Monday, 9 June 2025

शब्द नोहे जाणा विचारांचे वस्त्र

 ऋतुगंध शरद - वर्ष १८- अंक २ 

शब्द नोहे जाणा विचारांचे वस्त्र

 “मनातील विचार शब्दांचे अवगुंठन घेऊन जनात प्रगट होतात हे जर का खरे असेल तर मग शब्द म्हणजे विचारांचे वस्त्र हे देखील खरे मानायला हवे.” असे वाक्य सुप्रसिद्ध संत सखाराम गटणे म्हणाले आहेत की नाही माहिती नाही, पण ऋतुगंधच्या संपादकांनी ‘वस्त्र’ ह्या विषयावर लिहायला सांगितल्यावर हे वाक्य मनात आले खरे. तोच विचार मग सतत मनात रेंगाळत राहिला. त्या शब्दांना गुंफून लिहिलेले लेख, कविता ऋतुगंधमध्ये प्रकाशित होणे म्हणजे जणू आपल्या विचारांसाठी डिझाईन केलेले कपडे मिरवण्याचा एक फॅशन शो म्हणायला हवा. फॅशन शोमधील कपड्यांप्रमाणे ऋतुगंधमध्येही सगळे साहित्य आपापल्या परीने चांगलेच असते. पण त्यातही काही साहित्य शो स्टॉपरसारखे नेहमी लक्षात राहील असे असते हे ही खरे! म्हणूनच मग वाटले की आपल्या मनातील विचारांचे वस्त्र ह्या फॅशन शो मध्ये प्रस्तुत करण्याच्या अनुभवाविषयी लिहावे.

तर सुरुवात करते काही वर्षांपूर्वी मला सिंगापूरमध्येच भेटलेल्या आणि मराठीतून असलेला ऋतुगंध वाचणाऱ्या एका तरुण मराठी मुलीच्या अनुभवापासून. त्या वेळी मी लेखक, कवी, संपादक अशा अनेक नात्यांनी ऋतुगंधशी जोडलेली होते. हे कळल्यावर तिने विचारले, “तुम्हाला तुमच्या लेखनाविषयी खूSSSप इमेल्स येत असतील ना?” मला खरे उत्तर देऊन तिच्या उत्साहावर पाणी टाकणे जीवावर आले. मग मी ‘नरो वा कुंजरो वा’ पध्दतीने काहीतरी गुळमुळीत उत्तर दिले. असे उत्तर देण्यामागे ‘झाकली मूठ ठेवणे’ असा उद्देश नसून तिचा उत्साह तसाच रहावा, तिलाही पुढे कधीतरी ऋतुगंध मध्ये लिहायची इच्छा व्हावी हा उदात्त हेतू होता; हे वाचकांनी कृपया लक्षात घ्यावे!

ऋतुगंधमध्ये लिहू पाहणाऱ्या नवोदित लेखकांना खूप अप्रूप वाटत असते. स्वतःच्या मनातले विचार छापील स्वरूपात पहाणे, ते अनेकांपर्यंत पोहोचणे हे विशेष वाटत असते. मग त्यानंतर ते लोकांना आवडते की नाही, त्यावर अनुकूल प्रतिक्रिया येतील की प्रतिकूल, खूप इमेल्स आल्या तर त्यांना उत्तर द्यायला वेळ पुरेल की नाही? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात पिंगा घालत रहातात. लिखाण सुरु करायच्या आधी अशा शंका कोणी विचारल्या तर आपण त्यांना धीर द्यायचा असतो. त्यांना तेव्हा एवढेच म्हणायचे असते, “होईल गं किंवा होईल रे सगळे व्यवस्थित. जमेल तुला सगळे नीट.”

खरोखरीच फार चांगले साहित्य मिळते ऋतुगंधसाठी. खूप मनापासून, अभ्यासपूर्वक लिहिलेले असते. विषयांचे वैविध्य असते. लेखनशैलीतील गुणवत्ता जपण्याचा प्रयत्न असतो. असे सगळे साहित्य एकत्रितरीत्या ऋतुगंध मध्ये महाराष्ट्र मंडळाच्या संस्थळावर प्रकाशित झालेले पहाणे हा फार समृद्ध करणारा अनुभव असतो. इतके दिवस घेतलेले कष्ट सत्कारणी लागले अशी लेखकांची, संपादक मंडळाची भावना असते. मन तृप्त झालेले असते.

