Monday, 13 February 2023

साहित्य संमेलन - एक ऊर्जा स्रोत

 एक साहित्य संमेलन झाले की महिनाभर तरी साहित्य संमेलनात काय झाले? ते कसे बरोबर वा चूक होते? संमेलनाच्या आयोजनात काय चांगले वा वाईट होते? यावर चर्चा चालू राहते. ही चर्चा निवळली की मग कोणत्या ठिकाणी पुढचे साहित्य संमेलन होणार त्यावर चर्चा होऊ लागते. ते ठरले की मग अध्यक्ष कोण असणार, त्या नावाचा अंदाज सर्वजण वर्तवू लागतात. त्यानिमित्ताने माणसांना मोहरे करून विचारधारांवर टीका केली जाते किंवा विचारधारांना मोहरे करून माणसांवर टीका केली जाते. हे सगळे आटोपते आहे की नाही तोपर्यंत पुढचे साहित्य संमेलन येते. मग पुन्हा उडतो धुरळा.. कोणते विषय? कोणाला निमंत्रणे?


असेच रहाटगाडगे गेले कित्येक वर्ष आपण पहात आहोत. हे वर्षही काही वेगळे नव्हते! याच क्रमाने सगळे होत होत अखेर फेब्रुवारी उजाडला. साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आणि प्रत्यक्ष साहित्य संमेलनाला सुरुवात देखील झाली. 

महात्मा गांधी, विनोबा भावे, मावशी केळकर अशा थोर नेत्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले वर्धा शहर. जवळून वाहणारी वरदा नदी. ठेंगणी एक वा दोन मजली घरे, भरपूर मोकळी जागा असे हे मध्यम आकाराचे वर्धा शहर. पहाटे व रात्री गार होणारी तर दुपारी उन्हाचे चटके देणारी कोरडी हवा. इतकी कोरडी आणि उष्ण की वर्ध्याच्या भाषेत सांगायचं तर गगरा (कोरडी माती आणि धूळ) उडत होता. 


या साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून मी उपस्थित होते. तीनही दिवस साहित्यसंमेलनात जवळपास पूर्ण वेळ उपस्थित राहून साहित्य संमेलनाचा आनंद घेता आला. 

वर्ध्याच्या संमेलनाचे वर्णन करताना भव्य शब्द खूपदा वापरायला लागेल. संमेलनासाठी उपयोगात आणलेली जागा भव्य, मुख्य सभामंडप भव्य, व्यासपीठ भव्य, व्यासपीठ आणि श्रोत्यांच्या आसनव्यवस्थेमधील मोकळी सोडलेली जागा देखील भव्य, भोजनकक्षही भव्यच! या भव्यतेसाठी वर्धा संमेलन नक्कीच लक्षात राहील.


आयोजक असलेल्या विदर्भ साहित्य संघाला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली आणि हे ९६ वे साहित्य संमेलन. दोन्हीचीही शतकी वाटचाल कौतुकास्पद आणि प्रदीर्घ इतिहास व वारसा लाभलेली. अर्थातच सर्वांच्याच या साहित्य संमेलना कडून खूप जास्त अपेक्षा होत्या. 


तसे एक आणि दोन तारखेला काही कार्यक्रम सुरू झालेले असले तरी संमेलनाचा प्रमुख कार्यक्रम सुरू झाला तो 3 फेब्रुवारीला सकाळी. साहित्यसंमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने अगदी उत्साहात झाली. स्थानिक शाळा कॉलेजमधील विद्यार्थी आणि संमेलनाला आलेले साहित्यिक ह्यांचा सहभाग होता. 


पहिले उदघाटनाचे सत्र आचार्य विनोबा भावे सभा मंडपात जो मुख्य सभा मंडप होता तिथे, प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर आयोजित केलेले होते. ते सत्र उशिरा सुरू झाले. काही अनपेक्षित कारणांनी नितीन गडकरी त्या सत्रात उपस्थित राहू शकले नाहीत पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते. माजी अध्यक्ष भारत सासणे, संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या खेरीज साहित्य महामंडळाचे पदाधिकारी, समन्वयक उपस्थित होते. तसेच विश्वनाथ प्रसाद तिवारी आणि कुमार विश्वास हे देखील उपस्थित होते. ते सत्र उशीरा सुरु झाले आणि बरेच लांबले देखील. 

