ऋतुगंध – शिशिर – वर्ष १६, अंक ४ –
नमस्कार!
ह्या वर्षातील हा शेवटचा ऋतुगंध आणि अर्थातच ह्या लेखमालिकेतील हा शेवटचा लेख. काही विशिष्ट हेतूने केलेले पर्यटन, स्थळ व माहिती असे ह्या लेखमालिकेचे स्वरूप होते.
आत्तापर्यंत ह्या लेखमालिकेत आपण कन्याकुमारीचे विवेकानंद शिला स्मारक, बंगलोरजवळील विवेकानंद योग अनुसंधान केंद्राचे प्रशांती कुटिरम, भारताचे काही सीमावर्ती प्रदेश हे लेख वाचले. ह्याच मालिकेतील वाटावा असा एक लेख मी स्मरणिकेत लिहिला, तो होता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मस्थानाविषयी – भगूरविषयी.
त्या लेखात मी लिहिले होते,”प्रवास आपल्या नकळत आपल्याला बदलत असतो. आपल्याला ज्यांची जाणीव होईल वा कदाचित होणारही नाही.असे सूक्ष्म बदल आपल्यात होत जातात. आपण पाहिलेल्या जागा,अनुभवलेले सुंदर क्षण, आपल्यावर ओढवलेले प्रसंग हे सगळे आपल्या मनाचा एक भाग बनून जातात आणि आपल्याला सुजाण, समृद्ध करतात. हे ज्याला कळते तो प्रवासाचे गंतव्य विचारपूर्वक निवडतो. “
हे म्हणणे सार्थ होईल असा एक विलक्षण प्रवास नुकताच मला करता आला. त्या विषयीच आज लिहिते आहे.
महाराष्ट्रातील भक्तिमार्गाची एक ठळक खूण म्हणजे वारी. दरवर्षी लाखो भाविक पायी चालत वारीसाठी जातात. मग ही वारी पंढरपूरला असो, शिर्डीला असो वा शेगावला असो. पायी चालताना हे वारकरी तर नामस्मरणात मग्न असतातच पण आपल्याबरोबर त्या मार्गातील सगळ्यांना भक्तिरंगात रंगवून टाकतात.
वारी असतो भक्तीचा एक सामूहिक अविष्कार. भक्तांच्या मनात एकाच वेळी उमटणारा नामाचा हुंकार. पाय चालत असतात, मार्गक्रमण करत असतात पण मन मात्र माउलींच्या चरणी लागलेले असते. वारी सर्व भेद विरघळवून टाकते. आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करून कितीही अंतर सहजसाध्य करण्याची ऊर्जा देते. मला तर नेहमीच वारी म्हणजे समाजपुरुषाचा एक विराट अविष्कार आहे असेच वाटते. त्यातला प्रत्येक जण वैयक्तिक अस्तित्व विसरून जाऊन एका विराट रूपाचा भाग बनलेला असतो.
असे म्हणतात की तुम्ही शुद्ध मनाने इच्छा करा, ती साध्य करण्याकरिता शक्य ते सर्व प्रयत्न करा आणि ह्या विश्वातील सकारात्मक शक्ती तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी सहाय्य करतील. माझी वारीत सहभागी होण्याची इच्छा अशीच पूर्ण झाली ती गजानन महाराज उपासना केंद्र, ठाणे ह्यांनी आयोजित केलेल्या वारीच्या निमित्ताने.
ही वारी होती खामगाव – शेगाव अशी. साधारण १७ किलोमीटरचे अंतर पायी चालायचे होते. आम्ही आदल्या दिवशीच म्हणजे १० डिसेंबर २०२२ ला शेगावला पोचलो. त्या दिवशी सामूहिक उपासना झाली, मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता सर्वजण एकत्र आले. शेगावहून बसने खामगावला जायचे होते आणि मग तिथून पायी चालत शेगाव अशी वारी होती. बसमध्ये देखील नामाचा गजर सुरु होता.
वय वर्षे ९ ते ८५ ह्या वयोगटातील एकूण ५०० जण खामगावला पोचून, आरती होऊन, प्रत्यक्ष चालणे सुरवात व्हायला साडेसात वाजले. ‘मी’ लवकर उठले, ‘मी’ तयार झाले, म्हणजे आता लवकर निघायला हवे अशी आपल्या मनाची धारणा झालेली असते. पण ‘मी’ चा जेव्हा ‘आपण’ होतो तेव्हा केवळ ‘माझा’ नव्हे, तर ‘सर्वांचा’ विचार करायचा असतो हा पहिला धडा मिळाला. मनाचे उतावळेपण कमी करण्यासाठी हा वेळ खूप उपयोगी पडला.
नामघोषात वारी निघाली. नाम घेता घेता पावले आपोआपच पडत होती. चालण्याचा उत्साह वाढत होता. त्या आधी अजिबात ओळख नसलेल्या पण वारीत जोडीदार बनलेल्या सगळ्याजणी आपल्या अगदी जुन्या मैत्रिणी आहेत असे वाटत होते. ‘ऐसी कळवळ्याची जाती।करी लाभाविण प्रीती’ ह्या संत तुकारामांच्या वचनाचा अल्पसा प्रत्यय येऊ लागला.
