Sunday, 30 March 2014

वंगरंगी रंगले मी

 मागच्या ' वर्षा' अंकात आपण बोलत होतो ते पावसाविषयी आणि कवींविषयी. मग तोच धागा धरून बंगालातल्या कवींविषयी लिहायचे ठरवल्यावर सर्व प्रथम नाव आठवले ते कवी जयदेवाचे. 
कवी  जयदेवांच्याच लेखणीतून  अवतरले आहे  राधाकृष्णाच्या भक्तीची अनेकविध रूपे साकारणारे महान काव्य,"गीत गोविंद".कृष्णभक्तीने प्रेरीत होऊन, कृष्णचिंतनात तल्लीन होऊन एका वेगळ्याच भावावस्थेत जयदेव असायचा व त्याच भावावस्थेत त्याने गीत-गोविंद लिहिले असे म्हणतात.
जयदेवाचे जन्मस्थान केंदूली हे ओरिसातले केंदूली की बंगालातले ह्यावर वाद चालू आहे. त्याच्या जन्मस्थानाविषयीचा वाद काहीही असो, बंगालात जयदेव अत्यंत प्रिय आहे. बंगालातल्या केंदुलीला दर मकर संक्रांतीला जत्रादेखील भरते, जी प्रामुख्याने बाऊल कलाकारांसाठी प्रसिद्ध आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या वासूदेवाप्रमाणेच ही बाऊल परंपरादेखील नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे
 कोलकाता मुक्कामी आल्यावर एका मेट्रो स्टेशनच्या नावाने माझे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे कवी नझरूल. शिवाय एका रस्त्याचे नावही दिसले काझी नझरुल इस्लाम. १८९९ मधे एका गरीब मुस्लीम घरात जन्मलेला हा मुलगा. धार्मिक शिक्षण  त्यांनी घेतले होते, पण काव्य, नाट्य, साहित्य, संगीताशी त्यांचा संबंध आला तो नाटक कंपनीबरोबर काम करताना. पुढे ब्रिटिश सरकारची काही काळ चाकरी देखील केली. मग ती नोकरी सोडून देऊन कोलकाता येथे पत्रकार होण्याचे त्यांनी ठरवले. ब्रिटिश सरकारच्या जुलुमांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या कवितांमूळे विद्रोही कवी असा जनमानसाकडून किताब मिळाला आणि त्याचवेळी ब्रिटिश सरकारने अनेकदा लादलेला कारावासही सोसावा लागला. त्यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आजही " नझरुल गीती  " ह्या नावाने प्रसिद्ध आहेत. लघूकथा, कादंबरी, निबंध आदि अनेक प्रकारचे लेखन केले असले तरी त्यांची प्रामुख्याने ओळख कवी नझरुल हीच राहिली. बंगाली गझल हा नवा काव्यप्रकार त्यांनी लिहिला
दुर्दैवाने.तरूण वयातच त्यांना एका असाध्य रोगाने पछाडले आणि वाचा व स्मृती गमवावी लागली. अगदी शेवटी बांगला देश सरकारच्या निमंत्रणावरून ते बांगलादेश मधे वास्तव्यास गेले व तिथेच त्यांचे निधन झाले.
जे कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत आणि तरी त्यांच्या एका कवितेला त्या कादंबऱ्यांपेक्षाही अमाप प्रसिद्धी मिळाली, एवढेच नव्हे तर स्वातंत्र्यलढ्यात त्या  कवितेने मंत्राचे काम केले, त्या वंदे मातरम चे लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हेही बंगालचेच. एक कविता काय करू शकते, कसा इतिहास घडवू शकते ह्याचे वंदे मातरम ’ हे समर्थ उदाहरणच आहे.

          हे सर्व कवी प्रसिद्ध असले तरी  बंगालवर ज्या कवीची नाममुद्रा उमटली आहे ते म्हणजे कवीकुलगुरू रवीन्द्रनाथ ठाकूर. असा कर्तृत्ववान माणूस तर खरोखरीच विरळाच.काव्य, कथा, कादंबरी, नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला, शिक्षण साऱ्याच क्षेत्रांत गती असलेला आणि तरीही ज्याचे कवीपण ह्या साऱ्यांतून झळकत रहाते असा हा कवी. खुद्द रवीन्द्रनाथांनीही माझा धर्म कोणता असे विचाराल तर तो कवीचा धर्म आहे असे म्हटलेले आहे.
     कोलकाता येथे अनेक रस्त्यांना, इमारतींना, मेट्रो स्टेशनला रवींद्रनाथांचे नाव दिलेले आढळते. त्यांचे वंशपरंपरागत घर असलेल्या कोलकाता येथील ’ जोराशंको ठाकूरबारी ’ ह्या वास्तूत रवींद्रनाथांचा जन्म झाला. आता त्या भव्य इमारतीत रवींद्रभारती विद्यापीठ व संग्रहालय आहे.
     रवीन्द्रनाथांचे ’ शांतीनिकेतन ’ हे तर जगभरातल्या लोकांना मोहवणारे एक महाकाव्यच. शांतीनिकेतनाविषयी मी  इतके सारे वाचले होते, ऐकले होते की तिथे प्रत्यक्ष  जाणे हा केवळ, फक्त एक उपचार उरला आहे असे वाटत होते. तसेच  एखाद्या गोष्टीविषयी खूप ऐकलेले असावे आणि प्रत्यक्षात मात्र भ्रमनिरासच व्हावा, असे शांतीनिकेतनच्या बाबतीत तरी  होऊ नये अशी मनोमन प्रार्थना करीतच शांतीनिकेतनाला जायला निघाले. 
      वैश्विकीकरणाच्या रेट्यामूळे बाकी सगळ्या महानगरांसारखेच  बनू पहाण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असलेले कोलकाता तोपर्यंत माझ्या ओळखीचे झाले होते. मॉल्सच्या शिळ्या, थिजलेल्या थंडगार हवेत फिरताना ह्या प्रदेशाची  ही ओळख फार वरवरची व अपूरी आहे, खरा बंगाल तर आपल्याला अजून भेटलाच नाही अशी रुखरुख सतत मनात होती. 
     कोलकात्यापासून २०० कि.मी. अंतरावर असलेल्या शांतीनिकेतनाला जाण्याचा रस्ता मात्र ह्या रुखरुखीवर चंदनलेप लावून गेला. ग्रामीण बंगालचे सुखद रूप पहायला मिळाले. खरे तर ह्या वर्षी  बंगालातील काही जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. पाण्याअभावी करपलेली रोपे पहायला लागणार की काय ही आशंका मन कुरतडत होती.
     पण माझ्या भाग्याने मला पुन्हा एकदा योग्य वेळी योग्य ठिकाणी नेले होते. नुकत्याच झालेल्या पावसाने हिरवीगार दिसणारी झाडे, भाताच्या लवलवत्या शेतांनी दिलेले नव्या नव्हाळीचे हिरवेपण, अधून मधून आढळणारी केळीची बाग वा आमराई, ताडाची व नारळाची झाडे, शाकारलेली घरे, सतत सोबत करणारी अनेक छोटी छोटी तळी, निवांत चरणारी गूरे, शेतात, पाण्यावर, गूरांच्या पाठीवर बसलेले पक्षी.सारेच जणू स्वप्नवत होते.  कुठल्यातरी दूसऱ्याच जगातले असावे तसे आणि ह्या जगातले सारे व्यापताप विसरायला लावणारे होते.
ह्या प्रवासात नव्याने पहायला मिळाली ती तागाची शेती. ह्या परिसरात तागाचे सगळी रूपे व अवस्था पहायला मिळाल्या. लवलवत्या सुकुमार सडपातळ तरूणीप्रमाणे  तागाचे रोप असते. झाडांच्या जमातीतील ताग ही झिरो साईझवाली अभिनेत्री असावी! एका विशिष्ट उंचीपर्यंत वाढताच ती रोपे  कापून ,पाण्यात भिजवून ठेवतात. ह्यासाठी शेताच्या कडेकडेला खाचरे करून पाणी साठवलेले असते. ती बराच काळ भिजल्यावर म्हणजे जवळपास कुजल्यावर, त्यातून हाताने ओरबाडून त्याची साल काढतात व मधल्या कडक काठ्यांच्या मोळ्या बांधून उन्हात वाळत ठेवतात. जी साल निघालेली असते ती कापडाप्रमाणे दोरीवर, कुंपणावर वाळत ठेवतात. त्यातूनच तयार होतो रेशमाप्रमाणे चमचमणारा ज्यूट. त्याचे मोठाले गठ्ठे बांधून मग तो रवाना होतो. अक्षरश:  प्रत्येक भागाचा उपयोग होत असल्याने ही झाडे म्हणजे शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्षच. शाळेत असताना गाळलेल्या जागा भरा ह्या प्रश्नातील , {भारतातील तागाची सर्वात जास्त लागवड ----- ह्या राज्यात होते },त्याच राज्यात मी प्रवास करीत होते व तागाची लागवड प्रत्यक्ष पहात होते !
अशा सुंदर रस्त्यांवरून प्रवास करीत करीत आपण शांतीनिकेतन व श्री निकेतन परिसरात पोचतो.रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी साधी, देखणी घरे, अंगणात उभारलेली शिल्पे, सृजनचे  प्रवेशद्वार, सुगंधाची लयलूट करणारे वृक्ष आपल्याला आपण कलावंताच्या जगात प्रवेश करतो आहोत ह्याचा प्रत्यय देत रहातात. एक मातीचे छोटेसे घर आपले लक्ष वेधुन घेते. त्याच्या छपराच्या मधोमध तालवृक्षाचा शेंडा डोकावत असतो. झाडांवर प्रेम असल्याने, झाड तसेच ठेवून त्याच्या भोवती आपले घर बांधणाऱ्या तेजेशचंद्र सेन ह्या शांतीनिकेतनातील पहिल्या पिढीच्या शिक्षकाच्या रसिकतेला आपण मनोमन दाद देतो.

पूढे गेल्यावर झाडांखालच्या वर्गांच्या जागा दिसतात. अजूनही शाळेचे वर्ग तिथेच भरतात. शिक्षकांसाठी एक छोटा चबूतरा आणि विद्यार्थी त्यांच्या भोवती बसतात. विद्यार्थी व शिक्षकांची आसने मिळून एक वर्तुळाकृती पूर्ण होते. ह्यावर्गांवर सावली ढाळत उभे आहेत ते बकूल व आम्र वृक्ष. ह्या भागाचे नावच मूळी बकूळविथी व आम्रविथी असे आहे. विथी म्हणजे रांग. वर्गात विद्यार्थी अभ्यास करत आहेत. नजर जाईल तिकडे त्यांना भव्य वृक्ष दिसत आहेत. वाऱ्याच्या एखाद्या झुळकीबरोबर आकाशातून बकूळपुष्पे तरंगत खाली येत आहेत. हे कल्पनाचित्रदेखील किती सुखावणारे आहे ना !