तसेही उद्घाटनाचे सत्र हे सर्वांचे स्वागत, सन्मान आणि भाषणे यामुळे मोठेच असते. यावेळी ज्यांना विशेषत्वाने बोलावले होते ते डॉक्टर विश्वनाथ प्रसाद तिवारी आणि कुमार विश्वास यांना साधारण पाच पाचच मिनिटे बोलायला वेळ मिळाला. संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चपळगावकर थोडेच बोलले. पण त्यांचे संपूर्ण भाषण नंतर दुपारच्या सत्रात झाले. 


संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आपल्या भाषणात म्हणाले की एखादी घटना घडली की त्यावर विचार व्हायला पाहिजे. जसे फळ झाडावरून खाली पडते हे आपण सगळ्यांनी पाहिले होते, अनेक वर्षे पाहिले होते. पण विचार मात्र न्यूटननेच केला. त्याचप्रमाणे कुठल्याही घटनेवर ती का घडली? कशी घडली? असा विचार करायला पाहिजे. समारोपाच्या भाषणात त्यांनी सांगितले की मी काल विद्रोही साहित्य संमेलनात ठिकाणी जाऊन थोड्यावेळ बसून आलो. ही देखील विचार करायला लावणारीच घटना होती. समारोपाच्या भाषणात ते म्हणाले की सर्वांनी एकत्र आले पाहिजे. 


३,४,५ असे तीन दिवस मिळून अनेक विषयांवर परिसंवाद झाले. ग्रंथालय चळवळीचे यश अपयश, वैदर्भीय बोलीभाषा, गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज आणि महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा, आम्हां लेखकांना काही बोलायचे आहे, ललितेतर साहित्याची लोकप्रियता, स्त्रीपुरुष तुलना ( ताराबाई शिंदे ), कृषिजीवनातील अस्थिरता आणि मराठी लेखन, मराठीतील अर्थविषयक लेखन, वाचन पर्यायांच्या पसाऱ्यात गोंधळलेले वाचक, गांधीजी आणि विनोबा - आजच्या परिप्रेक्ष्यातून, वंचित समाजाच्या साहित्यातील लोकशाहीचे चित्रण इत्यादि विविध विषय होते. काही विशेष कार्यक्रम सादर झाले. त्यात मृदगंध - वैदर्भीय काव्यप्रतिभेचा हा विदर्भातील काव्यपरंपरेचा आढावा घेणारा कार्यक्रम होता. 


 शेजारी शेजारी किंवा जवळ जवळ असणारे मंडप आणि त्यात एकाच वेळी चालू असणारी सत्रे ह्यामुळे श्रोत्यांच्या मनात कोणत्या सत्राला उपस्थित रहावे याविषयी फारच संभ्रम होता. सत्र चालू असताना मध्येच उठून दुसरीकडे जाणारांची संख्या पण मोठी होती. 


परिणाम असा होत होता की वैचारिक भाषणे, परिसंवाद ह्यांना अगदी मोजकी संख्या पण राजकीय पुढारी, अभिनेते असतील की मुख्य मांडव ओसंडून श्रोते! संमेलनअध्यक्षांच्या भाषणाला देखील अगदी अल्प उपस्थिती होती. 

सर्वात जास्त उपस्थिती आणि रसिकांची दाद लाभणारा मंडप म्हणजे गझल कट्टा. तिथे अगदी नवनवीन कवी आणि आश्वासक गजल ऐकायला मिळाली. 

कवी कट्टा, बालसाहित्य, अभिवाचन हे इतर मंडप. अभिवाचनाचा ह्या वेळी प्रथमच समावेश झाला होता. प्रकाशन कट्ट्यावर अनेक पुस्तकांचे प्रकाशन झाले. 


चित्रकार विजय बोधनकर ह्यांचे स्वभाव चित्र प्रदर्शन ह्या संमेलनात होते. प्रत्येकाच्या लेखनातील, स्वभावातील, कर्तृत्वाचे बारकावे टिपून काढलेली एकेक चित्र पाहणे हा खूपच विशेष अनुभव होता. 


