Sunday, 15 February 2026

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६ 

जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, अतिशय सुंदर अशा त्या काव्यपंक्ती होत्या. त्यातील गिरीनायका आणि विजनात हे  वाचतानाच नजरेसमोर आले ते शिवाचे हेच रूप. घनदाट जंगलातले, पर्वत रांगांनी वेढलेले, मनुष्य वस्ती आसपास नसलेले असे हे स्वयंभू रूप. 

जगातले सर्वात मोठे स्वयंभू शिवलिंग अरुणाचल येथील झीरो मध्ये आहे.  आम्ही तिथे जाऊन आलो त्याला आता सात आठ वर्षे झाली. पण काही अनुभव मनावर कोरलेले असतात. तसेच कोरलेले आहे हे शिवाचे अद्भुत रूप. 

आम्ही गेलो तेव्हा आमच्या खेरीज  त्या परिसरात माणूस म्हणजे फक्त शंकराच्या शेजारी बसलेले गुरुजी. बाकी कोणीही नाही. इतके निवांत सविस्तर, मनभर दर्शन आमच्या भाग्यात लिहिलेले होते हेच खरे. अन्यथा त्या वेळी फारसे प्रसिद्ध नसलेले, जाण्याचा धड रस्ताही  नसलेले हे मंदिर अरुणाचलच्या प्रवासी नकाशावर नव्हतेच!

तेव्हा हा शंकर उघड्या आकाशाच्या खाली होता. पण भंवताली बांधकाम चालू होते. ( आम्ही गेलो त्या दिवशी बांधकामावरचे मजूरदेखील नव्हते!) आत्तापर्यंत मंदिर झालेही असेल बांधून. मला मात्र तेव्हा पाहिलेले रूपच कायम स्मरणात राहील. 

पंचमहाभूतांनी निर्माण झालेल्या ह्या विश्वाची  रसरशीत जाणीव करून देणारे ते स्थल, तिथला शांत एकांत, नीरव शांतता. मंदिरात जातानाचा अतिशय अवघड रस्ता, रस्त्यावरून दिसणारे अथांग आकाश आणि त्या खालची तेवढीच अथांग शेती, दूरवरचे डोंगर, गवतातली रानफुले, आकाशात मधूनच उडणारे पक्षी .. सारे अजून मनात ताजे आहे. 

आता तिथे जायचा  रस्ता चांगला झाला असेल. आता तिथे मंदिर बांधले गेले असेल. आता आजूबाजूला पूजा साहित्याची, चहा नाश्ता विकणारी दुकाने आली असतील. आता विजनात रमलेला शंकर नागरी संस्कृतीच्या जवळ आला असेल. असो!!

त्या वेळच्या भेटीविषयी, सिद्धनाथ महादेवाविषयी, झीरो विषयी अधिक वाचायचे असेल तर ब्लॉगची लिंक देते आहे. 

यू ट्यूब लिंक आहे ती सई लेले ह्यांचे काव्य मी वाचले आहे त्याची. सोबतीला ह्याच महादेवाचे रूप आहेच! 

https://youtube.com/shorts/_1jfkh2RP1w?feature=share


https://silvervegantravels.blogspot.com/.../blog-post_8.html

Saturday, 1 November 2025

सर्वाना समृद्ध करणारे आनंदघन - प्रल्हादजी अभ्यंकर”

“सर्वाना समृद्ध करणारे आनंदघन - प्रल्हादजी अभ्यंकर”

