म्हणताना जरी म्हणाले की, ‘तुमचे आमचे सेम असते’, तरी हे असते तरी काय? शास्त्राच्या भाषेतील व्याख्या सांगते की हा सगळा फेनिल इथिलअमाईन, डोपामिन, अन्डोर्फिन, नॉरअपिनेफ्रीन, ऑक्सिटोसीन ह्या रसायनांचा चमत्कार आहे. प्रेमाचे इतके अरसिक वर्णन? जाऊ दे! इथे वर्णनात अडकून बसायला वेळ आहे कोणाला?
आपण पाहू या, प्रेमातील काही अनोख्या छटा, विभ्रम आणि क्षण..आणि त्यांची कथा काव्यात गुंफलेली ही त्रिवेणी.. कटाक्षाच्या प्रतीक्षेपासून ते शब्दावाचून सारे कळण्याच्या प्रवासाची..
प्रेम नसतेच सोपे इतके..
किती अडचणी किती धोके !
मनाला नजरेत येताना रोखावे
तर डोळ्यांनीच मुळी ऐकेनासे व्हावे !
हानामी, जपानमध्ये साजरा होणारा उत्सव. बहरून आलेल्या चेरी ब्लॉसम [साकुरा] च्या साक्षीने, प्रियजनांसोबत आनंद साजरा करणे, असे ह्या उत्सवाचे स्वरूप असते. खाणे, पिणे [ओसाके-दारू, बिरू-बिअर], काव्य, नृत्य, संगीत असे ह्या उत्सवाचे स्वरूप असते. ज्यांच्यावर कुंचला प्रसन्न आहे असे कलाकार, साकुराची शोभा कागदावर उतरवण्याचा देखील प्रयत्न करतात.
साकुरा जरी वसंतात बहरत असला, तरी निसर्गाचा आनंद, प्रियजनांच्या संगतीत, अनुभवणे, हे कुठेतरी आपल्या कोजागिरी सारखे वाटते.हानामीत पुर्ण बहरलेले झाड असते तर कोजागिरीत पुर्ण चंद्राची आभा.फुलून आलेल्या चित्त वृत्ती दोन्हीकडे सारख्याच.त्यात जर का कोणी प्रेमात पडलेले असेल तर मग ह्या उत्सवाचे महत्व आगळेच!
इथे ह्या कवितेतला ‘एगाशिरा’ प्रेमात पडलाय ‘ओमोतो’च्या. अजून कोणीच उच्चार केलेला नसला तरी पण तिला देखील आपल्यासारखेच काहीतरी वाटत असावे अशी त्याला आशा. निसर्गातल्या व त्याच्या मनातल्या बहराची, चांदण्याची ही कविता. समजते का अखेर तिला त्याच्या मनातली भावना? त्याच्या डोळ्यांतले भाव येतील का तिला वाचता? खरेच असेल का तिच्याही मनात असेच काही नाजुकसे फुललेले?
हानामी
सांज होती पोर्णिमेची, उमलत होते चांदणे,
बहराने साकुराच्या, सारेच झाले होते दिवाणे.
प्रत्येक हा वृक्ष, मंद गुलाबी फुलांनी बहरला,
हिरव्या गहिऱ्या पानांचा मूळी मागमूसही ना राहिला.
ओसाकेच्या चषकांसोबत बीरू होती फ़सफ़सलेली,
हास्य विनोद अन काव्याने महफ़िल रंगत रंगत गेली.
प्रियजनांच्या सहवासाने सांज चढत ती राहिली.
’ओमोतो’ वाचून त्याला ’हानामी’ अधूरी वाटली.
साऱ्यांशी बोलत होता तो, वरकरणी हसतही राहिला.
इतक्यात ती अवतरताच तेथे, त्याचा चेहरा उजळला.
करीत त्याला बेदखल, तिरपा कटाक्षही ना टाकणे,
चार चौघांमधे तिने साधी ओळखही ना दावणे.
प्रिय त्याला सारे बहाणॆ, प्रत्येक अदा मान्य होती,
तिच्या नुसत्या असण्यानेही, अंतरात ज्योत उजळत होती.
बसली ’वातानाबे’ च्या शेजारी ती, त्याच्या साथीने गायले सुरेल गाणे.
उमलत, रंगत, आनंदाने हासत, मैत्रिणीच्या कानात काही कुजबुजणे.
सांज गहिरी जाहली.पुर्णचंद्राची आभा प्रकटली.
गायन वादन नर्तन झाले, महफिल आता स्थिरावली.