बसोली ग्रुपने आयोजित केलेली शालेय विद्यार्थ्यांची चित्र स्पर्धा व नंतर त्याचे प्रदर्शन हे देखील खूप खास होते. कवितांच्या ओळींवर, त्या कविता समजून घेऊन मुलांनी काढलेली चित्रे जो त्यांचा सामूहिक प्रयत्न होता. ती पाहणे आनंदाचे होते. 


मराठी राज्य भाषा विकास संस्थेने आयोजित केलेला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ह्यासाठीचे प्रदर्शन, राष्ट्रपतीना पत्र हा उपक्रम आणि शांतता मराठीचे कोर्ट चालू आहे हा लघुपट उल्लेखनीय होते. 


या संमेलनात अनेक स्नेही सहभागी होते. त्यामुळे मग कविता असेल, प्रकाशन असेल, गझल असेल, अभिवाचन असेल वा परिसंवाद असेल, त्यांचे सादरीकरण असेल त्या त्या ठिकाणी, त्या त्यावेळी उपस्थित राहणे हे आनंदाचे, अभिमानाचे होते.

त्याशिवाय जेवणाच्या वेळी म्हणा किंवा येता जाताना म्हणा, अनेक जण भेटत होते, त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणे,त्यांचे विचार जाणून घेणे हे देखील होत होते. हा एक मोठा आनंदाचा आणि भाग होता.


 अनेक प्रकाशन संस्थांचे स्टॉल्स होते. तिथे गर्दी दिसली नाही तरी अगदी कोणीच नाही असेही कधी दिसले नाही. आता प्रत्यक्षात विक्री झाली का नाही, हे त्या त्या स्टॉल धारकांनाच माहिती. खाऊ गल्लीतील विविध स्टॉल्स मात्र गजबजलेले असायचे! 


 भोजन मंडप खरोखरच भव्य होते. त्यामुळे गर्दी झाली नाही. शिवाय जेवणासाठी अनेक स्टॉल्स उभारल्याने, इतकी संख्या असूनसुद्धा, खूप वेळ रांग लावायला लागली आहे असे कधीच झाले नाही. 

 

इथे परत आल्यावर विविध वृत्तपत्रातील संमेलनाचा वृत्तान्त वाचणे हे खूपच ज्ञान वर्धक ठरले!

उद्घाटनसत्रात गडकरी असतील असे कार्यक्रम पत्रिकेत छापलेले होते. ते वाचून एका वृत्तपत्रात गडकरी उपस्थित होते असे छापून आले. प्रत्यक्षात काही अनपेक्षित घटना घडली त्यामुळे गडकरींना येता आले नव्हते! जे न देखे रवी, ते देखे कवी असे ऐकले होते. पण व्यासपीठावर नसलेले गडकरी वार्तहराला दिसले म्हणजे किती जबरदस्त वार्तांकन शक्ती म्हणावी ही! 

दुसरे लक्षात असे आले की अनेक संदर्भ देऊन केलेली अभ्यासपूर्ण भाषणे, परिस्थितीचा सम्यक विचार करून केलेली संयत भाषणे ह्यांना वृत्तपत्रांच्या दृष्टीने काहीच महत्व नव्हते. 

आम्हां लेखकांना काय म्हणायचे आहे ह्या परिसंवादात प्रविण दवणे ह्यांनी केलेल्या आशावादी भाषणाला माध्यमांनी जास्त जागा दिली नाही. गांधी आणि विनोबा आजच्या परिप्रेक्ष्यात ह्या परिसंवादातील प्रशांत धर्माधिकारी यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाची फारशी दखल घेतली गेली नाही. 

माध्यमांना वादग्रस्त विधाने असलेले, ओरडून केलेले, वेळप्रसंगी शिव्या देखील वापरलेली अशी भाषणे..मग त्यात परिसंवादाच्या विषयाला धरून मुद्दे असोत वा नसोत.. तीच दखलपात्र वाटतात असा ह्याचा अर्थ घ्यायचा का??


