आणि एवढे सगळे लिहून झाल्यावर प्रश्न उरलाच कि मग तुम्ही लास वेगासला काय केले? काय केले ते सांगण्याआधी … फार पूर्वी, म्हणजे जेव्हा विवाहित स्त्रिया कपाळावर कुंकू लावायच्या आणि त्याला सौभाग्याचे प्रतिकदेखील समजायच्या तेव्हा असा प्रघात होता, कि हळदीकुंकवाच्या आमंत्रणाला नाही म्हणू नये. त्याच न्यायाने कोणी काही विचारलेच तर लिहायला व बोलायला नाही म्हणू नये असाही संकेत मानायचा झालाच तर मग नुसते काय केले सांगून कसे भागेल? सविस्तर सारे उलगडून सांगायला नको? ऐकाच तर मग!
(लास वेगासचे वर्णन मर्यादेत आणि मर्यादित करायचे शिवाय ते मुक्तपिठीय लेखनाकडे झुकू द्यायचे नाही ही मोठीच कसरत आहे, ह्याची नोंद घ्यावी, कृपया!)
आयुष्य म्हणजे काही फेस्बूकाची पोस्ट नसतंय, सगळे काही परफेक्ट असायला. आम्हाला दोन दिवस लास वेगास आणि तीन दिवस grand canyon करायचे होते. पण बुकिंग करताना झालेल्या गोंधळामूळे तीन दिवस लास वेगास आणि दोन दिवस grand canyon असे झाले.
त्यामूळे झाले काय कि मन अतृप्त असताना grand canyonहून निघायला लागले आणि राहायचे नसताना लास वेगास मध्ये जास्त राहावे लागले.
पण आता एकदा असे झालेच आहे म्हणाल्यावर मग मात्र मी माझ्या कुवतीनुसार (!!!) लास वेगासचा पुरेपूर आनंद घेतला. खूप भटकलो. लहान मुलांच्या उत्सुकतेने सगळी रोषणाई, सजावट पाहिली. वेगवेगळ्या ठिकाणी जाउन खाल्ले. त्या शोधात दोन भारतीय शाकाहारी restaurantस देखील सापडली. शिवाय एका दुकानात विगन आईस्क्रीम मिळाल्याने मग त्यालाही तिथे असेपर्यंत रोज जाउन न्याय देणे हे कर्तव्यच नव्हते का माझे?
Volcano show at Mirage
खूप तऱ्हेतऱ्हेची माणसे पाहिली. अंगाखांद्यावरील ब्रँडेड गोष्टी, पर्सेस, फोन्स ह्यातून झळकणारी श्रीमंती मिरवणाऱ्या श्रीमंतांपासून ते 'होमलेस आहोत मदत करा' अशा पाट्या समोर ठेवून बसलेल्या विमनस्क लोकांपर्यंत अनेक प्रकार पाहिले.
लास वेगास मधील नशा, उत्साह व जिवंतपणा अंगात भरून घ्यायला जगभरातून येणारे नवतरुण, तरुणींचे लोंढे आणि त्यांचा मुक्त आनंदाविष्कार पाहिला.
केवळ जुगार खेळण्यासाठी जगभरातून येणारे लोक, त्यात तरुण, प्रौढ, म्हातारे सगळे होते. सांगण्याजोगी गोष्ट अशी कि तिथे अजिबात भेदभाव नाही. तुम्ही कोणत्याही देशातील, खंडातील, वर्णाचे, वयाचे असा, पैसे लावणार असाल तर तुम्हाला समान संधी मिळेल. अर्थात हे दुरून केलेले निरीक्षण. अंदरकी बात त्या जुगारदेवालाच माहिती!
उत्साहवर्धक पेयांचा आस्वाद घेतल्यामुळे स्वत:च्याच बायकोशीही लोक हसून बोलायला लागले तर कळणारच नाही ना कि ते नवराबायकोच आहेत म्हणून असा विचार माझ्या मनात आला. तेवढ्यात माझ्या समोरच्या जोडप्यातील स्त्री तिच्या सहचराशी अगदी हळूवार आवाजात काहीतरी कुजबुजली. मी अंदाज बांधला कि जर का ती त्याची मैत्रीण असेल तर मग तो ही तिच्याजवळ जाउन अगदी हळूवार आवाजात ती काय म्हणाली ते विचारणार आणि ती जर का त्याची बायको असेल तर … तेवढ्यात तो जोरात 'whattttt ' म्हणून म्हणाला आणि मग काही संभ्रमाला जागाच उरली नाही!! मंगला गोडबोले ह्यांनी लिहिलेलेच आहे, नवरा म्हणजे 'त वरून ताकभात' तर सोडाच पण जोरात, सगळ्यांना ऐकू जाइल असे, "कोणता भात म्हणालीस? '" असे विचारणार!
