Monday, 9 June 2025

सीमारेषांची अनुभूती

 

ऋतुगंध – शरद – वर्ष १६, अंक ३

जियो, जियो अय देश! कि पहरे पर ही जगे हुए हैं हम।

वन, पर्वत, हर तरफ़ चौकसी में ही लगे हुए हैं हम।
हिन्द-सिन्धु की कसम, कौन इस पर जहाज ला सकता ।
सरहद के भीतर कोई दुश्मन कैसे आ सकता है ?
पर की हम कुछ नहीं चाहते, अपनी किन्तु बचायेंगे,
जिसकी उँगली उठी उसे हम यमपुर को पहुँचायेंगे।
हम प्रहरी यमराज समान जियो जियो अय हिन्दुस्तान!

आपल्या ‘जियो जियो अय हिन्दुस्तान’ ह्या कवितेत ‘रामधारी सिंह ‘दिनकर’ म्हणतात सरहदीचे – देशाच्या सीमेचे आम्ही प्राणपणाने रक्षण करु. 

तुमच्या माझ्यासारख्या देशाच्या सर्वसामान्य नागरिकांना आपापल्या राज्यात असेल तर आणि तेवढीच देशाची सीमा माहिती असते. पण अन्य ठिकाणच्या माहिती नसतात. आज आपण पाहणार आहोत, जिथे आम्ही जाऊन आलो अशा काही सीमावर्ती भागांविषयी. 

भारताचा नकाशा आपण पाहिला तर हिंद महासागर, सिंधुसागर आणि बंगालचा उपसागर सोडल्यास बाकी भागात पाकिस्तान, अफगाणिस्थान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, ब्रम्हदेश हे देश आपल्या सीमेवर आहेत. ह्यातील सर्वात जास्त लोक जिथे भेट देतात ती बॉर्डर पोस्ट आहे ‘अटारी बॉर्डर’ – भारत आणि पाकिस्तानमधील बॉर्डर.ती जागा तिथे रोज संध्याकाळी होणाऱ्या ‘लोअरिंग ऑफ फ्लॅग्स सेरिमनी’ साठी खूप प्रसिद्ध आहे. अटारी बॉर्डर पाकिस्तानच्या वाघा येथे जोडली गेलेली आहे. पंजाब मधील अमृतसरपासून साधारण २८ किलोमीटर वर हे ठिकाण आहे. रोज संध्याकाळी होणारा हा रोमहर्षक सोहळा अनुभवण्यासाठी दोन्ही बाजूला हजारो प्रेक्षक जमलेले असतात.

तो सोहळा, त्या वेळी दोन्ही बाजूंच्या प्रेक्षकांतून दिल्या जाणाऱ्या घोषणा, जयघोष, उचंबळून येणाऱ्या भावना हे सगळे प्रत्यक्ष अनुभवण्याजोगे आहे. असा सोहळा भारताच्या अन्य कोणत्या बॉर्डर पोस्ट वर पाहायला मिळाला नाही. पाकिस्तान १९४७ पर्यंत भारताचा भाग असल्याने, साहजिकच भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप मोठी-जवळपास ३००० किलोमीटर लांब सीमारेषा आहे. गुजराथ, राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मीर इथून ही सीमारेषा जाते. 

अशीच खूप मोठी सीमारेषा असलेला दुसरा देश आहे बांगला देश. भारत आणि बांगला देश जवळ जवळ ४००० किलोमीटरच्या सीमेने जोडलेले आहेत. जगातील सर्वात मोठ्या पाच सीमारेषांपैकी ही एक आहे. इतकी मोठी सीमारेषा असणे स्वाभाविकच आहे, कारण १९४७ पर्यंत बांगला देश हा भारताचाच भाग होता. भारताचा नकाशा पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल की ही सीमारेषा कशी आणि किती पसरलेली आहे. आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम आणि पश्चिम बंगाल ह्या राज्यातून ही सीमारेषा जाते. इतकी मोठी, ४००० किलोमीटरपेक्षाही जास्त सीमारेषा असल्याने, तिकडून येणारे निर्वासित लोंढे थोपवणे, भारतासाठी फार अवघड झाले आहे. 

ह्या दोन देशांमधील सीमारेषा आम्ही कुठे पहिली ती हकीकत मनोरंजक आहे. आम्ही गेलो होतो मेघालयात दावकीजवळ ‘उमंगोत’ नदी बघायला. नदीचे पाणी इतके स्वच्छ आणि नितळ आहे की तुम्ही खरोखर तळ बघू शकता. तिथे नौकाविहार करणे फार आकर्षक आणि आनंददायी असते. 

आम्ही जेव्हा नावेतून फिरून काठावर परत आलो तेव्हा दिसले की इथेच भारत बांगलादेश सीमा आहे! बांगलादेशी नागरिकांचा एक घोळका तिथे फिरत होता. तेही दावकी आणि भारत बघायला आले होते. तिथे ना खांब होते, ना तारा होत्या, ना कुंपण होते. फक्त एक पाटी होती की ‘ही भारत बांगलादेश सीमा आहे. कृपया ओलांडू नये!’बांगला देशातील लोक चौपाटीवर फिरायला यावे तसे तिथे आलेले होते. अगदी चणेवाले देखील होते त्या पाटीच्या मागे..म्हणजे बांगलादेशात!!

अरुणाचल प्रदेशातील लोहित जिल्ह्यातील परशुराम कुंडला गेलो होतो तेव्हा अजून एक सीमारेषा पाहिली.  

