Saturday, 15 December 2012

ऋतुगंध शिशिर २००८ संपादकीय

स्नेहीजनहो नमस्कार,
ऋतुचक्रातला हा शेवटचा महिना.बोचऱ्या थंडीतून,गळणाऱ्या पानातुन वसंताकडे आशेने पहाणारा. अव्याहत चालणारे सृष्टीचक्र, अनंत काळापर्यन्त असेच चालत रहाणार आहे ह्याची ग्वाही देणारा.तत्कालीन संकटांनी खचुन न जाता,भविष्याकडे उमेदीने जाण्याची शिकवण देणारा.
मानवी आयुष्यासाठी हे ऋतुचक्र किती दिलासा देणारे आहे, नाही का? कितीही अवघड काळ आलेला असला, तरी तो लवकरच संपेल आणि मग येईल वसंत असे सोनेरी भविष्याचे स्वप्न दाखवणारे असे हे ऋतुचक्र.
सध्याच्या जागतिक मंदीच्या काळात निराश न होता, तग धरून रहाण्यासाठी,कडाक्याच्या थंडीतही चिकाटीने आला दिवस निभावून नेत, वसंताकडे वाटचाल करण्याची तयारी करणाऱ्या झाडांची जिजीविषा आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे.
ह्या संपादकीय समितीचाही हा शेवटचा अंक.ह्या वर्षभरात आपण अनेक नवी सदरे सुरू केली. यशस्वीरित्या वर्षभर चालवली.
समाज-जीवनाचे शिल्पकार ह्या सदरातून श्री.प्रफ़ुल्ल पेंढारकर ह्यांनी अनेक महनीय व्यक्तीमत्वांची अप्रकाशित बाजूही दाखवली.समर्थ समाजाच्या निर्मितीसाठी ह्या महान व्यक्तींचे कार्य आपल्याला प्रेरणादायी आहे, ह्यात शंकाच नाही..
डॉ रुपाली गोंधळेकर ह्यांनी ऋतुचर्या ह्या सदरातून ऋतुनुरूप आहारा-विहाराविषयी शास्त्रीय माहिती अगदी सोप्या शब्दांत आपल्या वाचकांसाठी दिली.
श्री.धनंजय बोरकर ह्यांनी केलेला काव्यानुवाद रसिकांची दाद मिळवून गेला..
अनेक मान्यवर लेखकांनी आपले साहित्य ऋतुगंध साठी पाठवले.आपल्या सभासदांनीही आपल्या लेखन कौशल्याचा प्रत्यय दिला.आपल्या बाल सभासदांनीही आपली चित्रकला प्रस्तुत केली.
पुर्णपणे लहान मुलांसाठी असलेला अंक, एका बालचित्रकाराने केलेल्या मुखपृष्ठासह प्रकाशित करण्याचा अभिनव उपक्रम आपण केला.
आपण सुरु केलेले मिसळ-पाव हे सदर लोकप्रिय झाले. वाचकांनी ह्या शैलीचे,ह्या कल्पनेचे उत्स्फ़ुर्त स्वागत केले. वाचकांना इब्लिसराव आपलासा वाटायला लागला. येणारे अनुभव इब्लिसरावांच्या भुमिकेतून कसे दिसतील,ह्याचे कल्पनाचित्र मनात उभे राहू लागले.श्री.अरुण मनोहर यांनी इब्लिसराव कोरियाला गेले तर, अशी कल्पना करून लिहिलेले "कोर्या रे"असाच आनंददायी वाचनानुभव देऊन जाते.
मराठी भाषा काळाच्या ओघात टिकेल का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो.पण महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्याही बाहेर चालणारे अनेक कार्यक्रम,उपक्रम, अशी शंका घेणे देखील चुकीचे आहे, हेच सिद्ध करतात, नाही का?
ऋतुगंध असाच एक अभिमानास्पद उपक्रम आहे.संपादकीय समितीतल्या आम्हा सर्वांना ह्या उपक्रमाचा एक भाग होता आले,ह्याचा अतिशय आनंद व अभिमान आहे.
आज,वर्षाच्या शेवटी,आपला निरोप घेताना, आपण दिलेल्या प्रतिसादाने,केलेल्या कौतुकाने,दाखवलेल्या आपुलकीने,संपादकीय समिती भारावून गेली आहे.
भविष्यातही ऋतुगंध वर आपण असेच प्रेमाचा अविरत वर्षाव करित रहाल,ही खात्री आहेच.
निरोपासाठी आज मनात आहेत,शांता शेळके ह्यांच्या ओळी,
 असेन मी,नसेन मी,तरी असेल गीत हे,
 फ़ुला-फ़ुलांत येथल्या,उद्या हसेल गीत हे!
शुभंभवतु॥
-वृंदा टिळक.
ऋतुगंध शिशिर २००८

