Wednesday, 26 March 2014

गोष्ट : बिट्टची ..गोष्ट बिट्टू व्यक्तीमत्व विकास शिबिराला जाते त्याची आणि गोष्ट त्या काळातल्या भाबडेपणाचीदेखील

एक काळ असा होता जेव्हा टेलीविजन, फोन, कॉम्प्युटरने मुलांच्या विश्वात शिरकाव केलेला नव्हता. खऱ्याखुऱ्या सवंगड्ड्यांबरोबर खेळणे ह्यात सारा आनंद सामावलेला होता. त्या काळातल्या एका निरागस मुलीची ही गोष्ट. गोष्ट : बिट्टची. गोष्ट बिट्टू व्यक्तीमत्व विकास शिबिराला जाते त्याची आणि गोष्ट त्या काळातल्या भाबडेपणाचीदेखील. 

बिट्टू, चंदा, सीमा, राजू सगळे अंगणात जमले .

"अजून हा बबलू कसा आला नाही? आज नको बाबा शाळेला उशीर व्हायला? "

“ चल, हाक मारु या .

"बबलू ..बबलू ..ओ काकू, बबलू कुठे आहे?"

काकूंच्या ऐवजी बबलूचा दादाच बाहेर आला आणि म्हणाला,"अरे आज गणिताचा नाही का पेपर? मग सकाळपासून घाबरून बबलूची तिसरी फेरी आहे!"

"ए दाद्या, नको सांगू म्हटले होते न..तर का सांगितले? थांब आता तुझे मित्र येउच देत मग बघतो"

दादाचे वाक्य अर्धेच तोडत बबलू बाहेर येत म्हणाला.

“बरं, जा आता शाळेत. नंतर भांडायला अख्खी सुट्टी आहे" बबलूची आई हसत हसत म्हणाली.

सगळे जण शाळेत निघाले. चालता चालता बिट्टूने खोबऱ्याचा तुकडा चिमणीच्या दाताने तोडून हळूच सीमाला दिला आणि मग उरलेले खारीक खोबरे खायला लागली. 

घरी जेमतेम दुध प्यायला वेळ असला की बशीतले खारीक खोबरे खिशात कोंबून पटकन बाहेर पडायची युक्ती बिट्टू नेहमीच करायची . 

“हुर्रॆ ..आज शेवटचा पेपर आणि तोही गणिताचा”. बिट्टूचा एकदम आवडता विषय. शुभंकरोती म्हणून झाल्यावर रोज पाढे, पावकी, निमकी, दिडकी हे सगळेसुध्दा आई म्हणायलाच लावायची तेव्हा खरे तर बिट्टूला जाम कंटाळा यायचा. पण गणिताच्या परीक्षेच्या दिवशी मात्र ते सगळे तोंडपाठ येत असल्याने मस्त वाटायचे.

आज तर तिला आपण चालत नसून तरंगत आहोत असेच सारखे वाटत होते. आजपासून सुट्टी लागणार. मग लग्गेच १० दिवसात दिवाळी. मज्जाच मज्जा.

परत तरंगल्यासारखे वाटल्यावर तिने त्या गोष्टीतल्या मिनीसारखे आपल्याला पंख तर फुटले नाहीत न म्हणून चाचपून पाहिले तर लक्षात आले कि चंदा तिचे दप्तर धरून हलवत होती. " अग बिट्टू,आपण आज दुपारी काय खेळू या ?" 

राजू ओरडला, "ढण ट डण. मी आज दुपारी नाहीच्चे ..दुपारच्या बसने आम्ही जाsssणार ..आssजीकडे ..ते एकदम दिवाळी झाल्यावरच परत येणार...खूप मज्जा करणार.!!"

क्षणभर बिट्टू गप्प बसली. पण अशी हार पत्करेल तर ती बिट्टू कसली!! 

लग्गेच ती म्हणाली,"जा..जा. आम्ही पण इथे खूप खूप मज्जा करणार. आजीकडे तर तुझ्याबरोबर कोणी पण नाही खेळायला. सगळी मोठ्ठी माणसे. तुलाच तिकडे कंटाळा येईल. आमची आठवण येईल. आम्ही तर बाबा सगळे इथे जाम धम्माल करणार. ए चंदा, बबलू, सीमा आपण आज दुपारी काय करूयात? भातुकलीच खेळूयात का? खरा खरा खाऊ आणून ?" .

