Wednesday, 20 April 2016

केनरोकुएन - एक मनभुली

जपान म्हणजे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रोनिक्स वस्तू, जपान म्हणजे बलाढ्य अर्थव्यवस्था, जपान म्हणजे हिरोशिमा/नागासाकीवर पडलेला अणूबॉम्ब, जपान म्हणजे किमोनो, जपान म्हणजे शिस्त आणि राष्ट्रभक्ती, अदब आणि नम्रता, जपान म्हणजे भूकंप आणि फुकुशिमा. . जपान म्हटले की आपल्या मनात हे सगळे येतेच. पण या खेरीज जपान म्हणजे साकुरा आणि मोमिजीसुध्दा!!!

आपल्या भारताप्रमाणेच अतिपूर्वेकडील जपानदेखील निसर्ग सौंदर्याने श्रीमंत आणि प्रत्येक ऋतूत आगळे वेगळे रूप धारण करणारा असा देश आहे. त्यातही एप्रिल आणि नोव्हेंबर हे दोन महिने जपानला अगदी आवर्जून भेट देण्यासाठीचेच मानले जातात. किंबहुना ह्या दोन महिन्यातले जपानचे रूप तुम्ही अनुभवले नसेल तर जपान पाहीलाच नाहीत म्हणा ना! 

मार्च अखेरीस वसंताचे स्वागत करत जापनीज प्लम बहरतात आणि मग सुरु होतो चेरी ब्लॉसमचा -साकुराचा उत्सव - हानामी!!शिशिरागमे ‘एकेक पान गळावया’ लागताना मनात अस्वस्थता दाटून येणे स्वाभाविकच आहे. पण त्या आधीच्या शरद ऋतूत, नोव्हेंबरच्या सुमारास पानांचे बदलणारे रंग न्याहाळणे मात्र अतीव आनंदाची अनुभूती देते. हवामानाच्या अंदाजानुसार कोणत्या भागातील झाडे अंदाजे कधी रंग बदलतील ह्याचे वेळापत्रकच प्रसिध्द होते आणि मग त्यानुसार प्रवासाचे बेत आखले जातात! 

रंग बदलणाऱ्या झाडात मोमिजी -जापनीज मेपल आपल्या सौंदर्याने प्रमुख स्थान पटकावते. मेपलच्या पानांची रचना तळहाताप्रमाणे असते. हिरव्या रंगापासून लाल रंगापर्यंत होणारा पानांचा प्रवास मध्ये अनेक रंग छटांची वळणे घेत जातो. एकाच झाडावर पानांच्या रंगाच्या विविध छटा आपल्याला पाहायला मिळतात. 

त्या खेरीज चमकदार पिवळा रंग धारण करणारे गिन्को वृक्ष ह्या ऋतूतील आणखी एक महत्वाचे सौदर्यस्थळ आहेत. पर्वतरांगांवर अन डोंगरउतारांवर विविध रंगांची उधळण करणारे नानाकामादो व कारामात्सू वृक्ष पाहताना ऋतूचे कूस बदलणे अक्षरश: अनुभवता येते! 

असा मोमीजीचा जपान ‘बघायला ‘ जाणारे लोक साधारणपणे टोक्यो, नारा, क्योटो, होक्काइडोला जातात. तेव्हा त्या विषयी न लिहिता चैत्रेयच्या ह्या अंकासाठी जपानच्या कानाझावा ह्या शहरातील केनरोकु एन बागेची ओळख करून देत आहे 

तोक्योच्या वायव्येला असणारे कनाझावा हे शहर जपानमधील इशिकावा भागाची राजधानी आहे. एदो कालात कानाझावा क्योतो आणि तोक्योच्या सारखेच प्रसिध्द शहर होतेच पण आजही इशिकावा भागातले उद्योगधंदे, संस्कृती ह्यांचे ते प्रमुख केंद्र आहे. 

आपल्याला कानाझावाचे पहिले दर्शन होते ते रेल्वे स्टेशन अत्याधुनिक आणि प्रचंड मोठे आहे. असंख्य चमचमत्या स्टील रॉड्सनी बनलेले स्टेशनचे डिझाईन पाहिल्यावर हे शहर तंत्रज्ञानासाठी प्रसिध्द असणार ह्याची खात्री पटते. बाहेरच्या रस्त्यांवर दुतर्फा असणारी, रंग बदलणारी झाडे आणि सुबक जपानी घरे पाहून मग नुसते तंत्रज्ञान नाही तर निसर्ग सौदर्य आणि जपानी परंपरा पण ह्या शहरात सुखनैव नांदते आहे ह्याची खूण पटवते!!!जपानमधील मोठ्या शहराची आधुनिकता आणि तरी एखाद्या छोट्या गावात जाणवणारी आत्मीयता इथे अनुभवता येते. 