        
शांतीनिकेतनाचे स्वप्न रवींद्रनाथांनी पाहिले तेच मूळी भारतीय संदर्भ घेत, विश्वभरातले ज्ञान देणारी,बंदिस्त नसलेली अशी गुरू कूल पद्धतीची शाळा उभारायची हे मनाशी पक्के करून. शांतीनिकेतनाच्या अनेक गुणवान विद्यार्थ्यांपैकी आपल्या सगळ्यांनाच माहिती असलेली नावे म्हणजे सत्यजित राय, अमर्त्य सेन व वर्ष /दोन वर्षे तिथे शिकलेल्या इंदिरा गांधी. अमर्त्य हे नामकरणदेखील रवींद्रनाथांनी केले असे म्हणतात. अमर्त्य सेन ह्यांचे एक घर ह्या परिसरात आहे जिथे त्यांच्या मातोश्री शेवटपर्यंत रहात होत्या.
शांतीनिकेतनातील इमारतींची, रस्त्यांची,भागांची नावेदेखील रसिक व कवीवृतीची निदर्शक आहेत. सारीच नावे सुंदर व अर्थगर्भ.
विद्यापीठातील निरनिराळे विभाग पहात पहात आपण येऊन पोचतो, ’ उत्तरायणात. ’ उत्तरायण हा ठाकूर कुटुंबियांनी  निरनिराळ्या वेळी बांधवून घेतलेल्या व रवीन्द्रनाथांनी  वास्तव्य केलेल्या घरांचा समूह आहे.
सध्या तिथे उभ्या आहेत त्या उदयन, कोणार्क, श्यामली, पुन:श्च व उदिची ह्या वास्तू. विविध वास्तूशैलींच्या संगमाने बनलेले उदयन लक्षवेधक आहे. ह्याच वास्तूतून रवींद्रनाथ अगदी शेवटी बोलपूरहून कोलकात्यास उपचारांसाठी गेले. " कोणार्क " मधे एक प्रदर्शनी लावलेली आहे. ’श्यामली’ आहे कवीच्या स्वप्नातले मातीचे घर. ते काही वर्षांनी गळायला लागल्यावर नव्याने बांधलेली वास्तू ती "पुन:श्च ". "पुन:श्च " मधे कोंडल्यासारखे वाटायला लागल्यावर कवीला हवेसे वाटले ते खुलेपणाचा अनुभव देणारे ,चहूबाजूंनी क्षितिज दिसणारे घर,ते  झाले "उदिची "ही सगळी नावे कवीराजांच्या कवितासंग्रहांची नावे म्हणून आपल्याला माहिती असतात. ' उदिची ' च्या शेजारी आहे,कवीराजांचा हस्तस्पर्श व निगराणी लाभलेली मोठी व फुलांनी बहरलेली बाग.
         ह्या परिसरात आणखी एक केवळ साहित्यात वाचलेले,ऐकलेले सुखनिधान लाभले ते म्हणजे " माधोबी" (माधवी ) ची फुले व वेल  प्रत्यक्ष पहायला मिळाले हे. रवींद्रनाथांच्या कवितासंग्रहाचे नाव म्हणुन तसेच इतरही जुन्या साहित्यात माधवी ह्या फुलांचे नाव अनेकदा ऐकले होते. पण ती प्रत्यक्ष कधी पाहिली नव्हती.त्याचा मंद सुगंध अनुभवला नव्हता. ती माधवी भेटली ती कवीच्या वास्तव्याने पूनीत झालेल्या परिसरात व योगायोगाने ज्या वेळी सिगापूरात शब्द-गंध सुरू असणार होता त्याच वेळी. 
    तिथे जवळच ऑगस्ट आला तरी अजुनही फुलत राहिलेला बहावा भेटला. बंगालीतले त्याचे नाव म्हणे ’ बांदरलाठी ’  म्हणजे माकडाच्या शेपटीसारखे घोस असणारे. पण इतके रुक्ष नाव वापरतील तर ते बंगाली लोक कसले ! नक्की नांव विचारले नाही, पण साधारण तशाच प्रकारच्या आपल्या 'संकासुरा' ला ते म्हणतात,’राधाचुरा’ म्हणजे राधेचा केशसंभार !! राधेचे केस इतके कुरळ्या लटांचे व सुंदर  असतील अशी कल्पना करून त्या झाडाचे नामकरण करणाऱ्या रसिकतेला सलाम ! विविध  छटांच्या जांभळ्या फुलांचे घोस असणाऱ्या झाडाला म्हणतात ’जारूल’.तशाच प्रकारच्या गुलाबी फुलांच्या झाडाला 'गोलोपी' म्हणतात की आणखी काही ते मात्र  विचारायचे राहूनच गेले.
  त्याच परिसरात आहे  ’ विचित्रा ’ ही वास्तू. तिथे एक कायमस्वरूपी संग्रहालय तसेच वाचनालय आहे. मूळ नोबेल पारितोषिक गहाळ झाल्याने आता त्याची प्रतिकृती आपल्याला पहायला मिळते. त्या गहाळ होण्याविषयी ह्या लेखात काही न लिहिलेलेच बरे.
       शांतीनिकेतनातील सुविधा,व्यवस्था ह्या त्या काळच्या किंवा ५० वर्षांपूर्वीच्या शांतीनिकेतनाला योग्य अशाच आहेत.तिथेच विश्वभारती विश्वविद्यालय पण आहे.सरकार दरवर्षी करोडो रुपयांची मदत करते. तरीदेखील ह्या सर्व परिसराला डागडुजीची,सुव्यवस्थेची गरज आहे असे सतत भासत रहाते. जाताजाता दोन घटनांचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. 
    संग्रहालयाजवळच्या पुस्तकांच्या दुकानात गेले असताना पूर्ण दुकान अस्ताव्यस्त होते.हे कशामूळे असे विचारले असता,तेथील विद्यार्थ्यांनी केले असे तो कर्मचारी म्हणाला .गेले दोन महिने फी वाढीविरुद्ध विद्यार्थी आंदोलन तिथे चालू होते. तसेच विश्वभारतीचा मानबिंदू व खासियत असलेला वसंतोत्सव यावर्षी विद्यार्थ्यांच्या निदर्शनांमुळे होऊ शकला नाही हे  ही आपल्याला माहिती आहेच.
      का होते आहे हे सारे? विद्यार्थ्यांच्या मागण्यांत काही तथ्य आहे की राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपामूळे हे सारे होते आहे? याला अनास्था जबाबदार आहे की भ्रष्टाचार? ह्याविषयी पुन्हा कधीतरी बोलू या.असो.
   तेथील संग्रहालयात रवींद्रनाथांची छायाचित्रे,त्यांच्या उपयोगात असणाऱ्या वस्तू तसेच त्यांनी काढलेली चित्रे,ते वाजवत होते ती वाद्ये एवढेच काय त्यांनी केलेले अप्रतिम लाकूडकाम,त्यांनी तयार केलेली पाठ्यपूस्तके हे सगळे तिथे आपल्याला पहायला मिळते. एक माणूस एवढा गूणवान कसा असू शकतो ह्याचा अचंबा परत परत वाटत रहातो. अवघ्या दीड शतकापूर्वी होऊन गेलेल्या व कर्तृत्वाचे  प्रत्यक्ष पूरावे असलेला हा चमत्कार पहाताना मन भारावून जाते.       
    रवींद्रनाथ तर कधीच बंगालच्याच काय पण भारताच्याही सीमा ओलांडून विश्वकवी बनलेले आहेत.पण .आत्ता  खुद्द बंगालात त्यांची किती जणांना माहिती आहे,त्यांच्या साहित्याचा परिचय आहे याची मला उत्सुकता होती.मी घरकामात मला मदत करण्यासाठी येणाऱ्या मुलीला विचारले की तुला ह्यांची कविता पाठ आहे का एखादी? तिला कविता पाठच काय पण  माहितीदेखील नव्हती.अर्थात शिक्षणाशी तिचा संबंधच आलेला नाही.त्यामूळे एखाद्या माहिती असलेल्या "गानाचे" कर्ते ते रोबीन्द्रोनाथच हे तिला माहिती असणार नाही.. साहित्य,कला ह्या सगळ्या भरल्या पोटी करायच्या गोष्टी आहेत हे खरे आहे की काय? खरेच हे  खरे असावे की काय?असा विचार मी करीत राहिले.
    नंतर मी तिला  विचारले,"तुला हे रोबिन्द्रो्नाथ ठाकूर कसे माहिती मग ?"तेव्हा ती उत्तरली,"टी.व्ही.वर त्यांचा फोटो दाखवतात ना?"त्यांच्या जन्माला १५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने इथे अनेक कार्यक्रमांचे आयोंजन सतत चालू असते..
  नंतर रविंद्र सदन व नंदन हा कला अकादमीसारखा साहित्य तसेच नाट्य,चित्रपटविषयक घडामोडींचा  परिसर बघत असताना, काही तरूण मूलींशी संवाद साधला.त्यांना रवीन्द्रनाथ किती माहिती आहेत,जवळचे आहेत ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्यांना अभ्यासात तर रविन्द्रनाथांची कविता,नाट्य उतारे होतेच .शिवाय आता आपापले  नोकरी व्यवसाय सांभाळून काही जणी रविन्द्र संगीत शिकत होत्या तर काहींनी रविन्द्र शैलीतील न्रुत्योनाट्यो चा अभ्यास केलेला होता. रविन्द्रनाथांच्या समग्र साहित्याचे वाचन करायचे आणि कलांचा आस्वाद घ्यायचा तर एक जन्म अपूराच अशीच त्या मूलींची भावना होती. मग घरी येणाऱ्रया इलेक्ट्रीशियन,प्लंबर,सुतार आदि मंडळींना रवीन्द्रनाथ किती माहिती आहेत ह्याचा शोध घेण्याचा उपक्रम मी सुरू केला. बऱ्याचजणांना एखादे रोबिन्द्रोगान पूर्वी येत होते. आता मुखोद्गत नसले तरी कोणी सुरुवात केली तर आपल्याला ते पूर्ण म्हणता येइल हा विश्वास होता.कोणी कधीतरी रोबिन्द्रोसंगीत ऐकलेले होते.ह्या सगळ्यांशी बोलल्यावर रवीन्द्रनाथ हे केवळ एक दंतकथा बनून रहाणार नाहीत व कलाक्षेत्रातील उच्चभृंची मक्तेदारी बनून रहाणार नाहीत,तर जनसामान्यांच्या जगण्यात ते झिरपत रहातील,विचारात फूलत रहातील हा दिलासा मिळाला.
       अर्थात रवीन्द्रनाथांमूळे त्यांच्या जगण्यात,विचारात कसा व किती बदल झाला,त्यांच्या आयुष्यावर किती प्रभाव पडला हे जाणून घ्यायचे तर मला ह्या कारागिरांशी संवाद साधता येणारी बंगाली भाषा शिकून घ्यायला हवी. तेव्हा तो प्रकल्प भविष्यकाळासाठी राखून ठेवला आहे ! 
    ठाकूर घराण्यात दत्तक गेलेले द्वारकानाथ म्हणजे रवीन्द्रनाथांचे पूर्वज.रवीन्द्रनाथ धरून त्यांच्या वडिलांना एकूण १५ मुले झाली. नियतीच्या अजब खेळाने आजमात्र  त्यांच्यापैकी कोणाचाही ,एकही वंशज आज हयात नाही.मूलींची मुले,नातवंडे  देखील नाहीत. त्यांचा संपूर्ण वंशच खुंटला असे आमचा मार्गदर्शक पुन्हा पुन्हा खेदपूर्वक सांगत  होता.मला त्याला म्हणावेसे वाटले ," ही सारी ग्रंथसंपदा,रोबीन्द्रोसंगीत, हे आहेच की वंशाचे  नाव चालवायला पूरेसे."
      नुकतेच मला असे कळले आहे की रवीन्द्रनाथ कोलकात्यात रहायचे ती जोराशंको ठाकूरबारी,विश्वनाथ दत्तांचे घर,( जिथे त्यांचा नरेन्द्र नावाचा मुलगा,जो पुढे विवेकानंद ह्या नावाने जगविख्यात झाला तो रहायचा) , शिवाय जगदीशचन्द्र बसू व प्रफ़ुल्लचन्द्र राय ह्यांची घरे हे सारे चालत चालत १०/१५ मिनिटांच्या परिसरात आहे. दोख्खिनेश्वर ही काही मग फार दूर नाही. शिवाय नावेत बसून गंगा ओलांडली की त्या तीरावर बेलूर आहेच. ह्या सगळ्यापासून थोडे दूर पण कोलकात्यामधेच नेताजी भवनही आहे. किती जादूई व भाग्यवान  माती असेल ती,जिथे अशा नररत्नांचे वास्तव्य झाले,त्यांचे कर्तृत्व  बहरले !.
    