Monday, 15 October 2012

ऋतुगंध हेमंत -२००८ संपादकीय

स्नेहीजनहो नमस्कार,

 ऋतुगंध-हेमंत हा बाल विशेषांक म्हणून आपल्यापूढे सादर करताना अतिशय आनंद होत आहे. नोव्हेंबर-डिसेंबर मधे शाळांना सुट्ट्या असतात, तेव्हा हा अंक मुलांच्या हातात असणार आहे हे विशेष.
इथे वाढणाऱ्या मुलांना मराठी ही अभ्यासाची भाषा नसतेच, खूपदा संपर्काची देखील नसते. मराठी लिहायची वा वाचायची त्यांना आवश्यकता भासत नाही. मग मराठी उरते,ती केवळ बोली-भाषा म्हणून..ते देखील घरात मराठी बोलली जात असेल तरच. अशा परिस्थितीत मराठीशी,मुलांचे भावबंध जुळावेत, ह्या साठीचा हा अल्पसा प्रयत्न आहे.
मराठी---जगातल्या समृद्ध भाषांपैकी एक.अनेक शतकांची परंपरा असलेली.हिच्याविषयी,"अमृतातेहि पैजा जिंके"असे सार्थ वर्णन ज्ञानेश्वरांनी केलेलेच आहे.वि.म.कुलकर्णींच्या शब्दात सांगायचे तर,
माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित
ज्ञानोबांची तुकयाची मुक्तेशाची जनाईची 
माझी मराठी गोडी रामदास शिवाजीची 
'या रे, या रे अवघे जण, हाक मायमराठीची 
बंध खळाळा गळाले साक्ष भीमेच्या पाण्याची 
डफ तुणतुणे घेऊन उभी शाहीर मंडळी 
मुजर्‍याची मानकरी वीरांची ही मायबोली 
नांगराचा चाले फाळ अभंगाच्या तालावर 
कोवळीक विसावली पहाटेच्या जात्यावर 
हिचे स्वरुप देखणे हिची चाल तडफेची 
हिच्या नेत्री प्रभा दाटे सात्विकाची, कांचनाची 
कृष्णा गोदा सिंधुजळ हिची वाढवती कांती 
आचार्यांचे आर्शिवाद हिच्या मुखी वेद होती 
माझ्या मराठीची थोरी नित्य नवे रुप दावी 
अवनत होई माथा मुखी उमटते ओवी 