३०/३५ वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही गंगोत्रीला पोचलो तेव्हा रात्रीच्या सघन अंधारात, गंगेच्या प्रवाहाचा खळखळ आवाज तेवढा ऐकू आला! दुसऱ्या दिवशी तांबडे फुटताच दिसला गंगेचा निर्मल कोवळा प्रवाह.
थोड्यावेळाने गंगामंदिराच्या जवळ गेलो. लहानमोठे प्लास्टिकचे डबे, बाटल्या, स्टीलचे, तांब्याचे गडू दुकानांत विकायला ठेवलेले होते. आपापल्या ऐपतीनुसार ते घेऊन मंत्रोच्चारासमवेत त्यात गंगाजल भरले जात होते. 
माझ्या बाबांवर म्हणजे प्रल्हाद सीताराम अभ्यंकर ह्यांच्यावर लेख लिहिताना आज तसेच वाटते आहे. लहानपणीच लक्षात आले की आपले बाबा बाकी मैत्रिणींच्या बाबांपेक्षा वेगळे आहेत. त्यांचे बाबा रोज घरी येतात. आपले बाबा अधूनमधून घरी येतात. जेव्हा ते घरात असतात तेव्हा खूप लोक त्यांना भेटायला आलेले असतात. इथे त्यांचे संघाचे काम, अंधारात ऐकू आलेल्या गंगेच्या खळखळाटाप्रमाणे नुसते जाणवले होते. 
 थोडे कळायला लागल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे काय? बाबा संघाचे काम करतात म्हणजे काय करतात? हे हळूहळू लक्षात येऊ लागले. अजून जाणतं झाल्यावर संघाची आणि बाबांच्या कामाची खरी ओळख आणि व्याप्ती पटू लागली. 
कोणत्याही पात्रात भरले गेले तरी गंगाजल हे पवित्रच राहते. तसेच लिहिणाऱ्याच्या कुवतीनुसार संघ कार्यकर्त्याचे काम, कामाचे महत्व कमीजास्त होत नाही. ते अक्षयच असते या भावनेनेच हा लेख लिहिते आहे.
गेले शंभर वर्षे अविरत वाहत असलेला संघ सरितेचा प्रवाह करोडो स्वयंसेवकांनी आपल्या त्यागाने, निष्ठेने आणि समर्पणाने समृद्ध केला आहे. नाव, पद, पैसा ह्यांची अपेक्षा न करता, राष्ट्र्राला परमवैभवाला नेण्याचा ध्यास घेऊन आयुष्यभर काम करत राहणारे असंख्य स्वयंसेवक आपल्याला अक्षरशः चकित करून टाकतात. त्यांची वैयक्तिक सुखदुःखे, आशाआकांक्षा ह्यांचा जणू त्यांना विसरच पडलेला असतो. इतकी आत्मविलोपी आयुष्ये असू शकतात का असा कोणाला प्रश्न पडला तर त्यांनी स्वयंसेवकांचे आयुष्य पाहावे! प्रल्हादजी अभ्यंकर ह्या असंख्य स्वयंसेवकांपैकीच एक! 
आपल्या व्यक्तीवैशिष्ट्याने ह्या संपूर्ण समुदायाची उन्नती करण्याचा प्रयत्न, वेगळे उठून दिसण्याचा प्रयास न करता, त्यात मिसळून जाऊन कसा करता येईल हे शिकण्यासाठी अनेक गुणाढ्य संघकार्यकर्त्यांची आयुष्ये अभ्यासता येतील. प्रल्हादजींचे बोलणे, वागणे हे त्याचेच उदाहरण!
त्यांचे वेगळेपण हे असू शकते की त्यांनी सर्व भूमिकांतून संघाचे काम केले आहे.  शाखेकडे कुतूहलाने पाहणारा नवयुवक शाखेत जायला लागला. स्वयंसेवक झाला, गटप्रमुख, शिक्षक, कार्यवाह, मुंबई जिल्हा प्रचारक, मुंबई जिल्हा कार्यवाह, संसारी कार्यकर्ता, विभाग संघचालक, सह प्रांत संघचालक, प्रांत संघचालक, पुन्हा सहप्रान्तसंघचालक, कार्यकारिणी सदस्य, वानप्रस्थी कार्यकर्ता असे सगळे झाला. सत्याग्रहात भाग घेऊन झाला. १९७९पर्यंत तीनचारदा तुरुंगवासही भोगून झाला. 
भौगोलिक क्षेत्राचे म्हणाल तर नेऊरगाव अगदी लहान खेडेगाव. तिथून मुंबईत आल्यावर त्यांचा संघाशी परिचय झाला आणि तिथेच ते संघकामात मुरले देखील. 
नंतर संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत राहिले. प्रसंग पडला तर शारीरिक शक्तीच्या बळावर विरोधकांना अद्दल घडवू शकणारा बलदंड युवक ते संघाची वैचारिक भूमिका आणि प्रत्यक्ष व्यवहार काय असावा ह्याचा निरंतर विचार करणारा वृद्ध इतका सगळा काळ ते संघकामात होते.
पारतंत्र्यात असलेला देश, मग स्वातंत्र्य, नंतरची आणीबाणी ते जनता पक्षाचे सरकार, पुढे राज्यात भाजपाचेही सरकार इतक्या मोठ्या स्थित्यंतराच्या काळात ते सदैव कार्यरत होते. प.पू. डॉक्टर हेडगेवार असतानाचा संघ ते मा. सुदर्शनजी सरसंघचालक असतानाचा संघ इतक्या दीर्घ काळात ते संघाचे स्वयंसेवक होते. कामानिमित्ताने त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला होता. तोही कसा तर अगदी बैलगाडी किंवा मिळेल ती लाल डब्याची बस, उभे राहून, बसून, कधी मोटारसायकलवर मागे बसून तर कधी जीपने, फार क्वचित रेल्वेनेही, नंतर नंतर स्वतंत्र कारने असे सर्व अनुभव त्यांच्या गाठीशी होते. उघड्या डोळ्यांनी ते समाजात वावरत होते. 
ह्या सर्व भूमिकांमुळे, प्रदीर्घ काळामुळे आणि सर्वार्थाने ‘प्रवासामुळेही’ माणसे, व्यवस्था आणि संस्था सुरळीत करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी जमा झाला होता. संघाला आणि समाजाला त्यांच्या ह्या कौशल्याचा खूप उपयोग झाला. 
ह्यातील प्रत्येक भूमिका आणि पद त्यांनी तितक्याच समरसून निभावले. त्या त्या भूमिकेला आणि पदाला त्यांनी आपल्या स्नेहार्द, संवेदनशील, विचारी, आशावादी स्वभावाने आणि सहजमोकळ्या वर्तनाने गौरव प्राप्त करून दिला. देशाच्या, राज्याच्या सर्वोच्च नेत्यांशी बोलताना ते जितके आदराने, मनापासून आणि स्पष्ट बोलायचे तेवढेच एका लहान गावातील एखाद्या नव्या कार्यकर्त्यांशीही बोलायचे. त्यांच्याशी संवाद कोणालाही सहजसाध्य होता. 
त्यांना माणसांचा लोभ होताच आणि महत्वाचे म्हणजे इतर सर्वांनाही त्यांचा मोह होता. त्यांच्याभोवती सतत घोळका असे. ते कोणत्याही पदावर नसतानादेखील ह्या स्थितीत बदल झाला नाही. स्वयंसेवकापासून ते मोठ्या राजकीय नेत्यांपर्यंत अनेक जण त्यांना भेटायला येत असत. 
त्यांचा संघकामातील अनुभव हे कारण होतेच पण  त्यांचा मिस्कील मोकळा स्वभाव, दीर्घकाळ मनात कटुता न ठेवणारे निरागस निर्मळ मन, माणसांवरचा आणि माणुसकीवरचा कशानेही भंग न पावणारा, म्हणजे अगदी अनेकांनी त्यांना व्यवहारात फसवले, गैरफायदा घेतला तरीही अढळ राहिलेला विश्वास, निरपेक्ष, नितांत प्रेम करण्याइतके विशाल हृदय आणि कोणाच्याही दुःखाने सावळे होणारे अंतःकरण हे देखील कारण असावे. 
ते मुंबईला असताना प्रचारक म्हणून थांबले आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले. प्रापंचिक गरजा भागविण्यापुरतेच काम करायचे आणि बाकी सगळा वेळ संघासाठी द्यायचा,  आपल्या गरजा कमीत कमी ठेवायच्या  हे मनाशी निश्चित होते. पण कमी आणि जास्त हे नेहमी सापेक्ष असते. त्यामुळे उदाहरण देते. एकाच पातेल्यात आळीपाळीने भात आणि भाजी करायला लागायची. त्यात घरात फक्त दोघेच  नाही तर सतत येणारे जाणारे कोणी असणारच. पण आई आणि बाबा दोघांनीही हे स्वीकारलेले होते.
 संघकामाचे महत्व पटलेली आणि बाबांच्या संघकामाची आवश्यकता जाणणारी सहधर्मचारिणी बाबांना मिळाली हा त्यांच्या कामासाठी एक भक्कम आधार ठरला. त्यामुळे प्रचारक म्हणून थांबल्यावरही काम, कामाविषयी तळमळ, त्यासाठी तनमनधन अर्पण करणे हे आयुष्यभर तसेच राहिले. असेच काम असंख्य स्वयंसेवक करत असतात हे मी जाणते. 
बुद्धाने म्हटल्याप्रमाणे असे अदृश्य खांब असतात म्हणून तर आभाळ तोलले जाते. ह्या सर्वांच्या कामाचा दृश्य परिणाम कदाचित दाखवता येणार नाही. पण जमिनीखालून वाहणाऱ्या एखाद्या अदृश्य प्रवाहाप्रमाणे ह्या सर्वांचे काम जमीन समृद्ध करत असते. आपल्या कष्टाने नांगरणी करून जमीन तयार करत असते. ह्या जमिनीत मग कोणतेही पीक घ्या, ते जोमानेच वाढेल. श्रेय त्या त्या वेळी बियाणे पेरणाऱ्याला जाईल पण त्यामागे त्याग असेल अशा असंख्य संघ कार्यकर्त्यांचा!
बाबांनी आयुष्यभर केलेल्या कामाचे फलित काय असा प्रश्न विचारणे कोतेपणाचे ठरेल. पण तरीही उत्तर शोधायचे ठरवलेच तर त्यांनी जोडलेली असंख्य माणसे, त्या माणसांच्या मनात जागृत केलेली देशप्रेमाची, संघकामाची आणि माणुसकीची भावना असे देता येईल. त्या प्रेरणेचा परिणाम म्हणून अनेक कार्यकर्ते तयार झाले. ते कार्यकर्तेही आजन्म राष्ट्रसेवेसाठी झटले. लहान मोठी कामे आणि संस्था उभ्या राहिल्या. केवळ उभ्या राहिल्या असेच नाही तर आज इतकी वर्षे उत्तमरीत्या सक्रिय राहिल्या. 
बाबा प्रांतसंघचालक झाल्यावर त्यांच्या कार्यपद्धतीचा विशेष सांगायचा तर कोणालाही त्यांच्याजवळ मनमोकळे बोलता यायचे, आपल्या समस्या आणि विचार मांडता यायचे. प्रांत कार्यकारिणी सामूहिकरित्या निर्णय घ्यायची. जबाबदारीचे वाटप व्हायचे. नव्या युगाला साजेश्या संघकामाची ती चाहूल होती. 
त्यांच्या कार्यकाळात तीन अगदी महत्वाचे मुद्दे आले. त्यावेळचे वर्णन मा. दामुअण्णा दाते ह्यांच्या शब्दांत सांगते. ते म्हणतात, “मंडल आयोग, मराठवाडा विद्यापीठ नामांतर, शिवसेना भाजप युती हे तीन विषय त्यांच्या प्रांतसंघचालकपदाच्या काळात आले. वेगवेगळ्या काळात या तीन विषयांच्या बैठका झाल्या आणि योगायोगाने या तिन्ही बैठकींचा समारोप प्रल्हादजींनाच करायला लागला. ह्या तिन्ही बाबतीत संघाच्या प्रांत कार्यकारणीचे मत अनुकूल होते. तसेच मत सर्वसामान्य कार्यकर्त्याचेही होणे आवश्यक होते. प्रल्हादजींनी त्यांच्या नेहमीच्या कौशल्याने या विषयाची अपरिहार्यता, अनुकूल निर्णय घेण्यामागची व्यापक भूमिका कार्यकर्त्यांना समजावून सांगितली. यामुळे मतभेदाची कटूता निर्माण न होता संघाने ते विषय स्वीकारले.” 
रुक्ष सिद्धांत, अवघड शब्दांतील तत्वे असे त्यांच्या भाषणात कधीच नसे. अगदी सोप्या शब्दांत हसत खेळत, रोजच्या जीवनातील उदाहरणे देत ते विचार मांडायचे. वाक्ये लहान लहान आणि लयबद्ध, मुक्तछंदातले काव्यच म्हणूया! त्या उदाहरणांची आणि संघविचारांची श्रोत्यांना चकित करणारी सांगड घातलेली असायची. त्यामुळे त्यांची भाषणे श्रोत्यांच्या मनाला भिडायची. आज बाबा जाउन पाव शतक उलटून गेल्यावरही त्यांच्या भाषणांची आठवण काढणारे अनेक जण आहेत ह्यातच सारे आले!
त्यांनी विचार सहजतेने मांडले आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे त्यांच्या व्यवहारातून सहृदय माणूसपणाचे निखळ दर्शन सहजपणे होत गेले. ते स्वतः प्रत्येक क्षण अगदी भरभरून जगले. आपल्यातले माणूसपण, माणूसपणाच्या मर्यादा आणि क्षमता त्यांना ज्ञात होत्या. 
आवश्यक तेव्हा अतिशय प्रखरपणे बोलणारे निर्भीड प्रल्हादजी अनेकांनी पाहिले. त्या त्या वेळच्या संघकामासाठी आवश्यक असेल ते सर्व त्यांनी केले. पण कधी कोणाविषयी त्यांनी दीर्घकाळ कडवटपणा ठेवला आहे असे आठवत नाही. त्यांचा स्वभावच नव्हता तो. 
त्यांच्या सगळ्याच भावना उत्कट होत्या. आनंद, उत्सुकता, काळजी, दुःख सगळेच बाबांना तीव्रतेने वाटायचे आणि उतारवयात तर स्थिती अशी झाली की अनेक आघात सोसलेल्या हृदयाला ते झेपायचे नाही! कोणाची काळजी वाटत असेल, निवडणुकीचे निकाल असतील, क्रिकेटची मॅच असेल सॉर्बिट्रेटची स्ट्रीप खिशातून काढावी लागायची! सिनेमा, नाटक बघताना, पुस्तक वाचताना इतकेच काय बोलता बोलता एखाद्या कार्यकर्त्याची आठवण झाली तरी कितीदा डोळे पुसावे लागायचे. 
कोणाचेही दुःख त्यांना सहन व्हायचे नाही. केवळ माणसांचेच नाही तर गुरांचे दुःखदेखील त्यांच्या हृदयाला भिडायचे. दुष्काळ विमोचन समिती, नंतरची जनकल्याण समिती ह्या सगळ्या कामांमागे ही सहवेदना अनुभवल्याने येणारी तळमळ होती. 
हीच तळमळ त्यांच्या सर्व काळातल्या, विविध वेळी, विविध ठिकाणी भोगलेल्या तुरुंगवासातही प्रत्ययाला येते. नाशिकला इतर  मनःस्थिती ठीक राहावी, नंतरही संघकाम करत राहण्याचीच सर्वांची भूमिका असावी ह्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अनेकदा सांगितले, लिहिले गेले आहेत. 
 बाबांचा अजून एक विशेष जाणवतो म्हणजे ते कायम संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक राहिले. जबाबदारी असताना आणि नसताना, सभेच्या केंद्रस्थानी असताना वा मागच्या खुर्चीवरचा सामान्य श्रोता असताना, ते निष्ठावंत स्वयंसेवकच राहिले. शाखेत जात राहिले. 
त्यांनी संघकामापुढे स्वतःच्या शरीराची, प्रकृतीची पर्वा कधीच केली नाही. अगदी मोजकी उदाहरणे सांगायची तर जनरल अरुणकुमार वैद्यांच्या हत्येने आधीच आजारी असलेले मा. नाना ढोबळे अत्यवस्थ झाले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच, डॉक्टरांना न जुमानता, बाबा सरळ रुग्णालयातून मुंबईहून पुण्याला पोचले होते. भाग्यनगर मुक्ती संग्रामयात्रेच्या वेळीही तसेच. हॉस्पिटलमधून ते सरळ सभास्थानी भाषण करायला, प्रवासाला जात असत. सगळ्या डॉक्टरांसाठी इतका आग्रही पेशंट ही एक अवघड कसोटीच असणार! 
स्वातंत्र्यसैनिक स्मारकाचे रखडलेले काम पाठपुरावा करून त्यांनी मार्गी लावले. सैनिक स्मारकाचे उद्घाटन बाबा गेल्यानंतर झाले. हा कार्यक्रम प्रल्हादजी असताना व्हायला हवा होता अशी हळहळ त्यावेळी अनेकांना वाटली. स्वतः बाबांना बहुतेक असे वाटले नसते. 
संघाबाहेर अनेक चांगले लोक असतात, निःस्वार्थ भावनेने काम करत असतात. जनसामान्यांनी केलेले अगदी लहान लहान काम असले तरी ते शोधून त्याचे कौतुक व्हावे, सुजनतेचा आणि सज्जनतेचा प्रसार समाजात व्हावा ह्यासाठी ‘उतराई’ नावाची संस्था सुरु करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. 
अनेक कामे, प्रकल्प, उपक्रम त्यांनी उभे केले. त्यांचा विश्वास होता की आपण नसलो तरी कोणी ना कोणी स्वयंसेवक ही सर्व कामे करण्यासाठी पुढे येईलच. ते गेल्यावर, काळाच्या ओघात कधी तो विश्वास सार्थ ठरला तर कधी ती कामे थांबली. असो. 
बाबांचा एक गुणविशेष असाही होता की ते एखाद्याच्या गुणांचा गौरव करीत पण उणिवांचा, दोषांचा उल्लेख करत नसत. सुख मानण्यावर आहे अशी त्यांची ठाम श्रद्धा होती. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीचा सहज स्वीकार करून ते पुढे जाऊ शकत. 
अगदी लहानपणीच त्यांची आई गेल्याने कदाचित त्यांना कधी मायेची उणीव जाणवलीही असेल. त्यांनी मात्र शेकडो जणांवर भरभरून माया केली. सर्वांनी सुखरूप राहावे असे त्यांना वाटे. समाजस्थितीची त्यांना जाण होती. ती चांगली ठेवण्यासाठी ते सतत कार्यरत राहिले.  राष्ट्रप्रेम, सौजन्य, सौहार्द बरसवून सर्वाना समृद्ध करणारे आनंदघन होते ते. 
- वृंदा टिळक 
जळगाव तरुण भारत- ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी दीपावली विशेषांक’  (दीपस्तंभ प्रचारक’ ) ह्या ऑक्टोबर 2025 च्या अंकात प्रकाशित.