        .
     
     

Thursday, 27 March 2014

खेळ मांडियेला

८-८-८ ला सुरु झालेल्या बिजिन्ग ओलिम्पिक्स मधे मायकेल फ़ेल्प्सने आठव्या दिवशी आठ सुवर्णपदके आपल्या खात्यात जमा करुन स्वतःचे नाव ऑलिम्पिक्सच्या पटावर कायमचे कोरुन ठेवले. त्या आधी भारताने मिळवलेले पहिले वैयक्तिक सुवर्णपदक, सिंगापूरचे रजत पदक ह्या मुळे सगळीकडे खेळांचीच चर्चा चालू आहे. वर्तमानपत्रे, टेलीव्हीजन, नेट सारी माध्यमे खेळांविषयीच्या माहितीने ओसंडून वहात आहेत. अशा वेळी स्मरणिकेसाठी लिहीताना माझ्या आवडीच्या खेळांविषयी मी लिहीले नाही तर वाचकांचे फ़ार मोठे नुकसान(!!!) होइल, ह्याची जाणीव मला झाली आणि त्यामुळे ह्याच विषयावर लिहायचे मी ठरवून टाकले.

मला आठवणारा अगदी पहिला खेळ म्हणजे ठिकरी किंवा चिरकी. एक चपटा दगडाचा तुकडा आणि चौकोन आखायला एक खडू किंवा विट्करीचा तुकडा एवढीच सामग्री त्याला पुरायची. एक-एक चौकोन पार करत मजल जेव्हा घर बान्धण्यापर्यन्त यायची तेव्हाच नेमकी घरातून हाक यायची. मग आखलेले चौकोन तसेच ठेवुन आम्ही घरी जायचो, ते संधी मिळताच परत येउन डाव सुरू करण्याचे ठरवुनच! 

प्रतिस्पर्ध्याचे घर ज्या चौकोनात असेल तो चौकोन ओलांडून जावे लागे, अन्यथा आउट होण्याची भीति असे. म्हणुनच जेव्हा जेव्हा मी "जिस गली मे तेरा घर ना हो बालमा, उस गलीसे हमे तो गुजरना नही" ऐकायची, तेव्हा तेव्हा '"अरे, आउट होशील ना मग, घरावरुन गेलास तर..त्या पेक्षा घर नसेल तिथून जा बाबा" असे मनात येउन जायचेच!!! तेव्हा सगळ्यांच्या दारासमोर असे आखलेले चौकोन दिसायचेच. परवा अचानक आमच्या नेबरहुड पार्क मधे दोन मुले चिरकी खेळताना दिसली तेव्हा विश्वबन्धुत्वाच्या भावनेने माझे मन भरुन आले!

 दुसरा जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे क्रिकेट. हा खेळायचा नसे तर ऐकायचा असे! रेडिओवर कॉमेन्ट्री ऐकत असलेल्या बाबांशेजारी बसुन रहाणे, हा मोठा आनंद असायचा. घरातली कामे तसेच गृहपाठ व बाकी अभ्यास चुकवायसाठी ह्यापेक्षा सुरक्षित जागा दुसरी कोणती सापडणार? पण एकदा बाबांनीसुद्धा "जा आता अभ्यासाला " असे सांगितले तेव्हा जे वाटले,ते "you too Brutus.."ला समांतर होते असे मोठे झाल्यावर लक्षात आले!!!

 शाळेतून घरी यायचे, जेवायचे, थोडाफ़ार अभ्यास असायचा तो उरकुन टाकला की मग चार कधी वाजतायत त्याची आम्ही वाट पहात असायचो. कारण चार वाजता आम्हाला खेळायला जायला मिळायचे. ज्या काळी भारतात पण कॉलनीत खेळाची मैदाने असायची व मुलांनी संध्याकाळी खेळायला जायची पध्दत होती तेव्हाची गोष्ट आहे ही !!! खूप मुले असायची खेळायला आलेली. मग दोन टिम करून सुरू व्हायचा बेसबॉल. तेव्हाच्या चिमुकल्या जगातली सर्वात मोठी काळजी असायची, ती ही की सगळीच जण बेस वर राहिलो आणि बॅटिंगला कोणीच नाही उरले तर??? तसे अधुन मधून बास्केट बॉल,थ्रो बॉल पण खेळायचो. सगळ्यांच्या हाताची आणि पायाची मिळून बरीचशी बोटे मुरगळली गेली कि आपोआप आम्ही परत बेसबॉल कडे वळायचो.

फ़क्त टिममधे खेळुन भागत नाही, तुम्हाला वैयक्तिक पण काही गेम खेळता यायला लागतात, हे कळायचे वय आले आणि मग आयुष्यात आले बॅडमिंटन. खुपच धम्माल यायची. त्या शटलची माझ्या रॅकेट बरोबर काय दुष्मनी होती माहिती नाही, ते दोघे कधी एकमेकांना भेटायचेच नाहीत!!! जर का कधी चुकून शटलची आणि रॅकेट्ची भेट झालीच तर शटलला नन्तर नेटविषयी एवढा आदर निर्माण व्हायचा की ते 'पाय लागू 'म्हणत नेटच्या पायाशी !! त्यालाही माझी हरकत नसायची, पण निदान नेट्च्या त्या बाजूला तरी त्याने जावे की नाही? तर ते नाहीच...जुन्या काळच्या खानदानी स्त्री प्रमाणे ते आपले उंबरठ्याच्या म्हणजे नेट्च्या आतच !!

अशी माझ्या क्रीडाजीवनात अनेक स्थित्यन्तरे होत होत आता मी स्थिरावले आहे "स्पायडर सोलिटेर "वर. तो जगातला सर्वात चांगला खेळ आहे असे सध्या तरी माझे ठाम मत आहे. आपले वाढलेले वजन, आळशीपणा, नेट कनेक्शन उपलब्ध नसणे काही म्हणता काहीही त्याच्या आड येत नाही. काहीतरी काम करायला कॉम्प्युटरवर बसावे. एखादी रिक्वेस्ट 'स्टील वर्किंग 'असल्याची संधी साधुन गेम सुरु करावा मग तिकडे कीतीही वेळ "स्टिल वर्किंग" राहीले तरी वाइट वाटत नाही!!! गाणी लावावीत आणि खेळायला सुरुवात करावी. स्पायडर सॉलिटेर..अहाहा काय खेळ आहे म्हणुन सांगू! समता शिकावी तर ती इथेच. 


लहान थोर असा, कोणत्याही वर्णाचे, धर्माचे, पंथाचे असा, सिटिझन असा, PR असा वा DP वर असा, कोणीही खेळायला सुरुवात करा, तुम्हाला ५०० गुण बहाल होतात. मागच्या जन्मीच्याच काय पण अगदी मागच्या डावातल्या चुकांचा पण इथे हिशोब नाही. तुम्हाला मिळालेले गुण तुम्ही किती वाढवायचे ते तुमच्या कौशल्यावर अवलंबुन.

डिफिकल्टी लेव्हल कोणती ते ठरवायचा अधिकार पण आपल्यालाच. "तुमची यत्ता कन्ची??" ह्याचा न्यायनिवाडा व्यवहारी जग पावलोपावली करायला टपलेले असताना, खेळात का होइना, पण आपली लायकी आपण ठरवण्याचे स्वातंत्र्य मनाला सुखावून टाकते. पुढचा धडा लगेच हजर असतोच, तो हा की पात्रतेपेक्षा स्वतःची लायकी जास्त आहे असे समजाल तर अपयश ठरलेलेच!!

