Friday, 13 June 2025

गंतव्य

माझ्या भाचीने ऑगस्टमध्ये मला रेन लिली च्या बिया दिल्या होत्या. मी लगेच कुंडीत लावल्या. त्या रुजल्या चांगल्या. पाने यायला सुरुवात झाली.
अनेक वर्षांनी घरात रेन लिली आली होती. मी उत्सुकतेने पावसाची वाट पाहू लागले. ह्या वर्षी मे मध्येच पाऊस येऊ लागला खरा, पण आमच्या रेन लिलीच्या काही तो मनास आला नाही.
झाडांकडे पाहूनच नेहमी माझ्या दिवसाची सुरुवात होते. त्यात ही कुंडी तर अगदी येता जाता दिसेल अशा ठिकाणी.
जून उजाडला. अचानक चार दिवसांपूर्वी एक काडी वर आली.. मी आता फुल येणार ह्या उत्सुकतेने दिवसातून तीनदा जाऊन पाहू लागले. त्याच्या आकारावरून मनात थोडा संशय येत होताच. पण काल सकाळी नक्की झाले की त्या बिया आहेत.
पण म्हणजे फुल आले होते आणि दिसलेच नाही?? असे कसे? फुल आले त्या दिवशी एक पूर्ण दिवस मी झाडाकडे पाहिलेच नाही असे झाले असेल? त्या आधी दोन दिवस तर कळी पण असेल..ती देखील दिसू नये???
असे होणे खरे तर अशक्यच वाटते मला..तरी पण आता डायरेक्ट बियाच दिसतायत म्हणजे तसे झाले होते हे मानायलाच हवे. अक्षम्य दुर्लक्ष होते हे. मनात अपराधीपणाची भावना दाटून आली.
मला कळलेच नाही, कोणत्या रंगाचे फुल येते, मला पहिले वहिले फुल पाहायला मिळाले नाही.. ही हळहळ होतीच. त्यापेक्षा इतके ते फुल आले आणि त्याचे काही कोडकौतुकच करता आले नाही ही खंत जास्त होती.
एरवी कळी, फुल दिसले असते तर थोड्या थोड्या वेळाने कुंडीपाशी जात मी त्याचे लाड केले असते. गप्पा मारल्या असत्या. फोटो काढले असते..ह्यातले काहीच त्या फुलाच्या वाट्याला आले नाही. रानावनात येऊन जावे तसे ते येऊन गेले. कोणीच त्याची दखल घेतली नाही.
फळ होणे हेच गंतव्य असेल तरी मधल्या प्रत्येक अवस्थेचा आनंद घेता यायला पाहिजे ना..फळ होणे हेच प्रयोजन असेल तरी कळीचे, फुलाचेही अस्तित्व महत्वाचे असतेच ना.. काल सकाळभर हेच आणि असेच सगळे मनात घोळत होते.
दुपारी विमान अपघाताची बातमी आली.. अजूनही काही सुचत नाहीये. . किती आयुष्ये खुडली गेली. किती स्वप्ने, किती आकांक्षा, किती कहाण्या अवेळीच मालवल्या.
ज्या क्षणी आपण जन्माला येतो त्या क्षणी मृत्यू निश्चित असतो हे जरी खरे असेल तरी मधले आयुष्य तर जगता यायला हवे ना.. सेल्फी मधल्या त्या तीन निरागस मुलांचे चेहरे डोळ्यांपुढून हलत नाहीयेत.
ज्या मेसवर विमान पडले तिथे कितीतरी तरुण डॉक्टर्स होते. त्यांच्या पालकांची किती मदार असेल त्यांच्यावर. ती तरुण मुले तर प्रवास देखील करत नव्हती. काळ आला की त्या पुढे कोणाचेच चालत नाही हेच खरे. मृत्यूच्या तऱ्हा तरी किती अतर्क्य.
सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।











No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...