुख स्थान पटकावते. मेपलच्या पानांची रचना तळहाताप्रमाणे असते. हिरव्या रंगापासून लाल रंगापर्यंत होणारा पानांचा प्रवास मध्ये अनेक रंग छटांची वळणे घेत जातो. एकाच झाडावर पानांच्या रंगाच्या विविध छटा आपल्याला पाहायला मिळतात. 

त्या खेरीज चमकदार पिवळा रंग धारण करणारे गिन्को वृक्ष ह्या ऋतूतील आणखी एक महत्वाचे सौदर्यस्थळ आहेत. पर्वतरांगांवर अन डोंगरउतारांवर विविध रंगांची उधळण करणारे नानाकामादो व कारामात्सू वृक्ष पाहताना ऋतूचे कूस बदलणे अक्षरश: अनुभवता येते! 

असा मोमीजीचा जपान ‘बघायला ‘ जाणारे लोक साधारणपणे टोक्यो, नारा, क्योटो, होक्काइडोला जातात. तेव्हा त्या विषयी न लिहिता चैत्रेयच्या ह्या अंकासाठी जपानच्या कानाझावा ह्या शहरातील केनरोकु एन बागेची ओळख करून देत आहे 

तोक्योच्या वायव्येला असणारे कनाझावा हे शहर जपानमधील इशिकावा भागाची राजधानी आहे. एदो कालात कानाझावा क्योतो आणि तोक्योच्या सारखेच प्रसिध्द शहर होतेच पण आजही इशिकावा भागातले उद्योगधंदे, संस्कृती ह्यांचे ते प्रमुख केंद्र आहे. 

आपल्याला कानाझावाचे पहिले दर्शन होते ते रेल्वे स्टेशन अत्याधुनिक आणि प्रचंड मोठे आहे. असंख्य चमचमत्या स्टील रॉड्सनी बनलेले स्टेशनचे डिझाईन पाहिल्यावर हे शहर तंत्रज्ञानासाठी प्रसिध्द असणार ह्याची खात्री पटते. बाहेरच्या रस्त्यांवर दुतर्फा असणारी, रंग बदलणारी झाडे आणि सुबक जपानी घरे पाहून मग नुसते तंत्रज्ञान नाही तर निसर्ग सौदर्य आणि जपानी परंपरा पण ह्या शहरात सुखनैव नांदते आहे ह्याची खूण पटवते!!!जपानमधील मोठ्या शहराची आधुनिकता आणि तरी एखाद्या छोट्या गावात जाणवणारी आत्मीयता इथे अनुभवता येते. 

कनाझावात कनाझावा कॅसल तसेच अनेक चांगली म्युझियम्स आहेत.
 

पण कनाझावातील सर्वात प्रेक्षणीय गोष्ट आहे केनरोकूएन -एक बाग. जपानी बागा प्रसिध्द आहेतच. जपानमधील सर्वोत्तम तीन बागांपैकी एक अशी ही केनरोकूएन. उत्कृष्ट बागेसाठी असलेले सहा निकष ही बाग अगदी सर्वार्थाने पूर्ण करते. अतिशय भव्य परिसर , शांतता, कलात्मकता, प्राचीनता , बागेत दिसणारी विविध सुंदर दृश्ये आणि पाण्याच्या वेगवेगळ्या रचना हे ते सहा निकष आहेत. म्हणूनच ह्या बागेचे नाव केनरोकुएन आहे. हे नाव आले आहे ते ११ व्या शतकातील एका चीनी कवीच्या रचनेचा संदर्भ घेऊन. त्या कवीने म्हटले होते की एका चांगल्या बागेची निर्मिती करणे ही फार अवघड गोष्ट आहे कारण त्यासाठी हे सहा निकष पूर्ण होणे गरजेचे आहे. केनरोकुएन हे नावच अभिमानाने सांगते आहे की ही बाग ह्या सर्व कसोट्यांना उतरणारी रम्य बाग आहे. 

सध्या ११. ४ हेक्टर परिसरात असलेली ही भव्य बाग काही शतके जुनी आहे. माएदा परिवाराची खाजगी बाग म्हणून ह्या बागेची १६२० च्या सुमारास निर्मिती करण्यास सुरुवात झाली. अनेकदा रचनेत बदल होत गेले. कधी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे तर कधी इतर आपत्तींमुळे बाग धोक्यात आली. पण पुन्हा पुन्हा ती उभारली गेली. नव्या सौदर्याने झळाळली. दर पिढीत तिच्या बदलणाऱ्या धन्यांच्या रुचीनुसार तिच्या रचनेत बदल होत राहिले. 