Friday, 25 July 2025

हुक्कुस बुक्कुस तेलव्यान शुक्कुस


"हुक्कुस बुक्कुस तेलव्यान शुक्कुस … हुक्कुस बुक्कुस तेलव्यान शुक्कुस "
हुक्कुस बुक्कुसच्या तालावर बर्फावरून उड्या मारायला किती मजा येते आहे!! असे तर मी दररोज देखील येऊ शकतो, सरपोशच्या मनात आले.
आज त्याचे बाबा डॉक्टरकडे गेले होते. त्यांना जाऊन यायला आता कमीतकमी २/३ दिवस तरी लागणार होते. तोपर्यंत मेंढ्याना चरायला घेऊन येण्याची जबाबदारी सरपोशवर आली होती. "आपण खूप मोठे झालो आहोत आता!" खुश होऊन सरपोश पुन्हा उड्या मारू लागला.
मे महिना आला होता तरी यावर्षी अजून बर्फ कमी झाला नव्हता. डोंगर शिखरावर तर बर्फ कायम असतोच पण इथे तळाशी, घळीच्या जवळ देखील अजून बर्फ होताच. त्या बर्फाच्या अधून मधून डोकावणारी हिरवळ शोधत शोधत मेंढ्या चरत होत्या.
इतक्यात सरपोशच्या लक्षात आले की सकीना कुठे दिसत नाहीये. ‘सकीना ऐ सकीना, किधर गई तू?’ हाका मारत तो तिला शोधू लागला. अतिशय अवखळ होती ती. आईने येताना चारदा सांगितले होते, तिच्याकडे नीट लक्ष ठेव. पण गाण्याच्या तालावर बर्फावर उड्या मारायच्या नादात सरपोशचे लक्ष तिच्यावरून ढळले. तेवढ्यात ती गायब झाली. 
सकीना सापडली नाही तर आई आणि बाबा दोघेही ओरडणार, तेव्हा तिला शोधायला हवेच होते आणि तसेही तीच तर होती सरपोशची सर्वात जवळची आणि एकमेव मैत्रीण.
द्रासजवळचे त्यांचे गाव अवघे पंधरा-वीस घरांचे. त्यात सरपोशच्या वयाचे तर कोणीच नव्हते. त्यामुळे सरपोशशी खेळायला त्यांच्या मेंढ्यांच्या पिल्लांशिवाय दुसरे कोणीच नव्हते.
सरपोश सकीनाला शोधू लागला. कुठे गेली असेल ती?थोडे चढावर जाऊन सरपोशने पाहिले तर वरच्या बाजूला दूर अंतरावर सकीना दिसत होती. तिथे मध्येच एका घळीत मोठा हिरव्या गवताच्या पुंजका होता, तिथे ती चरत होती. त्याच्यावरही सरपोशला आणखी एक गवताचा पुंजका दिसला. त्याच्या लक्षात आले की जर का आता आपण सकीनाला धरून आणले नाही तर ती आणखी वर जाऊ शकेल.