मुख्य मंडप खूपच भव्य होता. पण त्यातील व्यवस्था पाहणारे मात्र तिथे फारच क्वचित उपस्थित असायचे. त्यामुळे मग भल्या मोठ्या स्क्रीन वर आदल्या दिवशीच्या कविसंमेलनाची पत्रिका दिसत राहणे, अनेक लाईट स्टेजच्या मध्यभागी रोखलेले आणि बाजूला अंधार, स्टेज वर पुरेशी आसन व्यवस्था नसणे, आधीच्या सत्रातील वक्त्यांनी पाणी पिऊन रिकाम्या बाटल्या ठेवल्या असतील त्या पुढच्या सत्रातही टीपॉंय वर व मंचावर देखील पडलेल्या असणे असे प्रकार घडत होते. 


स्वच्छ्ता गृह व्यवस्था हा तर अतिशयच दुर्लक्षित प्रकार होता. महिला स्वच्छ्ता गृहे अगदीच अल्प आणि दयनीय होती. 


तसा विचार केला तर साहित्याचे अनेक पैलू आहेत. कथा, कादंबरी, ललित लेख, नाट्य वाचन, प्रवास वर्णन, कविता आणि बरेच काही. त्या सर्वांना काही ना काहीतरी प्रतिनिधित्व साहित्य संमेलनात मिळावे असे वाटते.


 इथे मला खुलभर दुधाची कहाणी एका वेगळ्या स्वरूपात दिसते. साहित्य संमेलन हा एक भला मोठा कुंभ ( मेळा नव्हे,तर कुंभ म्हणजे घडा, रांजण!) तर त्यात सहभागी प्रत्येक जण आपापल्या साहित्यकृती त्या रांजणात समाविष्ट करतो. पण मग तो संपुर्ण कुंभ सकस, समृद्ध असावा असे वाटत असेल तर मग आपला सहभाग असलेली साहित्यकृतीदेखील तेवढीच सकस नको का? लिहिणे आणि प्रकाशित करणे, सादर करायची संधी मिळणे..सगळेच आता सोपे झाले आहे. इतर कशाची आणि कोणाचीही कसोटी मानली नाही तरी स्वतःच आपण लिहिलेल्या कृतीच्या दर्जाविषयी सजग राहायला नको का?

 

साहित्य संमेलनात नवे लिहू पाहणारे, अनेक वर्ष लिहीत असलेले, लिहायची इच्छा असणारे असे अनेक जण एकमेकांना भेटतात. साहित्याच्या नव्या अविष्काराने प्रभावित होतात आणि नवीन काही लिहिण्यासाठी, नवीन विचारांसाठी ऊर्जा घेऊन जातात. ह्या साठी अशी साहित्य संमेलने होत राहिली पाहिजे. 

कुमार विश्वास म्हणाले तसे मागे बसलेल्यांना संमेलनात स्थान मिळायचे असेल तर जिल्हा पातळीवर देखील झाली पाहिजेत. 

साहित्य संमेलनाला महाराष्ट्र भरातून श्रोते तिकिटे काढून आले होते. दरवर्षी येत आहेत ही खूपच आश्वासक गोष्ट वाटते. 


साहित्य संमेलनाचा मूळ हेतू काय आहे? साहित्य विषयक चर्चा त्यात होतात का? साहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळते का? नवीन लिहू पाहणाऱ्यांना काही मार्गदर्शन मिळते का? या सगळ्या मुद्द्यांच्या विषयी प्रत्येकाच्या मनात विचार सुरू होणे हे साहित्य संमेलनाचे फलित म्हणता येईल! 

मुख्य अतिथी दिनेश प्रताप सिंग आणि कुमार विश्वास या दोघांनीही सांगितले की इतके मोठे संमेलन त्यांनी हिंदी भाषेचेही कधी पाहिलेले नव्हते.

अशी साहित्य संमेलने हा मराठी भाषेच्या दृष्टीने अभिमानाचा विषय आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी साहित्य संमेलने होत राहावीत. या निमित्ताने विचार विमर्श होत रहावा. साहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळावे. शुभंकर ऊर्जा मिळावी. 



No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...