संस्थळावरचा अंक डोळे भरून पाहून झाल्यावर मग लेखक,संपादक आता प्रतिक्रियांचा धबधबा कोसळणार म्हणून सरसावून बसतात. काहीजण दिवसातला ठराविक वेळ ह्या प्रतिक्रियांची उत्तरे द्यायला राखून ठेवायचा असे वेळापत्रकच आखून ठेवतात. मजकूराची जुळवाजुळव करून ठेवतात. कारण उघड असते. शेवटी प्रत्येक जण आपापले करियर सांभाळून, नोकरी वा उद्योग करीत ह्या लष्कराच्या भाकर्‍या भाजत असतो…च्च.च्च..च्च..म्हणजे हा ऋतुगंधसाठीचा लेखन-प्रपंच करत असतो ना! तेव्हा उपलब्ध असलेल्या मर्यादित वेळाचे नियोजन करायलाच लागते. तर एकूण लेखक-कवी-संपादक आघाडीवर अशी जोरदार तयारी झालेली असते.

पण ऋतुगंध वाचणारे सगळे आपलेच लोक असतात हो!! लेखकांविषयी त्यांच्या मनात अपार आपुलकी असते. लेखकांना बाकीचीही अनेक कामे आहेत, ह्याची त्यांना जाण असते. उगीच आपण लेखकाला लेखन वाचले, आवडले, खटकले, पटले इत्यादी सांगणारी ई-मेल पाठवणार, मग लेखकाला उत्तर देण्यात वेळ खर्च करावा लागणार ह्याचे भान असते. असा त्रास लेखकांना होऊ नये म्हणूनच केवळ ते ऋतुगंधमधल्या लेखनाविषयी चकार शब्द उच्चारत नाहीत. असा समजूतदारपणा केवळ आपल्या कल्याणाची तळमळ असलेल्या लोकांमध्येच दिसू शकतो, बरं का!! तर अशा पध्दतीने जेहत्ते काळाचे ठायी, श्री सिंगापूर क्षेत्रामध्ये ऋतुगंध प्रकाशित झाल्यावर सर्वत्र घनघोर शांतता प्रस्थापित झालेली असते.

नवोदित लेखक उत्सुकतेने प्रतिक्रियांची वाट पाहतो-पाहतो आणि कंटाळून जातो, हिरमुसतो. कोणी वाचणारच नसेल तर लिहायचे कशाला असा प्रश्न त्याला पडायला लागतो. शेवटी असे पहा, की केलेल्या कामाची कणमात्र दखल घेतली न जाण्याची सवय असायला तिथे मुरलेली गृहिणीच हवी. तिला कसे वर्षानुवर्षे दखल घेतली न जाता, काहीही कौतुक न होता काम करत राहण्याची सवय असतेच. बाकीच्यांना कसे जमायचे हे? मग खंतावलेले लेखक आता आम्ही नाही लिहिणार ऋतुगंधसाठी, असे म्हणायला लागतात. त्यांचे लेखन खूप चांगले असते. अशा दर्जेदार लेखनाची ऋतुगंधला आस असते. त्यामुळे असे लेखक गमावणे ऋतुगंधला परवडणारे नसते. संपादक मग त्यांना चार समजुतीचे शब्द सांगतात आणि लिहिते राहण्यासाठी प्रवृत्त करतात.

पण मी म्हणते की अशी समजूत काढायची वेळ यावीच का? लेखकांनी असे का बरे कष्टी व्हावे? निष्काम कर्मयोग आचरणात कसा आणावा, हे आपले वाचक त्याना अगदी फुकटात शिकवत आहेत, ह्याविषयी लेखकांच्या मनात अपार कृतज्ञताच नको का? आपण आपले विहित कर्म करावे, श्रेयाची अपेक्षा करू नये ही गीतेतील शिकवण काय फक्त पुस्तकातच राहणार का? साहित्य हे जीवनाचा भाग असावे असे (बहुतेक) संत सखाराम गटणे सांगून गेले आहेत ना? मग गीतेतील ही शिकवण देखील प्रत्यक्ष जीवनात उतरवता यायला नको का?