एकदा का तुम्ही लेव्हल ठरवलीत की खेळाला सुरुवात!! ह्या जगात किलवर,चौकट वगॆरे मंडळी नाहीतच असे समजून फ़क्त बदाम, इस्पिक ह्यानाच घेउन जोरात खेळ सुरु. लोकशाहीसारखेच....विरोधकांना आधीच नेस्तनाबुत करायचे वा खरेदी करायचे आणि मग व्यापक पाठिंबा असल्याची वल्गना करायची. इथे तर विरोधकांचे नामोनिशाणच नाही. फ़क्त राज्यकर्ते बदाम, इस्पिकच. आपल्यापुरते छोटेसे वर्तुळ आखावे, तेवढाच परिघ आबादीआबाद करुन टाकावा आणि जगात कुठे दुःख नाहीच म्हणत सुखात जगावे तसेच त्या दोघानाच खेळात घ्यायचे…

आयुष्यातला आणखीही एक नियम इथे चालतो. आपला फ़ायदा महत्वाचा.मार्क कशाने वाढणार आहेत? तर लाल वर लाल आणि काळ्यावर काळे पान लावल्याने. म्हणजेच असे की फ़ायदा असेल तर आणि तेव्हाच स्वजनांना जवळ करा. फ़ायदा नसेल तेव्हा स्वजन म्हणून मोहात पडण्याची जरुरी नाही, खुशाल परकियाना जवळ करा. लाल वर लावण्याजोगे लाल पान नसेल,पण काळे पान लागत असेल तर संधी सोडू नका. एक खेळी वाया घालवू नका.

 एवढे सगळे तुमच्या लक्षात राहिले की मग मैदान तुमचेच की! पण सगळे नियम, डावपेच वापरुनही कधी कधी वारंवार हार पत्करायला लागते, तेव्हा लक्षात ठेवायचे,

एखादा दिवस आपल्यासाठी नसतोच

एखादा डाव जिंकायसाठी नसतोच

हरलो म्हणुन निराश व्हायचे नसतेच

 पुन्हा प्रयत्न केल्यावाचून रहायचेही नसते.

परत परत रिस्टा्र्ट करत आपण गेम खेळत रहातो, कधीतरी अचानक डाव लागुन जातो आणि मग वाटते कि "अरे, हे इतके सोपे! मला इतका वेळ कसे जमले नाही?"

इथे चुका दुरुस्त करायची संधी पण आहे,अर्थात त्यासाठी मार्कांची किंमत मोजायला लागतेच. पण चुका दुरुस्त करण्यासाठी लागणारी मार्कांची किंमत आपण देउ शकतो हे ही नसे थोडके!!

सर्वात सुंदर क्षण असतो 'you won" सांगून आतषबाजी करणारा. मी सुरुवातीला त्याने किती हरखुन जायची ते मला अजून आठवतेय. पण आता मी मोहावर मात करुन कर्तव्य महत्वाचे मानायला शिकलेय. मी ती आतषबाजी पहाण्यात वेळ वाया न घालवता लग्गेच दुसरा डाव सुरु करते!!!!


स्पायडर सॉलिटेर खेळताना माझी अगदी ब्रम्हानंदी टाळी लागते. स्वैपाक, घरकाम असल्या क्षुद्र गोष्टी मला ध्येयापासून परावृत्त करू शकत नाहीत. मी खेळतच रहाते!! एवढेच काय लिखाणाच्या डेड्लाइन्स पण अगदी शेवटच्या क्षणी गाठते. आज १९ तारखेला मी हा लेख टाइप करते आहे ह्यावरुनच ओळखा काय ते!!

म्हटलेच आहे ना, खेळ मांडियेला कॉम्पुटर ठायी.. क्लिकती बोटे माउसवर रे//

-वृंदा टिळक 

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर स्मरणिका २००८

Wednesday, 26 March 2014

शून्यात गरगरे झाड

  "अंधार असा घनभारी चन्द्रातुन चन्द्र बुडले

 स्मरणाचा उत्सव जागुन जणु दुःख घराला आले 

दाराशी मी बसलेला दुःखावर डोळे पसरुन

 क्षितिज जसे धरणीला श्वासानी धरते उचलुन 

विश्रब्ध किनारे दूर जाऊन कुठे मिळताती 

जणु हृदयामागून माझ्या झाडांची पाने गळती

नाहीच कुणी अपुले रे प्राणांवर नभ धरणारे

दिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंदविणारे "

 प्राणावर नभ धरणारे कोणी नसल्याची खंत..दु:ख, वास्तव आणि कल्पना यांचे असे काही गूढ मायाजाल तुम्ही निर्माण करायचात .... की त्या नादमयी अनोख्या शब्दांच्या प्रेमात पडण्याखेरीज दुसरा काही पर्यायच उरायचा नाही.

" ही माझी प्रीत निराळी संध्येचे शामल पाणी 

दु: खाच्या दंतकथेला डोहातून बुडवून आणी

हाताने दान कराया           पोकळीत भरला रंग

तृष्णेचे तीर्थ उचलतो रतीरंगातील नि: संग

शपथेवर मज आवडती      गाईचे डोळे व्याकूळ

 घनगंभीर जलधीचेही        असणार कुठेतरी मूळ

आकाश भाकिते माझी नक्षत्र ओळ ही दंग 

 देठास तोडतानाही          रडले न फूलांचे अंग

तुम्हाला दिसणारे आकाशच वेगळे होते. संध्यारंग ल्यालेले. ना आदी ना अंत असे घनव्याकूळपण बरसवणारे तुम्ही...घन गंभीर जलधीचेही असणार कुठेतरी मूळ....शोधायचेच झाले तर मग विचार करावा लागेल की कसे होतात तुम्ही? ते तर कधी कुणाला सांगताच आले नाही. कारण तुमच्या सारखा झंझावाती वारा, हातून निसटणारा पारा असा का सहज शब्दात मावणार होता? 

ग्रेस हे नाव तुम्ही घेतलेत ते परमेश्वरी कृपा ह्या अर्थाने. पण खरोखरीच तुम्ही मराठी काव्य सृष्टीची "ग्रेस "होतात. तुमची सही देखील 'पोएट ग्रेस ' अशी.कवीपणाचा दिमाख मिरवणारी. हे कवीपण जपणे सोपे नव्हतेच. ते जपण्यासाठी तुम्हाला काय काय सहन करावे लागले ते तुमचे तुम्हालाच माहिती. असा कवीपणाचा पेटता निखारा हातात धरून ठेवत, तो दाह तुम्ही सतत जागता ठेवलात. त्याची धग तुमच्या कवितेतून सतत जाणवत राहिली. 

कोणत्याही परंपरेत बसवता येईल अशी तुमची कविता नव्हतीच कधी, ना तिच्यावर कोण्या पूर्वसुरींचा उमटला होता ठसा. ती होती संपूर्णपणे स्वयंभू. तिच्यावर उर्दू काव्याचा वा इंग्रजी काव्याचा प्रभाव आहे असेही म्हटले गेले. तुमच्या कवितेची म्हणावी तशी दखलही घेतली गेली नाही. पण ह्या कशाचाच परिणाम करून न घेता, सगळ्या चर्चेपासून अलिप्त रहात तुम्ही लिहित राहिलात. एकटेपणा,अलिप्तता आणि विरक्तीच्या मार्गावर चालत राहिलात. 

एकांताविषयी तुम्ही म्हणालात की एकांतात मी सर्वत्र विहार करू शकतो. कोणताच काळ मला अवरुध्द करू शकत नाही. कवीच्या कल्पनेने मी कुठेही जाऊ शकतो, काहीही पाहू शकतो. पोएट ग्रेसचे घरटे अशी पाटी असलेल्या असलेल्या घराच्या दारावर,"मी मोकळा आहे पण उपलब्ध नाही" असे लिहू शकणारे केवळ तुम्हीच असू शकता.

"गेले उकरून घर, नाही भिंतीना ओलावा; भर ओंजळी चांदणे करू पाचूचा गिलावा.",

 "आण लिंबोणी सावल्या, नाही आढ्याला छप्पर; वळचणीच्या धारांना लावू चंद्राची झालर " असे म्हणण्याची कुवतही तुमचीच.

तुमची कविता लेवून आली होती एक अप्रतिम शब्द कळा, जी केवळ तुमचीच असू शकत होती. वाचक त्या शब्दांच्या मोहात नाही पडला असे कधी झालेच नाही. पाउस, गाय, कावळे, सांज, कृष्ण ,निळाई ह्या तुमच्या कवितेत नेहमी आढळणाऱ्या संकल्पना.. हो संकल्पनाच. कारण त्या केवळ प्रतिमा म्हणून येत नाहीयेत तर स्वत:चे विश्व घेऊन अवतरतात.

ती गेली तेव्हा निनादत असणारा पाउस, दु:खाचा मंद सूर वाटणारा पाउस, कधीचा पडणारा, ताऱ्याच्या प्रहरापाशी कोसळणारा अशा अनेक रुपात पाउस तुम्हाला भिजवत होता व वाचकालाही तोच प्रत्यय देत होता. अनवट, नादमयी शब्दांचे एक भांडारच तुम्ही रसिकांना खुले करून दिलेत.

ती कविता समजण्याइतकी नव्हतीच आमची कुवत कधी आणि सुरुवातीला तुम्हीही कधी ती समजावून सांगायच्या भानगडीत पडला नाहीत. म्हणालात," मी काही माझ्या कवितेचा प्रियकर नाही.मी कशाला तिची पाठराखण करू? " त्या काळात तुमच्या कवितेतून वाचकांनी काही पारंपारिक अर्थ लावायचा प्रयत्नही केला. तरीही तुम्ही अलिप्तच. तसेही एकदा लिहून झाले की मग ते लेखन वाचकाचे. त्यांनी आपापल्या समज शक्तीच्या परीघानुसार तिचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा आणि मग मला कविता समजली म्हणून खुश व्हावे. कवीला त्याच्याशी काय देणेघेणे !!

 पण काळाच्या एका टप्प्यावर अचानक तुम्ही आपली अलिप्तता सोडून मुलाखती द्यायला लागलात, सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊ लागलात. आपल्या कवितेचा, एकमेवाद्वितीय अशा प्रतिमासृष्टीचा अर्थही सांगू पाहिलात. तुमचे अनुभव विश्व, त्यातील प्रतिमा, अस्सल भारतीय परंपरेतील रामायण आणि महाभारतातले संदर्भ एका वेगळ्याच दृष्टीकोनातून तुम्ही दाखवलेत. 

