एक काळ असा होता जेव्हा घरोघरी टी.व्ही. नव्हता. चित्रपट पाहायला जाण्याचे अप्रूप होते.त्या काळातल्या एका निरागस मुलीची ही गोष्ट...गोष्ट : बिट्टची..गोष्ट बिट्टू सिनेमाला जाते त्याची आणि गोष्ट त्या काळातल्या भाबडेपणाचीदेखील.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बिट्टूचा चिमुकला जीव आता जरा भांड्यात पडला होता. गेले काही दिवस फार धावपळीचे गेले होते. त्याचे असे झाले की ७/८ दिवसांपूर्वी बिट्टू जवळपास आली की ताई आणि तिच्या मैत्रिणी अचानक 'च' च्या भाषेत बोलायला सुरुवात करायला लागल्या. ‘च’ ची भाषा तर बिट्टूला अजिब्बात समजत नव्हती पण आपल्याला समजू नये म्हणून त्या सगळ्या जणी ‘च’ च्या भाषेत बोलत आहेत हे मात्र नक्की समजले! त्यांच्या चेहऱ्यावरचा न लपणारा आनंद, विस्फारलेले डोळे आणि कुजबुजत असताना नकळत उंचावणारा आवाज हे सगळेच बिट्टूला कुतुहलाचे वाटू लागले. काय बरं बोलत असतील त्या? कोणीतरी नवें खेळणे आणले असेल का आणि ते आपल्याला दाखवायचे नसेल म्हणून तर त्या अशा कुजबुजत बोलत नसतील? छे..तसे नसणार. मागच्याच आठवड्यात नाही का भांडण झाले तेव्हा ताईच्या मैत्रिणीनी बिट्टू आणि तिच्या मित्र मैत्रीणीना चिडवले होते की, "जा जा, खेळा तुम्हीच. आम्ही काही आता तुमच्यासारख्या लहान नाही आहोत खेळण्यांशी खेळायला. नकोच्चेत आम्हाला तुमची खेळणी " तेव्हा खेळण्याविषयी नक्की नसणार. मग खाऊ असेल का कोणी आणलेला आणि तो आपल्याला देत नसतील? पण ताई काय आपल्याला दिल्याशिवाय खाऊ खात नाही काही कधी. तेव्हा खाऊ बिऊ ची काही भानगड नसणार. काय असेल बरे त्यांची गंमत? बिट्टू जवळ आली की त्या बोलायच्या तरी थांबत तरी किंवा आवाज तरी बारीक करीत. काय बोलताय म्हणून विचारले की तुला काय करायच्यात ग मोठ्यांच्या गप्पा म्हणून तिच्यावर ओरडत. ह्या मैत्रिणी बरोबर असल्या ना की ताई पण त्यांच्यासारखेच वागते हां. आता बाबा आले की अगदी लक्षात ठेवून तिने मला खूप त्रास दिला हे सांगायलाच पाहिजे. बिट्टूने मनाशी पक्के केले.
असेच अजून १/२ दिवस गेले. आईने बिट्टू ला नव्या रिबिनी आणल्या. ताईने उदबत्ती लावून त्यांच्या कडा जाळून दिल्या. बिट्टू ने हट्ट केला म्हणून रिबिनीवर पाच भोकांची नक्षी पण काढून दिली. त्या रिबिनी मिरवण्यात बिट्टू ताईचे आणि तिच्या मैत्रिणींचे गुप्त बोलणे जवळ जवळ विसरूनच गेली. पण खेळायला गेल्यावर झाले काय की चकताना भांडण झाले. ‘राम राई साई सुट्ट्यो, म्हणून पुरे व्हायच्या आधीच राजू हात सोडून देत होता आणि मग कोण कसे हात ठेवतेय ते बघून सगळ्यात शेवटी आपले हात ठेवत होता. बिट्टू त्याला म्हणाली,"ए राजू,असे नसते काही चकायचे. थांब मी तुला शिकवते कसे चकायचे ते." राजूला आला राग. तो म्हणाला,"ए राहू दे हां..मोठी आलीये शहाणी मला शिकवणारी. स्वत:ला काय मोठ्ठी समजते का ग? मग असेच आहे तर ताई आणि तिच्या मैत्रिणी सिनेमाला जाणारेत उद्या, त्या का तुला फसवून घरी ठेवून जाणारेत? सांग न सांग" बिट्टू ला खूप धक्काच बसला. आपल्याला कोणीतरी ढकलून खाली पाडले आहे असेच तिला वाटले. तिचे तोंड हिरमुसले तरी पण उसना आव आणून ती राजूला म्हणाली," ए खोटारड्या, उगीच काहीतरी नको सांगूस. माझी ताई मला फसवून जाणारच नाही मुळी. तुझीच ताई जाणार असेल." पण नंतर तिचे भांडण्यात किंवा खेळण्यात कुठेच मन लागेना. ताई आणि तिच्या मैत्रिणी चिरकी खेळत होत्या तिकडे ती गेली आणि ताईला म्हणाली," ताई ताई, हा राजू बघ ना, काहीही बोलतोय. तू नाही ना ग मला फसवून सिनेमाला जाणार?" ताई आणि तिच्या मैत्रिणी एकदम खेळता खेळता थांबल्याच. ताई अंजूवर ओरडली, "बघ सांगितले होते तुला राजूला सांगू नको म्हणून. आता हिला कळले.आता हे रडतराऊ ध्यान आपल्या पाठी लागणार”. म्हणजे राजू म्हणाला ते खरे तर.
