प्रेरणाकेंद्र – विवेकानंद शिला स्मारक, कन्याकुमारी
किनाऱ्यापासून साधारण पाचशे मीटर अंतरावर भर समुद्रात उभे असलेले ते दोन भव्य खडक. सगळ्या बाजूनी उंच उंच लाटा त्यांच्यावर सतत आदळत असतात. संपूर्ण जगात ते दोन खडक प्रसिद्ध झाले ते तिथे बसून एका परिव्राजकाने केलेल्या चिंतनामुळे. हा योद्धा संन्यासी होता संपूर्ण जगाला भारतीय संस्कृती, हिंदू धर्म आणि विश्वबंधुत्वाची ओळख करून देणारे ‘स्वामी विवेकानंद’.
सर्व बाजूंनी असलेला विशाल सागर, माथ्यावरचे निळे आकाश आणि ह्यांच्याशी नाते सांगणारी, तेवढ्याच एका विशाल व्यक्तिमत्वाचे स्मारक असणारी भव्य, सुंदर वास्तू – विवेकानंद शिला स्मारक.
श्रीरामकृष्णांनी महासमाधी घेतल्यावर स्वामी विवेकानंद भारत परिक्रमेला निघाले. भारत मातेची मुले दरिद्री झाली आहेत, अज्ञानात खितपत पडली आहेत, असे दृश्य त्यांना दिसले आणि असे का? असा प्रश्न सतत त्यांच्या मनाला भेडसावू लागला. परिक्रमा करत असताना स्वामीजी भारत भूमीच्या दक्षिण टोकाला म्हणजे कन्याकुमारीला पोहोचले. देवीचे दर्शन झाल्यावर समुद्राने वेढलेल्या श्रीपाद शिलेकडे गेले. स्वामी विवेकानंदानी त्या शिलाखंडावर २५ ते २७ डिसेंबर १८९२ मध्ये तीन दिवस आणि तीन रात्री, भारताच्या प्रगतीसाठी, उर्जितावस्थेसाठी काय करायला हवे ह्याचे चिंतन केले.
कन्याकुमारीजवळचा तीन सागरांनी वेढलेला तो शिलाखंड किती भाग्यवान म्हणावा? कन्याकुमारीला तीन सागरांच्या संगमाच्या ठिकाणी श्रीपाद शिला आहे. भारतातील सर्वच नद्या ह्या सागरांना येऊन मिळालेल्या आहेत. कथा सांगते की इथे माता पार्वतीने वृक्षासनात सात वर्ष तप केले होते आणि त्यामुळे देवीचे पदचिन्ह इथे उमटलेले आहेत. अर्थात याच पदचिन्हांमुळे या शिलेला श्रीपाद शिला असे म्हटले जाते.जिथे पार्वती मातेने तप केले, त्याच ठिकाणी मला माझ्या जीवन ध्येयाची प्राप्ती होईल, शिवाची प्राप्ती होईल या विचाराने स्वामी विवेकानंदांनी तिथे तप केले होते. देशाचे स्वत्व आणि सामर्थ्य त्याला पुन्हा मिळावे हीच स्वामीजींची इच्छा होती. याच श्रीपाद शिलेवर कोट्यावधी बांधवांच्या मुक्तीचा मार्ग स्वामीजींना दिसला. याच श्रीपाद शिलेवर एका संन्याशाचे, एका महान समाजसुधारकामध्ये, श्रेष्ठ संघटकामध्ये रूपांतर झाले. नंतर शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत सहभागी होऊन स्वामीजींनी इतिहास घडवला. एका संन्याशाचे एका द्रष्ट्या विश्वगुरूत रूपांतर झालेले संपूर्ण विश्वाने पाहिले.