अशा मराठीशी इथल्या मुलांचे भावबंध जुळावेत, असा प्रयत्न करण्यामागे,मराठी भाषा केवळ अशा प्रयत्नांमुळेच जगेल, असा अभिनिवेष अजिबात नाही.
आपल्या मुलांना मराठी न आल्याने मराठी भाषेचे नुकसान होणार नाही आहे, तर आपल्या मुलांचे नुकसान होणार आहे. म्हणजे असे की, रोपे एका मातीतून उपटुन, दुसऱ्या मातीत आणुन रुजवायचा आपण प्रयत्न करतो आहोत. नव्या मातीला मुळे काही काळाने सरावतीलही. पण त्या मातीतले काय योग्य,काय अयोग्य, काय ग्रहण करायचे, ह्याचा विवेक, फक्त त्याच मुळांना असू शकतो, की जी स्वत:निरोगी आहेत,भक्कम आहेत.
आणि ही मुळे भक्कम कधी असतील, जेव्हा त्यांचे आत्मभान जागृत असेल.आपल्या अस्मितेची त्यांना ओळख करून देण्यासाठी मराठी भाषा महत्वाची भुमिका बजावू शकते.
आम्हांला कल्पना आहे, की बहुसंख्य मूले मराठी वाचु शकत नाहीत. पण हा अंक त्यांना वाचून दाखवायची जबाबदारी आम्ही त्यांच्या पालकांवर टाकत आहोत. ह्या निमित्ताने, मुलांबरोबरचा पालकांचा होणारा हा वाचन प्रकल्प, खूप आनंददायी असेल अशी आम्हाला खात्री आहे.
ह्या अंकासाठी चित्रे काढून पाठवणाऱ्या सर्व कलाकारांचे अभिनंदन. बाल कलाकाराने काढलेले चित्र मुखपृष्ठावर देताना आम्हाला अभिमान वाटत आहे.
ह्या अंकात एक पुस्तकांची सूची दिली आहे. ही आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्व बाल-सहित्याची सुची नाही आहे, तर वाचलेल्या, स्मरणात राहिलेल्या, पुस्तकांची सुची आहे. ह्या प्रकल्पासाठी आम्ही काही जणांशी संपर्क केला आणि त्या सर्वांच्या सहयोगातून ही सुची साकार झाली आहे. त्या सर्वांचेही हार्दिक आभार मानणे उचित होईल. ही सुची केवळ सुरुवात आहे.ह्यात आपण भर घालू शकता.
 जुन्या गाण्यांची व कवितांची ओळख मुलांना करून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, त्याच बरोबर चांद्र-यान प्रकल्पाची माहिती देउन त्यांचे ज्ञान अद्ययावत ठेवण्याचाही.

डॉ.बाळ फोंडके ह्यांची कथा व डॉ.राम म्हैसाळकर ह्यांची कविता आमच्या अंकाचे भुषण आहेत. तसेच आमच्या नेहेमीच्या सदर लेखकांनीही आपापली सदरे ह्या बाल विशेषांकासाठी योग्य अशा स्वरूपात लिहिली आहेत.
 ह्या अंकात, आपल्या चिमुकल्याच्या शाळेच्या पहिल्या दिवशी होणारी आईची तगमग वर्णन करणारी कथा आहे, तर बदलत्या वेगवान जगाबरोबर धावताना होणारे आई-लेकरांच्या अपेक्षेत, संबंधात होणारे बदल कवितेतुन आपल्यासमोर आले आहेत.
 बाल शौर्य पदकांविषयी, मुलांची उत्सुकता जागवण्याचा प्रयत्न कथेद्वारे केला आहे.

आज हे संपादकीय लिहित असताना, मुंबई दहशतवादाच्या क्रूर काळ्या सावटाखाली होरपळते आहे. मन विषण्ण आहे. कसे आणि कोणते जग आपण ह्या मुलांना जगायसाठी देतो आहोत? कोणता वारसा आहे हा?
अतिरेक्यांना पकडण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्यांविषयी अपार कृतज्ञता वाटते आहे. तसेच प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहिदांना विनम्र अभिवादन. दहशतवादाचा समुळ नि:पात होईल असा समर्थ समाज निर्माण व्हावा अशी आशा करणे भाबडेपणाचे होईल की काय हे येणारा काळच ठरवेल. पण अशा समर्थ समाजाचे जे आधारस्तंभ, अशा मुलांना,उद्याचे सुजाण नागरिक बनविणे, हे तर आपण नक्कीच करू शकतो.
शुभंभवतू॥
ऋतुगंध हेमंत २००८

Sunday, 15 January 2012

ऋतुगंध वसंत २००८ संपादकीय

स्नेहीजनहो नमस्कार!