तो धक्का आणि ताईने सगळ्यांसमोर रडतराऊ म्हणण्याने झालेला अपमान बिट्टूला असह्य झाला. मुसमुसत पाय आपटत ती घरी गेली. तर नेमक्या शेजारच्या काकू आईकडे स्वेटर शिकायला आलेल्या होत्या. आईने खरे तर बिट्टू रडत रडत आलेली पहिली होती. पण आत्ता तिच्याकडे लक्ष दिले तर स्वारी मोठे भोकाड पसरेल हे आईला माहिती होते. म्हणून तिने बिट्टू कडे आपले लक्षच नाही आहे असे दाखवले. थोडा वेळ आईचे लक्ष आपल्याकडे जायची वाट पाहून बिट्टू आतल्या खोलीत जाऊन पलंगावर पालथी पडून रडू लागली. ताई आपल्याला फसवून सिनेमा जाणार होती ह्याचे तर दु:ख होतेच. शिवाय ही गोष्ट राजूला माहिती होती आणि आपल्याला नाही हा अपमानही होता.आईने लक्ष न दिल्याने तर अपमानाचा कडेलोटच झाला होता. बिट्टू चे चिमुकले जग अनपेक्षित रित्या दु:खाने भरून गेले. थोडा वेळाने काकू घरी गेल्यावर आई आत आली तर काय, रडता रडता बिट्टू झोपून गेली होती. वेणीतले काही केस सुटून कपाळावर आले होते. गालांवर अश्रुंचे ओघळ वाळून गेले होते. अजूनही झोपेत मधेच हुंदके येत होते.आईने तिच्या कपाळावरचे केस मागे केले आणि मनाशी म्हणाली, आता हे ध्यान ताईच्या मागे लागणार!
आईला वाटले होते तसेच झाले. थोड्या वेळाने बिट्टूला जाग आल्या आल्या तिने मला पण ताई बरोबर सिनेमाला जायचे आहे असा धोशा सुरु केला. तोपर्यंत ताई देखील खेळून घरी आली होती. आई आणि ताई मिळून बिट्टूची समजूत काढू लागल्या.
" तुला समजत नाही ग सिनेमात काय बोलतात ते. मग तुला कंटाळा येईल न, म्हणून तू नको येऊ सिनेमाला ".
" नाहीSSS मला समजते. मला पण यायचेय तुझ्या मैत्रिणींबरोबर सिनेमाला."
"अग तो भुताचा सिनेमा आहे. तुला भीती वाटते की नाही, म्हणून तू आपली मस्तपैकी घरीच राहा हां."
“नाही..मला यायचेय..भीती वाटली तर मी तेव्हा घट्ट डोळे मिटून घेईन. ताईचा हात धरून ठेवेन. पण मला यायचेय."
आता आई पण कंटाळली. आई म्हणाली,"बरं, उद्याचे उद्या पाहू. आता हातपाय धुवून शुभंकरोती म्हणायला बस. पाढे पण सगळे म्हणून झाले पाहिजेत. पावकी ,निमकी विसरायची नाही. पूर्ण म्हणायची. माझे लक्ष असणार आहे”.
आईचा आवाजाचा पोत बदललेला बिट्टूने टिपला. ती पटकन हातपाय धुवून शुभंकरोती म्हणायला गेली. त्या दिवशी रात्री झोपेपर्यंत बिट्टू अगदी शहाण्यासारखे वागत होती.