 " आईंची नेहमीची उदात्त महन्मंगल मातृत्वाची कल्पना मी मांडत नाहीये तर तिच्यातील आदिम मादीपण मी मांडतोय " असे तुम्हीच सांगितलेत. त्या अनुभवाने होरपळलेले बालपण एक भळभळती जखम होऊन तुमच्या कवितेत वाहात राहिले. तुम्ही ती जखम सतत नखलून कायम ठसठसत ठेवलीत. म्हणालात,"आईचे आदिम मादी रूप, बीजरुपातील मादीचे अव्यंग रूप, सृजन रूप हेच माझ्या काव्य व गद्य विश्वाचा कणा आहे. माझे सगळे कल्पनाविश्व त्याभोवती उभे केलेले आहे. तिचे मादीपण हा माझ्या अस्तित्वाला सर्पाने घातलेला विळखा आहे. "

 सतत जाणवत राहिले तेच तुमच्या कवितेत प्रगट होणाऱ्या भाव विश्वातही. तिच्या मनस्वीपणात आणि देहस्वीपणात तुम्ही होतात साक्षीदार .त्याची मुद्रा तुमच्या आयुष्यावर कायमची कोरली गेली होती. आईला, तुमच्या शब्दात सुमित्रा बाईला, म्हणालात,

"तुझा आला ग साजण, नको त्याच्यापुढे जाऊ,

त्याने यात्रेत भेटल्या कोण्या पोरीला दिले आभाळाचे बाहू, 

त्याला हात नाही वेडे.उभा अंधारी साजण..तिने जीव दिला तरी, त्याने वाहत्या पाण्याचे ..इथे आणले पैजण.." 

तुम्ही असेही म्हणालात की सुमित्रा बाईचा देहस्वीपणा तिच्या आतले आणि बाहेरचे गोंदण गाव जाणून घ्यायचे तर आत्मदिपाचा प्रकाश पाहिजे." आयुष्यावर उमटलेला आईच्या ठसा कसा आहे ह्या विषयी म्हणालात ," आज ती निवर्तल्यावरही, ह्या कधी वैराण तर कधी बहरलेल्या चंद्र माधवीच्या प्रदेशात मला तिच्या हाका ऐकू येतात...मी कुठेही जात नसताना, तिच्यापासून पळत नसताना ती मात्र माझा सुसाट पणे पाठलाग करते आहे."

एकदा वाचल्यावर तुमची कविता देखील नाही का वाचकाचा पाठलाग करत रहात? दर वाचनाबरोबर नव्याने उलगडत, झोंबत, कुरतडून टाकत आणि तरी मोहात जखडत ती वाचकावर गारूड करते. तुमची कविता आहे एक चांदणचकवा. परत परत वाचकाला स्वत:कडे खेचणारा, स्वत:पाशी बांधून ठेवणारा. तुमची कविता समजली आहे असा भास होतोही क्वचित कधी पण तो भासच.

 तुम्हीच म्हटले आहेत ना ,"कर्णाला ज्याप्रमाणे जन्मतःच कवचकुंडले मिळालेली होती, तशी माझ्या काव्याला जन्मतःच दुर्बोधतेची बेसरबिंदी टोचलेली आहे...माझी कविता जगता जगता वाढेल..तोच तिचा... वंश-वृक्ष!''

माझ्या कवितेशी थांबणार्‍या माझ्या रसिकाचे काय होत असेल? याची कल्पना मी करु शकत नाही. 'गाईच्या दुधाला आच दिली की साय धरणार' असे निर्मितीचे साधे कोष्टक घेऊन तो उभा रहात असावा..पण माझी प्रश्नचूर निर्मिती असल्या साध्या प्रश्नांची उत्तरे देतेच कोठे?,

ती म्हणुन टाकते--'चंदनाच्या झोपाळ्याला, इंधनाचे भय, वाघिणीच्या दुधावर आली कशी साय'... 

माझी कविता हे एक बेटच आहे, मी ही एक बेटच आहे...बेटावर माणसे सफरीसाठी येतात, किंवा समुद्र जिवावर उठला तर... माझ्या कवितेच्या बेटावर येणार्‍या काव्यरसिकाला परतीच्या बोटीची कुठलीही हमी मी देऊ शकत नाही...परतावेसे वाटले तर स्वतःच होडी झाले पाहिजे!'

स्वत:च्या कवितेविषयी अभिमानाने तुम्ही म्हणालात, ती मर्त्य मानवासाठी नाहीच.. ती आहे एखाद्या सुफी फकीराप्रमाणे विष देखील अमृतासारखे पिणाऱ्यासाठी.एखाद्या एकांत ताऱ्यासाठी. तुम्ही म्हणालात देखील एकदा,"कोण पाण्याला शिवतो, गूढ घावांचे अस्तर, नांगी पिळून विषाचे जसे काढावे अत्तर" "मी रसिकाच्या हातात देतो आहे एक ओल्या,जिवंत वेळूची बासरी.." स्वत:च्या कवितेच्या वंश वृक्षाविषयी बोलणारे तुम्ही म्हणता ,"माझ्या मृत्युनंतरची माझ्या कवितेची व्यवस्था मी केव्हाच करून ठेवली आहे.' घरभर सरणाचे पात्र सांडून जाई..फिरुनीफिरुनी माझा निर्वंश होई.'

तुमच्या कवितेसारखेच तुम्हीही समजायला अवघड. एकांत आवडणारे तुम्ही, माणूसघाणे नव्हतात. एकदा मैत्र जुळले की मग तुम्ही दिलखुलास गप्पा मारायचात. वेदनेच्या, दु:खाच्या कविता लिहिणारे तुम्ही प्रत्यक्षात किती जिंदादिल होतात ह्याचे वर्णन तुम्हाला भेटून येणारे लोक नेहमी करत रहातात. कशाचे तरी भय, झाकोळून टाकणारे भय वर्णन करणारे तुम्ही मृत्यूला कसे हसत, टेचात सामोरे गेलात ह्याचेही वर्णन आम्ही वाचले.

 " भयभारच देहाचा का? ते जादूचे परिमाण;

 लाजते सुरीची जात ठेविता तिच्यावर मान. "

 तुमचा मनस्वीपणा, झोकून देऊन एखादी गोष्ट करण्याची तुमची वृत्ती, अगदी खास ग्रेसची अशी.

मृगजळाचे बांधकाम करू शकण्याची शक्ती देखील खास तुमचीच.

स्वत:च्या अक्षरातली अर्पण पत्रिका ही तुमची खासियत.

 तुम्ही लिहिलेत,

" पण मला तर हे बांधकाम, तुझ्याच निर्मितिसत्त्वाचे शील म्हणून करणे भाग पडलेय ना ?

तेव्हा हे मृगजळाचे बांधकाम, मी तुलाच अर्पण करतोय.

अर्पण, तर्पण, समर्पण आणि दर्पण (ही) यांचे, 

या सर्वांचे काही वेगळे अर्थ, अनर्थ असतात काय? संभवतात का..य? "

आज तुमच्या स्मरणाचा उत्सव जागत असताना वाटते आहे ह्या लेखाचा शेवट कसा होईल? नाही..होणारच नाही खरे तर ह्या लेखाचा शेवट.. कारण तुम्ही होतात आणि तुमच्या कवितेच्या रुपात तुम्ही आहात आणि राहाल.

फोटो आंतरजालावरून साभार. 

-वृंदा टिळक 

-(ऋतुगंध -वसंत २०१२ )


निसर्ग सिंगापुरी...

 सिंगापूरात पाय वाटेने फिरायला जावे. दुतर्फा झाडे असतात. रस्त्यावर गळून पडलेल्या फ़ुलपाकळ्यान्चा व वाळलेल्या पानांचा गालिचाच तयार झालेला असतो. उन आणि सावल्या लपाछपी खेळत असतात. शांत जलाशयावर मधेच वा-याने एखादा तरंग उमटत असतो. 

“उन्हाचे कवडसे मांडतात तेव्हा रिमझिम चा खेळ

तरंगत खाली येणाऱ्या पानात झुलू लागतात वेल

जमिनीवर पडलेल्या पिवळ्या तांबुस पानांना मग चढते सोनकळा

पायाखाली चुरणाऱ्या वाळक्या पानांतही फुलतो केशर मळा” 

असे क्षण हे माझ्या आयुष्यातील अतीव आनंदाचे क्षण असतात 



सिंगापूरमध्ये रहायला आल्या आल्या प्रत्येकाला आधी येथील हिरवाई मोहवते. त्या हिरवाईचा आपल्या आसपासचा डोळे सुखावणारा व मन शांतवणारा वावर आपल्या सवयीचा होत जातो. पण हळूहळू जसे प्रत्येकच सुखाचे होते तसेच सवयीने मग नुसती हिरवाई असणे, पहिल्याइतके आनंददायी वाटेनासे होते. "काहीही म्हणा पण सिंगापूरमध्ये सुंगधी फुलांची झाडे एकंदर कमीच, नाही का?" अशी कुरकुर सुरु होते!!!


खूप वर्षांपूर्वी असेच एकदा मन कुरकुरशास्त्री झालेले असताना, मी फिरायला गेले होते बुकीट बटोक नेचर पार्कमध्ये. सिंगापूरमध्ये नसलेल्या लेकराच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या हट्टी मनाची, `मुले मोठी झाली की दूर जाणारच ', ` मुले घराबाहेर राहिली नाहीत तर त्यांना जग कळणार तरी कसे व केव्हा?' अशी दुसरे तत्वचिंतक मन समजूत काढत होते. मग शांता शेळके यांच्या "जाणा-याची वाट अडवू नये कधीही, त्याला हसतमुखाने निरोप द्यावा. तेच असेल कदाचित त्याचे प्राक्तन किंवा सुंदर भविष्याचे आश्वासन" अशा काहीशा ओळीही आठवून झाल्या. आपल्याला कवितेचे नेमके शब्द आठवत नाहीत ह्या विषयी हळहळतानाही व्याकूळ मनाची समजूत काही केल्या पटत नव्हती ते गोष्ट वेगळीच!!

मनाच्या व्यग्र अवस्थेत कदाचित डोळ्यांनी पाहिलेले मेंदू पर्यंत पोचत नसेल पण नाकाने आपले काम चोख बजावले होते. अचानक एक सुंगध जाणवला. नाव लगेच आठवले नाही. पण गंध अगदी ओळखीचा होता. "त्याची माझी ओळखही जुनी, अगदी पूर्वजन्मीची वाटावी इतकी जुनी" आठवणीच्या लाटेवर स्वार होऊनच मग त्या गंधाचा माग लागला. तो होता सोनचाफा. त्याचा रंग, त्याचा गंध सारेच मला प्रिय. सोनचाफ्याचे झाड बुकीट बाटोक नेचर पार्क मध्ये सापडताच मी अगदी जुन्या ओळखीचे कुणी भेटावे इतकी खुश झाले. अनेक आठवणींचा, सुखद स्मृतींचा कोश विणला गेला. त्या आनंदाच्या भरात सारी व्याकुळता विसरून मन आश्वस्त कधी झाले, ते कळलेसुध्दा नाही!