सरपोश काटक होता, चपळ होता पण तरी तो चढ चढताना त्याला दम लागला. अखेर एकदाचे सकीनाला त्याने धरले आणि आता तो मागे वळणार इतक्यात डोळ्यांच्या कोपऱ्यातून अनपेक्षितपणे त्याला एक मानवी आकृती दिसली. या भागात तर कधीच माणसे दिसत नाहीत? हे कोण असेल? सरपोश घाबरला.
सकीनाला घेऊन पटकन एका उंचवट्या मागे लपून त्याने पाहिले तर तिथे शिखरावर आणखीही दोन/ तीन माणसे दिसत होती. त्यांचे चेहरे पूर्ण झाकलेले असल्याने ती कोण आहेत ते कळत नव्हते. पण त्यांच्या खांद्यावरच्या बंदुका मात्र इतक्या लांबूनही सरपोशच्या लक्षात आल्या.
दबक्या पावलांनी सरपोश सकीनाला घेऊन खाली उतरला व जरी अजून संध्याकाळ झालेली नव्हती तरी सगळ्या मेंढ्यांना गोळा करून घरी परतला.
आईला खूपच आश्चर्य वाटले. इतक्या लवकर कसा काय आला? तू ठीक तो है?कुछ हुआ क्या? भूक लगी क्या? आईने त्याच्यावर प्रश्नांची बरसात केली.
 गोरापान सरपोश घाईने आल्यामुळे लालबुंद झाला होता. त्याने आईला कशी सकीना वर गेली आणि मग तिकडे कशी माणसे दिसली ते सांगितले. आई देखील खूप आश्चर्यचकित तर झालीच पण तितक्यात तिच्या मनात जो विचार आला त्याने थोडी घाबरली पण. 
“ हाय .. हाय .. ये तो बताना पडेगा” असे म्हणून तिने सरपोशला खायला दिले. सर्व मेंढ्या त्यांच्या जागेत बंद करून ठेवल्या आणि धावत ती खालच्या बाजूला असलेल्या भारतीय लष्करी तळाकडे धावत निघाली. अंधार व्हायच्या आत तिला परत घरी यायचे होते. एक टेकडी उतरून दुसरी चढून परत ती उतरल्यावर मग कुठे ती भारतीय लष्करी तळावर पोहोचली आणि सरपोशला चार बंदूकधारी दिसल्याची बातमी तिने तिथल्या ऑफिसरला सांगितली.
तिला माहितीच नव्हते की भारतासाठी तिने तेवढी मोठी कामगिरी बजावली होती.
—-----------------------
कारगिल भागात पाकिस्तानी घुसखोर असल्याची बातमी मेंढपाळांकडून भारतीय लष्कराला समजली होती. तिथे अतिशय दुर्गम भागात लहान लहान गावे आहेत. ह्या तथ्यांवर आधारित काल्पनिक कथा.
--------------------------------
कारगिल युध्द स्मारक - ओपरेशन विजय स्मृतीस्थल

Friday, 13 June 2025

गंतव्य

माझ्या भाचीने ऑगस्टमध्ये मला रेन लिली च्या बिया दिल्या होत्या. मी लगेच कुंडीत लावल्या. त्या रुजल्या चांगल्या. पाने यायला सुरुवात झाली.
अनेक वर्षांनी घरात रेन लिली आली होती. मी उत्सुकतेने पावसाची वाट पाहू लागले. ह्या वर्षी मे मध्येच पाऊस येऊ लागला खरा, पण आमच्या रेन लिलीच्या काही तो मनास आला नाही.
झाडांकडे पाहूनच नेहमी माझ्या दिवसाची सुरुवात होते. त्यात ही कुंडी तर अगदी येता जाता दिसेल अशा ठिकाणी.
जून उजाडला. अचानक चार दिवसांपूर्वी एक काडी वर आली.. मी आता फुल येणार ह्या उत्सुकतेने दिवसातून तीनदा जाऊन पाहू लागले. त्याच्या आकारावरून मनात थोडा संशय येत होताच. पण काल सकाळी नक्की झाले की त्या बिया आहेत.
पण म्हणजे फुल आले होते आणि दिसलेच नाही?? असे कसे? फुल आले त्या दिवशी एक पूर्ण दिवस मी झाडाकडे पाहिलेच नाही असे झाले असेल? त्या आधी दोन दिवस तर कळी पण असेल..ती देखील दिसू नये???
असे होणे खरे तर अशक्यच वाटते मला..तरी पण आता डायरेक्ट बियाच दिसतायत म्हणजे तसे झाले होते हे मानायलाच हवे. अक्षम्य दुर्लक्ष होते हे. मनात अपराधीपणाची भावना दाटून आली.
मला कळलेच नाही, कोणत्या रंगाचे फुल येते, मला पहिले वहिले फुल पाहायला मिळाले नाही.. ही हळहळ होतीच. त्यापेक्षा इतके ते फुल आले आणि त्याचे काही कोडकौतुकच करता आले नाही ही खंत जास्त होती.
एरवी कळी, फुल दिसले असते तर थोड्या थोड्या वेळाने कुंडीपाशी जात मी त्याचे लाड केले असते. गप्पा मारल्या असत्या. फोटो काढले असते..ह्यातले काहीच त्या फुलाच्या वाट्याला आले नाही. रानावनात येऊन जावे तसे ते येऊन गेले. कोणीच त्याची दखल घेतली नाही.
फळ होणे हेच गंतव्य असेल तरी मधल्या प्रत्येक अवस्थेचा आनंद घेता यायला पाहिजे ना..फळ होणे हेच प्रयोजन असेल तरी कळीचे, फुलाचेही अस्तित्व महत्वाचे असतेच ना.. काल सकाळभर हेच आणि असेच सगळे मनात घोळत होते.
दुपारी विमान अपघाताची बातमी आली.. अजूनही काही सुचत नाहीये. . किती आयुष्ये खुडली गेली. किती स्वप्ने, किती आकांक्षा, किती कहाण्या अवेळीच मालवल्या.
ज्या क्षणी आपण जन्माला येतो त्या क्षणी मृत्यू निश्चित असतो हे जरी खरे असेल तरी मधले आयुष्य तर जगता यायला हवे ना.. सेल्फी मधल्या त्या तीन निरागस मुलांचे चेहरे डोळ्यांपुढून हलत नाहीयेत.
ज्या मेसवर विमान पडले तिथे कितीतरी तरुण डॉक्टर्स होते. त्यांच्या पालकांची किती मदार असेल त्यांच्यावर. ती तरुण मुले तर प्रवास देखील करत नव्हती. काळ आला की त्या पुढे कोणाचेच चालत नाही हेच खरे. मृत्यूच्या तऱ्हा तरी किती अतर्क्य.
सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।











Monday, 9 June 2025

प्रेरणाकेंद्र – विवेकानंद शिला स्मारक, कन्याकुमारी

 प्रेरणाकेंद्र – विवेकानंद शिला स्मारक, कन्याकुमारी

किनाऱ्यापासून साधारण पाचशे मीटर अंतरावर भर समुद्रात उभे असलेले ते दोन भव्य खडक.  सगळ्या बाजूनी उंच उंच लाटा त्यांच्यावर सतत आदळत असतात. संपूर्ण जगात ते दोन खडक प्रसिद्ध झाले ते तिथे बसून एका परिव्राजकाने केलेल्या चिंतनामुळे. हा योद्धा संन्यासी होता संपूर्ण जगाला भारतीय संस्कृती, हिंदू धर्म आणि विश्वबंधुत्वाची ओळख करून देणारे ‘स्वामी विवेकानंद’. 

सर्व बाजूंनी  असलेला विशाल सागर, माथ्यावरचे निळे आकाश आणि ह्यांच्याशी नाते सांगणारी, तेवढ्याच एका विशाल व्यक्तिमत्वाचे स्मारक असणारी भव्य, सुंदर वास्तू – विवेकानंद शिला स्मारक.

श्रीरामकृष्णांनी महासमाधी घेतल्यावर स्वामी विवेकानंद भारत परिक्रमेला निघाले. भारत मातेची मुले दरिद्री झाली आहेत, अज्ञानात खितपत पडली आहेत, असे दृश्य त्यांना दिसले आणि असे का? असा प्रश्‍न सतत त्यांच्या मनाला भेडसावू लागला. परिक्रमा करत असताना स्वामीजी भारत भूमीच्या दक्षिण टोकाला म्हणजे कन्याकुमारीला पोहोचले.  देवीचे दर्शन झाल्यावर समुद्राने वेढलेल्या श्रीपाद शिलेकडे गेले. स्वामी विवेकानंदानी त्या शिलाखंडावर २५ ते २७ डिसेंबर १८९२ मध्ये तीन दिवस आणि तीन रात्री, भारताच्या प्रगतीसाठी, उर्जितावस्थेसाठी काय करायला हवे ह्याचे चिंतन केले.