अखेरीस १८७४ मध्ये ती आम जनतेसाठी खुली झाली. इथे सध्या शेकडो झाडे आहेत. ह्या बागेत अनेक मानवनिर्मित तळी आहेत. बागेच्या केंद्रस्थानी असलेले काझुमी तळे हे सर्वात मोठे आणि नयनरम्य आहे. ते तळे म्हणजे जणू समुद्र आहे अशी कल्पना करून त्यावर मग बेट उभारण्यात आले. चिनी आणि जपानी परंपरेनुसार डोंगरांचा, पर्वतरांगांचा आभास निर्माण करण्यासाठी बागेत अनेक मोठाले खडक आहेत. 

काझुमी तळ्याशेजारी एक दगडी कंदील आहे. त्याचे नाव आहे कोतोजीतोरो. हा कोतोजितारो केनरोकुएनचे चिन्ह आहे. एका जपानी वाद्याप्रमाणे त्याची रचना भासते. 

ही बाग कानाझावा शहरातील एका छोट्या टेकडीवर वसलेली आहे. ह्या नैसर्गिक उंचीचा उपयोग करून घेत, बागेत पाण्याचे अनेक झरे, धबधबे, पाट, कालवे खेळवले आहेत. तसेच जपानमधील अतिशय जुन्या कारंज्यांपैकी एक कारंजे ह्या बागेत आहे. बागेच्या सौदर्याचा आस्वाद घेण्यासाठी जपानी परंपरेप्रमाणे काही चहा घरे देखील आज अनेक शतके अस्तित्वात आहेत. 

ह्या बागेतल्या वास्तू आपल्यासवे अनेक आख्यायिका नांदवत आहेत. अनेक शतकांपूर्वी काझुमि तळ्यावर असलेल्या बेटावर एक कुटी होती, ज्यातल्या ऋषीच्या आशीर्वादाने दीर्घायुष्य लाभायचे ही कथा असेल किंवा कनाझावाचे नाव कसे पडले त्याची कथा असेल! बागेत आजही एक विहीर आहे. अनेक शतकांपूर्वी एक शेतकरी म्हणे त्या विहिरीजवळ बटाटे धुण्यासाठी थांबला. तो विहिरीत बघतो तर काय जणू सोन्याचेच बुडबुडे विहिरीत येत होते. त्यावरून कानाझावा ह्या गावाचे नाव पडले. 

ह्या बागेत असलेला काईसेकी पागोडादेखील अनेक शतके जुना आहे. अनेक कथांचे जन्मस्थान आहे. त्याच्याजवळ असलेल्या धबधब्याचे नाव ठेवलेले आहे पाचू किंवा हिरवा!!आजूबाजूचा हिरवा रंग पाण्यात प्रतिबिंबित होताना सूर्याच्या किरणांनी पाणी चमकते ते मात्र खरोखरीच पाचूसारखेच दिसते . 

बागेत यामातो ताकेरू महाशयांचा पुतळा आहे. आख्यायिकेत आढळणारा हा वीरपुरुष आजदेखील अनेक कथा, कादंबऱ्या, चित्रपट, अनिमेशन्स, मान्गाज मध्ये आपले अस्तित्व टिकवून आहे! 

बागेतील ह्या सर्व मानव निर्मित रचना निसर्गात मिसळून जातील व बागेचे रूप खुलवतील अशी काळजी घेऊनच केल्या गेल्या आहेत. त्यामुळेच ही बाग जपानमधील नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती व मानवी बुध्दीचा अविष्कार ह्यांचा प्रत्यय देते. 

ही बाग कोणत्याही ऋतूत सुंदर दिसेल, पाहणाऱ्याला आकर्षून घेईल अशीच तिची रचना केली गेली आहे. वसंतात ती साकुराने -चेरी ब्लॉसमने फुलते. सर्वत्र पांढऱ्या, फिक्या गुलाबी रंगाच्या फुलांच्या घोसांनी आच्छादलेली झाडे दिसतात. ह्या वेळी असतो हानामीचा उत्सव. फुलांची शोभा पहात काव्य आणि हास्य विनोद यांचा सुर्हुदांसमवेत आस्वाद घेण्याचा हा उत्सव. ह्या वेळी बागेत सर्वांना विनामुल्य प्रवेश असतो. 