तसाच एक चमत्कार परत त्या शिलाखंडावर घडून आला १९७० मध्ये. तिथे भव्य विवेकानंद शिला स्मारक उभे राहिले. त्या उभारणीमागे होता कित्येक लोकांनी, कित्येक वर्षे, सतत दिवस रात्र घेतलेला स्मारकाचा ध्यास आणि त्यांना लाभलेले माननीय एकनाथजी रानडे ह्यांचे खंबीर, दूरदृष्टी असलेले कुशल नेतृत्व.अगदी नेमके सांगायचे तर स्मारक उभारणीला लागले दोन हजार एक्याऐंशी दिवस, सहा हजार टन पॉलीश केलेला ग्रॅनाईट, सात लाख त्र्याएंशी हजार सातशे सदुसष्ट तास. देशातील जनसामान्यांचा सहभाग असल्याने आणि पंथ, संप्रदाय, राजकीय पक्ष ह्या सर्व भेदांवर मात करत सर्व सहमतीने उभारलेले हे स्मारक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरले.
स्मारकाचा उदघाटन सोहळा पण खूपच विशेष होता. दोन सप्टेंबर एकोणीसशे सत्तर – भाद्रपद शुक्ल द्वितिया. भारतीय पंचांगाप्रमाणे स्वामी विवेकानंदानी शिकागोमध्ये केलेल्या भाषणाला त्या दिवशी ७७ वर्षे झाली होती. तोच दिवस विवेकानंद शिला स्मारकाचे उदघाट्न व राष्ट्रार्पण ह्या साठी निवडण्यात आला होता. रामकृष्ण मठाचे स्वामी विरेश्वरानंद, चिन्मय मिशनचे स्वामी चिन्मयानंद, तपोवनचे स्वामी चिदभवानंद, रामकृष्ण मिशनचे अनेक मान्यवर, भारताचे राष्ट्रपती श्री वराहगिरी वेंकटगिरी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री. एम. करुणानिधी, पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, श्री. मोरारजी देसाई, विजयाराजे शिंदे तसेच इतर अनेक लोकप्रतिनिधी, नेते, भारताच्या कानाकोपऱ्यातून येणारे लोक ह्यांनी विवेकानंद शिला स्मारकाला भेट दिली. हा उदघाट्न सोहळा चांगला दोन महिने चालला होता!
ह्या विवेकानंद शिला स्मारकाची रचना कशी आहे? तर सुरुवातीलाच आहे श्रीपाद मंडपम. मंडपाला तीन प्राकार आहेत. त्यातील पहिला प्राकार, म्हणजेच गर्भगृह चारी बाजूंनी भिंतींनी संरक्षित केलेला आहे. दुसऱ्या प्राकाराला २८ स्तंभ आहेत ज्याच्यावर छत विसावलेले आहे आणि तिसरा प्राकार खुला आहे. ग्रॅनाईट मध्ये बांधलेले हे वास्तुशिल्प आहे. हा श्रीपाद मंडपम भव्य आहेच. किती भव्य? तर ७१. १०* ७१.१० फूट इतका ह्याचा आकार आहे. इतकी भव्य रचना असून देखील, किनाऱ्यावर कुठेही उभे राहिले तरी मूळ स्मारकाचे दर्शन होत राहील, अशी काळजी घेतली गेली आहे. मंडपाच्या समोर मोकळी जागा आहे. त्या मोकळ्या जागेत मध्यभागी एक पुष्करिणी सारखी रचना आहे. आपण विवेकानंद शिला स्मारकाचे फोटो पाहिले तर ह्या दोन्हींच्या मध्ये असलेले अंतर लक्षात येईल. ह्या मोकळ्या आवारानंतर येतात ते दोन हत्ती. शांती, स्थैर्य आणि शक्तीचे प्रतीक असणारे हत्ती भारतीय मंदिरांच्या वास्तुशैलीत अनेकदा आपल्याला दिसतात. हे दोन हत्ती पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला उभे राहून आपले स्वागत करतात आणि नंतर येतात मुख्य मंडपात जाण्यासाठी पायऱ्या. पायऱ्या चढून वर आलो की आपण येतो ते सभामंडपात. ह्यालाच विवेकानंद मंडपम असेही म्हणतात. ह्या सभामंडपाला एकूण पाच शिखरे असून प्रवेशद्वाराजवळ असलेल्या दोन खोल्यांवर दोन लहान शिखरे आहेत. लाल ग्रॅनाईट मध्ये ही सर्व शिखरे बांधली गेली आहेत. निळसर ग्रॅनाईटच्या चौकटीतले भव्य अकरा फुटी प्रवेश द्वार आपल्याला सभामंडपात घेऊन जाते. ह्या दारावर भारतीय फुला-पानांची सुंदर वेलबुट्टी कोरलेली आहे. सभामंडपात आलो की त्याची भव्यता आपल्याला जाणवल्या वाचून राहत नाही. त्याचे आकारमान आहे अवघे १३० फूट * ५६ फूट!!