"मी दाणे आणि गुळ आणेन. आपण दाणे उघडून त्यात गुळ घालून मस्तपैकी लाडू करू या.."

सीमा म्हणाली, "मी कुरमुरे घेऊन येईन, ते लाटून आपल्याला पोळ्या करता येतील आणि चंदा तू ना, शेव आण. आपण काय करू, त्यात पाणी घालून खूप वेळ चमच्याने ढवळू म्हणजे त्याचे पिठले होईल. ए बबलू, तू काय आणणार रे?"

पण बबलूचे लक्ष होतेच कुठे त्यांच्या बोलण्याकडे. झाडाखालचे मारुतीचे मंदिर दिसले म्हणून तो त्या दिशेला तोंड करून, डोळे मिटून हात जोडत होता. मग सगळ्यांनाच आज गणिताचा पेपर असल्याची आठवण आली. सगळ्यांनी डोळे मिटून हात जोडले. बिट्टूने डोळे तर मिटलेच शिवाय ती ओठ पण हलवत होती. मोठी माणसे देवाला नमस्कार करताना आवाज न करता, काहीतरी पुटपुटत असतात हे तिने पाहिले होते. आता ह्या मारुतीसमोर काय म्हणायचे, 'भीमरूपी की मनोजवं' हे तिला पटकन ठरवता येईना. मग तिने ठरवले. जाऊ दे, आत्ता नुसतेच डोळे मिटून, हात जोडून ओठ हलवू या.

“ए चला पटकन, शाळेला उशीर होईल " सगळे जण भरभर चालायला लागले तर सीमा कपाळाला हात लावून जोरात " आई ग्ग "करून ओरडली.

"आता काय झाले? पेन विसरला का? की खोडरबर?"

" अग नाही, मला आठवले, आज्जीने सांगितले होते, देवाला नमस्कार करताना नेहमी बूट, चपला काढून नमस्कार करायचा. आता आपल्याला पाप लागेल का?"

" ए चाल लवकर..आता शाळेत आपण लवकर पोचलो नाही न तर मात्र आपल्याला अंगठे धरून सगळ्यांसमोर उभे राहावे लागेल. सगळी मुले प्रार्थनेहून परत जाताना आपल्याकडे पाहत हसत हसत जातील. चाल भर्रकन "

बबलू मात्र गंभीरपणे मनातल्या मनात मारुती त्याला प्रसन्न होईल की नाही ह्याचा विचार करत होता. मारुतीने जर का जादू करून एकदम दुपार केली आणि पेपर न होता एकदम सुट्टीच करून टाकली तर मारुतीला चांगल्या चार पेन्सिली द्यायचे बबलूने कबुल केले होते. पण आपल्याकडे तर तीनच पेन्सिली आहेत. मग दादा देईल का त्याची एक पेन्सिल मारुतीला देण्यासाठी? की हे सांगितल्यावर नुसतेच चिडवत राहील ह्याची चिंता त्याला सतावत होती.

जरा त्यांच्या गप्पा मारून होतायत की नाही तो लग्गेच शाळा आलीच. एकमेकांना 'बेश टोप लक' देत ते आपापल्या वर्गांकडे गेले. दप्तरे ठेवतायत की नाही तोच प्रार्थनेची बेल. मग लगेच प्रार्थना, बिट्टू चा आवडता गणिताचा पेपर झाला. हे सगळे शुन्य मिनिटात झाले.

 शाळा सुटण्याची बेल वाजताच सगळे जोरात ओरडत पळत सुटले. ग्राउंडभर सगळ्या मुलांचे हसणे, उड्या मारणे सुरु होते. बिट्टू मागे एकदा आईबाबांबरोबर बागेत गेली होती, तेव्हा तिथल्या हिरव्या गवतावर फुलपाखरामागे पळताना तिला वाटले होते तसेच छान छान गार गार तिला आताही वाटायला लागले. ‘एरवी गरम असलेली दुपार सुट्टीत न्हेमी गार्गार अस्ते' असे निरीक्षण तिने मनातल्या मनात लिहून ठेवले. सायन्सच्या बाईनी त्यांना सांगितलेच होते की नेहमी असे बारकाईने पाहून निरीक्षणे मनात नोंदवून ठेवावीत म्हणून.

