तशी सामोरी नाहीच आलीस तू कधी
पण जाणवत राहिले सतत तुझे अस्तित्व
माझ्या आयुष्यावरचे तुझे निर्विवाद स्वामित्व
माझ्या मनाप्रमाणे मी वागते, असं वाटणं, हा ठरला निव्वळ भास,
कारण त्या त्या वेळी, कुठे ना कुठे, जाणवला होता तुझा रेंगाळणारा श्वास.
तुझ्या हातात सारी सुत्रं ठेवून मला मर्यादित परिघात नाचू दिलंस,
जे नव्हतच कधी माझं कर्तृत्व त्या यशाचेही श्रेय घॆऊ दिलंस.
माझं उमलणं,बहरणं, कोमेजणं, उसासणं सारं तू निर्विकारपणॆ पहात राहिलीस,
भावनांच्या पूरात मी वाहून जात असताना नेमक्या क्षणी तू दोरी खेचलीस.
असं आपलं अतूट नातं, पण सामोरी आलीस तर ओळख कशी पटणार तुझी?
आणशील खूणेला माझं एखादं चमचमणारं दु:ख वा भळभळणारी सुखं ताजी?
-वृंदा टिळक
(चैत्रेय २०१०)
No comments:
Post a Comment