त्याच्यासाठी मात्र तिने पूर्णवेळ मिटला नजर भेटीचा पूल,
तिच्या असण्याच्या आनंदातही, काळीज विंधून गेला उदासीचा शूल.
आता तिची निघायची वेळ झाली, लवकरच ती जाणार,
संवाद तर नाहीच, साधी नजर भेटही नाही का होणार?
तगमग अंतरात झाली, महफ़िल जणू झाली बेरंग,
ती मात्र बेखबर, अजुनही होती आपल्यातच दंग.
बागेच्या ह्या कमानदार पुलावरून ती उतरली, की जाईल निघुन थेट
माहिती नाही, काय निमित्ताने, कशी, कुठे, कधी होणार मग भेट?
आसुसला तो, हुरहुरला मनी, आशेने कयास त्याने बांधला,
पुलावर जाताच जर वळली ती तर, आहे मदनशर तिथेही पोचला.
घेतला तिने निरोप ’ओयासुमी नासाई’ आणि ‘सायोनाराच्या’ गजरात
त्याचे श्वास गोठले, मिट्ट काळोख पसरला अंतरात.
थिजुनी तो बघत राहिला, खरंच पाहिल का ती मागे वळून?
वळली तर भाग्य माझे, जे उमलतंय इथे ते आलंय तिथेही रुजून.
डौल दार आपुल्या चालीने, पूल चढू ती लागली
शिखरावर पोचताच तेथे, क्षण मात्र ती थबकली.
पाहिले वळून मागे, घेतला नजरेने वेध त्याचा,
आता कुठे’एगाशिरा’ साठी, बहरला साकुरा खरोखरीचा.
ओमोतो आणि एगाशिराला राहू दे तिथे जपान मधेच साकुरासंगे बहरत फुलत...इथे हे दुसरे दोघे कोण??
ती चलाख मुळीसुध्दा न गवसणारी
सापडली म्हणे पर्यंत सुळकन निसटणारी
एकेक शब्द उच्चारताना गोळा होणारा त्याचा श्वास
काहीच न कळल्याचा तिचा बहाणा जीवघेणा खास
वामा.. चतुरा
चंद्र विरळ, फिका फिका...आधाराच्या शोधात
ढगाआडून दिसावे कि न दिसावे ह्या संभ्रमात
समुद्राच्या लाटा उधाणानंतरच्या सहजतेत
वारा पानांवर मंद मंद झोके घेत
झावळ्यांची वाऱ्यासवे सळसळ मंथर
तिच्या केवळ सोबत असण्यानेच त्याचा जीव अधर
मनातल्याला स्पर्श होऊ न देता बोलणे अवांतर
मनात दरवळत असलेले सहवासाचे अत्तर
चंद्र आता अवसान आणून प्रकाशलेला
त्यानेही सारा धीर गोळा केलेला
तो म्हणाला, "कसे असते ना?
कारण कळत नाही पण कोणी किती किती आवडून जाते ना?
इतके इतके की स्मरणासरशी श्वास अडावा,
गळ्यातला आवंढा टोचत राहावा,
न बोलता यावे, न लपवता यावे,
मी म्हणतो की कोणी इतके कशाला आवडावे?"
त्याच्या आवाजातील थरथर तिच्यापर्यंत पोचलीच..
त्याची घायाळ अवस्था तिला समजून चुकलीच..
ती मधाळ हसली. त्याच्यावर चांदणे सांडत.
आणि म्हणाली, "भाग्यवान आहेस. कोण रे ती?" !!
शब्द हतप्रभ होतात भावना व्यक्त करताना.
पण खरे तर शब्दांशिवायच कितीतरी सांगितलेले आणि कळलेले असतेच ना…
गंध फुलांचा गेला सांगून...
“आज केसात गजरा नाही?"
उशीरा पोचलेला तो कुजबुजला.
तिच्या चमकून बघण्याने विचारात पडला
आणि मग ऐकू आले त्यालाही तिने न बोललेले शब्द,
"तू सवे नसताना मी कधी फुले माळते?”
तिने न माळलेल्या फुलांचा गंध गेला सांगून तिच्या मनातील अनेक अस्पर्श वाटांचा पत्ता.
किती अवघड ह्या वाटा
नाजूक अन अनवट
तोल सांभाळणे आता
किती झालेय बिकट
वृंदा टिळक
(रश्मिन दिवाळीअंक २०१३, संकल्पना - प्रेम )
No comments:
Post a Comment