साधारण सात किलोमीटर चालून झाल्यावर अन्नकुटी मध्ये न्याहारीची सोय केलेली होती. तिथे स्तोत्रपठण आणि न्याहारी झाली. तिथे आम्हाला दुसरी एक वारी भेटली. त्या वारीला पाहून अनेक गोष्टी शिकता आल्या. आमची वारीची तयारी म्हणजे चांगले बूट, बॅकपॅक, टोपी, पाण्याची बाटली, लागतील म्हणून औषधे अशी जय्यत तयारी होती. आम्हाला भेटलेल्या वारीतील बायकांकडे काहीच सामान नव्हते. कित्येकींच्या पायात साध्या चपला पण नव्हत्या. त्यांच्या डोळ्यातला निर्मळ भाव आणि चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य मात्र त्यांना कशाचीही कमतरता वाटत नाही असेच सांगत होते.
आपल्या देहाला आणि मनाला लागलेल्या सुखसोयींच्या सवयी लगेच नाहीशा तर नाही होणार. पण त्यांचे अवडंबर शक्य तितके कमी करायला हवे हा धडा मिळाला.
सुरुवातीला सुखद असणारे ऊन आता चांगलेच तापले होते. आयोजकांनी आधीच सांगितले होते की आपला चालण्याचा वेग कितीही असला तरी आपल्याला सगळ्यांच्या सोबत हळू हळूच जायचे आहे. आपण तसेच करायचे, वारीची शिस्त मोडायची नाही असे मनाशी पक्के ठरवले होते. सर्वच जण अगदी सावकाश, बाकी सगळ्यांच्या वेगाशी जुळवून घेत चालत होते.
भजने, गजर, मनात सतत चालू असलेली ‘ओम गजानन नमो नम: श्री गजानन नमो नम: जय गजानन नमो नम: गुरु गजानन नमो नमः ‘ नामामधून, मागे पडलेले प्रापंचिक विषय असा अगदी वेगळा अनुभव होता तो. आयोजक सतत आमचा उत्साह वाढवत होते, आमची काळजी घेत होते.
वारीच्या अगदी सुरुवातीच्या भागात घातले जाणारे रिंगण, भजने आम्हाला दिसत वा ऐकू येत नव्हती. पण ह्या वेळी तिथे असा कार्यक्रम असेल हे आदल्या दिवशी कळले होते. त्यामुळे त्या वेळी जागच्या जागी पाय हलवत आम्ही मनोमन त्या भजनांची, भारुडांची, पावलीची आणि रिंगणाची कल्पना करत उभे होतो. वाटेतला ट्रॅफिक, त्यामुळे होणारा खोळंबा, माध्यान्हीचे वैदर्भी ऊन ह्या सगळ्याने प्रत्येकाची सहनशीलता वाढवली. साधारण दीड वाजता आम्हाला मंदिराचे दर्शन झाले. प्रत्यक्ष दर्शन घेणे शक्यच होणार नव्हते. त्या दिवशी रविवार आणि चतुर्थी होती. आमच्या आधी पाच सहा वाऱ्या येऊन पोचलेल्या होत्या. मंदिरात अतोनात गर्दी होती. त्यामुळे बाहेरून घडलेल्या मंदिराच्या दर्शनावर समाधान मानले.
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा जन्म कधी झाला हे तर कोणाला माहिती नाही, पण ते शेगावात २३ फेब्रुवारी १८७८ ह्या दिवशी प्रगट झाले. समाजातील दांभिकता,भेदभाव नष्ट होऊन एकता आणि अध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी ह्या योगीराजाने आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी ८ सप्टेंबर १९१० ला समाधी घेतली. शेगावचे महत्व मात्र कमी न होता, दिवसेंदिवस वाढतच आहे.
महाराजांनी सांगितल्यानुसार अतिशय शिस्तीचे, स्वच्छ, पारदर्शक आर्थिक व्यवहाराचे नियोजन असलेल्या शेगावच्या मंदिराला व्यवस्थापनाचा आदर्श मानले जाते. प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार मंदिरे ही संस्कारांची केंद्रे असायची. तसेच आहे हे मंदिर. देवस्थानामुळे संपूर्ण परिसराचा कायापालट झाला आहे.
माझ्या सारख्या ५०० जणांची वारी झाली. शेगावचे, महाराजांचे दर्शन झाले. डिसेंबर मधील ह्या वारीची तयारी ‘गजानन महाराज उपासना केंद्र, ठाणे’ च्या कार्यकर्त्यांनी ऑगस्ट पासून सुरु केली होती. त्या सर्वांचे योजकत्व आणि मेहनत सफल झाली.’ तुम्ही एक पाऊल पुढे या, माउली बाकी सगळे घडवून आणतात’ ह्याचा प्रत्यय आयोजकांना आणि वारकऱ्यांना वेळोवेळी आला.
वारी मध्ये अगदी पहिल्यांदा सामील होण्याचा आनंद खूपच मोठा होता. ह्या लेखमालिकेच्या समाप्तीसाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वैभव असणाऱ्या वारीविषयी लिहिता आले हा देखील भाग्ययोगच म्हणायला हवा.
ह्या संपूर्ण लेखमालिकेला,वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वाचकांनी आवर्जून लेख वाचल्याचे,आवडल्याचे कळवले. मन:पूर्वक धन्यवाद.
वृंदा टिळक
No comments:
Post a Comment