कन्याकुमारीजवळचा तीन सागरांनी वेढलेला तो शिलाखंड किती भाग्यवान म्हणावा? कन्याकुमारीला तीन सागरांच्या संगमाच्या ठिकाणी श्रीपाद शिला आहे. भारतातील सर्वच नद्या ह्या सागरांना येऊन मिळालेल्या आहेत. कथा सांगते की इथे माता पार्वतीने वृक्षासनात सात वर्ष तप केले होते आणि त्यामुळे देवीचे पदचिन्ह इथे उमटलेले आहेत. अर्थात याच पदचिन्हांमुळे या शिलेला श्रीपाद शिला असे म्हटले जाते.जिथे पार्वती मातेने तप केले, त्याच ठिकाणी मला माझ्या जीवन ध्येयाची प्राप्ती होईल, शिवाची प्राप्ती होईल या विचाराने स्वामी विवेकानंदांनी तिथे तप केले होते. देशाचे स्वत्व आणि सामर्थ्य त्याला पुन्हा मिळावे हीच स्वामीजींची इच्छा होती. याच श्रीपाद शिलेवर कोट्यावधी बांधवांच्या मुक्तीचा मार्ग स्वामीजींना दिसला. याच श्रीपाद शिलेवर एका संन्याशाचे, एका महान समाजसुधारकामध्ये, श्रेष्ठ संघटकामध्ये रूपांतर झाले. नंतर शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत सहभागी होऊन स्वामीजींनी इतिहास घडवला.  एका संन्याशाचे एका द्रष्ट्या विश्वगुरूत रूपांतर झालेले संपूर्ण विश्वाने पाहिले.

तसाच एक चमत्कार परत त्या शिलाखंडावर घडून आला १९७० मध्ये. तिथे भव्य विवेकानंद शिला स्मारक उभे राहिले. त्या उभारणीमागे होता कित्येक लोकांनी, कित्येक वर्षे, सतत दिवस रात्र घेतलेला स्मारकाचा ध्यास आणि त्यांना लाभलेले माननीय एकनाथजी रानडे ह्यांचे  खंबीर, दूरदृष्टी असलेले कुशल नेतृत्व.अगदी नेमके सांगायचे तर स्मारक उभारणीला लागले दोन हजार एक्याऐंशी  दिवस, सहा हजार टन पॉलीश केलेला ग्रॅनाईट, सात लाख त्र्याएंशी हजार सातशे सदुसष्ट  तास.  देशातील जनसामान्यांचा सहभाग असल्याने आणि पंथ, संप्रदाय, राजकीय पक्ष ह्या सर्व भेदांवर मात करत सर्व सहमतीने उभारलेले हे स्मारक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरले.

स्मारकाचा उदघाटन सोहळा पण खूपच विशेष होता. दोन सप्टेंबर एकोणीसशे सत्तर – भाद्रपद शुक्ल द्वितिया. भारतीय पंचांगाप्रमाणे स्वामी विवेकानंदानी शिकागोमध्ये केलेल्या भाषणाला त्या दिवशी ७७ वर्षे झाली होती. तोच दिवस विवेकानंद शिला  स्मारकाचे उदघाट्न व राष्ट्रार्पण ह्या साठी  निवडण्यात आला होता.  रामकृष्ण मठाचे स्वामी विरेश्वरानंद, चिन्मय मिशनचे स्वामी चिन्मयानंद, तपोवनचे स्वामी चिदभवानंद, रामकृष्ण मिशनचे अनेक मान्यवर, भारताचे राष्ट्रपती श्री  वराहगिरी वेंकटगिरी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री. एम. करुणानिधी, पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, श्री. मोरारजी देसाई, विजयाराजे शिंदे तसेच इतर अनेक लोकप्रतिनिधी, नेते, भारताच्या कानाकोपऱ्यातून येणारे लोक ह्यांनी विवेकानंद शिला स्मारकाला भेट दिली. हा उदघाट्न सोहळा चांगला दोन महिने चालला होता!

ह्या विवेकानंद शिला स्मारकाची रचना कशी आहे? तर सुरुवातीलाच आहे श्रीपाद मंडपम. मंडपाला तीन प्राकार आहेत. त्यातील पहिला प्राकार, म्हणजेच गर्भगृह चारी बाजूंनी भिंतींनी संरक्षित केलेला आहे. दुसऱ्या प्राकाराला २८ स्तंभ आहेत ज्याच्यावर छत विसावलेले आहे आणि तिसरा प्राकार खुला आहे. ग्रॅनाईट मध्ये बांधलेले हे वास्तुशिल्प आहे. हा श्रीपाद मंडपम भव्य आहेच. किती भव्य? तर ७१. १०* ७१.१० फूट  इतका ह्याचा आकार आहे. इतकी भव्य रचना असून देखील, किनाऱ्यावर कुठेही उभे राहिले तरी मूळ स्मारकाचे दर्शन होत राहील, अशी काळजी घेतली गेली आहे. मंडपाच्या समोर मोकळी जागा आहे. त्या मोकळ्या जागेत मध्यभागी एक पुष्करिणी सारखी रचना आहे. आपण विवेकानंद शिला स्मारकाचे फोटो पाहिले तर ह्या दोन्हींच्या मध्ये असलेले अंतर लक्षात येईल. ह्या मोकळ्या आवारानंतर येतात ते दोन हत्ती. शांती, स्थैर्य आणि शक्तीचे प्रतीक असणारे हत्ती भारतीय मंदिरांच्या वास्तुशैलीत अनेकदा आपल्याला दिसतात. हे दोन हत्ती पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला उभे राहून आपले स्वागत करतात आणि नंतर येतात मुख्य मंडपात जाण्यासाठी पायऱ्या.  पायऱ्या चढून वर आलो की  आपण येतो ते सभामंडपात. ह्यालाच विवेकानंद मंडपम असेही म्हणतात. ह्या सभामंडपाला एकूण पाच शिखरे असून प्रवेशद्वाराजवळ असलेल्या दोन खोल्यांवर दोन लहान शिखरे आहेत. लाल ग्रॅनाईट मध्ये ही सर्व शिखरे बांधली गेली आहेत. निळसर ग्रॅनाईटच्या चौकटीतले  भव्य अकरा फुटी प्रवेश द्वार आपल्याला सभामंडपात घेऊन जाते. ह्या दारावर भारतीय फुला-पानांची सुंदर वेलबुट्टी कोरलेली आहे. सभामंडपात आलो की त्याची भव्यता आपल्याला जाणवल्या वाचून राहत नाही. त्याचे आकारमान  आहे अवघे  १३० फूट * ५६ फूट!!

लाल ग्रॅनाईटच्या चौकोनी फरशा सभामंडपाची  विशालता अधोरेखित करतात. सभामंडपात आठ स्तंभ आहेत. स्तंभांवरची नक्षी व कोरीव काम, छतावरची  नक्षी हे सर्व पारंपरिक रचना तसेच आधुनिकता ह्यांचा अभिनव संगम आहे. सभागृहाच्या अनेक भव्य खिडक्या तसेच तीन प्रवेशद्वारे ह्यामुळे मोकळी हवा खेळत राहते व सभागृहात कितीही गर्दी झाली तरी गुदमरल्यासारखे होत नाही. सभागृहात आपल्याला श्री रामकृष्ण परमहंस तसेच माता शारदा देवी ह्यांच्या सुंदर प्रतिमा बघायला मिळतात.

सभामंडपात नंतर  येतो प्रतिमा मंडप. ह्या मंडपाला विशेष अलंकृत केले आहे. बाकी सभामंडपाची उंची २० फूट आहे तर प्रतिमा मंडपाची उंची २५ फूट आहे. प्रतिमा मंडपातील चार स्तंभांच्यामध्ये प्रतिमेसाठी विशेष स्थान निर्माण करण्यात आले आहे. त्यालाच मुख मंडप असे देखील म्हटले जाते. ह्या खांबांवर तसेच मंडपाच्या वरच्या कमानींवर अतिशय सुंदर कोरीवकाम आहे. निळसर ग्रॅनाईटच्या छतावर कमळाची रचना कोरलेली आहे. ह्या इतक्या सगळ्या सुंदर रचनांमध्ये देखील मन, बुद्धी आणि आत्म्याला आकर्षित करून घेतो तो मध्यभागी असलेला स्वामी विवेकानंदांचा पुतळा. 

पुतळ्याची उंची सात फूट चार इंच आहे तर त्या खालच्या चबुतऱ्याची उंची चार फूट आठ इंच आहे. हा पुतळा मुंबईच्या जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधील श्री. एन.एल.सोनावडेकर ह्यांनी बनवला आहे. स्वामी विवेकानंदांचा हा पुतळा येणाऱ्या लोकांना केवळ ध्यानधारणेची नव्हे तर कार्य करण्याची, क्रियाशील आणि गतिशील होण्याची प्रेरणा देतो. उठा! जागे व्हा! आणि ध्येयसिद्धी झाल्याखेरीज थांबू नका.  मी म्हटले होते की  इथे आल्यावर  मन, बुद्धी आणि आत्म्याला आकर्षित करून घेतो तो स्वामी विवेकानंदांचा पुतळा! मन स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने, ओजस्वी चरित्राने प्रभावित झालेले असते. बुद्धी विचार करत असते की  स्वामी विवेकानंदांची शिकवण  मला कशी आचरणात आणता  येईल?  ह्या संपूर्ण सृष्टीत वसलेल्या एकत्वाची जाणीव आत्म्याला झालेली असते. शिलास्मारकावरील विवेकानंद मंडपम मधील पुतळ्याची दृष्टी  सभागृहाचे  दार उघडताच बरोबर दोनशे अठरा फूट दूर असलेल्या श्रीपाद मंडपावर पडते. विवेकानंद पुतळ्याची देवळांप्रमाणे रोज पूजा अर्चा होत नाही. स्मारकामागील उद्देश आणखी एक देऊळ उभारणे असा नव्हता तर राष्ट्रीय एकात्मता साधता यावी, प्रत्येकामधील राष्ट्रभक्ती चेतना जागवावी हा होता. विवेकानंदांचे म्हणणे होते की तुमच्या सभोवताली असलेला विराट ईश्वर म्हणजेच हा जनता जनार्दन बघा. त्याच्यासाठी काम करा. त्याची सेवा करा. मानवाची सेवा हीच ईश्वरपूजा असे स्वामीजी सांगत असत.