अशीच एकदा होळी पौर्णिमेची वेळ. शब्दगंध लेब्राडोर पार्क मध्ये होता. आधी तिथे कधीच गेलेली नसल्याने, पार्कमध्ये गेल्यावर, रस्ता शोधत असताना चक्क मी सुगंधाने वेडीच झाले. तिथे किती बकुळीची झाडे होती म्हणून सांगू! तेव्हाच बकुळीचा सुगंध, पौर्णिमेचा चंद्र आणि कविता हे रसायन अगदी कायमचे आठवणीत कोरले गेले. सिंगापूरात बकुळीची झाडे खरोखरीच अमाप. मला तर कितीदा तरी भेटली आहेत. जेलापांग रोड जवळच्या नेचर पार्कमध्ये, कॅशु रोडजवळ, जूरोंगला आयबीपी मध्ये, आणखीही अनेक ठिकाणी भेटली आहेत. तो तो क्षण उजळवून गेली आहेत. 

एकदा जुन्या एअर इंडिया च्या ऑफिस कडून जुन्या इंडियन एअर लाईन्स च्या ऑफिस कडे निघाले होते. "कुठल्याही देशात ऑफिस असले तरी यांचा खानदानी आळशीपणा देशात असतो तसाच, बाकी एअर लाईन्स बघा कशा प्रोफेशनल आहेत..." अशी चीड चीड करत होते. अचानक शेंतोन वे च्या कोपऱ्यावर एक देखणे चाफ्याचे झाड सामोरे आले. किती त्याचा रुबाब, काय त्याचे सौदर्य! तशी तर सिंगापूरात चाफ्याची झाडे असंख्य आणि बहुरंगी. पण शेंतोन वे चे झाड मात्र लक्षात राहण्याजोगेच होते. 

मध्यंतरी औटरम पार्क जवळ एक कैलासपतीचे झाड दिसले. खरे तर त्या आधी व त्यानंतरही खुपदा कुठे कुठे कैलासपतीची झाडे दिसली होती. वेस्ट कोस्ट पार्क मध्ये, कोलकात्याला रामकृष्ण मिशनच्या आश्रमात, मुंबई ला ' द लीला 'च्या दारात, ठाण्यात घंटाळी मंदिराच्या आवारात. पण तरीही कैलासपतीच्या झाडावर मात्र औटरम पार्कच्या गणपतीची नाममुद्राच उमटलेली राहिली. 

बोटॅनिकल गार्डन मध्ये बहरलेली दिसली होती ती नक्की सुरंगीच की तिची एखादी चुलत वा मावस बहीण ह्या विषयी अजूनही मला शंका आहे. पण त्या बहराचा सुगंध मला खूप आवडला होता ह्या विषयी मात्र अजिबात शंका नाही!!!

सिंगापूर म्हटले की ऑर्किडच, फार फार तर सिंगापूर लिली वा स्पारोज नेस्ट असे अगदी पक्के समीकरण प्रसिद्ध असताना, हे बाकी सगळे वृक्ष भेटल्यावर फार बरे वाटते. दिखाऊ जगातून अगदी घरगुती वातावरणात आल्यावर वाटावा तसा सुकून मिळतो. 

सिंगापुरातल्या निसर्गाबाबत लिहायचे तर खरे तर इथल्या आकाशाच्या नानाविध रंगभूषा, उन्हाची कोवळीक व कर्मठपण, कधी कधी कडक उन्हाला ढगांमुळे लाभलेली मृदुता, ढगांची गडगड, विजांची कडकड, त्यांचे मनमोहक व रौद्र स्वरूप, इथला सुंदर पाउस, क्वचित कधी सुटणारा भरार वारा तसेच असह्य, गुदमरवून टाकणारा उकाडा... ह्या साऱ्याविषयी देखील लिहायला हवे. 

झालेच तर इथे बारा महिने कुहू कुहू साद घालणा-या कोकिळा, झाडांच्या गर्दीतून उडणारे पोपटांचे थवे, रस्ताभर साथ देणा-या साळुंक्या या विषयी पण लिहायला हवे. इथल्या विस्तीर्ण, व `जीवघेण्या ' सुंदर जलाशयांविषयी पण लिहायला हवे. पण हे सारे पुन्हा कधीतरी. `तसेही एकाच जन्मात कुठे सारे जगून होते ' च्या चालीवर `एकाच लेखात कुठे सारे लिहून होते 'असेच म्हणायला हवे!!!

आत्ता हा लेख संपवताना मी विचार करते आहे तो निसर्गाचे आपल्याला दिसणारे रूप हे मनातल्या भावनांचे प्रगटीकरण असते की निसर्गाच्या रुपानुसार मनातल्या भावना बदलतात ह्याचा. तोपर्यंत तुम्ही हे वरचे सगळे वृक्ष बघून या आणि प्राजक्त भेटलाच जर का सिंगापुरात कुठे, तर मी आठवण काढलीये म्हणून सांगा!!


 

-वृंदा टिळक 

(ऋतुगंध - हेमंत २०११)



डू बाई डू

 

 "आज मी इथे आहे तो केवळ माझ्या आईमुळेच" ह्या वाक्यानंतर जितका कापरा आवाज, डोळ्यात पाणी दिग्दर्शकाने करायला सांगितले होते तेवढे करून महामहिम गुरुजींनी पॉज घेतला. श्रोतृवर्गावर कॅमेरा फिरला. अनेक डोळ्यातून अश्रू, रुमालांची हालचाल इत्यादी टिपल्यावर कॅमेरा परत महामहिम गुरुजींवर आला. 'तुम्ही मराठी' या चॅनेलच्या "डू बाई डू "ह्या कार्यक्रमाचे चित्रण चालू होते.

 खरी गोष्ट अशी होती की त्यांची आई अतिशय रागीट होती. एखादी छोटी जरी चूक झाली तरी ती कान पिरगळून खेचत न्यायची. आपोआपच एक हात कानाला धरून दुसरा हात आणि दोन्ही पाय ह्यांच्या प्राणाच्या आकांताने अशा काही वेड्यावाकड्या हालचाली व्हायच्या की बस रे बस!! जशी चुकांची संख्या वाढत गेली तशी ह्या प्रसंगाची व आपोआप होणाऱ्या नृत्याची संख्याही वाढत गेली. पण दिग्दर्शक म्हणाले की नृत्याच्या शिक्षणाविषयी हे असे नाही सांगता यायचे जाहीर मंचावरून. 

मग महामहीम गुरुजी कॅमेर्याकडे पाहत म्हणाले,"माझी आईच माझी नृत्याची प्रेरणा आहे. माझा रियाज नियमित व्हावा ह्या कडे तिचे नेहमीच काटेकोर लक्ष असायचे." प्रेक्षकानी टाळ्यांचा कडकडाट केला. 

तो कडकडाट थांबल्यावर मग निवेदकाने परत " ह्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजेत "सांगून प्रेक्षकाना पुन्हा एकदा टाळया वाजवायला लावल्या.

 " 'डू बाई डू ' हा कार्यक्रम अतिशय उत्तम आहे.मराठी गुणवत्तेला व नृत्यकलेला वाव देणारा आहे.एवढे सांगून मी सध्यापुरता थांबतो" महामहिम गुरुजींचे बोलणे संपताच निवेदकाने लगेच "तुम्ही मराठी" चे मालक हरीश पुंजानी ह्यांना कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याची विनंती केली. 

आता गेले दीड वर्ष चालू असलेल्या कार्यक्रमाचे आत्ता परत उद्घाटन का होते आहे असा प्रश्न कोणालाही पडला नाही. 'तुम्ही मराठी ' चानेल हमेशा मराठी संस्कृतीची जोपासना करायला वचन बध्द राहेल म्हणजे राहेलच. मायबाप प्रेक्षकांचा आणि स्पोन्सर्स चा आशीर्वाद मिलाला तर आम्ही काय बी करू शकतो. एवडे बोलून मी आजच्या कारेक्रामाचे उद्गाटन झाले असे जाहीर करतो."

लगेच " डू बाई डू " चे टायटल सॉंग वाजायला सुरुवात झाली.

 "डू बाई डू, डान्स डू

नव्या रिती पाडू,,

सारे नियम तोडू

 डू बाई डू डान्स डू "

त्या गीतावर नृत्य करत चारी मेंटोर चे आगमन झाले.ते नाचत नाचत गीतलेखक दिलशा कातील ह्यांच्या खुर्चीजवळ गेले व त्यांना पुष्पगुच्छ दिला. त्या वेळी चार शब्द बोलताना दिलशा कातील ह्यांनी आपले हे टायटल सॉंग लोकप्रिय केल्याबद्दल पब्लिकचे आभार मानले व ह्या गाण्याद्वारे असामान्य प्रतिभा दाखवल्याबद्दल आपल्याला अ.भा.भा..म.प. ने सन्मानित केल्याचे सांगितले. अ.भा.भा.म.प.चे म्हणजेच अखिल भारतीय भायखळा मराठी परिषदेचे पण त्यांनी जाहीर आभार मानले. एवढ्या सुरुवातीनंतर एक ब्रेक तो होनाही मंगता था..त्या प्रमाणे तो झालाच.

 डू बाई डू च्या ह्या पर्वातील हा २४ वा एपिसोड होता. महाराष्ट्रातील मुलांच्या नृत्यगुणाना वाव मिळावा, त्यांच्या कलेचा विकास व्हावा ह्या हेतूने हा कार्यक्रम सुरु झाला होता. त्याच्या नावापासूनच मराठीचे प्रेम व संस्कृती जोपासण्याची तळमळ दिसून येत होती. कार्यक्रमाला सुरुवातीपासूनच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता.

 'डू बाई डू ' च्या निवड फेरीची तयारी करून घेणारे क्लासेस जोरात चालू होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या तील, गल्लीबोळातील, छोट्या मोठ्या शहरातील मुले मुली ह्या कार्यक्रमाद्वारे झळकायला मिळावे म्हणून उत्सुक होती.

 पहिले चार एपिसोड निवड फेरीचे चित्रण झाले होते. त्यातून २४ स्पर्धक निवडले गेले होते.. प्रत्येक मार्गदर्शक ज्याला कार्यक्रमात मराठीमध्ये मेंटोर असे म्हणाले जायचे, ६ जणांना मार्गदर्शन करीत होता. पाचव्या एपिसोडपासून त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेले नृत्यप्रकार केले जात होते.दोन जण परिक्षक होते. ज्यांचा नृत्याशी कधीही संबंध आला नव्हता असे लोक मुद्दाम परीक्षक म्हणून येतील ह्याची काळजी घेतली गेली होती. सगळ्यात ज्येष्ठ महापरीक्षक म्हणजे महामहीम गुरुजी होते.