वर्गातल्या मीनूबरोबर चिंचोके आणि बदामाच्या बियांची अदलाबदली खेळेपर्यंत राजू,बबलू,सीमा आणि चंदा आलेच. कसा का होईना पण गणिताचा पेपर एकदाचा झाल्याने बबलूदेखील खुशीत होता. रस्त्यातल्या कुत्र्यांना उरलेला डबा भरवून, त्यांच्या पिल्लांशी खेळून,रस्त्यातले काड्या पेटीचे छापे गोळा करत आणि आज भातुकली खेळून झाल्यावर उद्या किल्ला करायचे ठरवत ते सगळे खरे तर शुन्य मिनिटातच घरी आले. तर दारातच आई उभी. "अग इतका का वेळ लागला? शाळा सुटून तर तास व्हायला आला आता ..बरं, चल पटकन. हात पाय धुवून कपडे बदल आणि जेवायला ये ."

आज बाबा पण दुपारचे घरी आले होते जेवायला. जेवायला आईने चक्क शिकरण केली होती. बिट्टू खुश झाली. जेवताना आई बाबांना म्हणाली,"मला काय वाटते, बिट्टूला आपण एखाद्या शिबिराला पाठवू या का? इथे नुसतीच उन्हात खेळत बसणार त्यापेक्षा नवे काहीतरी शिकेल. चार लोकांत वावरावे कसे, बोलावे कसे ते शिकेल. जरा समजूत येईल अंगात "

 "कोणते शिबीर? तुला माहितीये का असे एखादे शिबीर जवळपास आहे म्हणून.? "

" हो,शेजारच्या कॉलनीतच बोर्ड पहिला मी. शिकवणा-यांची नावे पण प्रसिध्द लोकांची आहेत."

'हे सगळे बोलणे चालू होते तेव्हा बिट्टूचे लक्षच नव्हते. ती मनाने केव्हाच आधी आजच्या भातुकलीत आणि मग उद्याच्या किल्ला करण्यात पोचली होती. आता धम्माल. रोज सकाळी अंघोळ करून दुध प्यायला आणि खारीक खोबरे खायला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ झाला कि लग्गेच बाहेर अंगणात खेळायला जायचे.. जेवायला घरी आले की नंतर आई जबरदस्तीने थोडा वेळ तरी झोपायला लावणारच. ते पटकन झोपून चटकन उठायचे की परत खेळायला अंगणात पळायचे.

आणि .ह्या वर्षी किल्ल्यासमोरच्या मातीत अळीव पेरायला विसरायचे नाही. मागच्या वर्षी अळीव पेरायला उशीर झाला आणि मग अगदी दिवाळी आली तरी आपला किल्ला हिरवा गार दिसलाच नाही. शेजारच्या वाड्यातल्या श्री चा किल्ला कसा मस्त हिरवागार दिसत होता. आणि ह्या वर्षी अगदी खूप वेळ हिंडून खूप बांगड्यांच्या काचांचे तुकडे गोळा करायचे आणि किल्ल्यासमोर मोठ्ठी नक्षी काढायची म्हणजे काढायचीच. ताई जरा भाव खाइल पण देईल डिझाईन करून. अजून काय बरं करावे ...असा विचार करत बिट्टू पोळीचे बारीक बारीक तुकडे करत बसली होती. पोळी खात बसण्या ऐवजी नुसतीच शिकरण का नाही आई प्यायला देत कधी, तिला प्रश्न पडला.

"अग बिट्टू काय म्हणतेय मी? जाशील न मग त्या शिबिराला?"

" शिबीर? कोणते शिबीर?"

" झाले ..अख्खे रामायण सांगून झाले आणि म्हणे रामाची सीता कोण?" मग आईने तिला त्या शिबिराविषयी सगळे सांगितले. 

इथे मस्त मजा करायचे सोडून आपल्याला त्या शिबिराला का घालतायत बिट्टूला कळलेच नाही. ती म्हणाली,"किती ते किती जायचे तिथे? "

आई म्हणाली," दिवसभराचे आहे. सकाळी आवरून ९ वाजता जायचे ते ६ वाजताच परत यायचे."