काही लेखक मग आपापल्या फेसबुक वॉलवर लिंक देतात. असे केल्याने तरी लोक आपले लेखन वाचतील अशी आशा त्यांना वाटत असते. पण वाचक लेखकांपेक्षाही हुशार असतात. ते लेख न वाचता, ‘हार्दिक अभिनंदन’ असे मेसेजेस पाठवून मोकळे होतात!

माझ्यावर मात्र वाचकांच्या अजिबात काहीही प्रतिक्रियाच न येण्याचा प्रसंग येत नाही. अनेक वर्षे सातत्याने आणि चिकाटीने (!!) ऋतुगंधमध्ये लिहित राहिल्याने, मी दिसल्यावर लोक “ऋतुगंध वाचला, छान आहे” एवढे तरी सांगतातच सांगतात. मी पण ”हो ना!” म्हणत खुश होते. अगदी सुरुवातीला मी ‘हा लेख वाचला का, तो वाचला का’ असे विचारायची. उत्तर यायचे, “नाही तो नाही, पण बाकी सगळे वाचलेय.” अर्थात असे जवळपास सगळ्या लेखांविषयी व्हायचे हे वेगळे सांगायला नकोच!! पण आता मी अनुभवाने शहाणी झाले आहे. आता मी मला आवडलेल्या वा आवर्जून वाचलेच जावेत अशा ऋतुगंधमधल्या लेखांचे कौतुक करत सुटते. मग सहनशक्तीची मर्यादा संपली की अर्थातच समोरचा माणूस “थांबा आलोच” म्हणत गर्दीत हरवून जातो!!!

तर असे सगळे हितचिंतक, निष्काम कर्मयोग प्रत्यक्ष आचरणात कसा आणावा हे शिकवणारे गुरु आपल्या आसपास असताना, सगळेच काही अगदी नंदनवन नसते बरं का! त्यातच काही हितशत्रू देखील लपलेले असतात. अत्यंत सजग रहावे लागते. स्वत:ला सांभाळावे लागते. पूर्वी एकदा मी ऋतुगंधच्या एका अंकात सिंगापूरमध्ये मला भेटलेल्या फुलांविषयी एक लेख लिहिला होता. आता मी म्हणते, कोणी तो लेख पूर्ण वाचावाच कशाला? शीर्षक पहावे, लेखकाचे नाव पहावे आणि सोडून द्यावे ना. पण ऋतुगंधमधील लेख पूर्ण वाचणारे देखील लोक असतात म्हणजे बघा आता. कमालच झाली की नाही?? आता विचाराल की लेख पूर्ण वाचला हे मला कसे कळले तर त्याचे उत्तर असे- त्या लेखात मी शेवटी शेवटी असे काहीसे वाक्य लिहिले होते की ‘अजून प्राजक्त मात्र सिंगापूरात मला कुठे भेटला दिसला नाही.’ तर चक्क आली मला एक ई-मेल की ‘सिलोन रोडवरील गणपती मंदिरात आहे प्राजक्त म्हणून.’

आता मला सांगा, लेखनाची दखल घेऊन, अशा मेल पाठवून, लेखकांच्या सवयी बिघडवणाऱ्या वाचकांना हितशत्रूच म्हणायचे, नाहीतर काय? निष्काम कर्मयोग आचरणात आणून होणारी लेखकांची अध्यात्मिक उन्नती त्यांना पाहवली नसणार, दुसरे काय? समाजात असे प्रगतीच्या आड येणारे लोक असायचेच, असो. हे परमउदारा, भक्तवत्सला, करुणानिधी परमेश्वरा, ऋतुगंधच्या लेखकांचे अशा हितशत्रूंपासून रक्षण कर रे बाबा. तुलाच आता त्यांची काळजी!

तर अशा रीतीने ह्या डिझायनर वस्त्रांच्या फॅशन शोची साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!

शब्द नोहे जाणा, विचारांचे वस्त्र

दुधारी हे शस्त्र, असते हो।

शब्दांना गुंफूनि, लिहा तुम्ही लेख

वाचका सम्मुख, ठेवोनिया।

जरी सत्य असे, गोडही असावे

मनात रुचावे, वाचकांच्या।

प्रतिक्रिया त्यांची, येवो वा न येवो

कर्मयोग राहो,अंतरात!

– वृंदा टिळक

No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...