कनाझावात कनाझावा कॅसल तसेच अनेक चांगली म्युझियम्स आहेत.
 

पण कनाझावातील सर्वात प्रेक्षणीय गोष्ट आहे केनरोकूएन -एक बाग. जपानी बागा प्रसिध्द आहेतच. जपानमधील सर्वोत्तम तीन बागांपैकी एक अशी ही केनरोकूएन. उत्कृष्ट बागेसाठी असलेले सहा निकष ही बाग अगदी सर्वार्थाने पूर्ण करते. अतिशय भव्य परिसर , शांतता, कलात्मकता, प्राचीनता , बागेत दिसणारी विविध सुंदर दृश्ये आणि पाण्याच्या वेगवेगळ्या रचना हे ते सहा निकष आहेत. म्हणूनच ह्या बागेचे नाव केनरोकुएन आहे. हे नाव आले आहे ते ११ व्या शतकातील एका चीनी कवीच्या रचनेचा संदर्भ घेऊन. त्या कवीने म्हटले होते की एका चांगल्या बागेची निर्मिती करणे ही फार अवघड गोष्ट आहे कारण त्यासाठी हे सहा निकष पूर्ण होणे गरजेचे आहे. केनरोकुएन हे नावच अभिमानाने सांगते आहे की ही बाग ह्या सर्व कसोट्यांना उतरणारी रम्य बाग आहे. 

सध्या ११. ४ हेक्टर परिसरात असलेली ही भव्य बाग काही शतके जुनी आहे. माएदा परिवाराची खाजगी बाग म्हणून ह्या बागेची १६२० च्या सुमारास निर्मिती करण्यास सुरुवात झाली. अनेकदा रचनेत बदल होत गेले. कधी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे तर कधी इतर आपत्तींमुळे बाग धोक्यात आली. पण पुन्हा पुन्हा ती उभारली गेली. नव्या सौदर्याने झळाळली. दर पिढीत तिच्या बदलणाऱ्या धन्यांच्या रुचीनुसार तिच्या रचनेत बदल होत राहिले. 

अखेरीस १८७४ मध्ये ती आम जनतेसाठी खुली झाली. इथे सध्या शेकडो झाडे आहेत. ह्या बागेत अनेक मानवनिर्मित तळी आहेत. बागेच्या केंद्रस्थानी असलेले काझुमी तळे हे सर्वात मोठे आणि नयनरम्य आहे. ते तळे म्हणजे जणू समुद्र आहे अशी कल्पना करून त्यावर मग बेट उभारण्यात आले. चिनी आणि जपानी परंपरेनुसार डोंगरांचा, पर्वतरांगांचा आभास निर्माण करण्यासाठी बागेत अनेक मोठाले खडक आहेत. 

काझुमी तळ्याशेजारी एक दगडी कंदील आहे. त्याचे नाव आहे कोतोजीतोरो. हा कोतोजितारो केनरोकुएनचे चिन्ह आहे. एका जपानी वाद्याप्रमाणे त्याची रचना भासते. 

ही बाग कानाझावा शहरातील एका छोट्या टेकडीवर वसलेली आहे. ह्या नैसर्गिक उंचीचा उपयोग करून घेत, बागेत पाण्याचे अनेक झरे, धबधबे, पाट, कालवे खेळवले आहेत. तसेच जपानमधील अतिशय जुन्या कारंज्यांपैकी एक कारंजे ह्या बागेत आहे. बागेच्या सौदर्याचा आस्वाद घेण्यासाठी जपानी परंपरेप्रमाणे काही चहा घरे देखील आज अनेक शतके अस्तित्वात आहेत. 

ह्या बागेतल्या वास्तू आपल्यासवे अनेक आख्यायिका नांदवत आहेत. अनेक शतकांपूर्वी काझुमि तळ्यावर असलेल्या बेटावर एक कुटी होती, ज्यातल्या ऋषीच्या आशीर्वादाने दीर्घायुष्य लाभायचे ही कथा असेल किंवा कनाझावाचे नाव कसे पडले त्याची कथा असेल! बागेत आजही एक विहीर आहे. अनेक शतकांपूर्वी एक शेतकरी म्हणे त्या विहिरीजवळ बटाटे धुण्यासाठी थांबला. तो विहिरीत बघतो तर काय जणू सोन्याचेच बुडबुडे विहिरीत येत होते. त्यावरून कानाझावा ह्या गावाचे नाव पडले. 

ह्या बागेत असलेला काईसेकी पागोडादेखील अनेक शतके जुना आहे. अनेक कथांचे जन्मस्थान आहे. त्याच्याजवळ असलेल्या धबधब्याचे नाव ठेवलेले आहे पाचू किंवा हिरवा!!आजूबाजूचा हिरवा रंग पाण्यात प्रतिबिंबित होताना सूर्याच्या किरणांनी पाणी चमकते ते मात्र खरोखरीच पाचूसारखेच दिसते . 