" नाssही मला नाई जायचे शिबिराला बिबिराला...मला इकडे अंगणातच खेळायचे आहे दिवसभर."

" हे बघ ..आधीपासूनच नन्नाचा पाढा नको. आधी ऐक तर खरी .तिथे तुला भाषण करायला शिकवणार, चित्रकला शिकवणार,योगासने शिकवणार झालेच तर कागद्काम पण शिकवणार." 

"योगासने आणि बिट्टू कसली करणार? फदी आहे ही नुसती." ताईने तर बोलायलाच हवे होते न..

"तू थांब ग, तिला चिडवू नको..बरं मग जाशील न बिट्टू शिबिराला ?"

" मी काय करते सीमा आणि चंदाला पण विचारते. मग त्या येत असतील तर मी जाते शिबिराला"

"अग नाही येणार त्या. मी विचारले त्यांच्या आईला आधीच. बबलूची आई तर सरळ नाहीच म्हणाली. सीमाकडे तिच्या आत्या येणार आहेत आणि चंदाची आई म्हणाली, एवढी शिबिराची फी भरण्यापेक्षा मी चंदाला आणि सोनुला एकेक फ्रॉक जास्त शिवेन. आता ह्यावर मी काय म्हणणार? नवे फ्रॉक जास्त महत्वाचे की शिबिराला जाउन नव्या गोष्टी शिकणे? तूच मला सांग."

बिट्टू साठी मित्रमैत्रिणी बरोबर असणे फ्रॉक आणि नव्या गोष्टी शिकण्यापेक्षाही जास्त महत्वाचे होते. ती म्हणाली," ते सगळे नाहीत तर मी पण नाही जाणार."

" हे बघ बिट्टू वेडेपणा नको करू...तुलाच किती नव्या गोष्टी यायला लागतील ."

" मग काय ऐटच आहे बुवा एका मुलीची! " बाबा तिला खुलवायसाठी म्हणाले. पण बिट्टूचा चेहरा काही खुलला नाही म्हटल्यावर ते आईला म्हणाले," डोन्ट फोर्स हर "

बाबा काय म्हणाले ते बिट्टूला काही कळले नाही. पण त्या नंतर आईने जशी मान वेळावली त्यावरून बिट्टू शिबिराला जाणारच हे बाबांना आणि बिट्टूला लगेच्चच समजले. आता बाबापण आपल्याला वाचवू शकणार नाहीत हे बिट्टूलाही कळलेच. ती म्हणाली,"मग मी आणि ताई जाऊ का? "

"ते व्यक्तीमत्व विकास शिबीर ७-१२ वर्षांच्या मुलांसाठीच आहे फक्त. ताई कशी येणार तिकडे.?"

ताईला खोकला आला तो खराच की आपल्याला चिडवण्यासाठी ते बिट्टूला कळलेच नाही. पण अचानक शिकरण पण नको,काहीच नको..फक्त मला इथे खेळू दे दिवसभर असे वाटायला लागले. 

"आई नाही न जात मी, मी अगदी शांतपणे खेळेन. आवाज करणार नाही. किल्ला करताना मातीचे पाय घरात आणणार नाही .फ्रॉकला पण डाग पाडून ठेवणार नाही. झालेच तर तुला शंकरपाळे पण कापून देईन. पण मला नको न शिबिराला पाठवू. "

" बिट्टूल्या,तुझ्याच न चांगल्यासाठी पाठवतेय मी ..मग आता हट्ट नाही करायचा. शहाण्या मुलीसारखे उद्यापासून जायचे शिबिराला. मी आज जाऊन तुझे नाव नोंदवून येते. दहा दिवसांचे शिबीर होते आहे की नाही तो लगेच दिवाळी आणि मग दोन दिवसात शाळा सुर. तुला एकदाही कंटाळा येणार नाही."

