ऋतुगंध वर्ष १८, अंक ३
प्रिय मराठीस,
हो…हो… मला माहिती आहेत ना पत्रलेखनाचे नियम! आता तू इतकी हजारो वर्षे जुनी म्हणून तुला शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष असे लिहावे की सतत माझी जिवलग राहिली आहेस म्हणून बरोबरीचे मानावे की माझ्या नंतरही तू अनेक वर्ष राहणार आहेस म्हणून आशीर्वाद लिहावे हे कळलेच नाही. त्यामुळे तीर्थरूप, चिरंजीव अशा कुठल्याही संबोधनात आणि मायन्यात न अडकता मी ‘प्रिय’ एवढेच लिहिले. तसाही हा एक शब्दच सगळे व्यापून उरतोच ना!
सध्या तर काय बाई, तुझी गडबड असेल! आधी भाषा संवर्धन पंधरवडा झाला, मग २१ फेब्रुवारीला ‘मातृभाषा दिन’ झाला, मग २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिवस’ झाला. सध्या तुझ्या भोवती चंदेरी सोनेरी प्रभावळ असेल. लखलखती भरजरी वस्त्रे लेऊन तू मिरवत असशील. व्यासपीठावर, टीव्हीच्या, मोबाईलच्या पडद्यावर, राज दरबारी आणि अगदी गावातल्या लहानशा शाळेत देखील सर्वत्र तुझाच बोलबाला असेल. खूप छान वाटतात हे दिवस. असे वाटते आत्ताच्या उत्सवाच्या निमित्ताने पटलेल्या तुझ्या महत्वाचे वलय समाज मनावर निरंतर राहावे. फेब्रुवारी महिना संपला की कसं वाटतं गं ग तुला? फार धावपळ असते ह्या महिन्यात. नंतर मग कसं सगळं निवांत होत असेल!
त्यामुळे माझे पत्र अगदी सावकाश, ही सगळी गडबड संपल्यावर वाच. तसेही पत्रात काही विशेष बातमी किंवा प्रश्न लिहीलेले नाहीत. पण तसे महत्वाचे काही लिहायचे असेल तरच पत्र लिहावे असे थोडेच थोडीच आहे? साधे, नुसते ख्यालीखुशालीचे पत्र आले तरी किती बरे वाटते! कुठेतरी, कोणीतरी माझी आठवण काढली असे वाटून जीव सुखावतो बघ. अर्थात हे आम्हां सामान्य माणसांचे झाले. तुझी सुखदुःखे काही आगळीवेगळीच असतील, नाही का?
तू माझ्यासाठी काय आहेस ते शब्दात कशाला सांगायचे? म्हणजे तसे सं शब्दात ते सांगताही येणार नाही म्हणा! सगळाच अवकाश शब्दात मावणारा कुठे असतो? अगदी भाषेचा झाला म्हणून काय झाले? ते तर ज्याचे त्याने समजून घ्यायचे असते ना. पण मला अगदी ठाम विश्वास वाटतो आहे की तुला अवश्य समजेल.
तुला माझ्यापासून वेगळे काढताच येणार नाही. अगदी मी पहिला शब्द उच्चारला तेव्हापासून तुझी सोबत अनुभवते आहे आणि मला खात्री आहे, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ती सोबत असेलच. माझे प्रेम, राग, काळजी, माया, संताप, सृजन, पूजन, वक्तृत्व, लेखन सगळे सगळे तुझ्यातून आणि तुझ्यामुळेच तर असते!
तुझं माझं नातं बदललं नसलं तरी किती बदलले नाही दिवस? तुला माहिती आहे तू पण नव्या नव्या रूपात आमच्या समोर येते आहेस. जुन्या पुस्तकातील तुझे रूप आणि आत्ताचे वर्तमानपत्रातील, समाज माध्यमांवरचे तुझे रूप ह्यात किती फरक आहे! पण बदल हाच निसर्गाचा नियम आहे हे ठाऊक आहे मला आणि त्यामुळेच तुझ्यात येणाऱ्या सगळ्या शब्दांना आपल्या प्रवाहात सामावून घेऊन तू निरंतर वाहत राहणार आहेस याचा देखील विश्वास आहे मला. तुझ्या प्रवाहाला जिवंत आणि खळाळते ठेवणारे बोलीभाषांचे झरे देखील किती मोलाचे! माझ्या मराठमोळ्या संस्कृतीचा आधार असणारा अखंड स्रोत आहेस तू.
नेहमीची तू तर सवयीची असतेस. पण तंजावूरला गेले होते तिथे तू किती वेगळी दिसलीस? अंबेजोगाईला आद्यकवी मुकुंद राजांची समाधी पाहताना, त्या वेळच्या तुझ्या कोवळ्या रूपाची कल्पना करूनच थरारून गेले होते मी. त्यानंतर ज्ञानेश्वरांनी तुला कसं लखलखीत रूपात सामोरे आणले! आणि लडिवाळ रूपात सुद्धा. ते उकार दिलेले शब्द किती गोड वाटले म्हणून सांगू! विठ्ठलु, वेडू आणि असेच कितीतरी शब्द, लडिवाळ, वेल्हाळ. पण तीच तू शिवथरघळीजवळ वेगळीच दिसतेस गं ग. अगदी खणखणीत. सत्राणें उड्डाणे म्हणत काही ठणकावून सांगणारी. राष्ट्राला त्या त्या वेळी जशी आवश्यकता होती तशी तू बदलत राहिलीस.
