ऋतुगंध – वसंत – वर्ष १७, अंक १
मनातल्या मुक्या भावनांना शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत कविता लिहिली जाते.खरे तर, लिहिलेल्या शब्दांच्या मधल्या अवकाशात कविता कितीतरी सांगत असते. या लेखमालिकेत आपण वाचणार आहोत, अशा कवितांविषयी. दोन शब्दांच्या मधल्या अवकाशाचा शोध घेण्याचा हा तोकडा प्रयत्न आहे.
शाळा सुटली पाटी फुटली
शाळा सुटली, पाटी फुटली
आई, मला भूक लागली
शाळा सुटता धावत सुटले
ठेच लागुनी मी धडपडले
आई, मजला नंतर कळले
नवीन कोरी पाटी फुटली
धम्मक लाडू चापट पोळी
नको देऊ मज हवीच गोळी
किंवा दे गं , खमंग चकली
दे ना लवकर, भूक लागली
सायंकाळी जाउ दे मला
पटांगणावर खेळायाला
तिथे सोबती वाट पाहती
दे ना खाऊ, भूक लागली
गीतकार – योगेश्वर अभ्यंकर, संगीत- श्रीनिवास खळे, गायिका- कुंदा बोकील.
ह्या गाण्यातून, त्याच्या प्रत्येक कडव्यातून त्या वेळच्या समाजस्थितीचे वर्णन आपल्यासमोर येते.
विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी पाटी वापरण्याचा तो काळ होता. पाटी वर्षानुवर्षे जपून ठेवण्याचा काळ होता. सहसा मोठ्या भावंडांची पाटी लहान भावंडे वापरायची. फारच कौतुक असेल तर दसऱ्याच्या सुमाराला नवी पाटी मिळायची असा तो काळ होता. पैसा मर्यादित होता. होता तो पैसा अत्यंत जपून वापरून निगुतीने आयुष्य जगण्याची मानसिकता होती. वस्तूंवर वारंवार पैसे खर्च करण्याची, मनात आले की भारंभार वस्तू खरेदी करण्याची पद्धत नव्हती.
अशा काळात शाळेतून परत येताना ठेच लागून पडल्यावर सोबत पाटीही पडते आणि फुटते. हे तर मोठे आक्रित घडते. मुलांनी धडपडणे हे चालायचेच, कारण त्या काळी मुले मैदानावर खेळायला जात असत. सगळ्यांच्या गुडघ्यांना, कोपरांना जखमा असायच्या. खरचटल्याच्या खुणा असायच्या. ते लागलेले तर आईला सांगितले पण जायचे नाही. पण आता स्वतः पडण्यासोबतच पाटीदेखील फुटली. मग काय करणार? सांगायला तर लागणारच. कारण उद्या शाळेत पाटी नाही नेली तर बाई ओरडणार. म्हणून मग नाईलाजानेच आपण पडल्याचे आणि सोबतच पाटीदेखील पडून फुटल्याचे आईला सांगितलेले आहे.
आवाज थोडा रडवेला झाला आहे खरा पण संगीत मात्र करुण नाही. लहान मुलांची मनस्थिती अगदी अचूक दाखवणारी अशी ही स्थिती आहे. थोड्या काळासाठी नाराजी असली तरी आयुष्याचा आनंद अगदी पुरेपूर त्यांच्या मनात भरलेला असतो. उडत्या चालीची आनंदी सुरावट ऐकली की दुडक्या चालीने चालणारी, मधेच धावणारी, उड्या मारणारी, शाळेतून घरी येणारी मुले डोळ्यांसमोर येतात.
आता पाटी फुटली कळल्यावर आई नाराज तर होणारच. त्यावेळी बालमानसशास्त्र नावाची गोष्ट पालकांच्या खिजगणतीत नसायची. ‘छडी लागे छम छम विद्या येई घमघम’ हे केवळ शाळेपुरतेच नसायचे तर घरी देखील मुलांना वळणात ठेवायचा एकमेव मार्ग म्हणून मारण्याकडे पाहिले जायचे. मुलांना मारु नये, मुलांना मारले की त्यांना मानसिक धक्का बसतो असे पालकांना अजिबात म्हणजे अजिबातच वाटायचे नाही. तर मग आता पाटी फुटल्यावर आई नक्की मारणार. मग काय देणार? तर धम्मक लाडू आणि चापट पोळी. धम्मक लाडू म्हणजे हाताची मूठ करून पाठीत दिलेला बुक्का आणि चापट पोळी म्हणजे बोटे सरळ आणि एकत्र ठेवून बोटानी मारलेली चापटी. आता शाळेतून आल्यावर बाळाला भूक लागली म्हणून आई खायला देणारच. पण त्याच्या आधी आपण पाटी फुटली हे सांगितले म्हणून मग ती धम्मकलाडू किंवा चापट पोळी तर देणार नाही ना? अशी शक्यता वाटल्यावर बाळच आईला सांगत आहे की धम्मक लाडू, चापट पोळी नकोच देऊस. मग काय दे? तर गोळी दे, चकली दे! काय नको देऊ हे सांगताना आपल्याला काय आवडीचा खाऊ हवाय हे पण मुलगी आईला सांगून टाकते.