नेहमीप्रमाणेच सकाळ झाली. ताई व बिट्टू ,दोघींची शाळेत जायची गडबड सुरु झाली. बिट्टू ने आजपण शहाणपणाचा घेतला वसा सोडला नव्हता. रोजच्यासारखे पाण्यात खेळत न बसता, आई ओरडायच्या आत ती अंघोळ करून बाहेर आली. आपापली बटणे पटापट लावून, युनिफोर्म घालून तयार झाली. पांढरे बूट बाहेर काढून ठेवले. दप्तर भरून घेतले. सगळे अगदी पटापट ,आवाज न करता. आईला नवलच वाटत होते. उठल्यापासून बिट्टूने एकदाही सिनेमाचा विषय काढला नाही ते पाहून आई मनात म्हणाली, " विसरलेल्या दिसतात बाईसाहेब कालचा हट्ट. चला बरे झाले! आता हिला दुपारी लवकर झोपवले की ताईला सिनेमाला जाता येईल."
आईने डब्यात तूप साखर लावून पोळी दिलेली पाहून बिट्टू खुश झाली. तिच्या वेण्या आई वर बांधून देत होती तेव्हा हळूच आईला म्हणाली,"आई ,आज मी शहाणी झालेय ना"
आई कौतुकाने म्हणाली,"हो तर..दृष्टच काढायला पाहिजे अगदी"
"मग पाठवशील मला ताई बरोबर सिनेमाला?”
"आहेच का अजून ते डोक्यात खूळ?मला वाटले विसरलीस. जा आता निघा.शाळेला उशीर होईल."
“ हो..निघतेच.अच्छा आई." केव्हा एकदा शाळा संपते आणि आपण घरी जातोय असे बिट्टूला वाटत होते. त्या दिवशी शाळा नेहमीपेक्षा खूप जास्त वेळ होती बहुतेक! अखेर एकदाची शाळा सुटल्याची घंटा वाजली.बिट्टू आणि तिचे मित्रमैत्रिणी दप्तरे घेऊन घरी पळत निघाले. त्या दिवशी बिट्टू कोणाला अगदी काड्यापेटीचे रिकामे खोके बघायलाही थांबू देत नव्हती. रस्त्याने येताना मांजरीला हात लावणे नाही, कुत्र्याला उरलेला डबा देणे नाही, तिने कोणालाही मध्ये थांबू दिले नाही. थेट घर गाठले. त्या दिवशी ही सगळी फटावळ इतक्या लवकर कशी परतली ह्याचे नवल कॉलनीतील घरोघरी सगळ्यांनाच वाटले. आल्या आल्या बिट्टूने दप्तरातील डबा काढला. हातपाय धुतले.कपडे बदलले. पाटपाणी घ्यायला मदत केली. शहाणपणाचे मूर्तीमंत रूप म्हणजे बिट्टू असेच आज कोणालाही वाटले असते. जेवणे झाली.
कधी नव्हे ते आई आज जेवून झाल्या झाल्या म्हणाली,"चला आता झोपू या सगळ्यानी थोडा वेळ”. हे ध्यान झोपले की ताईला निर्वेधपणे मैत्रिणींबरोबर सिनेमाला जाता येईल असा तिचा अंतस्थ हेतू होता. पण बिट्टू कसली खट. ती म्हणाली," मी नाही झोपणार.मला ताई बरोबर जायचे आहे ".
आता मात्र ताई वैतागली. दीड वाजत आला होता. तीनचा सिनेमा म्हणजे अडीचला तरी निघायला पाहिजे होते. आता हे भूत हट्ट करत बसले तर झालेच. ती ओरडली, "मी अजिब्बात नेणार नाहीये तुला माझ्या मैत्रिणींबरोबर. दरवेळी काय..शेपूट बरोबर आहेच. काही गप्पा पण मारता येत नाहीत मग आम्हाला."
आई पण म्हणाली,” बिट्टू तू झोप. सिनेमाला तू जायचे नाहीयेस”. आता बिट्टूचा भोंगा मोठ्याने सुरु झाला. त्यावर आई चिडलीच.
" हे बघ तुला वाटत असेल की दरवेळी आपण मोठ्याने आवाज काढून रडू आणि मग आई आपल्या मनासारखे करेल. तर तो तुझा भ्रम आहे. आवाज बंद कर अन झोप गुपचूप."
