ह्या लॉकडाऊन ने मला दिले काय? खरे तर बरेच काही.. त्यातील एक म्हणजे दिली अशी एक संधी जी मला अनेक वर्षांपासून हवी हवीशी होती. फुल फुलते म्हणजे काय होतं? नेमका तो क्षण कोणता कुठल्या क्षणाला म्हणायचं फुल फुलले म्हणून? जेव्हा कळी येते तो क्षण? कि पूर्ण फुल दिसते तो क्षण?
आणि मग १६ जुलै ला निशिगंधाच्या पानांमध्ये एक घट्ट दांडा आल्यापासून रोज नेमाने त्याचे, सकाळी ठराविक वेळेला, फोटो काढायचे हा उपक्रम हातात घेतला. सुरुवातीला कॅमेरा त्या हिरव्यागार पानांच्या मध्ये घालून फोटो काढायला लागायचे आणि मग सरसरसर कळ्या असलेला दांडा वर वाढत गेला आणि आज पाने कितीतरी तरी खाली राहिली आहेत आणि तो दांडा केवढा उंच झाला आहे!
ह्या सगळ्या प्रवासात लक्षात आलं की ज्या क्षणी पहिल्यांदा सुगंध दरवळेल तेव्हा म्हणायचं कि फुल फुलले! सध्या रातराणी देखील फुलली आहे, पण काल रात्री तिच्या सुगंधापेक्षा एक वेगळा सुगंध जाणवला. बाल्कनीत जाऊन बघायच्या आधीच लक्षात आले कि निशिगंध फुलला!हाच तो क्षण, फुलण्याचा!!
निशिगंध अगदी लहानपणापासूनच माझ्या आवडीचा. लहानपणी सुट्टीत पुण्याला गेलं की परत औरंगाबादला जाताना, डेक्कनशी मिळणारे निशिगंधाचे दांडे घेऊन जायचे ठरलेलेच. मग जाताना बस मध्ये अगदी ते जीवापाड जपायचे आणि नंतर दोन-तीन दिवस घरी त्या दरवळणाऱ्या सुगंधाचा आनंद साजरा करायचा!
नंतर औरंगाबादलाही छान निशिगंध मिळायला लागला, अजूनही मिळतो. किंबहुना मला तर नेहमी वाटतं की, औरंगाबाद ला मिळणाऱ्या निशिगंधा इतका सुगंध इथे मिळणाऱ्या निशिगंधाला नाहीच.
मग इथे घरी कुंडीत निशिगंध आला. मागच्या वर्षी पहिल्यांदा असाच फुलला, तो आनंद मैत्रिणींबरोबर गप्पा, कविता, वाचन आणि अर्थात खाणं असं करत साजरा केला. यावर्षी घरी तर कोणाला बोलवता येणार नाही, म्हणून निशिगंधच पाठवत आहे.
https://youtu.be/TsQaPHhFPEc
No comments:
Post a Comment