पुढच्या ओळीत मला खूप भूक लागली आहे हे पण सांगते. बाळाला भूक लागली आहे कळल्यावर आईचे मन विरघळणार आणि शिक्षा करायची, मारायचे सगळे विसरुन ती खाऊ देणार हे नक्की. म्हणजे मुलांनी आईचे मानसशास्त्र नेमके जाणलेले असते. आताही आणि त्यावेळीही!
तिसऱ्या कडव्यात ‘मला पटांगणावर खेळायला जाऊ दे’ हे देखील ती लगेच सांगते. पन्नास किंवा साठच्या दशकातील हे गीत असावे.त्या काळी संध्याकाळी मुलांनी पटांगणावर खेळायला जायची पद्धत होती. पहिली गोष्ट म्हणजे घराच्या जवळ पटांगण असायचे. मोकळी मैदाने असायची. सगळी जागा रस्त्याने किंवा इमारतींनी भरलेली नसायची. दुसरी गोष्ट म्हणजे शाळा सुटल्यावर मुलांना कोणते क्लासेस नसायचे. त्यामुळे मुलांना खेळायला मोकळा वेळ असायचा. या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाच ओळीत समजतात आणि तिसरी आणखी एक गोष्ट म्हणजे समजा आईने मारले नाही तरी त्यापेक्षाही वाईट शिक्षाही ती करू शकते. ती वाईट शिक्षा म्हणजे- ‘आज पटांगणावर खेळायला जायचं नाहीस. पाटी फोडलीस ना? मग तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे.’ शिक्षेची ही शक्यता लक्षात आल्यावर लगेचच, ‘मला पटांगणावर खेळायला जाऊ दे’ असं सांगून मुलगी मोकळी होते. तिथे माझे सोबती वाट पाहत आहेत असेही सांगते. म्हणजे फक्त मैत्रिणी नव्हे तर मैत्रिणी आणि मित्र दोघेही वाट पाहत आहेत.
हे गाणे ऐकताना अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात. हे गाणे म्हणणारी मुलगी आहे. म्हणजे स्त्री शिक्षण सर्रास झालेले आहे. सगळ्या मुली शिकत आहेत. नुसत्या शिकत नाहीयेत तर मैदानावर खेळायला देखील जात आहेत. तिथे मुले मुली एकत्र खेळत आहेत. केवळ मुलींच्या शाळा किंवा केवळ मुलांच्या शाळा असे न राहता सहशिक्षण सुरु झालेले आहे. आई विषयी मनात धाक आहे. तिचे आपल्यावर खूप खूप प्रेम आहे याची खात्री आहे. आपण काय म्हटले किंवा केले की ती राग विसरणार आहे, तिचे मन विरघळणार आहे याची स्पष्ट जाणीव आहे. आपल्या हातून चूक घडली आहे तर त्यासाठी शिक्षा मिळणार असा संशयवजा खात्री, मग ती शिक्षा कमीत कमी कशी असेल याचा प्रयत्न, असे सगळे सगळे आपल्याला या गाण्यात दिसते.
ह्या गीताचे कवी आहेत योगेश्वर अभ्यंकर. विजयपताका श्रीरामाची, नंदाघरी नंदनवन फुलले, अजिंक्य भारत अजिंक्य जनता, गवळणीनो जाऊ नका बाजारी , राधिका हरी भजनी रंगली ही व अशी अनेक अविट गोडीची गीते योगेश्वर अभ्यंकर यांनी लिहिली. अत्यंत सोपे प्रासादिक अर्थपूर्ण शब्द, रचनेतील गेयता हे त्यांचे वैशिष्ट्य.
नको ताई रुसू, या चिमण्यांनो परत फिरा, सदैव सैनिका पुढेच जायचे, प्रीतीचा पारिजात फुलला अशी काही मोजकी पण रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलेली गाणी गाणाऱ्या कुंदा बोकील ह्यांनी’ शाळा सुटली’ हे गीत गायिले आहे. गायनाला असलेला शास्त्रीय संगीताचा पाया, लिहिलेल्या शब्दातील भावना गायनात दाखवणे आणि स्पष्ट उच्चार या सगळ्यामुळे त्यांची गाणी आकाशवाणी वर अतिशय गाजली.
पद्मभूषण श्रीनिवास खळे ह्यांच्या संगीताबद्दल तर म्या पामराने काय बोलावे? शेकडो मधुर गाणी त्यांनी आपल्या कारकिर्दीत रसिकांना दिली आहेत.
‘शाळा सुटली पाटी फुटली’ असा वाक्प्रचार प्रचलित आहे. कित्येकदा गरज संपली अशा चुकीच्या अर्थाने, पण तो उपयोगात आणला गेलेला आढळतो. ‘शाळा सुटली पाटी फुटली’ हे गीत मात्र ज्यांनी लहानपणी ऐकलेले आहे, त्यांच्या स्मरणात ते कायमचे जागा पटकावून बसले आहे.
वृंदा टिळक
No comments:
Post a Comment