आता बिट्टूचे हुंदके वाढले. आता शेवटचा निकराचा प्रयत्न करायला हवा हे तिने ओळखले. नेमके आज बाबा घरी होते. ती सरळ त्यांच्या जवळ जाऊन मोठ्याने रडायला लागली. तिचे डोळे पुसून बाबांनी विचारले,"कुणी?कुणी त्रास दिला आमच्या राणीला?आपण त्याचे घर उन्हात बांधू हां. शहाणी माझी सोनी ती”
"नाही मी नाही राणी आणि मी सोनी पण नाही”
बिट्टू आता हातपाय पसरून रडायलाच बसली. आधीच बाबांना कोणी रडलेले सहन व्हायचे नाही. त्यात त्यांची लाडकी बिट्टू रडलेली तर त्यांना अजिबात आवडायचे नाही."अग हो..हो..मला सांग तर काय झाले ते”
."मला सिनेमाला जायचेय. ताई मला नेत नाही. ती मैत्रिणींबरोबर जाणार आहे " बिट्टूचा रुसका आवाज, रडून लाल झालेले डोळे, सुकलेला चेहरा...होतो आहे तो बिट्टूवर १०० टक्के अन्याय होतो आहे, ह्याची बाबांना खात्री पटायला एवढे पुरेसे होते!
त्यानी ताईला हाक मारली. " ताई इकडे ये पाहू. हे बघ.बिट्टू तुझी लहान बहीण आहे ना आणि तू तिची ताई. मग तिला न नेता का बरं पाहायचा सिनेमा. तिला पण घेऊन जा"
ज्या शब्दांची बिट्टू वाट पाहत होती ते शब्द कानावर पडताच बटण दाबावे तसे तिचे रडणे थांबले. पटकन जाऊन तिने तोंड धुतले. कंगवा घेऊन आईपाशी गेली. "आई आई मला बाबा हो म्हणाले जायला. माझी गोंडे सोडून वेणी दे न घालून ".आता बाबाच हो म्हणाल्यावर आईचे काहीच चालले नाही. बिट्टूबाई गोंडे सोडून, नवा पांढरा शुभ्र फ्रॉक घालून ताईच्या आधी तयार होऊन दाराशी उभ्या राहिल्या. हो, तेवढ्यात उशीर झाला म्हणून ताई जायला नको !!
ताईने चरफडत बिट्टूचा हात धरला आणि चालायला सुरुवात केली. सगळ्या मैत्रीणीना बोलावत, सगळ्या जणी गोळा होत होत, अखेर एकदाच्या सिनेमाला निघाल्या. आज बिट्टूचे बाबा घरी आहेत म्हणजे बिट्टूला घेऊन जाण्याखेरीज आपल्यापुढे पर्याय नाही हे त्या सगळ्यांच्या लक्षात आले तसे त्यांनी सरळ तिच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. बिट्टूच्या चालीने चालताना आपोआपच ताई आणि बिट्टू बाकी सगळ्यांच्या मागे रहात होत्या. राजेश खन्नाचे लग्न अन्जु महेंद्रूशी होणार की डिम्पलशी अशी ज्ञानवर्धक चर्चा सगळ्या चालता चालता करत होत्या. बिट्टू बरोबर असल्याने ताईला त्यात भाग घेता येत म्हणून तिची चिडचिड होत होती.
तो शाळेपेक्षा वेगळा रस्ता, थियेटरवरची गर्दी, ताई च्या मैत्रिणींचे अनाकलनीय बोलणे ह्या सगळ्यामुळे बिट्टूला खूप भिंगऱ्या एकदम फिरत आहेत असा भास होत होता. ती तिकीटाची खिडकी, लाईन, ती गर्दी एक अनोखे विश्व बिट्टू समोर उलगडत होते. सिनेमाची मोठाली पोस्टर्स बिट्टू 'आ' वासून बघत होती.
“ए ,तोंड मीट.माशी जाईल तोंडात."अंजू म्हणाली तशा सगळ्याजणी फिस्सकन हसल्या. एरवी खरे तर ह्यावर बिट्टू भांडली वा रडली असती. पण आज सिनेमाला यायला मिळाल्याच्या आनंदात बिट्टूने त्यांना माफ करून टाकले. त्या सगळ्या आता आत जाऊन बसल्या होत्या. बिट्टू चा जीव जरा भांड्यात पडला होता. आता आपण नक्की सिनेमाला आलो तर. सिनेमा सिनेमा म्हणतात तो असा असतो होय. तिने आता त्या घडीच्या खुर्च्या, समोरचा पडदा ह्याविषयी मोठ्या आवाजात ताईला प्रश्न विचारायला सुरुवात केली.
" ए येडपट,आपण सिनेमाला आलोय. इथे एवढ्या मोठ्या आवाजात बोलायचे नसते काही." ताईने दटावले.
