Thursday, 27 July 2023

शब्दरूप लेऊन फुलल्या.. मनमंदिरा ..

 शब्दरूप लेऊन फुलल्या..  

मनातल्या मुक्या भावनांना शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत कविता लिहिली जाते. खरे तर लिहिलेल्या शब्दांच्या मधल्या अवकाशात कविता कितीतरी सांगत असते. या लेखमालिकेत आपण वाचणार आहोत, अशा कवितांविषयी. दोन शब्दांच्या मधल्या अवकाशाचा शोध घेण्याचा हा तोकडा प्रयत्न आहे. 

—-----------------------------------------------------------

मनमंदिरा .. 

घनदाट अंधारात  दिशा दिसत नसतात.  कुठे जावे समजत नसते. अशा भांबावलेल्या स्थिती कुठून तरी एखादा बारीकसा प्रकाश कण दिसतो. खरे तर तो कण असतो अगदी बारीकसा.  पण  त्याच्या अस्तित्वामुळे धास्तावलेले मन थोडे शांत होते. अंधार दाट आहे हे खरं आहे, पण म्हणून प्रकाश दिसतो आहे हे काय खोटं आहे?  असे मनाला वाटू लागते.  त्या प्रकाशाच्या भरवशावर माणूस चालत राहतो.


गडद काळोखात सगळीकडे अंधार असताना काजव्यांचा प्रकाश देखील माणसाला धीर देतो.  मन उजळून टाकतो. असाच अनुभव देणारे गीत म्हणजे 'मन मंदिरा..'

'कट्यार काळजात घुसली' या सुप्रसिद्ध चित्रपटातील हे गीत. 

गीत - मंदार चोळकर, संगीत - शंकर एहसान लॉय, गायक - शंकर आणि शिवम महादेवन 


मन मंदिरा… तेजाने…
मन मंदिरा… तेजाने उजळून घेई साधका
मन मंदिरा… तेजाने उजळून घेई साधका
संवेदना… संवेदना… संवादे सहवेदना… जपताना
मन मंदिरा…

तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी
तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी
स्वयंप्रकाशी तू तारा…..
स्वयंप्रकाशी तू तारा
चैतन्याचा गाभारा
भर पंखातून स्वप्न उद्याचे
भर पंखातून स्वप्न उद्याचे
झेप घे रे पाखरा
उजळून घेई साधका
मन मंदिरा.. तेजाने उजळून घेई साधका
मन मंदिरा… मन मंदिरा…
मन मंदिरा…


काही महत्वाचे मुद्दे आपण टिपून ठेवतो तसे हे गीत मला वाटते. गाणे होताना आलाप ताना आल्याने ते गीत मोठे वाटते. अन्यथा कविता म्हणून अगदी  लहान लहान आणि थोड्याच ओळी आहेत. मानसशास्त्रातील सूत्रे सांगावीत तसेच प्रत्येक ओळीत एकेक मुद्दा सांगितलेला आहे. 

चित्रपटातील संदर्भ लक्षात न घेता नुसती एक स्वतंत्र कविता म्हणून देखील उत्कट आणि अर्थपूर्ण असलेली ही रचना. 

सर्वात महत्वाचा शब्द म्हणजे साधका. इथेच लक्षात येते की आपण सारेच साधक नाही का? आपापल्या समजुतीनुसार आणि कुवतीनुसार जगण्याला अर्थ देऊ पाहण्याची साधना करत असलेले साधक. 

साधकाने स्वतःच्या मनाचा गाभारा तर उन्नत तेजस्वी विचारांनी उजळून घ्यायचा आहेच. पण दुसऱ्याच्या भावना जाणवतील, टिपता येतील असे तरल संवेदनशील मन ठेवायचे आहे.  तेजाने मन उजळून गेल्यावर मनात कुठल्या वाईट विचारांना, अंधाराला जागा राहीलच कशी? 

पुष्कळदा असे होते की स्वतःच्या यशाच्या, आनंदाने हरखून जाउन, त्या  भरात माणूस दुसऱ्यांचा विचार करणे विसरून जातो. कधी कधी ह्याच्या अगदी उलट देखील होते. आपलेच दुःख आपल्याला इतके मोठे वाटत असते, आपल्याच दुःखाने आपल्याला इतके व्यापून टाकलेले असते की आपल्या आजूबाजूला असलेल्यांचे दुःख आपल्याला दिसतच नाही. 

माणसाला स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांच्या भावना जाणवणे ही सहवेदनाच नव्हे का? असे मन असण्यासाठी, त्या वेदना जाणवल्यावर योग्य ती कृती करण्यासाठी  देखील साधना आवश्यकच. 