शिलास्मारकातील आणखी एक महत्वाची रचना म्हणजे ध्यानमंडप. ध्यानमंडपात कोणत्याही व्यक्तीचा, देवतेचा फोटो नाही. मूर्ती देखील नाही. तर फक्त ॐ आहे. निराकार ओंकार, सृष्टीचे मुलतत्व असलेला ओंकार. ज्यात विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय सामावलेली आहे असा ओंकार.विवेकानंद शिला स्मारकाला भेट द्यायला आलेल्या लोकांना शांतपणे बसून ध्यान, मनन आणि चिंतन करता यावे म्हणून ध्यानमंडपाची योजना करण्यात आली. ह्या मंडपाचा आकार त्रेचाळीस फूट दहा इंच * एकवीस फूट सहा इंच इतका आहे.ध्यानमंडपात नैऋत्य  बाजूला एका  उंच वेदीसारख्या रचनेत  भव्य ओंकाराची स्थापना करण्यात आली आहे. ह्यालाच प्रणव पीठम असेही म्हणतात. प्रणव म्हणजेच ॐ.  

भेट देणाऱ्या लोकांची कितीही गर्दी असली तरी ह्या मंडपात अजिबात आवाज करू नये अशा सूचना असल्याने ध्यान मंडपात शांतता असते. अतिशय शांत वातावरणात मन एकाग्र होते,  सृष्टीचे मूळ असलेल्या ओमचे ध्यान करता येते. देशातीलच नव्हे तर जगभरातील लोक तेथे येत असतात. ओंकाराचे ध्यान करत असतात. श्रीपादमंडपम आणि विवेकानंद मंडपम प्रमाणेच ध्यान मंडपम  आणि प्रणव पीठम ही देखील कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाची ओळख बनलेली आहे. ह्या दगडातील सुंदर स्मारक जे विचार जागवते त्याचे जिवंत रूप आपल्याला पाहायला मिळते गावात असलेल्या विवेकानंद पुरम  मध्ये. विवेकानंद केंद्राचे मुख्य कार्यालय असलेल्या विवेकानंद पुरम मध्ये अनेक प्रदर्शनी तर आहेतच, सुंदर मंदिर आहे आणि प्रशिक्षण केंद्र देखील आहे. ऑगस्ट २०१६ मध्ये एका शिबिराच्या निमित्ताने इथल्या प्रशिक्षण केंद्रात  ८/१० दिवस राहण्याची संधी मिळाली. तेव्हा केलेली योग साधना, ऐकलेली व्याख्याने जशी लक्षात आहेत  तसेच दोन्ही बाजूला फुललेले आणि आपल्या सुगंधाने आसमंत भारुन टाकणारे आकाशनिंब (कोणी ह्याला गगनजाई किंवा बुचाची फुले देखील म्हणतात) आणि पिसारा फुलवून नृत्य करणारे, एकमेकांना साद घालणारे असंख्य मोर हे देखील लक्षात आहे. त्या परिसरातील साधेपणा, शांती, समुद्राकडे जाणारी सुंदर वाट, विवेकानंदांचा पुतळा सगळेच कधी न विसरता येण्याजोगे. 

देशभरात अनेक ठिकाणी, अगदी दुर्गम भागातून देखील शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक, शेती आणि ग्रामविकास विषयक काम करणारे हजारो तरुण कार्यकर्ते विवेकानंद केंद्राकडे आहेत. कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता  ते शांतपणे आपले काम करत आहेत. स्वामी विवेकानंदांचे दगडातील सुंदर स्मारक आणि त्याचा जिवंत प्रेरणादायी अविष्कार बघायचा असेल तर कन्याकुमारीला अवश्य भेट द्या.

वृंदा टिळक

सीमारेषांची अनुभूती

 

ऋतुगंध – शरद – वर्ष १६, अंक ३

जियो, जियो अय देश! कि पहरे पर ही जगे हुए हैं हम।

वन, पर्वत, हर तरफ़ चौकसी में ही लगे हुए हैं हम।
हिन्द-सिन्धु की कसम, कौन इस पर जहाज ला सकता ।
सरहद के भीतर कोई दुश्मन कैसे आ सकता है ?
पर की हम कुछ नहीं चाहते, अपनी किन्तु बचायेंगे,
जिसकी उँगली उठी उसे हम यमपुर को पहुँचायेंगे।
हम प्रहरी यमराज समान जियो जियो अय हिन्दुस्तान!

आपल्या ‘जियो जियो अय हिन्दुस्तान’ ह्या कवितेत ‘रामधारी सिंह ‘दिनकर’ म्हणतात सरहदीचे – देशाच्या सीमेचे आम्ही प्राणपणाने रक्षण करु. 

तुमच्या माझ्यासारख्या देशाच्या सर्वसामान्य नागरिकांना आपापल्या राज्यात असेल तर आणि तेवढीच देशाची सीमा माहिती असते. पण अन्य ठिकाणच्या माहिती नसतात. आज आपण पाहणार आहोत, जिथे आम्ही जाऊन आलो अशा काही सीमावर्ती भागांविषयी. 

भारताचा नकाशा आपण पाहिला तर हिंद महासागर, सिंधुसागर आणि बंगालचा उपसागर सोडल्यास बाकी भागात पाकिस्तान, अफगाणिस्थान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, ब्रम्हदेश हे देश आपल्या सीमेवर आहेत. ह्यातील सर्वात जास्त लोक जिथे भेट देतात ती बॉर्डर पोस्ट आहे ‘अटारी बॉर्डर’ – भारत आणि पाकिस्तानमधील बॉर्डर.ती जागा तिथे रोज संध्याकाळी होणाऱ्या ‘लोअरिंग ऑफ फ्लॅग्स सेरिमनी’ साठी खूप प्रसिद्ध आहे. अटारी बॉर्डर पाकिस्तानच्या वाघा येथे जोडली गेलेली आहे. पंजाब मधील अमृतसरपासून साधारण २८ किलोमीटर वर हे ठिकाण आहे. रोज संध्याकाळी होणारा हा रोमहर्षक सोहळा अनुभवण्यासाठी दोन्ही बाजूला हजारो प्रेक्षक जमलेले असतात.

तो सोहळा, त्या वेळी दोन्ही बाजूंच्या प्रेक्षकांतून दिल्या जाणाऱ्या घोषणा, जयघोष, उचंबळून येणाऱ्या भावना हे सगळे प्रत्यक्ष अनुभवण्याजोगे आहे. असा सोहळा भारताच्या अन्य कोणत्या बॉर्डर पोस्ट वर पाहायला मिळाला नाही. पाकिस्तान १९४७ पर्यंत भारताचा भाग असल्याने, साहजिकच भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप मोठी-जवळपास ३००० किलोमीटर लांब सीमारेषा आहे. गुजराथ, राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मीर इथून ही सीमारेषा जाते. 

अशीच खूप मोठी सीमारेषा असलेला दुसरा देश आहे बांगला देश. भारत आणि बांगला देश जवळ जवळ ४००० किलोमीटरच्या सीमेने जोडलेले आहेत. जगातील सर्वात मोठ्या पाच सीमारेषांपैकी ही एक आहे. इतकी मोठी सीमारेषा असणे स्वाभाविकच आहे, कारण १९४७ पर्यंत बांगला देश हा भारताचाच भाग होता. भारताचा नकाशा पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल की ही सीमारेषा कशी आणि किती पसरलेली आहे. आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम आणि पश्चिम बंगाल ह्या राज्यातून ही सीमारेषा जाते. इतकी मोठी, ४००० किलोमीटरपेक्षाही जास्त सीमारेषा असल्याने, तिकडून येणारे निर्वासित लोंढे थोपवणे, भारतासाठी फार अवघड झाले आहे. 

ह्या दोन देशांमधील सीमारेषा आम्ही कुठे पहिली ती हकीकत मनोरंजक आहे. आम्ही गेलो होतो मेघालयात दावकीजवळ ‘उमंगोत’ नदी बघायला. नदीचे पाणी इतके स्वच्छ आणि नितळ आहे की तुम्ही खरोखर तळ बघू शकता. तिथे नौकाविहार करणे फार आकर्षक आणि आनंददायी असते. 