" नाही मी म्हणणार तुला, मला कंटाळा आलाय म्हणून, पण मला घरीच राहू दे न "

".ब sssर आता चर्चा बास..संपव पटकन पानातले. "

आईचा आवाज ऐकून बिट्टू अगदी १०० टक्के की काय ते समजून चुकली की बाकी सगळे इकडे अंगणात दिवसभर खेळणार आणि आपण एकटे मात्र शिबिराला जाणार. एवढ्या अवघड नावाचे शिबीर किती अवघड असेल? आणि हा विकास कोण असेल बरं? ब तुकडीतला की काय? त्याचे नाव का दिले असेल पण शिबिराला? तिथे कोण कोण असेल? ती शेजारच्या कॉलनीतील शिष्ठ मुले बिट्टू ला अजिब्बात आवडायची नाहीत. आता चंदा,बबलू,सीमा नाहीत, ताई पण नाही आणि आपण एकटेच त्या शिबिरात जाणार म्हणल्यावर तिचा धीर सुटला. ती मुसमुसतच झोपायला गेली. 

झोपेतही तिला उंच दगडी भिंती, त्याच्या आत ब तुकडीतला मस्तीखोर विकास, शेजारच्या कॉलनीतल्या शिष्ठ मुली आणि हेडसरांसारख्या गंभीर चेहऱ्याचे अनोळखी लोक दिसत राहिले. आपण त्या उंच भिंतीआड आहोत आणि बाहेर चंदा, बबलू, सीमा किल्ला करत आहेत, काचा शोधायला हिंडत आहेत आणि आपल्याला हाक मारत आहेत. आपण त्यांना भेटायला बाहेर येणार तर," ए मुली अजून ६ नाही वाजले. इतक्यात नाही घरी जायचे.अजून नव्या गोष्टी शिकून नाही झाल्या सगळ्या" असे कोणीतरी तिला रागावले आणि तिचा हात पकडून तिला परत आत नेले. 

मागे एकदा राजूने एक फुलपाखरू काड्यापेटीत बंद करून ठेवले होते तेव्हा ते कसे पंख हलवत होते थोडा वेळ ..आपलेही हात तसेच हलत आहेत असे बिट्टू ला वाटले

तिचा हात धरणाऱ्या, त्या हाताला हिसडून बिट्टू पळणार तोच तिला आईचा आवाज ऐकू आला, "बिट्टू अग उठ, किती वेळ झोपलीस."

बिट्टू खुश झाली ".अरे वा म्हणजे ते आई शिबिराला पाठवणार आपल्याला एकटीला, ते सगळे स्वप्नच होते तर. चला ...बरे झाले. म्हणजे आता आपल्याला एकटीला, रोज कुठ्ठे जायचे नाहीये. इथेच सीमा,चंदा,बबलूबरोबर धम्माल करायचीये."" 

ती पट्टकन उठली. तोच आई म्हणाली,"ती बघ, सीमा तुला खेळायला बोलवायला आलीये. आज खेळून घे. मग उद्यापासून तू शिबिराला जाणार न, तुला तिच्याबरोबर नाही खेळायला मिळणार."

अर्रे .. म्हणजे शिबिराला जायचे खरेच आहे तर. आई अजून बोलतच होती. " तुला माहितीये का? तुम्हाला शिबिरातून एक दिवस किल्ल्यांचे प्रदर्शन पाहायला नेणार आहेत. झालेच तर आकाशकंदील करायला पण शिकवणार आहेत आणि मोठ्ठी रांगोळी काढायला पण .."

"मज्जा आहे एका मुलीची. आई, त्यांना विचार न, ते मला पण येऊ देतील का म्हणून?" ताईने विचारताच बिट्टू एकदम म्हणाली, "छे! छे! ते तर फक्त बारा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीच आहे. तुला कसे येता येईल? पण मी शिकवेन हां आल्यावर तुला!!" आपल्याला ताईलाही यावेसे वाटतेय अशा ठिकाणी एकटीला जायला मिळणार आणि ताईलाही येत नाही असे काहीतरी शिकायला मिळणार हे कळल्यावर बिट्टू एकदम खुश झाली.

"आता आपण काय करू या..सीमा,बबलु आणि चंदाला सांगून ठेवायचे . तुम्ही सगळे किल्ल्याचे सामान गोळा करून ठेवा. मी शिबिरातून घरी आले की आपण किल्ला करू या. आणि तो झाला कि मग आकाशकंदील पण किल्ल्यावर लावायला. आणि किल्ल्यासमोर चक्क मी काढलेली मोठ्ठी रांगोळी???!!!" त्या नुसत्या कल्पनेनेही खुश होत बिट्टू खेळायला पळाली.

-वृंदा टिळक 


-ऋतुगंध शिशिर-२०१२


No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...