त्या नंतर काही काळाने जून महिन्यात बाग आयरिस च्या निळ्या जांभळ्या फुलांनी बहरून जाते. नोव्हेंबरमध्ये बागेतील जापनीज मेपल रंग बदलतात. त्यांच्या रंगांच्या छटा तरी किती! उशीरापर्यंत रंग बदलण्याची टाळाटाळ करणारी जिद्दी हिरवी पाने, आपल्या सोनेरी झळाळीने उजळून गेलेली पिवळी पाने, लाजरी फिकी गुलाबी पाने तर स्वतःच्या सौंदर्याचा सार्थ अभिमान बाळगत केशरी रंग मिरवणारी रुपगर्विता पाने, अनुभवी लाल पाने आणि हे सारे तळ्याच्या पार्श्वभूमीवर पाहताना आपण आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय सौंदर्य क्षण अनुभवत आहोत अशी निजखूण मनात उमटून जाते. 

त्याच सुमारास बागेत तयारी सुरु होते ती येणाऱ्या दीर्घ बर्फाळ काळाची. त्या काळात बर्फ पडून झाडांना त्रास होऊ नये ह्यासाठी, त्यावर बांबूंच्या सहाय्याने दोरांनी बांधून तयार केलेल्या जणू भव्य टोप्याच घातल्या जातात. त्याला म्हणतात ‘युकीझुरी ‘. युकीझुरी ही केनरोकुएन ची खासियत आता जणू हिवाळ्याचेच चिन्ह बनली आहे. हिवाळ्यात ह्या उतरत्या बांबूंच्या रचनेवरून बर्फ घरंगळते. झाडे, पाने आत सुरक्षित राहतात. जशी थंडी वाढेल तसे ह्या टोप्यांवर बर्फ जमत जाते आणि मग बागेत एक प्रगाढ शांतता अनुभवता येते. झाडेही जणू ध्यानस्थ असतात. 

वर्षभर सौदर्यातील विविधतेने बाग सर्वांना आकर्षून घेते. जपानी बागांचे वैशिष्ट्य असलेले तळया -ओढ्यांवरचे वेगवेगळ्या रचनेचे आणि आकारांचे पूल बागेच्या सौदर्यात भर घालतात. बागेतील अनेक पायवाटा, वळणे, चढ -उतार बागेच्या भव्यतेबरोबरच एकांताचादेखील अनुभव देतात. झाडांतून गाळून येणाऱ्या प्रकाशात आणि सावल्यांच्या जाळीत मन भुलत जाते. 

आम्ही केनरोकुएन बघायला गेलो त्या दिवशी पावसाची भुरभूर चालू होती. सूर्याचा उजेड पण त्या शिरव्यामुळे मवाळ झाला होता. थंडी तर होतीच. दूरच्या पर्वतरांगांवर रात्री पडलेला बर्फ अजूनही चमकत होता. त्या सगळ्यात केनरोकूएन स्वत:च एक कविता बनली होती. केनरोकूएन आता कायमची मनात कोरली गेली आहे. आयुष्यात जोपर्यंत स्मरणशक्ती साथ देईल तोपर्यंत केनरोकुएनचे अद्भुत सौदर्य आणि रंगवैभव एक अत्यंत हृद्य खजिना बनून आठवत राहील हे नक्की!!

(चैत्रेय २०१६ मध्ये प्रकाशित)

Tuesday, 12 April 2016

मोहनगरी लास वेगास- भाग २


आणि एवढे सगळे लिहून झाल्यावर प्रश्न उरलाच कि मग तुम्ही लास वेगासला काय केले? काय केले ते सांगण्याआधी … फार पूर्वी, म्हणजे जेव्हा विवाहित स्त्रिया कपाळावर कुंकू लावायच्या आणि त्याला सौभाग्याचे प्रतिकदेखील समजायच्या तेव्हा असा प्रघात होता, कि हळदीकुंकवाच्या आमंत्रणाला नाही म्हणू नये. त्याच न्यायाने कोणी काही विचारलेच तर लिहायला व बोलायला नाही म्हणू नये असाही संकेत मानायचा झालाच तर मग नुसते काय केले सांगून कसे भागेल? सविस्तर सारे उलगडून सांगायला नको? ऐकाच तर मग!


