चैत्रमास…. होती कुठली तरी तिथी आणि ऊन मात्र वैशाख वणव्यातले होते. दिनांक नीटच लक्षात आहे. २४ /०४/२४. नाना पालकर स्मृती समिती ठाण्यात एक डायलिसिस सेंटर सुरू करते आहे. त्याची मीटिंग होती चार वाजता कोपरीला.
म्हणून रिक्षात बसून बैठकीसाठी निघाले. आता घोडबंदर रोडपासून कोपरी पर्यंत जायचं म्हणजे वेळच वेळ हातात. मग रिकामे बसून काय करायचं?
तर खूप दिवसांपासून खुणावत असलेली ब्लॉग पोस्ट लिहायला घेतली. तिकडे फुललेल्या फुलांचे वर्णन लिहिण्यात मी रंगून गेले होते. सगळे सिग्नल्स लागत, ट्रॅफिक पार करत रिक्षा आपल्या गतीने जात होती. तरीही मी वेळेत पोचणार होते त्यामुळे मला काळजी नव्हती. रिक्षा आता साधारण पोचली होती तीन हात नाक्याजवळ..
तर आपण होतो फुलांच्या वर्णनाशी.. जंगलभर फुललेली ऱ्होडोडेंड्रॉन्स अजूनही डोळ्यांपुढे आणि मनात बहरली होती आणि इतक्यात …. म्हणजे आपण कौतुकाने जोपासलेले झाड असावे.. त्याला पहिली कळी आलेली असावी.. आणि आता कळी उमललेली असेल म्हणून आपण उत्सुकतेने पहाटे येऊन पाहावे तर… तर कोणीतरी आपल्या आधीच उठून ते फूल खुडून नेलेले असावे तसे झाले..
आले का लक्षात काय झाले असेल ते? अहो.. ज्या फोनवर गुगल डॉक्युमेंट्स मध्ये मी टाईप करत होते, तो फोनच हातातून नाहीसा झाला होता!!
क्षण भर तर मला कळलेच नाही की नक्की काय झाले ते आणि मग लक्षात आले की शेजारून बाईक वरुन जाणाऱ्या दोन मुलांपैकी एकाने माझ्या हातातला फोन हिसकावून नेला होता.
मी ‘फोन फोन’ करून ओरडले. त्या भरधाव ट्रॅफिक मध्ये ते कोणालाही ऐकू गेले नाही. थोड्यावेळ रिक्षाने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण बाइकचा वेग खूप जास्त होता. झिगझॅग मोटरसायकल चालवत ते दोघं वेगाने निघून गेले. मला बाईकचा नंबर देखील पाहता आला नाही.
लगेच रिक्षावाल्याला नौपाडा पोलीस स्टेशनला रिक्षा घ्यायला सांगितली. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तिथून त्या तक्रारीची कॉपी घेऊन वोडाफोन सेंटरमध्ये गेले. ते सिम कार्ड ब्लॉक करून, नवीन सिम ताब्यात घेतले. त्याच रिक्षाने घरी आले. लॅपटॉपवरुन तो फोन सिक्युअर केला. पण मग मनात आलं की नकोच रे बाबा.. आणि मग तो फॅक्टरी रीसेट देखील करून टाकला. कारण तसेही आधी गुगल लोकेशन बघितले तर ते दिसत नव्हतेच. चांगला गुगल पिक्सेल सिक्स होता. पण त्यापेक्षाही महत्त्वाचे होते ते हे की तो फोन मुलाने आणि सुनेने खूप प्रेमाने, आग्रहाने मला दिला होता. त्यामुळे तो गेल्याची हळहळ अजूनच जास्त वाटत राहिली.
आता ही हकीकत, स्वतःच्या वेडेपणाची कितीही लाज वाटली तरीही, मी आवर्जून सगळ्यांना सांगते आहे. त्यातून झालेच कोणी तर शहाणे होईल ही आशा आहे.
