स्नेहीजनहो नमस्कार!
आपणां सर्वाना हे सर्वधारीनाम संवत्सर सुख-समाधानाचे, समॄद्धिचे व आरोग्यदायी जावो, ह्या शुभेच्छा.
आज 'ऋतुगंध" एक वर्ष पुर्ण करीत आहे. गेल्या वर्षभरात आपणांकडून जसे कौतुक झाले, प्रतिसाद मिळाला, सहकार्य लाभले, तसेच आगामी वर्षीही लाभेल, अशी खात्री आहे. आपल्याला काही त्रुटी जाणवल्या असतील, काही सुधारणा, बदल सुचवू इच्छित असाल तर जरुर कळवा. आपल्या सुचनांचा निश्चितच विचार केला जाईल.
ज्याप्रमाणे ऋतुगंध नविन वर्षात पदार्पण करीत आहे, त्याचप्रमाणे सॄष्टीदेखील एक आवर्तन पुर्ण करुन नविन आवर्तनाची सुरुवात करीत आहे. वसंताचे आगमन झालेले आहे. सॄष्टीची नव्हाळी मनाला उल्हसित करते आहे. ज्ञानियांच्या राजाने म्हटल्याप्रमाणे, वासंतिक बहर असेल, प्रियजनांचा सहवास असेल, स्नेह्पूर्ण व्यवहार असेल, तर आणखी काय पाहिजे?
विषुववृत्ता्च्या इतक्या जवळ रहाणा़-या आपल्यासारख्या लोकांना बदलत्या ऋतुचक्राची मजा उपभोगण्याची
संधी मिळत नाही, म्हणुन हळहळत बसायचे की वसंत नेहेमीच अनुभवायला मिळतो, झाडे नेहेमीच हिरवीगार असतात, फ़ुले फ़ुललेली असतात, कोकिळेचे कुजन ऐकायला मिळते म्हणुन आनंदात रहायचे, हे आपल्याला ठरवायचे आहे.
कोणतीही नवी सुरुवात होण्यासाठी आधीचे आवर्तन पुर्ण व्हावे लागते.त्याचा अंत सहन करावाच लागतो. इथे आयुष्याचा नविन कालखंड सुरु करण्या्साठी, तिथे खुप काही मागे सोडुन आपण आलो आहोत. त्या वियोगाने तळमळत बसायचे की त्या आठवणींचा योग्य तो सन्मान करीत, इथेही आपुलकीचे आणखी एक बेट निर्माण करायचे ते आपणच ठरवायचे आहे.
आपल्या कर्तृत्वाने आयुष्य उजळवुन टाकायचा प्रयत्न करीत असतानाच, आपल्या क्षमतांचा उपयोग फ़क्त वैयक्तिक लाभासाठी करायचा की समाजाचेही आपण काही देणे लागतो ह्या भावनेने सामाजिक कामांसाठीही आपल्या क्षमतांचा विनियोग करायचा हे ही आपल्यालाच ठरवायचे आहे.
आपल्या भाग्याचा लाभ उपभोगणा-यांचे वर्तुळ आपल्या आप्तजनांपुरतेच मर्यादित ठेवायचे की त्याचा परीघ मोठा करुन,आपल्यापेक्षा कमी भाग्यवान असणा-यांनाही त्यात सामिल करुन घ्यायचे, ह्याचाही निर्णय आपणच घ्यायचा आहे.
गेल्या वर्षी केलेल्या संकल्पांचा आढावा घेण्यासाठी आणि नविन संकल्प करण्यासाठी वर्षप्रतिपदेइतका चांगला मुहुर्त दुसरा कोणता सापडणार?
ह्या सा-या निर्णयांसाठी, संकल्पांसाठी आवश्यक असणारी मनाची समचित्तता आपणा सर्वांनाच लाभू दे.
॥शुभं भवतू॥
वृंदा टिळक
-ऋतुगंध वसंत २००८
No comments:
Post a Comment