लोकांचा आणखी एक प्रकार म्हणजे कॅसिनोत खेळताना स्थलकालाचे भान विसरलेली लोके. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कॅसिनोतूनच सगळ्या हॉटेलमध्ये जायचे रस्ते असल्याने, जा ये करणारी इतकी माणसे पाहून वाटले कि त्यांच्यामुळे खेळणार्यांना डिस्टर्ब नाही का होणार? पण मग लक्षात आले कि एकाग्रता कशी असावी ह्याचे ते खेळाडू अप्रतिम उदाहरण आहेत. आजूबाजूला काहीही होवो, त्यांचे लक्ष अजिबात विचलित व्हायचे नाही. एकदा तर तिथे चक्क लाईट गेले. अर्थात लाईट गेल्यावर त्याला नुसते 'लाईट गेले' असे म्हणाले तर ती अमेरिका कसली? तिथे त्याला पॉशपैकी पॉवर औटेज म्हणतात. तर असे ते पॉवर ओउटेज झाले, बाकी कॅसिनोमध्ये अंधार झाला तरी ज्या भागात लाईट होते तिथे लोक अजिबात लक्ष ढळू न देता खेळतच राहिले.
तसेही कॅसिनोत मंद मंद दिवे लावलेले असतात. नैसर्गिक उजेड अजिबात येणार नाही ह्याचीही काळजी घेतलेली असते. त्यामुळे खेळताना दिवस रात्रीचे भान रहायचा प्रश्नच नाही.
चौकाचौकात स्पायडर, सुपर असे सगळे मॅनस ( इथे manचे अनेकवचन men होऊ शकत नाही ह्याची नोंद घ्यावी. . कृपयाच!), तसेच सगळ्या पऱ्या, राजकन्या शिवाय सांगाडे, भूते असे सगळे पोशाख घातलेली माणसे हजर असायची तुमच्याबरोबर फोटो काढू द्यायला तत्पर पण असायची. तोच त्यांचा पैसे मिळवण्याचा मार्ग होता. अजूनही बऱ्याच प्रकारचे फोटो काढून मिळत होते. लास वेगास हे सर्व प्रकारची कल्पनाशक्ती वापरून ती प्रत्यक्षात आणणारे गाव आहे एवढे म्हटले कि अजून वर्णन करायलाच नको! (वि. सूचना - आता आम्ही असे फोटो काढून घेतले का विचारू नये. आम्ही त्यातल्या कोणा बरोबरही फोटो काढून घेतले नाहीत. )
हिंडताना तिथे एक छान दुकान सापडले. Stupidiotic नावाचे. नावातच सगळे काही आलेले एवढे समर्पक नाव दुसरे कोणते नसेल! अनेक चित्र विचित्र गोष्टी तिथे होत्या. battery operated फोर्क होता म्हणजे spaghetti आपोआप त्याच्याभोवती गुंडाळली जाइल. Jigsaw puzzle च्या आकारात sandwich कापणारा कटर होता. पंजाच्या आकाराच्या खुर्च्या होत्या. डोक्याभोवती गुंडाळून जाउन मग तोंडात द्रव पदार्थ नेणारी straw होती. चित्र विचित्र फलक होते. अत्यंत सडेतोड संदेश लिहिलेले कपडे, मोजे होते.
लास वेगासमधल्या बस ड्रायवर्सचा विशेष उल्लेख करायला हवा. स्पीकरवरून ते चक्क सगळ्या बसशी सामायिक गप्पा, हास्य विनोददेखील करत होते.
एकूणात लास वेगासमध्ये इतके दिवस काय करणार असा प्रश्न सुरुवातीला आम्हालाही पडला होता तरी आम्ही लास वेगासमध्येही आनंदात राहू शकलो. लास वेगासने स्वत:ची प्रतिमा family destination अशी देखील(!!!) व्हावी, असे प्रयत्न सुरु केले आहेत, त्याचा आम्हाला फायदा झाला. पण खरे तर लास वेगासमध्ये जर का तुम्हाला स्लॉट मशिन्स आणि उत्साहवर्धक पेयांमध्ये गम्य नसेल तर मग दोन दिवस लई झाले. माणूस दिव्यांची रोषणाई आणि इतर जत्रा किती वेळ बघणार?
Venetianआता जाता जाता अजून एक - परतताना एयर पोर्टवर जातानाच्या टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले कि कसे वाटले लास वेगास? तर मी सांगितले, "लोक खूप उत्साही, आनंदी आणि मदतीला तत्पर असलेले आणि मित्रत्वपूर्ण असे आहेत, ते आवडले. " त्यावर ती हसून म्हणाली, " they are supposed to be like that when they are here!!"






No comments:
Post a Comment