(लास वेगासचे वर्णन मर्यादेत आणि मर्यादित करायचे शिवाय ते मुक्तपिठीय लेखनाकडे झुकू द्यायचे नाही ही मोठीच कसरत आहे, ह्याची नोंद घ्यावी, कृपया!)


आयुष्य म्हणजे काही फेस्बूकाची पोस्ट नसतंय, सगळे काही परफेक्ट असायला. आम्हाला दोन दिवस लास वेगास आणि तीन दिवस grand canyon करायचे होते. पण बुकिंग करताना झालेल्या गोंधळामूळे तीन दिवस लास वेगास आणि दोन दिवस grand canyon असे झाले. 


त्यामूळे झाले काय कि मन अतृप्त असताना grand canyonहून निघायला लागले आणि राहायचे नसताना लास वेगास मध्ये जास्त राहावे लागले. 


पण आता एकदा असे झालेच आहे म्हणाल्यावर मग मात्र मी माझ्या कुवतीनुसार (!!!) लास वेगासचा पुरेपूर आनंद घेतला. खूप भटकलो. लहान मुलांच्या उत्सुकतेने सगळी रोषणाई, सजावट पाहिली. वेगवेगळ्या ठिकाणी जाउन खाल्ले. त्या शोधात दोन भारतीय शाकाहारी restaurantस देखील सापडली. शिवाय एका दुकानात विगन आईस्क्रीम मिळाल्याने मग त्यालाही तिथे असेपर्यंत रोज जाउन न्याय देणे हे कर्तव्यच नव्हते का माझे?

 
Volcano show at Mirage


खूप तऱ्हेतऱ्हेची माणसे पाहिली. अंगाखांद्यावरील ब्रँडेड गोष्टी, पर्सेस, फोन्स ह्यातून झळकणारी श्रीमंती मिरवणाऱ्या श्रीमंतांपासून ते 'होमलेस आहोत मदत करा' अशा पाट्या समोर ठेवून बसलेल्या विमनस्क लोकांपर्यंत अनेक प्रकार पाहिले. 


लास वेगास मधील नशा, उत्साह व जिवंतपणा अंगात भरून घ्यायला जगभरातून येणारे नवतरुण, तरुणींचे लोंढे आणि त्यांचा मुक्त आनंदाविष्कार पाहिला. 



केवळ जुगार खेळण्यासाठी जगभरातून येणारे लोक, त्यात तरुण, प्रौढ, म्हातारे सगळे होते. सांगण्याजोगी गोष्ट अशी कि तिथे अजिबात भेदभाव नाही. तुम्ही कोणत्याही देशातील, खंडातील, वर्णाचे, वयाचे असा, पैसे लावणार असाल तर तुम्हाला समान संधी मिळेल. अर्थात हे दुरून केलेले निरीक्षण. अंदरकी बात त्या जुगारदेवालाच माहिती!


उत्साहवर्धक पेयांचा आस्वाद घेतल्यामुळे स्वत:च्याच बायकोशीही लोक हसून बोलायला लागले तर कळणारच नाही ना कि ते नवराबायकोच आहेत म्हणून असा विचार माझ्या मनात आला. तेवढ्यात माझ्या समोरच्या जोडप्यातील स्त्री तिच्या सहचराशी अगदी हळूवार आवाजात काहीतरी कुजबुजली. मी अंदाज बांधला कि जर का ती त्याची मैत्रीण असेल तर मग तो ही तिच्याजवळ जाउन अगदी हळूवार आवाजात ती काय म्हणाली ते विचारणार आणि ती जर का त्याची बायको असेल तर … तेवढ्यात तो जोरात 'whattttt ' म्हणून म्हणाला आणि मग काही संभ्रमाला जागाच उरली नाही!! मंगला गोडबोले ह्यांनी लिहिलेलेच आहे, नवरा म्हणजे 'त वरून ताकभात' तर सोडाच पण जोरात, सगळ्यांना ऐकू जाइल असे, "कोणता भात म्हणालीस? '" असे विचारणार!