लाल ग्रॅनाईटच्या चौकोनी फरशा सभामंडपाची विशालता अधोरेखित करतात. सभामंडपात आठ स्तंभ आहेत. स्तंभांवरची नक्षी व कोरीव काम, छतावरची नक्षी हे सर्व पारंपरिक रचना तसेच आधुनिकता ह्यांचा अभिनव संगम आहे. सभागृहाच्या अनेक भव्य खिडक्या तसेच तीन प्रवेशद्वारे ह्यामुळे मोकळी हवा खेळत राहते व सभागृहात कितीही गर्दी झाली तरी गुदमरल्यासारखे होत नाही. सभागृहात आपल्याला श्री रामकृष्ण परमहंस तसेच माता शारदा देवी ह्यांच्या सुंदर प्रतिमा बघायला मिळतात.
सभामंडपात नंतर येतो प्रतिमा मंडप. ह्या मंडपाला विशेष अलंकृत केले आहे. बाकी सभामंडपाची उंची २० फूट आहे तर प्रतिमा मंडपाची उंची २५ फूट आहे. प्रतिमा मंडपातील चार स्तंभांच्यामध्ये प्रतिमेसाठी विशेष स्थान निर्माण करण्यात आले आहे. त्यालाच मुख मंडप असे देखील म्हटले जाते. ह्या खांबांवर तसेच मंडपाच्या वरच्या कमानींवर अतिशय सुंदर कोरीवकाम आहे. निळसर ग्रॅनाईटच्या छतावर कमळाची रचना कोरलेली आहे. ह्या इतक्या सगळ्या सुंदर रचनांमध्ये देखील मन, बुद्धी आणि आत्म्याला आकर्षित करून घेतो तो मध्यभागी असलेला स्वामी विवेकानंदांचा पुतळा.
पुतळ्याची उंची सात फूट चार इंच आहे तर त्या खालच्या चबुतऱ्याची उंची चार फूट आठ इंच आहे. हा पुतळा मुंबईच्या जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधील श्री. एन.एल.सोनावडेकर ह्यांनी बनवला आहे. स्वामी विवेकानंदांचा हा पुतळा येणाऱ्या लोकांना केवळ ध्यानधारणेची नव्हे तर कार्य करण्याची, क्रियाशील आणि गतिशील होण्याची प्रेरणा देतो. उठा! जागे व्हा! आणि ध्येयसिद्धी झाल्याखेरीज थांबू नका. मी म्हटले होते की इथे आल्यावर मन, बुद्धी आणि आत्म्याला आकर्षित करून घेतो तो स्वामी विवेकानंदांचा पुतळा! मन स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने, ओजस्वी चरित्राने प्रभावित झालेले असते. बुद्धी विचार करत असते की स्वामी विवेकानंदांची शिकवण मला कशी आचरणात आणता येईल? ह्या संपूर्ण सृष्टीत वसलेल्या एकत्वाची जाणीव आत्म्याला झालेली असते. शिलास्मारकावरील विवेकानंद मंडपम मधील पुतळ्याची दृष्टी सभागृहाचे दार उघडताच बरोबर दोनशे अठरा फूट दूर असलेल्या श्रीपाद मंडपावर पडते. विवेकानंद पुतळ्याची देवळांप्रमाणे रोज पूजा अर्चा होत नाही. स्मारकामागील उद्देश आणखी एक देऊळ उभारणे असा नव्हता तर राष्ट्रीय एकात्मता साधता यावी, प्रत्येकामधील राष्ट्रभक्ती चेतना जागवावी हा होता. विवेकानंदांचे म्हणणे होते की तुमच्या सभोवताली असलेला विराट ईश्वर म्हणजेच हा जनता जनार्दन बघा. त्याच्यासाठी काम करा. त्याची सेवा करा. मानवाची सेवा हीच ईश्वरपूजा असे स्वामीजी सांगत असत.
