पहाटे ५.३०/५.४५ ची वेळ. सूर्य नुकताच उगवलेला. स्थळ-कोलकात्यातील रविंद्र सरोवर. सरत्या फ़ेब्रुवारीतील थंडीची झुळुक सुखावत होती. आदल्याच रात्री सिंगापूर सोडून कोलकाता मुक्कामी वास्तव्यासाठी मी आले होते. सिंगापूर वियोगाच्या जखमा अगदी लसलसत्या ओल्या होत्या.
विस्तीर्ण जलाशय,भोवताली असणारी प्रसन्न हिरवाई. काही वृक्ष तर अगदी ८०/८५ वर्षांचे आयुष्य व विस्तार लाभलेले आणि तसेच आश्वस्त करणारे होते. काही वृक्ष पाण्यात पाय सोडून स्वत:चेच प्रतिबिंब निरखत असलेले. प्रतिबिम्ब निरखत होते की जलाशयात हरवलेले काही शोधण्याचा प्रयत्न करत होते कोणास ठाऊक? चालायसाठी, पळायसाठी तळ्याच्या किनाऱ्याने सुबक रस्ते बांधलेले होते. व्यायामासाठी खास जागा, क्रिकेट आणि फ़ूट्बॉल ट्रेनिंगसाठी, खेळण्यासाठी प्रचंड मैदाने होती.
फिरायला आलेले, व्यायाम करणारे, हास्यक्लबातले, भजने म्हणणारे, नुसतेच चहा पीत मित्रांबरोबर गप्पा मारणारे अशी नाना परींची माणसे जमलेली. एवढ्या साऱ्या गर्दीतही मला त्यावेळी अत्यावश्यक असणारा, मन निवळवणारा, स्वत:बरोबर रहाण्याची संधी देणारा एकांत सापडला होता.
आता दिवस वर चढू लागला होता. होळीचे रंग सर्वत्र पसरू लागले होते. बागेच्या एका कोपऱ्यात परिचयाचे काही जण जमून होळी साजरी करत होते. ढोलकीचा ताल धरत म्हटलेली गाणी, पानांच्या द्रोणातून गरमागरम कचोरी, सामोसा, जिलबी आणि मातीच्या ग्लासातून थंडाई.लहान-थोर सारेच एकमेकांना रंग लावण्यात मग्न.
सावळी, किडकिडीत, डोक्यावर पदर, भांगात सिंदूर अशी ती, मोठ्यांच्या पायांवर रंग वाहून, नमस्कार करीत होती. बरोबरच्यांना, लहानांना मनसोक्त रंगवत होती. मोठ्यांबरोबरची तिची अदब, बाकींच्यांबरोबरचा मनमोकळेपणा सारेच उत्फ़ुल्ल. थोड्याच वेळात ती माझ्यापर्यंत पोचली. तोपर्यंत आलेल्या सगळ्यांना, "क्षमा किजीये, ऍलर्जी है "असे मी हात जोडून सांगत होते. फारच आग्रह झाला तर स्वत:च्या हाताने, कपाळाला चिमूट भर रंग लावून घेत होते. तिलाही तसेच सांगितले. तिचा हिरमुसला चेहरा बघून, तिच्या हातातल्या रंगाची चिमूट मी स्वत:च्या हाताने कपाळावर लावून घेतली. " हमसे नहीं लगवाइगा क्या? "म्हणून ती एवढी झकास फुरंगटली, की त्या लोभस निरागसतेला दाद देत तिच्यासमोर कपाळ झुकवण्याखेरीज माझ्यासमोर पर्यायच उरला नाही. तुम्ही आधीच्या रंगात जरी अगदी नखशिखांत रंगलेले असाल, तरी नवा रंगही चढायला कायम जागा असतेच,असा धडा मी मनाला सांगत राहिले!
पहाटे आत्ममग्न भासणारा रविंद्र सरोवरचा परिसर आता माणसांनी फ़ुलला होता. रंगोत्सव घोळक्या घोळक्यांनी साजरा होत होता. हातात हलवायाकडून आणलेल्या खाद्यपदार्थांच्या टोपल्या आणि रंग खेळण्याची जय्यत तयारी करून लोक सहपरिवार बागेत येत होते. सी-सॉ, घसरगुंडीवर मुले खेळत होती. "फक्त १२ वर्षांखालील मुलांसाठी " अशी पाटी असलेल्या झोक्यांवर सिनेमाची गाणी म्हणत, चांगली १८/२० वर्षांची मूले उंच झोके चढवत होती! असा साजरा झाला आमचा कोलकात्यामधील पहिला उत्सव. सर्वांच्या बरोबर. सुंदर तळ्याच्या काठी.
नुकतीच होळीच्या दिवशी, रविंद्र सरोवरला, कोलकात्यातील प्रसिद्ध मानवनिर्मित तळ्याला भेट दिलेली असल्याने, तशाच दुसऱ्या, सुभाष सरोवरच्या सौदर्यीकरणाचा प्रकल्प सुरु झाल्याची बातमी, मी काल अगदी उत्सुकतेने वाचली. २०११ च्या जानेवारीपर्यंत तोही प्रकल्प पूर्ण होणार आहे. कोलकात्यातील पर्यटन स्थळात आणखी एक मोलाची भर पडणार आहे.
वर्तमानपत्रातील बातमीवरुन आठवले, गेली काही वर्षे, सिंगापूरमध्ये कशी मला वर्तमानपत्रांत देशाच्या प्रगतीच्या, विकास कामांच्या, मंत्र्यांच्या भाषणांच्या बातम्या वाचायची सवय झाली होती. चोरी, खून, भ्रष्टाचार अशा बातम्या असतील तर स्थळ न वाचताही ओळखावे की ती बातमी शेजारच्या देशांमधलीच असणार. स्वदेशातील जास्तीत जास्त सनसनाटी बातमी म्हणजे एखादा अपघात.अशा अगदी चिंच गुळातल्या अळवाच्या भाजीइतक्या मवाळ बातम्या वाचायची सवय डोळ्यांना आणि मनाला लागल्यावर भारतात परतल्यावर इथे पहिल्याच पानावर "शिल्डात माओवाद्यांचा पोलीस चौकीवर हल्ला ", "रेल्वे मंत्र्यांच्या राज्यात, त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी केलेली भाववाढीविरुद्धची निदर्शने ", "विमानतळ कर्मचाऱ्याने विमानतळावर केलेला ७ वर्षांच्या मुलीचा विनयभंग ", "विश्वविद्यालयातील मुलांच्या निदर्शनांमुळे न होऊ शकलेले वसंतोत्सवातील नाटक ", अशा सगळ्या बातम्या म्हणजे तिखटजाळ, झणझणीत, लालभडक रश्शाने जीभ भाजली जावी तसेच झाले. तिथे इतक्या चांगल्या चांगल्या बातम्या देऊन लोकांमधला जगण्याविषयीचा आशावाद वाढवतात असे म्हणावे की इथे अशा प्रकारच्या बातम्या पहिल्याच पानावर देऊन आयुष्यातील वस्तुस्थितीचे भान आणून देतात असे म्हणावे,तेच कळेनासे झाले.
आयुष्यातील सारी जहालता विसरण्यासाठीच तर इथे लोक सतत रोशोगुल्ला आणि मिष्टी दोही खात नसावेत?!!
-वृंदा
-खास ऋतुगंधसाठी,वंगभूमीतून, वृंदा टिळक.
ऋतुगंध वसंत -२०१०
No comments:
Post a Comment