बागेत यामातो ताकेरू महाशयांचा पुतळा आहे. आख्यायिकेत आढळणारा हा वीरपुरुष आजदेखील अनेक कथा, कादंबऱ्या, चित्रपट, अनिमेशन्स, मान्गाज मध्ये आपले अस्तित्व टिकवून आहे! 

बागेतील ह्या सर्व मानव निर्मित रचना निसर्गात मिसळून जातील व बागेचे रूप खुलवतील अशी काळजी घेऊनच केल्या गेल्या आहेत. त्यामुळेच ही बाग जपानमधील नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती व मानवी बुध्दीचा अविष्कार ह्यांचा प्रत्यय देते. 

ही बाग कोणत्याही ऋतूत सुंदर दिसेल, पाहणाऱ्याला आकर्षून घेईल अशीच तिची रचना केली गेली आहे. वसंतात ती साकुराने -चेरी ब्लॉसमने फुलते. सर्वत्र पांढऱ्या, फिक्या गुलाबी रंगाच्या फुलांच्या घोसांनी आच्छादलेली झाडे दिसतात. ह्या वेळी असतो हानामीचा उत्सव. फुलांची शोभा पहात काव्य आणि हास्य विनोद यांचा सुर्हुदांसमवेत आस्वाद घेण्याचा हा उत्सव. ह्या वेळी बागेत सर्वांना विनामुल्य प्रवेश असतो. 

त्या नंतर काही काळाने जून महिन्यात बाग आयरिस च्या निळ्या जांभळ्या फुलांनी बहरून जाते. नोव्हेंबरमध्ये बागेतील जापनीज मेपल रंग बदलतात. त्यांच्या रंगांच्या छटा तरी किती! उशीरापर्यंत रंग बदलण्याची टाळाटाळ करणारी जिद्दी हिरवी पाने, आपल्या सोनेरी झळाळीने उजळून गेलेली पिवळी पाने, लाजरी फिकी गुलाबी पाने तर स्वतःच्या सौंदर्याचा सार्थ अभिमान बाळगत केशरी रंग मिरवणारी रुपगर्विता पाने, अनुभवी लाल पाने आणि हे सारे तळ्याच्या पार्श्वभूमीवर पाहताना आपण आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय सौंदर्य क्षण अनुभवत आहोत अशी निजखूण मनात उमटून जाते. 

त्याच सुमारास बागेत तयारी सुरु होते ती येणाऱ्या दीर्घ बर्फाळ काळाची. त्या काळात बर्फ पडून झाडांना त्रास होऊ नये ह्यासाठी, त्यावर बांबूंच्या सहाय्याने दोरांनी बांधून तयार केलेल्या जणू भव्य टोप्याच घातल्या जातात. त्याला म्हणतात ‘युकीझुरी ‘. युकीझुरी ही केनरोकुएन ची खासियत आता जणू हिवाळ्याचेच चिन्ह बनली आहे. हिवाळ्यात ह्या उतरत्या बांबूंच्या रचनेवरून बर्फ घरंगळते. झाडे, पाने आत सुरक्षित राहतात. जशी थंडी वाढेल तसे ह्या टोप्यांवर बर्फ जमत जाते आणि मग बागेत एक प्रगाढ शांतता अनुभवता येते. झाडेही जणू ध्यानस्थ असतात. 

वर्षभर सौदर्यातील विविधतेने बाग सर्वांना आकर्षून घेते. जपानी बागांचे वैशिष्ट्य असलेले तळया -ओढ्यांवरचे वेगवेगळ्या रचनेचे आणि आकारांचे पूल बागेच्या सौदर्यात भर घालतात. बागेतील अनेक पायवाटा, वळणे, चढ -उतार बागेच्या भव्यतेबरोबरच एकांताचादेखील अनुभव देतात. झाडांतून गाळून येणाऱ्या प्रकाशात आणि सावल्यांच्या जाळीत मन भुलत जाते. 

आम्ही केनरोकुएन बघायला गेलो त्या दिवशी पावसाची भुरभूर चालू होती. सूर्याचा उजेड पण त्या शिरव्यामुळे मवाळ झाला होता. थंडी तर होतीच. दूरच्या पर्वतरांगांवर रात्री पडलेला बर्फ अजूनही चमकत होता. त्या सगळ्यात केनरोकूएन स्वत:च एक कविता बनली होती. केनरोकूएन आता कायमची मनात कोरली गेली आहे. आयुष्यात जोपर्यंत स्मरणशक्ती साथ देईल तोपर्यंत केनरोकुएनचे अद्भुत सौदर्य आणि रंगवैभव एक अत्यंत हृद्य खजिना बनून आठवत राहील हे नक्की!!

(चैत्रेय २०१६ मध्ये प्रकाशित)

No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...