आपणां सर्वाना हे सर्वधारीनाम संवत्सर सुख-समाधानाचे, समॄद्धिचे व आरोग्यदायी जावो, ह्या शुभेच्छा.

आज 'ऋतुगंध" एक वर्ष पुर्ण करीत आहे. गेल्या वर्षभरात आपणांकडून जसे कौतुक झाले, प्रतिसाद मिळाला, सहकार्य लाभले, तसेच आगामी वर्षीही लाभेल, अशी खात्री आहे. आपल्याला काही त्रुटी जाणवल्या असतील, काही सुधारणा, बदल सुचवू इच्छित असाल तर जरुर कळवा. आपल्या सुचनांचा निश्चितच विचार केला जाईल.

ज्याप्रमाणे ऋतुगंध नविन वर्षात पदार्पण करीत आहे, त्याचप्रमाणे सॄष्टीदेखील एक आवर्तन पुर्ण करुन नविन आवर्तनाची सुरुवात करीत आहे. वसंताचे आगमन झालेले आहे. सॄष्टीची नव्हाळी मनाला उल्हसित करते आहे. ज्ञानियांच्या राजाने म्हटल्याप्रमाणे, वासंतिक बहर असेल, प्रियजनांचा सहवास असेल, स्नेह्पूर्ण व्यवहार असेल, तर आणखी काय पाहिजे?

विषुववृत्ता्च्या इतक्या जवळ रहाणा़-या आपल्यासारख्या लोकांना बदलत्या ऋतुचक्राची मजा उपभोगण्याची 
संधी मिळत नाही, म्हणुन हळहळत बसायचे की वसंत नेहेमीच अनुभवायला मिळतो, झाडे नेहेमीच हिरवीगार असतात, फ़ुले फ़ुललेली असतात, कोकिळेचे कुजन ऐकायला मिळते म्हणुन आनंदात रहायचे, हे आपल्याला ठरवायचे आहे.

कोणतीही नवी सुरुवात होण्यासाठी आधीचे आवर्तन पुर्ण व्हावे लागते.त्याचा अंत सहन करावाच लागतो. इथे आयुष्याचा नविन कालखंड सुरु करण्या्साठी, तिथे खुप काही मागे सोडुन आपण आलो आहोत. त्या वियोगाने तळमळत बसायचे की त्या आठवणींचा योग्य तो सन्मान करीत, इथेही आपुलकीचे आणखी एक बेट निर्माण करायचे ते आपणच ठरवायचे आहे.

आपल्या कर्तृत्वाने आयुष्य उजळवुन टाकायचा प्रयत्न करीत असतानाच, आपल्या क्षमतांचा उपयोग फ़क्त वैयक्तिक लाभासाठी करायचा की समाजाचेही आपण काही देणे लागतो ह्या भावनेने सामाजिक कामांसाठीही आपल्या क्षमतांचा विनियोग करायचा हे ही आपल्यालाच ठरवायचे आहे.

आपल्या भाग्याचा लाभ उपभोगणा-यांचे वर्तुळ आपल्या आप्तजनांपुरतेच मर्यादित ठेवायचे की त्याचा परीघ मोठा करुन,आपल्यापेक्षा कमी भाग्यवान असणा-यांनाही त्यात सामिल करुन घ्यायचे, ह्याचाही निर्णय आपणच घ्यायचा आहे.

गेल्या वर्षी केलेल्या संकल्पांचा आढावा घेण्यासाठी आणि नविन संकल्प करण्यासाठी वर्षप्रतिपदेइतका चांगला मुहुर्त दुसरा कोणता सापडणार?

ह्या सा-या निर्णयांसाठी, संकल्पांसाठी आवश्यक असणारी मनाची समचित्तता आपणा सर्वांनाच लाभू दे.

॥शुभं भवतू॥

वृंदा टिळक
-ऋतुगंध वसंत २००८

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...