लोकांचा आणखी एक प्रकार म्हणजे कॅसिनोत खेळताना स्थलकालाचे भान विसरलेली लोके. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कॅसिनोतूनच सगळ्या हॉटेलमध्ये जायचे रस्ते असल्याने, जा ये करणारी इतकी माणसे पाहून वाटले कि त्यांच्यामुळे खेळणार्यांना डिस्टर्ब नाही का होणार? पण मग लक्षात आले कि एकाग्रता कशी असावी ह्याचे ते खेळाडू अप्रतिम उदाहरण आहेत. आजूबाजूला काहीही होवो, त्यांचे लक्ष अजिबात विचलित व्हायचे नाही. एकदा तर तिथे चक्क लाईट गेले. अर्थात लाईट गेल्यावर त्याला नुसते 'लाईट गेले' असे म्हणाले तर ती अमेरिका कसली? तिथे त्याला पॉशपैकी पॉवर औटेज म्हणतात. तर असे ते पॉवर ओउटेज झाले, बाकी कॅसिनोमध्ये अंधार झाला तरी ज्या भागात लाईट होते तिथे लोक अजिबात लक्ष ढळू न देता खेळतच राहिले. 

तसेही कॅसिनोत मंद मंद दिवे लावलेले असतात. नैसर्गिक उजेड अजिबात येणार नाही ह्याचीही काळजी घेतलेली असते. त्यामुळे खेळताना दिवस रात्रीचे भान रहायचा प्रश्नच नाही. 


चौकाचौकात स्पायडर, सुपर असे सगळे मॅनस  ( इथे manचे अनेकवचन men होऊ शकत नाही ह्याची नोंद घ्यावी. . कृपयाच!), तसेच सगळ्या पऱ्या, राजकन्या शिवाय सांगाडे, भूते असे सगळे पोशाख घातलेली माणसे हजर असायची तुमच्याबरोबर फोटो काढू द्यायला तत्पर पण असायची. तोच त्यांचा पैसे मिळवण्याचा मार्ग होता. अजूनही बऱ्याच प्रकारचे फोटो काढून मिळत होते. लास वेगास हे सर्व प्रकारची कल्पनाशक्ती वापरून ती प्रत्यक्षात आणणारे गाव आहे एवढे म्हटले कि अजून वर्णन करायलाच नको! (वि. सूचना - आता आम्ही असे फोटो काढून घेतले का विचारू नये. आम्ही त्यातल्या कोणा बरोबरही फोटो काढून घेतले नाहीत. )


Fall Of Atlantis fountain show at Caesar's palace forum shops



हिंडताना तिथे एक छान दुकान सापडले. Stupidiotic नावाचे. नावातच सगळे काही आलेले एवढे समर्पक नाव दुसरे कोणते नसेल! अनेक चित्र विचित्र गोष्टी तिथे होत्या. battery operated फोर्क होता म्हणजे spaghetti आपोआप त्याच्याभोवती गुंडाळली जाइल. Jigsaw puzzle च्या आकारात sandwich कापणारा कटर होता. पंजाच्या आकाराच्या खुर्च्या होत्या. डोक्याभोवती गुंडाळून जाउन मग तोंडात द्रव पदार्थ नेणारी straw होती. चित्र विचित्र फलक होते. अत्यंत सडेतोड संदेश लिहिलेले कपडे, मोजे होते. 




लास वेगासमधल्या बस ड्रायवर्सचा विशेष उल्लेख करायला हवा. स्पीकरवरून ते चक्क सगळ्या बसशी सामायिक गप्पा, हास्य विनोददेखील करत होते. 


एकूणात लास वेगासमध्ये इतके दिवस काय करणार असा प्रश्न सुरुवातीला आम्हालाही पडला होता तरी आम्ही लास वेगासमध्येही आनंदात राहू शकलो. लास वेगासने स्वत:ची प्रतिमा family destination अशी देखील(!!!) व्हावी, असे प्रयत्न सुरु केले आहेत, त्याचा आम्हाला फायदा झाला. पण खरे तर लास वेगासमध्ये जर का तुम्हाला स्लॉट मशिन्स आणि उत्साहवर्धक पेयांमध्ये गम्य नसेल तर मग दोन दिवस लई झाले. माणूस दिव्यांची रोषणाई आणि इतर जत्रा किती वेळ बघणार? 