माझ्या झालेल्या चुका अशा होत्या -
1. रिक्षात एकटी असूनही मध्ये न बसता अगदी डाव्या बाजूला बसले होते.
2. दोन्ही हाताने टाईप आणि तेही फक्त हाताच्या अंगठ्याने टाईप करायची सवय असल्याने (त्या अर्थाने अंगठे बहाद्दरच!!) फोन हातात घट्ट धरलेला नव्हता.
3. मोटरसायकल झिगझॅग चालवली म्हणून नंबर दिसला नाही हे तर ठीकच आहे. पण मला त्या मुलाच्या शर्टचा रंग, त्याच्या बाईकचा रंग काही म्हणता काही लक्षात राहिले नाही.
आता जे कोण भेटेल त्याला सगळी कहाणी मी सांगत असल्यामुळे मला अजून काही रोमहर्षक कहाण्या ऐकायला मिळाल्या.
त्यातली एक अशी- एकजण नवऱ्याच्या मागे बसून मोटरसायकल वर जात होती. तिच्या हातातला फोन कापूरबावडी सर्कलच्या जवळपासच कुठेतरी हिसकावला गेला. त्या धक्क्याने ती पडली. मोटरसायकल पडली आणि जवळपास एक्सीडेंटच झाला.
दुसरी घटना म्हणजे एक काका कापूरबावडी/ माजिवडा परिसरात स्टॉप वर उभे होते. फोन त्यांच्या शर्टच्या वरच्या खिशात होता. त्यांच्याजवळ पत्ता विचारण्यासाठी एक मोटरसायकल उभी राहिली. ते सिरियसली पत्ता समजावून सांगत असतानाच त्या मोटरसायकलवर मागे बसलेल्या मुलांनी त्यांच्या खिशातला फोन काढून घेतला. पण त्या काकांनी मोटरसायकलच्या मागे धरले व थोडे अंतर ते मोटारसायकल सोबत फरफटत गेले. आरडाओरडा झाला आणि घाबरून त्या मुलांनी फोन टाकून दिला. काकांना मात्र भरपूर लागले.
सध्या अशा खूप घटना ऐकू येत आहेत. तर ह्या सगळ्या कहाण्यांचा सारांश की मी केल्या त्या चुका तुम्ही करू नका. रस्त्याने चालत असा, रिक्षात बसलेले असा, मोटरसायकल वर बसलेले असा .. आपला फोन आणि पाकीट सांभाळा. काळजी घ्या आणि मुख्य म्हणजे तुम्ही स्वतः सुरक्षित रहा!!
आता इतक्या रोमहर्षक प्रसंगावर लिहायला तर लागणारच ना!! आता मी लिहिलेल्याचे एखादया जुन्या आवडत्या कवितेशी साधर्म्य दिसले तर त्याला योगायोग मानू नका!!
लाडका फोन तो होता माझा एक
मिळणार तसा ना शोधून दुसरे लाख
किती भराभरा तो साईट साऱ्या उघडी
सर्च रिझल्टही देण्या वेळ मुळी ना दवडी
किती सुंदर होता बदामी त्याचा रंग
लावले कव्हर मी झाकण्या त्याचे अंग
किती तरी फोन मी घेतले आजवरी
पण हा होता कार्य कुशल ही भारी
त्या घेऊन संगे गेले रिक्षामध्ये बसोन
घेतला चोरट्याने हातातून हिसकावोन
मी ओरडले.. मग आले पोलिसांत जाऊन
नोंदविली तक्रार अन घेतले सिम बदलून
किती शोध शोधला कुठे ना परि तो दिसला
परतले घरी मी चेहरा ही माझा हिरमुसला
वाटते सारखे न जावे त्याच ठिकाणी
काढून घेईल का फोन दुजाही कोणी
किती वाटले असे तरी स्वस्थ न बसते घरात
बाहेर जाता फोन ठेवते पर्सच्या कप्प्यात