परशुरामकुंड कडे पाठ करून उभे राहिलो की मागे जो डोंगर दिसतो, तो पार केला की ब्रम्हदेश आहे! त्यामुळे तशी दुरवरूनच आम्ही सीमा पाहिली असे म्हणायला हवे. जानेवारीत तिथे एक विशेष जत्रा असते. काही जनजातीच्या लोकांना तिथे जायला किंवा तिकडून इथे यायला परवानगी आहे. अर्थात सीमेवर एक बॉर्डर पोस्ट आहे पण ते दूर आहे. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम आणि मेघालय ह्या चार राज्यात भारत ब्रम्हदेश सीमाभाग आहे. जवळपास १५०० किलोमीटरची ही सीमा आहे.

अजून एक सीमारेषा पाहिली ती भारत चीन सीमा. इथे मात्र व्यवस्थित बॉर्डर पोस्ट, नो मॅनस लँड आणि लाईन ऑफ कंट्रोल पण आहे. ही सीमा अरुणाचल प्रदेशाच्या तवांग जवळील बुमला पास येथे आहे. अरुणाचल मध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला इनरलाईन परमिट लागते. ते प्रत्यक्ष जाउन तुम्हाला गुवाहाटी विमानतळावर किंवा रेल्वे स्टेशनवर मिळू शकते. त्यासाठी तुमचे फोटोज, ओळखपत्र, आणि निवासाचा दाखला लागतो. इनरलाईन परमिट ऑनलाईन देखील घेऊ शकता. 

१९६२ च्या भारत चीन युद्धातील एका घनघोर संग्रामाचे ठिकाण म्हणजे तवांग. ‘तवांग युद्ध स्मारक’ शहरापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे. तवांग युद्ध स्मारक बघणे ही तर आगळीच भावना आहे. आदर, अभिमान, दुःख, अपराधीपण .सर्वच भावनांचा कल्लोळ मनात उसळतो. असे म्हटले जाते की तेव्हा इतके भारतीय सैनिक गेले, त्यांच्या रक्तामुळे तवांग जवळून वाहणारे झरे देखील लाल झाले होते. सगळे भारतीय नागरिक सुरक्षित राहावे म्हणून ते सैनिक शत्रूशी लढले आणि धारातिर्थी पडले, अमर झाले. अशी युद्धस्मारके जिथे जिथे बघता येतील ती सर्व पाहिली पाहिजेत. आम्ही जेसलमेर येथे असे एक युद्धस्मारक पाहिले होते. 

तवांगहून बुमला पासला जाण्यासाठी त्या अवघड रस्त्यांवरून जाऊ शकतील अशाच गाड्या लागतात. तशा गाड्या आणि वाहनचालक तवांगमध्ये अगदी सहज मिळतात. 

बुमला येथे फक्त भारतीय नागरिकच जाउ शकतात. त्यांनादेखील एक विशेष परवानगी घेऊन मगच जाता येते. हे परवानगीपत्र तवांगमधून घ्यायला लागते. मिलिटरी चेक पोस्टवर ते तपासले जाते आणि मगच तुम्ही बुमलाच्या रस्त्यावरून जाउ शकता. 

रस्ता खूप खडतर आहे. आता रस्ता तरी आहे पण आपले सैनिक १९६२ साली लढले तेव्हा रस्ता नव्हताच. पाठीवर आपापले सामान घेऊन, डोंगर-दऱ्या तुडवत, खायला मिळाले तर मिळाले, नाही तर उपाशी पोटी.अशा अवस्थेत कित्येक किलोमीटर चालत आपले सैनिक बुमलाला पोचले आणि लढले. 

बुमला पासला पोचल्यावर एन्ट्री गेटच्या बाहेर गाडी पार्क करायला लागते. हे ठिकाण समुद्रसपाटी पासून १५,२०० फूट उंचीवर आहे. तिथून अगदी जवळ असलेल्या  ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत हुडहुडी भरते. तुमचे सगळे सामान, अगदी फोन, पर्स, पाकिटे सगळे तिथे ठेवून घेतले जाते आणि मग तुम्हाला प्रत्यक्ष बॉर्डर जवळ जाता येते. तिथे फोटोग्राफी करायला परवानगी नाही.

तिथे पोचायला खरे तर अगदी थोडेच चालायला लागते. पण अतोनात थंडी आणि ऑक्सिजनचे अल्प प्रमाण ह्यामुळे आपण किती चाललो आहोत असे वाटते. काही सामान नसताना, नुसते चालण्यासाठी देखील आपल्याला कष्ट होतात. सैनिक इथे कसे लढले असतील आणि लढत असतील?

तिथे पोचल्यावर  सैन्य अधिकारी युद्धाच्या वेळी काय काय झाले, कुठे सैनिक होते, युद्ध कसे झाले ते सगळे निवेदन करतात. चीनची सीमा लांबवर दिसत असते. तुमच्या तोंडून आपोआपच ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ अशा घोषणा निनादत राहतात. 

मला वाटते प्रत्येक भारतीय नागरिकाने एकदा तरी अशा सीमावर्ती भागात जाऊन यायला हवे. आपले हात पाय काम करेनासे होतात, नुसते चालणे देखील कठीण होऊन जाते. अशा वातावरणात सैनिक जीवावर उदार होऊन युद्ध करत असतात.. ते कोणासाठी? कशासाठी? आपण काय जाणीव ठेवतो त्यांची? आपण त्यांच्यासाठी काय करतो? असे सगळे प्रश्न पडायला लागतात. अत्यंत दुर्गम भागात, कसोटी पाहणाऱ्या हवामानात आपल्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांविषयी आदर, अभिमान आणि कृतज्ञता जास्तच प्रकर्षाने वाटायला लागते आणि आपोआपच नागरिक म्हणून आपल्यावर असलेल्या जबाबदारीचे भान येते. सजग, सुजाण नागरिक हे कोणत्याही देशाचे बलस्थान असते ह्यात शंकाच नाही.

वृंदा टिळक

No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...