                                                                           Venetian


आता जाता जाता अजून एक - परतताना एयर पोर्टवर जातानाच्या टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले कि कसे वाटले लास वेगास? तर मी सांगितले, "लोक खूप उत्साही, आनंदी आणि मदतीला तत्पर असलेले आणि मित्रत्वपूर्ण असे आहेत, ते आवडले. " त्यावर ती हसून म्हणाली, " they are supposed to be like that when they are here!!"


Wednesday, 6 April 2016

मोहनगरी लास वेगास - भाग १

आद्यकाळापासून आम्हां दोघांचाही मद्य आणि द्यूत ह्या दोन्हीशी दुरान्वयानेही संबंध नसताना आणि सद्यस्थितीतही त्या संबंधात काही बदल झालेला नसताना, आम्ही दोघे लास वेगास मध्ये जाउन काय करणार ह्याचे कुतूहल बाकी सगळ्यांनाच काय, पण आम्हालाही होते!


आम्ही लास वेगास ला रात्री पोचलो. विमान खाली उतरत असतानाच सगळीकडे लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया दिसायला लागली. विमानतळ जिथे आहे त्या भागाचे नावच मूळी paradise असल्यावर हे स्वाभाविकच!


लास वेगास च्या नावाचा अर्थ आहे 'meadow -of green grass'. आता त्या ग्रीन चे माहिती नाही पण "ग्रास" चा संबंध मात्र कायम राहिला असावा! Ref- गांजाला ग्रास देखील म्हणतात!)


हवा म्हणाल तर फारच विचित्र होती. वयानुसार वेगवेगळी वाटणारी. ३५ वर्षे वयाच्या खालच्यांना बहुतेक अतिशय उष्ण वाटत असणार. एक पातळ दोरी आणि त्या दोरीला झेपेल एवढ्याच वजनाचा कापडाचा तुकडा परिधान करून तरुण लोक आरामात वावरत होते. मात्र तुमचे वय जास्त असेल तर मग मात्र तुम्हाला थंडी वाजून जॅकेट्स, स्वेटर्स घालायला लागतील असली हवा! नेटवर पहिले तर तापमान साधारण १३डिग्रीज च्या आसपास होते. 


द स्ट्रीप नावाचा भाग अनेक उत्तमोत्तम इमारती आणि रोषणाईच्या नव्या नव्या आश्चर्याने ओसंडून वाहणारा. आता हे नाव कसे पडले ह्या विषयी उगाच भलभलते तर्क करू नका… जमिनीचा एक पट्टा ह्या अर्थी पडले असणार! एकाहून एक सुंदर इमारती, त्यात असलेली भव्य हॉटेल्स, प्रत्येक हॉटेलचा आपापला कॅसिनो … ती एक वेगळीच दुनिया आहे हे नक्की. 


कॅसिनोमध्ये रात्रंदिवस दिवे चमचमत आमंत्रण देणारी अनेक यंत्रे. शिवाय सिनेमात पहिली होती तशी अनेक टेबल्स. त्या प्रत्येक टेबलवर एक युनिफोर्ममधील डीलर. त्या टेबल्सभोवती एकाग्र होऊन साधना करीत बसलेले अनेक जण. त्यांना तऱ्हेतऱ्हेची मद्ये पुरवणाऱ्या वेट्रेसेस. इथे एक गंमत जाणवली. सगळ्या डीलर्सना अगदी गळाबंद कॉलर व बो असलेला लांब हातांचा शर्ट व फूलपँट असा युनिफॉर्म आणि मग तो झालेला कापडाचा अपव्यय भरून निघावा असे कपडे घातलेल्या वेट्रेसेस. 


सगळ्या हॉटेल्सचा निवासी भागाकडे किंवा त्या हॉटेलमध्ये काही विशेष बाग किंवा शो असेल तर तिथे जाण्याचा मार्ग कसिनोस मधूनच. त्यामूळे जाता येता सतत तुम्हाला खेळ, खेळणारे आणि खेळवणारे दिसणारच. 


एकदा आमची सकाळी लवकरची फ्लाईट होती म्हणून आम्ही ६ च्या सुमारास निघालो, तर तेव्हाही कॅसिनो चालूच. मी एका टेबलवरील डीलरला विचारले तर तिने मस्त उत्तर दिले. ती म्हणाली, कोणीही केव्हाही आले तरी त्यांना खायला आणि खेळायला मिळालेच पाहिजे म्हणून हे सगळे २४ तास चालूच असते!"