तेवढ्यात लाईट बंद झाले.आपोआप बिट्टूने ताईचा हात धरला. पडद्यावर आता मोठ्ठे चित्र दिसू लागले. एक लग्न घर, ती गडबड, गजरे. बिट्टू खुश झाली. "झाला सुरु सिनेमा ?" तिने ताईला विचारले.
समोरच्या रांगेतील लोकही ह्या प्रश्नावर हसल्याने आता ताईला खूप लाज वाटली.
" हे बघ बिट्टू तुला जे काही विचारायचे ते अगदी हळू आवाजात विचार मला. हा सिनेमा नाही. ही तर विको टर्मारिक ची जाहिरात आहे. अजून सिनेमा सुरु व्हायला वेळ आहे."
बिट्टू डोळे विस्फारून बघत राहिली. ते सगळे काय बोलतायत ते तिला कळत नव्हते. पण पाहायला मात्र मजा येत होती. थोड्या वेळात ते थांबले आणि अचानक पडद्यावर खूप गर्दी दिसू लागली.
"झाला सुरु सिनेमा ? " परत बिट्टूने ताईला विचारले.
"अग नाही ग...अजून नाही."
त्या गर्दीत मग वेगवेगळी चित्रे उमटायला लागली. शेवटी त्यातले 'दो या तीन बस' हे बिट्टूला कळले. वड्या खाताना आई हावरट पणा करू नको सांगते. एक किंवा फार फार तर दोन घ्यायची परवानगी देते. तसेच हे दिसते आहे. मात्र हे सिनेमावाले खूप चांगले आहेत. ते अजून एक म्हणजे तीन घ्यायला पण हो म्हणत आहेत असे बिट्टूला वाटले. वड्यांच्या आठवणीने तिला भूक लागल्यासारखी झाली. मग आईने दिलेली बिस्किटे खाउन झाली. बिस्किटे खाल्ल्यावर मग तहान तर लागणारच न, मग पाणी पिऊन झाले.
सारखे बिस्कीट दे, पाणी दे करून ताई वैतागली होती. "झाले का आता सगळे की अजून काही राहिलेय? "तिने विचारले.
तितक्यात पडद्यावर नवें चित्र दिसायला लागले."झाला सुरु सिनेमा?" बिट्टू ने ताईला विचारले.
"अग ही तर न्यूज रील आहे.हे बघ आता सारखे सारखे मला नको विचारू, सिनेमा सुरु झाला की सांगेन मी तुला.".
त्यात कोणीतरी जोरजोरात भाषण करत होते. बिट्टूने आपले कान दाबून ठेवले.
परत चित्र बदलले. आता काय सिनेमा सुरु झाला की काय? बिट्टूने ताईकडे बघितले.पण ताई काही म्हणालीच नाही की हो हाच सिनेमा..म्हणजे अजून सिनेमा सुरु झाला नसणार.
मिरगीचा रुग्ण आढळला तर मदत करा. उद्या तुमचे कोणी आपलेही असेच रस्त्यावर पडलेले असू शकते.पडद्यावर निवेदन चालू होते. तो मिरगी येऊन पडणारा माणूस पाहताना बिट्टू घाबरली. तिने डोळे पण गच्च मिटून घेतले.
डोळे मिटल्यावर तो माणूस दिसेनासा झाला. बिट्टूला जरा बरे वाटले. पण तिने डोळे आपले मिटूनच ठेवले. परत आपण डोळे उघडले आणि तो माणूस दिसला तर काय करायचे? त्यापेक्षा मिटलेलेच बरे..सिनेमा सुरु झाल्यावर ताई सांगणार आहेच तेव्हा उघडू या डोळे असा तिने विचार केला.
सकाळची शाळा, हट्ट करण्यासाठी रडण्याचे झालेले कष्ट, उन्हातून थियेटरपर्यंत चालत येणे, थियेटरमधला गारवा आणि मऊ खुर्च्या डोळे आता मिटायला लागत नव्हतेच. आपोआपच मिटत होते !.
सिनेमा सुरु झाला. ते सांगायला ताईने बिट्टूकडे पहिले तो काय ! बिट्टू गाढ झोपली होती. ताईला हसायला आले आणि पुढचा सिनेमा आता प्रश्नांशिवाय निर्वेध पणे पाहता येणार म्हणून हायसेही वाटले. तिने हळूच बिट्टूला आपल्या बाजूला ओढून घेतले व तिचे डोके आपल्या मांडीवर ठेवून थोपटू लागली.
-वृंदा टिळक
(ऋतूगंध -शरद -२०१२)
No comments:
Post a Comment