सगळ्याच संतांचे आमच्यावर अगणित उपकार आहेत. अभंगाच्या रूपातून त्यांनी तुझा प्रवाह वाहत ठेवला. शिवबाच्या मावळ्यांनी तुला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून गुंजत ठेवले. शाहिरांनी, लोककवींनी तुला मनामनात गाजत ठेवले. जात्यावरच्या ओव्यानी तू माजघरात नांदलीस. भूपाळीच्या, काकडारतीच्या सुरात मंदिरात तेवलीस.
त्या नंतर मग तुझं इतिहासकालीन रूप फारसी उर्दू अरबी शब्दांना सामावून घेत राहिले.आताही बघ ना, तारीख आणि नक्की किती सहज म्हणतो आम्ही! कितीतरी शब्द इतके रुळले आहेत की ते मराठी शब्द नाहीत हे आमच्या ध्यानात सुद्धा येत नाही. म्हणजे तसा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रयत्न केला. तुझ्या प्रवाहातले बाकी सगळे बाजूला करून पाणी शुद्ध करायचा! पण ते एकटे किती पुरे पडणार? जोपर्यंत आम्ही सगळेजण मनावर घेणार नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार.
आणि मुख्य म्हणजे संस्कृती पण बदलली. हो ना? आता हेच बघ ना. माझ्या लहानपणी आई सांगायची, “पाट पाणी घ्या.” कारण तेव्हा आम्ही खाली पाटावर जेवायला बसायचो. नंतर मग मी मुलांना सांगायला लागले, “पानं घ्या.” म्हणजे काय की टेबलवर ताटं, वाट्या, भांडी, पाणी सगळे मांडा. मग हळू हळू कोणी त्याला ‘टेबल लावा’ म्हणायला लागले. आता तर प्लेटमध्ये आपापले वाढून घेऊन एकतर टीव्ही समोर जेवायला बसायचे असते किंवा आपापल्या खोलीत प्लेट घेऊन जायचे असते. मग ‘पाट पाणी घेणं, पानं घेणं’ हे शब्द नाहीसेच होणार ना!
घराचे अंगण नाहीसे झाले, परसदारीचे आड नाहीसे झाले, चुली गेल्या, वैल गेले तसे फुंकण्याही नाहीशा नाहीश्या झाल्या. बैलगाड्या गेल्या तसे कासरेही गेले, शिंगांचे बेगड गेले. जग बदलणार, वस्तू बदलणार, प्रयोजन बदलणार तसे ते शब्दही जाणारच ना?
पण बदलत्या काळासोबत नवे शब्दही आले. संगणक, आंतरजाल, समाज माध्यमे हे आणि असे कितीतरी शब्द तू स्वीकारलेस. तू जितकी पुरातन तितकीच नित्य नूतनही राहिलीस. अभिजात तर तू होतीसच, आता त्याला शासन दरबारी दर्जा देखील मिळाला.
लिहायची भाषा म्हणशील तर ते आणखीन एक वेगळेच प्रकरण! आता तुला माहितीये का, पेन पेन्सिलने लिहिणे इतिहासजमाच झालंय! मी देखील नाही का आत्ता तुला कीबोर्ड वरूनच पत्र लिहिते आहे! पण असे तर पूर्वी टाक आणि दौत वापरायची बंद झाली तेव्हाही वाटले असेल.
आता वेगळे आहे ते हे की खूप जण वेळ लागतो या नावाखाली देवनागरी लिपीत लिहीतच नाहीत. रोमन मुळाक्षरे वापरून मराठी लिहितात. अगदी स्वतः तू जरी ते वाचायचे म्हणालीस तरी गोंधळून जाशील असे नव साहित्य निर्माण होते त्यातून! आता काय म्हणावं यांना? बरं, एरवी मराठी आमची मातृभाषा म्हणत अभिमानाने मिरवतात. पण मग देवनागरीत का लिहीत नाहीत म्हणते मी? मला तर भय वाटते की आंतरजालावर वापर होत नाही म्हणून देवनागरी हळूहळू बिनकामाची आणि म्हणून अस्तंगत नाही का होणार? माझे पण बहुतेक वय झालंय बर का! पाहिलंस ना किती तक्रारी केल्या मी लागोपाठ?
पण सगळंच चित्र काही इतकं वाईट नाहीये बरं का! मी पाहते ना, अगदी लहान लहान मुलं देखील चांगल्या मराठीत भाषण करतात. आवर्जून त्यांचे आई-वडील त्यांना मराठी गोष्टी सांगतात, मराठी गोष्टी वाचून दाखवतात. मग असं असताना आपण चिंता ती कशाची करायची? उज्ज्वल उज्वल आहे ग भविष्य तुझे. नाही मला त्याची काळजी.
आता हेच बघ ना सिंगापूरला महाराष्ट्र मंडळात मराठी शाळा चालते. लहान मुलांचे लेख मराठी मासिकात असतात, मराठी कार्यक्रम होतात. आणि असंच सगळ्या देशात काही ना काही चालू आहे.आपली माणसं महाराष्ट्रातून बाहेर गेली ना तरी त्यांच्यातून मराठी मात्र बाहेर जात नाही हेच खरं. नाही का?
चल,खूप लांबलं गं पत्र. तुझ्याशी बोलायला लागलं ना की वेळेचे भानच राहत नाही बघ! काळजी घे. असेच संपर्कात राहूच नेहमी. आणि हो, तू अशीच रहा कायम, शतसुर्यांचे तेज घेऊन लखलखत. पुढच्या अनेक शतकांना जोपासत जोपासत!
तुझीच,
वृंदा
No comments:
Post a Comment