शहरभर उत्साहवर्धक पेयांची लयलूट असल्याने उत्साही लोक भरपूर. उत्साह अगदी फसफसून वाहत असतो. नंतर उत्साह करून दमलेले, खेळून हरलेले लोकही जागोजागी दिसतात. होमलेस आहे म्हणून मदत करा अशा पाट्या समोर ठेवून पैसे मागणारे तर कित्येक ठिकाणी. उत्साह आनंदाची परमावधी होऊन जमिनीवर लोळलेले लोकही दिसतात. 


Bellagio नावाच्या हॉटेलचा कारंज्यांचा शो, मिराजचा volcanoes चा, Caesar's Palaceचा Fall Of Atlantis, Wynn resortsचा Lake of Dreams, Circus Circus मधील ऍक्रोबॅटीकस हे सगळेच शोज नयनरम्य. दर तासाने किंवा ठराविक वेळी हे शोज असतात. ह्या शिवाय रस्त्यावर अनेक खेळ चालू असतात. तऱ्हे -तऱ्हेची वाद्ये वाजवणारे, वेगवेगळ्या कॅरेक्टरचे पोशाख केलेले, ऍक्रोबॅट्स, जादूगार ह्या सगळ्यांनी एकदम जिवंत वातावरण असते. 


                                                               Bellagio fountain show


                                                              Volcano show at Mirage

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुरवलेल्या उत्तम सुविधा हे ह्या शहराचे वैशिष्ट्य आहे. अनेक ठिकाणी दोन दोन तीन तीन हॉटेल्सच्या अशा आपापल्या मोनोरेल्स व ट्राम्स आहेत. शहरात फिरायचे झाले तर अनेक बसेस आहेत. ८ $ चे तिकीट काढले तर तुम्ही २४ तास हवे तितक्यांदा बस प्रवास करू शकता. 



जगभरातील श्रीमंत वर्गात नावाजलेल्या brands ची दुकाने इथे पाहायला मिळतात. प्रत्येक हॉटेलचा ambiance एकेक थीमवर आधारलेला असा केलेला आहे. मिराज मधले ट्रोपिकल फोरेस्ट, Caesar's Palace चा ढगांसकट खरा भासणारा आकाशाचा घुमट, Luxorचे pyramid आणि sphynx, New York New York चे Statue Of Liberty सकट उभे केलेले New York, हॉटेल Paris चा भव्य Eiffel Towerअशी अनेक उदाहरणे. हे सगळे बघायला आणि हिंडायला हाताशी वेळ मात्र हवा.



                                                                                  Luxor

                                                                   NewYork NewYork 


                                                                                Excalibur


Freemont street हा जुन्या लास वेगासमधील रस्ता एकदम स्वत:चे व्यक्तिमत्व असलेला. zip-line, indoor flying, रस्त्यावर चाललेले जादूचे खेळ, भविष्य सांगणारे, तांदुळावर नाव लिहून देणारे असे सगळे बघायला मिळते. हे सगळे वर्णन ऐकून हा रस्ता लहान मुलांना घेऊन जाण्याच्या योग्यतेचा आहे अशी तुमची समजूत झाली तर मात्र ती एकदम चुकीची आहे!!!



अमेरिकेत आणखी एका गोष्टीसाठी लास वेगास प्रसिद्ध आहे. सोपे लग्न व डायवोर्स साठी. त्यामुळे लग्न लावून मिळणारी अनेक chapels, bride-to -be sash घालून मैत्रिणींच्या घोळक्यात bachelorette पार्टी साजरी करत असलेल्या मुली, लग्न करून आपापल्या वेडिंग ड्रेस मधेच हिंडायला आलेले वधूवर हे अगदी सर्रास दिसणारे दृश्य आहे. 


एकूणच हे शहर आगळेवेगळे आहे हे खरे. "What happens in Las Vegas stays in Las Vegas!" ह्या वाक्यातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी ह्या Sin City कडे झेपावणारे माणसांचे लोंढे, सतत चालू असणारा जुगार, त्यातून होणारी पैशांची प्रचंड उलाढाल व अर्थकारण सगळेच आगळेवेगळे. 


महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...