"हुक्कुस बुक्कुस तेलव्यान शुक्कुस … हुक्कुस बुक्कुस तेलव्यान शुक्कुस "
हुक्कुस बुक्कुसच्या तालावर बर्फावरून उड्या मारायला किती मजा येते आहे!! असे तर मी दररोज देखील येऊ शकतो, सरपोशच्या मनात आले.
आज त्याचे बाबा डॉक्टरकडे गेले होते. त्यांना जाऊन यायला आता कमीतकमी २/३ दिवस तरी लागणार होते. तोपर्यंत मेंढ्याना चरायला घेऊन येण्याची जबाबदारी सरपोशवर आली होती. "आपण खूप मोठे झालो आहोत आता!" खुश होऊन सरपोश पुन्हा उड्या मारू लागला.
मे महिना आला होता तरी यावर्षी अजून बर्फ कमी झाला नव्हता. डोंगर शिखरावर तर बर्फ कायम असतोच पण इथे तळाशी, घळीच्या जवळ देखील अजून बर्फ होताच. त्या बर्फाच्या अधून मधून डोकावणारी हिरवळ शोधत शोधत मेंढ्या चरत होत्या.
इतक्यात सरपोशच्या लक्षात आले की सकीना कुठे दिसत नाहीये. ‘सकीना ऐ सकीना, किधर गई तू?’ हाका मारत तो तिला शोधू लागला. अतिशय अवखळ होती ती. आईने येताना चारदा सांगितले होते, तिच्याकडे नीट लक्ष ठेव. पण गाण्याच्या तालावर बर्फावर उड्या मारायच्या नादात सरपोशचे लक्ष तिच्यावरून ढळले. तेवढ्यात ती गायब झाली.
सकीना सापडली नाही तर आई आणि बाबा दोघेही ओरडणार, तेव्हा तिला शोधायला हवेच होते आणि तसेही तीच तर होती सरपोशची सर्वात जवळची आणि एकमेव मैत्रीण.
द्रासजवळचे त्यांचे गाव अवघे पंधरा-वीस घरांचे. त्यात सरपोशच्या वयाचे तर कोणीच नव्हते. त्यामुळे सरपोशशी खेळायला त्यांच्या मेंढ्यांच्या पिल्लांशिवाय दुसरे कोणीच नव्हते.
सरपोश सकीनाला शोधू लागला. कुठे गेली असेल ती?थोडे चढावर जाऊन सरपोशने पाहिले तर वरच्या बाजूला दूर अंतरावर सकीना दिसत होती. तिथे मध्येच एका घळीत मोठा हिरव्या गवताच्या पुंजका होता, तिथे ती चरत होती. त्याच्यावरही सरपोशला आणखी एक गवताचा पुंजका दिसला. त्याच्या लक्षात आले की जर का आता आपण सकीनाला धरून आणले नाही तर ती आणखी वर जाऊ शकेल.
सरपोश काटक होता, चपळ होता पण तरी तो चढ चढताना त्याला दम लागला. अखेर एकदाचे सकीनाला त्याने धरले आणि आता तो मागे वळणार इतक्यात डोळ्यांच्या कोपऱ्यातून अनपेक्षितपणे त्याला एक मानवी आकृती दिसली. या भागात तर कधीच माणसे दिसत नाहीत? हे कोण असेल? सरपोश घाबरला.
सकीनाला घेऊन पटकन एका उंचवट्या मागे लपून त्याने पाहिले तर तिथे शिखरावर आणखीही दोन/ तीन माणसे दिसत होती. त्यांचे चेहरे पूर्ण झाकलेले असल्याने ती कोण आहेत ते कळत नव्हते. पण त्यांच्या खांद्यावरच्या बंदुका मात्र इतक्या लांबूनही सरपोशच्या लक्षात आल्या.
दबक्या पावलांनी सरपोश सकीनाला घेऊन खाली उतरला व जरी अजून संध्याकाळ झालेली नव्हती तरी सगळ्या मेंढ्यांना गोळा करून घरी परतला.
आईला खूपच आश्चर्य वाटले. इतक्या लवकर कसा काय आला? तू ठीक तो है?कुछ हुआ क्या? भूक लगी क्या? आईने त्याच्यावर प्रश्नांची बरसात केली.
गोरापान सरपोश घाईने आल्यामुळे लालबुंद झाला होता. त्याने आईला कशी सकीना वर गेली आणि मग तिकडे कशी माणसे दिसली ते सांगितले. आई देखील खूप आश्चर्यचकित तर झालीच पण तितक्यात तिच्या मनात जो विचार आला त्याने थोडी घाबरली पण.
“ हाय .. हाय .. ये तो बताना पडेगा” असे म्हणून तिने सरपोशला खायला दिले. सर्व मेंढ्या त्यांच्या जागेत बंद करून ठेवल्या आणि धावत ती खालच्या बाजूला असलेल्या भारतीय लष्करी तळाकडे धावत निघाली. अंधार व्हायच्या आत तिला परत घरी यायचे होते. एक टेकडी उतरून दुसरी चढून परत ती उतरल्यावर मग कुठे ती भारतीय लष्करी तळावर पोहोचली आणि सरपोशला चार बंदूकधारी दिसल्याची बातमी तिने तिथल्या ऑफिसरला सांगितली.
तिला माहितीच नव्हते की भारतासाठी तिने तेवढी मोठी कामगिरी बजावली होती.
—-----------------------
कारगिल भागात पाकिस्तानी घुसखोर असल्याची बातमी मेंढपाळांकडून भारतीय लष्कराला समजली होती. तिथे अतिशय दुर्गम भागात लहान लहान गावे आहेत. ह्या तथ्यांवर आधारित काल्पनिक कथा.
--------------------------------
कारगिल युध्द स्मारक - ओपरेशन विजय स्मृतीस्थल
No comments:
Post a Comment