तळहाताच्या रेषांनी ..सहजसुखा का भोगी कुणी? अगदी खरे आहे. आपल्याला यशस्वी माणसांचे यश दिसते. पण त्या साठी त्यांनी केलेले प्रयत्न मात्र खूपदा लक्षात येत नाहीत. परीक्षेत यश मिळवण्यासाठी एकाग्रतेने केलेला अभ्यास, बाकी सुखांचा केलेला त्याग  आपल्या लक्षात येत नाही. एखाद्या खेळाडूचे, उद्योगपतीचे यश दिसते पण त्या आधी त्यांनी केलेले जीवतोड प्रयत्न लक्षात येत नाहीत. 

एखादे माणूस लोकप्रिय असते. इथे  मी पुढारी, नेते, इतर माध्यमातील चमकणारे तारे, लेखक, कवी इत्यादी अशा मोठ्या लोकांविषयी बोलत नाहीये.  तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांविषयी बोलते आहे. तर त्या लोकप्रिय माणसाविषयी, त्याच्या आजूबाजूला नेहमी असणाऱ्या माणसांविषयी बोलताना आपण हे विसरून जातो की आजूबाजूची  माणसे जपताना, त्या आता लोकप्रिय असलेल्या माणसाने भरपूर प्रयत्न केलेले असतात. प्रसंगी स्वतःचे सौख्य, स्वास्थ्य, शांतता बाजूला ठेवून मदत केलेली असते.भावनिक आणि मानसिक गुंतवणूक केलेली असते.  

त्यामुळेच साधका, सहज मिळते असे काहीच  नाही, कोणतेच सुख नाही. प्रयत्न करशील तर मात्र नक्कीच साध्य  होईल. कठोर परिश्रमाने तू ध्येयापर्यंत पोचलास की तूच स्वयंप्रकाशी होऊन जाशील. इतरांना मार्गदर्शक ठरशील. 

अशी मनाची जागरूक अवस्था असेल, आत्मज्ञान प्राप्त झालेले असेल तेव्हा साधका, तूच चैतन्यमय झालेला असशील. नाही का? चैतन्य तरी वेगळे काय असते? 

उद्याचे स्वप्न बघ. त्या साठी सर्व ते प्रयत्न कर आणि झेप घे. 

मनाने पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात येतील याचे जणू आश्वासन देणारा असा हा क्षण. असे म्हणतात की स्वप्न तर सगळेच जण पाहतात.  पण त्या स्वप्नांचा पाठपुरावा करून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करणारे फारच थोडे जाण्यास असतात. 

गेल्या काही  वर्षात वाढलेल्या  डिप्रेशनच्या केसेस, वाढलेले आत्महत्यांचे प्रमाण आपल्याला काय सांगते? चिंतेने, शंकेने  मन ग्रासून गेल्यावर सारासार विवेक नाहीसा होतो.  विचार शक्ती नाहीशी होते आणि त्यामुळेच माणूस निराश होतो, आत्महत्या करण्यास पटकन प्रवृत्त होतो. 

पण डोळ्यांपुढे जर एखादे भव्य  स्वप्न असेल, ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असतील ते सगळे कष्ट करण्याची तयारी असेल, जिद्द असेल तर मग मनात निराशेला थारा राहीलच कसा? 

मनाचे मंदिर तेजाने उजळून टाकण्याची, मंदिराचा गाभारा चैतन्याने उजळून टाकण्याची, इतरांचे दु:ख जाणून ते दूर करण्याची, स्वप्न पाहून त्या साठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देणारे हे काव्य.  कर्तव्य करण्यास प्रवृत्त करणारे,  प्रसन्न मनाने प्रकाशाच्या दिशेने प्रवास करायला उद्युक्त करणारे असे  हे सुंदर गीत.  कविता म्हणून विचार केला तर अगदी मोजक्या पाच-सहा ओळींची ही कविता.  पण त्यातून प्रगट होणारा भाव मात्र खूप मोठा.  शब्दातून व्यक्त होणाऱ्या भावाला साजेल अशीच त्याला दिलेली सुरांची सजावट. कधी कधी असे  होते  की सुरावट एवढी मोहक असते, एवढी लोभस असते की त्यामुळे शब्दांकडे दुर्लक्ष होते.  या गीताच्या बाबत मात्र तसे  होत नाही.  चित्रपटातील तो प्रसंग, सुंदर भरदार आवाज, ते मोहून  टाकणारे सूर याचबरोबर लक्षात राहतात  ते अर्थ देखील तितक्याच प्रभावीपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचवणारे शब्द.  

- वृंदा टिळक.

पूर्वप्रसिद्धी - ऋतुगंध वर्षा ( २०२३ )


No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...