इथे दहाव्या मजल्यावरून सगळी झाडे वरून पाहता येण्याचे मोठेच सुख!! त्या एका भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाला अशी अर्धीच गुलाबी किरमिजी शेंदरी पालवी का आलीये कोणास ठाऊक? किती सुंदर दिसतो आहे तो रंग ! तो मोहोर असेल का? असा अर्ध्याच झाडाला? की ती दोन वेगवेगळी झाडे असतील आणि त्यातील एकच झाड मोहोरत असेल ?
अधून मधून काही झाडांना लगडलेले पिवळे फुलांचे घोस वरून तर फारच छान दिसतात. इथे ह्या खिडकीत उभे राहिले की ग्राउंडवर खेळणारी मुले, विविधरंगी झाडे, उडणारे पक्षी ,लगबगीने ये जा करणारी माणसे , मधेच तुरुतुरु धावणाऱ्या ट्रेन्स, त्या पलीकडच्या बिल्डींग्स, त्यातील एका इमारतीच्या बाहेरच्या बाजूने लगटून वरखाली करणारी पारदर्शक लिफ्ट ..नजर जरा पलीकडे नेली की काळपट हिरव्या झाडांनी अवगुंठीत टेकडी आणि विस्तीर्ण निळे आकाश... काय बिशाद की मनात काही निरुत्साह राहील!! सगळेच कसे सकारात्मक उर्जा देणारे दृश्य..
आत्ता ह्या क्षणी सूर्याचा निवळत जाणारा उजेड..
रेडीयोवरचे 'दिल ढून्ढता है फिर वही फुरसत के रात दिन' ह्या गाण्याचे सूर.. आणि 'बैठे रहे तसव्वुर ए जाना किये हुये' !!!!
-वृंदा टिळक
No comments:
Post a Comment