 प्रत्येक मुलाचा नाच, मग त्यानंतर निवेदकाचे असंबध्द बोलणे, मग परीक्षक स्वतःची जीवन कहाणी सांगणार, मग महामहीम गुरुजी चार शब्द म्हणून एक गोष्ट सांगणार, ह्यात मध्ये मध्ये टाळ्या, त्या नन्तर ब्रेक, मग दुसऱ्या मुलाचा नाच व परत हे सगळे चक्र असे करत २४ स्पर्धकांची एक फेरी पूर्ण होईपर्यंत आणखी ४ एपिसोड गेले होते. मग त्यातील २० मुलांना निवडले गेले.

 त्यानंतर विषय दिला गेला होता महाराष्ट्रीय शास्त्रीय नृत्य. ह्या मध्ये स्पर्धकांनी मेंटोर च्या सल्ल्याने झुम्बा, टॅंगो, हिपहॉप, जाझ असे मराठमोळे प्रकार सादर केले. काही स्पर्धकांनी हळूच आम्ही कथ्थक,भरत नाट्यम व कुचीपुडी करू शकतो का असे विचारले.

त्यावर त्यांना,"यु स्टुपिड,अरे ते काय मराठी प्रकार आहेत का?" असे उत्तर मिळाले. ह्यात परत ४ एपिसोड गेले.आता टी आर पी जरा कमी झाला होता. त्यामुळे मग ह्या नंतर २० पैकी १६ स्पर्धक निवडताना परीक्षकांच्या मतभेदांचा वग दिग्दर्शकांनी बसवून घेतला. 

प्रत्यक्ष कार्यक्रमाआधी सतत जाहिरात करून "काय होणार पुढे?" असे प्रेक्षकांच्या कानावर दिवसातून शंभरदा पडेल, ह्या मतभेदाच्या वगातील निवडक दृश्ये पाहायला मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली. त्याचा योग्य तो फायदा होऊन टी आर पी परत वाढला होता.

आता १६ जणांचा कसून सराव सुरु झाला होता. त्या सरावाचे चित्रीकरण, स्पर्धकांची राहण्याची जागा दाखवणे, त्यातील त्यांचे प्रेम व भांडणे दाखवणे ह्यात अजून २ एपिसोड गेले. कार्यक्रमाच्या ह्या गतीवर स्पॉन्सर्स फारच खुश होते.

आता मराठी वातावरण चित्रित करणारे नृत्य अशी फेरी होती. ह्यात मग कोंबडी पळाली, दे धक्का, हम को आजकाल हैं इंतेझार, मुंगडा ओ मुंगडा, चिकनी चमेली इत्यादी भावगीतांवर नृत्ये बसवली गेली. आत्तापर्यंत कार्यक्रम सुरु होऊन तसे पाहिले तर साधारण ४ महिनेच होत होते. पण कार्यक्रमातील १०-१५ वयोगटातील स्पर्धक मात्र ह्या चार महिन्यात कमीतकमी ५ वर्षे वय वाढल्याप्रमाणे नृत्ये करायला लागले होते. त्यामुळे ह्या ‘भाव' गीतातील 'भाव ' दर्शन त्यांनी फारच जाणकारीने केले. न राहवून, समाजाला परिपक्व करणारा कार्यक्रम म्हणून महामहीम गुरुजींनी एकदा कौतुक देखील केले.

ह्यानंतर 'तुम्ही मराठी' च्या मूळ उद्देशापासून कार्यक्रम भरकटत चालला आहे का अशी चर्चा वर्तमानपत्रात, विविध संस्थळांवर घडवून आणण्यात आली. त्यामुळे जे लोक हा कार्यक्रम आधी बघत नव्हते ते देखील उत्सुकतेने हा कार्यक्रम बघू लागले. चर्चेचा उद्देश सफल झाला. 

आता नृत्यात व भाव दर्शनात उत्तम तयारी असलेली १२ जणेच ह्या कार्यक्रमात उरली होती. मग एकदा त्यांना त्यांच्या गावाला नेऊन आणून व मंदिर,मस्जिद,चर्च,गुरुद्वारा अशा शक्य त्या सर्व धार्मिक ठिकाणी नेऊन आणून २ एपिसोड खर्च केले गेले व जनमत तयार केले गेले. कारण ह्या पुढच्या फेरीपासून एसेमेसद्वारे जनतेला विजयी स्पर्धकांची निवड करता येणार होती.

आता एसेमेस महत्वाचे असल्यामुळे दूरध्वनी कंपनीचे गिलानी शेठ मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत रस घेऊ लागले होते!!! 

एका बाम बनवणाऱ्या कंपनीने पण प्रायोजकत्व देऊ केले होते. त्यांची अट फक्त एवढीच होती की नृत्याच्या स्टेप्स अशा पाहिजेत की शरीराचे तमाम अवयव सर्व दिशांनी आणि सर्व कोनांतून हलायला पाहिजेत. म्हणजे मग त्याची नक्कल जेव्हा अगदी बालक मंदिरापासून ते कॉलेजपर्यंतच्या स्नेहसंमेलनापर्यंत, तसेच गणपती उत्सवापासून ते लग्न समारंभापर्यंत होईल तेव्हा बऱ्याच लोकांचे बरेच काही लचकले वा मुरगळले पाहिजे. तरच आमच्या बामचा खप वाढू शकेल. 

दिग्दर्शकांनी त्यांना सांगितले," तुम्ही काळजीच करू नका हो अजिबात.अहो, सुरुवातीच्या एपिसोड मध्ये गणेश वंदनेला देखील मुलांनी एवढे लचके झटके केले. आता तर काय शेवटच्या व महत्वाच्या फेऱ्या आल्या आहेत. आता जोरदार असतील स्टेप्स. तुमच्या बामचा खप दोनशे टक्क्यांनी नाही वाढला तर हा कार्यक्रम सोडून देईन बघा मी!! "

संशोधन सहाय्यकाने इमाने इतबारे महाराष्ट्रातील नृत्यप्रकारावर गुगल सर्च करून त्याची प्रिंटआउट दिग्दर्शकाच्या हातात आणून दिली. दिग्दर्शकाने त्याकडे एकदा नजर टाकताच त्याचे डोकेच फिरले. त्या कागदावर बाल्या नृत्य, आदिवासी नृत्य, गोंधळ, जोगवा असले काय काय लिहिलेले होते. " किस गधेने इसको रिसर्च असिस्टन्ट बनाया रे? टी आर पी कम करना हैं क्या? आता फक्त लावणी आणि कोळी नृत्यच होऊ शकेल. कोळ्यांनी कधी जन्मात पहिल्या नसतील अशा स्टेप्स आता त्यांना बघायला मिळतील आणि फडावरच्या बाया पण आमच्या शो मधून नव्या स्टेप्स शिकतील. असल्या धम्माल नाचानेच तर आपला टी आर पी वाढेल. जा, ये कागज कचरेमे फेक दे."

आता पुढच्या एपिसोडस ची जोरात तयारी सुरु आहे. वातावरण तयार केले जात आहे. दूरदर्शन वरून, "लहान मुलांनी लावणी नृत्य करणे योग्य की अयोग्य?" ह्या विषयावर चर्चा घडवून आणली जात आहे.

आपल्या बिनधास्त शैलीसाठी प्रसिध्द असलेले पत्रकार श्री. माथेफिरू ह्यांना भरभक्कम पैसे देऊन भडक शैलीत कार्यक्रमावर टीका करणारे लेख पुंजानी शेठ लिहून घेत आहेत. 

"असेच नृत्य सादर होणार असेल तर हा कार्यक्रम कौटुंबिक वेळेला ठेवावा की रात्री उशिरा ", “ ह्या कार्यक्रमाचा नृत्याशी काही संबंध आहे की फक्त व्यापार चालू आहे?” अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्या जात आहेत म्हणजे घडवून आणल्या जात आहेत.

हवा तापत आहे. त्याचा फायदा कार्यक्रमाला मिळत आहे. "डू बाई डू "कार्यक्रम जोरात चालू आहे. ह्या कार्यक्रमाने पुंजानी शेठना आर्थिक समाधान मिळत आहे. प्रत्येक स्पर्धकाने नृत्यानंतर जय म्हाराष्ट्र म्हणणे त्यानी सक्तीचेच केले आहे.

 एकूण मराठी संस्कृतीला आणि नृत्याला सुगीचे दिवस आले आहेत ह्यात कोणाला शंकाच नसावी!!

|| जय म्हाराष्ट्र || 

-वृंदा टिळक 

(ऋतुगंध ग्रीष्म २०१२/१३)



हद्द झाली !!!

               अयाई ग्ग !!गाडीला बसलेल्या जोरदार धक्क्याबरोबर पाठीतून जोरदार कळ गेली. अगदी मणका न मणका मोजून घ्यावा अशी.

 " एक्स्प्रेस हायवे संपून बेलापूर रोड सुरु झाला ..लगेच धक्के बसायला सुरुवात झाली. हे खड्डे कधी बुजवणार कोणास ठाऊक? " पुस्तक बंद करत स्मिता मनाशीच म्हणाली.

 "पुस्तक वाचत असताना किती वेळ गेला कळलेच नाही.आता काय ठाण्याला पोचायला आणि असमीचे घर यायला वेळ लागायचा नाही".

 " आता ना ही असमी असमी म्हणायची सवय सोडून द्यायला हवी. सतत माझ्या तोंडचे असमी ऐकून मैत्रीणीना पण वाटायला लागलेय की तिचे नाव असमीच आहे. त्या पण तिला असमी म्हणायला लागल्यावर मात्र त्यांना सांगायला लागले की अग बायानो, तिला अस्मिता म्हणा !! "

 "ही पाठ मात्र आता फारच छळते आहे.सकाळी निघताना घेतलेल्या पेनकिलरचा इफेक्ट आता ओसरलेला दिसतोय.काल मैत्रिणीबरोबर सिनेमाला जाताना वाटले होते आपले मन सिनेमात गुंतल्यावर पाठ दुखणे एवढे जाणवणार नाही.पण नाहीच. एरवी मैत्रीणीना भेटून आल्यावर सतत बोलण्याने व हसण्याने डोके दुखतेच.काल शिवाय पाठही दुखत होती. "

"चला, आले की असमीचे घर "मुले आणि अस्मिता तिची वाट पाहत दाराशी उभीच होती.तिघांनाही तिच्याशी बोलायचे होते. तिला काय काय दाखवायचे होते. एकच गडबड उडाली.जेवतानाही गप्पा चालूच होत्या.

अस्मिताने भरगच्च कार्यक्रम आखला होता. गडकरी रंगायतन मध्ये नाटक, मासुंदा तलावात बोटिंग, तलावपाळीवर थोडे फिरून मग जेवण आणि आईस्क्रीमने कळसाध्याय ! 