शिलास्मारकातील आणखी एक महत्वाची रचना म्हणजे ध्यानमंडप. ध्यानमंडपात कोणत्याही व्यक्तीचा, देवतेचा फोटो नाही. मूर्ती देखील नाही. तर फक्त ॐ आहे. निराकार ओंकार, सृष्टीचे मुलतत्व असलेला ओंकार. ज्यात विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय सामावलेली आहे असा ओंकार.विवेकानंद शिला स्मारकाला भेट द्यायला आलेल्या लोकांना शांतपणे बसून ध्यान, मनन आणि चिंतन करता यावे म्हणून ध्यानमंडपाची योजना करण्यात आली. ह्या मंडपाचा आकार त्रेचाळीस फूट दहा इंच * एकवीस फूट सहा इंच इतका आहे.ध्यानमंडपात नैऋत्य बाजूला एका उंच वेदीसारख्या रचनेत भव्य ओंकाराची स्थापना करण्यात आली आहे. ह्यालाच प्रणव पीठम असेही म्हणतात. प्रणव म्हणजेच ॐ.
भेट देणाऱ्या लोकांची कितीही गर्दी असली तरी ह्या मंडपात अजिबात आवाज करू नये अशा सूचना असल्याने ध्यान मंडपात शांतता असते. अतिशय शांत वातावरणात मन एकाग्र होते, सृष्टीचे मूळ असलेल्या ओमचे ध्यान करता येते. देशातीलच नव्हे तर जगभरातील लोक तेथे येत असतात. ओंकाराचे ध्यान करत असतात. श्रीपादमंडपम आणि विवेकानंद मंडपम प्रमाणेच ध्यान मंडपम आणि प्रणव पीठम ही देखील कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाची ओळख बनलेली आहे. ह्या दगडातील सुंदर स्मारक जे विचार जागवते त्याचे जिवंत रूप आपल्याला पाहायला मिळते गावात असलेल्या विवेकानंद पुरम मध्ये. विवेकानंद केंद्राचे मुख्य कार्यालय असलेल्या विवेकानंद पुरम मध्ये अनेक प्रदर्शनी तर आहेतच, सुंदर मंदिर आहे आणि प्रशिक्षण केंद्र देखील आहे. ऑगस्ट २०१६ मध्ये एका शिबिराच्या निमित्ताने इथल्या प्रशिक्षण केंद्रात ८/१० दिवस राहण्याची संधी मिळाली. तेव्हा केलेली योग साधना, ऐकलेली व्याख्याने जशी लक्षात आहेत तसेच दोन्ही बाजूला फुललेले आणि आपल्या सुगंधाने आसमंत भारुन टाकणारे आकाशनिंब (कोणी ह्याला गगनजाई किंवा बुचाची फुले देखील म्हणतात) आणि पिसारा फुलवून नृत्य करणारे, एकमेकांना साद घालणारे असंख्य मोर हे देखील लक्षात आहे. त्या परिसरातील साधेपणा, शांती, समुद्राकडे जाणारी सुंदर वाट, विवेकानंदांचा पुतळा सगळेच कधी न विसरता येण्याजोगे.
देशभरात अनेक ठिकाणी, अगदी दुर्गम भागातून देखील शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक, शेती आणि ग्रामविकास विषयक काम करणारे हजारो तरुण कार्यकर्ते विवेकानंद केंद्राकडे आहेत. कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता ते शांतपणे आपले काम करत आहेत. स्वामी विवेकानंदांचे दगडातील सुंदर स्मारक आणि त्याचा जिवंत प्रेरणादायी अविष्कार बघायचा असेल तर कन्याकुमारीला अवश्य भेट द्या.
वृंदा टिळक
No comments:
Post a Comment