आम्ही जेव्हा नावेतून फिरून काठावर परत आलो तेव्हा दिसले की इथेच भारत बांगलादेश सीमा आहे! बांगलादेशी नागरिकांचा एक घोळका तिथे फिरत होता. तेही दावकी आणि भारत बघायला आले होते. तिथे ना खांब होते, ना तारा होत्या, ना कुंपण होते. फक्त एक पाटी होती की ‘ही भारत बांगलादेश सीमा आहे. कृपया ओलांडू नये!’बांगला देशातील लोक चौपाटीवर फिरायला यावे तसे तिथे आलेले होते. अगदी चणेवाले देखील होते त्या पाटीच्या मागे..म्हणजे बांगलादेशात!!

अरुणाचल प्रदेशातील लोहित जिल्ह्यातील परशुराम कुंडला गेलो होतो तेव्हा अजून एक सीमारेषा पाहिली.  

परशुरामकुंड कडे पाठ करून उभे राहिलो की मागे जो डोंगर दिसतो, तो पार केला की ब्रम्हदेश आहे! त्यामुळे तशी दुरवरूनच आम्ही सीमा पाहिली असे म्हणायला हवे. जानेवारीत तिथे एक विशेष जत्रा असते. काही जनजातीच्या लोकांना तिथे जायला किंवा तिकडून इथे यायला परवानगी आहे. अर्थात सीमेवर एक बॉर्डर पोस्ट आहे पण ते दूर आहे. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम आणि मेघालय ह्या चार राज्यात भारत ब्रम्हदेश सीमाभाग आहे. जवळपास १५०० किलोमीटरची ही सीमा आहे.

अजून एक सीमारेषा पाहिली ती भारत चीन सीमा. इथे मात्र व्यवस्थित बॉर्डर पोस्ट, नो मॅनस लँड आणि लाईन ऑफ कंट्रोल पण आहे. ही सीमा अरुणाचल प्रदेशाच्या तवांग जवळील बुमला पास येथे आहे. अरुणाचल मध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला इनरलाईन परमिट लागते. ते प्रत्यक्ष जाउन तुम्हाला गुवाहाटी विमानतळावर किंवा रेल्वे स्टेशनवर मिळू शकते. त्यासाठी तुमचे फोटोज, ओळखपत्र, आणि निवासाचा दाखला लागतो. इनरलाईन परमिट ऑनलाईन देखील घेऊ शकता. 

१९६२ च्या भारत चीन युद्धातील एका घनघोर संग्रामाचे ठिकाण म्हणजे तवांग. ‘तवांग युद्ध स्मारक’ शहरापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे. तवांग युद्ध स्मारक बघणे ही तर आगळीच भावना आहे. आदर, अभिमान, दुःख, अपराधीपण .सर्वच भावनांचा कल्लोळ मनात उसळतो. असे म्हटले जाते की तेव्हा इतके भारतीय सैनिक गेले, त्यांच्या रक्तामुळे तवांग जवळून वाहणारे झरे देखील लाल झाले होते. सगळे भारतीय नागरिक सुरक्षित राहावे म्हणून ते सैनिक शत्रूशी लढले आणि धारातिर्थी पडले, अमर झाले. अशी युद्धस्मारके जिथे जिथे बघता येतील ती सर्व पाहिली पाहिजेत. आम्ही जेसलमेर येथे असे एक युद्धस्मारक पाहिले होते. 

तवांगहून बुमला पासला जाण्यासाठी त्या अवघड रस्त्यांवरून जाऊ शकतील अशाच गाड्या लागतात. तशा गाड्या आणि वाहनचालक तवांगमध्ये अगदी सहज मिळतात. 

बुमला येथे फक्त भारतीय नागरिकच जाउ शकतात. त्यांनादेखील एक विशेष परवानगी घेऊन मगच जाता येते. हे परवानगीपत्र तवांगमधून घ्यायला लागते. मिलिटरी चेक पोस्टवर ते तपासले जाते आणि मगच तुम्ही बुमलाच्या रस्त्यावरून जाउ शकता. 

रस्ता खूप खडतर आहे. आता रस्ता तरी आहे पण आपले सैनिक १९६२ साली लढले तेव्हा रस्ता नव्हताच. पाठीवर आपापले सामान घेऊन, डोंगर-दऱ्या तुडवत, खायला मिळाले तर मिळाले, नाही तर उपाशी पोटी.अशा अवस्थेत कित्येक किलोमीटर चालत आपले सैनिक बुमलाला पोचले आणि लढले. 

बुमला पासला पोचल्यावर एन्ट्री गेटच्या बाहेर गाडी पार्क करायला लागते. हे ठिकाण समुद्रसपाटी पासून १५,२०० फूट उंचीवर आहे. तिथून अगदी जवळ असलेल्या  ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत हुडहुडी भरते. तुमचे सगळे सामान, अगदी फोन, पर्स, पाकिटे सगळे तिथे ठेवून घेतले जाते आणि मग तुम्हाला प्रत्यक्ष बॉर्डर जवळ जाता येते. तिथे फोटोग्राफी करायला परवानगी नाही.

तिथे पोचायला खरे तर अगदी थोडेच चालायला लागते. पण अतोनात थंडी आणि ऑक्सिजनचे अल्प प्रमाण ह्यामुळे आपण किती चाललो आहोत असे वाटते. काही सामान नसताना, नुसते चालण्यासाठी देखील आपल्याला कष्ट होतात. सैनिक इथे कसे लढले असतील आणि लढत असतील?

तिथे पोचल्यावर  सैन्य अधिकारी युद्धाच्या वेळी काय काय झाले, कुठे सैनिक होते, युद्ध कसे झाले ते सगळे निवेदन करतात. चीनची सीमा लांबवर दिसत असते. तुमच्या तोंडून आपोआपच ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ अशा घोषणा निनादत राहतात. 

मला वाटते प्रत्येक भारतीय नागरिकाने एकदा तरी अशा सीमावर्ती भागात जाऊन यायला हवे. आपले हात पाय काम करेनासे होतात, नुसते चालणे देखील कठीण होऊन जाते. अशा वातावरणात सैनिक जीवावर उदार होऊन युद्ध करत असतात.. ते कोणासाठी? कशासाठी? आपण काय जाणीव ठेवतो त्यांची? आपण त्यांच्यासाठी काय करतो? असे सगळे प्रश्न पडायला लागतात. अत्यंत दुर्गम भागात, कसोटी पाहणाऱ्या हवामानात आपल्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांविषयी आदर, अभिमान आणि कृतज्ञता जास्तच प्रकर्षाने वाटायला लागते आणि आपोआपच नागरिक म्हणून आपल्यावर असलेल्या जबाबदारीचे भान येते. सजग, सुजाण नागरिक हे कोणत्याही देशाचे बलस्थान असते ह्यात शंकाच नाही.

वृंदा टिळक

एक तरी वारी अनुभवावी


ऋतुगंध – शिशिर – वर्ष १६, अंक ४ –

नमस्कार! 

ह्या वर्षातील हा शेवटचा ऋतुगंध आणि अर्थातच ह्या लेखमालिकेतील हा शेवटचा लेख. काही विशिष्ट हेतूने केलेले पर्यटन, स्थळ व माहिती असे ह्या लेखमालिकेचे स्वरूप होते. 

आत्तापर्यंत ह्या लेखमालिकेत आपण कन्याकुमारीचे विवेकानंद शिला स्मारक, बंगलोरजवळील विवेकानंद योग अनुसंधान केंद्राचे प्रशांती कुटिरम, भारताचे काही सीमावर्ती प्रदेश हे लेख वाचले.  ह्याच मालिकेतील वाटावा असा एक लेख मी स्मरणिकेत लिहिला, तो होता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मस्थानाविषयी – भगूरविषयी. 

त्या लेखात मी लिहिले होते,”प्रवास आपल्या नकळत आपल्याला बदलत असतो. आपल्याला ज्यांची जाणीव होईल वा कदाचित होणारही नाही.असे सूक्ष्म बदल आपल्यात होत जातात. आपण पाहिलेल्या जागा,अनुभवलेले सुंदर क्षण, आपल्यावर ओढवलेले प्रसंग हे सगळे आपल्या मनाचा एक भाग बनून जातात आणि आपल्याला सुजाण, समृद्ध करतात. हे ज्याला कळते तो प्रवासाचे गंतव्य विचारपूर्वक निवडतो. “

हे म्हणणे सार्थ होईल असा एक विलक्षण प्रवास नुकताच मला करता आला. त्या विषयीच आज लिहिते आहे. 