कुठलेसे ऐतिहासिक नाटक चालू होते. "हा मर्द मराठा गडी मोडेल पण वाकणार नाही." असा खणखणीत संवाद ऐकताना स्मिताला वाटून गेले, नक्की ह्याची पण पाठ दुखत असणार! म्हणूनच वाकणार नाही म्हणत वाकायचे टाळतोय !!!नाट्यगृहातल्या ए.सी .ने तर तिची पाठ चांगलीच दुखायला लागली होती. 

नाटक संपताच बाहेर पडायला ही गर्दी. कसेबसे ढकलत, ढकलले जात हे सगळे बाहेर पडतायत तोच स्मिताच्या शेजारणीचा भाऊ दिसला. "झाSSSSले..आता मी पुण्यात पोचायच्या आधीच, मी कोणत्या नाटकाला,किती वाजता, कोणाबरोबर आले होते ह्याची सविस्तर बातमी पुण्यात पोचणार तर !!" 

 "नमस्कार !! इकडे कुठे? "

"बहिणीकडे आलेय. ही असमी..अस्मिता "

"अरे वा.. पाठची बहिण दिसतेय ..ओळखूच येते... अगदी सारख्या दिसता दोघी "

" अरे बाबा,नुसत्या सारख्या दिसता म्हण ना ..पाठची म्हणून परत मला माझ्या दुखणाऱ्या पाठीची कशाला आठवण करून देतोस !! " स्मिता मनाशीच म्हणाली. त्यालाही पुढच्या नाटकाला जायचे असल्याने बोलणे थोडक्यात आटोपले. 

तलावपाळीवर फिरताना अस्मिता म्हणाली,"मला ही जागा फार आवडते..आत्ता गर्दी आहे म्हणून तिचे रूप वेगळे.. एखाद्या गजबजलेल्या घरासारखे. पण पहाटे किंवा रात्रीच्या शांत वेळी इथले रूप काही आगळेच असते. वाऱ्याबरोबर हेलकावणारे तलावातील पाणी, त्यात हिंदकळणारी काठावरील दिव्यांची प्रतिबिंबे आणि हे सारे साक्षीभावाने पाहत उभी पाठीमागची गडकरी रंगायतनची इमारत.."

आई ग…’पाठी' मागची.. सगळे जग आपल्या दुखणाऱ्या पाठीची आठवण करून द्यायला टपले आहे असे स्मिताला वाटून गेले..नव्हे हात धुवून 'पाठीच' लागले आहे म्हणायला हवे !!

रात्री झोपताना तिने परत एक पेनकिलर घेतली. सकाळी उठली तर मुलांच्या शाळेच्या तयारीची गडबड सुरु होती. तिच्या भाचीला वेणी घालण्यापासून ते अच्छा करण्यापर्यंत सगळ्याला मावशीच हवी होती.

मुले शाळेत गेल्यावर आवरून बहिणीबहिणी खरेदीसाठी बाहेर पडल्या. आधी ठरल्याप्रमाणे एकेक साडी घेऊन झाली. मग आवडली म्हणून एकमेकींना आग्रह करून आणखी एकेक घेऊन झाली. येताना सहज शो केस मधले पंजाबी सूट बरे वाटले म्हणून एका दुकानात शिरल्या तर तिथल्या काही शेड्स आपल्याकडे नाहीच्चेत असा साक्षात्कार दोघीनाही झाला. म्हणून मग ड्रेसची दोन दोन कापडे घेऊन दोघी दुकानाबाहेर पडल्या. इतक्या वेळ जिची आठवण पण आली नव्हती त्या पाठीने गाडीत बसायला खाली वाकताच आपले अस्तित्व जाणवून दिले. अशी कळ सरकत गेली की स्मिताची बोलतीच बंद झाली. 

येताना रस्ताभर अस्मिता आपण कशी आजकाल काटकसर करतोय ते सांगत राहिली. खरे तर स्मितालाही आपली काटकसरीची उदाहरणे सांगायची होती पण ही मेली पाठ..सुचू देईल तर ना...

तिचा चेहरा बघून अस्मिता म्हणाली,"नुसत्या पेनकिलर घेऊन काही पाठ बरी होत नाहीये तुझी. इथे जवळच माझी एक मैत्रीण आहे. डॉ.शमा बापट. आयुर्वेदिक डॉक्टर आहे. चांगला गुण आहे तिच्या हाताला..आपण संध्याकाळी तिच्याकडे जाऊ या. "

 शमाकडे गेल्यावर तिने स्मिताची नाडी बघितली. नाडी बघून हिला पाठीचे दुखणे कसे कळणार असे स्मिताच्या मनात येते न येते तोच तिने स्मिताच्या मानेवर एके ठिकाणी थोडा दाब दिला. स्मिता जोरात विव्हळली. भारीभक्कम शब्द वापरून मग शमाने स्मिताला काय झाले आहे, त्यावर काय औषध हवे, त्याचा काय परिणाम होईल हे सगळे समजावून सांगितले. औषधी तेलाने मसाज केला आणि औषधही बांधून दिले. मसाज केल्याने आता स्मिताला खूपच बरे वाटत होते. रात्री गप्पांच्या नादात औषध घ्यायचे राहूनच गेले.

पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याला निघायच्या गडबडीत अस्मिताने तिला आठवण करून दिली आणि औषध घ्यायलाच लावले.

"दोन दिवस कसे गेले कळलेच नाही." गाडीत स्मिता विचार करत होती. हातात पेपर होताच वाचायला.मध्ये ड्रायव्हरने चहा प्यायला गाडी थांबवली. स्मिताही पाय मोकळे करायला खाली उतरली.

उन चांगले तापले होते.स्मिताने गॉगल डोळ्यांवर चढवला. जरा घट्ट वाटत होता गॉगल. स्मिताने आपला मोर्चा चिक्कीच्या दुकानाकडे वळवला. वाटेत खूप जण आपल्याकडे वळून वळून पाहत आहेत असे तिला जाणवले. नवा रेबॅन चा गॉगल आणि डिझायनर ड्रेस असल्यावर दुसरे काय होणार? ती मनाशीच म्हणाली आणि चिक्की घेऊन गाडीत बसली.

"म्याडम,तब्बेत ठीक आहे न तुमची?" गाडीत ती बसताच ड्रायव्हरने विचारले.

"हो एकदम छान आहे."स्मिता उत्तरली. मसाज आणि औषधाने आपला परिणाम दाखवला होता. पाठ आता दुखेनाशी झाली होती.

घरी पोचताच तिने हातपाय धुतले. तोंडावर पाणी मारत तिने आरशात पाहिले आणि ती दचकलीच. हे आरशात काय दिसतंय ते तिला कळेचना.

 मग नीट पाहिल्यावर तिच्या लक्षात आले आरशात जे काय दिसत होते ते तिचे तोंडच होते. फक्त त्यावरच्या नाकाच्या आकारात प्रचंड वाढ झाली होती. नाकाच्या मुळापासून ते शेंड्यापर्यंत तसेच गालाचाही काही भाग खूप सुजलेला होता. तरीच गॉगल घट्ट बसला होता आणि लोकही वळून वळून पाहत होते. जेमतेम कॉफी पिऊन ती लगेच डॉक्टरकडे गेली.

 डॉक्टरांनी ही कसली तरी अलर्जी आहे असे सांगताच तिने कपाळावर हात मारून घेतला. आपल्याला गुग्गुळाची ऍलर्जी आहे हे आपण शमाला सांगितलेच नाही. तिचे बोलणे ऐकताना गुग्गुळाच्या ऍलर्जी विषयी सांगायला साफ विसरलो. त्या गोळ्यात गुग्गुळ असणार. म्हणूनच सकाळी औषध घेतल्यावर १/१.५ तासांत चेहरा सुजायला सुरुवात झाली.डॉक्टरांकडून अलर्जीसाठीची औषधे घेऊन ती घरी आली.

घरी आली तर लगेच नवऱ्याचा फोन.. तो रात्री जेवायला काही परदेशी पाहुण्यांना सोबत घेऊन येणार होता. एवढा विचित्र चेहरा दिसत असताना पाहुणे आले तर कसे होईल असा संकोच तिला क्षणमात्र वाटला. पण तो विरूनही गेला. कारण नवऱ्याचे तर आपल्याकडे लक्ष जाणार नाही ह्याची तिला खात्रीच होती आणि पाहुणे तिला पहिल्यांदाच पाहणार होते. त्यांना वाटले असते ती नेहमीच अशी दिसते! 

 जेवणाचा कार्यक्रम सुरळीत पार पडला. नंतर पाहुण्यांना पोचवायला ती खाली उतरली तर लिफ्ट समोरच मैत्रीण भेटली. स्मिताला पाहिल्यावर ती एवढ्या जोरात किंचाळली की पाहुणे दचकलेच. मैत्रिणीने म्हटल्यावर मग स्मिताच्या नवऱ्याचे लक्ष गेले. खरेच हिच्या चेहऱ्यात काहीतरी बदल दिसतोय.. पण बदल म्हणजे नक्की काय बदल दिसतो आहे ह्याचा उलगडा होण्याच्या आधी दचकलेल्या पाहुण्यांना सावरणे गरजेचे होते.

तो पाहुण्यांना म्हणाला, " शी इज एक्सायटेड बिकॉज दे आर मीटिंग आफ्टर अ लॉंग गॅप”

"ओह..दीज इंडियन्स आर रियली इमोशनल स्टफ" पाहुणे नक्कीच मनात म्हणाले असणार.

पाहुणे गाडीत बसताच स्मिता मागे वळली तर मैत्रीण तिच्याशी बोलायला थांबलेली होती. "अग,माझ्या ओळखीचे एक चांगले आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. उद्या सकाळी आपण त्यांच्याकडे जाऊ या. त्यांच्या औषधाने तुला नक्की बरे वाटेल."

"अरे देवा !! हद्द झाली. आता परत आयुर्वेदिक औषध !! " खो खो हसत स्मिता तिथल्या कट्ट्यावर बसली. तिला हसणेही आवरता येईना आणि आयुर्वेदिक औषधातील गुग्गुळाच्या अलर्जीमुळेच हे झाले आहे असे मैत्रिणीला सांगताही येईना.ती अनावर हसत राहिली. 

 मैत्रीण हताश होऊन आता हिची पाठ,नाक ह्या बरोबर डोकेही डॉक्टरना दाखवायला पाहिजे असा विचार करत गंभीरपणे तिच्याकडे पाहत राहिली.

-वृंदा 

(ऋतुगंध -शरद २०१३/१४)


महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...