महाराष्ट्रातील भक्तिमार्गाची एक ठळक खूण म्हणजे वारी. दरवर्षी लाखो  भाविक पायी चालत वारीसाठी जातात. मग ही वारी पंढरपूरला असो, शिर्डीला असो वा शेगावला असो. पायी चालताना हे वारकरी तर नामस्मरणात मग्न असतातच पण आपल्याबरोबर त्या मार्गातील सगळ्यांना भक्तिरंगात रंगवून टाकतात.

वारी असतो भक्तीचा एक सामूहिक अविष्कार. भक्तांच्या मनात एकाच वेळी उमटणारा नामाचा हुंकार. पाय चालत असतात, मार्गक्रमण करत असतात पण मन मात्र माउलींच्या चरणी लागलेले असते. वारी सर्व भेद विरघळवून टाकते. आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करून कितीही अंतर सहजसाध्य करण्याची ऊर्जा देते. मला तर नेहमीच वारी म्हणजे समाजपुरुषाचा एक विराट अविष्कार आहे असेच वाटते. त्यातला प्रत्येक जण वैयक्तिक अस्तित्व विसरून जाऊन एका विराट रूपाचा भाग बनलेला असतो. 

असे म्हणतात की तुम्ही शुद्ध मनाने इच्छा करा, ती साध्य करण्याकरिता शक्य ते सर्व प्रयत्न करा आणि ह्या विश्वातील सकारात्मक शक्ती तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी सहाय्य करतील. माझी वारीत सहभागी होण्याची इच्छा अशीच पूर्ण झाली ती गजानन महाराज उपासना केंद्र, ठाणे ह्यांनी आयोजित केलेल्या वारीच्या निमित्ताने. 

ही वारी होती खामगाव – शेगाव अशी. साधारण १७ किलोमीटरचे अंतर पायी चालायचे होते. आम्ही आदल्या दिवशीच म्हणजे १० डिसेंबर २०२२ ला शेगावला पोचलो. त्या दिवशी सामूहिक उपासना झाली, मंदिरात जाऊन दर्शन घेतले. 

दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता  सर्वजण एकत्र आले. शेगावहून बसने खामगावला जायचे होते आणि मग तिथून पायी चालत शेगाव अशी वारी होती. बसमध्ये देखील नामाचा गजर सुरु होता. 

वय वर्षे ९ ते ८५ ह्या वयोगटातील एकूण ५०० जण खामगावला  पोचून, आरती होऊन, प्रत्यक्ष चालणे सुरवात व्हायला साडेसात वाजले. ‘मी’ लवकर उठले, ‘मी’ तयार झाले, म्हणजे आता लवकर निघायला हवे अशी आपल्या मनाची धारणा झालेली असते. पण ‘मी’ चा जेव्हा ‘आपण’ होतो तेव्हा केवळ ‘माझा’ नव्हे, तर ‘सर्वांचा’ विचार करायचा असतो हा पहिला धडा मिळाला. मनाचे उतावळेपण कमी करण्यासाठी हा वेळ खूप उपयोगी पडला. 

नामघोषात वारी निघाली. नाम घेता घेता पावले आपोआपच पडत होती. चालण्याचा उत्साह वाढत होता. त्या आधी अजिबात ओळख नसलेल्या पण वारीत जोडीदार बनलेल्या सगळ्याजणी आपल्या अगदी जुन्या मैत्रिणी आहेत असे वाटत होते. ‘ऐसी कळवळ्याची जाती।करी लाभाविण प्रीती’ ह्या संत तुकारामांच्या वचनाचा अल्पसा प्रत्यय येऊ लागला. 

साधारण सात किलोमीटर चालून झाल्यावर अन्नकुटी मध्ये न्याहारीची सोय केलेली होती. तिथे स्तोत्रपठण आणि न्याहारी झाली. तिथे आम्हाला दुसरी एक वारी भेटली. त्या वारीला पाहून अनेक गोष्टी शिकता आल्या. आमची वारीची तयारी म्हणजे चांगले बूट, बॅकपॅक, टोपी, पाण्याची बाटली, लागतील म्हणून औषधे अशी जय्यत तयारी होती. आम्हाला भेटलेल्या वारीतील बायकांकडे काहीच सामान नव्हते. कित्येकींच्या पायात साध्या चपला पण नव्हत्या. त्यांच्या डोळ्यातला निर्मळ भाव आणि चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य मात्र त्यांना कशाचीही कमतरता वाटत नाही असेच सांगत होते. 

आपल्या देहाला आणि मनाला लागलेल्या सुखसोयींच्या सवयी लगेच नाहीशा  तर नाही होणार. पण त्यांचे अवडंबर शक्य तितके कमी करायला हवे हा धडा मिळाला. 

सुरुवातीला सुखद असणारे ऊन आता चांगलेच तापले होते. आयोजकांनी आधीच सांगितले होते की आपला चालण्याचा वेग कितीही असला तरी आपल्याला सगळ्यांच्या सोबत हळू हळूच जायचे आहे. आपण तसेच करायचे, वारीची शिस्त मोडायची नाही असे मनाशी पक्के ठरवले होते. सर्वच जण अगदी सावकाश, बाकी सगळ्यांच्या वेगाशी जुळवून घेत चालत होते. 

भजने, गजर, मनात सतत चालू असलेली  ‘ओम गजानन नमो नम: श्री गजानन नमो नम: जय गजानन नमो नम: गुरु गजानन नमो नमः ‘ नामामधून, मागे पडलेले प्रापंचिक विषय असा अगदी वेगळा अनुभव होता तो. आयोजक सतत आमचा उत्साह वाढवत होते, आमची काळजी घेत होते. 

वारीच्या अगदी सुरुवातीच्या भागात घातले जाणारे रिंगण, भजने आम्हाला दिसत वा ऐकू येत नव्हती. पण ह्या वेळी तिथे असा कार्यक्रम असेल हे आदल्या दिवशी कळले होते. त्यामुळे त्या वेळी जागच्या जागी पाय हलवत आम्ही मनोमन त्या भजनांची, भारुडांची, पावलीची आणि रिंगणाची कल्पना करत उभे होतो. वाटेतला ट्रॅफिक, त्यामुळे होणारा खोळंबा, माध्यान्हीचे वैदर्भी ऊन ह्या सगळ्याने प्रत्येकाची सहनशीलता वाढवली. साधारण दीड वाजता आम्हाला मंदिराचे दर्शन झाले. प्रत्यक्ष दर्शन घेणे शक्यच होणार नव्हते. त्या दिवशी रविवार आणि चतुर्थी होती. आमच्या आधी पाच सहा वाऱ्या येऊन पोचलेल्या होत्या. मंदिरात अतोनात गर्दी होती. त्यामुळे बाहेरून घडलेल्या मंदिराच्या दर्शनावर समाधान मानले. 

संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा जन्म कधी झाला हे तर कोणाला माहिती नाही, पण ते शेगावात २३ फेब्रुवारी १८७८ ह्या दिवशी प्रगट झाले. समाजातील दांभिकता,भेदभाव नष्ट होऊन एकता आणि अध्यात्मिक  उन्नती साधण्यासाठी ह्या योगीराजाने आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी ८ सप्टेंबर १९१० ला समाधी घेतली. शेगावचे महत्व मात्र कमी न होता, दिवसेंदिवस वाढतच आहे. 

महाराजांनी सांगितल्यानुसार अतिशय शिस्तीचे, स्वच्छ, पारदर्शक आर्थिक व्यवहाराचे नियोजन असलेल्या शेगावच्या मंदिराला व्यवस्थापनाचा आदर्श मानले जाते. प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार मंदिरे ही संस्कारांची केंद्रे असायची. तसेच आहे हे मंदिर.  देवस्थानामुळे संपूर्ण परिसराचा कायापालट झाला आहे. 

 माझ्या सारख्या ५०० जणांची वारी झाली. शेगावचे, महाराजांचे दर्शन झाले. डिसेंबर मधील ह्या वारीची तयारी ‘गजानन महाराज उपासना केंद्र, ठाणे’ च्या कार्यकर्त्यांनी ऑगस्ट पासून सुरु केली होती. त्या सर्वांचे योजकत्व आणि मेहनत सफल झाली.’ तुम्ही एक पाऊल  पुढे या, माउली बाकी सगळे घडवून आणतात’ ह्याचा प्रत्यय आयोजकांना आणि वारकऱ्यांना वेळोवेळी आला. 

वारी मध्ये अगदी पहिल्यांदा सामील होण्याचा आनंद खूपच मोठा होता. ह्या लेखमालिकेच्या समाप्तीसाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वैभव असणाऱ्या वारीविषयी लिहिता आले हा देखील भाग्ययोगच म्हणायला हवा. 

ह्या संपूर्ण लेखमालिकेला,वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वाचकांनी आवर्जून लेख वाचल्याचे,आवडल्याचे कळवले. मन:पूर्वक धन्यवाद. 

वृंदा टिळक

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...